Can corruption be curbed? in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | भ्रष्टाचारावर लगाम लावता येईल काय?

Featured Books
Categories
Share

भ्रष्टाचारावर लगाम लावता येईल काय?

भ्रष्टाचारावर लगाम लावता येईल काय?


            भारत देश तसं पाहिल्यास भांडवलशाही राष्ट्र. यात मुक्त अर्थव्यवस्था आहे. मुक्त अर्थव्यवस्था यांचा अर्थ सर्वसामान्य लोकांच्या मतानुसार आपल्या मेहनतीनं धन कमवणं. हा अधिकार आपल्याला संविधानानं निर्माण करुन दिला आहे. त्यानुसार आपण धनराशी कमवीत असतो. मात्र संविधानात जरी मुक्त अर्थव्यवस्था सांगीतली असली तरी घटनेच्या ३८ व्या कलमेनुसार कोणालाही आर्थिक असमानता निर्माण करता येणार नाही वा आर्थिकतेवरुन कुणाचीही हेळसांड करता येत नाही. 

         भारतात मुक्त अर्थव्यवस्था आहे व घटना ही जरी मुक्त अर्थव्यवस्था साःगत असली तरी ती कधीच कुणाचा अर्थव्यवस्थेवरुन तिरस्कार करायला लावत नाही. परंतु असे असले तरी आजची काही मंडळी ही आर्थिकतेवरुन नेहमी व सतत वाद उत्पन्न करतांना दिसतात. ज्याचेजवळ भरपूर पैसा असतो. अशी मंडळी ही गरीबांना मोजतच नाही व त्यांची सतत हेळसांड करतांना दिसतात. हेच वास्तविक चित्र आज प्रत्येकांना अनुभवायला मिळते. 

        भारतात मुक्त अर्थव्यवस्था आहे व ती असायलाच हवी होती. त्या अर्थव्यवस्थेचा स्विकार भारतानं सन १९४८ लाच केला. त्यानंतर संविधान बनलं व संविधानात तशा अर्थव्यवस्थेचा पुरस्कारही करण्यात आला. त्यानंतर त्याच अर्थव्यवस्थेवर आधारीत काही कलमाही बनल्या. ज्या कलमा माणसाला मुक्त अर्थार्जनाची परवानगी देते. तुम्ही कितीही कमवा. ही आपलीच कमाई असंही सांगते. परंतु हे जरी खरं असलं तरी भारंईय अर्थव्यवस्था ही कधीही असा पैसा भ्रष्टाचारानं कमविण्याची परवानगी देत नाही. ती भ्रष्टाचाराला विरोध करते. परंतु हे जरी बरोबर असलं तरी आजची बरीचशी मंडळी ही भ्रष्टाचारी व वाम मार्गाने पैसा कमवते. ती मंडळी पैसा कमविण्यासाठी कोणत्याही स्तराला जात असते. जरी संविधानात कलमांचा अंतर्भाव असला आणि कायद्याचा धाक असला तरी पैसा कमवीत असतांना कायद्याला लोकं आज घाबरत नाहीत, असं चित्र दिसतं. आता पैसे कमविण्यासाठी काही लोकांनी वाममार्खाचे जे प्रकार योजनेले आहेत. ते सांगणे गरजेचे आहे. 

          वाममार्गानं पैसा कमविण्याचा पहिला प्रकार आहे, फसवणूक करणे. ज्यात आता लोकं ऑनलाईन फसवणूक हाही एक प्रकार वापरत असतात. ज्यातून सायबर क्षेत्र असुरक्षीत झाले आहे. 

           दुसरा प्रकार आहे, अपराध करुन पैसा कमवणे. जसे, कोणाच्या खुनाची सुपारी घेणे. कोणाचे अपहरण करुन पैसा मागणे. चाकूच्या धाकावर खंडणी गोळा करणे. 

            तिसरा प्रकार आहे, भ्रष्टाचारी मार्ग अवलंबून पैसा कमविणे, हे मात्र सरकारी कार्यालयात होतं. सरकारी कर्मचारी हे कार्यालयातील कोणतेही काम करुन देतांना पैसा घेतात. ती लाचच असते. 

          भारतात मुक्त अर्थव्यवस्था आहे व भारतीय कायदा अशा अनैतिक मार्गानं पैसा कमविण्याची परवानगी देत नसला तरी भारतीय लोकं हे अशाच प्रकारच्या अनैतिक मार्गानं पैसा कमवितात. जो प्रत्यक्षात दर्शवला जात नाही. उदाहरणार्थ एखादं दुकान. दुकानदार हे आपल्यावर असे प्रसंग उद्भवू नये म्हणून कर भरतात. परंतु ती त्यांच्या कराची रक्कम ही कमी असते. कारण वस्तूची खरेदी किंमत ही जरी स्थिर असली तरी तिच्या विकण्याची किंमत ही स्थिर नसते. अशावेळेस ती वस्तू दुकानातून जेव्हा विकली जाते, तेव्हा त्या वस्तूंची खरेदी किंमत दिसते. परंतु ती वस्तू कितीला विकली हे काही दाखवले जात नाही. यातच वरचा जो अतिरिक्त पैसा मिळतो. तो काळाच पैसा असतो. शिवाय जे लोकं खंडणी रुपात पैसा गोळा करतात. त्यांचाही पैसा हा मोजमाप केला जात नाही. याच पैशातून काही लोकांच्या मालमत्ता गोळा होतात. तोही भ्रष्टाचारच असतो. त्या मालमत्तेचंही मोजमाप होत नाही. आज तर आणखी नवीनच फॅड निर्माण झालं. आता शेजारचा शेजारी कंगाल असतो. त्याचेकडे खायलाही पैसा नसतो आणि अचानक अशी लक्ष्मीची कृपा होते की त्याच्याकडे भरमसाठ पैसा येतो. हे त्याच्या वागण्यातून दिसतं. आता तो पैसा कुठून आला? हे कळायलाही मार्ग नसतो. असे बरेचसे महाभाग असतात की ज्यांच्याकडे अशी लॉटरी लागत असते. कोणी अशा भ्रष्टाचारी मार्गानं एका रात्रीतून श्रीमंत होतो तर कोणी एका रात्रीतून एका रात्री खाकही होत असतो. म्हणतात ना की राजाचा रंक व रंकाचा राजा बनतो तसे. मात्र कोणी कोणी संपूर्ण आयुष्यभर राब राब राबत असतात. तरीही एक छदामही शिल्लक पडत नाही. 

