विश्वनाथ नेरूरकर -एक स्फूर्तिस्थान
Amiita Salvi
१९८५ सालची गोष्ट आहे.आमच्या सोसायटीचा पाणीपुरवठा खूप कमी झाला होता. ५-६ वर्षांपूर्वी आम्ही नवीन फ्लॅट घेतला तेव्हा २४ तास पाणी मिळत होते. कमी -कमी होत दिवसातून फक्त १५ - २० मिनिटे पाणी मिळू लागले. आॅफिसला जाणा-या स्त्रियांपुढे तर मोठे प्रश्नचिन्ह होते. आॅफिसला जायला निघेपर्यंत नळाला पाणी नाही आणि घरी आल्यावरही नळ कोरडे. नवीन घर बघावे लागेल असे वाटू लागले. पण हा परिसर मुंबईतील इतर विभागांपेक्षा वेगळा होता. इथे इमारतींची गर्दी नव्हती. समोर रस्ता आणि मागे गर्द हिरवीगार झाडी असल्यामुळे मुंबईत असूनही एखाद्या पर्यटनस्थळाचा भास होत असे. त्यामुळे दाटीवटीने उभ्या असलेल्या इमारती पाहिल्या की घर बदलायला मन तयार होत नसे. श्री. विश्वनाथजी नेरूरकर नुकतेच विभागाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्याकडे ही तक्रार जाताच दुस-या दिवशी पहाटे ५.वाजता (जेव्हा महानगरपालिकेचे पाणी सोडले जाते तेव्हा) -काही संबंधित लोकांना घेऊन ते पहाणी करण्यासाठी आले. आजूबाजूला वस्ती वाढल्यामुळे पाण्याचा फोर्स कमी झाला होता हे त्यांच्या लक्षात येताच काही दिवसांतच अामच्या सोसायटीला पाण्याची नवीन पाइपलाइन मिळाली आणि आमचा पाण्याचा प्रश्न सुटला. यानिमित्ताने आमच्यासमोर जे व्यक्तिमत्व आले ते राजकारणी माणसाचे नव्हते तर सह्रदय समाजसेवकाचे होते. विभागातील लोकांचा एखादा प्रश्न इतक्या गंभीरपणे घेणारे नगरसेवक क्वचितच असतील.
हे विभागाविषयी झाले;त्या काळात मुंबईच्या लोकांना पाण्याविषयी एक मोठा प्रश्न भेडसावत होता. सहकारी गृहनिर्माण प्रकल्प मोठ्या संखेने उभे राहिले होते, पण ब-याच इमारतीना काहीना काही कारणास्तव आॅक्युपेशन सर्टिफिकेट मिळू शकले नव्हते. अशा इमारतींमधील घरांचा सभासदांनी ताबा घेतला होता पण नियमानुसार अशा इमारतीना महानगरपालिकेचे वाॅटर- कनेक्शन मिळू शकत नव्हते.या लोकांना टँकरने पाणी मागवून दैनंदिन गरजा भागवाव्या लागत होत्या. टँकरचे पाणी सतत मागवणे आर्थिक दृष्टया परवडणारे नव्हते शिवाय ते आरोग्याला हितकारक नव्हते. त्यावेळी श्री. नेरूरकर महानगरपालिकेमधे विरोधी पक्षनेते होते. अनेक संबंधीत लोकांनी त्यांची भेट घेऊन आपली समस्या त्यांना सांगितली. प्रश्न गंभीर होता. श्री. नेरूरकर यांनी हा प्रश्न महानगरपालिका सभागृहात मांडला. एक सुवर्णमध्य काढला गेला.नियमांमध्ये थोडा बदल झाला. ज्या इमारतीनाओ.सी.नाही अशा इमारतीना अधिक भार आकारून महानगरपालिकेचे पाणी देण्यात येऊ लागले. मुंबईच्या या रहिवाशांच्या दॆनंदिन जीवनाशी निगडित एक मोठा प्रश्न माणुसकीच्या दृष्टिकोनातून हाताळला गेला.
