स्कायलॅब पडली
त्यावर्षी ११ जुनला शाळा सुरु झाली. प्रार्थना संपली आणि क्लासटीचरआपआपल्या वर्गांवर गेले. स्टाफ रूममध्ये आम्ही चौघे जणच उरलो . विषय एकच....... स्कायलॅबचा. गेलेपंधरा वीस दिवस वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावररकाने भरून स्कायलॅब कसं भरकटलं आणि महाराष्ट्राच्यापश्चिम किनारपट्टीवर कोणत्या ठिकाणांवर ते कोसळण्याची शक्यता आहे ? त्याच्यामुळे केवढी मोठी हानी संभवेल याची रसभरीत वर्णनं असायची. रेडिओवरहीबातमी पत्रांमध्ये दिवसभर याच उलटसुलट बातम्या आणि संकट प्रसंगी लोकानी कोणती खबरदारी घ्यावी याच्या पोकळ चर्चा व्हायच्या. अमेरिकेचे राजदूत थॉमस रिबोलवीच यांचे नावपेपर वाचणाराना तोंडपाठ झाले होते. कारण पेपरमध्ये त्यांचा हवाला देवून काय काय नवीनमाहिती दिलेली असे. आमच्यागप्पा सुरु असताना हेडमास्तर पुजारी सरही गेल्या साताठ दिवसांचे लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्सपेपर घेवून स्टाफ रूम मध्ये आले. त्यानी पेपरचा जुडगा टेबलावर टाकताच आम्ही अधाशासारखेपेपर्सवर तुटून पडलो.
७८टनवजनाची नऊ मजली इमारती एवढी स्कायलॅब १४ मे १९७३लाअमेरिकेने अंतराळात सोडली होती. जवळ जवळ ४/५ वर्षेती पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करीत आपले काम चोख बजावत राहिली. कधिमधी रात्रीच्या वेळी एक छोटासा तारा आकाशात वेगानेफिरताना दिसे . तो तारा नसून अमेरिकेने सोडलेली स्कायलॅब आहे असे जाणते लोक सांगत. पणअकस्मात अंतराळात झालेल्या सौर वादळामुळे स्कायलॅबचे पॅनल्स जळून गेले. स्कायलॅबचीउर्जा पुरवठा यंत्रणा बंद होवून इंजिन्स बंद पडली आणि स्कायलॅब भर्कटली. नियंत्रणसुटलेली स्कायलॅब मृत्यूदूत बनून पृथ्वीकडे झेपावू लागली. ती नेमकीकोणत्या भागावर कोसळेल याचा नक्की अंदाज कोणत्याही तज्ज्ञ शास्त्रज्ञाला देतायेईना. त्या वेळी पुऱ्या गावात अवघे तीन रेडिओ होते. एक ग्रामपंचायतीत , दुसरा दादा बामणाकडे आणि तिसरा हरीभाऊ ठाकरांच्या सासवेकडे. दादांचा बॉम्बे पोर्ट्रस्टमध्ये मोठ्या हुद्यावर असलेला भाऊ शानु ह्याला बक्कळ वरकमाई व्हायची म्हणून त्याने स्टेटस सिंबॉल म्हणून घरी रेडिओ दिलेला.
