Savitribai in a storm in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | सावित्रीबाई एक झंझावात

Featured Books
Categories
Share

सावित्रीबाई एक झंझावात

सावित्रीबाई एक झंझावात?          *आज तीन जानेवारी. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले हे एक वादळच होतं त्या काळातील. ज्या काळात स्री पुरुष भेदभाव शिगेला पोहोचला होता. ज्या काळात स्रियांना शिक्षणाचा हक्कं नव्हता आणि ज्या काळात त्या काळातील पुरुषसत्ताक पद्धतीनं शिक्षणाचा हक्कं नाकारला होता.*         शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, असं बाबासाहेबांनी म्हटलं. त्यानंतरच्या अनेक विचारवंतांनी शिक्षणाबद्दलच्या अनेक व्याख्या केल्या. आपआपले विचार मांडले. परंतु खरं शिक्षण म्हणजे काय? हे या दांपत्यांनी व्याख्या न करता कृतीतून दाखवून दिलं.          तो काळ तसा बालविवाहाचाच होता व अगदी बाल्यावस्थेत सावित्रीबाई असतांना तिच्याशी महात्मा फुलेनं विवाह केला. त्यानंतर शिक्षण ही स्रीची आवश्यक गरज आहे, असा विचार करुन तिला आपल्याच घरी शिकवलं. तिला ज्ञानामृत पाजलं. तिला घडवलं व त्याच मुशीतून सावित्रीबाई तयार झाल्या व आज सावित्रीबाई आपल्यासमोर आदर्श प्रस्थापित करीत खंबरीपणे त्या आपल्यासमोरुन काळाच्या ओघात निघून गेल्या असल्या तरी खंबीरपणानं उभ्या आहेत.           सावित्रीबाईचा जन्म साधारणतः ३ जानेवारी १८३१ चा. ज्या काळात आफण इंग्रजांचे गुलामच होतो. त्यांना आपण आद्य शिक्षीका म्हणून ओळखतो व त्या कवयित्रीही होत्या. त्या जेव्हा शिक्षीत झाल्या तेव्हा आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईनं पुण्याच्या भिडेवाड्यात एक मुलींची शाळा काढली. हीच सामान्य स्रीवर्गासाठी उभारलेली पहिली शाळा होती. याचा अर्थ पुर्वी स्रियांसाठी शाळा नव्हत्या काय? मग शाळा जर नव्हत्या तर त्यापुर्वी देशात निर्माण झालेल्या गार्गी, मैत्रेयी कशा विद्वान होवून गेल्या की ज्यांनी शास्रार्थ केला. त्यापुर्वी शूर असलेल्या शिवाजीला घडविणारी राजमाता जिजाऊ कशी शूर झाली. इतकंच नाही तर राजारामाची पत्नी ताराबाईनं औरंगजेबाला शह दिला नव्हे तर लढली. ती शिकली नव्हती तर ती कशी लढली? असे अनेक प्रश्न निर्माण होवू शकतात स्री शिक्षणाबद्दल. कारण बऱ्याच स्रिया त्यापुर्वीही शिकलेल्या दिसतात. परंतु ते जरी खरं असलं तरी ते राजप्रासादातील शिक्षण होतं. राजवाड्यातील राजे हे युद्धात गुंतलेले असायचे. ते केव्हा मृत्यू पावतील याचा काही नेम नसायचा. त्यामुळंच राज्य कसं सांभाळायचं, याचं थोडंसं शिक्षण स्रियांना द्यावं लागायचं. परंतु ते शिक्षण सामान्य स्रियांसाठी नव्हतं. ते सामान्य स्रियांसाठी खुलं केलं महात्मा ज्योतीराव फुले व त्यांच्या सोबतीला असलेल्या सावित्रीबाईनं.            सुरुवातीला सावित्रीबाईला जेव्हा महात्मा फुलेंनी शिक्षण शिक व मी तुला शिकवतो म्हटलं, तेव्हा सावित्रीबाईनं बरेच आढेवेढे घेतले. ती सहजासहजी तयार झाली नाही. त्यानंतर महात्मा फुलेंनी तिला शिक्षण म्हणजे काय व त्याची गरज काय? ते ओबडधोबड भाषेत समजावून सांगीतलं व सध्या शिक्षण कोणत्या अवस्थेत आहे?  