Nirdhar in Marathi Magazine by Amita a. Salvi books and stories PDF | निर्धार

Featured Books
Categories
Share

निर्धार

निर्धार.

----------

रात्रीचे ११ वाजले होते.रमाबाई अस्वस्थ मन:स्थितीत खिडकीत उभ्या होत्या.त्यांची लाडकी मुलगी कल्याणी अजून घरी आली नव्हती. कल्याणी एका मोठ्या कंपनीत फॅशन डिझाइनर म्हणून काम करत होती.अल्पावधीतच तिने तिच्या क्षेत्रात चांगले नाव कमावले होते.अत्यंत हुशार आणि निर्भिड स्वभावाची कल्याणी म्हणजे रमाबाईंचा प्राण होता.मोठा मुलगा अजय बँगलोरच्या एका काँम्प्यूटर कंपनीत कामाला होता. त्याची पत्नी आणि दोन वर्षांचा मुलगाही तिकडेच होते. मुंबईच्या फ्लॅटमध्ये मुलीसोबत रमाबाई आणि श्रीधरराव रहात होते. श्रीधरराव दोन वर्षांपूर्वी बँकेच्या नोकरीतून रिटायर झाले होते आणि शांत-समाधानी आयुष्य जगत होते.आता ते ईझीचेअरवर बसून पुस्तक वाचत होते पण त्यांचेही लक्ष दरवाजाकडेच होते.शेवटी त्याना रहावले नाही."अजून कशी आली नाही ? नेहमी तर आठ वाजता घरी येते.आज एवढा उशीर का झाला असेल?" त्यांनी काळजीच्या स्वरात विचारले. रमाबाई जरी स्वत: तणावाखाली होत्या तरी पतीला दिलासा देण्यासाठी म्हणाल्या "येईल हो!आयत्या वेळी मॆत्रिणींचा काही प्रोग्रॅम ठरला असेल." "अग! पण निदान फोन तरी करायला हवा होता! " श्रीधरना पत्नीचे स्पष्टीकरण पटले नव्हते. कल्याणी थोडा जरी वेळ होणार असेल, तरी घरी फोन करून कळवते हे त्याना माहीत होते. फ्लॅट तळमजल्यावर असल्यामुळे उशीरा येणारी एखाद् दुसरी व्यक्ती खिडकीतून दिसत होती. तेवढ्यातच स्कूटरवरून आलेला उपेन्द्र रमाबाईंना दिसला.उपेन्द्र अजयचा मित्र! दोघे मुंबईत एकाच इंजिनियरिंग काॅलेजमध्ये शिकत होते.तेव्हापासूनच उपेन्द्र शेजारच्या फ्लॅटमध्ये रहात होता. आई - वडील पुण्याला रहातात.हा फ्लॅट त्याला वडिलांनी घेऊन दिला होता.अधून -मधून. दोघेही भेटायला येत. दोघांचाही स्वभाव फार चांगला होता. आणि म्हणूनच. उपेन्द्रला त्यांनी खूप चांगले संस्कार दिले होते. स्कूटर पार्किंगमध्ये लावून तो बिल्डिंगमध्ये आला आणि श्रीधररावांच्या घराची बेल वाजवली." तुम्ही अजून जागे कसे? झोपला नाहीत?" त्याने विचारले. त्यांची रात्री लवकर झोपून सकाळी फिरायला जाण्याची संवय त्याला माहीत होती.जरी अजय बँगलोरला गेला होता तरी त्याच्या घरी त्याचे येणे -जाणे कमी झाले नव्हते. अजयच्या आई-वडिलांनाही त्याच्या विषयी आपुलकी होती.रविवारचा चहा त्याने आपल्या घरी घ्यावा असा त्यांचा आग्रह असे.तो आला की त्याच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने आणि खळखळत्या हास्याने घरही हसू लागे."अजून कल्याणी आली नाही तिची वाट बघतोय आम्ही." रमाबाई म्हणाल्या.तरूण आणि हुशार उपेंद्रचा त्याना अजयसारखाच आधार वाटत असे."येईल! येईल! काहीतरी काम निघाले असेल.काळजी करू नका."तो हसत म्हणाला आणि स्वत:च्या फ्लॅटकडे वळला.रमाबाई परत खिडकीत उभ्या राहिल्या, आणि कल्याणीला येताना पाहून त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.दरवाजा उघडून तिला आत घेत त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली,"किती वेळ? फोनसुद्धा केला नाहीस. आम्ही किती काळजीत होतो!" "अग! किती प्रश्न विचारशील? मला बोलू देशील. की

