(वाचकांनी हा अध्याय वाचण्या आधी सुरुवातीचे पाच अध्याय वाचावे. अन्यथा वाचकांना या अध्यायाचा अर्थ लागणार नाही.)
Chapter 6
सुरुवातीला मला वाटलं मी स्वप्न पाहत आहे, पण तिन चार वेळा बेल वाजल्यानंतर माझी झोप मोडली आणि मला कळालं की दाराबाहेर कोणीतरी उभं राहून बेल वाजवत होता. दार उघडलं तर समोर करीश्मा दिसली. यावेळी करीश्मा एका महिलेसोबत आली होती. माझ्या प्रश्नांची उत्तर जोपर्यंत करीश्माने मला दिली नसती, तोपर्यंत मी तिला घरात घेणार नव्हतो. पण आमच्यातलं भांडण तिच्या सोबत आलेल्या महिले समोर नको, म्हणून मी त्यांना घरात बोलवलं. तोंड धुतलं आणि कपडे बदलून बाहेर आल्याबरोबर करीश्माने विचारले.
“तू अजून झोपला होतास¿”
“रात्री झोपच लागत नव्हती. सकाळी नऊ वाजता झोप लागली म्हणून उठायला थोडा उशीर झाला.”
“दुपारचे दोन वाजलेत.”
हातात घातलेलं घड्याळ दाखवत करीश्मा म्हणाली.
“तुझ्या सोबत या कोण¿”
सोफ्या समोरच्या खुडचीवर बसत मी करीश्माला विचारले.
“ही माझी आई आहे. तुला भेटायचं होतं म्हणून घेऊन आले.”
त्यांना पाहून मला जास्त आनंद झाला नाही. तरी औपचारीकता दाखवत मी स्मितहास्य केले आणि म्हणालो.
“ओ, सॉरी. मी तुम्हाला ओळखलं नाही. त्याचं काय झालं ते...”
मला मध्येच थांबवत करीश्माची आई म्हणाली.
“तुम्ही सॉरी म्हणू नका. मला करीश्माने सांगितलं की तुमची स्मृती नष्ट झाली आहे. मी करीश्माला तिन दिवसांपुर्वी फोन केला होता. तेव्हा तिने सांगितलं की तुमचा अपघात झालाय आणि त्यात तुमची मेमरी पुर्ण गेली आहे. हिचे बाबा आणि मी इथं येणारंच होतो, पण करीश्माच्या वडीलांचं काम काही निघालं. म्हणून मला एकटीलाच यावं लागलं. काल दुपारी घरी पोहोचले. करीश्माला मी तुमच्याबद्दल विचारलं. तिने सांगितलं की आता जास्त काही त्रास नाहीये...”
बोलता बोलता त्यांनी पर्समधून गुलाबी रंगाचे पाकीट काढले. त्यात काही फोटो होते. त्या मला फोटो देत म्हणाल्या.
“... हे तुमच्या दोघांचे फोटो. जाताना धूवायला टाकले होते. येताना घेऊन आले.”
मी ते फोटो हातात घेऊन पाहू लागलो. पाच मधल्या तिन फोटोत मी, करीश्मा आणि करीश्माची आई, आम्ही सोबत दिसत होतो. करीश्मा काही न बोलता शांतपणे माझ्याकडे पाहत होती. माझे फोटो पाहून झाल्यावर मी फोटो करीश्माच्या आईला परत केले.
“तुमच्यात काही भांडण वगैरे झालंय का¿ आल्यापासून तुम्ही एकमेकांशी काहीच बोलला नाहीये.”
करीश्माच्या आईने आमच्या दोघांकडे पाहत विचारले. घरात आल्यापासून मी करीश्मासोबतच बोलत होतो, तरी सुध्दा तिच्या आईला असं का वाटावं की आम्ही एकमेकांशी काही बोलत नाही म्हणून. कदाचित करीश्माने आमच्यात जे काही झालं ते तिच्या आईला सांगितलं असावं. मी तिच्या आईला खरं खरं सांगितलं.
“तसं भांडण वगैरे काही झालं नाही. थोड्या गैरसमजूती झाल्यात...”
“गैरसमजूती¡ मग एकत्र बसायचं, एकमेकांशी बोलायचं, मनात काहीही ठेवायचं नाही, तेव्हा कुठं जाऊन गैरसमजूती दूर होतात. असं तुम्ही एकमेकांशी बोललाच नाही तर तुमच्यातल्या गैरसमजूती दूर कशा होणार.”
“आज संध्याकाळी मी येणारच होतो, करीश्माकडं. जी गैरसमजूत होती ती त्या पैशांना घेऊन होती. करीश्माला वाटलं की मी घरी एक कोटी रुपये घेऊन आलो होतो आणि ते हरवले आहेत आणि मला आजोबांच्या वाड्यावर काम करणाऱ्या मावशींनी सांगितलं की मी फक्त पंच्वीस लाख रुपयेच घेऊन गेलो होतो. पण काल संध्याकाळीच मला माझा एक मित्र भेटला. त्याने सांगितलं की मी एक कोटीच घेऊन आलो होतो पण ते पैसे मी परत वाड्यावर ठेवले आणि फक्त विस लाख रुपये घेऊन आलो. ते विस लाख रुपये मी त्याच्याकडे ठेवायला दिले होते. म्हणजे माझा एक रुपया सुध्दा कुठं गेला नाहीये.”
“बापरे, तुम्ही हे काय बोलताय. एक कोटी¡”
करीश्माच्या आईला एवढी मोठी रक्कम ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. करीश्माने तिच्या आईला एक कोटीबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. नातं वाचवण्यासाठी मी त्यांच्याशी खोटं बोललो होतो. माझ्या त्या खोट्या वाक्यामुळे करीश्माने पुन्हा माझ्याशी बोलायला सुरुवात केली.
“पण मग तू हे मला का नाही सांगितलं¿”
“अपघाताच्या आधी तुला का नाही सांगितलं, याबद्दल मला काहीच कल्पना नाही. पण काल संध्याकाळी मला कळाल्याबरोबर मी तुला सांगणार होतो. मग विचार केला की बऱ्याच दिवसांपासून मी तुझ्या घरी आलो नव्हतो. तर याच निमीत्ताने आपलं भेटनंही झालं असतं आणि तुला सांगणही झालं असतं.”
