Dusht Chakrat Adkalela to - 4 in Marathi Thriller by Pranali Salunke books and stories PDF | दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 4

Featured Books
Categories
Share

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 4

आरती आणि अजित जेवतानासुध्दा भूतकाळात घडलेल्या घटनेच्या विचाराने अस्वस्थ झाले. इतकी वर्ष लोटली मात्र त्या घटनेचे पडसाद अजूनही त्यांच्या मनावर तसेच आहेत. अभिमन्यू जेवत असताना या दोघांचे निरीक्षण करतो. त्या दोघांच्या असं अवस्थ होण्याने काही तरी भयानक घडून गेल्याची जाणीव त्याला होते. जेवणे वैगरे आटोपल्यावरही त्या दोघांना असं शांत पाहून अभिमन्यू स्वतःचं बोलायला सुरुवात करतो.
"आई - बाबा, तुम्ही दोघे एवढे अस्वस्थ का झाला आहात? तुम्हाला ती घटना सांगताना त्रास होणार असेल तर नका सांगू" अभिमन्यू. 
"हे बघ राजा, आजा ना उद्या आम्हाला तुला ही गोष्ट सांगावी लागेलच ना? आणि तसंही आम्ही सगळं तुला सांगणार होतो. फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो" आरती. 
"कदाचित आजच ती योग्य वेळ आहे" अजित.
"तुम्हाला त्रास होणार नाही ना?" अभिमन्यू 
"थोडा होईल पण तुला सांगून तर मोकळे होऊ. म्हणजे आमच्या मनावर काही ओझं राहणार नाही" आरती. 
"अभी, तू नेहमी विचारतोस ना की आम्ही तुला गावी नेत नाही. याला पण काही कारण आहेत. आपण मुळचे कोकणातले पण आपले पूर्वज कामानिमित्त मलकापूरला स्थायिक झाले. त्यामुळे आपण तिथलेच झालो. मी असं ऐकलंय की आपलं आधी आडनाव सावंत होतं. पण मलकापूरला स्थायिक झाल्यानंतर आपण भोसले आडनाव धारण केलं. मलकपुरला आपली शेती आहे, फळबागा आहेत आणि एक मोठा वाडा आहे. जो आपल्या कोणत्यातरी पूर्वजांनी बांधला असेल हा पण त्याला दुरुस्त माझ्या पणजोबांनी केलं. तर मुळ मुद्दा हा की त्यांच्या काळात काही तरी भावकीमध्ये वाद झाले होते. ते वाद संपत्तीला धरून होते की आणखी काही या खोलाईत आम्ही कधी गेलोच नाही. मीही तिथेच लहानाचा मोठा झालो आणि तिथल्याच एका कार्यालयात नोकरीला लागलो. आजोबा होते तोवर सगळं ठीक होत. ते गेल्यावर मात्र सगळ्या शत्रूंनी डोकी वर काढली. बाबा त्यांच्या परीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. बाहेरच्या शत्रूंशी चार हात करू शकत होतो मात्र घरातल्या शत्रूंना कसं तोंड देणार? माझ्या सख्ख्या काकाने एका पंचविशीतल्या मुलीशी लग्न केलं. त्याला आधीच तीन मुली होत्या. त्याच्या वागण्याने काकीला तर धक्काच बसला. बाबांनी त्याला त्याच्या वागण्याचा जाब विचारला तर म्हणाला त्याला जे हवं ते फक्त त्याची नवी बायको देऊ शकेल असं उत्तर दिलं. सगळं काही सुरळीत सुरू असतानाही तो असा का वागला हेच आम्हाला कळेना. त्याच्या दुसऱ्या लग्नानंतर घरात पहिल्यासारखे वातावरण राहिले नाही. काकी आणि तिच्या मुली सतत दुःखात दिसायच्या आणि घरात कोणी ना कोणी आजारी पडायचे. त्यातच एक गोष्टी घडली एका रात्री काकीची भयानक अशी किंकाळी ऐकली आणि त्यानंतर तिची वाचा गेली. काय झालं होतं त्या रात्री हे मात्र कुणालाच माहिती नाही." अजित