नाही? "कल्याणी म्हणाली. "तिला प्रश्न नंतर विचार. ती दिवसभर थकली असेल. भूक लागली असेल.आपण नंतर बोलूया.अगोदर तिला जेवायला वाढ."बाबा म्हणाले. पण कल्याणी वेगळ्याच मूडमध्ये होती, तिच्या चेह-यावर उत्साह ओसंडत होता."जेवण नंतर. आधी मी काय सांगते ऎका.मी बनवलेल्या काही डिझाइन्स आमच्या कंपनीने इंटरनेटवर टाकल्या होत्या.एका फिल्म प्राॅडक्शन हाउसला त्या आवडल्या.आज सकाळी त्यांनी कंपनीला फोन केला; आणि मला कंपनीच्या काही लोकांसोबत त्याना भेटायला जावे लागले. तिथे बराच वेळ चर्चा झाली. आमच्या कंपनीला सध्या दहा लाखांची आॅर्डर दिली आहे . त्यांच्या आवश्यकतेनुसार वेळोवेळी नवीन ऑर्डर मिळणार आहेत.तिथून निघेपर्यंत दहा वाजले म्हणून उशीर. झाला.मोबाइलची बॅटरी डाउन होती त्यामुळे फोनही करता आला नाही."कल्याणी सांगत होती."पंधरा दिवसांत ऑर्डर. पूर्ण करायची आहे. उद्या त्याना लागणा-या काॅस्ट्यूम्सविषयी चर्चा आहे , आणि नंतर कामाला सुरुवात. करायची आहे.माझ्या क्रिएटिव्हिटीला आता वाव मिळेल याचा खूप आनंद होतोय मला ! आता या इंडस्ट्रीतील इतरांचेही लक्ष माझ्या टॅलेंन्टकडे वेधले जाईल." " आमचे आशिर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत. पण तुला झेपेल, त्रास होणार नाही एवढ्याच कामाची जबाबदारी घे. तुझ्या तब्येतीची हेळसांड. होता कामा नये." बाबांनी सल्ला दिला. तेवढ्यातच फोन वाजला."अपर्णाचा दोन वेळा फोन येऊन गेला. तीच असेल बहुतेक " रमाबाई म्हणाल्या कल्याणीने फोन उचलला. फोनवर अपर्णाच होती. अपर्णा एल. एल. बी. झाल्यावर पुढे शिकण्यासाठी अमेरिकेत गेली होती नंतर तिथेच स्थाईक झाली होती.तिची खूप इच्छा होती की कल्याणीने अमेरिकेत यावे.तिच्या कलेला तिथे वाव मिळेल असे तिला वाटत होते.आजही तिने त्यासाठीच फोन केला होता.ती म्हणत होती "माझ्या एका क्लाएन्टची फॅशन गार्मेंटची फॅक्टरी आहे. तिथे तुला डिझाइनर म्हणून घ्यायला तयार आहे. तुझ्या व्हिसाची व्यवस्थाही तोच करेल." आपला देश सोडून कुठे जायचे नाही हा कल्याणीचा निर्धार होता पण अपर्णा एवढ्या आपलेपणाने बोलत होती की तिला लगेच नकार सांगवेना. "सध्या इथे मला चांगले प्राॅस्पेक्ट्स आहेत पण तुला मी विचार करून कळवते.बाकी सर्व ठीक आहे नं? नितीन कसा आहे? लग्न कधी करणार आहात?"तिने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. "लवकरच! पण कधी- ते अजून ठरले नाही.तू ऑफर चा जरूर विचार कर.मी तुला फोन करेन तेव्हा कळव किंवा मला 'ई मेल' कर."अपर्णा म्हणाली मनातून तिलाही चांगलेच माहीत होते,की अमेरिकेला येण्याचा विचार कल्याणीच्या गळी उतरवणे फार कठीण आहे.

