Bed room in Marathi Short Stories by Naeem Shaikh books and stories PDF | बेड रूम

Featured Books
  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

  • आखेट महल - 7

    छ:शंभूसिंह के साथ गौरांबर उस दिन उसके गाँव में क्या आया, उसक...

  • Nafrat e Ishq - Part 7

    तीन दिन बीत चुके थे, लेकिन मनोज और आदित्य की चोटों की कसक अब...

Categories
Share

बेड रूम

वेळ खुप विचित्र असतो. कसल्या परीस्थिती उत्पन्न करेल, काही सांगता येत नाही... कधी कधी परीस्थिती अशी येते की आपल्याला न आवडणारे काम, आपली इच्छा नसतानाही करावे लागते. असे अनुभव प्रत्येकाला येतच राहतात. मला असे अनेक अनुभव आले आहे. त्यातलाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो.

ही गोष्ट सहा वर्षांपुर्वीची आहे. त्यावेळी मी ११वी ला होतो. १० वी आणि १२ वी सारखा आभ्यासाचा टेंशन मला नव्हता. माझं रोज खेळायला जाणं, फिरायला जाणं, मस्ती करणं, हेच वर्षभर चाललं होतं. ११वीच्या वर्षात येणारी मजा ही फक्त त्यालाच कळते, जो वर्तमानात जगतो. कारण भूतकाळात जगणार्यांना १०वीला पडलेले कमी मार्क प्रत्येक क्षणाला आठवत असतात तर भविष्यात जगणार्यांना १२वीचा भूत घाबरवत असतो.

संध्याकाळची वेळ होती. दाराची बेल वाजली आणि मी दार उघडलं. समोर रोशनी होती. रोशनी आमच्या सोसायटीत राहणारी, १२ वीत आमच्याच कॉलेजमध्ये शिकणारी एक सुंदर मुलगी. तिच्या सुंदरतेने आमच्या सोसायटीमध्ये अनेकांचे शिकार केले होते. एखाद्या मानसाला स्वतःच्या सुंदरतेने बळी पाडून, त्या मानसाशी गोड गोड बोलून, त्याला तिच्या प्रेमाच्या पिक्चरचा ट्रेलर दाखवून त्याच्याकडून हवं ते काम करुन घेण्याची कला तिच्याकडे होती. माझ्या घराच्या दारासमोर तिला पाहून आधीतर मला भितीच वाटली. इतर वेळी आपल्याला लांबूनही ओळख न देणारी आज माझ्या घरी स्वतः चालत आली होती. आमच्यात सहसा बोलण्याचा प्रसंग आला नव्हता. ती मुलगी बॉयफ्रेंड बनवण्यासाठी सोसायटीत बदनाम होती. तिने सोडून दिलेले चार पाच मजनू सोसायटीत त्यावेळीही फिरत होते आणि आजही फिरत आहेत. माझी पहिली नजर तिच्या हाताकडे गेली. तिच्या हातात दोन जाड रजीस्टर होते.

“काय झालं रोशनी¿ आज असं अचानक.... आणि या वेळी...”

“तुला तर माहितंच आहे की १२वीची बॉर्डाची परीक्षा पुढच्या महिण्यात आहेत आणि आता जर्नल्स चेकींग चालू आहे. परवा बायो आणि केम चं जर्नल सबमिट करायचं आहे...”

ती गरीब गायी असल्या सारखी बोलत होती. विषयांची नावं उच्चारताच मला कळालं होतं की ही बाई आपल्याला त्या त्या जर्नल्समधल्या आकृत्या काढायला सांगणार आहे. मला आकृत्या काढता येत नाही असंही सांगता येणार नव्हतं. कारण मी आकृत्या खुप सुंदर काढतो असा प्रचार आख्ख्या सोसायटीत माझ्या मित्रांनी केला होता.

पण एक सुंदर आणि नाजूक मुलगी माझ्या घरापर्यंत आली होती. मोठी चालू प्रकाराची मुलगी असली तरी नाईलाजाने मी तिला म्हणालो –

“हो... मी काढून देईन त्या आकृत्या...”

हातातल्या जर्नलांपैकी एक जर्नल तिने माझ्या दिशेने पुढं केला. तो जर्नल जरा वजनाने जास्तच होता त्यामुळे त्याला धरून ठेवण्यासाठी मी दोन्ही हातांचा वापर केला. रोशनी माझ्या हाततला जर्नल उघडून म्हणाली –

“हा बायोचा जर्नल आहे. यात जास्त नाही फक्त ९३ आकृत्या आहेत... तुला फक्त त्यातल्या अवघड अवघड आकृत्याच काढायच्या आहेत. त्या आकृत्या फक्त ३२च आहेत.”