श्री विश्वनाथ रामचंद्र नेरूरकर यांचा जन्म ९-११-१९५२ रोजी कुडाळमधील नेरूर येथे झाला. त्यांना दिलीप नेरूरकर म्हणून जास्त ओळखले जाते. त्यांचे शिक्षण बोरिवली येथे झाले. पहिली नोकरी त्यांनी 'म्हाडा' मध्ये केली. त्यानंतर काही काळ ते 'रीचर्डसन हिंदुस्तान ' या कंपनीत होते. त्यानंतर 'स्पेन्सर ' मध्ये नोकरी करत असताना विभागातील लोकांनी त्यांना महानगपालिकेची निवडणूक लढविण्याची गळ घातली. कार्यकर्त्यानी सेवाभावाने निडणूककाळात काम केले. स्वतः पत्रके वाटली. बॅनर्स लावले. शिवसेना- शाखाप्रमूख म्हणून श्री नेरूरकर यांना त्यांनी जवळून पाहिले होते. त्यांची निर्णयक्षमता आणि धडाडी पाहून, जर या विभागात सुधारणा घडवून आणायची असेल; तर श्री नेरूरकर सत्तेत आलेच पाहिजेत हा निर्धार त्यांनी केला होता. कारण हातात अधिकार असल्याशिवाय मनाप्रमाणे काम करणे कठीण असते. ही निवडणूक मोठे आर्थिक पाठबळ नसतानाही केवळ कार्यकर्ते आणि मित्रमंडळी आणि परिसरातील लोकांच्या विश्वासाच्या पाठबळावर ते जिंकले.
१९७८ साली त्यानी ' ज्ञानदा ' शिक्षणसंस्था स्थापन केली होती दर रविवारी बोरिवली आणि आसपासच्या विभागांमधील मराठी माध्यमातील १० वीच्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले जाई. यासाठी डाॅ. जी . ए. देसाई, श्री. बी. एल. नागवेकर, श्री एस. एम. खटावकर, श्री. एस. वाय. गोडबोले आणि श्री.नाझिर खान यांच्यासारखे अध्यापन क्षेत्रातील दिग्गज येत असत.पहिल्याच वर्षी शालांत परीक्षेत या संस्थेतील पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. या हुशार विद्यार्थ्यांनी निवडणूक काळात श्री. नेरूरकर यांना मनापासून साथ दिली.
याच विभागात लहानाचे मोठे झाल्यामुळे बोरिवली विभागाची आणि येथील मोठ्या समस्यांची पूर्ण माहिती त्यांना नगरसेवक होण्याच्या आधीपासूनच होती. आणि या समस्या सोडविण्याचा संकल्प त्यांनी नगरसेवक होतानाच केला होता. येथील सर्वात मोठी समस्या वहातुकीची होती. बोरिवली पूर्व आणि पश्चिम विभाग रेल्वेने पूर्णपणे विभक्त केलेले होते. वाहने असोत वा येथील रहिवासी असोत रेल्वे फाटक ओलांडल्याशिवाय पलिकडे जाता येत नसे. जेव्हा फाटक बंद असे तेव्हा रस्त्यावर गाड्यांच्या लांब रांगा लागत. ज्यांना फाटक ओलांडायचे नाही अशा गाड्याही अडकून पडत. कधी -कधी तर या ट्रॅफिकमधे अर्धा - पाऊण तास जात असे.यात बसेस आणि स्कूल बसेसही असत. पूर्ण वेळपत्रक कोलमडून जात असे. जेव्हा फाटक उघडत असे तेव्हा रेल्वे वहातूक खोळंबून रहात असे.