त्यानंतरचे पंधरा दिवस खूप गडबडीत गेले.कल्याणीने रात्रंदिवस मेहनत करून आणि आपले कॊशल्य पणाला लावून ऑर्डर पूर्ण केली.हे काम पसंत पडले तर पुढच्या ऑर्डर मिळणार होत्या; त्यामुळे काम वेळेवर पूर्ण करणे आवश्यक होते.पॅकिंग करून रात्री सामानाची डिलिव्हरी देईपर्यंत खूप वेळ झाला.त्या दिवशीही ती उशीरा घरी आली.आई-बाबांना आता तिच्या घरी उशीरा येण्याची संवय झाली होती;तरीही ती घरी येईपर्यंत दोघेही तणावाखाली असायचे. "उशीर होण्याचा

आजचा शेवटचा दिवस. " कल्याणी म्हणाली,"पण उद्या सकाळी मात्र मला लवकर जावे लागेल.उद्या आम्हाला चेक मिळणार आहे.सगळ्याचे पेमेंट करायचे आहे.तेव्हा आज मी लवकर झोपणार आहे"

दुस-या दिवशी कल्याणी घरातून लवकर निघाली.गेटजवळच तिला बाबा भेटले."आज पेमेन्ट मिळणार आहे नं? फार रात्र करू नको.लवकर घरी ये."ते म्हणाले."हो बाबा!" तिने उत्तर दिले आणि घाईत पुढे निघाली.त्या दोघांचे बोलणे कोणीतरी ऎकत होते हे त्यांना माहीत नव्हते.त्या दिवशी चेक घेऊन येणारा माणूस इतका उशीरा आला की चेक बँकेत डिपाॅझिट करणे शक्य नव्हते.दुस-या दिवशी कामगारांचे,सप्लायर्सचे पॆसे द्यायचे होते त्यामुळे बेअरर चेक घेऊन ती निघाली.सकाळी बँकेत जायचे होते.कॅशियर आणि प्यून तिकडेच येणार होते. सोसायटीजवळ येईपर्यंत रात्र झाली होती.दहा बिल्डिंगची सोसायटी! आज आतल्या छोटया रस्त्यावरील लाइट गेलेले होते त्यामुळे आत पूर्ण काळोख होता.दोन बिल्डिंग पार केल्या की तिसरी बिल्डिंग कल्याणीची होती.घरांमधील दिव्यांच्या मंद प्रकाशात ती हळूहळू पुढे चालली होती.कां कोण जाणे तिला आसपास कोणीतरी आहे असे वाटत होते.पण तो मनाचा संशय आहे असे स्वतःला समजावत ती चालत राहिली. अचानक् कोणीतरी तिचा हात धरून दोन इमारतींमधील काळोख्या गल्लीत ओढले. त्या माणसाने एवढ्या जोरात हात खेचला की बेसावध कल्याणी तोल जाऊन बाजूच्या भिंतीवर आपटली आणि शुद्ध हरपून खाली पडली.तिची पर्स हातातून खाली पडली . तो माणूस तिच्याकडे लक्ष न देता तिच्या पर्सकडे वळला. आणि तेवढ्यातच स्कूटरचा प्रखर प्रकाश त्या रस्त्यावर पडला.तो माणूस पर्स उचलून कंपाउंडची भिंत ओलांडून पळून गेला.स्कूटरवरील व्यक्ती खाली उतरली, कल्याणीला बेशुद्ध पाहून डिकीतून पाण्याची बाटली आणून तिच्या तोंडावर पाणी शिंपडले. तिने डोळे उघडले.तिच्या समोर उपेंद्र उभा होता.त्याने तिला आधार देऊन भिंतीला टेकवून बसवले.तिला पाणी प्यायला दिले.थोडी तरतरी आल्यावर ती उठून उभी राहिली."कोण होता तो?तू त्याला पाहिलेस का? तिने विचारले."नाही! त्याने तोंडाला रुमाल बांधला होता.आपल्याला पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवावी लागेल.तुझी पर्स घेऊन पळालाय तो!"त्या माणसाला आपण पकडू शकलो नाही याची चीड उपेंद्रच्या बोलण्यात जाणवत होती "तू अगदी वेळेवर आलास,थँक्स. "बोलताना तिच्या डोळ्यांत पाणी तरळले."तू ठीक आहेस न?"उपेंद्रने हळव्या स्वरात विचारले. त्याच्या मनातील तिच्याविषयीच्या कोमल भावना त्याच्या आवाजातून व्यक्त होत होत्या.

उपेंद्र तिला तिच्या घरी घेऊन गेला.घडलेला प्रसंग ऎकून तिचे आई-बाबा हबकून गेले.रमाबाई तर रडायला लागल्या.कल्याणी आता थोडी सावरली होती . "तू स्वतःला त्रास करून घेऊ नको आई ! तो फक्त माझी पर्स घेऊन पळून गेला." कसेबसे चार घास खाऊन ती श्रीधरराव आणि उपेंद्रसोबत जाऊन तक्रार. नोंदवून आली. रात्री तिला झोप येणे शक्यच नव्हते.तिच्या पर्समध्ये दहा लाखाचा चेक होता.जर मी बँकेत जाण्यापूर्वी कोणी पॆसे घेऊन गेले,तर काय होईल? बाॅस. मला निष्काळजी समजतील.माझ्या करीयरवर डाग पडेल.' हे सर्व विचार रात्रभर तिला सतावत होते.

