तिन दिवसानंतर...
सकाळच्या कामाची सुरुवात झाली होती. हवलदार अजींक्यच्या टेबलावरच्या फाईल्स व्यवस्थित करत होते. तेवढ्यात सब इंस्पेकेटर अजींक्य जाधव केबीनमध्ये आले.
“गुड मॉर्नींग सर.”
“व्हेरी गुड मॉर्नींग, काल रात्रीत काही केस आली होती...”
“नाही सर... आणि तसंही विश्वकर्मा सर इथं होते, काल संध्याकाळ पासून.”
डोहिफोडे हवलदाराच काम झाल्यानंतर अजींक्यच्या टेबला जवळ उभं राहून तो बोलत होता.
“आता कुठं आहेत...? मी बाहेरुन आलो तर मला दिसले नाही?”
“ते अर्ध्या तासापुर्वीच गेले.”
बोलता बोलता अजींक्य त्याच्या खुडचीवर बसला.
“सर चहा सांगू का?”
डोहिफोडे बाहेरच्या दिशेने जात म्हणाला. अजींक्य होकारार्थी मान हलवून होकार देणार आणि “चहा आणा” असं म्हणनार तेवढ्यात एक वयस्कर दामपत्य त्यांच्या केबीनमध्ये आले. त्यांच्या सोबत हवलदार शिंदेही होते. त्या दांपत्य, नवरा बायकोच्या चेहेर्-यावर भिती दिसत होती. त्यांना घाबरलेले पाहून अजींक्यने आणि हवलदारने त्यांना बसण्यासाठी खुर्च्या पुढं सरकवल्या. अजींक्यने हवलदाराला पाणी आनण्याचा इशारा केला.
“अजोबा, शांत व्हा तुम्ही...”
अजींक्य त्यांना शांत करत होता तेवढ्यात हवलदार पाणीचे ग्लास घेऊन आला. त्यांना पाणी पिण्यास वेळ दिला आणि पाणी पिऊन झाल्यानंतर अजींक्यने त्यांना विचारले.
“एवढं घाबरण्यासारखं काय झालं?”
“साहेब, आम्ही एका आठवड्यासाठी बाहेर गेलो होतो. काल रात्रीच परतलो. सकाळ - सकाळी फोन आला. कोण बोलत होतं ते कळालं नाही पण त्याने सांगितलं की आमच्या अंगणात आमच्यासाठी त्याने काहीतरी सप्राईझ ठेवलं आहे. आधी मी त्याच्या बोलण्याकडं मी जास्त गांभिर्याने पाहिलं नाही. पण जेव्हा माझ्या बायकोला लॉनमध्ये ठरावीक भागात गवत नसल्याचे कळाले. ती माझ्याकडे आली आणि मला तिने तो प्रकार दाखवला. ती जागा अशी वाटत होती जणू आधी तिथं कोणीतरी खोदून पुन्हा तो खड्डा माती टाकून बंद केला असावा. ते पाहिल्यानंतर मी ती जागा फावड्याने खोदून पाहिली. त्या जागेवर एका मानसाचे मृतदेह पुरले होते. त्या मृतदेहाला पाहून आम्ही खुप घाबरलो. आणि वेळ वाया न घालवता आम्ही दोघं सरळ इथं आलो.” घाबरलेल्या स्वरात तो म्हातारा बोलला.
त्याचं बोलून झाल्यावर अजींक्यने वळून हवदारांकडं पाहिलं. हवलदारांना अजींक्यच्या मनात काय चाललं होतं त्याचा अंदाज आला होता.
“तुम्ही मला आधी हे सांगा तुम्ही कुठं राहता?”
अजींक्यने त्या दाम्पत्त्याला विचारले.
“रेल्वे स्टेशन मागून जो सनसिटीला रोड जातो, त्या रोडवरचा पहिला बंगला...”
“पांढरा बंगला, ज्याच्या मागच्या बाजूला अंब्याच्या झाडांची बाग आहे...आणि त्याच्या जवळ पास दुसरी घरं नाहीत तोच का?”
डोहिफोडे हवलदार त्यांच्या बंगल्याचा बरोबर पत्ता सांगितल्यावर त्या जोडप्याला आश्चर्य वाटले.
“तुम्हाला कसं कळालं?”