पायी फाटक क्राॅस करून जाणा-यांची दोन्ही बाजूनी येणा-या गाड्या चुकवताना तारांबळ उडत असे. रेल्वे अपघातांचे प्रमाण मोठे होते. कधी कधी एखादी गाडी फाटकातच उभी असे. कधी चालू होईल हे कळण्यासारखे नसे. कदाचित् २ मिनिटे किंवा २ तासही लागत असत. अशावेळी गाडीखाली वाकून लोक रेल्वे क्राॅस करत असत. नाइलाजास्तव हा धोकाही पत्करावा लागत असे. फाटक क्राॅस करणा-यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती ही सुदधा चिंतेची बाब होती.पश्चिम द्रुतगती मार्ग पूर्वेला आहे. त्यामुळे बोरिवली पूर्वेकडून पश्चिमेला जाणा-या वाहनाची संख्या अधिक असल्यामुळे वहातुक कोंडीची समस्या पूर्व बोरिवलीमध्ये जास्त होती. बोरिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल बांधणे ह्या प्रश्नाला श्री.नेरूरकर यांनी अग्रक्रम दिला. पण हा प्रश्न फक्त महानगरपालिकेच्या अखत्यारीतला नव्हता. त्यासाठी रेल्वे अाणि म्हाडासह अनेक खात्यांच्या सहमतीची आवश्यकता होती.श्री. नेरूरकर यांनी सर्व संबंधित खात्यांच्या अधिका-यांशी चर्चा करून आवश्यक ऒपचारिक गोष्टींची पूर्तता करून बोरीवली पूर्व - पश्चिमेला जोडणा-या फ्लाय-ओव्हर ब्रिजला मंजुरी मिळवली. पण पुढेही अनेक अडचणी होत्या. पुलाच्या मार्गात अनेक घरे येत होती. वर्षानुवर्षे तेथे राहिलेले रहिवाशी घरे सोडायला तयार नव्हते. कुठे रहावे लागेल, पर्यायी घर कुठे मिळेल?कधी मिळेल ? अशा अनेक शंका त्यांच्या मनात होत्या. श्री. नेरूरकर यांनी त्यांच्यातील काही तरूणांना विश्वासात घेतले , पूल होण्याचे महत्त्व त्यांना पटवून दिले. याच विभागात पर्यायी जागेची हमी दिली.त्यांच्या मनातील साशंकता दूर केली. या रहिवाशाना जराही विलंब न करता तयार इमारतींमध्ये हक्काच्या जागा दिल्या. १९९५ साली उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले.या नेत्रदीपक उड्डणपुलाला भारताचे पहिले लश्करप्रमूख 'जनरल करीअप्पा' यांचे नाव देण्यात आले. या ' जनरल करीअप्पा उड्डाणपुला'मुळे फक्त पूर्व आणि पश्चिम बोरिवली विभागाची समस्या दूर झाली नाही; तर आसपासच्या मोठ्या परिसरातील वहातुकीची समस्या दूर झाली. या पुलापासून पश्चिम द्रुतगती मार्ग जवळ आहे. त्यामुळे तो सर्व प्रकारच्या वहातुकीला अत्यंत सोईस्कर आहे. एका लहानशा जिन्याने हा पूल स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला जोडला गेला आहे.येथील रहिवाशाना स्टेशनच्या गर्दीत जायची गरज भासत नाही.
उड्डाणपुल झाला पण काही लोकांसाठी फाटकातून ये- जा करणे अपरिहार्य होते, फाटक आणि उड्डाणपूल यांमधे बरेच अंतर होते. त्यामुळे या पुलावरून पलीकडे जाणे प्रत्येकाला सोईस्कर नव्हते. रेल्वेच्या आॅथाॅरिटीजशी याबाबत चर्चा करून श्री. नेरूरकर यांनी सब-वे साठी प्रयत्न सुरू केले.लवकरच सब-वे झाला आणि फाटक पूर्णपणे बंद झाले.
