Bad command in Marathi Moral Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | बॅडकमांड

Featured Books
Categories
Share

बॅडकमांड

 बॅड कमाण्ड

कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून कुंदनकडेवळत राहिली... प्रॉम्पटस् चुकत गेले... मॉनिटरच्या स्क्रीनवर बॅड कमाण्ड.... बॅड कमाण्ड असा रिस्पॉन्स मिळत राहिला. सकाळी असाईनमेंट सुरू केल्यावर असाच घोळ होत गेला. ग्राफिक डिझायनिंगमधल्या फाईल्स उडाल्या. जॉब पूर्ण करणं दूरच... डिस्टर्ब झालेली विंडो फॉरमॅट करून नव्याने सेटअप मारायचं झंझट मागे लागलं. नव्यानं ट्रेनिंग मधे रूजू झालेलागोपू... डॉस प्रॉम्पटस् देताना आधीच कोण टेंशन यायचं... त्यात माथं फिरवायला शोल्डरकट टॉप घालून टंच दिसणारी, मधाळ हसणारी कुंदन! सेटअप मारून वैतागलेला गोपू ताडकन उठूनमागे वळूनही न पहाता ए.सी.काँप्युटर लॅब बाहेर आला. हात ताणून आळोखे पिळोखे देताच मणक्यातूनकटाकटा आवाज आले. थोडा रिलीव्ह झालेला गोपू टॉयलेटमध्ये शिरला. बेसिनचा नळ सोडून गार पाण्याचे सपकारे तोंडावर मारून जरा फ्रेशझाला. सालं हे असंच होत राहिलं तर सीडॅकमधलं अॅनिमेशन, ग्राफिक डिझाईन कसं काय पुरंव्हायचं... इथे दांडी उडाली तर मग जॉब सिक्युरिटी... काकांकडून, आत्याकडून कोर्ससाठीकर्जाऊ घेतलेली चाळीस हजाराची मोठी अमाऊंट... ती कशी काय फेडायची? छे... छे साला हापोरींचा फंद आपल्या सारख्या थर्डरेट मिडलक्लासवाल्यांसाठी नसतोच मुळी.

पॅव्हेलियन समोरच्या लॉनमध्ये, कोपऱ्यातल्या गुलमोहोराच्या झाडाखालचीपेटंट सीट गाठून गोपूनं चक्क मारूती स्तोत्र म्हणायला सुरूवात केली. ‘ध्वजांगी उचली बाहो आवेशे लोटिला पुढे...’ मनात मात्र विचारांची वेगळीचआवर्तनं सुरू झालेली. कर्दळीच्या फुलासारखी सोनवर्णी रसरशीत अंगकांती असलेली कुंदन...खुडिपाटच्या कोनीत गर्द हिरवी बकुळीची झाडं बघून ‘हौ नाईस... सिंपली बिवीचींग’ म्हणत सित्कार करणाऱ्याकुंदनला आपल्या पुष्ट भुजांवर अल्लाद उचलून गोपू धावत सुटला. बकुळीच्या फुलांची पखळण पडून गंधमय झालेली पाण्याची तळी... कुंदनलाधप्पकन त्या तळीत टाकून गोपू अनिमिष नेत्रांनी बघतच राहिलेला. 'पुच्छ ते मुरडिले माथा किरीटी कुंडले वरी...' तोच चरण पुन्हा पुन्हाआर्वतन घेत राहिला... हनुमान जन्माचं आख्यान ऐन रंगात आलेलं... 'न्हाणी न्हाणी त्यानिर्मळाते न्हाणी हो' रसाळवाणीने भिडे बुवांचा पाळणा सुरू झाला... सेवेकरी चंदनी पाळण्याच्यादोहो बाजूला उभे राहून खणाच्या कुंचीत वेष्टीलेला असोल्यानारळरूपी बाळ हनुमान पाळण्याच्या वरून खालून गोविंद घ्या SS गोपाळ घ्या म्हणतएकमेकाहाती सोपवल्यावर अलगद पाळण्यात ठेऊन झोप्या काढीत राहीले... छोटा गोपू हनुमानजन्माचं ते कौतिक डोळयात साठवत राहिला.

