The Festival of Diwali. A Festival of Memories in Marathi Biography by Arjun Sutar books and stories PDF | सण दिवाळीचा: आठवणींचा दीपोत्सव

Featured Books
Categories
Share

सण दिवाळीचा: आठवणींचा दीपोत्सव

परवा मी दुबईत माझ्या जुन्या बुर दुबईतील इमारतीत गेलो होतो. दुबईतील बुर दुबई हा नेहमीच गजबजलेला आणि लोकांनी भरलेला परिसर आहे. या भागाला ‘जुनी दुबई’ असंही म्हणतात. येथे भारतीयांची मोठी वस्ती असून, जवळच मीना बाजार नावाची बाजारपेठ आहे. मीना बाजारमध्ये गेलं की आपण भारतातच आहोत असं वाटतं. इथे ड्राय फ्रूट्स, चॉकलेट्स, कपडे, भारतीय ज्वेलर्सची सोनेरी दुकानं, भारतीय हॉटेल्स आणि बरेच काही मिळतं. मला तर वाटतं की मीना बाजार म्हणजे दुबईतील दुसरी ‘तुळशीबाग’च! एकदा का लेडीज बुर दुबईत गेल्या की त्या मोकळ्या हाताने परत येत नाहीत; इथे खरेदीसाठी खूप पर्याय आहेत.

दुबईमध्ये या ठिकाणी दिवाळी खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. बुर दुबईतील इमारतीच्या बाहेर भरपूर दिवे आणि सजावट असते. या ठिकाणी आल्यावर आपण जणू मुंबई-पुण्यासारख्या शहरात आहोत असा अनुभव येतो. प्रत्येक इमारतीच्या बाहेर आकर्षक लाईटिंग असतं, ते बघून थांबून बघावंसं वाटतं. हे सगळं पाहताना भाडीपा चॅनेलची एक पोस्ट आठवली, "NRI लोक काय मिस करतायत दिवाळीत?" माझं मन आपसूकच जुन्या आठवणींत रमलं.

ऑक्टोबर महिना सुरू झाला की पहाटेच्या गारव्यात झाडांच्या पानांवर दव दिसायचं, पहाटे धुक्याची दुलई असायची, आणि त्या थंडीत दिवाळी जवळ आल्याचं जाणवायचं. दसरा संपल्यावर दिवाळीची चाहूल लागायची. शाळेत असताना आमची दिवाळी कशी असायची, हे अजूनही ताजं आहे. आमच्या शाळेला दिवाळीसाठी महिनाभराची सुट्टी मिळायची, पण त्यासोबत 'दिवाळी अभ्यास' असायचा. सुट्टी लागली की घरच्या कॅलेंडरवर अभ्यासाचा प्लॅन बनवला जायचा. कठीण विषयाला जास्त दिवस ठेवायचा हा अलिखित नियम असायचा. माझ्यासाठी दिवाळीतलं मुख्य आकर्षण म्हणजे नवीन कपडे आणि दिवाळीचा फराळ.

त्या काळात आजच्यासारखं मनमोकळेपणाने आणि हवं तेव्हा कपडे घेण्याची सोय नव्हती. गावात आमचं छोटंसं गॅरेज होतं, आणि आमच्या बाबांसोबत गावातील इतर कामगारही काम करत असत. दिवाळीत त्यांच्यासाठी कपडे घेण्याची आणि दिवाळी बोनस वाटण्याची पद्धत होती. त्याचवेळी घरचे सगळे नवीन कपडे खरेदी करायचे. त्या कामगारांसोबत आम्हा भावांना एकाच तागाचं कापड मिळायचं, जे गावातल्या टेलरकडे शिवायला द्यायचं. गावातल्या टेलरकडे एवढी गर्दी असायची की लक्ष्मीपूजनाच्या आधी कपडे मिळवण्यासाठी दोन-तीन वेळा चौकशी करावी लागायची. टेलरचं ठरलेलं वाक्य असायचं, "काळजी करू नका, नवीन मशीन आहे; तीन तासांत एक ड्रेस तयार होतो." बेलबॉटम, नॅरो आणि बॅगी पँटची फॅशन त्यावेळी होती, आणि शर्टाच्या कॉलरला बटण लावायची पद्धत होती. टेलरकडे माप देताना पुढील १-२ वर्षं फिट बसेल असं माप द्यावं लागायचं.

