चाळीतले दिवस भाग 6
पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून मी पुण्यात यायचो तेव्हा माझे बंधू आणि वहीनी बऱ्याचदा एक दोन तशा दूरच्या नातेवाईकांकडे मला घेऊन जायचे.
त्यातलेच एक चौरे नावाचे कुटुंब रास्ता पेठेत क्वार्टर गेट जवळ राहात होते.तसे त्यांच्याशी दूरचे नाते असले तरी माझे बंधू आणि त्यांचे खूपच घरोब्याचे संबंध होते.श्रीयुत चौरे पुणे स्टेशनजवळ पेशवेकालीन दप्तर सांभाळणाऱ्या सरकारी ऑफिसात नोकरी करायचे तर चौरे मावशी घरीच असायच्या.त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती त्यातला मोठा मुलगा फुटकळ नोकरी करायचा दोन नंबरचा मुलगा आणि मुलगी कॉलेजला जात होते.
जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्या घरी जायचो त्यांच्याकडून आमचे उत्साहात स्वागत केले जायचे.मावशीचा स्वयंपाकात हातखंडा होता.रास्ता पेठेत त्यांच्या घरी गेल्यावर जेवल्याशिवाय मावशी कधीच सोडायच्या नाहीत.आमच्यासारखीच त्यांची खोली लहान होती,पण त्यांचे घर कधीही गेले तरी स्वच्छ आणि टापटीप असायचे.बऱ्याचदा आम्ही त्यांच्या घरी मुक्कामालाही रहायचो.
नागपूर चाळीत मी एकटा राहायला लागलो तरी मी या चौरे मावशीकडे नियमितपणे जायचो.त्यांच्याकडे गेल्यावर पोटभर जेवायला मिळायचे! वेळ मिळाला की मी त्यांच्याकडे जायचो.
दरम्याच्या काळात माझ्याकडे असलेली बंधूची लुना चौरे मावशीच्या धाकट्या मुलाने वापरायला नेली आणि कुठेतरी धडकून तिचे बरेच नुकसान झाले. त्याने ती दुरुस्त न करता तशीच माझ्याकडे आणून दिली.चौरे कुटुंबाशी असलेल्या संबंधामुळे मी ही गोष्ट कुणालाच सांगू शकलो नाही.बरेच दिवस लुना तशीच पडलेली होती.
एक दिवस लुना एका गॅरेजमधे दाखवली.त्याने किरकोळ दुरुस्ती करून ती चालू करून दिली.ट्रायल घ्यायला म्हणून मी कॉलेजला लुना घेऊन गेलो आणि परत येताना नेमकी डेक्कनच्या जवळपास ती बंद पडली.गॅरेजमधे दाखवायचे तर खिशात पैसे नव्हते त्यामुळे लुना ढकलत मी घराकडे निघालो होतो.एक तर सकाळी केवळ मी एक सिंगल वडासांबार खाऊन कॉलेजला गेलो होतो.सपाटून भूक लागलेली असताना लुना ढकलणे खूपच त्रासदायक झाले होते.
मी मधेच दम खात लुना ढकलत चाललो असताना रस्त्याच्या कडेला गॅरेजमध्ये काम करणारा एक उंचापुरा हिरोछाप तरुण येऊन गाडीला काय झाले म्हणून विचारू लागला.
सुट्टी झाल्याने तो त्याच्या घराकडे निघाला होता.ओळख पाळख नसताना मी माझ्या बद्दल आणि गाडीबद्दल त्याला सर्व काही सांगितले.दुरुस्तीसाठी माझ्याकडे पैसे नाहीत हे सुद्धा मी स्पष्ट केले.
त्याने माझ्या हातून गाडी घेतली आणि त्याच्या घराकडे चल आपण काय आहे ते बघू असे म्हणू लागला.त्याने त्याचे नाव राजू नाईक असे सांगितले होते,मी त्याच्या मागोमाग चालू लागलो.रस्त्यात त्याने मला चहाही पाजला.
शिवाजी नगरहून गुरुवार पेठेतल्या नाईक वाड्यातल्या राजूच्या घरापर्यंत आम्ही चालत गेलो.त्याच्या वाड्यात मोकळ्या जागेत तो वाहनदुरुस्तीची कामे करायचा.माझ्या लुनाचे इंजिन खोलून राजूने सांगितले की गाडीचे बरेच काम करावे लागणार आहे,माझ्याकडे पैसे नसल्याने मी त्याला पुन्हा गाडी जोडून दे मी ढकलत नेतो असे सांगितले,पण राजूने सांगितले की गाडी इथेच राहू दे, वेळ मिळेल तशी तो तिची दुरुस्ती करेल आणि जमेल तसे पैसे देण्याबद्द्लही तो बोलला.घरात नेऊन त्याच्या आईशी ओळख करून दिली .त्याच्या आईने मला काहीतरी खायलाही दिले.नुकतीच ओळख झालेल्या राजूकडे लुना सोपवून मी बसने घरी गेलो.
राजू नाईक कॉलेजला शिकत होता,पार्ट टाइम गॅरेंजात काम करत होता शिवाय संध्याकाळी आप्पा बळवंत चौकातल्या एका पुस्तकाच्या दुकानातही काम करत होता. त्या काळी सायन्सला वापरल्या जाणाऱ्या कुलकर्णीज नोट्स त्याच्यानंतर मी राजुकडून घेवून जायचो.
पुढे चार पाच महिने वेळ मिळेल तशी माझी लुना तो दुरुस्त करत होता.मी ही जमेल तसे त्याला थोडे थोडे पैसे देत होतो.त्याने एकदाची लुना मला आणून दिली.पुढे राजू नाईकशी कधी कधी पुस्तकाच्या दुकानात भेट व्हायची.काही दिवसानंतर तो दुकानही सोडून गेला आणि गॅरेजही!आवर्जून पुढे कधी भेटायचा प्रयत्न दोघांकडूनही झाला नाही मैत्रीचे धागे विरत गेले.खूप दिवसांनी एकदा नाईक वाड्यात जायचे ठरवले,पण वाडा पाडून तिथे बिल्डिंग बांधायचे काम चालू असलेले दिसले आणि राजूचा शोध अर्थातच थांबला.
चौरे कुटुंबही ते घर सोडून दुसरीकडे रहायला गेले पुढच्या आयुष्यात या दोन्ही व्यक्ती पुन्हा कधीच भेटल्या नाहीत..
(क्रमश:)
प्रल्हाद दुधाळ.