इंस्पेक्टराकडे पाहून हवलदार म्हणाला –
“सर, हा बंगला तर तोच आहे जिथं आम्हाला तो अमन घेऊन गेला होता.”
“अमन?... म्हणजे तोच ना जो आपल्याकडे आला होता, स्वतःच्या मैत्रिणीचा खुन केलं असं म्हणत होता...”
“हो सर, तोच अमन.”
“हो काय... तुम्ही तर म्हणाला होता की सगळीकडे पाहिलं होतं आणि तिथं काहीच सापडलं नाही म्हणून... मग ही डेड् बॉडी तिथं आली कशी?”
हवलदारने मान खाली टाकली. अजींक्यच्या प्रश्नाने एकाकी शांतता पसरली.
“उत्तर द्या.”
अजींक्य ओरडत म्हणाला.
“सॉरी सर, तुम्हाला तो अमन खोटा वाटत होता आणि आम्हालाही त्याच्या वागण्यावरुन असं वाटलं की तो आपला टाईम पास करत असेल. पण तरी आम्ही त्याने सांगितलेल्या जागेवर खोदून पाहिलं पण तिथं काहीही नव्हतं. म्हणून आम्ही बाकीच्या ठिकाणी पाहिलं नाही.”
“बाकीच्या ठिकाणी नाही तर ही डेड बॉडी तुमच्या खोदलेल्या ठिकाणीच आहे असं वाटतंय. मला वाटतंय आपण त्या अमनला खुपंच हलक्यात घेतलं आणि तुम्ही तुमचं काम न करुन खुप मोठी चुक केलीत... त्याच्या डिटेल्स् घेतल्या होत्या ना...”
“हो सर.”
दोन्ही हवलदार एका स्वरात बोलले.
“एक काम करा, त्याने यांच्या बंगल्या व्यतीरीक्त काही पत्ता दिला आहे का......”
“त्या बंगल्या व्यतीरिक्त आणखि एक पत्ता दिला आहे.”
“…. तर त्याने दिलेल्या पत्त्यावरुन त्याला शोधून आना. पण माझा अनुभव सांगतो की एक तर हा पत्ता तरी चुकीचा असेल किंवा तो या पत्त्यावरुन पळून गेला असेल. त्यामुळे त्याने मोबाईल नंबर दिलाय तो त्याचाच आहे का पाहा आणि जर तो मोबाईल नंबर त्याचाच असेल तर मला सांगा?”
“ओके सर.”
“... आणि शिंदेंना गाडी काढायला सांगा. पटवर्धनांच्या घरी जावं लागणार आहे.”
हवलदार बाहेर निघून गेला. इंस्पेक्टर त्या वयो वृध्द जोडप्याकडं वळाले.
“अमन तुमचा कोण लागतो?”
“कोण अमन? आम्ही कोणत्याही अमनला ओळखत नाही. आमच्या घरात फक्त आम्ही दोघंच राहतो.”
“हे खुप विचित्र वाटतं की तुम्ही आठवड्यासाठी बाहेर जाता आणइ त्याच काळात एक अनोळखी मानुस तुमच्या बंगल्याच्या लॉनमध्ये एक प्रेत पुरुन जातो... तुमच्या गेटला तुम्ही लॉक लावत नाही किंवा तुमच्या बंगल्याची राखन करण्यासाठी तुम्ही एक सिक्युरीटी गार्डसुध्दा ठेवत नाही. असं का... आणि विचार करण्यासारखी आणखिन एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही त्याला ओळखत नाही तर त्याने मृतदेह ठेवण्यासाठी तुमचाच बंगला का निवडला. तो दुसर्-या कोणत्याही बंगल्याच्या लॉनमध्ये तो पुरु शकला असता किंवा त्या ओसाड जागेवर कोठेही... आणि कोणाला कळालेही नसते. मग त्याने असं का केलं?”
अजींक्यच्या प्रश्नांना ऐकून त्या दोघांना घाम फुटला. काय बोलावे, त्यांना कळेना. त्यांनी आधी एकमेकांकडे पाहिले आणि नंतर मिस्टर पटवर्धन बोलू लागले.
