Kal chakra - 2 in Marathi Moral Stories by Naeem Shaikh books and stories PDF | काल चक्र - 2

Featured Books
Categories
Share

काल चक्र - 2

काल चक्र.

नारळाच्या झाडांच्या गर्दीमध्ये असनार एक कवलारु घर. घराच्या भिंतींना नुकताच रंग दिल्याने त्या भिंतीतुन रंगाचा वास येत होता . घराला फुलाने आणि रंगबेरंगी लाईटांनी सजवले होते. घरामध्ये मानसांची गर्दी दिसुन येत होती. कसल्यातरी कार्यक्रमाच्या तयारीसाठी सगळ्यांची धावपळ चालू होती. दुपारची वेळ, पांढ-या रंगाची कार त्या घरा समोर येऊन थांबली. त्यामधून राकेश आणि अश्विनी खाली उतरले. ते अश्विनीचं गावाकडचं घर.

त्यांना आलेलं पाहून, घरातून अश्विनीचे वडील बाहेर आले. त्यांच्यासोबत दोन मानसं राकेश आणि अश्विनीच्या दिशेने चालत आले. अश्विनी कोणाशीही न बोलता घरात निघून गेली. अश्विनीच्या वडीलांनी राकेशला घरात बोलवले. दोघेही घरात आले. राकेशला त्याची खोली दाखवून अश्विनीचे वडील जाण्यासाठी दाराकडे निघाले, तेवढ्यात राकेशने त्यांना थांबवले.

“काका, पण मला अजून कळालं नाही की नक्की कार्यक्रम कसला आहे.”

“तुला अश्विनीने काहीच सांगीतलं नाही का...”

“नाही, तिला तर.... तिचं जाऊद्या. तुम्ही सांगा, कसला प्रोग्राम आहे.”

“उद्या अश्विनीचा साखरपुडा आहे... आमचा हा कार्यक्रम महिनाभर आधीच फिक्स् झाला होता. मग तिने तुला का नाही सांगीतलं... कळतं नाही तिने असं का केलं असेल.”

राकेशला अश्विनीच्या साखरपुड्याची गोष्ट कळताच मानसीक धक्का बसला. काही क्षणासाठी तो सुन्न झाला. काय बोलावे, काय प्रतिउत्तर द्यावे, त्याला समजेनासे झाले. अश्विनीचे वडील निघून गेले.

‘महिन्या आधी जर सर्व ठरवलं होतं तर अश्विनीने मला काही सांगीतलं का नाही. तिने माझ्यापासून ही गोष्ट का लपवली. एवढी मोठी गोष्ट अश्विनी खरंच विसरली का तिने मला मुद्दाम सांगीतले नाही मला..’

राकेशला अजूनही विश्वास बसत नव्हता. तो त्याच्या भूतकाळात त्याला पडलेलेया प्रश्नांचे उत्तर शोधतत होता तर दुसरी अश्विनी आणि त्याचे नातेवाईक तिच्या साखरपुड्याची तयारी करत होते.

रात्रीच्या वेळी राकेश एकटाच अंगणाच्या कुंपना जवळ उभा होता. भूतकाळातले प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर एका मागून एक येऊ लागले.

काही दिवसांपुर्वी राकेशने अश्विनीला स्वतःच्या मनातल्या तिच्या बद्दलच्या भावना सांगीतल्या. तो तिच्यावर प्रेम करत होता हे त्याने सांगीतले आणि त्या दिवसांपासून सर्वकाही बदललं. अश्विनी राकेशकडं दुर्लक्ष करु लागली. राकेशला ही गोष्ट आवडली नाही. त्या दिवशी राकेशने तिला याच गोष्टीबद्दल विचारले होते पण तिने मात्र राकेशच्या बोलण्याचा वेगळाच अर्थ काढला आणि त्यामुळं त्या दिवशी त्यांच्यामध्ये भांडन झालं.

राकेशला एकट्याला विचारात मग्न असलेला पाहून अश्विनीचे वडील त्याच्या जवळ आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.

“काय झालं राकेश. तू असा एकटा....”

“असंच... जेवल्यानंतर जरा शतपावली करत होतो.”

“शतपावली करताना तर तू दिसत नाहीये. मग माझ्याकडून काय लपवतोयस...”

“खरंच शतपावली करण्यासाठीच मी इथं आलो होतो. या अंधारात ही नारळाची झाडं, हा थंडगार वारा,...हे दृष्य पाहून थांबलो. असं आम्हाला शहरात नाही पाहायला मीळत. खरंच काका, तुम्ही खुप लकी आहात.”