सकाळी लवकर उठून ती बँकेत गेली. इन्सपेक्टरही आले होते.बॅकेच्या मॅनेजरना सर्व काही कळल्यावर ते म्हणाले, "चेकचे पॆसे कोणी नेणार नाही याची आम्ही काळजी घेऊ,कोणी चेक घेऊन आल्यास पोलिस चॊकीवर फोनही करेन पण तुम्ही आमच्या कस्टमरकडून चेकचे 'स्टाॅप पेमेन्ट' घेऊन या.त्यामुळे तुम्हाला आणि आम्हालाही कायद्याने संरक्षण मिळेल." त्यांचे आभार मानून ती सिनेकंपनीमध्ये गेली.इन्सपेक्टरनी एक पोलीस तिच्याबरोबर दिला होता. ' स्टाॅप ' पेमेंट' प्रोसीजर पूर्ण करून घेऊन दुसरा चेक बँकेत भरून पॆसे कंपनीत दिले आणि दोन दिवसांची रजा सांगूनच ती घरी गेली.डोक्यावरचे मोठे ओझे उतरल्यासारखे तिला वाटत होते.तिस-या दिवशी सकाळी तिला पोलिस चॊकीत येण्यासाठी फोन आला.बाबाना आणि उपेन्द्रला घेऊन ती चॊकीत गेली. झाल्या प्रसंगापासून उपेंद्र त्यांच्या कुटुंबाच्या अधिकच जवळ आला होता. त्याचे आस्थेने वागणे श्रीधररावाना अजयची आठवण करून देत होते. त्याची कल्याणीविषयीची काळजी वारंवार जाणवत होती.पोलिस चॊकीत गेल्यावर तर त्यांना मोठा धक्का बसला.त्यांच्या सोसायटीचा एक सेक्युरिटी गार्ड नरेश आणि त्याचे आई-वडील उभे होते.इन्सपेक्टर बोलू लागले "तुमची पर्स या नरेशने चोरली.तुम्ही म्हणाला होतात की त्या दिवशीच सोसायटीच्या रस्त्यावर लाइट नव्हते. म्हणून मला संशय आला की कोणीतरी आतलाच माणूस या घटनेला जबाबदार आहे.म्हणून साध्या वेशातील पोलीस लक्ष ठेवण्यासाठी ठेवला होता.आज पहाटे तुमच्या दरवजासमोर गुपचुप पर्स ठेवत होता,ते त्याने पाहिले आणि पकडून इकडे घेऊन आला." नरेश खाली मान घालून उभा होता.त्याचा पिवळसर गोरा चेहरा काळवंडला होता.कल्याणीकडे बघून त्याच्या आई-वडिलांनी हात जोडले.आईचे डोळे रडून रडून सुजल्यासारखे वाटत होते.ती काकुळतीला येऊन म्हणाली,"माझ्या नरेशला एकदा माफ करा.आम्ही त्याला आमच्याबरोबर गावाला घेऊन जाऊ.तो वाईट मुलगा नाही हो.तुम्ही जर त्याला माफ केले नाही तर तो माणसातून उठेल.आमचा एकुलता एक मुलगा आहे तो! दया करा आमच्यावर." कल्याणीला काय बोलावे तेच कळत नव्हते.ती स्तब्ध होती.शेवटी इन्सपेक्टरनी नरेशला विचारले,"काय रे! का केलीस तू चोरी? झटपट श्रीमंत व्हायचे होते का?"नरेशने मान हलवून नाही म्हटले.आणि तो बोलू लागला,"आईच्या डोळ्यांचे ऑपरेशन करावे लागेल असे डाॅक्टर म्हणाले आहेत.खर्च पन्नास हजार येईल असे म्हणाले.एवढे पॆसे मी कुठून आणणार? त्या दिवशी तुमच्या दोघांच्या बोलण्यातून मला कळले की तुम्हाला पॆसे मिळणार होते. म्हणून मी पाळतीवर होतो.लाइट मुद्दाम बंद करून ठेवल होते.पण तुमच्या पर्समध्ये दहा लाखाचा चेक मिळाला.एवढे पॆसे मला नको होते म्हणून पर्स ठेवायला गेलो आणि पकडला गेलो. मला माफ करा मॅडम,मी असे वागायला नको होते.यापुढे जीव गेला तरी कधी चोरी करणार नाही.त्याच्या विनवण्यांचा श्रीधररावांवर. काहीच परिणाम होत नव्हता.त्याच्यामुळे आपल्या मुलीला किती मानसिक त्रास झाला हे ते विसरू शकत नव्हते.कल्याणी त्यांना घेऊन बाहेर गेली."बाबा! मला असे वाटते की त्याला माफ करायला हवे." "पण त्याला जर आपण सोडून दिले तर तो सोकावेल.उद्या दुस-या कुणाला तरी लुटण्याचा प्रयत्न करेल.गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे" बाबा म्हणाले. कल्याणीला त्यांचे म्हणणे पटत होते पण नरेशच्या वृद्ध आई-वडिलांचा चेहरा दु:खी चेहरा ती विसरू शकत नव्हती."जर तो तुरुंगात गेला तर गुन्हेगारांबरोबर राहून अट्टल गुन्हेगार होईल त्याचे आईवडील निराधार होतील.मला असे वाटते की त्याला एकदा माफ करावे.ती म्हणाली. अखेर तिघांनी मिळून तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला.

