शोध साहित्यिकांच्या पाऊलखुणांचा---एक अनोखं पर्यटन
आपल्या कानावर पुढील गाणी सतत पडत असतात...' रे घना ये रे धना न्हाऊ घाल माझ्या मना ...'' नाही कशी म्हणून तुला..म्हणते मी ....'' कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे....कुणाचे ओझे..'' इथे भोळ्या कळ्यांना ही येतोय आसवांचा वास'किंवा
' मेंदीच्या पानांवर मन अजून झुलते ग...' '. सांग सांग भोलानाथ......'' माझे जीवन गाणे... गाणे..'' संथ निळे पाणी वर शुक्राचा तारा..'किंवा
चक्र, स्पर्श, महानंदा, मालवणी सौभद्र,... ठणठणपाळ.... असं साहित्य अनेक कादंबर्या
तसेच ययाती ,दोन धुव्र... अनेक रूपक कथा... कादंबऱ्या... कविता... पटकथा लघुनिबंध...पत्रे...इ.ही यादी न संपणारी... आणि या यादीशी निगडित माणसे आभाळाऐवढी...शब्दांचे ईश्वर पण यांचे व्यक्तीमत्व शब्दांपलीकडचे...शब्दात न मावणारे हे सगळं एवढ्यासाठी की... माझ्या' जास्वंदी ' कथासंग्रह प्रकाशनावेळी विनय सौदागरने कल्पना मांडली की आपण सारे दक्षिण सिंधुदुर्गातील नामवंत साहित्यिकांच्या घरांना भेट देऊया.आम्ही(एस.पी.के 1982 बॅच) ही कल्पना तत्काळ मान्य केली. आज दि. 30/10/24 ला सकाळी पहिली भेट दिली ती शिरोड्यातील वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालयाला भेट दिली.सकाळीच रिमझिम पाऊस पडून गेला होता.सौम्य ऊन होत.अश्यावेळी मराठीला सर्वप्रथम 'ज्ञानपीठ ' पुरस्कार मिळवून देणारे ययातीकार वि.स.खांडेकर यांच्या स्मृती जागवणार्या संग्रहालयात पाय ठेवताच शरीर थरारल मन आनंदीत झाले.' जग बदलायचे आहे ' या वाक्याचा सतत पाठलाग करणार त्यांचं जीवन व साहित्य यांचा सुरेख आलेख इथं मांडलाय.त्यांच साहित्य...त्यांची पत्रे(त्यांच्या हस्ताक्षरातील)...शिरोड्यातील वास्तव्यातील पाऊलखुणा फोटो व चित्ररूपाने इथे मांडल्या आहेत .मिठाच्या सत्याग्रहाची सचित्र माहिती ...ह्या सत्याग्रहाच्या तयारीची खांडेकरांनी लिहिलेली हकिकत...त्यांच्या चित्रपटांच्या कथा...जुन्या काळातील प्रोजेक्टर व कॅमेरा... ज्ञानपीठ पुरस्काराची प्रतिकृती...तो स्विकारतानाचा फोटो....त्या नंतर शिरोड्यात झालेलं जल्लोषी स्वागत...हे सगळं बघत असताना अस वाटत होते इथे खांडेकर आसपास वावरत आहेत.हे प्रदर्शन पाहण्यासाठी किमान दोन ते तीन तास वेळ दिला पाहिजे.चौदा मराठी पटकथा,संवाद,गीते....दहा हिंदी चित्रपटाच्या कथा ..दोन तेलगू/तमिळ चित्रपट कथा...अस अफाट साहित्य लिहिणारे वि. स.खांडेकर आम्हाला तिथे भेटले..वाडीतून चालत निघालेल्या खांडेकरांनी मळेवाड तिठ्यावर कुठची वाट निवडू अशी झालेली द्विधा मनस्थिती...नंतर त्यांनी पकडलेली शिरोड्याची वाट..सारं तिथे रेखाटलय.. शिरोड्यात दोना डवली या उपहारगृहात चविष्ट नाश्ता करून आम्ही आरवली येते जयवंत दळवींच्या मूळ घरी भेट दिली. दळवींच्या पुतण्याने ( सचिन दळवी)आमचं सहर्ष स्वागत केलं.दळवी व त्यांचा परीवार...त्यांचं साहित्य...