तिचा आकृत्यांच्या संख्येंबद्दलचा आभ्यास पाहून ठसकाच लागला.

“...आणि तो केमेस्ट्रीचा जर्नल¿”

“तो तर सौरभ पुर्ण करणार आहे...”

शेवटचं वाक्य बोलून ती निघून गेली. ती जात होती, आणि मी फक्त पाहतंच राहिलो. एका क्षणाला असं वाटलं की मला सुध्दा तिने इतरांसारखं वेड्यात तर काढलं नव्हतं ना

३२ आकृत्या...¡ मी माझ्या जर्नलमधल्या आकृत्या काढताना पंन्नास वेळा आपल्या शिक्षण व्यवस्थेला शिव्या देणारा... तिच्या ३२ आकृत्या कश्या काढणार. मी काही तिच्या जर्नलमधल्या आकृत्या काढल्याच नाही. दुसर्या दिवशी संध्याकाळी ती पुन्हा आली. तिला समोर पाहून काय उत्तर द्यावं, याचा विचार करू लागलो.

“झाल्या का आकृत्या काढून¿”

“अं... ते ... मी ... नाही काढू शकलो... कारण ... आज युनिट टेस्ट होती... तिचा अभ्यास करत होतो... त्यामुळे नाही काढू शकलो...”

तिचा चेहेरा पडला. ती नाराज झाली होती. तिला माहित होते की कॉलेजमध्ये कोणतीही युनीट टेस्ट नव्हती आणि मला आकृत्या काढायच्याच नव्हत्या म्हणून मी तिच्याशी खोटं बोलत होतो. पण मी तरी काय करणार होतो.

“इट्स ओके.”

असे शब्द उच्चारून ती निघून गेली. मला काही क्षणासाठी वाईट वाटलं. पण जर मी सुध्दा इतर मुलांन प्रमाणे तिच्या सौंदर्याचा दिवाना होऊन त्यावेळी तिची मदत केली असती, तर तिच्यासाठी वेडे असणार्यांच्या यादीत माझा सुध्दा समावेश झाला असता.

या घटनेला आठवडा होऊन गेला होता. मी त्या घटनेला पुर्णतः विसरलो होतो. रात्रीचं जेवन करुन सर्व मुलं फिरायला बाहेर निघाले. इतरांन प्रमाणे मी सुध्दा फिरायला बाहेर आलो. सर्वजण एका ठिकाणी उभे असताना अचानक रोशनी तिथं आली. कोणालाही याची कल्पना नव्हती. आमच्या गर्दी शेजारी उभी राहून माझ्याकडे पाहत होती. मी तिच्याकडे पाहतोय हे तिला कळताच तिने मला त्या गर्दीतून बाहेर येण्याचा इशारा केला. मी तिच्याजवळ गेलो आणि माझ्या मित्रांच्या त्या गर्दीत शांतता पसरली. ते तिरप्या नजरांनी माझ्याकडे पाहत होते.

“माझ्या सोबत थोड्या वेळासाठी माझ्या घरी येशील का¿... थोडं काम होतं... तू फ्री आहेस का¿ ”

“हो, मी आता फ्रीच आहे... पण काम काय आहे¿”

“जास्त काही नाही... तू चल...”

बोलता बोलता तिने माझा हात धरला आणि मला ओढत तिच्या घरी घेऊन जाऊ लागली.

“मी आलोच थोड्या वेळात...”

मी मागे वळून माझ्या मित्रांना म्हणालो. त्या क्षणी त्यांचे चेहेरे पाहण्यासारखे होते.

आम्ही तिच्या घरात दाखल झालो. मी आत जाताच सरळ सोफ्यावर जाऊन बसलो.

“इथं का बसला... आत ये.”

तिने बेड रुमच्या दिशेने इशारा केला. मी सुध्दा जास्त विचार न करत बेडरुममध्ये आलो. मला लवकरात लवकर बाहेर जाऊन मित्रांसोबत फिरायचे होते. मी तिथं पोहोचल्यावर बेडवरील गुलाबाच्या फुलांचे चित्र असणार्या बेडशिटकडे

पाहतंच राहिलो. लाल रंगाची बेडशिट मनाला मोहून टाकणारी होती. मी त्या मनमोहक बेडशिटकडे पाहत राहिलो आणि तेवढ्या वेळात ती कुठं गायब झाली कळालंच नाही. मी बेडवर बसून त्या बेडच्या गादीची पारख करत असताना तिने बेडरुममध्ये पुन्हा एकदा प्रवेश केला. तिच्या हातात एक मोठी कागदाने जिला झाकले होते अशी प्लेट होती.