इन्सपेक्टर साहेबांशी बोलून तिने आपली तक्रार मागे घेतली.उपेंद्रचा मित्र सरकारी हाॅस्पिटलमध्ये डाॅक्टर होता.त्याच्या ओळखीने नरेशच्या आईचे चांगल्या डाॅक्टरकडून उत्तम ऑपरेशन झाले.पॆसेही कमी लागले.थोडे बरे वाटायला लागल्यावर नरेशला घेऊन दोघेही गावी निघून गेले.जाताना दोघांनी कल्याणीचे खूप आभार मानले.

********

या घटनेनंतर काही दिवस गेले वरवर सगळे शांत होते .घरातील प्रत्येक व्यक्ती आपण सर्व विसरलो आहोत असे दाखवत होती पण मनातून घाबरली होती.कल्याणी ऑफिसला गेली की ती घरी येईपर्यंत रमाबाईंचे चित्त था-यावर नसे.त्यांचे नामस्मरण,ध्यान-धारणा वाढली होती.त्यामुळे मनोबल वाढते असे त्या कल्याणीला म्हणत.तरूण सुंदर मुलगी म्हणजे श्रीधररावांनाही जबाबदारी वाटू लागली होती.कल्याणी तर मनातून हादरली होती.ज्याने रक्षण करायचे तोच घात करत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा? तिला मनातून इथे असुरक्षित वाटू लागले होते. त्याच मानसिकतेमधून तिने अपर्णाला ' ई मेल ' करून अमेरिकेला यायला तयार असल्याचे कळवले.पुढे 'फोनवर सविस्तर बोलणे झाल्यावरच कंपनीशी बोल' असे लिहीले.त्याच दिवशी रात्री श्रीधररावानी तिला उपेंद्रविषयी विचारले."जर तुला तो पसंत असेल तर त्याच्याशी लग्ना विषयी बोलतो.मला खात्री आहे की त्याच्यापेक्षा चांगला मुलगा शोधूनही सापडणार नाही.आपल्याविषयी त्याच्या मनात किती जिव्हाळा आहे हे आपण गेले काही दिवस पहातच आहोत." यावर कल्याणीने जे उत्तर दिले ते त्याना जराही अपेक्षित नव्हते. " बाबा! मी एवढ्यात लग्नाचा विचार करू शकत नाही . मी अमेरिकेत नोकरी करायची असे ठरवले आहे.उपेन्द्र खरंच चांगला आहे. त्याची पत्नी खूप नशीबवान असेल.पण त्याच्याशी लग्न केले तर मला इथेच रहावे लागेल;आणि ते मला नको आहे.तुम्ही उपेन्द्रला काही विचारू नका."श्रीधररावाना तिचा हा निर्णय आवडला नाही.पण तिची मानसिक अवस्था लक्षात घेवून ते काही बोलले नाहीत.

