पुण्यस्मरण वडिलांचे 🙏
आजच्या तिथीला वडिलांचे निधन झाले .आम्ही त्यांना काका म्हणायचो ...वडील निस्सीम गणपती भक्त होते .या तिथीलाच त्यांचा मृत्यू होणे हा एक योगायोगच ..त्यांचे नाव लक्ष्मीकांत विश्वनाथ देव .आम्ही माहेरकडून चिंचवडच्या मोरया गोसावीचे वंशज त्यामुळे आम्हीच देव आहोत असे समजले जाते कारण मोरया गोसावीची गणपतीवर इतकी भक्ती होती व त्याच्या तपश्चर्येत ते इतके मग्न असत की प्रत्यक्ष गणपती सुद्धा देऊळ सोडुन त्याला भेटायला बाहेर येत असे अशी आख्यायिका आहे .आमच्या घरात बाहेरून गणपतीची मुर्ती आणली जात नसे .त्यामुळे विसर्जना चा प्रश्नच नसे .गणेशचतुर्थी पासुन अनंता पर्यंत सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती मात्र केली जात असे .त्या काळात वडील रोज सोवळ्याने अथर्वशीर्ष एकवीस वेळा म्हणत असत .इतर वेळेस सुद्धा ते रोज सोवळ्याने देवपूजा करीत त्यात गणपतीला एकवीस दुर्वा व लाल फुल “मस्ट” असे रोज सकाळी अंघोळ केली की आधी गणपतीच्या देवळात जात असत मग पुण्यात असो वा कोल्हापुरात .कोणत्याही दुख्खात अथवा आनंदात त्यांना गणपती आठवत असे .त्यांचा जन्म लक्ष्मीपूजनाचा त्यामुळे त्यांचे नाव लक्ष्मीकांत ठेवले होते .वडील खुप रसिक होते .सिनेमाची त्यांना प्रचंड आवड होती .तरुण वयात त्यांनी सिनेमागृहात डोअरकीपर म्हणून नोकरी केली होती .त्यांचा आवडता हिरो राजेंद्रकुमार होता .माझ्या लहानपणी ते मला सायकलवर बसवून अनेक चित्रपट पाहायला घेऊन जात .राजेन्द्रकुमारचे तर सर्वच सिनेमा मला त्यांनी दाखवले .त्यांना रेडीओ सिलोन ऐकायला खुप आवडत असे .जुनी हिंदी मराठी गाणी ऐकणे आणि जोरजोरात म्हणणे त्यांचा आवडता छंद होता .सकाळी रेडीओ सिलोन ऐकताना ते दाढी करीत असत त्याच वेळी गाणी ऐकता ऐकता मलाही गाण्याची आवड निर्माण झाली व मीही गाणी म्हणू लागले .अनेक हिंदी मराठी गाणी मलाही म्युझिक पीस सकट तोंडपाठ झाली .सिलोन ऐकताना शेजारीच मला बसवून शुद्ध लेखन घालत असत .इंग्रजी मराठी दोन्ही प्रकारचे शुद्ध लेखन मला काढावे लागत असे .त्यांचे स्वतःचे इंग्रजी व मराठी दोन्ही अक्षर मोत्या सारखे होते .तसे ते डावरे होते पण दोन्ही हातांनी लिहू शकत असत .माझेही अक्षर सरावाने खुप छान झाले होते .नंतर त्यासाठी मला खुप बक्षिसे पण मिळाली .तसेच त्यांना हिंदी मराठी सुभाषिते याचाही नाद होता .ही सुभाषिते म्हणून ती मला समजावणे हे त्यांना खुप आवडत असे .मलाही त्यांच्यामुळे अनेक सुभाषिते मुखोद्गत होती .त्यांचे इंग्रजी व्याकरण पण खुप छान होते .त्यांच्या शिकवण्यामुळे मला अकरावीत इंग्रजीला ला उत्तम मार्क मिळाले होते .