“जाऊद्या, तुमच्यातला गैरसमज दूर तर झाला ना. मला असं वाटतंय तुम्ही एकमेकांपासून लांब राहिलात तर तुमच्यात असेच गैरसमज होत राहणार. म्हणून एक काम करूया. याच महिन्यात तुमचं लग्न लाऊन देऊया.”
करीश्माच्या आईचं वाक्य संपताच आम्ही एकमेकांकडं पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणाला करीश्मा तिच्या आईचा हात ओढत म्हणाली.
“आई खुप लवकर होतंय. याच महिन्यात लग्न शक्य नाही. तयारी करायला वेळच मिळणार नाही.”
“मग काय करायचा विचार आहे तुझा¿”
“मला वाटतं या महिन्यात साखरपुडा करूया आणि पुढंच्या महिन्यात लग्न करूया. वाटलं तर महिन्याच्या सुरुवातीलाच करू, पण या महिन्यात नको.”
करीश्मा आणि तिच्या आईमध्ये बोलणं चालू होतं. माझं लक्ष त्यांच्या बोलण्याकडं नव्हतं. मी शुण्यात पाहत होतो. दाराच्या बेलने माझं मन भानावर आलं. करीश्माने जाऊन दार उघडलं. दारात पुन्हा तेच दोन पोलीस कॉन्स्टेबल उभे होते, जे आधीसुध्दा माझ्या घरी येऊन गेले होते.
“मिस्टर आदित्य आहेत का¿”
“हो आहेत.”
असं बोलून करीश्माने त्यांना घरात घेतले. त्यांना पाहून मी जाग्यावरून उठलो आणि विचारले.
“काय झालं¿ तुम्ही परत¿”
“तुम्ही आम्हाला काय सांगितलं होतं की रशमी आणि सलीलमधल्या भांडणातून रशमीची हत्या झाली आहे, सलीलने रशमीला मारून नदीत फेकलं आणि आम्हाला नदीतून सापडलेलं मृतदेह रशमीचं असेल म्हणून.”
“हो, मी हेच सांगितलं होतं. पण झालं काय¿”
“काय झालं¿ आम्ही ते मृतदेह रशमीच्या आजीला दिलं, त्यांनी त्याचा अंतीमसंस्कार केला आणि आज सकाळी चार वाजता रशमी तिच्या घरी परत आली आहे.”
करीश्मा आणि मला कॉन्स्टेबलच्या बोलण्याचा मोठा धक्का बसला. करीश्मा पुढं येऊन म्हणाली.
“पण हे कसं शक्य आहे. मेलेला व्यक्ती पुन्हा जिवंत कसा होऊ शकतो¿”
कॉन्स्टेबलांनी तिच्याकडे रागात पाहिले आणि त्यातला एक कॉन्स्टेबल म्हणाला.
“काय मॅडम्, तुम्ही तर म्हणाला होता की तुम्ही रशमीला ओळखत नाही. पण तिने तर सांगितलं की ती तुमच्याच ओफिसमध्ये काम करते आणि तुम्ही एकाच डिपार्टमेंटमध्ये आहात म्हणून¿”
“अं... ती... असेल आमच्याच ऑफिसमध्ये, आमच्याच डिपार्टमेंट असेल... पण सेक्शन वेगळा असेल... म्हणून मी पाहिलं नसेल.”
करीश्मा अडखळत बोलत होती. तिला घाम फुटला होता.
“कोणीही जिवंत झालं नाहीये. रशमी म्हणून ज्या मुलीला तिच्या आजीने पुरलं, ती दुसरीच कोणीतरी होती. तुमच्या एका चुकीमुळं आमच्याकडून खुप मोठी चुक झाली. याची तुम्हा दोघांना शिक्षा मिळेल.”
“पण आम्हाला शिक्षा का¿”
मी त्यांच्या जवळ जात विचारलं.
“तुम्ही दोघांनी पोलीसांची दिशाभूल केली आहे आणि हा एका प्रकारे तुम्ही गुन्हाच केला आहे. त्यामुळे तुम्हा दोघांना शिक्षा मिळणारच.”
“मी तर तुम्हाला फक्त माहिती दिली होती की रशमी गेल्या दहा बारा दिवसांपासून बेपत्ता आहे आणि कदाचित सलीलमने तिचा खुन केला असावा. पण तुम्हाला मिळालेले मृतदेहं हे रशमीचेच आहे हे मी सांगितलं नव्हतं आणि ते मृतदेह रशमीचं आहे, याची ओळख पटवणारी तिची स्वतःची आजी होती. त्यामुळे यात माझी किंवा करीश्माची काहीच चुक नाही.”
माझं बोलणं त्या दोन्ही कॉन्स्टेबलांना पटलं. त्यांनी एकमेकांकडं पाहिलं आणि त्यांच इशाऱ्यात काहितरी बोलणं झालं. त्यानंतर त्यांच्यातला एक कॉन्स्टेबल आमच्या दिशेने वळून म्हणाला.
“ते काही असो, पण आम्हाला आमच्या सरांच्या सांगण्यावरून, तुम्हाला शिक्षा द्यावीच लागणार आहे. आधी तुम्हाला पोलीस चौकीत घेऊन येण्याचा आदेश मिळालाय आम्हाला.”
“पण तुम्ही तुमच्या चुकीसाठी या दोघांना का शिक्षा देणार¿”
करीश्माची आई कॉन्स्टेबलला म्हणाली.
“एक मिनेट. तुम्ही आम्हाला कोणत्या चुकी खाली अटक करणार आहात किंवा कोणत्या चुकीसाठी शिक्षा देणार आहात ते तुमच्या नावाने लेखी द्या किंवा तुमच्या सरांकडून तसं लेखी आणा. माझे मामा वकील आहे. बाकीचं आम्ही तुम्हाला त्यांच्याशी बोलूनच काय ते सांगू.”
करीश्माचं बोलणं ऐकून कॉन्स्टेबलसुध्दा काहीसे घाबरले आणि आपापसात चर्चा करु लागले. त्यांनी आपापसात काहीतरी ठरवलं आणि म्हणाले.
