९. पिंगळ्याची भाक
महिम्न, त्रिसूपर्ण, पुरुषसूक्त पुरे झाले आणि पुर्षाबाळंभटाकडे जायचा बंद झाला. नेहमीप्रमाणे सकाळीच उठून संथा घ्यायला म्हणून तो साळसूदाप्रमाणेघराबाहेर पडायचा. पण बाळंभटाकडे न जाता थेट बंदर गाठायचा. बंदराजवळ सातवाहनाच्या काळातलीपडझड झालेली गढी होती. तिथे दिवसभर गावातली उनाड पोरे हुदू घालायची. बेदाद वाढलेल्यावडा-पिंपळाच्या झाडांवर सूरपारंब्या खेळायची. कुणी हत्ती तलावात पोहायची. भुकेच्याआगीला चिंचा, आवळे, बोरे, चिकणे, भोकरे, ओवळदोडे, आंबे असला रानमेवा आलटून पालटून चाखतायायचा. गावात कोणाचेही पोर घरात नसले की ते हुकमी गढीत असणार हे मुळी ठरलेले गणित!दोन वेळच्या अन्नाची भ्रांत सोडवायच्या उद्योगात गळ्यापर्यंत बुडालेल्या माई दीक्षितीणीलापोराकडे लक्ष द्यायला सवड तरी कुठली व्हायला?
बाळंभटजीनी पुर्षाची लक्षणे कधीच ओळखली होती. कोणाचाधाक नसलेले हे निब्बर पोर वेदविद्या काय कर्माची शिकणार? हे भाकीत त्यांनी पत्नीकडेकधीच वर्तवलेले पण माई अगदीच हाता पाया पडली म्हणून अन् महिन्यातल्या अडचणीच्या दिवसातनिरोपा सरशी येऊन माई दोन वेळेला अन्न रांधून जायची. कधी सणसूद, श्राद्ध-महाळ अशावेळी करा सवरायला यायची. बरे अमुकच मोबदला हवा अशीहीमाईची अट नसायची. तिचे करणे कर्तृक चांगले, राहणे निर्मळ आणि मुख्य म्हणजे तोंडानेफटाफटा नाही. यामुळे बाळंभटणीचे तिच्यासाठी अडायचे. हे ओळखूनच बाळंभट धोरणाने म्हणाला,"पाठव, पुर्षाला, बघू या आरेखतो का! मलाही जरा मदत होईल. शिकला सवरला तर भिक्षुकीकरुन पोट भरील. नीट शिकला तर त्याचे कल्याणच होईल. बघू काय होते..."
पुर्षा भिक्षुकी शिकायला बाळंभटाकडे जाऊ लागला. तिथेगेल्यावर शेणगोठा. गुरे सड्यावर लावून येणे, देवपूजा, कधी नारळ पाडून दे, बंदरावरुनजिन्नस आणून दे असल्या कामात त्याची विरड जायची. भटजी भिक्षुकीसाठी लांब गावाना जायचे.पुर्षा येऊ लागल्यावर, भटजींना मिळकतीची पडशी वहायला हुकमी चाकर मिळाला. बरे मुंज झालेलाब्राह्मणाचा मुलगा म्हणून यजमान इतर ब्राह्मणांबरोबर पै-पैसा त्याच्याही हातावर घालीत.हे सगळे सांभाळून सवड मिळेल तसे भटजी त्याला काहीबाही शिकवित. पुर्षासुद्धा विशेष तोशीसलावून न घेता जमेल तसा शिकवलेला भाग मुखोद्गत करी. सलग पाच-सहा वर्षे भटजींकडे खेष्ट्यामारुन फक्त महिम्न, त्रिसूपर्ण, पुरुषसूक्त आणि ब्रह्मकर्मे इथपर्यंतच त्याची मजल गेली.या गोष्टींचा भिक्षुकीसाठी फारसा उपयोग नव्हता.
लग्न, मुंज, वास्तुशांत, गृहमख, श्राद्ध-पक्षादिविधी ही भिक्षुकीतली चलनी नाणी... पुरुषसूक्त झाल्यावर पुर्षाने म्हटले देखील, "गुरुजी,आता मला धर्मकृत्ये शिकवा म्हणजे संथा सांभाळून मला भिक्षुकीही करता येईल." पण हे शिकवले की पुर्षा कमाईला लागेल. फक्त संथाघेण्यापुरता येणार नी ढुंगणाला पाय लावून जाणार "कधी..काय..नीकसे शिकवायचे ते ठरलेले असते. तुझी वाणी अजून संस्कारित व्हायला हवी. रुद्र, श्रीसूक्त,देवे झाले की मग विधी एकेक सुरु करुया. पुरुषसूक्त झाले म्हणजे षोडषोपचार पूजा कायतुला अडायची नाय. तेव्हा आधी रुद्र घेऊया." पुर्षा आता रंजिस आला. घरी माईपुढेत्याने तोंड सोडले. "बाळंभट मला राबवून घ्यायला सवकला आहे. घरचे राडे उपसायला फुकटचा नोकर मिळालाहेना... तो बरीच मुदत टिकायला हवाम्हणून वेळकाढूपणा करुन ते लोंबवताहेत मला."