“साहेब, खरंच आम्हाला यातलं काहीही माहित नाही. त्याने आमचाच बंगला का निवडला... आम्हाला नाही माहित. पण राहिला प्रश्न सिक्युरीटी गार्डचा, तर आम्ही एक सिक्युरीटी गार्ड नेमला आहे. दिवसासाठी एक आणि रात्रीसाठी एक. आज दिवसा येणारा सिक्युरीटी गार्ड आला नाही. त्याची तब्बेत खराब आहे. आणि रात्रीचा सिक्युरीटी गार्ड तर रोज येतोय. आणि कोणीही असो वा नसो. बंगल्याच्या गेटवर आम्ही ताळा लावलेला आहे.”
“असं कसं होऊ शकतो. तिन दिवसांपुर्वीच आमचे हवलदार तुमच्या बंगल्यावर जाऊन आलेत. त्यावेळी तिथं गेटवर कुलूप किंवा सिक्युरीटी गार्ड यांपैकी कोणीही नव्हतं.”
“साहेब, मी त्यांना बोलावून घेतो. तुम्ही त्यांनाच विचारा नक्की आम्ही नसताना इथं झालं काय होतं.”
“ते तर लवकरंच कळेल...” खुर्चीवरुन इंस्पेक्टर उठले आणि बाहेर निघतं ते म्हणाले - “चला... तुमच्या बंगल्यावर जाऊया.”
***
मिस्टर पटवर्धनांच्या बंगल्याच्या बाहेर...
पोलीसांची गाडी बंगल्याच्या गेट समोर थांबली. गाडीतून अजींक्य, पटवर्धन दांपत्य आणि दोन हवलदार एकामागून एक उतरले. मिस्टर पटवर्धन पोलीसांना गेटमधून आत घेऊन आले. पटवर्धन दांपत्याने पोलीसांनी त्यांनी खोदलेलं ठिकाण दाखवलं. बंगल्यासमोरच्या लॉनमध्ये नारळाच्या झाडासमोरच्या जागेवरती खोदलेली जागा होती. अजींक्यने हवलदाराकडे त्यांनी खोदलेल्या जागेबद्दल विचारले. त्यांनीही तिच जागा दाखवली जिथं त्या क्षणी खोदलेलं होतं.
“सर, आम्ही त्या दिवशी त्या अमनच्या सांगण्यावरुन याच ठिकणी खोदलं होतं.”
अजींक्य हवलदाराने सांगितलेल्या जागे शेजारी पायाने दाबून त्या जागेचे परीक्षण करु लागला. हवलदार आश्चर्यचकीत झाले होते.
“तुम्ही तिन दिवसां आधी इथं खोदलं.... परत तो खड्डा बुजवला होता का?”
“नाही सर.”
“म्हणजे तुम्ही त्याला मृतदेहाला लपवण्यामध्ये त्याची मदत केलीत...”
अजींक्यने मातीला हात लाऊन आजूबाजूची जमीन तपासली.
“सर, आम्ही असं काहीही केलं नाही... आम्ही त्याची का मदत करू...”
“तुम्ही मदत केली याचा अर्थ, त्याने तुम्हाला खोदायला सांगितलं, तुम्ही खोदलं आणि त्याने त्या खड्ड्यात मृतदेहाला पुरलं... राहूद्या, इथली जागा पुन्हा खोदा. खोदून आतुन त्या मृतदेहाला बाहेर काढून ठेवा. मी तोपर्यंत बंगल्याची तपासणी करतो.”
अजींक्य बंगल्याच्या मालका सोबत बंगल्यात गेला. हवलदारांनी गाडीतले हत्यारे काढली आणि खोदायला चालू केलं. पटवर्धनांनी आधीच खोदलेले असल्याने त्यांना जास्त खोदावं लागलं नाही. थोडीफार माती बाजूला केल्या नंतर मृतदेह सहज त्यांच्या नजरेस आले. त्यांनी त्या मृतदेहाला बाहेर काढले. त्या मृतदेहामधून घानेरडा वास येत असल्याने प्रत्येकजन नाकाला रुमाल लाऊन उभे राहिले होते.
“गाडीला बोलवलं का?”
अजींक्यने हवलदारांना विचारले.
“हो सर, बोलवलं होतं... येईल काही वेळात.”
“एक काम करा. या बंगल्याला सिल करुन घ्या....”