“हे बघा, एका बाजूला तुम्ही आहात आणि दुसऱ्या बाजूला आमचे सर. आम्ही त्यांना सांगितलं होतं, आदित्यची स्मृती नष्ट झाली आहे. त्यामुळे त्यांच्या भूतकाळात काय झालं हे त्यांना आठवत नाहीये. मग त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही माहितीला स्टेटमेंट म्हणून त्याची नोंद करता येणार नाही. पण ते ऐकायला तयारच नव्हते. आज सकाळी रशमी पोलीसस्टेशनमध्ये आल्यावर तुम्हाला पकडून आणायला आम्हाला सांगितलं. आता जर तुम्ही जे काही सांगितलं तसं आम्ही त्यांना सांगितलं, तर जोपर्यंत तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये येणार नाही तोपर्यंत ते आम्हाला परत तुमच्याकडं पाठवतील. त्यामुळं तुम्ही एकदा येऊन, त्यांना भेटून, तुमची बाजू काय आहे ते सांगा.”
“आम्ही का पोलीस स्टेशनमध्ये जायचं¿ आम्ही तुमची मदत करण्याचा प्रयत्न केला ही काय आमची चुक आहे का¿ मान्य आहे माझ्याकडून रशमीला ओळखण्यात चुक झाली. ती बोडी खुप खराब झाली होती, ती ओळखू येत नव्हती. पण ही काही आमची चुक नाही.”
जी करीश्मा आतापर्यंत पोलीसांना घाबरून होती, ती करीश्मा आता कॉन्स्टेबलवर भडकली होती. ते दोन्ही कॉन्स्टेबल विचारात पडले. प्रत्येकाने आपापली जागा घेतली आणि कॉन्स्टेबलांना सोडून, बाकी आम्ही वयक्तीक विचार करू लागलो. बराच वेळ शांत राहिल्यानंतर त्यांच्यापैकी एक कॉन्स्टेबल म्हणाला.
“हे बघा मॅडम. तुम्हाला आम्ही मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवलं होतं. तुम्ही आला आणि त्या मृतदेहाला ओळखलं नाही, कारण तुम्ही खरंच त्या मृत महिलेला ओळखत नव्हता. पण जेव्हा तुम्हाला आम्ही रशमीबद्दल विचारलं तेव्हा तुम्ही म्हणाला की तुम्ही रशमी नावाच्या कोणत्याही महिलेला ओळखत नाही. आता जर त्या रशमीने हे कबुल केलं की तुम्ही तिला ओळखता तर मात्र शिक्षा तर होणार. काहीही झालं तरी तुम्ही पोलीसांना खोटी माहिती दिली आहे. कदाचित त्या व्यक्तीचा खुनही तुम्हीच केला असावा, असा संशय आमचे सर तुमच्यावर घेऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्या वकीलाकडं जायचं असेल, त्याच्याकडं जावा. आमचं काम होतं तुम्हाला सांगणं. आम्ही आमचं काम केलं.”
“तुम्हाला माहित नाहीये तुम्ही कोणाशी बोलताय. मी तुम्हा पोलीसांना कोर्टात घेऊन जाईन.”
करीश्मा तिचा मनातला राग व्यक्त करत होती. परंतू तिच्या चेहेऱ्यावरची भिती ती लपवू शकली नाही. तिच्या चेहेऱ्यावरून ती दंडाला किंवा पोलीसांना, यापैकी कोणालातरी नक्कीच घाबरली होती हे कळून येत होतं. मी त्या कॉन्स्टेबलला विचारलं.
“दुसरा काही मार्ग नाही का¿ म्हणजे हिचे मामा वकील आहे तर ते आमची मदत करूच शकतात ना, त्या हिशोबाने...”
मला मध्येच थांबवत करीश्मा म्हणाली.
“यांना काय विचारतोस. या सगळ्यातून माझे मामाच आपल्याला बाहेर काढतील.”
तिला तिच्या आईने मागे ओढले आणि शांत राहायला सांगितले.
“साहेब, तुम्ही हिच्या बोलण्याचा राग मनात घालून घेऊ नका. तुम्हालातर कळतंय ना की या सगळ्यात आमची काहीच चुक नाहीये म्हणून.”
तो कॉन्स्टेबल करीश्माकडे रागात पाहून म्हणाला.
“आम्ही आता यांची एकच मदत करू शकतो. इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो की आम्हाला या मॅडम सापडल्याच नाही. यांच्या ओफिसमध्ये शोधलं, घरी शोधलं, पण या कुठेही सापडल्या नाही. त्या नंतर काय करायचंय ते आमचे सरंच करतील.... आणि स्वतःला दंडापासून वाचवायचं असेल तर लवकरात लवकर तुमच्या मामांसोबत तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हा.”
“हो – हो. ही लवकरच हिच्या मामांसोबत पोलीस स्टेशनमध्ये येईल. हिचं झालं, पण मग माझं काय¿”
“तुमचं काय म्हणजे¿ तुम्ही चला आमच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये आणि आमच्या सरांना सांगा की तुम्ही खोटा स्टेटमेंट का दिला होता.”
“मी खोटा स्टेटमेंट कधी दिला¿ मी तर माझ्या मनातली एक शंका व्यक्त केली होती फक्त. मला माझ्या भूतकाळाबद्दल काय माहित.”
“मग तुम्ही कसं सांगितलं की रशमीचा खुन सलील करू शकतो म्हणून. रशमीने तर सांगितलं, सलील नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ती ओळखत नाही. मग तुम्ही आम्हाला खोटं का सांगितलं¿”
“मला माझ्या भूतकाळाबद्दल राहुलने जे काही सांगितलं, तेच मी तुम्हाला सांगितलं.”
“मग त्या राहुललापण घेऊन चला.”
“पण हे सगळं मीच त्याला सांगितलं होतं.”
“म्हणून मी सरांना सांगत होतो. ज्या मानसाची स्मृती नष्ट झाली आहे त्या मानसाचा स्टेटमेंटची नोंद करण्यात आणि त्याची चौकशी करण्यात काहीच अर्थ नाही. पण सरांनी माझं ऐकलं नाही. तुमच्या सांगण्यावरून सलीलला शोधायला निघालो. खुप शोधलं, पण तुमचा तो सलील काही सापडला नाही आणि आज रशमीने आम्हाला जे काही सांगितले त्यावरून असा अर्थ निघतो की तुम्ही अस्तीत्वात नसणाऱ्या व्यक्तींचं नाव सांगून पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.”