“असा अवघडल्या सारखा का बसला आहेस¿... मागे सरकून बस... बी कम्फर्टेबल...”

तिच्या आदेशाचे मी पालन केले. मी मागे सरकून बसलो. तिने माझ्यासमोर ती प्लेट ठेवली आणि त्यावरचा पेपर काढला. प्लेटमध्ये तिन वाट्या होत्या. पहिल्या वाटीत चिवडा, दुसर्यात बासुंदी आणि तिसर्या वाटीत कसली तरी मिठाई होती. मी त्या पदार्थांना पाहून खुप खुश झालो. माझी एवढी सेवा कशाबद्दल चालू होती मला त्या क्षणी माहित नव्हतं.

रात्रीच्या साडे नऊ – पावणे दहाची वेळ होती. मला दिलेल्या पदार्थांना संपवण्याच्या नादात होतो. ती तेवढ्या वेळात कपडे बदलून आली. पांढरा रंग आणि त्यावर गुलाबी रंगाचे बदामाचे आकार असणारा नाईट ड्रेस तिने घातला होता. नाईट ड्रेस म्हणावा तसा झोपताना घालण्याच्या लायकीचा वाटला नाही. दिसायला तरी तंग होता. असो, प्रत्येकाची आवड ही वेगळीच असते.

मी माझ्या समोरच्या तिनही वाट्या रिकाम्या केल्या होत्या. तिने ती प्लेट उचलली आणि बेड शेजारच्या टेबलावर ठेऊन दिली आणि टेबलाखालच्या कप्प्यामध्ये तिने लपवलेले बायोलॉजीचे जर्नल बाहेर काढले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझी एवढी सेवा का चालली होती ते.

“हे बघं...” तिने जर्नल उघडला आणि मला दाखवंत म्हणाली –

“मासे... चारच आहेत आणि हा झिंगा... एवढ्याच आकृत्या काढायच्या आहेत...”

त्या परीस्थितीत नाही कसं म्हणनार. नाईलाज होता. हो म्हणालो. माझ्या तोंडातून होकार येताच तिने माझ्या हातात तिन वेगवेगळ्या प्रकारच्या पेंसिली दिल्या आणि खोडरबर घेऊन स्वतः माझ्या शेजारी बसली. मी आकृत्या काढण्यात मग्न होतो. तिच्याशी गप्पा न मारता मी माझं काम शांतपणे करत होतो. ती बेडवरुन उठली आणि बाहेरच्या दिशेने निघाली. मला वाटलं कदाचित ती बोर झाली आहे आणि टाईम पास करण्यासाठी बाहेर जाऊन येणार आहे. पण ती फक्त बेडरुमच्या दारापर्यंत गेली आणि बेडरुमचा दरवाजा बंद करुन आली. तिने असं का केलं असावं, असा मला प्रश्न पडला. अंदाज न लावता मी तिला विचारले –

“तू बेडरूमचा दरवाजा का बंद केला¿”

“आमच्या घरी आम्ही तरी असंच करतो. म्हणजे ज्या रुममध्ये आपण असतो त्या रुमचा दरवाजा आतून आणि ज्या रुममध्ये आपण नसतो त्याला बाहेरुन बंद करायचं.... आमच्या गावाकडेही सगळे असंच करतात.”

ती मुळची उत्तर भारतातील हाय-फाय सोसायटीत राहणारी फॅमीली होती. कदाचित करतही असतील असं... आपल्याकडं तर असं काही करत नाही म्हणून मला थोडंस खटकलं. पण नंतर मी विचार केला – जर कोणी अचानक आलंच, तरी त्याला आधी मेन डोर मधून म्हणजे हॉलमधल्या दारातूनच आत यावं लागेल. आणि तो दरवाजा बंद आहे. त्याला उघडायला जाताना बेडरुमचा दार उघडावाच लागेल.

माझ्याच बुध्दीच्या विचारांनी माझ्या मनाला लागलेल्या काळजीला नाहीसे केले. मी पुन्हा आकृत्या काढण्यात मग्न झालो आणि ती पुन्हा माझ्या शेजारी येऊन बसली. अचानक माझ्या मनाला एक शंका आली. मी तिच्या घरात आल्यापासून तिच्या घरातल्यांपैकी कोणीही दिसले नव्हते. त्यांचा सहा मानसांचा कुटूंब होता. ती आणि तिची बहिण, तिचे दोन भाऊ आणि आई वडील. एवढी मोठी फॅमीली आणि घराच कोणीही नाही. घरात फक्त ती आणि मी.

मी तो वाक्य पुन्हा एकदा उच्चारला, घरात फक्त ती आणि मी... त्या वाक्याने माझ्या हृदयाच्या स्पंदनांची गती आता वाढू लागली.