“मी कसला लकी. जीच्या मुलीला असं...” बोलता बोलता ते थांबले. काही क्षणासाठी विचार केल्यानंतर राकेशकडे पाहत म्हणाले. “ राकेश, तुझी मी माझ्या बायको कडून माफी मागतो.”

“काका, तुम्ही... आणि माझी माफी का मागतायं.”

“तू जेव्हा आमच्या घरी फोन केला आणि अश्विनीबद्दल सांगीतलस तेव्हा तुझी काकु तुझ्यासोबत खोटं बोलली होती. अश्विनीला या आधी असं कधीच झालं नव्हतं.”

“पण का.”

“उद्या साखरपुडा आणि लग्नाला एकच महिना राहिला आहे. अशा परीस्थितीत जर अश्विनीच्या अशा वागण्याबद्दल बाहेर कोणाला कळालं तर... त्यामुळं तुझ्याशी खोटं बोलून, तिला सोबत घेऊन येण्यासाठी सांगीतले... आमच्या अशा वागण्यामुळे तुला त्रास झाला असेल त्याबद्दल माफी मागतो.”

राकेश समोर त्यांनी हात जोडले. ते पाहून राकेश पुढे आला आणि त्यांचा हात धरुन म्हणाला.

“काका, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. माझ्या वडीलांसारखे. तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका.”

“पण तिला असं अचानक ... नक्की काय झालं होतं.”

“ काका अश्विनी अशा एका चक्रात अडकली आहे ज्यामध्ये एकाच प्रसंगचा ती पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहे. तिच्या सोबत रोज तिच घटना घडत असल्याने तिचं आयुष्य त्या एका दिवसा पुरतं सिमीत होऊन गेलंय. या सगळ्या प्रकाराची सुरुवात त्या संध्याकाळी झाली...

अंधार पडला होता. अश्विनी कामावरुन घरी जात होती. मी माझी गाडी अश्विनी समोर थांबवली आणि गाडीवरुन उतरुन अश्विनी जवळ गेलो. अश्विनी माझ्याकडे रागाने पाहत होती. त्या दिवशी माझ्यात आणि अश्विनीत कामावरुन भांडन झालं होतं. मी तिला सॉरी म्हणायला गेलो होतो. पण तिनं माझं एकलंच नाही. ती रागात तिथुन निघून गेली. मला वाटलं त्या दिवसानंतर ती माझ्याशी कधीच बोलनार नाही. पण दुस-याच दिवशी तिचा फोन आला.

मी नुकताच कामावर आलो होता. माझ्या सिनीयरने मला बोलवून घेतले आणि माझं कामात लक्ष नसन्यावरुन मला खुप सुनावले . माझ्या दिवसाची सुरवात खराब झाली होती. मी कामाला सुरुवात करणारच तेवढ्यात अश्विनीचा फोन आला. तिने मला तातडीने बोलावले. काल पर्यंत दुर्लक्ष करणारी अश्विनी आज मला स्वतःहून बोलावत होती. ही गोष्ट मला विचित्र वाटनारी जरी असली तरी जास्त चौकशी न करता मी स्वतःच काम सोडून अश्विनीने सांगीतलेल्या स्थळाकडे निघालो. अर्ध्या तासात मी त्या कॉफीशॉपमध्ये पोहोचला. तिथं पोहोचल्यावर अश्विनीने मला तिच्यासोबत घडलेली घटना सविस्तर सांगीतली.

तिनं सांगीतलं, आदल्या दिवशी रात्री अश्विनी तिच्या रुममध्ये गेली आणि बेडवर जाऊन डोकं धरून बसली. त्या दिवशी काम करताना जे काही झालं, त्या नंतर अश्विनीचे मनःस्वास्थ्य बिगडले होते. तिच्यात उदासिनता उत्पन्न झाली होती. झालेल्या गोष्टींचा विचार करण्यात ती मग्न असताना अचानक सई धावत, रडत तिच्या जवळ आली आणि म्हणाली.

“ताई मला पण घेऊन चल ना तुझ्या सोबत... मला तुझ्या सोबत यायचंय् . मला पण घेऊन चल ना गं...”