“पण मी कोणाची दिशाभूल कसा करेन. मलातर मी कोण आहे हे सुध्दा माहित नव्हतं. अशा स्थितीत मी मुद्दाम तुम्हाला खोटं का सांगेन¿”
“हे बघा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे. ते तुम्ही आमच्या सरांना जाऊन सांगा. त्यांनी तुमचं ऐकल्यानंतर त्यांना काही समजलं तर ठिक. नाहीतर तुम्ही सुध्दा यांच्या मामाची मदत घ्या. नाहीतर तुम्ही वेडे आहात, तुम्ही मानसीक रुग्ण आहात आणि तुमच्या मनाला येईल ते सांगता, हे सिध्द करा. म्हणजे वेड्यांच्या स्टेटमेंटवर कायदा कार्यवाही करत नाही. याने तुम्ही निर्माण केलेल्या सगळ्या झंझटीच मिटतील.”
तो कॉन्स्टेबल वैतागून बोलत होता. त्याचं बोलणं संपल्यावर सर्वजण शांत राहिले. पण त्याच्या मागे उभ्या कॉन्स्टेबलला काहीतरी सुचलं आणि तो पुढे येत म्हणाला.
“अरे ही बेस्ट आईडीया आहे. म्हणजे आपली कायमची कटकट मिटून जाईल. म्हणजे ज्याचा कोणाचा खुन झाला होता त्याचा मृतदेह तर गेला. हा वेडा आहे हे सिध्द झालं तर हा केसच बंद होईल. आपण या केसच्या अंतर्गत गोष्टींमध्येच गुंतलोय. खुन्याचा शोध तर लांबच राहीला. हा केस बंद झाला तर इतर केसवर जास्त फोकस करू शकतो.”
दुसऱ्यालाही त्याची ही युक्ती आवडली. दोघांच्याही चेहेऱ्यावर आनंदाची लहर पसरली. ते दोघंही माझ्याकडे आशेच्या नजरेने पाहू लागले. जर मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागलो तर त्यांचीच काय माझी सुध्दा कटकट दूर होईल या विचाराने मी त्यांना होकार दिला.
“मी तयार आहे. पण मला काय करावं लागेल¿”
“जास्त काही नाही. एखाद्या मनोरुग्नालयातून डॉक्टरांचा पत्र आणा. ज्यात असं लिहिलं असेल की तुम्ही त्यांचे पेशंट आहात आणि तुमचा उपचार त्यांच्याकडे चालू आहे. तुम्हाला वेगवेगळे भास होतात, ज्या गोष्टी अस्तीत्वातच नाहीत त्या गोष्टींना तुम्हाला दिसतात. त्यामुळे तुम्ही दिलेल्या माहितीला गंभीरतेने घेऊ नये. असा प्रमाणपत्र तुम्ही आमच्या सरांना दाखवा. बाकी हा केस कसा बंद पाडायचा ते आम्ही बघून घेऊ. तुम्ही असा लेटर किंवा प्रमाणपत्र घेऊन लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचा.”
ते बोलत असताना दाराची बेल वाजली. मी माझ्या जाग्यावरून पाय हलवले आणि दार उघडायला दाराजवळ आलो. दार उघडलं. पण समोर कोणीही दिसत नव्हतं. जेव्हा मी माझं डोकं दारातून बाहेर काढलं, तेव्हा दाराला लागून असणाऱ्या भिंतीसमोर चाळीशीचा एक माणुस उभा असलेला दिसला. त्याच्या एका हातात सुटकेस आणि दुसरा हात खिशात होता.
“कोण हवंय तुम्हाला¿”
“घरी कोण आहे¿”
“घरी मी आहे.”
माझं वाक्य पुर्ण होताच तो माझ्या समोर येऊन उभा राहिला. तो काही बोलणार त्याआधी घरात उभ्या दोन्ही कॉन्स्टेबलांना पाहून त्याने तोंड लपवले आणि रस्त्याच्या दिशेने पळून लागला. रस्त्याशेजारी त्याने त्याची गाडी उभी केली होती. धावत जाऊन त्याने गाडी चालू केली आणि तो निघून गेला.
“कोण होता तो¿”
मी दार लावत असताना कॉन्स्टेबलने मला विचारले.
“मला वाटतंय ज्या व्यक्तीचा मृतदेह तुम्हाला सापडाला. तिचा खुनी असावा. कारण त्याला मला भेटायचं होतं. पण त्याने तुम्हाला पाहिलं आणि तो पळून गेला. ”
“मग त्याला पकडलं का नाही¿”
“तुम्ही आताच तर म्हणाला की तुम्हाला ही केस बंद करायची आहे म्हणून. मग त्याला पकडून कशाला तुमच्या केसला नवीन वळन आणायचं.”
“कोणत्या दिशेने गेला तो¿”
त्यातल्या एका कॉन्स्टेबलने विचारले.
“त्या दिशेने गेला.”
तो गेलेल्या दिशेने मी हात दाखवत म्हणालो.
वाक्य संपताच ते दोन्ही कॉन्स्टेबल बाहेरच्या दिशेने धावले.
*****
त्याच संध्याकाळी....
राहुल संध्याकाळी कामावरून सरळ माझ्या घरी आला. दुपारी जे काही झालं ते मी राहुलला सांगितलं.
“.... हे तू बरं केलंस. माझ्या ओळखीत एक वेड्यांचं हॉस्पीटल आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडून तुला वेड लागलं असल्याचं सर्टिफिकेट घेऊन येऊया.”
राहुल खिशात त्या हॉस्पीटलचं कार्ड शोधत म्हणाला.
“तुझी ओळख म्हणजे¿”
“तसं नाही. मी माझ्या आजीला घेऊन गेलो होतो... अं... आता तर डॉक्टर नसतील आणि उशीरसुध्दा झालाय. जाऊन येणं होणार नाही. आपण उद्या सकाळी जाऊया.”
“उद्या सकाळी¡”
“हो उद्या सकाळी. का उद्या कुठं जायचंय का¿”
“हो उद्या महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे उद्या नाही जमणार.”
“स्वतःला पोलीसांपासून वाचवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काम काय आहे¿”
“आहे रे एक काम.”
मी त्याला टाळत होतो. पण त्याने विषयाच्या मुळाशी जात मला विचारायला सुरुवात केली.
“सांग की, कोणतं काम आहे ते. मला सुध्दा ऐकायचं आहे की नक्की तू उद्या काय करणार आहेस ते.”