"काय झालं बाबा, तुमच्या डोळ्यांत पाणी? तुम्ही ठीक आहात ना?" अभिमन्यू 
"हो बाळ, त्यानंतर आठवडाभरातच काकी गेली. त्यानंतर घरात विचित्र आवाज आणि घटना घडू लागल्या. यातही एक गोष्ट मात्र आई निग्रहाने करत होती ते म्हणजे देवासमोर दिवा लावणे आणि पोथी वाचणे. यात तिने कधीही खंड पडू दिला नाही. या सगळ्यातून देवच तारेल असा विश्वास तिला होता. काकीने आईच्या पूजेत कितीही विघ्न आणले तरी आई काही तिला बधत नव्हती. अशातच काकांच्या मोठ्या मुलीने, नीलिमाने विहिरीत उडी मारली. तिच्या अशा मृत्यूने काका आणि बाबा दोघेही हादरले. पण आई खंबीर होतीच. घरात नकारात्मक शक्ती असल्याचा तिला भास होत होता आणि ही शक्ती संपवण्यासाठी तिला मदत हवी होती. पण त्यासाठी तिला घरातून बाहेर निघणं गरजेचं होतं. घरात असं वातावरण असताना एके दिवशी तिने माझ्या लग्नाचा विषय काढला. मला तिची योजना लक्षात येताच मीही लग्नासाठी होकार दिला. आम्ही घरात काही बोलू शकत नव्हतो. पण मुली बघायच्या निमित्ताने आम्ही बाहेर जाऊन मदत मागू शकत होतो. आई, बाबा आणि मी त्यासाठी बाहेर निघायचो पण मंदिरात जायचो आणि तिथे काही मदत मिळते का बघायचो. मंदिरतल्या उपायाने फारसा काही फरक पडत नव्हता. एके दिवशी आम्ही आमच्या गावातल्या गुरूजींनी सुचवलेल्या स्थळाच्या घरी गेलो. ते स्थळ होतं तुझ्या आईचं. गुरूजींनी आम्हाला तिथे मदत मिळेल या अपेक्षेनेच पाठवलं होतं हे आम्हाला नंतर समजलं. आईच्या सांगण्याप्रमाणे आम्ही आधी मुलगी बघण्याचा कार्यक्रम केला. तुझ्या आईला पाहताक्षणीच मी तिच्या प्रेमात पडलो. तुझ्या आईच्या घरी दत्तात्रेयांची मोठी तसबीर होती. ती पाहूनच माझ्या मनातली भीती जाऊन सकारात्मकता निर्माण झाली. आईला मी ही पसंत पडल्याचा इशारा करताच आईने मुळ मुद्द्याला हात घालायला सुरुवात केली. सगळं सांगून झाल्यावर हिच्या वडिलांनी लग्नाला होकार दिला आणि त्यांनी या सगळ्यात मदतीचे आश्वासनही दिले. आमचं लग्न वैगरे सगळं पार पडल्यावर मात्र आम्हाला एका साधकाची मदत मिळाली. तो आमच्यापर्यंत कसा आला हे आम्हाला समजलं नाहीच. त्याने केलेल्या पुजेतून मात्र बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या आणि त्यावर तोडगाही काढला गेला. आम्ही यातून बाहेर पडलो हे जरी खरं असलं तरी हा त्रास पुन्हा काही वर्षांनी सुरू झाला. तेव्हा आई मात्र आणखीनच घाबरली. कारण आता तिची नात्वान घरात वाढत होती. तिने लागलीच फोन करून हिच्या वडिलांना सगळं सांगितलं. पण यावेळेस आम्हाला मदत मिळू नये म्हणून बहुतेक त्या शक्तीचे प्रयत्न सुरू होते. अशातच दोन बळी गेले होते. आम्ही भीतीच्या सावटाखाली राहत होतो. आई आणि हिने कंबर कसली होती म्हणून मलाही धीर आला. काकी मात्र काळी पडत चालली होती. खूप भयंकर होत ते सगळं..आठवलं तरी अंगावर काटा येतो. तिने आमचे घराबाहेर पडायचे सगळे मार्ग बंद केले होते. मग एके दिवशी घरात एक साधूसारखा वेश करून आलेला गृहस्थ आला. त्याने आमची सुटका केली त्या शक्तीपासून...