हनुमान जयंतीच्या उत्सवातली कीर्तनं हे भिडेबुवांच वर्षासन...अशीच कुठे कुठे वर्षासनं असायची... कीर्तनाच्या तुटपुंज्या मिळकतीवर खुटु रूटु चाललेला त्यांचा संसार... या वेळी छोटा गोपू हट्टकरून बाबांबरोबर आलेला... तालाचंज्ञान अगांत जन्मजात असलेला गोपू झांज किती सुरेख वाजवायचा... तबलजीच्या चुकलेल्या मात्रा कळायच्या ... बुवांचा तराणाऐन

रंगात आला, लय वाढू लागली की तबलजीची उडणारी तिरपीट अचूक हेरून मुरब्बी हसणारा गोपू ... पोराला उपजत तल्लख कान आहे, आवाजसुध्दा बऱ्यापैकी गोड आहे... कीर्तनकार झाला तर भिडे घराण्याचा वारसासंभाळून लौकिक करील ही बुवांची इच्छा. पण हा दरिद्री पेशा पत्करून दरवेशागत हिंडायचं, रिकामी झोळी हालवीत गाठीला गाठ मारून पोट जाळीत रहायचं त्या पेक्षा शिकून सवरून नोकरी मिळाली तर घरातलं दैन्य तरी फिटेल... ही गोपूच्या माऊलीची इच्छा... यावेळी ती माहेरी गेलेल्याचा मोका साधून गोपू त्यांच्या बरोवर आलेला... आई असती तर चार दिवस शाळा बुडवून कीर्तनं ऐकायला जायची त्याची काय बिशाद...!

गोपू तीन वर्षाचा झाल्यापासून त्याला शिक्षणाचं वाळकडू पाजायचीआईची जिकीर सुरू झाली. स्कॉलरशिपमध्ये तो जिल्ह्यात पहिला आला. पुढे इंग्रजीशाळा सुरू झाली. पहाटे नित्यनेमाने अभ्यासाला बसवून तिने गोपूचा अभ्यास मागे पडू दिला नाही. तो ८९% मार्क्समिळवून एस्.एस्.सी पास झाला. तालुक्याला नव्याने सुरू झालेल्या सायन्स शाखेतलेप्राध्यापक त्याला मुद्दाम भेटायला आलेले.

एफ. वाय. बी. एस्सी पासून तर रोजच्या एष्टीच्या वाऱ्या करण्यातअभ्यास बुडेल म्हणून आईनं तालुक्याला कॉलज संनिध बि-हाड केलं. गोपू ‘ए’ ग्रुप घेऊन डिस्टींक्शन मध्ये बी. एस्सी झाला. आता पुढे काय करायचं? विद्यापीठात राहून एम. एस्सीकरणं खर्चाच्या दृष्टीने आवाक्या बाहेरचं... पण परमेश्वरानं सत्व परीक्षा घेतली नाही. नेमक्या त्याच वेळी नाशिकच्या बँकेत सर्व्हीस करणारे गोपूचे काका सहाय्याला आले. गोपूने नाशिक गाठलं. टाईम्स ऑफ इंडियातली जाहीरातवाचून फॉरीन कंपनीत अॅप्रेण्टिसशीपसाठी त्याने अर्ज केला. हजारोंच्या संख्येने आलेल्याअर्जाना चाळणी लावून कंपनीने नेमके पाचच उमेदवार निवडले. गोपू, मुकेश हिरचंदानी, कुंदनपितलिया, प्रणीत मुखर्जी, रॉजर गोन्सालविस ही पाच टॅलेंटेड मुलं अॅप्रेण्टीसम्हणून रूजू झाली. गोपू सोडला तर उरलेली मुलं सुखवस्तु श्रीमंत कुटुंबातली . पण गोपूचा स्मार्टनेस ओळखून कलिग्ज त्याला बरोबरीनं वागवायचे. कुंदन पितलिया तर चक्क त्याच्यावर भाळलीच गोरापान,चित्पावनी निळसर घाऱ्या डोळयांचा, सशक्त अंगकाठी असलेला सात्विक वृत्तीचा गोपू... ‘घाटीहै लेकिन लेडी किलर है’ कुंदन म्हणायची.

