Can't be forget in Marathi Classic Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | भुलाये न बने

Featured Books
Categories
Share

भुलाये न बने

              भुलाये न बने .......

 

              १९७0/८0 चे दशक म्हणजे ऑर्केस्ट्रांची चलतीअसलेला काळ! बाबला , महेश कुमार, प्रमिला  दातारयांचे ऑर्केस्ट्रा कायम हाऊसफुल्ल व्हायचे. या शिवाय शंकर जयकिशन कल और राहुलदेवआज, ओपी नैय्यर मुझिकल नाईट असे अनेक ऑर्केस्ट्रा धुमाकूळ घालित होते. महेश कुमारलताच्या आवाजात ‘ऐ मेरे वतनके लोगो’सादर करी तेंव्हा अक्षरश: टाळ्यांचा कडकडाट होत असे. या सगळ्या गदारोळात तुफानीगर्दी खेचणारा ऑर्केस्ट्रा होता सी. रामचंद्रांचा “ भुलाये न बने”! रत्नागिरीला याऑर्केस्ट्राचा शो जाहीर झाला. नेमके वर्ष आठवत नाही, पण ही साधारणपणे  १९७३‌ - ७४मधली घटना असावी.

        तेंव्हा पेंटर सोहोनींच्या गाडी तळावरच्या (आताचा सावरकर चौक) गणपतीच्या शाळेत तिकिटविक्री व्हायची. ‘भुलाये न बने’ची तिकिट विक्री सुरू व्हायची होती त्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून अशी काय गर्दी उसळली की पेंटर सोहोनींच्या दुकाना पुढे सुरू झालेली रांग आगाशे कन्याशाळेलगतच्या तांबट आळीकडे जाणाऱ्या बोळापर्यंत लांबली. आठ वाजता दुकान  उघडलं . पेंटर सोहोनींच्या परिचयातल्या काही बुजुर्ग मंडळीनी कुटूंब कबिल्यासाठी ५/६  तिकिटं राखून ठेवायला सांगितलेली. एरव्ही स्वत:सोडाच मुलानाही सिनेमा बघू न देणाऱ्या वडिलधाऱ्या मंडळीनी सी‌ रामचंद्राचाऑर्केस्ट्रा येणार हे कळल्यानंतर सहकुटूंब जायचा बेत योजलेला. त्यानी रांगेत राहूनतिकिटं मिळणार नाहीत हे ओळखून पेंटर सोहोनींनाच आगावू भेटून तिकिटांसाठी वर्णीलावून ठेवलेली. पाटणकर नावाचे कोणीतरी गृहस्थ तिकिटं विकायला बसायचे.त्यानी सगळं तोस्तान उघडल्यावर स्वत: पेंटरसोहोनी त्यांच्या समोर यादी घेवून बसले. त्यांच्या यादी प्रमाणे स्पेशल क्लास मधली तिकिटं फाडून देवून बुकींग चार्ट  मध्येत्या त्या नंबरांवर फुल्या मारून झाल्या. मग पेंटरांच्या  परिचयाची काही मंडळी तिकीट बुकींग साठी  दुकानात आलेली होती त्यांची वर्णी लागली. बघता बघता स्पेशल  क्लासमधल्या पुढच्या दहाबारा रांगा फुल  झाल्या.

                  परिचयातली आणखी काही मंडळी मागून पुढून  तिकिटे मागतील हे लक्षात घेवून स्पेशल क्लास आणि फर्स्ट क्लास मधली मोक्याच्या  रांगांमधली  काही  तिकीटेही  अशीच  मागे राखून ठेवल्यावर नंतर  रांगेत थांबलेल्यांसाठी  तिकीटांची विक्री  करायची  असा बेत होता. कारण  दस्तुरखुद्द  सी. रामचंद्र  गाणी  म्हणणार होते.  जुन्या जमान्यातले त्यांचे  चाहते  प्रचण्ड  गर्दी करणार आणि  बघता बघता  हातोहात चार्ट फुल्ल होणार  हा पक्का  अंदाज होता. रांगेत  ताटकळत  उभ्या असलेल्या काही लोकानी हा प्रकार पाहिल्यावर बोंबाबोंब सुरू केली. गदारोळ फारच वाढल्यावर पेंटरसोहोनीनी रागाने दुकानाच्या दारात उभे राहून दम भरला. “ तुमचा आरडा ओरडा बंद होईपर्यंत तिकीट विक्री सुरू होणार नाही .”रांगेतल्या लोकानी मग राजरोसपणे अधिकच   कालवा सुरू केला. तारतम्य ओळखून पेंटर सोहोनी  दुकानाचे दार बंद  करून दुकानाबाहेर पडले. ते  त्याच पावली  तांबट आळीतल्या पोलिस स्टेशनमध्ये गेले.चौकीतल्या फौजदारानी त्यांची जातीनिशी वास्तपुस्त करून दोन पोलिस त्यांच्या सोबत पाठवून दिले. पोलिस आल्यावर गडबड  बंद झाली नी तिकिट विक्री सूरू झाली. साधारण अकरा वाजता बुकिंग फुल्ल झालं नी तिकीट विक्री बंद झाली. रांगेतली लोकं नाराज होवूनमाघारी फिरली.