एखादं घनघोर युद्ध घडून गेल्यासारखं आम्हा सगळ्यांना वाटलं. आंजनेय असं नाव होतं त्या  गृहस्थाचं... तेव्हा त्याने आम्हाला हा वाडा सोडून दुसरीकडे राहायला जाण्याचा सल्ला दिला.निदान सगळ्या लहान मुलांना लांब ठेवायला सांगितलं. सध्यापुरती त्याने ती शक्ती बांधून ठेवली होती पण तिला संपवू शकला नव्हता. मग काय आईने हट्टाने आम्हाला दुसऱ्या शहरात स्थायिक व्हायला सांगितलं. आरती आणि मी कोल्हापूरातच राहिलो पण घरापासून लांब आलो. आई आणि बाबा होते तेव्हा काही वर्ष तिथे जात होतो मग मात्र काही काम असेल तरच जात होतो. काका, काकी आणि त्यांचा मुलगा व सून तिथे अजून आहेत. पण आता आमच्या दोघांचं मन काही केल्या तिथे जायला धजावत नाही. म्हणून आम्ही तुला तिथे नेलं नाही" अजित
"पण बाबा तुम्हाला कसं समजलं ते साधक होते?" अभिमन्यू 
"हे सगळं झाल्यावर आमच्यासोबत आम्ही कोल्हापूरला आलो तेव्हा हिचे आई-वडील म्हणजेच तुझे आजी-आजोबा इथे आम्हाला सोबत म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी ते दोघे साधक वर्गातले होते. असा गट जो अशा कठीण प्रसंगात लोकांची मदत करतो. आंजनेय यांनी आम्हाला सांगितलं होतं की ते आणखी तयारी करून वाड्यातील शक्ती संपवतील. पण ते आलेच नाहीत." अजित
"हो ना बाबांनी खूप संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी काही पुन्हा भेट झाली नाही" आरती
"कदाचित ते कुठे तरी अडकले असतील?" अभिमन्यू
"असू शकतं, कारण बाबा सांगत होते ते त्या काळचे सगळ्यात मोठे साधक होते." आरती
"सरांनी आणि साधिकाने मला सांगितलं त्याप्रमाणे मला काही मंत्र वैगरे शिकून घ्यावे लागतील. कदाचित हे सगळं वाड्याशी निगडित असेल तर" अभिमन्यू
"हे बघ काहीही झालं तरी मी तुला आता वाड्यात पाठवणार नाही." आरती
"मी सुद्धा आरतीशी सहमत आहे." अजित
"पण बाबा, त्यांनी हे सगळं सांगण्यामागे काही तरी उद्देश असेल ना?" अभिमन्यू
"बाळ, आम्ही ते नाकारत नाहीये पण सध्या तू त्यांनी जे सांगितलं आहे ते शिकण्यावर भर दे" अजित 
"आणि आता या फार विचार करत राहू नकोस, स्वामी आहेत आपल्या पाठीशी...तेव्हा आता निवांत झोप" आरती. 
"हो जातो." अभिमन्यू
"अहो, आता तरी आपण त्याला वाड्यात जाण्यापासून रोखलं आहे पण तो आज ना उद्या कधीतरी वाड्यात जाणार आहे तेव्हा काय करायचं आपण?" आरती
"आरती, चिंता करू नकोस. तुला आंजनेय यांनी केलेलं भाकीत आठवतं आहे ना? बस मग आणखी काही विचार करू नकोस, स्वामी त्याच्या मदतीला कोणाला तरी नक्की पाठवतील" अजित 
"अहो, त्यांचं भाकीत मी कसं विसरू शकेन?" आरती. 
"आपण एके दिवशी त्याच्या सरांची भेट घेऊ आणि त्यांच्या कानावर या गोष्टी घालू. तोपर्यंत तू बाबांशी बोलून साधकांना कसं शोधायचं ते विचारून घे" अजित
"ठीक आहे. मी उद्याच बाबांना फोन करते. चला आता झोपुया." आरती
"हो चल" अजित
-------------------------------------------------------------
विक्राळ आणि भयावह अशा एका मूर्तीसमोर हवन करणाऱ्या व्यक्तीचे डोळे ताडकन उघडले. त्याला जे डोळ्यासमोर दिसलं त्याने त्याचा संताप होतो. 
 "महादू, इकडे ये..." तो.
 "जी सरकार," महादू.
 "कारंडे आणि राजाध्यक्षला बोलावून आण." तो