हेही समजावून सांगीतलं. त्यानंतर सावित्रीबाई शिकल्या व त्या शिकवत्या झाल्या.          सुरुवातीच्या भिडेवाड्यातील शाळेत सहाच मुली होत्या. ज्या शिक्षणासाठी आल्या होत्या. तसं पाहिल्यास स्रियांनी शिकवावं व एका स्त्रीने शिकवावं ही प्रथाच नव्हती. त्यामुळंच एक स्री तिच्याच बिरादरीतील स्रीजातीला शिकवते असं त्या काळातील तमाम पुरुषसत्ताक चमूला माहीत होताच त्यांनी त्याचा विरोध केला व सावित्रीबाई न ऐकत असल्यानं त्यांच्या अंगावर अक्षरशः शेण व धसकटं टाकली. त्या कारणानं सावित्रीबाई निराश झाल्या होत्या. ते त्यांनी आपल्या पतीला सांगीतलं. तेव्हा महात्मा फुले म्हणाले,         "अगं हे चालणारच. ज्या लोकांना सुधारणा हव्या नाहीत. ती मंडळी हे करणारच. तेव्हा घाबरुन जावू नकोस. मी आहे ना."           महात्मा फुले तिला बळच देत राहिले. उत्साह वाढवत राहिले ते. त्याच बळावर सावित्रीबाई दररोजचा दिवस गोड करीत राहिल्या व शिकवीत राहिल्या. त्यांनी केवळ चार वर्षात अठरा शाळा काढल्या.           सावित्रीबाईंनी शाळा काढल्या. त्यानंतर सामान्य लोकांसाठी त्या शाळा सुरु झाल्या. सामान्य स्रिया शिकायला लागल्या व आज त्या नावारुपाला आल्या.             आज स्रिया शिकल्या आणि नावारुपाला आल्या आणि ते घडलं एका सावित्रीबाईमुळं. परंतु आज त्या स्रिया नावारुपाला आल्या असल्या तरी त्यातील बऱ्याच स्रियांना आजही सावित्रीबाई आठवत नाहीत. त्यांनी केलेला त्याग आठवत नाही. ती अंगावर धसकटं झेलणं व त्या शेणानं तिचं अंग अक्षरशः न्हाऊन निघणंही आठवत नाही. कधी एखाद्यावेळेस सावित्रीबाईची जयंती येते व त्या दिवशी फक्त काही मोजक्याच स्रिया सावित्रीबाईचा उदोउदो करतात. बाकिच्यांना सावित्रीबाई कोण? हे त्या शिकल्या असल्या तरी कळत नाही.            विचार करा की जर सावित्रीबाईनं स्री शिक्षीत होण्यासाठी पहिलं पाऊल उचललं नसतं तर आज स्थिती काय असती. आजही फक्त श्रीमंत कुटूंबातील स्रिया शिकल्या असत्या. कदाचीत श्रीमंत कुटूंबातील स्रिया शिकल्या असल्या. त्या यासाठी शिकल्या असल्या, त्याचं कारण आहे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी उघडलेल्या शाळा. त्या मुलींसाठीच होत्या. परंतु सामान्य मुलींसाठी नाही.          विचार करण्यालायक बाब अशी की आज स्रिया शिकल्या. सुसंस्कृत झाल्या. त्या सावित्रीबाईच्या कार्याचं द्योतक आहे. परंतु त्यांनी जाण ठेवायला हवी की सावित्रीबाई जर झाल्या नसत्या तर आज सामान्य घरातील स्री शिकली नसती. अन् ती जर शिकली नसती तर आज तिला कोणी विचारलं नसतं आणि आज ज्या स्रिया मोठ्या पदावर गेल्या, कोणी राष्ट्रपती बनल्या, कोणी अंतरिक्षात गेल्या. कोणी पंतप्रधान बनल्या. त्या बनल्या नसत्या. म्हणून आज स्रियांनी शिकावं, उच्च उच्च श्रेणी प्राप्त कराव्या. कारण त्या जर झाल्या नसत्या, त्यांनी कार्य केलं नसतं तर आज स्री शिकलीच नसती व तिला जे आत्मनिर्भरतेचे पंख फुटले आहेत. ते फुटले नसते. यात शंका नाही. म्हणूनच स्रियांनी सावित्रीबाईला विसरु नये व त्यांचा त्यागही विसरु नये म्हणजे झालं.           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०