“घरात कोणी नाही का¿.... म्हणजे कोणी दिसलं नाही जेव्हा पासून मी इथं आलोय तेव्हा पासून..”

घाबरत घाबरत मी प्रश्न विचारला.

“पप्पांची नाईट आहे, पण जेवायला साडे दहाला येतीलंच आता. आणि मम्मी बाहेर फिरायला गेली आहे आणि बहिन आणि दोन्ही भाऊ शेजारच्या काकूंच्या घरात आहे...”

मला रोशनी सगळ्यांसमोरुन हाताला धरुन ओढत घेऊन आली होती. सगळ्यांना माहित होतं की मी तिच्या घरी आहे. पण ही गोष्ट जर सोसायटीमध्ये पसरली की मी रोशनीच्या घरात कोणीही नसताना गेलो होतो तर माझी खुप बदनामी होईल. तिच्या बॉयफ्रँड्सच्या यादीमध्ये माझं नाव घेतलं जाईल. एका सेकंदात मला कळून चुकले की मी किती मोठ्या संकटात सापडलो आहे. एव्हाना मी तिन मासे आणि एक झिंगा काढला होता. जर साडे दहाच्या आधी माझा शेवटचा मासा झाला नाही, तर तिचा पापा मला त्या माश्यांच्या जर्नलने धुलाई करेल. मी पटापट तो मासा उरकण्याच्या बेतात होतो. पण घाई-गडबडीत आकृती काढत असल्याने अनेकदा चुकत होतो. ती नकळंत तिच्या हातांनी मला स्पर्श करत होती. तो स्पर्श जरी काही नॅनो सेकंदाचा होता पण एक-एक स्पर्श माझ्या हृदयाचे आणखि दहा ठोके वाढवत होता. कसा बसा मी मासा पुर्ण केला. फक्त शेपटीला रेषा मारायच्या होत्या तेवढ्यात दारावर हात आपटण्याचा आवाज आला. घराला बेल बसवली असताना कोणी दारावर हात का आपटत असेल मी याचा विचार करत होतो. पण माझ्या लक्षात आले नाही की तो आवाज हॉलमधल्या दाराचा नसुन बेडरूमच्या दाराचा होता.

आम्ही बेडरुममध्ये येण्याच्या गडबडीत हॉलचा दार बंद केलाच नव्हता. तिनेही काहीही विचार न करता, अगदी सहजतेने दार उघडले. ती रोशनीची आई होती. मृत्यूला समोर पाहून कसं वाटत असेल, हे मला त्या दिवशी कळालं. तिची आई झपाझप पावलं टाकत माझ्या दिशेने आली. मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नच करणार नाही असं मनातल्या मनात ठरवलं. ती बेडजवळ आली आणि बेडवरची गादी उचलून गादी खाली ठेवलेली चावी घेऊन निघून गेली.

दोन मिनीटं माझ्या मनाला शांत व्हायला लागले. त्यानंतर रोशनीला मी विचारलं –

“कसली चावी होती¿”

“किचनची...”

“किचनला कुलूप लावता तुम्ही¿”

“हो... पप्पा नाईटला असले की साडे दहा वाजता येतात. मग तो पर्यंत किचनला कुलूप लाऊन ठेवतो.”

“किचन बंद असतं तर जेवन बनवता कसं... आणि तहान लागली तर¿”

“अरे वेड्या, जेवन बनवून झाल्यावरचं बंद करतो दरवाजा. आणि पाण्याचं काय... बॉटल असतात की हॉलमध्ये बेडरुममध्ये...”

तिच्या आईचं काम झालं असावं, त्या पुन्हा चावी ठेवायला आल्या. चावी ठेवून त्या दारा पर्यंत गेल्या आणि पुन्हा आमच्याकडे वळाल्या. मला वाटलं तिला कसला तरी संशय आला असावा. पण त्या म्हणाल्या –

“मी बाहेरून कडी लाऊन जाऊ का¿”

त्यांच्या त्या वाक्याने मला आश्चर्याचा धक्काच बसला. दुसर्याच क्षणाला मी ओरडलो.

“नाही काकू... मला घरी जायचंय.”

“मग आतून कडी लावा... दार चांगलं बंद करुन घ्या.”

मी तो दिवस कधीही विसरु शकलो नाही. दोन महिण्यांनंतर अचानक एक दिवस ती मला पुन्हा भेटली. तिची परीक्षा संपली होती. त्या वेळी मी तिला तोच प्रसंग माझ्या दृष्टी कोणातून सांगितला. त्यावर ती म्हणाली –

“चोराच्या मनात चांदण्या...”