तो विषयाला जास्त ओढणार याची मला खात्री होती म्हणून मी त्याला खरं सांगायचं ठरवलं.
“उद्या मी सायली सोबत तिच्या लग्नाचं सामान घ्यायला जाणार आहे.”
राहुल डोळे मोठे करत माझ्याकडे पाहून विचारलं.
“तुला सायलीच्या लग्नाचं सामान आणायला जायचं आहे¿ म्हणजे त्यानंतर जर पोलीसांनी तुला जेलमध्ये टाकलं किंवा पंधरा विस हजाराचा दंड लावला तरी चालले. पण उद्या सायलीच्या लग्नाची खरीदी करणं महत्त्वाचं आहे¿”
“मला माहित होतं तू असाच बोलशील. म्हणून मी तुला सांगत नव्हतो आणि तसंही उद्या काय तुला सुट्टी आहे का¿”
“नाही. पण मी सुट्टी काढणार आहे आणि आपण त्या डॉक्टरांकडं जायचंय.”
“पण का सुट्टी काढतोस¿ माझ्यासाठी तू आधीच बरेचदा सुट्ट्या काढल्या आहेस. तू माझी काळजी करू नकोस आम्ही जातो. आधी डॉक्टरांकडं जातो आणि नंतरच तिच्या लग्नाचं सामान घ्यायला जातो. तू मला त्या डॉक्टरचं नाव आणि पत्ता दे.”
त्याने रागात कोऱ्या कागदावर डॉक्टराचं नाव, नंबर आणि त्यांच्या हॉस्पीटलचा पत्ता लिहिला. त्याचा मुड बदलण्यासाठी मी विषय बदलत म्हणालो.
“मला काय वाटतं आपण करीश्माला जसं समजतोय ती तशी नसावी. कारण आज दुपारी ती तिच्या आईला घेऊन आली होती. तिच्या आईसोबत मी बोललो. तिच्या आईजवळ आमचे दोन तिन फोटो होते. त्यांनी गावाला जाताना धुवायला दिले होते. गावावरून परतताना त्यांनी ते आणले. मी तुला ते फोटो दाखवतो...”
“पण जावई फोटोग्राफर असताना तिने बाहेर का धूवायला दिले फोटो¿ तुझा फोटोस्टुडीयो काय मेला होता का¿”
“असेल त्यांचं काहीतरी. तुला एक सांगायचं होतं¿”
“सांगना मग¿”
तो चिढून बोलत होता. माझ्या मनात काय चाललं होतं मलाच कळत नव्हतं. विषयबदल्याच्या प्रयत्नात त्याला विचारलं खरं. पण कुठून आणि काय सांगायचं ते कळालं नाही. त्यावेळी त्याला माझ्या मनातली गोष्ट सांगणे योग्य होणार नाही असा विचार करून मी त्याला काहीही न सांगण्याचे ठरवले.
“सांग की आता. तू काहीतरी सांगणार होतास.”
“अं... काही खास नाही...”
जोपर्यंत मी त्याला माझ्या मनातली गोष्ट त्याला सांगणार नाही तोपर्यंत तो मला प्रश्न विचारतच राहणार. म्हणून ती गोष्ट लपवून त्याला मी दुसऱ्या गोष्टीबद्दल सांगायचे ठरवले.
“सायली म्हणाली होती की...”
“परत सायली¿ सगळं त्या सायलीचंच ऐक. माझं काही ऐकू नकोस.”
“तू तर खुपच सिरीअस झालास. मला सांग, आपण काही चुकीचं काम केलंच नाही. तर मग पोलीसांना का घाबरायचं. एक काम करू. उद्या संध्याकाळी तू कामावरून आलास की आपण जाऊ त्या हॉस्पीटलमध्ये.”
“नाही - नको. तसंही डॉक्टर संध्याकाळी नसतात. तू सायलीसोबत सकाळी जा आणि संध्याकाळी मला सांग की काय झालं ते.”
“चालेल. तर मी तुला काय सांगत होतो, की सायलीला मी सगळं सांगितलं की काय झालं गेल्या आठवड्याभरात आणि तिने एक मार्ग सुचवला आहे. एकनाथ काकांना पत्र लिहून पैशांबद्दल विचारायचे. त्यांना मी किती दिले ते तर माहित आहे. पण कदाचित त्यांना हे सुध्दा माहित असेल की बाकीचे पैसे मी कोणाला दिले होते किंवा कुठे ठेवले होते.”
“हं. हे योग्य राहिल. खरतर त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा आपल्यालाच विचारायला पाहिजे होतं.”
“कसं विचारणार. आपल्याला पैशाचा घोळ बालान्गीरला गेल्यावर कळाला होता.”
“तसं नाही. तू त्यांना किती पैसे दिले होते, त्याबद्दल विचारायला पाहिजे होतं. म्हणजे आपल्याला अंदाज लावता आला असता की आपल्याला किती पैसे शोधायचे आहेत.”
“चालेल, तर मी आता पत्र लिहितो आणि टपालपेटीत टाकून येतो.”
असं बोलून मी सरळ बेडरूममध्ये गेलो आणि पत्र लिहायला घेतले.
काही वेळा नंतर कपडे बदलून मी एकनाथ काकांसाठी लिहिलेले पत्र घेऊन बाहेर आलो. राहुल त्याच्या विचारात मग्न होता. मी त्याच्या समोर आल्यावर तो भानावर आला आणि त्याने विचारले.
“कुठं निघालास¿”
“तुला आताच तर सांगितलं होतं पत्राबद्दल. तेच पत्र टपालपेटीत टाकायला जातोय. येतोस का¿”
“चल.”
तो सोफ्यावरून उठला आणि आम्ही सोबत घराबाहेर पडलो.
*****
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता सायली तिच्या मैत्रिणीची स्कुटर घेऊन माझ्या घरी आली. तिला स्कुटर चालवताना पाहून मला स्वतःचीच लाज वाटली. ती मुलगी असुन स्कुटर चालवरत होती आणि मी मुलगा असुन तिच्या मागच्या सिटवर बसलो होतो. खरा फरक मुलगा – मुलगी यातला नव्हता. पण मुलगी मुलाला स्कुटरवरती फिरायला घेऊन गेली, ही गोष्ट त्या काळी ऐकाण्याची कोणाचीच मनस्थिती नव्हती, कदाचित माझीसुध्दा.
