Description
'स्वराज्यसूर्य शिवराय' ही माझी चरित्रात्मक कादंबरी मातृभारती या लोकप्रिय साइटवर पंचवीस भागामध्ये प्रकाशित झाली आहे. आतापर्यंत ही कादंबरी दहा हजार लोकांनी वाचली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा परिचय, त्यांच्या विविध पराक्रमाचे वर्णन, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, त्यांचा गनिमी कावा, धाडस, साहस, जीवाला जीव लावणारे सवंगडी, शत्रूला सळो की पळो करणारी नीती, अशा सर्व बाबींवर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केला आहे.
शेकडो वर्षे झाली परंतु श्री शिवाजी महाराजांची लोकप्रियता दिवसेंदिवस, उत्तरोत्तर वाढत आहे. शिवराय हे महाराष्ट्रातील जनतेचे दैवत आहे. सिनेमा, नाटक, कथा, कादंबरी, चरित्र, पोवाडे, गाणी इत्यादी कुठल्याही प्रकारात शिवरायांचे वर्णन पुढे येताच शिवभक्त क्षणभर थांबतो, पाहतो, गुणगुणायला लागतो. भक्तीभावाने महाराजांना वंदन करून मगच पुढे जातो. आबालवृद्धांना आवडणारे, भावनारे अनेक प्रसंग शिवरायांच्या जीवनात घडून गेले आहेत. शिवरायांच्या पूर्वीचा महाराष्ट्र, भोसले घराणे, शहाजी राजे भोसले यांचे पराक्रम,अफजलखानचा वध, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून चातुर्याने करून घेतलेली सुटका, पावनखिंडीत बाजीप्रभूने केलेला पराक्रम, मुरारबाजीचा साहसी पराक्रम, प्रतापराव गुजर यांनी केलेले जगावेगळे धाडस अशा शेकडो घटना पुन्हा पुन्हा शिवभक्तांना मंत्रमुग्ध करतात, स्फूर्तीदायी ठरतात.
जिजाऊ! शिवाजी महाराजांच्या मातोश्री! शिवरायांच्या जीवनात धाडसाचे, पराक्रमाचे, स्वराज्य स्थापनेचे बीजांकुरण करताना शिवरायांना धीर देणारे, मार्गदर्शन करणारे एक प्रमुख व्यक्तीमत्त्व! छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेकांनी लिहिले आहे. मी या कादंबरीच्या निमित्ताने एक उत्तुंग व्यक्तीत्त्व वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हे महत्वाचे चरित्र लिहिताना मातृभारती संस्थेचे मुख्य श्री महेंद्र भाई शर्मा, मातृभारती मराठी विभाग प्रमुख अनुजा कुलकर्णी आणि मातृभारतीच्या सर्व संबंधित यांनी सहकार्य केले त्यामुळेच हे करु शकलो. कादंबरी वाचून अनेक वाचकांनी भरपूर प्रतिसाद दिला या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद!
नागेश सू. शेवाळकर