श्री.नेरूरकर जेव्हा काॅर्पोरेटर झाले तेव्हा विभागामध्ये स्वच्छतेच्या प्रश्नाने गंभीर रूप घेतले होते. मुंबईत जिथे मोकळी जागा दिसेल तिथे झोपड्या उभारल्या जातात. आमचा विभागही याला अपवाद नव्हता संपूर्ण मोकळी जमीन गेल्या काही वर्षांमधे झोपड्यांनी व्यापून टाकली होती. इतर काही व्यवस्था नसल्यामुळे प्रातर्विधी रस्त्यावर केले जात होते. रस्त्यांवरून चालणेही मुश्किल झाले होते. संपूर्ण परिसराला गलिच्छ कळा आली होती. रहिवाशांच्या अारोग्यालाही धोका उत्पन्न झाला होता. एवढ्या झोपड्या हटवणे अनेक कारणांमुळे अशक्यप्राय गोष्ट होती. श्री.नेरूकर यांनी ही अस्वच्छता हटवण्याचा निर्धार केला. या झोपड्यांसाठी ५०० 'स्वच्छतागृहे ' बांधली गेली. यामुळे या वस्त्यांमधील लोकाची सोय तर झालीच पण आसपासचा परिसर अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या विळख्यातून मुक्त झाला. अशाप्रकारे ' स्वच्छ भारत मिशन' ची सुरूवात आमच्या विभागात कोणतीही जाहिरात न करता , गाजावजा न करता श्री.नेरूरकर यांनी तीन दशकांच्या आधीच केली होती.
अशाप्रकारे श्री. नेरूरकर यांनी आमच्या विभागाचा संपूर्ण कायापालट केला. त्याचबरोबर नागरिकाच्या सुख- सुविधांकडेही लक्ष पुरविले. ज्येष्ठ नागरीक, स्त्रिया , विद्यार्थी यांना रेल्वेचे ब्रिज ओलांडणे, ट्रेनमध्ये चढणे - उतरणे त्रासदायक असते. गर्दीतून प्रवास करणे सगळ्यानाच जमते असे नाही. यासाठी बोरिवली- पूर्वमधील. 'मागठाणे' येथे बस डेपो सुरू करण्याचे ठरले . पण म्हाडाच्या 'मागठाणे' येथील बस डेपोसाठी निर्धारित केलेल्या जागेवर. १५०० अवॆध झोपड्या उभ्या राहिल्या होत्या. या झोपड्या पाडल्याशिवाय बस- डेपो बांधणे शक्य नव्हते. श्री.नेरूरकर यांना पोलीस आणि महापालिकेचे पथक आणून या झोपड्या पाडून जागा मोकळी करून घ्यावी लागली. हे करताना त्यांनी झोपडपट्टी दादांचीही पर्वा केली नाही. हा डेपो झाल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी रिकामी सुटणा-या बसेस मिळण्याची सोय ज्येष्ठ नागरिकांसाठी झाली. शाळा काॅलेजमध्ये जाण-या विद्यार्थ्यांनाही या डेपोमुळे खूपच फायदा झाला.
बोरीवली -पूर्व विभागात शाळा कमी होत्या आणि वस्ती भरपूर वाढली होती. मागाठाणे येथील म्युनिसिपल स्कूल, १२ वी पर्यंत शिक्षण देणारे योजना विद्यालय इत्यादी शाळा श्री.नेरूरकर यांच्या प्रयत्नाने चालू झाल्या. याशिवाय मागाठाणे येथील सेंट जाॅन स्कूल स्थापन करण्यासाठी त्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शाळा -प्रवेशाचा प्रश्न सुटला .या शाळांमुळे सुमारे ३०००. विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली.शिवाय. लहान मुलांना कुठे लांब बस किंवा रिक्षाने शाळेत जायची गरज राहिली नाही.