"जी सरकार, आता आणतो." महादू
 "सरकार, तुम्ही बोलावलंत?" राजाध्यक्ष
 "हो, तुमचं आमच्या कैद्यांकडे बारीक लक्ष असतं ना?" तो 

 "हो सरकार," राजाध्यक्ष 
"मग असं असताना त्या सुदामाने साधकांशी कसा संपर्क साधला?" तो 
 "कसं काय शक्य आहे? सरकार, मी चोख बंदोबस्त केला होता. विचारा कारंडेला...मी बनवलेलं चक्र मोडणं शक्यच नाही..." राजाध्यक्ष
 "हो सरकार, याने आणि याच्या मुलाने ते चक्र बनवलं आहे. त्यामुळे इथून तो संपर्क होणं शक्य नाही." कारंडे. 
"म्हणजे...तिकडून संपर्क गेला आहे...कसं शक्य आहे? हे फक्त एकालाच साध्य होतं..." तो.
"कोणाला सरकार?" कारंडे 
 "आंजनेय..." तो

 "कसं शक्य आहे? सरकार, त्याला जाऊन तर बरीच वर्ष झाली ना..." राजाध्यक्ष
 "हो...पण तो आंजनेय आहे हे विसरून चालणार नाही." तो.

 "कोण आहे हा आंजनेय?" कारंडे 
 "माझा सगळ्यात मोठा शत्रू...आणि सगळयात ताकदवर साधक..." तो
 "पण मग आता काय करायचं सरकार?" राजाध्यक्ष
"कारंडे, तू त्या तारिणीचा शोध घे... आणि राजाध्यक्ष तू आंजनेय खरोखरच मेला आहे का? याचा शोध घे...आणि त्याच्याविषयी जमेल तितकी माहिती गोळा कर..नक्कीच त्याने काही तरी तजवीज करून ठेवली असणार... कारंडे तो मुलगा मला हवा आहे काहीही करून..." तो 
 "हो सरकार, मला तो उद्या तो भेटणार आहे..." कारंडे
"सरकार, माझा मुलगाही तुमच्या कमी येऊ शकतो..." राजाध्यक्ष
"हो लक्षात आहे माझ्या...त्याला उद्या मला भेटायला सांग...चला तुम्ही निघा आता... माझ्या साधनेचा वेळ झाला आहे..." तो

