Driver in Marathi Anything by Pralhad K Dudhal books and stories PDF | ड्रायव्हर

Featured Books
Categories
Share

ड्रायव्हर

ड्रायव्हर....

 शिंगटेआण्णा म्हणजे ऑफिसातला एकदम अफलातून माणूस! इथे येण्यापूर्वी हवाई दलात शिपाई म्हणून पंधरा वर्षाची नोकरी करून आण्णा तिथून रिटायर झाला आणि एक्स सर्व्हिसमनसाठी राखीव असलेल्या कॅटेगरीमधे ड्रायव्हर म्हणून केंद्र सरकारच्या या खात्यात चिकटला.

   एकंदरीत सगळ्याच सरकारी खात्यात तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांच्या ड्रायव्हरचा फार म्हणजे फारच रूबाब असतो. कोणताही सरकारी अधिकारी कधीच त्याच्या ड्रायव्हरला दुखावत नाही,यामागे बरीच कारणे असतात आणि त्यातले महत्वाचे कारण असते ते म्हणजे...साहेब दिवसभरात कुठे कुठे फिरला,बाहेर कुणाकुणाला भेटला, हे सगळ त्याच्या ड्रायव्हरला माहीत असते. साहेबाने दिवसभरात भेट दिलेल्या ठिकाणांपैकी काही ठिकाणे साहेबाला कुणाला समजू द्यायची नसतात.ऑफिसच्या वेळेत आणि ऑफिसच्या खर्चाने करत असलेले काही उद्योग,वा अजून काही सिक्रेट्स ड्रायव्हरने कुणाला सांगू नयेत म्हणून साहेब लोक आपल्या ड्रायव्हरला खूपच जपतात,त्याला विश्वासात घेऊन त्याला हवे नको ते बघतात.साहेबाची अशी बरीच खाजगी गुपिते ड्रायव्हर स्वत:जवळ बाळगत असल्यामुळे बरेच साहेब लोक आपल्या ड्रायव्हरला वचकून असतात.

  तर...सांगायचे म्हणजे आपला हा शिंगटेआण्णाही अशाच एका बड्या अधिकाऱ्याच्या दिमतीला ड्रायव्हर म्हणून काम करायचा. मोठ्या साहेबाचा जवळचा माणूस म्हणून त्याला अख्ख्या खात्यात सगळे टरकून असायचे.शिंगटे आण्णाच्या ओळखीने बरेचजण साहेबाकडून आपली अडलेली कामेही करुन घेत.

   आण्णाच्या बदलून आलेल्या नव्या साहेबाचे राहणीमान एकदमच साधे होते.बऱ्याचदा त्यांचे केस विस्कटलेले असायचे.एवढा अधिकारी माणूस पण बिन इस्त्रीचे कपडे घालायचा.अनेकदा दाढी न करताच साहेब ऑफिसात यायचे. साहेबाची एकंदरीत पर्सनालिटी अशी होती की एक अधिकारी म्हणून समोरच्या व्यक्तीवर जी छाप पडायला हवी तशी त्यांची अजिबात छाप पडायची नाही.

  याउलट प्रकार शिंगटे अण्णाचा होता.एकतर आपला हा शिंगटे अण्णा दिसायला एकदम गोरागोमटा होता शिवाय एक्स सर्व्हीसमन असल्याने त्याचे राहणीमान नेहमीच कडक असायचे.दररोज अगदी गुळगुळीत दाढी करून कडक परीट घडीच्या इस्त्रीचा सफारी घातलेल्या आण्णाची छाप समोरच्या माणसावर अशी काही पडायची की कधीकधी सध्याचा त्याचा साहेबच याचा ड्रायव्हर असावा असे वाटायचे!

  कुठे दौऱ्यावर गेल्यावर तर बऱ्याचदा असे घडायचे की साहेब सोडून शिंगटे अण्णाचेच लोक आदरातिथ्य करायचे.

   एकदा काय झालं की खात्याच्या दिल्लीच्या मुख्य कार्यालयातून एक व्हीआयपी अधिकारी तातडीच्या इन्स्पेक्शनसाठी पुण्याला यायचा होता.नेहमी अशा मोठ्या अधिकाऱ्याला स्टेशनवर घ्यायचे काम जनसंपर्क अधिकारी करायचे पण यावेळी जनसंपर्क अधिकारी रजेवर असल्याने या दिल्लीच्या बड्या अधिकाऱ्याला रेल्वे स्टेशनवर रिसीव्ह करून हॉटेलवर घेवून जायची सूचना आणाच्या साहेबाला मिळाली.

   ठरलेल्या वेळी शिंगटे आण्णाला बरोबर घेवून साहेब रेल्वे स्टेशनवर पोहोचले.

 शिंगटेआण्णाने आज नवीन शिवलेला सफारी घातला होता. साहेब मात्र नेहमीच्या प्रमाणे अगदी साध्या कपड्यात होते. रेल्वे स्टेशनवर पार्किंगला गाडी उभी करुन दोघे जिथे अधिकारी पोहोचणार होते त्या फलाटावर आले.

  सांगितलेल्या वेळेला आण्णा पुढे आणि साहेब मागे असे फलाटावर उभे राहिले.साहेबाच्या हातातला त्या बड्या अधिकाऱ्यासाठी बनवलेला स्वागतफलक आपल्या हातात घ्यायला हवा हे शिंगटेआण्णा विसरून गेला.साहेबानेही फार विचार न करता स्वागतफलक आपल्याच हातात धरुन ठेवला होता.

 निर्धारित वेळेवर दिल्लीवरून येणारी गाडी फलाटावर आली.दिल्लीहून आलेला तो बडा अधिकारी फलाटावर उतरला. शोधक नजरेने  स्वागत फलक दिसल्यावर अधिकारी पुढे आला.आल्या आल्या त्याने कडक सफारीतल्या आण्णाशी हस्तांदोलन केले.आपली व्हीआयपी सुटकेस त्या अधिकाऱ्याने मदतनीस असेल असे समजून आण्णाच्या साहेबाच्या हातात दिली!

  हे सगळे एवढे पटकन झाले की साहेबाला काही बोलायचे ते सुचलेच नाही. झालेला गोंधळ लक्षात आल्यामुळे आण्णाने साहेबाच्या हातातली सुटकेस पटकन काढून घेतली आणि तरातरा चालत स्टेशनबाहेरच्या गाडीत ड्रायव्हरसीटवर जावून बसला!

 आता त्या बड्या अधिकाऱ्याच्या झालेला प्रकार लक्षात आला होता,पण जे व्हायचे ते घडून गेले होते!

   दोन्ही अधिकारी कानकोंडे होत काही न बोलता गाडीत येवून बसले.आण्णाने साहेबाच्या तोंडाकडे बघायचे टाळत हॉटेलकडे गाडी पिटाळली.

   दुसऱ्या दिवशी मात्र साहेबाने आण्णाला यापुढे 'दररोज अॅाफिसला येताना नियमाप्रमाणे खाकी युनिफॉर्म घालायचा' लेखी आदेशच काढला!

- प्रल्हाद दुधाळ.