आम्ही सरळ कपड्याच्या दुकानात गेलो.
दोन मजली साड्यांचं दुकान होतं. एवढं मोठं दुकान चार चाकी गाड्या विकणाऱ्यांचं सुध्दा नसावं. मी तरी एवढं मोठं दुकान पहिल्यांदाच पाहत होतो. मी आधी पाहिलं असेलही, पण माझी स्मृती जाण्या आधी. सायली भिंतीवर लावलेल्या साड्यांमधून तिच्या आवडीची साडी शोधत होती. मी दुकानाच्या सजावटीकडे पाहण्यात मग्न होतो.
“ही साडी माझ्यावर सुट होतीये का¿”
अंगावर लाल रंगाची साडी गुंडाळून, स्वतःला आरश्यात पाहत तिने विचारले. साडीच्या किनाऱ्यावर सोनेरी रंगाचे भरत काम केले होते. साडी दिसायला आकर्षक वाटत होती.
“छान दिसतीये.”
“कोण मी का साडी¿”
आरशातून माझ्या पाहत, तिने एका डोळ्याची भुवई उडवत विचारले.
“अं... दोन्ही.”
“दोन्ही¿ निट बघं माझ्यावर ही साडी बिलकूल सुट करत नाहीये.”
“पण मला तर आवडली.”
“साडी चांगलीच आहे. पण माझ्यावर ती शोभत नाहीये.”
गुंडाळलेली साडी तिने काढली आणि जमीनीवर पसरवलेल्या पांढऱ्या गादीवर फेकून दिली.
“काका, साडी एकदम भारीतली दाखवा. पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे. येणाऱ्या काही दिवसात त्या संदर्भाचे दोन तिन कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी मला चांगल्यातली चांगली साडी दाखवा.”
“आणि मॅडम लग्नाची साडी¿”
“लग्नाच्या साडीसाठी माझी आई माझ्यासोबत येणार आहे. ती नसताना जर मी लग्नाची खरीदी केली तर ती मला मारूनच टाकेल. तुम्ही फक्त कार्यक्रमांसाठी माझ्यावर सुट होईल अशा साड्या दाखवा.”
तिची ऑर्डर ऐकल्यावर त्यांनी भिंतीवर लावलेल्या माहागातल्या साड्या काढायला सुरुवात केली. दुकानदार एक एक साडी काढत होता. सायली प्रत्येक साडीला हातात घेऊन नापसंत करून खाली ठेवत होती. दुकानातल्या महागड्या साड्या संपल्या पण सायलीला त्यातली एकही साडी आवडली नाही. शेवटची साडी नापसंत करून तिने खाली ठेवताच दुकानदार म्हणाला.
“मॅडम तुम्ही ज्या प्रकारच्या साड्या मागितल्या होत्या. त्यातल्या सगळ्या साड्या दाखवल्या. प्रत्येक रंगात, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये साड्या दाखवल्या आणि तुम्ही त्यांना रिजेक्ट केलंत.”
“माझ्यावर एक सुध्दा साडी सुट करत नाहीये.”
“आहो मॅडम तुमच्यावर बरेचश्या साड्या सुट होतात. खोटं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना विचारा.”
“आहो काका, मी यांचा मिस्टर नाहीये.”
मी समोर येत म्हणालो. सायली काही बोललीच नाही. ती फक्त माझ्याकडे हसून पाहत होती. दुकानदाराला त्याची चुक कळताच तो चुक सुधारत पुढे म्हणाला.
“माफ करा मला. पण तुम्हीच सांगा, यांच्यावर एकही साडी सुट होत नाहीये का¿”
मी सायलीला नापंसत साड्यांकडे पाहिले. त्यातल्या दोन साड्या हातात घेऊन मी म्हणालो.
“मला वाटतं सायली तुझ्यावर ह्या साड्या सुट होत आहेत.”
मी निवडलेल्या साड्या हातात घेऊन ती आरश्या समोर उभी राहिली. काही वेळ आरश्यात पाहिल्यानंतर तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली.
“म्हणून मी तुला सोबत आणलं होतं. चांगलं काम केलसं.”
तिच्या आवडीच्या साड्या घेऊन झाल्यावर आणि बाजारात आलो. बाजारातून काही वस्तू विकत घेतल्या. ज्या गोष्टींसाठी आम्ही तिथे गेलो होतो, त्या सगळ्या गोष्टी आम्ही घेतल्या. दुपार झाली. भुक लागली होती. संपुर्ण शहरात एकच चांगला आणि स्वच्छ असा हॉटेल होता. जेवणासाठी आम्ही तिथं जायचं ठरवलं.
बाहेर बगीचा, भिंतींवरील नक्षीकाम आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचा एक सारखा पोषाक, मनाला मोहून टाकणारे होते.
“मला असं वाटतं आज तुला माझ्या सोबत नाही, तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला सोबत असायला पाहिजे होतं. त्याला सोबत घेऊन यायला पाहिजे होतं.”
“तुला असं का वाटतं¿”
“कारण तुमचं लग्न काही दिवसांवर आलंय आणि अशा वेळी तुम्ही जितकं सोबत राहाल तितकं तुम्ही एकमेकांना समजू शकाल.”
“तुला माझ्यासोबत बॉअर होतयं म्हणून तर तू असं बोलत नाहीयेस ना¿”
“नाही – नाही. मला बॉअर होतोय म्हणून असं म्हणत नाहीये. आज काल सगळेच असं करतात म्हणून म्हणालो. आज काल दोनच पध्दतीचे लग्न होतात. एक म्हणजे लव्ह मॅरेज आणि दुसरं म्हणजे अरेन्ज्ड् लव्ह मॅरेज. आता अरेंज्ड् जरी असेल तरी नवरा बायको महिना दोन महिने आधी एकमेकांच्या प्रेमात पडतात. कदाचित औपचारीकता असेल, पण असंच करतात. तसंही अरेंज्ड्मध्ये ते दोघं एकमेकांना ओळखत नाही म्हणून त्यांनी लग्नाच्या आधी काही दिवस सोबत फिरायला जाणं, शॉपींगला जाणं, वगैरे करायला पाहिजे. असं मनोरमा मॅग्झीनमधल्या एका आर्टीकलमध्ये वाचलं होतं.”