हरीभाऊंची सासू तिलासगळे लळतीणकाकू म्हणत. तिचाधाकटा मुलगा शामरावबंगलोरला कुठच्यातरी अमेरिकनकंपनीत मॅनेजर होता. गप्पारंगात आल्या की लळतीण माना वेळावीत डाव्या हातावर उजव्या हाताची मूठ आपटून ठसक्यात सांगायची, “आमच्या शामरावास महिन्याला अट्ठावीस हज्जार रुपये पगार आहे. ” शामराव बायको मुलांसह जीप गाडी घेवून गावी आलेला असताना दादा बामणाच्या भावाने घरी रेडिओ बसवला हे त्याला कळले. मगत्याने मुद्दाम कोल्हापुरला जावून एअर व्हॉईस चा रेडिओ आणून ओटीवर बसवला. लळतीणीच्यामोठ्या मुलीने शेजारच्या हरीभाऊशी आईच्या इच्छेविरुद्ध पळून जावून लग्न केले. म्हणून आई मुलीचे बोलभाषण बंद होते. पण लळतीण हरीभाऊशी बोलायची. चारीही नातवंडं कायम आजीच्या घरीच असत. जेवणखाण, पूजा वगळता हरीभाऊचा मुक्काम कायम लळतीणीच्या ओसरीवर असे. मंगलप्रभात, बातम्या, कामगारसभा, पुन्हा प्रपंच आणि रात्री दहा वाजता आपली आवड हे कार्यक्रम तो ऐके. सोबतीला वाडीतले पाचसहा रिकामटेकडे बापये , गाणी आयकायला चटावलेली पोरही अधे मधे येवून टेकायची . दिवसभर मोठ्या आवाजात रेडिओ सुरुच असायचा.
आम्ही तीनशिक्षक लळतीणकाकूच्या शेजारीच असलेल्या हिर्लेकरांच्या वाड्यात खोल्या घेवून रहायचो. स्कायलॅबप्रकरण सुरु झाल्यावर आम्हीही बातम्या ऐकायला जायचो. नासाच्यावैज्ञानिकानी स्कायलॅब हिंदी महासागरात कोसळेल अशी एक शक्यता वर्तवली आणि जगातल्याइतर देशांपेक्षा भारतातसर्वाधिक चिंतेचे वातावरण निर्माण झाले. रेडिओ वरही माहिती ऐकल्यावर हरीभाऊ म्हणाले,“ हे गोऱ्यांनी योजून केलेले कपट कारस्थान आहे. आपलीचामडी बचावण्यासाठी त्यानी ते स्कायल्याब मुद्दम भारताकडे ढकलून लावलेनी असणार . त्यांचाकाय भरवसा ? ” ऐकणारे त्याना काय काय विचारीत रहात. “आता आमी आकाशात फिरताना बगली ना ती चान्नी..... असो असोन केवडी मोटी आसनार? लयच तर चार हात लांब नी तीन तीन हात रुंद..... नी ती पडली तर असा काय लुकसान होनार? ” कधिकाळी मुंबईत त्याने लांबून विमान बघितलेले, त्यावरूनत्याने केलेला अंदाज. त्याला समजावीत हरीभाऊ म्हणाले, खुळो काय तू? हुंबयत नव माळ्याची इमारत बगलस ना तू ? तेवडामोटा इमान हातां.... हय पडला तर पुरी वरची वाडी नायशी करून टाकीत. तां पडात तवां मोटो फटाक्या सारको आवाज व्हयत तेना कानाचे पड्डे फाटती. सगळ्याम्होरी आग लागोन निस्ती लंका होयत् लंका.......”
ही भयाकारी माहिती गावभर पसरली आणि सगळीकडे एकच घबराट पसरला. भरीस भर म्हणजे चारसहा दिवसात मुंबईत राहणाऱ्या पंधरावीस चाकरमान्यांची कुटुंब जीव वाचवायला गावी आली. आता सांजसकाळ बायाबापये रेडिओ वाल्यांच्या घरी नी ग्रामपंचयातीत गर्दी करायला लागली. गर्दीचाआवाका वर्णन करताना हरीभाऊ सांगायलालागले, “ आम्हांसआता दिवसाडी हजारपानें, दोनरत्तल सुपारीचीखांडे , चार मुठी तंबाखू नी दोन पांढरा धागा विडी बंडले पुरत नाय. ” लोक बसल्या बसल्या बिड्या फुकीत, कोणी पानाचे तोबरे भरीत नी जाताना एक विडा बनवून कडोसरीलाखोचून घेवून जात. बातम्यासंपल्या की जाणते ऐकलेली माहिती जानपदमाणसाना समजावून सांगत.