अजींक्य त्यांच्या बोलत असताना एँब्युलेंस बंगल्याच्या गेटमधून आत आली.
“पंचनामा झाला असेल तर डेड बॉडीला पोस्टमोर्टमला जाऊद्या. त्याचे रिपोर्ट संध्याकाळपर्यंत येईल. तिथून रिपोर्ट घेऊन या... आठवनीने.... आणि कोणाला तरी यांची फोटो आसपासच्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवायला सांगा. यांची मिस्सींग कंप्लेट आहे का पाहायला सांगा.”
“ओके सर.”
अजींक्यने त्या मृतदेहाला पुन्हा एकदा पाहिले. त्या मृतदेहाला घेऊन जात असताना अजींक्यने त्यांना थांबवले आणि मृतदेहाच्या जवळ जात काहीतरी आठवल्यासारखे करुन मृतदेहाच्या चेहेर-याच्या अनुसार सरळ होऊन पाहिले. त्याच्या बद्दल आठवल्या नंतर त्यांना जाण्याचा इशारा केला.
अजींक्य त्याच्याकडून झालेल्या चुकीवर दुःख व्यक्त करत होता. अमन त्यांच्याकडे तिन दिवसांपुर्वी आला होता, स्वतःच्या गुन्ह्याची कबूली दिली होती. पण त्याच्यावर विश्वास न करुन, तसेच त्यांच्याच हवलदारांच्या त्यांच काम योग्य प्रकारे न केल्याने ती परीस्थितीला सामोरे जावे लागत आहे असं त्याला वाटत होतं.
त्याने शिंदे हवलदाराला बोलवले. एँब्युलेंस जवळ गेलेले शिंदे हवलदार त्याच्याजवळ धावत आले.
“शिंदे, या मानसाचा फोटो कोठेही पाठवू नका. मला माहित आहे हा व्यक्ती कोण आहे... तरी कन्फर्म करण्यासाठी पुणे पोलीस स्टेशनला राकेश शर्मा बद्दल चौकशी करायला सांगा. त्याचा पत्ता मी देतो तुम्हाला.”
“सर तुम्ही ओळखता या मानसाला?”
“हं... ओळखतो...”
अजींक्य तिथून सरळ पोलीस स्टेशनला गेला. बंगल्याची सर्व बाजूंनी तपासणी करण्यात आली. त्यांच्या हाती काहीही लागलं नाही. तपासणी पुर्ण झाल्यावर हवलदार शिंदे तिथून हॉस्पीटलमध्ये गेले आणि तिथून पोस्ट मॉर्टमचे रिपोर्ट घेऊन पोलीस स्टेशनला आले. त्याने पोस्टमोर्टमचा रिपोर्ट अजींक्यला दिला. रिपोर्टप्रमाणे मृत्यू ३० नोव्हेंबरला झाला होता. अमन त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये १ डिसेंबरला आला होता. मृत्यूचे कारण त्या रिपोर्ट प्रमाणे धार धार हत्याराने गळ्यावर वार केल्याने झाले होते. अजींक्य हातात पोस्टमोर्टमचा रिपोर्ट घेऊन टेबलाला टेकून उभा होता. त्याने हवलदार शिंदेंना आत येताना पाहिले.
“शिंदे, त्या बंगल्यावरुन कोणत्याही प्रकारचे हत्यार सापडले का?... चाकू किंवा कोयता, अशा प्रकारचे हत्यार...”
“नाही सर, तिथून काहीही सापडलं नाही.”
अजींक्य पुन्हा त्या रिपोर्टमध्ये पाहू लागला. त्याला अचानक माझी आठवन आली.
“अं.... त्या अमनचं काय झालं..? तो सापडला का?”
“त्यालाच शोधायचं काम सुरु आहे. त्याने सांगितलेल्या पत्त्यावर शोधायला एक हवलदार गेला आहे.”
“त्याने पत्ता काय दिला आहे?”
“पुण्याचा पत्ता आहे...”
त्याच्या खिशातला कागद काढून शिंदेने अजींक्यच्या हातात दिले. त्या कागदावर त्याने मी दिलेला पत्ता लिहिला होता. त्या पत्त्याला वाचल्या नंतर अजींक्यला आश्चर्य झाले.