अॅप्रेण्टिसशीपचं वर्षभर चुटकीसरशी संपलं. जॉईण्ट डायरेक्टरखोसलानी सगळ्यांची मिटींग घेतली. “कंपनी काँप्युटर सॉफ्टवेअर, ग्राफीक डेव्हलपमेंटलाँच करू इच्छितेय... पाचही जणानी सीडॅक जॉईन करा... नव्या प्रोजेक्टाध्ये पाचही जणानापाच स्वतंत्र सेक्शन्समध्ये असिस्टण्ट डायरेक्टर म्हणून कंपनी अपॉईट करील. कंपनीकडेफायनान्स अपुरा आहे... कोर्स फी तुम्ही बेअर करा. कंपनी स्टायपेंड सुरू ठेवेल कोर्सकंप्लीट केल्यावर ट्वेंटी फाईव्ह थावजंट रूपीज पर मंथ, स्वतंत्र कार असं अॅग्रीमेंटकरून देतो.” ऑफर चॅलेंजिंग... कंपनी बॉण्ड करून द्यायलातयार... पाचही जणानी पूर्ण विचार करून ‘हो’ म्हणायचं ठरवलं. इतर चौघाना घरच्यांचा फक्तकन्सेण्ट अपेक्षित... गोपूला मात्र समोर सत्तर ऐंशी हजारांचा खड्डा दिसायला लागला आईबाबांचा सल्ला घ्यायला चार दिवसांची रजा घेऊन गोपूनं खुडीपाटगाठलं.

संध्याकाळच्या वेळी झोपाळयावर बसून परवचा म्हणण्या ऐवजी हिंदीगीताची धून आळवीत गोपू शीळ घुमवित राहिला. शहरी पाणी अंगात मुरून पोर बहकला तर नाही ना असं मनाशी म्हणत आई बाहेर आली. “गोपू SS कातरवेळ झालीए. असं अवेळी शीळा घालणं बरं नव्हे जरा रामरक्षा म्हण... तोच आपला वाली... निर्वाणीच्या वेळी तरी देवाचंनाव तोंडात येऊ दे..." काहीतरी उडवाउडवीचं उत्तर देणं अगदी तोंडावर आलेलं पण प्रसंगओळखून गोपू रामरक्षा पुटपुटायला लागला पोरानं गरीबपणानं ऐकून घेतलं... अगदीच वाह्यात नाही झाला अजूनही आईला वाटलं. गोड आवाजात आईबोलली, 'अरे गोपू असं तोंडातल्यातोंडात काय पुटपुटतोस...? मला माहितीय्... वर्षभर सगळा अनाध्याय... बिनचूक म्हणता येईल अशी खात्री नाही तुला... चल आपण दोघानी मिळूनम्हणूया..." मुलाजवळ झोपाळयावर बसून तिनं रामरक्षासुरू केली.