दोनदिवसानी हायस्कूलात गावाचीसभा झाली. अस्मानी अरिष्ट टळावे म्हणून ग्रामदैवत गांगेश्वराला नित्यलघुरुद्रासह अभिषेक सुरु करायचे ठरले. वाडीवाडीवार सकाळसंध्याकाळ एकरामनाम जप सुरुकरायचेही ठरले. गाव सभाझाल्यामुळे खरोखरचजगबुडी होणार म्हणून लोक काळजारले. सुतारवाडीतली राधेआक्का नवराबाळगीना म्हणून माहेरी आईकडे रहायची. तीकोंबड्या पाळून चरितार्थ चालवी. मागिलदारी प्रशस्त आंगण होते ते निगडीच्या - आंजणीच्या गच्च सलड्यानी बंदिस्त करून नी वरती रापणीची जाळी लावून ती दिवसभर त्यात कोंबड्या सोडून ठेवी. चारपिल्लां पासून पन्नासेक कोंबडी झाली. रोज तीसचाळीस अंडी ती विकी. बियाण्या पुरते चार पाच कोंबडे राखून बाकीचे कोंबडेआणि खुडुक तलंगा विकी. गाव मिटींग झाली नी राधे आक्का चितागती झाली. घरात तीनी म्हातारी दोघीच, बापया माणूस कोण नाय. अस्मानीसुलतानी झालीच नी न जाणो म्हातारी एकटी राहिली तर वादी दुष्मन तिलालुटून खातील. म्हणून कोंबडी विकून टिकून बियाण्यापुरती चार पिल्ली घेवून घरदार बंद करूनगोठिवऱ्यात मावळ्याच्या आश्रयाला जावून रहाचये तिच्या मानाने घेतले.
आम्हाला कळल्यावर आम्ही तिची समजूत घालायचा खूप प्रयत्नकेला. त्या वेळी बेतवार कोंबड्याचे पंधरा ते वीस रुपये मिळत. आडसंधीलालोक किंमत पाडून देणार. इथे कायनी गोठिवऱ्यात काय मरण यायचे असले तर ते काय चुकणार नाय. आम्हीसमजावायची शिकस्त केली. तिने एकच पालुपद लावले. आमचीभावकी बरोबर नाय. मी कोंबड्याच्या धंद्यात चार पैशे कमावातय तेलोकांच्या डोळ्यार येतेत. उद्या आमी मेलाव तर सोदे घरदार लूटून न्हेतीच पन आमकाधड अग्नि देती की जाग्याक सडवती काय सांगता येणार नाय. माजो बेतठरलो तो थरलो. हय अवघाती मरण्या पक्षा मावळ्याच्या सावलीत निचिंतीनसुकान डोळे मिटती. दोनदिवसात मिळतील त्या पैशाना सगळी कोंबडी विकून बियाण्यापुरती चार पिली आणि जोखमीचं सामान घेवून दाराला टाळं मारून आक्का आयशीला सोबत घेवून गोठिवऱ्यात निघून गेली.
गावात जशी अवकळाच पसरली. एरवी चार जिन्नस शिलकीला राखून पोट आवळून राहणारी भावरथी लोकं. त्यांचीहीबुद्धी फिरली. जगबुडीतर नक्की होणार मग शिलकीलाकोणासाठी ठेवायचं? बऱ्याचजणानी मुडे फोडले. कोंबडी बाळगणारे पुर्वी बियाणं म्हणून चार कोंबडी राखून ठेवीत असे. पण आतामाणसांचा विचारच बदलेला, जीव आहे तोवर खावून घ्या! लोकानी बियाण्याचे कोंबडे कापून मटण रांधून खाल्लं. मुंबैवाल्यासाठी गाडग्या मडक्यात दडवलेल्या काजी भाजायला बाहेर काढल्या. लावणीच्याटायमाला खायला म्हणून माती लावून साठवून ठेवलेल्या फणसाच्या आठिळा, शिंक्यात घालून साठवणीला ठेवलेले गोलिम, सुकटेबाहेर काढली. चार दिवसआहेत तोवर सुखात खावूनमरा. असा सगळ्यांचा दृष्टिकोन बनला.