“याने जो पत्ता दिलाय, तो पत्ता राकेशच्या पुण्यातल्या घराच्या पत्त्याच्या खुप जवळचा आहे.”
“सर त्या राकेशला कसं ओळखता?”
“राकेश बर्-याच वर्षांपासून माझ्या ओळखीचा आहे. पैशेवाली पार्टी होती. त्याच्या बर्-याच गैरकानुनी कामांना मी करुन दिले आहे. आणि त्याने सुध्दा बर्-याचदा मला पैशांची मदत केली आहे. पण त्याला त्याच्या पैशांचा खुप अहंकार होता. त्याचाच पैशांनी त्याचा खुन केला असणार... जास्त वय नव्हतं याचं. जेम तेम माझ्या एवढाच होता.”
“मला वाटतंय त्या अमनने खुन करुन राकेशला कुठं तरी ओसाड जागेत पुरलं असतं तर कदाचित त्याबतने केलेला गुन्हा कोणालाही कळाला नसता. पण त्याने तर एवढे पुरावे मागे सोडले आहेत की...”
शिंदेंना मध्येच थांबवत अजींक्य म्हणाला -
“नाही शिंदे, हे एका कोड्याप्रमाणे आहे. खुन केला, त्या मृतदेहांना अशा बंगल्यात ठेवलं, जिथंली मानसं बाहेर गेली होती आणि त्या ते पुढच्या काही दिवसांपासून घरी येणार नाही हे माहित होते, त्यानंतर त्याची तक्रार करायला पोलीस स्टेशनमध्ये आला, त्याला माहित होते की आपण चुकणार आहोत आणि त्यानंतर... मला असं का वाटतंय की तो सारडणार नाही. कारण जो व्यक्ती एवढा अभ्यास करुन तिन व्यक्तींचे खुन करु शकतो तो व्यक्ती इतक्या सहजा सहजी सापडणार नाही. तरी तुम्ही त्याला शोधण्याचे पुर्णपणे प्रयत्न करा.”
“ओके सर...”
*****
त्या दिवशी वातावरणात गारवा होता. आकाशात लाल रंग सर्वत्र पसरला होता. सायंकाळची वेळ होती. निधी शांतपणे बसली होती. मी तिच्या शेजारी जाऊन बसलो. बर्-याच दिवसांनंतर तिच्याशी बोलणार होतो. मनात आनंद आणि ओठावर स्मित हास्य होते. मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. नेहेमीप्रमाणे ती शांतपणे माझं बोलणं ऐकत राहणार हे मला माहित होते.
“निधी तुझं एक बरं आहे. मी तुला या मतलबी जगापासून खुप लांब घेऊन आलोय. त्यामुळे तुला या जगातले दुःख स्पर्शही करत नाहीत... मी तुला दोष नाही देत. तुला दुःखाने स्पर्श करु नये म्हणूनच तर मी तुला इथं आणलं आहे. तू खुश राहावीस असं मला नेहेमी वाटतं. आणि मी तुला नेहेमी खुश ठेवीन...”
शेवटचं वाक्य बोलताना माझे डोळे भरुन आले. जुण्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या होत्या.
“तू फक्त माझ्याशी खोटं नव्हतं बोलायला पाहिजे.... तू माझ्याशी खोटं बोलून खुप चुकीचं वागलीस... मला तो दिवस आठवलं ना तरी इतकं वाईट वाटतं. तुझ्यावर मी किती विश्वास टाकला होता. तू सांगशील त्या गोष्टी मी डोळे झाकून करत राहिलो. कधीही विचारलं नाही, तू काय सांगतेस आणि का सांगतेस...”
डोळ्यातले आश्रृ गालावरुन वाहून खाली पडले. ओल्या गालांना पुसून मी तिच्याकडे पाहिले. खुप काही बोलायचं होतं तिला, पण आता शब्द ओठातून बाहेर पडत नव्हते. तिला तिथं सोडून मी निघालो. अंधारात वाट दिसत नव्हती. पण त्या वेळी मी त्याचा विचार केला नाही. मी फक्त चालत राहिलो. रागाच्या भरात बर्-याचं लांब निघून आलो होतो. मनातला क्रोध जास्त वेळ बुध्दीत राहू शकला नाही. तिला तिथं एकटीला सोडून माझं असं सोडून येणं योग्य नव्हतं. मी मागे फिरलो. ती तिथं त्याच स्थितीत बसली होती ज्यात तिला मी सोडून आलो होतो. मी धावत तिच्या जवळ गेलो. तीच्या चेहेर्-यावरील भाव जरासेही बदलले नव्हते. जणू मी तिला सोडून जाऊनही तिला माझ्याबद्दल राग आला नव्हता. मी तिला मिठी मारली.