त्यावेळी बोरीवली आणि आजूबाजूच्या मोठ्या परिसरात मनोरंजनासाठी बरीच चित्रपटगृहे होती, पण नाट्यगृह मात्र नव्हते.येथे रहाणारा मराठी आणि गुजराथी माणूस नाट्यरसिक आहे पण नाटक पहायचे असेल; तर पार्ल्याला 'दीनानाथ नाट्यगृह ' किंवा दादर येथे ' शिवाजी मंदीर ' पर्यंत जावे लागे. वेळही जाई आणि दगदग होत असे. शिवाय रात्रीच्या नाटकांच्या वेळा परतीची गाडी पकडण्याच्या दृष्टीने गॆरसोईच्या असत. लोकाग्रहास्तव श्री. नेरूरकर यांनी नाट्यगृह बांधले जावे यासाठी प्रयत्न सुरू केले. तेव्हाचे म्युनिसिपल कमिशनर, श्री. शरद काळे यांच्यासमोर नाट्यगृहाचा प्रस्ताव ठेवला. महापलिकेच्या प्राथमिकता यादीमध्ये शिक्षण, आरोग्य इत्यादी गोष्टीना प्राधान्य देण्यात आले होते.नाट्यगृहासाठी मंजुरी मिळणे तितकेसे सोपे नव्हते. पण श्री.नेरूरकर यांना नाट्यगृहाची योजना मंजूर करून घेण्यात यश मिळाले. आणि बोरिवली - पश्चिम येथे ' प्रबोधनकार ठाकरे ' नाट्यगृह उभे राहिले. या सुसज्ज नाट्यगृहामध्ये दर्जेदार मराठी आणि गुजराथी नाटकांचे प्रयोग होतात.अनेक कलाकारांना या नाट्यगृहामुळे वाव मिळाला आहे. मुंबईतील अत्यंत उत्कृष्ट नाट्यगृहांपॆकी हे एक आहे.बोरीवलीतील मराठी आणि गुजराथी नाट्यरसिकांसाठी हे एक वरदान ठरले आहे.
श्रीयुत नेरूरकर यांनी सत्यात उतरवलेले त्यांचे आणखी एक स्वप्न म्हणजे ' शिवसेवा सामाजिक शिक्षण संस्था ' . परिसरातील नागरिकांसाठी आणि विद्यर्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम येथे राबविले जातात. काॅम्प्यूटरचे ज्ञान ही काळाची गरज आहे . म्हणूनच येथे काँप्यूटरचे मोफत शिक्षणवर्ग घेतले जातात. अनेक प्रॊढही येथे काँप्यूटर शिक्षणाचा लाभ घेतात. येथे क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जाते. तज्ज्ञ आणि अनुभवी प्रशिक्षक मुलांना मार्गदर्शन करतात. अनेकांना येथील क्रिकेट कोचिंगचा फायदा झाला आहे. येथे क्रिकेटचे प्राथमिक धडे घेतलेला 'रोहित शर्मा ' आंतरराष्ट्रीय कीर्तीचा क्रिकेटपटू आहे; तर राज्यस्तरावर ' पूनम राऊत ' लेडीज टीम मधून खेळत आहेत.
या संस्थेमध्ये स्वसंरक्षणाचे महत्व लक्षात घेऊन, मुला - मुलीनां ज्यूडो -कराटेचे प्रशिक्षण दिले जाते. सु्ट्टीच्या दिवसांमध्ये अभिनयाचे वर्ग घेतले जातात. नावाजलेले नट आणि दिग्दर्शक मुलांना अभिनयाचे धडे देण्यासाठी बोलावले जातात. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि वक्तृत्वकलेच्या विकासासाठीही या वर्गांचा उपयोग होतो.
रहिवाशांसाठी येथे आरोग्य- शिबिरे घेतली जातात. रक्तशर्करा, ब्लड प्रेशर, इत्यादी तपासण्या केल्या जातात, डोळे तपासून मोफत चष्मे दिले जातात. विशेशतः गरीब परिस्थितीतील लोकांना आणि वरिष्ठ नागरिकांना या शिबिरांचा भरपूर फायदा होतो.येथे रक्तदान शिबिरेही आयोजित केली जातात.