                 मला  हा ऑर्केस्ट्रा  बघायचा होता . संध्याकाळी  आम्ही चार पाक मित्र  तिकिटं काढायला गेलो तेंव्हा  अकरा वाजताच बुकिंग फुल्ल  झाल्याचं कळलं. आम्ही नाराज झालो . पण माझं दैव बलवत्तर  होतं. आमच्या आगाशे वाड्यात  त्यावेळी  भगवान किल्लेकर  यांचे रेडिओ दुरुस्तीचे दुकान होते. ते  स्वत:  ऑर्गनआणि व्हायोलिन वाजवीत. मी  अधून मधून त्यांच्याकडे  गाणी ऐकायला बसत असे. ते आणि  भाऊसाहेब गोवेकर, भाई  हेळेकर, विजय पटवर्धन, सांगली रेडिओ स्टार एम्.जी. पटवर्धन , काका मलुष्टे, तोडणकर  अशा  काही मंडळीनी संगीत मंडळ स्थापन केलेलं होतं. त्या संगित मंडळाचे  गाण्याचे कार्यक्रम  व्हायचे. त्यानी राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत भाग घेवून  प्रथम क्रमांक मिळवलेला होता. दर रविवारी  भाऊसाहेब गोवेकरांच्या घरी  त्या मंडळींचा सराव व्हायचा.  किल्लेकरांशी मैत्री झाल्यावर मी  रविवारी श्रोता म्हणून जात असे. भाऊ साहेब ऑर्गन , भाई  हेळेकर तबला नी किल्लेकर व्हायोलिन साथ करीत.  विजय, एम्. जी. हे  गायन करीत.   

                किल्लेकर हे  ब्लड बॉर्न  टेक्निशियन होते. त्यावेळी रत्नागिरीत  लता आणि राधाकृष्ण   ही दोन सिनेमा  थिएटर होती. श्रीराम  नाट्यगृह आणि  पुरुषोत्तम  ओपन एअर नाट्यगृह   होते.  सिनेमा थिएटर मध्ये  किंवा नाट्यगृहामध्ये  ऐन वेळी काही तांत्रिक बिघाड झाला  तर  तिथले मॅनेजर भगवान किल्लेकरांकडे यायचे.  किल्लेकर  हातातलं काम टाकून  त्यांच्या सोबत जायचे आणि  तांत्रिक बिघाड चुटकीसरशी   दूर करून द्यायचे.  त्यामुळे या चारही ठिकाणी   किल्लेकर कधिही गेले  तरी  त्याना  रिझर्व कोट्यातल्या  अगदी  पुढच्या रांगेतल्या  सीट  मिळत. किल्लेकरानी आपल्या   मित्रवर्गासाठी  सीट ठेवायला  सांगितले होते.  त्या  मंडळींबरोबर माझीही वर्णी  लागली. मला  एक पै ही खर्च न करता  पुढच्या रांगेत बसून  ऑर्केस्ट्रा पहायला मिळाला. 

         फाटक हायस्कूलच्या  पुरुषोत्तम  स्मृती खुल्या थिएटर मध्ये ऑर्केस्ट्रा व्हायचा होता. शोच्या वेळी दहा बारा पोलिस बंदोबस्ता साठी आलेले होते. थिएटरच्या  भिंतींपलिकडे  अभ्यंकरांच्या डेअरीच्या आवारात घुसून गवताच्या गंजीवर, चिरेबंदी तटालगतच्या झाडांवर चढून शेकड्याच्या संख्येने माणसं बसलेली होती. ऑर्केस्ट्रा सुरू  झाला. भोली सुरत नी गोरे गोरे ओ बांके छोरे ही दोन गाणी झाल्यावर निवेदकाने अकल्पितपणे घोषित केले की, “ लोकाग्रहास्तव उद्या रात्री याच वेळेला याच रंगमंचावर भुलाये न बने चा शो सादर केला जाईल. याची तिकिट विक्री उद्या श्रीराम नाट्यमंदिर जवळ करण्यात येईल .” घोषणा ऐकल्यावर टाळ्या नी शिट्ट्या मारून प्रेक्षकानी थिएटर डोक्यावर घेतले.