बंदराच्या मावळत खाडीच्या मध्यभागी चाळीस एकरात पसरलेलं जुवं ( बेट ) होतं . तानुबाणे नी भगवान वालम यांच्या घरवडी तिथे खंडाने शेती करून पावसाळी चाळीस खंडी भात पिकवीत. जुव्यावरगोड्या पाण्याचा जिवंत झरा असायचा. त्यापाण्यावर उन्हाळीवांगी ,मिर्च्या ,मुळा, चवळी, नवलकोलअशी भाजी पिकवीत. जुव्याच्या कडेला गच्च कांदळ नी चिपी वाढलेल्या. ३०/४० फुटउंच गोदे कांदळ, कळंब असायचे. तसेच डेरेदार आंब्याची झाडं आणि गगनावेरी उंच वाढलेले साठ सत्तर माड . त्याआडोशाला पर्ल्या नी लवू भंडारी दारवेची हातभट्टी लावीत. दिवसालांबून धूर दिसलाअसता म्हणूनरात्री भट्टी लावीत. बासष्ट साली मोठे जोवूळ (चक्री वादळ) झाले. वारेएवढ्या सोसाट्याचे की, घों घों असेभयाकारी आवाज यायचे. मळ्यातलेमाड - पोफळी मुळासकटउन्मळून पडले. गावदरीत एक उंच झाड शिल्लक राहिले नाही. पण जुव्यातल्या राखणदार असा जागृत की तिथल्या झाडांची एक टाळीही मोडली नाय. ते सोडाचपण माडाच्या आमसुख्या सावळीही गळल्या नाहित. जोवूळशमल्यावर जुव्यातली झाडे धक्काही न लागता शाबूत राहिली हे सगळ्याना अजाबच वाटले. म्हणून येणाऱ्या अस्मानीसुलतानीतून बचावण्यासाठी तानु आणि भगवानदोन्ही घरवडी घरदारं बंद करून बाका पोरं , गुरं-ढोरंघेवून जुव्यावररहायला गेली. त्यांच्या पाठोपाठ लवूची घरवडही गेली. जुव्यावर कावणं बांधून तिथे गेलेले लोक निश्चिंत झाले. त्यांचंबघून जुव्याचा मालक आबा खोत तोही गुरं ढोरं नी कुटुंब कबिला घेवून जुव्यावर रहायला गेला.जुव्यावरचाराखणदार अस्मानी सुलतानी झाली तरी आपल्याकेसालाही ढका लागू देणार नाही असा ठाम विश्वास बाळगून ती लोकं निर्धास्त झाली.