रात्री जेवणखाण झाल्यावर आईनं हडपा मोकळा केला. जीव जीव म्हणूनराखलेली ठेव आईबाबानी मोजली. सहा हजार रूपयात वीस कमी भरले. गोपूने स्टायपेंडमधून दरमहाच्या खर्चाचे एक हजार काकाना देऊन साठवून ठेवलेले साडेअकरा हजार... त्याच्याभरीला आईचं स्त्री धन... एकदाणी, अग्रफूल, बुवांचा सल्लेजोडअन् भिकबाळी, गोपूच्या मुंजीत हौसेनं केलेली हसोळी... सगळी मिळून तीसेक हजारांची भरझाली. "आमची आमदनी एवढीच... निम्मे खर्चाची भर सुध्दा नाही... पण तू काळजी करूनकोस... भगवंताच्या मनात असेल तर तो कुणाच्या ना कुणाच्या रूपाने उभा राहील... चारदिवस निश्चिंत रहा... आमची पुण्याई अजून शिल्लक आहे..." बुवानी उपोद्घात केला.ताण कोणाच्याच मनावर नव्हता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत सगळीजणं निश्चिंत झोपली.

बुवांचा विश्वास फळाला आला काका, कमल आत्ते दोघानी स्वतःहूनमदतीचा हात पुढे केला... चुटकीसरशी रक्कम उभी राहीली. आई बाबांच्या श्रध्दा-संस्कार यांचीशिदोरी घेऊन गोपू मोठ्या उमदीने नोईडात सीडॅक साठी रूजू झाला. हे ट्रेनिंग अक्षरशः घामटं काढणारं!रोज १४/१६ तास हार्ड वर्क... लॅब चोवीस तास उघडी असायची... कधीही जाऊन प्रॅक्टिस करीत बसायची मुभा... नव्हे ती जणू सक्तीच! काही वेळा असाईनमेंट पुरी करण्याच्या नादातजेवण सोडाच, साधा चहा घ्यायचीही फुरसत मिळणं मुष्किल व्हायचं. बेसिक फंक्शन, डॉस कमांड झाल्यावर अॅनिमेशन, ग्राफिक डिझाईन सेशनसुरू झालं. आय. आय. टीतले एक्सपर्ट रिसोर्स पर्सन अभ्यंकर सर आलेले... एक एक चॅलेंजिंग जॉब द्यायचे. त्यानी एडस् वर आधारीत होर्डिंग करायचं असाईनमेंट दिलेलं...

नोईडात जॉईन झाल्यापासून कुंदनची गोपुशी सलगी वाढलेली. उज्ज्वलभविष्याची चाहूल, मोकळं वातावरण आणि प्रदीर्घ सहवास यामुळे हळूहळू गोपूही कुंदनमधेइनव्हॉल्व्ह होऊ लागलेला. मुकेश, प्रणव गोपूवर अक्षरशः जळायचे. कुंदनचा वचपाकाढण्यासाठी कॉलगर्ल्स शोधीत हिंडायचे... भविष्याची चिंता नव्हती... पैशाची कमतरतानव्हती... हेवी फिज देऊन कोर्स जॉईन केलेला... नापास व्हायची चिंताच नव्हती... दिल्लीचामझा पुन्हा चाखायला मिळणार थोडाच... कुंदन नही तो और सही...

त्या दिवशी कहरच झाला. वैतागून गुलमोहोराखाली बसलेला गोपू भानावर आला तो कुंदनच्या‘हाय स्वीट’ या शब्दानी... ‘चलो कॉफी पिएंगे’ तीनं इनव्हाइट केलं. कॅटिनमधे बसल्यावर लाडिकपणे कुंदन म्हणाली, “देखो गोपूऽऽ ये दूरी अब कितने दिन रहेगी? हमको तो सहा नही जाता... आज हमारीपार्टनर्स छुटी मनाने गई है... मैं रूमपर अकेली हूँ... तू ऐसा कर... नौ बजे रूमपर आजाओ... मैं वही पर टिफीन मंगाऊँगी... और बादमें... तू समझ गया ना? जरूर आओ... मैं राहदेखूँगी...”