त्यांच्या आठवणी यांना उजाळा दिला.दळवींच दिडशे - पावणेदोनशे वर्षांपूर्वीच राहत घर आम्ही बघितलं.विस खोल्यांचं...जीने व माड्या असलेलं...पूर्वीच्या काळातल घर पाहताना अंगावर रोमांच येत होते.लाकडी दारावरची सुंदर नक्षीकाम... गणपतीची खोली...बाळंतीणीची खोली...कामगारांची पेज- भाजी खाण्याची खोली...आंब्याची माडी...माळी वरचा जुना चरखा.आम्ही गेलो तेव्हा दोन खोल्या नुकत्याच शेणाने सारवलेल्या आम्हाला दिसल्या.दळवी बसत ती आरामखुर्ची पाहिली. दळवी घरी असताना वाचन करत पण लिखाण करत नसत...पण ते मंगेशी (कुलदैवता) या ठिकाणी महिना दोन महिने राहत तिथे शाई -टांक वापरून लिखाण करत.इतिहासाच्या या खाणाखुणा दळवींच्या पुतण्याने जपून ठेवल्यात त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत लागतील.या परीसरात... अंगणात दळवी खेळले असतील..इथेच त्यांच्यातला लेखक आकाराला आला असेल.इथली अनेक माणसे त्यांनी रेखाटलीत.मुळात ते मानसशास्त्राचे अभ्यासक त्यामुळे साहित्यात त्यांनी मानवी वर्तनाचे अनेक कंगोरे रेखाटलेत.त्यांच्या घरासमोर असलेल्या ज्या प्राथमिक शाळेत ते शिकले तिथे आम्ही भेट दिली.या शाळेच्या पुढे सुमारे दिडशे मीटरवर खांडेकर ज्या घरात भाड्याने राहत त्या घराला भेट दिली.मराठीतील दोन दिग्गज लेखक या परीसरात वावरले .. आणि आम्ही त्या परीसराला भेट देत होतो हे आमचं भाग्य. आमचा पुढचा टप्पा होता , मंगेश पाडगांवकरांच उभादांडा हे गाव.पण वाटेवर आरवलीच ग्रामदैवत व दळवींच्या लिखाणात श्रध्दापूर्वक उल्लेख येतो त्या देव वेतोबा मंदीराला धावती भेट दिली..लक्ष वेधून घेतले ते केळीच्या पिवळ्याजर्द घडांनी...पांढर्या-निळ्या कमळांनी.मध्ये मोचेमाडची खाडी...वळणा वळणाचा रस्ता... कामात रमलेली माणसे झरझर मागे टाकत आम्हीउभ्या दांडा येथे पोहचलो. डाव्या बाजूला एक छोटी प्राथमिक शाळा दिसली." थांब..' विनय ने प्रदीपला सांगितले.'हिच पाडगावकरांची शाळा..."पाठीला दप्तर लावलेलं...डोळ्यात भय दाटलेला सात ते आठ वर्षांचा मुलगा (मंगेश पाडगावकर. )--' सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल का?शाळेभोवती तळ साचून सुट्टी मिळेल का?"असं म्हणत शाळेबाहेर रेंगाळत आहे असं दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळल. आम्ही राज्यातील पहिला ' कवितांचा गाव 'अस बिरुद मिरवणाऱ्या...जिथे भला मोठा कार्यक्रम घडवला गेला तिथे पोहोचलो.पण प्रत्यक्षात तिथे काहीच नव्हते.गेटला कूलूप...फोन लावला तर उत्तर मिळाले मी ॲडमिट आहे येवू शकत नाही.बाहेरून एका भिंतीवर लिहिलेली एक ओळ दिसली. 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम कराव'जगायचं कसं हे शिकवणाऱ्या या कवीच्या स्मारकाची मात्र थट्टा उडवल्यागत वाटतं होतं.गोडकरसरांनी आणलेल्या शहाळ्याचे गोड पाणी आम्ही सुरुच्या बनात पिऊन तहान भागवली.दुपारच जेवण किनार्यावर असलेल्या रिसॉर्टमध्ये घेतलं.समोर अथांग सागर...भणभणता वारा...