          पैसा कमवावा. तो कमविण्यासाठीच असतो. तो कोणी किती कमवायचा याचं गणित नाही आणि मोजमापही नाही. परंतु आपण जेही काही कमवतो, ते रास्त मार्गानं कमवावं. तो अनैतिक मार्गानं कमवू नये. शिवाय जोही पैसा कमवला, त्यातील काही भाग हा देशासाठी द्यायलाच हवा. कधी कर म्हणून तर कधी स्वखुशीनं दान म्हणून. कारण त्याच पैशानं देशाची अर्थव्यवस्था चालत असते. देशाला बलशाली बनवता येते. देशाचा तळागाळातील विकास करता येतो. त्या पैशातून रस्ते बांधणे, नागरिकांना सेवा पुरवणे इत्यादी गोष्टी घडत असतात. परंतु लोकं तो पैसा दान देण्याचं सोडा, साधा तो पैसा कर रुपातच भरत,नाहीत. कित्येक जण असे असतात की जे कर बुडवतात. मग कुठून देशाचा विकास करता येईल? शिवाय याच रांगेत काही नेतेही असतात. मग जनता का बरं तसं करणार नाही. 

        विशेष सांगायचं झाल्यास लोकं असा पैसा कमवितात, जो वाममार्गाचा असतो. तो पैसा लोकं कुठून आणतात ते कळत नाही. कोणी त्याला गुप्तधन मिळालं असंही म्हणतात. तर कोणी मोबाईलशर रवी सर्कल वा खेळ खेळून कमवला असेही म्हणतात. परंतु तो पैसा कोणी कसाही कमवो, त्याचा बाऊ होवू नये. मात्र असा जर पैसा कुणाकडे आलाच तर त्यांनी कधी त्या पैशातून एखादा गरीब मुलगा दत्तक घ्यावा. त्या मुलाचं शिक्षण व पोट त्याच पैशानं भागवावं. जेणेकरुन गरीबाच्याही मुलाला आपल्या ज्ञानाची भूक भागवता येईल व तो शिक्षणाच्या उत्तूंग शिखरावर पोहोचू शकेल. 

        आजचा काळ मुक्तअर्थव्यवस्थेचा आहे व या काळात कोणी किती पैसा कमवायचा याला बंधन नाही. मात्र तो पैसा कोणत्या मार्गानं कमवायचा याला बंधन आहे. तो पैसा सन्मार्गानं कमविण्याला प्राधान्य आहे. वाममार्गानं तसा पैसा कमविण्याला जास्त प्राधान्य नाही. असे जरी असले तरी आज बरीचशी मंडळी वाममार्गानं पैसा कमवीत असतात. ते सन्मार्ग जोपासत नाहीत. याच वाममार्गानं पैसा कमवीत असतांना कधी एखादा व्यक्ती अचानक गर्भश्रीमंत होत असतो की त्याच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात सहज शंका निर्माण होते. शिवाय त्या पैशाची विचारणा होत नाही. त्याला इनकमटॅक्सच्या मर्यादेत घेतले जात नाही. शिवाय त्यानं तसा पैसा कुठून आणला? याचं साधं गणितही केलं जात नाही. असं बरंच ठिकाणी घडतं. खरं तर हा देशाचा पैसा असतो आणि असे व्यक्ती असा पैसा अकस्मात उभा करुन देशालाच लुटत असतात. तेव्हा सरकारनं अशाच पैशावर नियंत्रण आणावं. शिवाय अशा व्यक्तीनं तो पैसा कुठून आणला? याची विचारणा करावी. दरवर्षी कोणाजवळ किती आहे, याचं प्रतिज्ञापत्र लोकांकडून भरुन घ्यावं व वाढलेली मालमत्ता वा पैसा कुठून आणला? याची विचारणा व्हावी. प्रत्येक पैशाचा हिशोब मागावा. अन् मग चौकशी. तो पैसा वाममार्गानं कमवला की सन्मार्गानं. सन्मार्गानं असेल तर त्या व्यक्तीची मालमत्ता मुक्त करावी आणि अनैतिक मार्गानं असेल तर तीच मालमत्ता जप्त करावी. जेणेकरुन अशा मोजमापानं मोठमोठे मासे गळाला लागतील. काही लोकं भ्रष्टाचार करणार नाही. भ्रष्टाचारानं पैसे कमविण्यावर भरही देणार नाहीत. शिवाय कालमितीला ज्याचेजवळ काही नव्हते. आज एवढी मालमत्ता कुठून मिळवली याचंही विवरण मिळत असल्यानं देशातील अर्थव्यवस्था पारदर्शक होईल व देशाची लोकशाही तेवढीच बळकट. तसंच असंच जर घडत गेलं तर देशातील सर्वच लोकांचा आपल्या देशावर विश्वास बसेल. देशाचं जगात नाव होईल व भ्रष्टाचाराला कायमचाच लगाम लावता येईल यात शंका नाही.


           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०