अश्विनी गोंधळलेल्या स्थितीत होती. क्षणार्धात ते घर बदलले. तिथल्या वातावरणात झालेला बदल तिला समजलासुध्दा नाही. ती तिच्या मामाच्या घरात आहे असं तिला वाटू लागलं. सईला तिथं येऊन मिनीटभर सुध्दा झाला नसेल की तेवढ्यात सईचे बाबा म्हणजे अश्विनीचे मामा तिथे आले.

“सई, तुला एकदा सांगीतलना तू नाही जाऊ शकत ताई सोबत. मग हट्ट का लावला आहेस.”

त्यांनी सईला अश्विनीपासून लांब केले आणि अश्विनीला म्हणाले.

“अश्विनी तू जाण्याची तयारी कर. अंधार होण्या आधी तुला तिथं पोहोचायला हवं.”

जाता जाता अश्विनी सईच्या डोक्यावरुन हात फिरवला आणि म्हणाली.

“मी पुढच्या रवीवारी परत येणार आहे. तेव्हा आपण बागेत फिरायला जाऊया.”

अश्विनी तयारी करण्यासाठी बाहेरच्या खोलीत गेली. तिने कपड्यांच्या घड्या घालून बॅगमध्ये भरले आणि जाण्यासाठी तयार झाली. अजूनही सईच्या रडण्याचा आवाज येत होता. अश्विनी सोफ्यावरुन उठणार त्या आधी संपुर्ण घर फिरु लागलं. डोकं जड वाटू लागलं. ती कधी बेशुध्द पडली, तिलासुध्दा ते समजले नसावे. डोळे उघडले तेव्हा ती तिच्याच घराच्या सोफ्यावर असल्याचे तिला कळाले.

‘काल खुप डोकं दुःखत होतं. कदाचित मामाच्या घरुन आल्यावर सोफ्यावर बसल्या बसल्याच झोप लागली असावी.’ असा विचार करुन तिने विषय सोडून दिला.

दुस-या दिवशी ती सकाळी कामावर निघाली असताना तिने भयानक अशी घटना घडताना पाहिली. तिने अपघातात सईचा मृत्यू पाहिला आणि सर्वात विचित्र म्हणजे तिने त्या ठिकाणी स्वतःला पाहिले.

मी आधी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा त्या सर्व गोष्टी माझ्या समजण्या पलीकडे गेल्या तेव्हा मी अश्विनीला म्हणालो.

“पण असं कसं होऊ शकतं.... तू ज्या ठिकाणा बद्दल बोलतेस, त्या ठिकाणी फक्त आणि फक्त बिल्डींगच आहेत. तिथेतर साधा एक पार्कसुध्दा नाहीये. मग तू जे सांगतेस की वडाचं झाड पाहिलंस, माळरान पाहिलंस, ते कसं शक्य आहे. आणि तो पाऊस आणि वीज वगैरे, असं काहीच झालं नव्हतं.”

“पण मी जे तुला सांगीतलं, ते खोटं नव्हतं. मी ज्या गोष्टी पाहिल्या त्याच तुला सांगीतल्या...”

“चल, तू जे काही सांगीतलंस त्या सर्व गोष्टी ख-या आहेत असं जरी समजलं तरी हे कसं होऊ शकतं की काल रवीवार होता , काल आपल्याला सुट्टी होती आणि तू काल तुझ्या मामाकडे गेली होतीस.’’

“का... काल आपल्याला सुट्टी नव्हती का.”

मी माझा मोबाईल खिशातून बाहेर काढला आणि अश्विनीला दाखवला. त्यावर त्या दिवसाची तारीख आणि मंगळवार लिहिले होते. तिने खात्री करण्यासाठी स्वतःचा मोबाईल तपासला. खरच त्या दिवशी मंगळवार होता.

“जर आज मंगळवार असेल तर काल रवीवारची सुट्टी कशी मिळेल.”

मोबाईल खिशात ठेवत मी म्हणालो.

“मला आता असं वाटतंय, माझ्या डोक्याच प्रेशर वाढून तो फुटेल की काय.”

“एक काम कर. आज कामावर नको जाऊस. घरी राहा आणि आराम कर. गेल्या काही दिवसांपासून तू खुप टेंशन घेतलं होतस. तुला आरामाची खुप गरज आहे. तूला आरामाची खुप गरज आहे.”

“का.. काय झालं होतं. मी कसलं टेंशन घेतलं होतं.”

“का... तुला माहित नाही का.”

“राकेश मला काहीच आठवत नाहीये.”