ताटात तळलेली सुरमई...बांगड्यांची कढी ... आमच्यासाठी हेच स्वर्ग सुख होते. आम्ही आता 'बागलाची राय ' कोंडुराच्या दिशेने निघालो. चिं. त्र्यं.खानोलकर यांचं जन्मस्थळ असलेलं हे ठिकाण पाहण्याची उत्सुकता होती.सागरी महामार्गावरील सुखद प्रवास वेंगुर्ले...दाभोली... वायंगणी...कोंडुरा...हरिचरणगीरी पार करत पुढे सरकलो.झांट्येला नेमकं ठिकाण माहिती असल्याने तो पुढे होता. रस्त्याच्या डाव्या बाजूला माड- पोफळींच्या गर्द झाडीत वर जाणारया पायर्या दिसल्या.वर चिदानंद स्वामींची संजीवन समाधी आहे.तिचे दर्शन घेतले.समोर असलेल्या पिंपळाच्या पारावर बसलो.विनयने त्यांची माहिती दिली. निसर्गतः पिंपळाची पाने वारा आला की सळसळतात..एक अनाहुत नाद निर्माण करतात. पण चिदानंद स्वामींच्या ध्यान धारणेत त्यामुळे अडथळा निर्माण व्हायला लागला.तेव्हा स्वामी म्हणाले' तूझ्या सळसळण्याचा मला त्रास होतोय.'त्या क्षणापासून पिंपळाच सळसळण बंद झालं ते आजतागायत. हे अधिकारी पुरूष बागलांचे गुरु होय. खाणोलकरांचा जन्म आजोळी म्हणजे बागलकरांच्या (मामा) घरी झाला.पिंपळाखाली बसून विनय,गोठसस्कर,फातर्फेकर सर यांनी चिंत्र्यं. खानोलकरांच्या आठवणी जागवल्या.त्यात ' आरती प्रभू ' हे त्यांचे टोपणनाव कसं पडलं. कुडाळात ते खानावळ चालवत व तिथे गल्ल्यावर बसल्या -बसल्या वहीवर कविता लिहित. त्यांचा स्वभाव कसा भिडस्त होता...यावर चर्चा झाली.ते लिहितात--- मी स्वतः पाहतोय स्वत:च्याच कवितेला एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेऊन
अशा अचाट व अफाट प्रतिभा असलेल्या या कवी लेखकाला मनोमन वंदन करत आम्ही अरुंद अश्या चिरेबंदी पाणंदीतून बागलांच्या घरी गेलो.त्यांनी वरच मूळ घर निर्लेखीत करून खाली नवीन घर बांधले आहे.थोडा वेळ त्या घराच्या व्हरांड्यात बसून आम्ही घरमालकिणीशी गप्पा मारल्या.आरती प्रभू व त्यांच्या कुटुंबियांबध्दल माहिती घेतली.पावसाची चाहूल लागल्यावर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.जाता येता ॲड. गावकरांचे वकीली क्षेत्रातील धमाल किस्से ऐकले त्यामुळे प्रवास अधिक सुखकर झाला. मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील हे सारे साहित्यिक सावंतवाडीशी निगडित आहेत. खांडेकर.. पाडगावकर...यांची घर वाडीत आहेत..आरती प्रभू वाडीत शिकलेत... जयवंत दळवी या ना त्या कारणाने वाडीशी निगडित होते.सावंतवाडी ते बागलांची राय हा प्रवास साधारण पंचेचाळीस किलोमीटरचा ...या प्रवासाच्या टप्पात भेटणारी ही पवित्र ठिकाण.... पर्यटन विभागाने या दृष्टीने विचार करायला हरकत नाही.साहित्य रसिकांनीही जरूर या स्थळांना भेटी द्याव्यात.प्रो.गोडकरनी असंच एखादं स्मारक कवी वसंत सावंत यांच्या साहित्यावर व आठवणींवर झाले पाहिजे अशी इच्छा व आशा प्रकट केली.खरच आजचा दिवस सोनियांचा दिन होता...पंढरीच्या वारी एवढाच आनंद आम्हाला आज लाभला..
बाळकृष्ण सखाराम राणे.मो.नं.8605678026