गावात दोन आठवड्यांपूर्वीच फटाक्यांची दुकानं लागायची. ‘लक्ष्मी छाप’ फटाके खूप प्रसिद्ध होते. सुतळी बॉम्ब, लवंगी फटाक्यांचे माळ, पाऊस, भुईचक्र असे विविध प्रकारचे फटाके मिळायचे. या सगळ्यांत लाडू, चकली यांचा वास घराघरात येईपर्यंत खरी दिवाळी सुरू झाली असं वाटत नसे. त्यावेळी सगळा फराळ घरीच तयार व्हायचा. आई बुंदीचे लाडू, चिवडा, शंकरपाळी स्वतः बनवत असे, आणि आम्ही तिला मदत करत असू. त्यातला आनंद काही वेगळाच होता.

दिवाळीच्या किल्ल्याला एक वेगळं महत्त्व असायचं. छोटा का होईना, पण एक किल्ला हवाच, आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान असायचे. किल्ल्यासाठी लागणारी माती-दगड शेतात जाऊन सायकलवरून आणायचो, आणि मग स्वतःचा किल्ला बनवून झाल्यावर मित्रांच्या किल्ल्याला मदत करायचो. किल्ला बनवताना मजाही यायची, पण त्यातून शिवरायांचा अभिमान आणि मावळ्यांची आठवण मनात रुजायची.

दिवाळी पाडवा हा दिवाळीतला सगळ्यात महत्त्वाचा दिवस. त्या दिवशी वर्कशॉपमध्ये पूजन असायचं. पूजेची तयारी दोन दिवस आधीच सुरू व्हायची. वर्कशॉपची पूर्ण साफसफाई व्हायची, आणि रात्रभर झेंडूच्या फुलांचे हार बनवून सगळीकडे सजावट केली जायची. घरी दारासमोर आकाशकंदील, दरवाजावर झेंडूच्या फुलांची माळ, आणि सोबत इलेक्ट्रिक लाईटिंगचे माळ असे साधे पण सुंदर डेकोरेशन असायचं. त्यानंतर सकाळी लवकर उठून आई उटणं लावून अंघोळ घालायची. त्या उटण्याचा सुवास अजूनही नाकात दरवळतो, आणि मग नवीन कपडे घालायला भेटायचे.

दिवाळी पाडव्याच्या दिवशी दुकानांसमोर एवढे फटाके फोडले जायचे की कोणाच्या दारात जास्त फटाक्यांचे कागद आहेत, यावरून अंदाज लावला जायचा की कोण किती फटाके फोडले. लहानपणी लक्ष्मी छाप फटाके आणि सुतळी बॉम्ब फोडताना भीती वाटायची. फटाके फोडून झाल्यावर न फुटलेले फटाके गोळा करून त्यांची दारू काढून पुन्हा पेटवायचो, यात एक वेगळीच मजा असायची.

दिवाळीच्या दिवसांत मित्रांसोबत फेरफटके मारायचो, आणि फराळाच्या गप्पा रंगायच्या. परगावी उच्च शिक्षणासाठी गेलेल्या शेजारच्या मित्र-मैत्रिणींची भेट व्हायची, आणि त्यांच्यासोबत तासनतास गप्पा रंगायच्या. दिवाळीच्या दिवसांत असं एकत्र जमणं आणि आनंद साजरा करणं याचं महत्त्व खूप मोठं वाटायचं. मग सगळेजण एकत्र क्रिकेट खेळायला जायचो.

भाऊबीज हा दिवाळीतला खास दिवस. या दिवशी आम्ही मामाच्या घरी जायचो किंवा मामा आमच्याकडे यायचा. मामा दिवाळीत आला नाही तर ती दिवाळी अपूर्ण वाटायची. घरी मामा येणार म्हणजे घराचं वातावरण वेगळंच असायचं. मामा हा एकमेव नातेवाईक जो भाच्यांवर लाड करत असे. मामा कडून मिळणाऱ्या दिवाळीच्या पैशांवर खरेदीची मजा काही औरच असायची.

आता नवीन ठिकाणी असूनही जुन्या आठवणींना उजाळा देताना लक्षात येतं की, दिवाळी तशीच आहे; फक्त फरक इतकाच आहे की, ती साजरी करण्यासाठी आपल्यासोबत ती माणसं आता जवळ नाहीत. काळाच्या ओघात सगळे घरच्या जबाबदाऱ्यांमुळे आपापल्या मार्गानं निघून गेले आहेत. तुमची दिवाळी कशी साजरी होते? तुम्ही काय मिस करता? लवकर कळवा मला मग.