' शिवसेवा' मध्ये सीनियर सिटिझनशिप क्लब उत्तम प्रकारे चालवला जातो. आठवड्यातून एकदा - बुधवारी ज्येष्ठ नागरिक येथे एकत्र जमतात. वाढदिवस - लग्नाचे वाढदिवस साजरे केले जातात. सण, सहली यांचा आनंद घेतला जातो. पावसाळ्यात छत्र्यांचे वाटप केले जाते. वक्तृत्व, वाचन इत्यादींमध्ये प्रत्येकाला भाग घ्यावा लागतो. घरी जाताना येणा-या बुधवारच्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाते. येणारा पूर्ण आठवडा कार्यक्रमाच्या तयारीत जातो.त्यांनी आनंदी रहावे आणि त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी यासाठी याचा उपयोग होतो. या सगळ्यांना 'शिवसेवाविषयी ' खूप आत्मीयता वाटते. बुधवार कधी येतो याची आम्ही वाट पहातो असे ते म्हणतात.
येथे सुसज्ज व्यायामशाळा आहे. ' सॊना-बाथ 'सारख्या आधुनिक सुविधाही आहेत. येथील स्टेडियममध्ये वर्षातून एकदा मराठी आणि गुजराथी व्यावसायिक दर्जेदार नाटके विभागातील रहिवाशांना विनामूल्य दाखविली जातात.
त्यावेळी सुरू झालेल्या योजनेअंतर्गत त्यानी अनेक बेरोजगार तरूणांना 'झुणका-भाकर केंद्र ' सुरू करण्यासाठी मदत केली. कॅटरींगचे नवीन क्षेत्र तरूणांसाठी खुले झाले. या तरूणांबरोबरच या व्यवसायाशी निगडित इतर व्यवसायांमधेही रोजगार वाढले. शिवाय लोकांना स्वच्छ आणि स्वस्त खाद्यपदार्थ उपलब्ध झाले.
दहिसर येथे एके ठिकाणी डोळे न तपासता एक ऒषध लोकांच्या डोळ्यात घातले जात होते. अनेक लोक हे ऒषध डोळ्यात घालून घेत होते. पण तपासणीशिवाय चाललेले हे मोफत उपचार धोकादायक ठरू शकत होते.श्री. नेरूरकर यांनी हे ऒषध तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. नंतर काही दिवसंतच हे विनातपासणी नेत्रोपचार केंद्र बंद झाले.
बोरिवली - डोंगरी येथे एका माणसाने चीट फंड काढला होता. आसपासच्या लोकांकडून करोडो रुपये लुबाडून तो पळून गेला. फसवले गेलेले लोक श्री.नेरूरकर यांना भेटले. ही केस पोलिसात गेली. तो माणूस पकडला गेला. इतकेच नाही तर सर्व संबंधित लोकांचे पैसे परत केले गेले.
श्री. नेरूरकर १९८५ पासून. १९९७ पर्यंत आमच्या विभागाचे नगरसेवक होते. लोकांसाठी इतके झटून काम केल्यावर सर्वसाधारणपणे लोकप्रियतेचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये घेतला जातो. पण श्री. नेरूरकर यानंतर निवडणुकीला उभे राहिले नाहीत. आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी इतरांनाही मिळाली पाहिजे असे त्यांचे मत होते. हा त्यांचा विश्वास त्यांच्यामागून नगरसेवकपदी आलेले श्री. बाळ राणे यांनी खरा केला. श्री बाळ राणे आणि श्री नेरूरकर- दोघे बालमित्र ! कार्यक्षेत्र एकच असल्यामुळे दोघांची मॆत्री अजूनही टिकून आहे. मुंबईत असतात तेव्हा इतर मित्रमंडळींसमवेत दोघे पहाटे नॅशनल पार्कला जाऊन भरपूर चालतात. संध्याकाळी ' शिवसेवा ' मधे कॅरम खेळतात. इथे त्यांना भेटायलाही बरेच लोक येतात. विभागातील नवीन घडामोडींवर चर्चा होते.