                   खुल्या थिएटरमध्ये एरवीच्यावेळी नाटकं वगैरे होत तेंव्हा एक अंक झाल्यावर, आणि काही वेळा बुकिंग फुल्ल झालेलं असेल तर नाटक सुरू झाल्यावर अर्ध्या तासात थिएटरची  प्रवेशद्वारं उघडून पब्लिकला मुक्त प्रवेश दिला जाई. 'भुलाये न बने '  च्या शो च्या वेळी मात्र पिटातही तुफानी गर्दी असल्यामुळे इंटर्वलला  व्हॉलिंटिअर्स नी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवून तिकिटं चेक करूनच प्रवेश दिल्यामुळे इंटर्व्हललाआत घुसायला थांबलेल्यांचा चांगलाच विरस झाला. दरम्याने दुसऱ्या दिवशी हाच शो होणार असल्याची बातमीही फुटली आणि ॉतसा बोर्ड ही झळकला. त्याचं असं झालं की शो च्या वेळी आयत्यावेळी तिकिट काढूनजायचा बेत करून आलेल्यांचाही चांगलाच पचका झाला. कारण बुकिंग झालं त्याच वेळी पिटातली तिकिट विक्रीही  नेहमीपेक्षा दीडपट जादा झालेली होती. आयत्यावेळी तिकिट काढायला आलेल्यांपैकी कुणातरी धनिक मारवाडी पुत्राच्या ही गोष्ट जिव्हारी लागली. तो लगेच घरी जावून कॅश घेवून आला नी त्याने शो  सुरू होण्यापूर्वी  आत जावून ऑर्केस्ट्रा  प्रोग्रॅम अ‍ॅरेंजरची भेट घेतली. “उद्या याच ठिकाणी हाच शो ठेवा, तुम्हाला या क्षणी बिदागीची  पूर्ण  रक्कम मी रोख  देतो.” अशी गळ घातली.

                     रसिक श्रोत्याची ही विनंती ऐकल्यावर  सी. रामचंद्र  थक्क झाले. कर्मधर्म संयोगाने पुढचे दोन दिवस मोकळेच होते. म्हणून मारवाडी पुत्राची ऑफर सी. रामचंद्र यानी स्विकारली. त्या लक्ष्मी पुत्राने ने  शोची पूर्ण रक्कम रुपये १२,००० तत्काळ  जमा  केली. त्यावेळी  ही रक्कम फार मोठी, सधन - पैसेवाल्याच्याही  आवाक्याबाहेरची होती.  दुसरे दिवशी श्रीराम नाट्यमंदीर मध्ये तिकिट विक्री झाली. कसलीही जाहिरातबाजी न  करता  अडीच तीन तासात शो फुल्ल  झाला. जिद्दीला पेटून मोठी रक्कम मोजणाऱ्या मारवाडी पुत्राची रक्कम एका दिवसात सव्याजवसूल झाली. रात्री तिकीट बुकिंग  केलेला नियोजीत श्रोतृवंद आसनस्थ झाल्यावर  त्या दिलदार मारवाडी पुत्राने शोच्या आरंभीच प्रवेश द्वारे उघडून बाहेर जमलेल्या घुसपासाना मुक्त प्रवेश दिला. मुंगीलाही शिरायला वाव मिळणार नाही एवढ्या भाऊतोबा गर्दीत 'भुलाये न बने' चा लोकाग्रहास्तव सादर केलेला खास शो संपन्न झाला. हा खास शो सुद्धा  किल्लेकरांमुळे  मला पुन्हा पाहता आला.

                 त्या  नंतर काही दिवसानी   प्रमिला दातारांचा 'सुनहरी यादे'हा  ऑर्केस्ट्रा आला. त्यावेळीही अशीच राडीराड गर्दी लोटली. त्यावेळी शो आणणाऱ्या कंत्राटदाराने दुसऱ्या दिवशी पुन्हा 'सुनहरी यादे' चा शो ठेवला. तो शो ही दुसऱ्यादिवशी असाच हाऊसफुल्ल  झाला  होता. आज या घटना  जुन्या जाणत्या रत्नागिरीकरांच्या स्मरणात कदाचित असतील-नसतील. कारण गुगलवरही भुलाये न बने,शंकर जयकिशन कल  और राहुलदेव आज, महेशकुमार अ‍ॅण्ड पार्टी, झंकार या ऑर्केस्ट्रांबद्दल  काहीही माहिती मिळत नाही. एकेकाळी रसिकांची गर्दी खेचणारे हे ऑर्केस्ट्रा काळाच्या उदरात लुप्त झाले आहेत. सी . रामचंद्र  यांचाऑर्केस्ट्रा  होता नी  तो  तुफान  लोकप्रिय ही झाला होता  ही  गोष्ट त्यावेळी  मोबाईल , यु ट्युब  सारखी  प्रचार -प्रसार माध्यमे  नसल्याने  समाजातील विशिष्ट वर्गापलिकडे  फारशी कुणाला ज्ञात नाही. 

                              **********