कुंदनची ऑफर ऐकून गोपू अक्षरशः उडालाच. विवाहपूर्व संबंध... छे...छे... अब्रह्मण्यम्...भलतंच... “तू पागल हो गई क्या? शादी के पहले ये बाते सोचनाभी पाप है कुंदन... बस्स एक दो साल सबर करो... फिर शादी मनाएंगे...” गोपूला थांबवीत कुंदन उसळून बोलली, “ए बुद्दुऽऽ तु कौनसे जमाने की बात कर रहा है रे? बडे भागसे ये मौका मिलरहा है... तू हां कह दे... रूम पर आ जाओ तो... फिर देखती हूँ... शादी ब्याह की गाँठतो उपरवाले के हाथ में है... फिर घरवालों की एक्सपेक्टेशन भी क्या होगी राम जाने...शादी तो अपने बस की बात थोडी ही है...? आज मौका हैखुशिया मनाएँगे... कल क्या होगा कौन बता सकता है...?”

गोपूला काही सुचेनासं झालेलं... कुंदनची जात-संस्कृती, संस्कारआई बाबाना कितपत रूचतील हा प्रश्नच! बाबा कदाचित संयम दाखवतील... आईला सुध्दा आवरतील...सगळं खरं पण उंबऱ्याच माप ओलांडून आत गेल्यावर कुंदनसह आईला नमस्कार करताना तिच्यानजरेला नजर देण्याचं धैर्य आपल्याला होईल का? बिनदिक्कतपणे विवाहापूर्वी शेज सजवायला तयार असणारी बिनधास्त कुंदन...! सणावाराला सोवळयानं स्वयंपाक करणारी... वैश्वदेव, नैवेद्य झाल्याशिवायअन्न ग्रहण म्हणजे पाप समजणारी संयमी आई...!

त्याच्या मनात व्दंव्द सुरू झालं... कुंदनची ऑफर हा पौरूषाचाजणु सन्मान... कुठल्या खुळचट विचारंच्या आधीन होऊन ही सुवर्णसंधी दवडायची म्हणजे चक्कमुर्खपणा... आपण काँप्युटरच्या युगातले आहोत... स्त्री पुरूष संबंध हा निसर्ग आहे...हा दोघांच्याही खुशीचा मामला... मनाशी निर्धार करून कुंदनला आवडणारी अॅश कलरची सफारीघालून गोपू रूम बाहेर पडला... तो मेन रोडला आलातेव्हा समोरचं दृष्य आपण नव्यानेच पाहतोय अशी जाणीव त्याला झाली.आजपर्यंत कामाच्या धिबीडग्यात ह्या सगळ्या गोष्टी कधीडोळाभर बघितलेल्याच नव्हत्या. समोर क्रॉसिंगच्या बाजूला कचरा कुंडीच्या मागे भिंतीवर लावलेलंएडस् चं होर्डिंग... ‘यौनसंबंध जब जब... कंडोम तब तब’ कडेला उघड्या गटाराच्या बाजूला हारीने लावलेल्याभेलपूरी, कुल्फीच्या हातगाडया... गटराच्या दुर्गंधीची, गलिच्छ कचरा कुंडीची पर्वाही न करता भेलपूरी, भजिया, पाव चवाचवा खाणारी थर्डक्लासमाणसं... त्याला अक्षरशः शिसारी आली. नैवेद्य दाखविल्याशिवाय पंचपक्वान्नाना सुध्दारूची येत नाही. चंदनी पाट, स्वच्छ धुतलेलं केळीचं पान, त्यावर सुबक वाढलेलं अन्न, ताटाभोवती रांगोळीची वेलबुट्टी अन् समोर मंदगंध पसरीत जळणारी उदबत्ती... अन्न पूर्णब्रह्म वाटतं ते त्यामुळे... बुवानी कुठल्याशाकीर्तनात पूर्वरंगाला केलेलं निरूपण त्याला आठवू लागलं... ‘स्थल-काल-स्थितीचं भान ठेऊन वागतो तो मनुष्य, दमन, शमन, उन्नयन ही आर्य संस्कृतीची त्रिसूत्री... विधीनिषेधांचपालन हा मनुष्य धर्म... नव्हे नव्हे विश्वधर्म...!