श्री.नेरूरकर यांनी निवडणुकांमध्ये भाग घ्यायचा नाही असे ठरवले; पण समाजसेवेकडे पाठ फिरवली नाही. एप्रिल - मे महिन्यांमध्ये कडक उन्हात ते विदर्भ - मराठवाड्याचे दॊरे करत असतात. येथील शेतकरी आणि इतर स्थानिक लोकांना भेटून त्यांच्या समस्या समजून घेतात, येथील विद्यार्थ्यांना वह्या - पुस्तके , चपला, बूट, गणवेश यांचे वाटप करतात. घरची परिस्थिती त्यांच्या शिक्षणात आडवी येऊ नये, पुढच्या जीवनात त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान अवगत करता यावे, शेतीबरोबरच काही जोडधंदे करता यावेत, आजच्या शेतक-याप्रमाणे फक्त शेतीवर आणि अप्रत्यक्ष रित्त्या निसर्गाच्या लहरींवर अवलंबून रहावे लागू नये या हेतूने हे प्रयत्न केले जात आहेत. कोणतीही जाहिरातबाजी न करता, गाजावजा न करता हे काम केले जाते.
श्री.नेरूरकर १९९५. ते१९९९ या पर्यंत ते ' म्हाडा 'चे चेअरमन होते. येथेही अनेक रेंगाळलेले प्रकल्प त्यांनी मार्गी लावले. तेथील कामे विनाविलंब व्हावीत म्हणून त्यांनी तेथे सुधारित कार्यपद्धती सुरू केली.
श्री.नेरूरकर यांचे कार्य मोठे आहे.येथे काही मोठी उदाहरणे दिली आहेत. ते शिवसेनेचे उपनेते आहेत पण राजकारणातली रस्सीखेच, वाद -विवाद, अारोप - प्रत्यारोप या सर्व गोष्टींपासून ते कायमच दूर राहिले आहेत. काही काळ हातात हातात सत्ता असली , तरी तळमळ असेल तर किती मोठी कामे होऊ शकतात हे त्यांनी १२ वर्षांमधे केलेल्या अनेक सुधारणांवरून दिसून येते. बोरिवली पश्चिमेचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने झाला, पण बोरिवली पूर्वेच्या बाबतीत असे झाले नाही. येथील विकासाचे प्रकल्प पूर्ण करणे अशक्यप्राय होते. पण श्री. नेरूरकर यांनी हे शिवधनुष्य पेलले. इतकेच नाही ; तर सुरू केलेला प्रत्येक प्रकल्प वेळेत पूर्ण केला.
हसतमुख चेहरा, उंचपुरे प्रसन्न व्यक्तिमत्व , सहज संवाद साधण्याची हातोटी आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे समोरच्या माणसावर त्यांचा प्रभाव पडतोच पण त्याचबरोबर त्यांच्याविषयी विश्वासही वाटू लागतो. ते चांगले वक्ते आहेत. कधी विनोदी किस्से सांगत, तर कधी हृदयाला भिडणारे प्रसंग सांगत ते श्रोत्यांशी संवाद साधतात. त्यांचे भाषण ऎकायला सर्वच नेहमी उत्सुक असतात. माननीय शिवसेनाप्रमुख 'बाळासाहेब ठाकरे ' यांनी शिवसैनिकांना एक मंत्र दिला होता. "आपला पक्ष २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करेल. " हा तो मंत्र होता. वास्तविक पहाता सगळ्याच राजकारणी लोकांसाठी हा ' गुरुमंत्र ' आहे. त्याचे पालन झाले तर भारतात रामराज्य अवतरेल. श्री. नेरूरकर यांनी मात्र आयुष्यभर १०० टक्के समाजकारण केले.
तर असे हे श्री. विश्वनाथ (दिलीप) नेरूरकर. असेच कार्य करत रहाण्यासाठी त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.