बाजार...
तालुक्याच्या गावचा आठवडा बाजार म्हणले म्हणजे एकच घाईचा दिवस
सकाळी उजाडल्या पासून जवळच्या अनेक गावातुन अनेक लोक वेगवेगळ्या वस्तू घेऊन येतात विकायला
हा वार असतो रविवार
या दिवशी जनावरे पक्षी प्राणी यांचा पण बाजार असतो
प्राणी असो पक्षी असो वा माणुस आपले घर प्रत्येकालाच प्रिय असते आपले घर सोडून जाणे कोणालाच आवडत नाही
थोड्या दिवसा साठी कुठे बाहेर गावी जायचे तरी घरी कधी येऊ असे होऊन जाते
जन्म झाल्या पासुन ज्या घरात वाढले आणी ज्यांच्या हातचे खाऊन मोठे झाले त्या लोकांना सोडून दुर जाणे ..
कुठे आणी कुणाच्या हातात जातोय हे पण माहीत नसणे
शिवाय ही सारी माहिती विचारणार तरी
. कशी?.. कारण ती ते तर सारे मुके प्राणी असतात म्हणजे ते बोलु शकतात ..बोलतात ही पण माणसांना त्यांची भाषा नाही समजत
आपल्याला विकायला नेत आहेत हे त्यांना समजतेच !!!
त्यामुळे असे प्राणीअसोत अथवा पक्षी विकायला बाहेर जाताना त्यांच्या भाषेत आक्रोश करीत असतात
पण माणुस मात्र स्वतच्या गरजे पोटी किंवा इतर अडचणी मुळे ही जनावरे विकतो अशा वेळी केलेला आक्रोश त्यांच्या कानी पडत नाही किंबहुना तिकडे तो दुर्लक्ष करतो
किंबहुना काही वेळा हा आक्रोश त्याला कानाआड टाकावा लागतो त्याचा ही नाईलाज असतो असाच एक मी पाहिलेला प्रसंग
रविवार सकाळची शांत वेळ .आम्ही आमच्या नेहेमीच्या रस्त्याने फिरायला निघालो होतो
आमचा फिरायचा रस्ता म्हणजे गावाबाहेर रानातून जातो
रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळी पिके असलेली शेती आहे
सकाळची वेळ खुप प्रसन्न असते पक्षी आनंदाने किलबिलाट करीत असतात
हवेत एक सुखद गारवा आणी प्रसन्न पणा दाटलेला असतो
मन एकदम आनंदी असते त्या वेळेस आम्ही दोघे असेच काही गप्पा गोष्टी करीत चालत होतो
आणी अचानक मागील बाजूने हम्बर्ण्या चा आवाज येऊ लागला
आणी एक शेतकरी आपल्या म्हशीला घेऊन बाजारच्या दिशेने जाताना दिसला
म्हैस एक एक पाऊल कसे तरी टाकत हम्बरत होती
आणी तिचा मालक .गंगे गंगे अग चल की लवकर
का येळ करतीयास ?
असे म्हणत तीला ओढत ओढत चालवत होता
त्याच्या बरोबर त्याचा एक छोटा मुलगा पण होता हातात काठी घेऊन ..
म्हैस बाजाराच्या रस्त्याला जाण्याच्या ऐवजी परत घराच्या वाटेला जाऊ पाहत होती
आता हे त्रिकुट आम्हाला ओलांडून आमच्या पुढे चालू लागले
आता आमच्या समोरून आम्हाला त्या तिघांचे व्यवस्थित दर्शन झाले
आणी समजले तो एक शेतकरी असावा ..दाढीचे खुंट वाढलेले
पायात चप्पल नव्हते ..पाय ठीक ठिकाणी भेगा पडलेले होते
कपडे जुने आणी मळके असलेले ..
कदाचित परिस्थिती मुळे त्याला हा बाजार चा रस्ता धरावा लागत असावा
मुलगा अगदी लहान सात आठ वर्षाचा असावा त्याच्या अंगात पण जुनेच कपडे होते
पण फाटके नव्हते ..पायात पण एक बऱ्या पैकी बुट सुध्धा होते
त्याच्या हातात काठी होती पण ती तो फक्त फिरवत फिरवत चालला होता
आता म्हशीकडे लक्ष गेले आमचे .म्हैस गाभण होती
हो ..गाभण म्हशीला जास्त किंमत होती ना !!!
म्हशीचे पोट इतके मोठे होते की त्या अवस्थेत तीला चालणे पण मुश्कील होते
आणी हा शेतकरी तर तीला चक्क ओढत ओढत नेत होता
काही अंतर गेल्यावर मात्र म्हैस अजिबात चालेना झाली
जोरजोरात हंबरू लागली ..आणी बरोबर असलेल्या त्या लहान मुलाकडे पाहु लागली
आता मात्र मुलाच्या लक्षात येऊ लागले की म्हशीला कुठेतरी नेत आहेत
बाजार वगैरे समजायचे त्या मुलाचे अजिबात वय नव्हते
मग तो म्हणाला ..पप्पा कुट घेऊन चाललोय आपण गंगीला ..?