“तुला जर खरंच काही आठवत नसेल, तर ही गोष्ट तुझ्या स्वास्थ्यासाठी नक्कीच चांगली आहे.”

“पण मला सांग तरी की मला कसलं टेंशन होतं ते.”

“मी सांगेन तुला, पण आता नाही. नाहीतर तुझी डोके दुःखी आनखिनच वाढेल.”

“जसं तुला योग्य वाटेल...”

मी तिला तिच्या घरी सोडलं आणि मी कामावर निघून गेलो.

त्या दिवसानंतर पुढे दोन दिवस तिच घटना घटत राहिली. अश्विनी रोज तिच घटना घडताना पाहत होती आणि रोज त्याच वेळेवर ती मला फोन करुन तिथं बोलवतं असे. तिने पाहिलेली घटना आणि आदल्या दिवशी ती मामाच्या घरी गेल्याची गोष्ट सांगत होती. तिस-या दिवशी जेव्हा अश्विनीने मला बोलावले. तेव्हा मी तिची तिच कथा ऐकल्यावर तिला घरी सोडलं आणि नंतर ईथं फोन केला. रोज घडणारी घटना मी अश्विनीच्या आईला सांगीतली. त्यावर काकूचे उत्तर आले –

“तिला असं होतं कधी कधी. जेव्हा तिला कामाचं जास्त टेंशन येतं तेव्हा होतं असं. तू जास्त टेंशन घेऊ नकोस. परवा ती गावाला येणारच आहे. एकदा ती इथं आली, मग तिला होणारे भाससुध्दा बंद होतील.”

“पण तिला तर आदल्या दिवसाचं काहीच आठवतं नाही आणि तिचं ते बेशुध्द पडनं.... या आधी मी तिला असं पाहिलं नव्हतं कधी.”

“तिचं हे नेहेमीचं आहे. मी तिला लहानपणापासून ओळखते...राकेश तू पण ये परवा तिच्या सोबत...”

“परवा कसला फंग्शन आहे का...”

“हो. तुला माहित नाही का... अश्विनीने तुला सांगीतलं नाही का...”

“तेच तर सांगतोय. तिला आदल्या दिवसाच काही लक्षात राहत नाही. मग ती...”

“अरे मुद्दाम सांगीतलं नसेल. कदाचित सरप्राईझ् द्यायचं असेल तिला. पण तू ये नक्की. मला जरा काम आहे, मी फोन ठेवते.”

“चालेलं काकू, बाय्”

काकूंनी जरी तिच्या विकाराला साधारन व काही दिवसातच नाहीसे होणार असल्याचे सांगीतले असले तरी माझी काळजी कमी झाली नव्हती. मी माझ्या ओळखीच्या एका डॉक्टराकडं गेलो. त्यांना २ दिवसांपासून घडणा-या घटने बद्दल सांगून तिच्या आईने सांगीतलेली अश्विनीबद्दलची माहितीसुध्दा दिली. सर्वकाही ऐकल्यानंतर डॉक्टराने तिन दिवसांच्या गोळ्या दिल्या आणि जर विकार बरा झाला नाही तर पुढच्यावेळी हॉस्पीटलमध्ये अश्विनीला सोबत आणायला सांगीतले. गोळ्या घेऊन मी गोळ्या घेऊन मी अश्विनीकडे गेला आणि गोळ्या देऊन तिला सर्व समजून सांगीतलं.

आज सकाळी मी अश्विनीच्या घरी पोहोचलो. मला अश्विनीकडून जशी अपेक्षा होती तसंच झालं. मी दाराची बेल वाजवल्यावर अश्विनीने जेव्हा दार उघडला ती कामावर जाण्याची तयारी करत होती.

“अश्विनी, आज तुला गावाला जायचंय ना...”

“नाही, मी का जाऊ गावाला.... आणि तुला असं कोणी सांगीतलं.”

मला पुर्णपणे खात्री पटली होती की अश्विनी भूतकाळातल्या गोष्टी विसरली असणार.

“सकाळीच तुझ्या आईचा मला फोन आला. त्यांनी मला सांगीतलं की तू आज गावाला जाणार आहे आणि त्यांनी मलासुध्दा बोलावलं आहे.”

“जर मला बोलवलं होतं, तर मला कसं आठवत नाहीये.”

“तुला तर काल काय झालं ते सुध्दा आठवत नाही. तर मग चार दिवसा आधीच कसं आठवनार.”