निषिध्द गोष्टीना निसर्गधर्माचा मुलामा देऊन स्वतःच्या शेण खाण्याचंनिर्लज्ज समर्थन? बॅड कमांड... बॅड कमांड! मनःचक्षू समोरच्या अंधाऱ्या पटलावर उमटणारीबॅड कमांडची पांढरी शुभ्र अक्षरं आईच्या आवाजात बोलायला लागली. रामरक्षेतले चरण कानात घुमायला लागले... “जितेंद्रियं बुध्दीमतां वरिष्टम् वातात्मजं वानर युथमुख्यम्...” गोपू क्षणभरथांबला. मग निर्धारपूर्वक त्यानं कॉम्प्युटर लॅब गाठली. सी.पी.यू.चं बटण स्वीच ऑन केलं... विंडोफ्लिकर झाली... “इंप्रॉपर शट डाऊन डिटेक्टस...” मेसेजआला.

खुशीत हसत गोपू पुटपुटला, “गड्या ऽऽ कॉम्प्युटरा! विंडो प्रॉपरली शटडाऊन नाही झाली तरी चालेल...फाईल्स लॉस्ट झाल्या, करप्ट झाल्या तर पुन्हा सेटप् मारून ताळ्यावर आणीन मी तुला...आता मला छान जमतंय की ते! तुला संभाळायला मी समर्थ आहे... अन् तु सुध्दा बॅड कमांडचा मेसेजदेऊन ताळयावर ठेवलस की गड्या मला...” मग तो सकाळी दिलेल्या जॉब मध्ये गढून गेला. दुसऱ्यादिवशी अभ्यंकर सर गोपूच्या ग्राफीकवर जाम खूश झाले.

“बॅक ग्राऊंडला लाल-जांभळी सर्कलस्... कचरा कुंडीच्या बाजूला तंग कपड्यातल्या तरूणीची निळसर धूसर आकृती...तिच्या बाजूला क्षितीजापर्यंत विरत गेलेला रस्ता आणि कचराकुंडी जवळचं रोड क्रॉसिंग... तुम्हीकुठच्या दिशेला वळणार हे क्रॉसिंग जवळ ठरवा असंच जणु सुचवायचय... मर्यादा सुचविणारीजणू ती लक्ष्मणरेषा अन् कोपऱ्यात हताश चेहेऱ्याचा तरूण... रिअलीमार्व्हलस... सगळयाच्या वरकडी म्हणजे होर्डिंगला दिलेलं शीर्षक... ‘रिस्ट्रेंट इज बेटर देंन रिपेंटन्स...पश्चात्ताप करण्यापेक्षा संयम ठेवा...' 'व्हेरी नाईस... आत्मसंयमन, मर्यादापालन हेच एडस् वरचं खरं उत्तरआहे...!’ त्यांनी दिलखुलास दाद दिली.

अभ्यंकर सरांच सेशन आटोपल्यावर लंच घ्यायला गोपू लॅब बाहेर आला.पाठोपाठ कुंदनही आली. पॅसेजच्या बाहेर आल्या आल्या त्याचा हात खेचून थांबवीत ती फसफसली,“यू मीन... यू चिटेड मी... तू मर्द कहने के लायक नही रहा... तुमने मुझे क्या समझ रखाहै? तू तो बिल्कुल घाटी निकला!” तिचा हात झिडकारून गोपू म्हणाला,“प्लीज होल्ड ऑन युअर टंग मिस् कुंदन... खुदको सुश्मिता समझती है क्या? तू पागल कुत्तीहै कुत्ती...! मैं मर्द हूँ! लेकिन मेरी मर्दानगी तुम क्या खाक समझोगी... आय अॅम नॉटमेल प्रॉस्टीट्यूट...! और देखो... फिर कभी मेरी औकात निकाली ना तो जबान खिंचके रखदूँगा!जा किसी कुत्ते को ढूँढ...”

