"कर्म ". गीता रहस्य.
ज्ञानानें आणि श्रद्धेनें, पण त्यांतल्या त्यांतहि विशेषेकरून भक्तीच्या सुलभ राजमार्गानें, बुद्धि होईल तितकी सम करून प्रत्येकानें लोक- संग्रहार्थ स्वधर्माप्रमाणें आपआपलीं कर्मे निष्काम बुद्धीनें आमरणान्त करीत रहाणें हेंच त्याचे परम कर्तव्य असून, त्यांतच त्याचे इहलौकिक व पारलौकिक कल्याण आहे, मोक्षप्राप्तीसाठीं कर्मे सोडण्याची किंवा दुसरें कोणतेंहि अनुष्ठान करण्याची जरूर नाहीं, हा सर्व गीताशास्त्राचा फलितार्थ होय. -लोकमान्य टिळक.
ज्ञानी पुरुषांनी लोकांना ज्ञान देऊन शहाणे करावे.
लोकांना सदाचरणाची सवय लागलेली नसते , त्यांना ज्ञान झाल्यानंतर ते आपल्या गैरवर्तनाच्या समर्थनार्थ त्याचा उपयोग करतात. ज्ञानी पुरुषांनी आपण स्वतः संसारात राहून लोकांना निष्काम कर्माचा म्हणजे सदाचरणाचा धडा घालून देऊन त्याप्रमाणे त्यांच्याकडून आचरण करून घेणे हे त्यांचे या जगातील महत्त्वाचे काम आहे असा गीतेचा सिद्धांत आहे.
लोकांना उत्तम उदाहरण देऊन लोकांना सुधारण्यासाठी ज्ञानी पुरुषांनी कर्मे केलीच पाहिजेत. इंद्रिये ताब्यात ठेवून त्यांच्या स्वभाव सिद्ध वृत्तींचा लोकांसाठी उपयोग करणे हे शहाणे माणसाचे कर्तव्य आहे.
निस्पृहपणे स्वकार्य करीत राहण्यानेच परमसिद्धी मिळते.
यदा यदाही धर्मस्य या श्लोकाचे तात्पर्य असे आहे की आपण निर्माण केलेल्या जगाची सुस्थिती कायम राहून त्याचे कल्याण व्हावे, म्हणूनच अवतार घेऊन भगवान समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवून देत असतात. भगवंताच्या जन्माचा व कृत्याचा विचार करा व त्यातील तत्त्व ओळखून वागा म्हणजे भगवद प्राप्तीसाठी दुसरे साधनाची आवश्यकता नाही.
भगवान म्हणतात मला कर्माचे फळाची इच्छा नाही त्यामुळे मला कर्माची बाधा लागत नाही.
कर्म त्याग म्हणजे अकर्म नव्हे.
विपरीत कर्म म्हणजे काय ते समजले पाहिजे, विपरीत कर्म करू नये. मनुष्य जोपर्यंत सृष्टीत आहे तोपर्यंत त्याला कर्म चुकत नाही, त्यामुळे जे कर्म करून आपल्याला बाधत नाही त्याचे बंधकत्व गेले असे मानले पाहिजे.
कर्माचे फलाचे बंधन न लागण्यासाठी ते कर्म फलाशा सोडून निष्काम बुद्धीने करणे हेच गीतेचे सांगणे आहे.
वरील प्रकारची सात्विक कर्मे सोडली की दोन कर्मे राहतात. एक राजस व दोन तामस. तामस कर्मे ही मोहाने व अज्ञानाने होत असतात. राजस कर्मे ही पहिल्या प्रतीची नसली तरी तामस या प्रकारातील नसतात.
फलाशा सोडणारा, चित्ताचे नियमन करणारा व सर्व संगमुक्त झालेला पुरुष कर्मैंद्रियानी कर्म करत असला तरी त्याला पाप लागत नाही. रागद्वेषापासून मुक्त , साम्य बुद्धीने व यज्ञासाठी म्हणून जो पुरुष कर्म करतो त्यास मोक्ष प्राप्ती होते.
ममत्वबुद्धि सोडून ब्रह्मार्पणपूर्वक आयुष्यातील व्यवहार करणे हा एक यज्ञ असून त्यामुळे परमेश्वराची प्राप्ती होत असते.
बुद्धीने जे ज्ञान व शांती प्राप्त होणार तेच श्रद्धेनेही मिळते मात्र संशयखोराला या लोकांत किंवा परलोकात सुख लाभत नाही. भगवान सांगतात आपल्या हृदयात अज्ञानाने उत्पन्न झालेला संशय ज्ञानरूपी तलवारीने छाटून टाकून कर्मयोगाचा आश्रय कर व युद्धाला उभा राहा.
ज्ञान कर्म संन्यास योगाचे तात्पर्य हेच आहे की निष्काम बुद्धीने परमेश्वराचे ठाई कर्म अर्पण करणे. कर्म त्याग हा त्याचा अर्थ नाही.
जेव्हा अर्जुन विचारतो संन्यास व कर्म यापैकी अधिक प्रशस्त काय ते मला निश्चितपणे सांग तेव्हा दोन्ही मार्ग मोक्षप्रद असले तरी ज्ञान प्राप्त झाल्यावर निष्काम बुद्धीने कर्म करीत राहणे हेच श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे.
संन्यास मार्गात ज्ञान प्रधान मानले तरी ज्ञानाची सिद्धी कर्मे केल्याशिवाय होत नाही आणि कर्ममार्गात कर्मे ज्ञान पूर्वक असल्याने ब्रह्मप्राप्ती होणारच त्यामुळे हे दोन्ही मार्ग वेगळे समजणे योग्य नाही.
इंद्रिये आपली कर्मे करीत असतात उदाहरणार्थ पापण्या हलवणे पाहणे इत्यादी .
अहंकार बुद्धी सुटली की इंद्रिये काही वाईट करू शकत नाहीत व आत्म्याचे ताब्यात राहतात.
ज्ञानी पुरुषांची कर्मेंद्रिये कर्म करणारच, त्यामुळे संन्यास मार्गी किंवा कर्म मार्गी यांना कर्म चुकत नाही पण आसक्ती सुटली की कर्माचे बंधन राहत नाही , त्यामुळे कर्मातील आसक्ती सोडणे हेच आवश्यक आहे. कमळाच्या पानाला जसे पाणी चिटकत नाही तसे अशा मानवाला पाप चिकटत नाही. म्हणजेच कर्मयोगी अहंकार बुद्धी न ठेवता व आसक्ती सोडून आत्मशुद्धीसाठी कर्म करीतच असतात.
फलाशेच्या ठाई आसक्ती सोडून कायीक, वाचिक, मानसिक कर्मे केले तरी कर्त्यास त्याचा दोष लागत नाही. जो योगयुक्त होऊन शांती मिळवतो तो सर्व कर्मांचा मनाने संन्यास करून राहतो तो मानव देहरुपी नऊ द्वारांच्या या जगात आनंदाने राहतो.
कर्म मार्गातही सर्व भूतान्तर्गत परमेश्वर ओळखणे हेच परम साध्य आहे .
त्यामुळे सर्व यज्ञ तपाचा भोक्ता सर्व लोकांचा धनी आणि सर्वांचा सखा अशा मला जो या प्रकारे ओळखतो त्याला शांती मिळते.