ती पुन्हा हसली.
“काय करणार दिवसभर घरात बॉअर होत असतो. त्यामुळे टाईम-पास करण्यासाठी मी मॅग्झीन वाचतो.”
आम्ही दिलेली ऑर्डर आमच्या टेबलवर आल्याबरोबर आम्ही जेवायला सुरुवात केली. काही वेळाने मी तिला पुन्हा विचारलं.
“मग, बाकी लग्नाची तयारी झाली का पुर्ण¿”
“जवळ जवळ झाल्यात जमा आहे.”
“हूं. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला सोबत का नाही बोलवलंस¿”
“ते येऊ शकले असते तर मी त्यांनाच बोलवलं असतं. पण त्यांना सुट्टी मिळणार नाही आणि बाकी घरात दुसरं कोणी नव्हतं म्हणून तुला बोलवलं.”
“बरं केलंस मला बोलवलंस. नाहीतरी मी घरी बसल्या बसल्या बॉअरच होणार होतो. तसे तुझे होणारे मिस्टर काय करतात¿”
“पावडरच्या कंपनीत वर्कर म्हणून काम करतात.”
ती काहीशी नाराज झाल्यासारखी दिसत होती. म्हणून मी तिला विचारले.
“सायली. काय झालं. अशी अचानक...”
“काही नाही. असंच काहीतरी आठवलं.”
“मनात काही ठेवायचं नसतं, असं म्हणतात. मनात गोष्टी लपवून ठेवल्याने त्या मनात जखम निर्माण करतात आणि ती जखम दिवसेंदिवस वाढत जाते, असंसुध्दा म्हणतात. आता किती खरं किती खोटं ते माहित नाही.”
“असंच... विचार करत होते. काय आहे ना की माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या डोक्यावर नव्वद हजारांचं कर्ज आहे आणि त्यांच्या तिन हजाराच्या नोकरीनवर घर सांभाळून कर्ज फेडणं खुप कठीण होतं. पण प्रॉब्लेम आता कर्जाचा नाहीये. कारण त्यांना ७० हजार रूपये मिळतीत तर ते त्या पैशांतून त्यांच्यावरचा कर्ज फेडतील. प्रॉब्लेम असा आहे की त्यांचा पगार तिन हजार आहे आणि त्या पगारावर पाच जणांचा कुटूंब चालवणं त्यांना होत नाहीये. लग्नानंतर मी त्यांच्या कुटूंबात गेल्या नंतर त्यांच्या कुटूंबाची संख्या वाढून पाचची सहा होईल आणि उरलेली कर्जेची रक्कम... त्या पैशातून कसं घर चालवणार.”
“तू एवढी शिकलीस, तू नोकरीसुध्दा करते, तुला नोकरीचा अनुभवसुध्दा आहे. मग तू तुझी नोकरी लग्नानंतर चालू ठेव.”
“मी असं करू शकत नाही. मुलगी नोकरी करणारी नको, अशी त्यांची अट होती. त्या अटीला मान्य केलं, हुंड्याची रक्कम देण्याचं मान्य केलं, तेव्हा जाऊन माझं लग्न जमलं.”
“हुंडा किती¿ ७० हजार दिला ना¿”
तिने फक्त होकारार्थी मान हलवली. सगळी परिस्थिति माझ्या लक्षात आली होती. मी तिला म्हणालो.
“तुला माहित आहे का सायली. आपण हे जे काही खात आहोत ना, त्याच्या बदल्यात आपल्याला पैसे द्यावे लागणार आहेत. पण समज आपण या हॉटेलमध्ये जेवलो आणि यांनी आपल्याला जेवण केल्याबद्दल पैसे दिले तर¿”
“ते असं का करतील¿”
“समज त्यांनी केलं तर¿ माणसं इथं पैसे मिळवण्यासाठी येतील. इथल्या जेवणाची काहीच किम्मत राहणार नाही. तसं तुझं आहे. तुझ्याशी लग्न करण्यासाठी, तुझे घरचे समोरून पैसे देत आहेत. मग तुझ्याशी लग्न करणारा हा तुला बघून लग्न करणार नाही. तुझ्या घरच्यांनी दिलेल्या पैशांकडं बघून लग्न करेल. मग या सगळ्यात तुझी काय किम्मत¿ तुच विचार कर.”
“तू चुकीच्या पद्धतीने विचार करतोय. जेवणामध्ये आणि मानसामध्ये खुप अंतर असतं. हुंडा घेणं आणि देणं ही आपली प्रथाच आहे.”
“तुझ्या माहितीसाठी सांगतो की हुंडा घेणं आणि देणं गुन्हा आहे.”
“आणि ह्या गुन्ह्याची शिक्षा काय¿”
“ते मला माहित नाही. पण हा कायद्याने गुन्हा आहे एवढं मला माहित आहे आणि अप्रत्यक्षरीत्या त्या गुन्ह्याला तू प्रोत्साहन देत आहेस.”
“तुला काय वाटतं तू करीश्माकडून लग्न करण्यासाठी हुंडा घेतला नसशील का¿”
“मी का घेईन हुंडा. माझ्या नावावर एक कोटी रुपये आणि भला मोठा वाडा केला होता. मी ती संपत्ती सोडून आलो. मग तुला काय वाटतं, मी काही हजार रुपयांसाठी लग्नाच्या वेळी अट घालीन का¿”
“हूं... असं असेल तर तुझ्यासारखा नवरा सगळ्यांना मिळावा. पण सत्य हेच आहे की लाखो मुलांमध्ये एक मुलगा तुझ्यासारखा असतो, जो हुंडा घेत नाही.”
“म्हणजे मी लाखात एक आहे की काय.”
माझ्या त्या वाक्यावर आम्ही दोघं हसलो. हसनं थांबवून मी म्हणालो.
“काळजी करू नकोस. समाजात बदल होईल, फक्त प्रयत्नाची गरज आहे.”
माझं असं सकारात्मक दृष्टीकोणातून समाजाकडं पाहणं तिला आवडलं. त्या विषयातून बाहेर पडत तिला काहीतरी आठवलं.