याचा यांना खुप अभिमान होता . वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट पदार्थ घरी खाणे तसेच हॉटेल मध्ये जाणे हाही त्यांना शौक होता मात्र जिथे शक्य आहे तिथे पैसे वाचवणे ही त्यांची खुबी होती .ताई ..मला ते ताई म्हणत ..MONEY SAVED is MONEY EARNED ..हे त्यांचे आवडीचे वाक्य होते .स्वभाव खुप हट्टी असल्याने शुगर चा त्रास सुरु झाला तरी ते कोणाचेच ऐकत नसत .व मनसोक्त गोड पदार्थ खात असत .या स्वभावामुळे त्यांनी हळूहळू आपला एक पाय गमावला होता .फिरायची त्यांना अतिशय आवड होती पण .डायबिटीस च्या आजारपणात त्यांचा एक पाय काढावा लागला त्यामूळे त्यांना बिछान्यावर पडून राहावे लागले त्यामूळे त्यांचे बाहेर पडणे बंद झाले आता आईच त्यांचे सर्व बघत होती खरेतर आई त्यांच्या हट्टी पणाला खुप वैतागत असे .पण ती एक "सावित्री" होती तिचे तीच्या पतीवर आणि वडिलांचे तिच्यावर खुप प्रेम होतेत्यामुळे ती आनंदाने त्यांची सेवा करीत असे वडील सुद्धा तिच्या सल्ल्याशिवाय कधीच काहीही करीत नसत .त्यांची जोडी खरंच अद्वितीय होती 💕वयोमाना प्रमाणे आईला पण शुगर होतीच .एके वर्षी डोळ्याचे छोटे ऑपरेशन झाल्याचे निमित्त होऊन .दोन तीन दिवसात तिची शुगर लो होऊन तिचा मृत्यू झाला .सकृत दर्शनी त्यांनी दाखवले नाही पण मनातून ते हादरून गेले होते .हळू हळू त्यांचा जगण्यातील रस कमी होऊ लागला .त्यांच्या आवडत्या गोष्टी म्हणजे पेपर वाचन ,रेडीओ,गप्पा ,भावाच्या मुलीशी खेळणे ..या सर्व गोष्टी त्यांनी हळूहळू बंद केल्या .त्यांना आता अल्झायमर ने गाठले ..खाणे, पिणे समजेना ,लोकांची ओळख लागेना .माझ्यासकट घरच्या कोणालाच ते ओळखेना झाले .त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती माझ्या वहिनीचा सकाळीच फोन आला .ताई काकांना येऊन भेटून बघून जाते तुमची आठवण काढत आहेत .एक तर त्या दिवशी जवळ किल्ल्या असल्याने मला बँकेत सुटी घेणे अशक्य होते .शिवाय विसर्जन मिरवणुकीच्या कारणाने कोल्हापुरातले अनेक रस्ते बंद होते .माझ्या आणि भावाच्या घरात चौदा पंधरा किमी चे अंतर होते .आजकाल मी त्यांना भेटायला गेले तरी ते मला ओळखत पण नसत .मग मी विचार केला उद्या सकाळी मात्र त्यांना जाऊन भेटेन ..तसे वहिनीला मी सांगितले .तिला पण माझी अडचण समजत होतीच ..दिवसभर त्यांच्या काळजीतच सगळी कामे आवरत होते .उद्याची रजा देऊन ठेवली उद्या दिवसभर तिकडेच राहायचे आता असे ठरवले आणि रात्री साडेदहा ला फोन आला ..“ताई काका गेले .....मी सुन्न झाले ऐकुन ..ताबडतोब निघते असे म्हणाले ...आणि अनेक रस्ते कसेबसे ओलांडून इतक्या रात्री काकांना भेटायला गेले जे त्यांच्या लाडक्या गणपतीसोबतच निघून गेले होते ..😥