“का, मला का नाही आठवनार... माझी काय स्मरन शक्ती नष्ट झाली आहे का... मला सगळं व्यवस्थीत आठवतंय. काल रवीवार होता आणि आपल्याला सुट्टी होती. मी माझ्या मामाकडं गेली होते....”

“... आणि तुझ्या मामाची मुलगी सई, तुझ्या सोबत येण्यासाठी हट्ट करत होती. बरोबर...”

“...पण हे तुला कसं कळालं...”

“ते जाऊदे, तू तुझ्या आईला फोन करुन विचार की त्यांनी तुला बोलवलं होतं का.”

अश्विनीने घरी फोन लावला. माझ्यापासून थोड्या अंतरावर जाऊन ती काकू सोबत बोलू लागली. जेव्हा तिला माझं म्हणनं पटलं तेव्हा ती माझ्यासोबत इथं येण्यासाठी तयार झाली.”

ते ऐकल्यावर अश्विनीचे वडील दुवीधावस्थेत पोहोचले.

“पण हे कसं शक्य आहे. अश्विनीला भास होत आहेत हे मी एक वेळा मान्य करु शकतो. पण असे भास... म्हणजे, अश्विनीला कोणी मामा नाही आणि कोणी सई नाही. मग तिला असे भास..?”

ते ऐकून राकेशलाही आश्चर्य वाटत होतं. त्यानंतर तिला मानसीक विकार असल्याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका उरली नव्हती. राकेशने त्याच्या जवळ असणा-या अश्विनीच्या गोळ्या त्याने अश्विनीच्या वडीलांच्या हातात दिल्या आणि म्हणाला.

“डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या आहेत. तिला वेळच्या वेळी द्या. आणि जर गोळ्या खाऊन सुध्दा तिला भास होतच राहिले तर मात्र तिला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. कदाचित हॉस्पीटलमध्ये भरती करावं लागेल.”

त्या दोघांनी एक नजर घराकडं टाकली. सर्वजण दुस-या दिवसाच्या कार्यक्रमाच्या तयारीत गुंतले होते.

राकेश स्वतःचं भविष्य अश्विनीत पाहत होता. पण अश्विनीचा साखरपुडा आणि महिन्याभरात लग्न, या गोष्टी अशा अचानक राकेशला कळाल्या आणि तो मनापासून खचुन गेला. त्याला त्याचा भविष्य अंधारात दिसू लागला. त्याने ठरवलं, दुस-या दिवशी साखरपुडा झाल्यावर अश्विनीला आयुष्यात कधीच भेटायचं नाही, तिच्याबद्दल विचार करायचा नाही. मन कठोर करुन त्याने निर्णय तर घेतला पण भविष्यात काळाने त्याच्यासाठी काय ठरवलं होतं हे त्याला त्याक्षणी माहित नव्हतं. ठरल्या प्रमाणे साखरपुडा झाला. त्याच दिवशी राकेश शहराकडं निघून गेला. दोन दिवसांनी त्याला कळाले की अश्विनीने नोकरी सोडली. दुसरीकडे साखरपुड्यानंतर अश्विनीवर उपचार केले गेले आणि त्या नंतर अश्विनीला कोणत्याही प्रकारचे भास झाले नाही. महिण्याभरानंतर तिचं लग्न झालं. राकेश मात्र तिच्या लग्नात गेला नाही.

१ महिण्यांनंतर...

अश्विनीचा नवरा महेश, नेहेमी प्रमाने सकाळी ७ वाजता उठला. त्याने पाहिले अश्विनी तयार होऊन बाहेर निघाली होती. तिला बाहेर जाताना पाहून महेशने तिला आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून ती थांबली.

“कुठं निघालीस एवढ्या सकाळी.” बेडवरुन उठत महेशने विचारले.

“तुम्ही कोण... आणि माझ्या घरात काय करतायं.”

“अश्विनी, काय वेड लागलं की काय... काय बोलतीये...”

“हॅलो मिस्टर, एकतर माझ्या घरात मला न सांगता येता आणि परत मलाच वेडी म्हणता...मी पोलीसांना फोन लावेन.”

महेश तिला समजवण्यासाठी तिच्या जवळ जाऊ लागला. हे पाहून अश्विनी घाबरली. तिने पर्समधला मोबाईल बाहेर काढला आणि त्यावरील बटनं दाबून मोबाईल कानाला लावला आणि बाहेर निघून गेली.

“हॅलो, पोलीस स्टेशन. मी अश्विनी बोलतीये.....”

क्रमशः