“मला माफ कर निधी... जुण्या गोष्टींचा राग आला आणि... मला माफ कर...”
मी हळूवार तिला उचलले. पाच सहा पावलांवर असलेल्या माझ्या त्या पडक्या घरात घेऊन गेलो. घराच्या एका कोपर्-यात एक जुना बाथ-टब होता. त्या बाथ-टब वरील लाकडी फळी बाजूला ठेवले. त्या टबमध्ये त्या द्रव्यात तिला हळूवार सोडले. तिचं शरीर त्या द्रव्यात पुर्णतः बुडाल्यावर बाजूला ठेवलेली लाकडी फळी त्या बाथ-टबवर ठेवले. तिथेच कोपर्यात भिंतीला टेकून मी काय करत आहे याचा विचार करु लागलो. माझं वागण योग्य आहे का...¿ असा प्रश्न मी स्वतःलाच विचारत होतो.
***
अजींक्य बद्दल प्रत्येक माहिती करुन घेणे माझ्यासाठी खुप गरजेचं होतं. त्याच्यावर नजर ठेऊन होतो. मी जो प्लॅन बनवला होता त्यासाठी मी नसताना पोलीस स्टेशनमध्ये काय होत होतं, हे जाणून घेणे खुप महत्त्वाचे होते. पोलीस स्टेशन प्रमाणे अजींक्यच्या घरातही नजर ठेवने माझ्यासाठी गरजेचे होते. त्यामुळे मी त्याच्या घरात घडणार्-या घटनांवर नजर ठेऊन होतो. त्या दिवशी अजींक्य दबक्या पावलांनी घरात दाखल झाला. त्याच्या हातात दोन बॅग्स् होत्या. बॅग्स् कशाच्या होत्या हे फक्त त्यालाच माहित होते. ते कोणालाही कळू नये याची त्याने पुरेपुर काळजी घेतली होती. घरात आल्या बरोबर त्याला नेहाने पाहिले. नेहा अजींक्यची बायको होती. त्यांच लग्न नुकतंच दोन महिण्यांपुर्वी झालं होतं.
“आज इतक्या लवकर¿”
नेहा किचनच्या दारावर उभी राहून त्याच्याकडे पाहत होती. ती अजींक्यला पाहत असल्याचे त्याला माहित नव्हते. तिचा आवाज आल्यानंतर त्याने मान वळवली आणि ती कुठं आहे त्याचा अंदाज आवाजाच्या सहाय्याने लावला.
“नाही, मी लवकर आलो नाहीये. मला परत जायचं आहे.”
तो घाईने बेडरुम मध्ये गेला आणि कपाटात त्या बॅग लपवू लागला.
“परत जायचं होतं तर मग घरी कशाला आलात... आणि कपाटात काय ठेवताय¿”
“ते आहे काहीतरी... तुझ्या कामाचं काहीही नाहीये.”
त्याने कपाटाचे दार बंद केले आणि तो मागे वळाला. ती बेडरुमच्या दाराजवळ उभी राहून त्याच्याकडे पाहत होती. तिला पाहून अजींक्य थोडासा घाबरला. त्याला वाटलं तिने त्याला बॅग ठेवताना पाहिले.
“काय ठेवलंय त्यात¿”
नेहाच्या या प्रश्ना नंतर त्याच्या जिवात जिव आला. त्याने बॅग ठेवल्या आहेत हे तिला कळाले नव्हते. पण त्याच्या घरातून गेल्यानंतर मात्र ती कपाट उघडून पाहणार नाही असं कशावरुन... तिला काही सांगायचं की नाही याबद्दल त्याच्या मनात विचार चालू होता. अशा असमंजस मध्ये असताना घाबरलेल्या स्वरात त्याच्या तोंडून निघाले -
“आहे रे काहीतरी... बस ते तुझ्या कामाच नाही, एवढंच तू लक्षात ठेव.”