कुंदनने त्याचा सल्ला शब्दशः अमलात आणला. संध्याकाळीच ती मुकेशलाघेऊन बाहेर पडली. मग जसा रतिबच सुरू झाला. प्रणीत मुखर्जीला संधी मिळाली. बिचारा रॉजर गोन्सालविस...! काळा कुट्ट... दात पुढे आलेले... तोंडावर देवीचे व्रण...त्याचं भाग्य मात्र उजळलं नाही. मुखर्जी पाठोपाठ कुंदननंथेट काँप्युटर इन्सट्रक्टर चोपडांशीही सूत जमवलं. कोर्स पूर्ण झाला. फायनल एक्झाम झाली.रिझल्ट दुसऱ्या दिवशीच जाहीर झाला. कुंदन आणि गोपूला ए ग्रेड तर रॉजर, प्रणीत, मुकेशयाना सी प्लस मिळाली. चमू नाशिकला परतला. कंपनीच्या बॉण्डप्रमाणे पाचहीजण पाच वेगवेगळया बँचेसमध्ये रूजू झाले. पाच सहा महिन्यानी कुंदन मॅरेज इन्व्हिटेशनकार्ड द्यायला गोपूच्या बॅचमध्ये येऊन गेली. तिने उत्तमचंद नावाचा कुणी जातवाला गाठलेला.

सगळे कलिग्ज शादीशुदा झाले. गोपू सेटल होईपर्यंत दोन अडीच वर्ष थांबला. मग मात्र आईने जशी मोहीमच उघडली. शोध चवकशा करून आपल्या माहेरच्या नातेसंबंधातली कुणी योगितानावाची बी. एस्सी झालेली मुलगी तिनं हेरली. पत्रिका बत्तीस गुणानीजुळली. मुलामुलीची पसंती झाली आणि साखरपुडा पार पडला. पत्रिका छापून झाल्यावर चारही कलिग्जना गोपूने समक्षनिमंत्रण द्यायचं ठरवलं. तो इनव्हाईट करायला गेला तेव्हा कुंदन सिकनोट देऊन घरी असल्याचंकळलं. तो मुद्दाम तिच्या स्टाफक्वाटर्सवर गेला पण तिथे कुलुप लावलेलं... कुंदन कुठेगेली समजलं नाही.

कणकवलीच्या मंगल कार्यालयात गोपूच्या लग्नाला मॅनेजिंग डायरेक्टरआणि इतर टॉपरँकचे ऑफिसर्स कंपनीची स्पेशल गाडी घेऊन आले. कलिग्ज पैकी फक्त रॉजर एकटाचआला. अहेराची धामधूम उरकल्यावर रॉजरनं तोंड उघडलं, "गोपूतुम्हे कुंदन के बारे मे कुछ पता लगा?" गोपू उत्तरला, "नही तो... मै खुदउसे इन्व्हाईट करने गया था... लेकिन कुंदन सीक नोट देके बाहर गई थी... वो क्वार्टरमें भी नही थी..." दीर्घ उसासा सोडून रॉजर म्हणाला, "तुम्हे पता नही शायद...कुंदन बहोत बीमार है... उसकी एम्. आर. आय्. हुआ... एच. आय. व्ही. पॉझिटीव्ह रिपोर्टहै... उसे जसलोक में अॅडमिट किया है... वो चोपडा साब कंप्यूटर इन्स्ट्रक्टर! वो तो उपर गये... !! पंद्रह दिन पहले मै दिल्ली गया था...नोईडा से होके आया... वहाँ खबर मिली... वजह एकही है... एच. आय. व्ही. पॉझिटीव्ह...!हिरचंदानी और मुकर्जी सलामत है लेकिन... गॉड ब्लेस देम... वो भी इस चक्कर में फँसनेवालेहै...! ये व्हिशस सर्कल है गोपू... पूरा होकर ही रहेगा...!! तुझे तो बुद्दुपन ने बचाया... और मैं... बुरे रंग की वजह से मैं बच गया रे! वरना...!!!

                       ***********