पुढचा आठवडा गडबडीत गेला .कल्याणी इथली सगळी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती.आपण अमेरिकेला गेल्यावर ऑफिसमध्ये कोणाला त्रास होऊ नये यासाठी तिचा आटापिटा चालला होता.अजून तिने नोकरीचा राजीनामा दिला नव्हता,कोणाला काही सांगितले नव्हते कारण अजून अमेरिकन कंपनीच्या लोकांशी तिचा संपर्क झाला नव्हता. अपर्णाचा फोनही आला नव्हता.इंटरनेटवर सुद्धा ती येत नव्हती.ती कामात व्यग्र होती की आजारी होती ; काहीच कळत नव्हते. शेवटी आठ दिवसानी तिचा फोन आला."अपर्णा ! किती वाट बघायची तुझ्या फोनची?तुझी तब्येत बरी आहे नं? मला तुझी काळजी वाटत होती." कल्याणीचे तिच्यावरील प्रेम तिच्या बोलण्यातून व्यक्त होत होते. " खूप मोठा प्राॅब्लेम झाला "अपर्णा सांगू लागली ,"गेल्या आठवड्यात नितीनची गाडी सर्व्हीसिंगला गेली होती.ऑफिस घरापासून जवळ आहे, म्हणून तो चालत घराकडे येत असताना तीन तरुणांनी त्याला अडवले.त्याचे पॆशांचे पाकीट , हातातले घड्याळ,ब्रेसलेट काढून घेतले.नितीनने प्रतिकार केला पण तिघांपुढे त्याचे काही चालले नाही.ते पळून जायला लागले तेव्हा तो त्यांचा पाठलाग करतोय हे पाहून त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.एक गोळी पायात घुसली.ऑपरेशन करून काढावी लागली.इतके दिवस तो हाॅस्पिटलध्ये होता.आणि माझाही वेळ त्याच्यामागूनच जात होता.कालच त्याला डिस्चार्ज मिळाला.या गडबडीत तुला फोन करायला वेळच मिळाला नाही."अपर्णा सांगत होती.तिला मध्येच थांबवून कल्याणीने विचारले, "म्हणजे तिकडे पण अशा घटना घडतात? मला वाटले होते की सुरक्षित वातावरण असेल." या प्रश्नावर अपर्णाने अनपेक्षित उत्तर दिले," इथे रात्र झाली की सहसा कोणी कार घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. घरफोड्याही खूप होतात."विषय बदलत ती कल्याणीला म्हणाली,"तुझे इकडे यायचे नक्की झाले ते बरे झाले.आपण खूप मजा करू.मी तुला त्या कंपनीच्या साइटचे डीटेल्स,फोन नंबर,सर्व 'ई मेल' करते."तिला मध्येच थांबवत कल्याणी म्हणाली,"साॅरी अपर्णा,मी तिकडे येण्याचा विचार बदललाय इथे चांगला जाॅब मिळाला आहे मला आणि माझे लग्नही लवकारच ठरतंय." "अभिनंदन! कोण आहे तो भाग्यवान? "अपर्णाने विचारले."ते तुला नंतर सविस्तर सांगेन.अजून नक्की ठरले नाही."कल्याणी म्हणाली. " "मला कल्पना होतीच ! तू भारत सोडणार नाहीस. लग्नाचे नक्की झाले की कळव. आता मी फोन ठेवते. नितीन हाका मारतोय " अपर्णाने फोन ठेवला.कल्याणीला चांगलाच घाम फुटला होता.डोके बधीर झाले होते.ती विचार करू लागली,जे प्रश्न इथे आहेत तेच तिथेही आहेत;कदाचित् मोठ्या प्रमाणावर आहेत,मग मी घाबरून कुठे आसरा घेणार? जोपर्यंत जोपर्यंत लोभ-मोहादि षड्रिपू आहेत,तोपर्यंत माणूस कुठेच सुरक्षित नाही.कुठे काम-क्रोधाच्या अतिरेकामुळे,कुठे गरीबीमुळे, कुठे श्रम न करता भरपूर पॆसे मिळवण्याच्या मानसिकतेमुळे गुन्हे होतच रहाणार ;मग तो जगाच्या पाठीवरील कोणताही देश असो. काहीही होऊ दे ! आता मी माझा देश सोडणार नाही ;पण स्वसंरक्षणाचे धडे घ्यायला सुरवात करायला हवी.आई म्हणते त्याप्रमाणे रोज सकाळी थोडा वेळ ध्यानधारणा करायला हवी म्हणजे मन स्थिर राहील.या काळात अगदी 'सातच्या आत घरात ' हे शक्य नाही पण जमेल तितके लवकर घरी यायला हवे; आणि हो! उद्याच बाबांना उपेंद्रविषयी होकार सांगायला हवा.

-----------------------