तो परत जाण्यासाठी निघाला होता. नेहा त्याच्याकडे तिरप्या नजरांनी पाहत होती.
“मला नाही सांगणार का¿”
अजींक्य तिला शेजारून दाराबाहेर गेला होता. तिचे शब्द कानी पडताल्या बरोबर तो जाग्यावर थांबला. नेहा त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली –
“कोणती चुकीची गोष्ट तर नाही ना त्या बॅगमध्ये¿”
“हे बघं... त्यात काहीही चुकीचं नाही. तू फक्त त्याला उघडून पाहू नकोस. माझ्या विश्वास ठेव.”
अजींक्य झपाझप पावले टाकत हॉलच्या दारा पर्यंतच गेला होता, तेवढ्यात नेहाने त्याला पुन्हा थांबवले –
“मला तुमच्यावर विश्वास आहे. पण तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही वाटतं...”
रुसल्याप्रमाणे तीचा आवाज आला. अजींक्य तिच्यावर प्रेम करत होता म्हणून तिला रुसलेली तो पाहू शकला नाही. तो नसताना जर तिने ती बॅग उघडली आणि तिला कळाले की त्या बॅगमध्ये काय आहे तर अनर्थ होण्यापेक्षा तिला काहीतरी सांगायला हवं, असं त्याला वाटलं.
“अगं नेहा,... ठिक आहेस, त्यात पैसे आहे. पण माझे नाहीत... पण तू हि गोष्ट कोणाला सांगू नकोस.”
“पण कोणाचे पैसे आहेत¿”
“माझ्या एका मित्राचे आहेत. त्याच्या घरात थोडा प्रोब्लेम झाला आहे . त्यामुळे त्याने हे पैसे माझ्याकडे दिले आहेत. तू फक्त कोणाला सांगू नकोस आणि या पेक्षा जास्त काहीही विचारू नकोस. कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये...”
त्याने दाराबाहेरच्या स्टँडमधून बुट काढले आणि त्यांना झटकू लागला.
“नाही, मी कोणालाही सांगणार नाही... पण एक काम करशील का माझं¿”
“हो सांग...”
“तुझ्या पोलीस स्टेशनशेजारच्या त्या मोबाईलच्या दुकाणातून माझ्यासाठी रिचार्ज आनशील¿”
तो बुट घालून तो उभा राहिला आणि नेहाकडे पाहून म्हणाला -
“उद्या मार ना रिचार्ज... आज मला नाही जमणार...”
“उद्या नाही रे... आजच हवंय. उद्या मला ठाणेला जायचंय.”
“ठाण्याला¿... का¿”
“माझ्या भावाला भेटायला जायचं आहे. उद्या सकाळी निघेन मी आणि संध्याकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत येईन परत.¿”
दारा समोर त्याने त्याची दुचाकी स्टेंडवर लावली होती. अजींक्य त्याच्या दुचाकीवर बसत म्हणाला –
“मी बघतो, जर रिचार्ज झाला तर करतो नाहीतर संध्याकाळी आल्या नंतर करतो...”
अजींक्यने त्याची गाडी चालू केली आणि पुढच्याच क्षणाला तो निघाला. नेहा तिच्या कामासाठी किचनमध्ये निघून गेली.
***
अजींक्य पोलीस स्टेशनमध्ये आल्या बरोबर सर्वजण उभे राहिले. हवलदारांनी त्याला सल्युट मारत त्यांना मिळालेल्या माहिती बद्दल सांगणार, तेवढ्यात अजींक्यने त्यांना आत येण्याचा इशारा केला. केबीनमध्ये जाऊन तो त्याच्या खुर्चीवर बसला. सर्वजण एकामागून एक आत आले. अजींक्य त्याच्यांकडे शांतपणे पाहत होता. पाचही हवलदार एका ओळीत उभे राहिले. काहीच्या हातात फाईल होत्या तर काही तसेच आले होते.
“काय काय माहिती गोळा झाली...”
अजींक्यचे शब्द कानावर पडताच त्यांच्या रांगात पहिल्या नंबरवर उभ्या असणार्-या अनुभवी हवलदार पुढे आले.