गावदेवावर लघुरुद्र अभिषेक आणि वाडी वाडीवार सकाळ संध्याकाळ सामुहीक नाम जप सुरु झाले. रात्री भजनी मंडळांच्या बाऱ्या चालू झाल्या. गावातल्या झाडून सगळ्यामुंबईकरांची कुटुंबं येवून गाव भरला. रेडिओवाल्यांच्या ओटीवर नी ग्राम पंचायतीच्या चावडीत बातम्या आयकायला बोट शिरेना अशी गर्दी व्हायला लागली. एरव्हीदेवधर्माची खिल्ली उडवणारे अमेरिकन वैज्ञानिक साळसूदपणे लोकाना आवाहन करू लागले, ‘विल पॉवरवाढवा... ’ बातमी पत्रात हे आवाहनसांगितल्यावर हरीभाऊनी विचारले, “काय हो सर ! ही विलपावर काय भागनगड आहे? तो अमेरिकेतला कोणसासा शास्त्रज्ञ ते वाढवायस् सांगतोहे म्हणे” मग मी त्याना अर्थ सांगितला. “अहो विल पॉवर म्हणज्ये इच्छाशक्ती.... तीस्कायलॅब मानवीवस्तीत पडणार नाही अशी ठाम इच्छा लोकानी मनातल्या मनात करायची ....” त्यावर खो खो हसत ते म्हणाले, “हे म्हंजे परभारे पावणे तेरा.... वा रे वा गब्रूनो! ह्यानी विद्वास करणारे शोध लावायचे नी ते आंगलट आले की हेपोकळ सल्ले देवून काखा वर करायस् मोकळे. त्यास्नीआधी विचारायस् हवे, की ते स्कायल्याब सोडलेत तेव्हा आम्हास विचारले होतेतकाय ? नीविलपावर वाढवायची म्हंजे फुग्यात हवा भरायची नायतर भांड्यात पाणी ओतावे इतके सोपे आहे काय सोद्यानो? वील पावरवाढावायची म्हणजे नेमकें काय करायस् हवें ते सांग म्हणावें सोद्यानो .... पाखंडीहरामखोर साले. ”
नमस वाडीतला आबा वालम गिरणीत जॉबर होता. तो फंडघेवून गावात आल्यावर त्याने महिना दीड / दोनरुपये व्याजाने कर्ज द्यायचा धंदा सुरु केला. महिन्यालाशंभर रुपयावर दीड/ दोन रुपये व्याज हे गावातल्या अडाणी लोकाना कमी वाटे. याधंद्यात आबाचा चांगलाच जम बसला. तो डायरीत लिहून ऋणकोचे नाव लिहून त्याची सही/ आंगठाघेई नी महिना भरला की वाडी वाडीवार वसुलीकरीत फिरे. मुसलमान वाडीत तर घरठेप कर्जदार होते. सगळ्यांचामच्छिमारीचा धंदा असायचा. ते आठवडाभर दर्यात असत नी शुक्रवारी वाडीत येत. त्यावेळीआबा फेरीमारायचा पैसे मिळाले नाहीत तर त्याबदल्यात मुसलमान मासे देत. गरीबकुळवाडी भाजी देत, कोण कोणभात देत, कडदण देत, नारळबोंड , केळ्घड, गीमात आंबे – फणस- काजी देत. जे मिळेल ते नगण्य पडत्या भावात आबा पदरात पाडूनघेई. मजुरीवर बाया माणसे ठेवून त्यांच्या करवी भाजी, मासे,नारळ मांडावर किंवा गावात फिरून ते विकी. कडदण, तांदूळ, नाचणे गावतल्या किराणा दुकानदाराना विकी. रोजउठल्यावर कुठच्या वाडीत जायचे ते ठरलेले असे. त्याच्यासोबत तीन चार दारुडे भले मोठे चिव्याचे दांडे घेवून असायचे. त्यामुळेबिनबोभाट वसूली व्हायची. लोक त्याच्या माघारी म्हणत ‘आजदाण्डेकराचो फेरो येयत्......’ यातला विनोद असा कि, हातातला दाण्डा खण्ण खण्ण आपटून गावभर वर्दी देत फिरणाऱ्या महाराला गाव रहाटीत ‘दाण्डेकर’ ही उपाधी असे. साताठ वर्षात आबा चांगलाच वधारला. गावातल्यापोस्टात पैसे ठेवले तर बातमी फुटेल म्हणून तो राजापुरच्या पोस्टात जावून दाम दुपटीतरक्कमा गुंतवी.