पप्पा ने काहीच उत्तर दिले नाही ..आणी ओरडला चल आता बिगी बिगी
लयी येळ हुयाला लागलाया ..
आता जवळच्या एका पाण्याच्या साठ्या जवळ म्हैस थांबली आणी पाणी पिऊ लागली
शेतकरी मात्र तीला पाणी पिऊ द्यायच्या मनस्थिती मध्ये नव्हता
मग मुलगा त्या म्हशी जवळ गेला ..त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवला .
आणी म्हणला ..गंगे तहान लागली व्हय तुला ..पी हा बेगीन ,,
म्हशीने त्याच्या कडे प्रेमाने पाहिले आणी पोटभर पाणी प्यायले ..
चल रें पोरा आता ..बेगीन चल शेतकरी ओरडू लागला आणी म्हशीला ओढू लागला
आता मात्र म्हैस एक तसु भर पण जागेवरून हलायला तयार होईना ..
अगदी त्याच जागेवर अडून बसली ..
शेतकऱ्याने पोराच्या हातातली काठी ओढून घेतली आणी एक जोरात रट्टा घातला म्हशीच्या पाठीत
आता म्हशीचे ओरडणे ऐकवेना ..
पोरगा पण घाबरला ..पप्पा का मारताय गंगीला ?..नका मारू तीला
म्हशीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहात होत्या
पण रट्टे खाल्ल्याने ती नाईलाजाने अगदी मुंगीच्या पावलाने पुढे सरकू लागली
तशात नुकताच पाउस झाल्याने जमीन थोडी निसरडी झाली होती ..
म्हशीचा पाय पण सरकु लागला .
शेतकरी पण आता इरेला पेटला होता ..हो बाजारची वेळ निघून गेली तर साराच गोधळ होईल
मग तो त्या मुलाला म्हणाला शिरप्या आता आवर लवकर
म्हशीला बाजार दावायचा हाय ,,..
मग मुलाला परिस्थिती ची जाणीव झाली ..
पप्पा नाय द्यायचे गंगीला कुट मी नाय जाऊ देनार तीला असे म्हणुन त्याने म्हशीच्या गळ्यातली दोरी आपल्या हाताने खेचायचा प्रयत्न करू लागला ..
म्हशीला पण जरा धीर आला असावा त्याच्या बोलण्याने
ती पण आता त्या दोरीला हिसडा देऊ लागली .
हे सारे पाहुन आता मात्र शेतकऱ्याचे डोके चांगलेच तापले
चल रें शिरप्या जा तु घरला हिला हात लावलास तर बघ असे म्हणुन
एक झटका देऊन त्याने आपल्या पोराला दुर ढकलले..
शिरप्या दुर जाऊन पडला आणी जोरजोरात रडू लागला
शेतकऱ्याने आता परत म्हशीला जोर जोरात ओढायला सुरवात केली
आता मात्र म्हशीने असा काही जोरदार हिसडा दिला त्या दोरीला .
की ती दोरी शेतकर्याच्या हातुन सुटली आणी म्हैस अक्षरशः जीव मुठीत घेऊन इकडे तिकडे पळू लागली
आता त्याचा मुलगा पण म्हशीच्या मागे धावून तीला धरायची खटपट करू लागला
एक दोन वेळा दोरीचे टोक लागले हाताला त्याच्या .
पण त्याच्या ही बाल मुठीतून ते सुटून गेले
आता म्हैस रस्ता सोडून जवळच्या शेतात घुसली आणी शेतकरी तिच्या मागे
म्हैस संपूर्ण शेतातून सैरा वैरा धावत होती
संपूर्ण शेतात चिखल झाला होता .म्हैस गाभण असल्याने तीला स्वताचा तोल सावरणे पण मुश्कील
त्यात ती जीव खाऊन धावत होती ..
आणी ही दोघे तिच्या मागे पडत धडपडत शिव्या देत धावत होती
यानंतर एका वेळेस म्हैस त्या चिखल मातीत घसरून धप्पकन पडली असा प्रकार तीन चार वेळा घडला
आता मात्र हे दृष्य माझ्या कडून पाहवेना .
म्हशीची आणी तिच्या पोटातल्या बाळाची होणारी परवड ..याची कल्पना करवेना
मग मात्र आम्ही दोघांनी त्या दृष्या कडे पाठ फिरवली आणी आमच्या घराच्या दिशेने परतलो
यानंतर काय झाले मला नाही माहीत .
शेतकऱ्याला त्या म्हशीचा कळवळा आला का नाही ..का त्या म्हशीचे आयुष्य पडून झडून संपले
काहीच समजले नाही किंबहुना ते समजून घ्यावे असे मला वाटले नाही
माझ्या मनात त्या म्हशी विषयी इतकी करून दाटून आली होती
आणी मी तिच्या साठी काहीच करू शकत नव्हते या विचाराने मन विषण्ण झाले !!
त्यानंतर हा प्रसंग थोडा काळ माझ्या मनातून गेला असे मला वाटले
पण नाही अजूनही ते दृष्य आणी तो प्रसंग माझ्या समोर घडला असाच दिसतो
आणी परत परत तसेच वाईट वाटते ..
असा हा बाजार .....