“अरे मी तुला सांगायचंच विसरले की उद्या संध्याकाळी माझ्या घरी मी सगळ्या मित्र मैत्रिणींना बोलवलं आहे. तर तुला आणि करीश्मालासुध्दा यावं लागेल आणि राहुललासुध्दा घेऊन येण्याची जबाबदारी तुझीच. आई बाबासुध्या आज संध्याकाळ पर्यंत येतील. मी आपल्या क्लासमधल्या सगळ्या फ्रेंड्स्ला बोलवलं आहे. तू येशील तर तुझं त्यांच्याशी भेटणंही होईल आणि जुन्या आठवणीसुध्दा ताज्या होतील.”
“आठवणी ताज्या होतील का नाही माहित नाही. पण एक मात्र नक्की आहे की त्यांना भेटून या रिकाम्या डोक्यात काही आठवणींची भर पडेल.”
जेवण करून झाल्यावर सायलीने मला माझ्या घरी सोडलं आणि ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली.
दुपारचे तिन वाजले होते. मला हॉस्पीटलमध्ये पाचच्या आधी पोहोचायचे होते. पण राहुल कामावरून येण्याआधी मी परत घरी पोहोचणं मला शक्य होणार नव्हतं. म्हणून मी एका कागदावर राहुलसाठी संदेश लिहिला आणि तो कागद घराच्या दारावर चिटकवून हॉस्पीटलच्या दिशेने निघालो.
*****
संध्याकाळी साडे चार वाजता मी हॉस्पीटलमध्ये पोहोचलो. माझ्या हातात अर्धा तास होता. केसपेपर काढून मी डॉक्टरांना भेटलो.
“प्रॉब्लेम काय आहे¿”
“डॉक्टर मला वेगवेगळे भास होत आहेत. म्हणजे दोन आठवड्यां आधी माझा अपघात झाला होता. त्यात माझ्या डोक्यावर मार लागला आणि डॉक्टरांचं म्हणनं होतं की त्या मारचा परीणाम माझ्या मेंदूवर झाला आणि त्यामुळे माझी स्मृती पुर्णतः नष्ट झाली आहे. याला दोन आठवडे झाले...”
सोबत आणलेले रिपोर्ट्स मी त्यांच्यासमोर ठेवले. डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट्स पाहिले. ते पाहून झाल्यावर डॉक्टर मला म्हणाले.
“तुमच्याकडे पाहून वाटत नाही की तुमच्यासोबत असं काही झालं असेल म्हणून. असो, मला सांगा तुम्हाला कशा प्रकारचे भास होत आहेत¿”
“अस्तित्वात नसणाऱ्या माणसांना पाहिल्याचे भास होत आहेत. मला उपचार वगैऱ्यांची गरज नाही. कारण त्यासाठी माझ्यावर उपचार चालू आहेत. मला फक्त तुमच्याकडून लेखी हवंय की मला असा आजार आहे.”
“लेखी हवंय¿ कशासाठी हवंय¿ नोकरीसाठी की कोर्टातल्या खटल्यासाठी.”
“पोलीसांना दाखवण्यासाठी. मी त्यांना मर्डर केसमध्ये मदत करण्यासाठी पत्राद्वारे एका व्यक्तीबद्दल माहिती दिली होती. पण त्यांच्या चौकशीतून कळालं की तसा कोणी व्यक्ती अस्तीत्वातच नाही. त्या वेळी कळालं की मला होणाऱ्या भासांमधल्याच एका व्यक्तीची मी त्यांना माहिती दिली होती. त्यांनी तसं डॉक्टरांकडून लेखी पत्र आणायला सांगितलं आहे. म्हणून मी तुमच्याकडं आलो.”
“मग त्यासाठी माझ्याकडं येण्याची गरज काय. तुमचा उपचार ज्या डॉक्टराकडं चालू आहे त्याच्याकडून लेखी पत्र मागा. ते तुम्हाला लगेच देतील.”
“पण त्यांचा पत्र चालणार नाही असं म्हणाले. पोलीसांना फक्त मनोरोग चिकित्सकांकडचं पत्र हवंय.”
“पण मी तुम्हाला तुमच्या सांगण्यावरून पत्र देऊ शकत नाही. त्यासाठी मला तुमच्या तपासण्या कराव्या लागतील. मला पाहावं लागेल की तुम्ही जे काही सांगत आहात ते खरं आहे की खोटं.”
डॉक्टरांच्या वाक्यात “तपासणी” हा शब्द येताच माझ्या हृदयाचे ठोके वाढू लागले. आपण खोटं बोलत आहोत हे सत्य समोर येऊ नये याची भिती मनात लागून होती.
“पण डॉक्टर तपासण्यांची काय गरज¿”
“काय गरज म्हणजे¿ तुम्ही याआधी मनोरोग चिकित्सकाकडे गेला नाहीत. गेला असाल तर तसे रिपोर्ट्स दाखवा. तसे रिपोर्ट्स तुमच्याकडे नाहीत, म्हणून मला तुमच्या तपासण्या कराव्या लागतील. बिना तपासण्यांच्या मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लेखी पत्र देऊ शकणार नाही आणि तपासण्या आता करता येणार नाही. कारण मी आता जाणार आहे. तर तपासण्या उद्या सकाळीच होऊ शकतात.”
“पण...” मी स्वतःला वाचवण्याचा मार्ग शोधत होतो.
“... मला तर रात्रीचे भास जास्त होतात. मग सकाळी तपासण्या केल्या तर त्यात विकाराचा निदान होणारच नाही.”
“रात्रीचे भास होतात म्हणजे¿”
“म्हणजे मी त्या व्यक्तीला रात्रीच्या वेळी पाहिलं, जो व्यक्ती अस्तीत्वातच नव्हता. पोलीसांना मी माहिती पत्राच्या स्वरूपात दिली आणि तो पत्रसुध्दा रात्रीच्या वेळीच लिहिला होता. त्यामुळे मला असं वाटतं की मला फक्त रात्रीच्या वेळीच भास होत असणार किंवा रात्रीचाच काहीतरी त्रास असणार.... असं मला वाटतं.”
“चालेल, तर तुम्ही आमच्या हॉस्पीटलमध्ये ऍड्मिट व्हा. आमच्याकडे सगळ्या सुवीधा आहेत. रात्री तुम्हाला कोणत्याही प्रकारचे भास झाले तर ते आम्हाला लगेच कळतील.”
स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात मी मोठ्या संकटात अडकल्याचे मला जाणवले. माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्याने मला हॉस्पीटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं.
*****