स्कायलॅब पडायची आवई उठली नी कसं कोण जाणे पण काहीजहांबाज लोकानी आबाच्या व्याजबट्ट्याच्या धंद्यामुळे गावताले पाप वाढले नी नको तेअरिष्ट आले असा एक सूर लावल. भोळ्या भाबड्या लोकानाही ही गोष्ट पटली. कारणआठवडाभरापेक्षा अधिक काळ गावदेवाला अभिषेक करून , वाडी वाडीवार सकाळ संध्याकाळ जप, भजने करूनही संकट टळले नाही हे जरा विपरीतचहोते. पूर्वी प्लेग आला, मलेरिया, नारू अशा महामाऱ्या आल्या होत्यातेंव्हा सप्ताहभर गावदेवावर रुद्राभिषेककेल्यावर त्यांचाजोर कमी झाला होता. कधिमधी ऐन लावणीच्या टायमाला पाऊस दडीमारी. मळे कोरडे होवून भाताची रोपं सुकायला लागत . मग जाणतेलोक देवबुडवीत. ग्राम दैवत गांगेश्वराची पिंडी बुडे पर्यंत घाभारा पाण्याने भरीत. त्यानंतर दोन तीन दिवसात हुकमी धो धो पाऊस सुरु होई. यापूर्वीअनेकदा याची प्रचीती घेतलेली होती. असे देवाचे सत्व असताना अजून संकट टळत नाय त्याअर्थीकायतरी मोठे आडमेळे असणार असं जाणते म्हणू लागले.
गावात उठलेली आवई कर्णोपकरणी आबाच्या कानावर गेली. स्कायलॅबपडणार ह्याचा चांगलाच धसका आबानेही घेतलेला होता. हाजनापवाद कानावर गेल्यावर आबानेगिरमाईच्या जागृतथळावर कौल घेतला. देवीने हा धंदा बंद करायचा कौल दिला. न जाणोया गोष्टीवर बारापाचाचा मेळ बसला तर गाव आपलंहगणं मुतणं बंद करील हे आबाने ओळखलं. मग धूर्त विचार करून आबा ऋणकोना सांगू लागला, “मी आता व्याजबट्टो बंद करणार.... तुमचाकर्ज आसा तां चार आणे आठ आणे हिश्शान मुद्दल फेडा... तुमचो हात चलात तेवडां , काय जमात तां देवा नी तुमी मोकळे होवा नी माकाव मोकळो करा.” साताठवर्षे महिनोमाल व्याज भरून लोकजेरीला आलेले .... पणमुद्दल काय फिटलेनाय नी महिनोमाल दाण्डेकराचा फेरा काय सुटला नाय.... जगबुडीझालीच तर आबाच्या कर्जात रहायला नको असा भावरथी विचार बहुसंख्य लोकानी केला नी कशीबशी होईल तेवढी जम करून
बरेचसे लोक मोकळे झाले.
काही लोक सोदे होते, त्यानीआबा मनातून भ्यालेला आहे हे ओळखून रड खडकरून कायतरी किडूक मिडूक पुढे करूनत्यानी आपली आंग वटावणी करून घेतली . ऋणको येवून व्यवहार पुरा करूनगेला की आबाडायरीतले त्याचे पान फाडून टाकी. पाचसहा दिवसात बारा- चौदा आणे हिश्शाने व्यवहार मोकळे झाले. काही लोकअगदी निब्बर होते. त्यांचानादच आबाने सोडला नी डायरी बंद करून टाकली. गिरमाईलापाच नारळाचे तोरण बांधून चूक भुल बक्षिस कर म्हणून गाऱ्हाणे घातले नी व्याजबट्टाबंद केला. झाला व्यवहारही आबाचा चांगलाच फायदा करून गेला. त्यानेजमलेल्या ठेलीभरून नोटा देवघरात पत्राच्या ब्यागेत ठेवल्या . मात्र या वेळी जगबुडी होणारम्हणताना राजापुरात जावून पोस्टात पैसे ठेवायच्या फंदात तो पडला नाही.