"हो सरकार..." राजाध्यक्ष - कारंडे

आंजनेय जिवंत असेल तर खरच आपल्याला जास्त ताकद लागणार आहे. यावेळी हरायचं नाही, तयारीला लागायाला हवं, तशी माणसे गोळा करायला हवीत. आंजनेयला पुरून उरणारी आणि त्याचे शत्रू अशांशी तातडीने संपर्क साधायला हवा. या सगळ्या गोष्टी मनाशी ठरवून तो पुन्हा साधनेला बसला. 
-------------------------------------------------------------
साधिका तिच्याकडे मदत मागणाऱ्या आजीच्या घरी गेली. त्यांच्या घरात प्रवेश करताच तिला नकारात्मक शक्तीचा अनुभव येऊ लागला. तिचा हात तिच्या गळ्यातल्या रुद्राक्षाकडे जाताच तिला त्याची उष्णता जाणवू लागली. इथे जे काही आहे ते ताकदवर आहे तिला याची जाणीव झाली. 
साधिका : आजी, तुम्ही कशा आहात आणि या घरात तुम्ही एकट्याच राहता का ? 
आजी : मी आणि माझी नात...
साधिका : तुम्हाला हा त्रास कधीपासून जाणवतो आहे? आणि नेमकं काय होतं? 
आजी : माझी नात, श्रेया सहलीवरुन परत आली आहे तेव्हापासून ती वेगळीच वागते आहे... आम्ही शाकाहारी आहोत... पण हल्ली तिला रात्री मांसाहारी जेवण हवं असतं...संध्याकाळी ७ नंतर तिचा आवाजच काय तिचं वागणं - बोलणं सगळंच बदलत...
साधिका : किती वर्षांची आहे तुमची नात? 
आजी : बावीस वर्षांची आहे...सध्या कॉलेजमध्ये शिकतेय आणि एका वकिलाकडे टायपिंगची कामे करते... 
साधिका : आता ती कुठे आहे? 
आजी : अग काल तिने खूप गोंधळ घातला...म्हणून मी मंदिरातून आणलेली विभूती तिच्या डोक्यावर लावली आणि तिला खोलीत बंद केले...त्याच मंदिरात मला तुझ्या आणि तारिणीविषयी समजले. 
साधिका : चला मला तिची खोली दाखवा... 
आजी : या दिशेला ये... 
श्रेया आणि तिची खोली बघून साधिकाला काही गोष्टींचा अंदाज येतो आणि तिला नेमका काय उपचार करायचा आहे तिच्या लक्षात येतं. 
साधिका : आजी, चला आपण बाहेर जाऊन बोलू... 
आजी : हा चल...तुला काही समजलं का ? 
साधिका : हो, बाहेर चला...सांगते. इथे बसा...आजी तुमची नात सहलीवरुन येताना एकटी आलेली नाही...कोणीतरी तिच्यासोबत आलं आहे...त्यामुळे ते जे काही आहे त्याने तिच्या शरीर आणि मनाचा ताबा घेतला आहे...बर मला सांगा...ती सहलीला एकटी गेली होती का? 
आजी : तिच्या कॉलेजचे मित्र-मैत्रिणीही होते तिच्यासोबत...
साधिका : कोण कोण होतं मला सांगू शकाल का ? 
आजी : अगदी सगळ्यांची नावं आठवत नाही पण तिची जवळची मैत्रीण आहे शलाका... 
साधिका : कुठे राहते ती... 
आजी : ही दोन घरं सोडून राहते...बोलावू का तिला... 
साधिका : हो... 
आजी लगेच घरातल्या फोनवरून शलाकाला फोन लावतात आणि तिला बोलावून घेतात. एक दहा मिनिटे झाल्यावर शलाका आजीच्या घरी येते. साधिकाला पाहून आधी ती घाबरते पण मग स्वतःला सावरत ती आजीला हाक मारते. तिला पाहिल्यावरच साधिकाच्या मनात धोक्याची घंटा वाजते आणि ती सरळ हीची शाळा घेण्याचे ठरवते. 
साधिका : आजी, तुम्ही आमच्या दोघींसाठी चहा आणाल का ? तोवर आम्ही आमची ओळख करून घेऊ...
आजी : हो आता आणते...
साधिका : इथे बस...मला सांग...तुम्ही सहलीला कुठे गेलेलात... 
शलाका : ते आम्ही, कोल्हापूरमध्ये एक रिसॉर्ट आहे तिथे गेलो होतो... 
साधिका : खोटं बोलायचं नाही...मला खरं अपेक्षित आहे... 
शलाका : ते आम्ही एका झपाटलेल्या जागेवर गेलो होतो... 
साधिका : कोणत्या आणि का गेला होतात? 
शलाका : ते ती जागा आम्हाला पहायची होती...म्हणजे उत्सुत्कता होती म्हणून गेलो होतो.. 
साधिका : जागा कोणती ? 
शलाका : नायकिणीचा वाडा... 
साधिका : मूर्ख आहात का तुम्ही? हे नसते उद्योग तुम्हाला कोणी करायला सांगितले..? 
शलाका : कोणी नाही...आम्ही फक्त ऐकलं होतं त्या जागेविषयी...
साधिका : हे सगळं तर मी काढून घेईनच...तुम्ही सगळे त्या वाड्यात राहिला होतात का ? 
शलाका : नाही...आम्ही तिथेच जवळपास असलेल्या रिसॉर्टमध्ये राहिलो होतो... 
साधिका : वाड्यात गेला होतात...
शलाका : म्हणजे...आम्ही दिवसा गेलो तर काहीच त्रास झाला नाही...म्हणून या वाड्याविषयीच्या अफवा असतील असं समजून पुन्हा रात्री जायचं ठरवलं...पण रात्री कुणी यायला तयारचं होईना... 
साधिका : पटकन बोलायचं... 
शलाका : सगळ्यांनी नकार दिल्यावर विनिता म्हणून आमची एक मैत्रीण आहे...ती खूप धाडसी असल्याने ती एकटीच आत गेली... अचानक तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून आम्ही घाबरलो... पण तिला वाचवायला जायची आमची हिंमत होईना...त्यात श्रेया मागचा पुढचा विचार न करता तिला वाचवायला आत गेली...जवळ जवळ पहाटे त्या दोघी वाड्यातून बाहेर आल्या... मग आम्ही तडक सगळे घरी निघून आलो... 
साधिका : तू हे बोलते आहेस ते अर्धसत्य आहे... मला कळेलच काय झालं होतं ते....श्रेया वर्गात कशी असते? म्हणजे काही फरक जाणवला का तुला...? 
शलाका : नाही...ती नेहमी असते तशीच वाटली मला...
साधिका : ठीके तू जा आता घरी... 
शलाका : श्रेयाला काही झालंय का? तुम्ही कोण आहात ? 
साधिका : श्रेयासाठी मी आहे..तिची काळजी तू नको करुस... आणि मी कोण आहे लवकरच कळेल तुला...तेव्हा आता इथून निघ...
शलाका : काही मदत लागली तर सांगा...
साधिका : मला तुझ्या मदतीची गरज नाही....तू तुझं बघ...उद्या कदाचित तुलाच माझी मदत लागेल...आणि हो जिच्यासोबत राहून हे करते आहेस ना...तिच्यापासून तू सावध रहा...बाकी तू सुजाण आहेस...
साधिकाचा हा उपदेश ऐकून शलाका तोंड वेंगाडते आणि घरातून बाहेर पडते. इथली परिस्थिती ती लागलीच फोन करून एकाला कळवते. 
-------------------------------

 प्रणाली प्रदीप