“पुण्यातल्या पोलीसांना राकेश बद्दल चौकशी करायला सांगितलं होतं. त्यांनी चौकशी केली. राकेश कामावर गेल्या पाच दिवसांपासून आला नाहीये. त्याचा फ्लॅटसुध्दा पाच दिवसांपासून बंद आहे. त्याला शेवटी त्याच्या सोबत काम करणार्-या त्याच्या मित्रांनी ३१ नोव्हेंबरला पाहिले होते. त्या दिवशी तो कामावरून लवकर घरी गेला होता. पण विचित्र गोष्ट आहे की त्याच्या मिसिंगची तक्रार कोणीही केलेली नाही. तिची बायको माहेरी गेली होती. तिला सुध्दा राकेशबद्दल कालच कळालं...”
“त्याची तक्रार करणार तरी कोण... त्याचं कोणीही नातेवाईक पुण्यात नाही आणि त्याने कोणालाही इतकं जवळं केलं नाही की कोणीही त्याची काळजी करेल... बायको माहेरी गेली होती, तर तिने गेल्या पाच दिवसात एकदाही राकेशला फोन केला नसेल का... तिला काहीही वाटलं नाही का, की तिचा नवरा गेल्या पाच दिवसांपासून तिला फोन करत नाहीये किंवा तिने केलेला फोन तो उचलत नाहीये...”
“सर, मला वाटतं की त्यांच्यात भांडण झाली असावी म्हणून तिने राकेशची चौकशी केली नसावी...”
“तिची चौकशी करायला हवी... ती कधी येणार आहे, डेड बॉडी घ्यायला¿”
“संध्याकाळ पर्यंत पोहोचेल ती”
शेजारी उभा असलेला हवलदार शिंदे पुढे आला आणि बोलू लागला.
“सर, तुमचा संशय बरोबर निघाला. त्या अमनने दिलेला पत्ता हा राकेशच्या फ्लॅटच्या जवळचाच निघाला. त्याने त्याचा खरा पत्ता होता. तो एका पत्ता हॉटेलचा होता. तो तिथं गेल्या पाच वर्षांपासून तिथंच राहत होता. त्याने तिन महिण्यांपुर्वीच ते काम आणि ती जागा सोडून गेला होता. त्यानंतर तो कुठं गेला हे त्या हॉटेलच्या मालाकालाही माहित नाही. त्याने आपल्याला दिलेला मोबाईल नंबरही त्याच्याच नावावर रजीस्टर आहे. पण सध्द्याला तो स्विच्च ऑफ दाखवंत आहे आणि स्विच्च ऑफ होण्या आधी त्याचा लोकेशन पटवर्धनांच्या बंगल्याजवळची दाखवतंय.”
अजींक्यला मिळालेल्या माहितीवर विचार करत तो शुण्यात पाहू लागला.
“सर, मला वाटतंय ही दोघं पुण्यातंच भेटली असावी आणि त्यांच्यात झालेल्या वादातून अमनने राकेशचा खुन केला असावा..”
हवलदार शिंदेनी त्याचे विचार व्यक्त केले.
“फक्त अंदाजावर काहीही निष्कर्ष काढणे, या क्षणी बरोबर राहणार नाही... त्या अमनचा फोन ट्रॅकींगवर ठेवा. कधी ओन झाला की लोकेशन काढा त्याचा. आणि राकेश किंवा अमनशी संबंधीत कोणी निधी नावाची मुलगी आहे का ते पण शोधा.”
अजींक्यचं आदेश मिळताच हवलदार त्यांच्या कामाला लागले. अजीँक्य त्या दिवसाला आठवत होता ज्या दिवशी मी त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो. तो मी त्याच्याशी बोललेला शब्दना शब्द आठवतं होता.
“सर, काही सांगायचं राहून गेलंय का¿”
डोहीफोडे हवलदारांनी अजींक्यला विचारले. अजींक्यने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला –
“मला असं का वाटतंय की अमनला मी आधीही कधीतरी, कुठंतरी पाहिलं आहे¿”
“सर मी आपल्या कडंच जुना रेकॉर्ड तपासू का¿”
“मला नाही वाटत, त्याच्या विरोधात आपल्या रेकॉर्डमध्ये काही सापडेल.... तरी एकदा पाहून घ्या.”
“ऑके सर.”
डोहीफोडे केबीनच्या दाराच्या दिशेने निघून गेला.
***