गेलेदोनचार दिवस नमस वाडी, बाणेवाडी, मोंडे वाडी , आग्रेवाडी, शिडम अशी तास दीड तास चालीच्या लांब अंतरावरची मुले शालेत यायची बंदच झाली. शाळे लगतच्या चार दोन वाडीतूनजेमतेम पन्नासेक मुले शाळेत येत. मग़ तासभर कविता , पाढेम्हणून घेवून आम्ही शाळा सोडून देवू. त्याचदरम्याने हेडमास्तरानी सहा सएवर चालणारा नवा ट्रांझिस्टर आणला. रेडिओपेक्षा या ट्रांझिस्टरवर कार्यक्रमचांगले आयकायला येत. आम्ही संध्याकाळ पर्यंत आकाशवाणी वरचे कार्यक्रम ऐकून आला दिवस साजरा करू. रात्रीसुद्धा आम्ही सगळी शिक्षक मंडळी सरांच्या बिऱ्हाडी बातम्या, श्रुतिकानायतर आपली आवड ऐकत बसू. आताशादिवसाडी सुद्धा कामाशिवाय कोण माणूस गावात फिरेनासा झालेला. दिवसजाता जात नसे. तशात अकराजुलैचा दिवस उजाडला. आदल्या दिवशीच्या बातम्यांमध्ये अकरा तारखेला ती स्कायलॅब कोसळणार असे भाकितवर्तवलेले होते. शाळेत जेमतेम पंचवीस पोरे असतील नसतील . प्रार्थनाझाल्यावर सगळेजण सभागृहात सरांचा ट्रांझिस्टर लावून ऐकतअसताना अकस्मात निवेदन सुरु झाले. पहाटेच्यासुमाराला अमेरिकेची स्कायलॅबऑस्ट्रेलिया जवळ हिंदी महासागरात कोसळली, तिचाहवेतच स्फोटहोवून ती फुटल्यामुळे काहीभागांचे तुकडे लोकवस्तीतपडले. पण मनुष्य हानी किंवा इतर मालमत्तेचे काही नुकसान मात्रझाले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिम कार्टर यानी ऑस्ट्रेलियन जनतेची माफी मागितली.
अरिष्टनिभावले..... गांगेश्वराने आपल्या लेकराना सुखरूप ठेवले म्हणताना सगळा गावदेवळात अभिषेक सुरु होता तिथे जमला. काही जणानी बंदरावर जावून जुव्यावरच्या लोकाना स्कायलॅब दर्यात कोसळली , धोकाटळला, तुम्ही गावात या अशी वर्दी दिली. लघुरुद्र अभिषेक आटोपला. भल्यागुरवाने गांगोलाकडकडावून गाऱ्हाणे घातले, नीदेवाच्या पाया पडून लोक घराकडे परतले. दोन चारदिवसात मुंबैवाल्यांची कुटुंबे मुंबईलापरतू लागली. राजापुर डेपो तून सोडलेल्या जादा गाड्या भरभरूनमुंबईला रवाना झाल्या. आठवडाभराने संध्याकाळी बैल गाडीत सामानाची बोचकी नी बियाण्याच्या कोंबडीच्यापिलाची डालगी घेवून राधे आका सुतारीण नी तिची म्हातारी गोठिवऱ्यातून परत आली. जनजीवन सुरळीत सुरु झालं. मांडावर बसलेल्या बापयांच्या गप्पात स्कायलॅबचा विषय निघाला की, गप्पिदास दारूडा नथू भंडारी हडकण्या मारी .... “ ते रोजी इराकतीक लागली म्हनान मी फाटपटी उटान भायर गेलय ..... तेवड्यातमावळतच्या दिशेक मोटो उजेड दिसलो , मोटा इमान जळत पेटत खाली दर्यात पडलेला दिसला. पन ह्यांकाय आक्रित घडताहा, माजी काय ट्युब पेटली नाय . साडे धा वाजता शाळकरी चेडू सांगत इला की, तां अमेरिकेचा इमान पडोचा हुता ना तां तिकडे लांब दर्यात पडला..... तवां मी समाजलय की, फाटपटी माका जां दिसलाना तां ताच व्हता......”
※※※※※※※※