If the nature of others can be changed in Marathi Anything by Pralhad K Dudhal books and stories PDF | इत्तरांचा स्वभाव बदलता आला तर

Featured Books
Categories
Share

इत्तरांचा स्वभाव बदलता आला तर

मला इत्तरांचे स्वभाव बदलता आले असते तर...  

    'व्यक्ती तितक्या प्रकृती'अशी उक्ती आपल्याकडे सर्रास वापरली जाते.दैनंदिन आयुष्यात आपला विविध वृत्तीच्या, विविध प्रकारच्या लोकांशी काही ना काही संबंध येत असतो. त्यातल्या त्यात जो सरळमार्गी आहे त्याला तर अनेकदा आडमुठ्या स्वभावाच्या लोकांकडून खूप मनस्ताप सहन करावा लागतो.      सहज मनात विचार आला की मला एखादी दिव्य शक्ती मिळाली आणि इत्तरांचे स्वभाव हवे तसे बदलता आले तर...

   साधारणपणे आपण बघतो की आपल्या संपर्कात ज्या व्यक्ती येतात त्यापैकी ज्या व्यक्ती आपल्याला हवे, आपल्याला जसे आवडते तसे वागल्या तर अशा व्यक्ती आपल्या अत्यंत आवडत्या असतात,तर ज्यांचे आपल्याशी जमत नाही, त्यांचे स्वभाव व त्यांची मते आपल्यापेक्षा वेगळी असतात.    मला जर समोरच्या व्यक्तीचा स्वभाव बदलण्याची शक्ती प्राप्त झाली, तर सर्वप्रथम मी ज्यांचा ज्यांचा स्वभाव आवडत नाही अशा नेहमी संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची यादी बनवून एका एका व्यक्तींचे स्वभाव एका पाठोपाठ एक मला हवे तसे बदलून घेईन. एकदा का त्यांचे स्वभाव बदलले की मग आजूबाजूचे सगळे लोक मला हवे तसे वागू लागतील आणि निदान  माझे जगणे अगदी सोप्पे होऊन जाईल.   सरकारी कार्यालयात,महानगरपालिकेत, पोस्टात,बँकेत जिथे जिथे माझी कामे अडवली जातात, बाकीच्या लोकांना नाडले जाते, जेथे लाल फितीच्या कारभार असतो कामे होण्यापेक्षा ती न होतील असे पाहिले जाते, तिथल्या सर्व बाबू लोकांचे तसेच अधिकाऱ्यांचे स्वभाव मला हवे तसे मी बदलवून टाकेन आणि सर्वत्र सर्वांची विनाकारण अडवली जाणारी कामे होतील.लोक आनंदी होतील.     आपल्याला बऱ्याचदा समाजातल्या ज्ञानी म्हणून नावाजलेल्या लोकांशी मैत्री करावीशी वाटते,काही लोकांशी सलगीचा संबंध असावा असे वाटते;पण यापैकी काही लोकांच्यात अहंकार अगदी ठासून भरलेला असतो.स्वतःला ते अतिशहाणे समजत असतात.मला मिळालेल्या शक्तीने मी त्यांचा स्वभाव बदलून त्यांना माणुसकीने वागायला भाग पाडेल...   

माझ्याकडे असलेल्या या शक्तीचा मी राजकारणी लोकांवर गुंडावर समाजविघातक असलेल्या व्यक्तींवर करेन आणि मला हवे तसे त्यांचे स्वभाव बदलून घेईन जेणेकरून भ्रष्टाचार आणि  गुंडागर्दी संपून जाईल.समाजात सदाचार आणि बंधुभाव वाढावा यासाठी मी माझ्या या शक्तीचा पुरेपूर वापर करून घेईन

.  आपल्या आजूबाजूला अनेक माणसे अशी असतात ती इत्तरांशी खूप वाईट वागत असतात;पण आपणच योग्य आहोत असा दुराभिमान त्यांच्याकडे असल्याने ते आपल्या जवळच्या नात्यागोत्यातल्या माणसांशीही ते नीट वागत नाहीत.आपलेच खरे करण्याच्या नादात ते सर्वांच्यावर अन्याय करत असतात;पण त्यांना या गोष्टीची जाणीवच नसते. अशा लोकांचा स्वभाव मी मला मिळालेल्या शक्तीने बदलून टाकीन आणि माणसा माणसाच्या नात्यात गोडवा पेरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.     मला मिळालेल्या शक्तीचा मी माणसाच्या मनात असलेल्या राक्षसाला खरा माणूस बनवण्यासाठी उपयोग करेल. देशातील दहशतवाद गुंडागर्दी करणाऱ्यांचे स्वभाव बदलले तर देशातला आतंकवाद संपून जाईल.सर्वत्र शांतता प्रस्थापित होईल...तसेही करण्याचा मी प्रयत्न करेन......पण....

 ...पण ....या सगळ्यात एक खूप मोठा धोकाही आहे...     

 कुणाच्याही स्वभावात मी बदल करू शकतो, माझ्याकडे दिव्य शक्ती आहे ...याचा कदाचित मलाही गर्व होऊ शकतो!   

  या दिव्य शक्तीचा कदाचित माझ्याकडून गैरवापरही होऊ शकतो.     

या मिळालेल्या शक्तीपोटी  मी अहंकारग्रस्त होऊ शकतो,      सर्वांनी माझ्या मनाप्रमाणे वागावे या लालसेपोटी मी मला हवे तसे लोकांचे स्वभाव बदलू लागलो तर?

इत्तराना बदलता बदलता माझाच स्वभाव  एक  दिवस बदलून जाईल मी स्वार्थी होईल आणि माझे स्वत्व हरवून जाईल ....असे स्वार्थी होऊन जगणे माझ्या तत्वात बसत नाही ... इतरांना बदलता बदलता माझ्यात बदल होणे मुळीच मान्य नाही कारण माझे  स्वतःवर  खूप प्रेम आहे!  काही नको मला तसली शक्ती....   त्यापेक्षा मी आहे तसाच बरा आहे....  उगीच समोरच्याला बदलवण्यापेक्षा आनंदाने जगण्यासाठी आवश्यक तसे, आवश्यक तेवढे स्वतःत बदल करणे खूप सोपे आहे!

 © प्रल्हाद दुधाळ, पुणे. 9423012020