माई करवादली. "मी हाता-पाया पडून तुझे लोढणेअडकवले त्यांच्या गळ्यात. विद्या घ्यायची म्हणजे गुरुची सेवा नको का करायला? एवढा त्रिखंडाचास्वामी कृष्ण परमात्मा... पण त्याने सुद्धा सांदिपनीच्या आश्रमात गुरे वळली, लाकडेफोडली. नी तू कोण एवढा तालेवार लागून गेलास रे टिक्कोजी? जलमण्यापूर्वी बापसाला उलथूनघातलेस. भिकू मास्तराच्या शाळेत घातला तर चार वरसात दोन यत्ता काय पुऱ्या करवेनात तुला...मीही अशी रांडमुंड वनवाशी बाई. हाडाची काडे करुन संसार रेटत्येय्. तू मार्गी लागशील,कमाई करुन माझे पांग फेडशील म्हणून आला दिवस दाढेत आवळा धरुन ढकलत्येय्...! नि तुलाकाय अशी वेठबिगारी करायला लागत्ये रे सोकाजीरावा? दुपारी पंक्तीला बसून पोटभर हादडतोसकी नाय बाळंभटजींकडे?... अधे मध्ये पै-पैसा का होईना त्यांच्या पुण्याईवरच मिळतो नातुला? पुर्षा रे, माणसान् प्रवाह पतित होऊन दिवस काढावे. लोहपिष्ट पचवायला शिकावे.आमचे अण्णा म्हणत, चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे."
"तू जरा धीरधर. आपला पडता काळआहे. थोडी कळ सोस. मग सगळे मार्गी लागेल. अरे रुद्र आला की श्रावणातल्या चार सोमवारीतुला थारा मिळणार नाही. एवढी एकादष्ण्यांची कामे मिळतील." पुर्षाला गप्प राहणे भाग पडले. तो मुकाटपणे भटजींकडे जात राहिला.त्याने चंग बांधून सहा महिन्यात रुद्र पुरा केला नि "आता धर्मकृत्ये सुरु करा." असा भटजींच्या पाठी लकडा लावला पण ते कायगम लागू देईनात. तेव्हा मात्र पुर्षा हताश झाला. त्यांचे हात पाय चालताहेत तोवर तेआपल्याला रखडवणार हे पुर्षाने ओळखले. एक दिवशी मनाचा हिय्या करुन त्याने सरळ गढी गाठली.सुरुवातील एक-दोन दिवस मोकळ्या अंगाने रांबाडपणा करणे त्याला गोड वाटले. पण गढीतल्यावडावर सूर पारंब्या खेळायचे, विटी दांडूत रमायचे त्याचे वय राहिले नव्हते. मग त्या पोरांची संगत सोडून गढीतल्या भवानीच्या देवळात, कधी मारुतीच्यादेवळात तो बसून रहायला लागला. मारुतीच्या देवळात रमल सांगणाऱ्या बैराग्याची मजा बघीतत्याचा दिवस मजेत जायचा. आरशावर काजळाच्या बोटांनी चित्रविचित्र आकृत्या काढून बैरागीप्रश्नकर्त्यांना काहीबाही तोडगे, उतारे सांगायचा.
नारळ, भाताचे मुटकुळे उतरुन काढ, लिंबू कापून तीनतिठ्यावर पीर, असे काही तोडगे तो आलेल्या माणसाला सांगायचा. अडचण सांगायला आलेला मनुष्यसमोर बसला की त्याच्या चेहऱ्याकडे बैरागी टक लावून बघायचा. मग आरसा स्वच्छ पुसून त्याच्याहाती द्यायचा अन् काजळात बोटे बुडवून आरशावर काहीबाही रेघोट्या काढायचा. आरशात बघीतअसलेला मनुष्य कोण कुठला त्याच्या घराजवळच्या खाणाखुण इत्थंभूत सांगून त्याची अडचणकाय आहे, कसले आडमेळे आहे. त्यावर काय उपाय करायला हवा हे फडाफड बोलायचा. काही वेळाविभूत मंत्रून द्यायचा, कधी नारळ मंत्रून द्यायचा, कधी लिंबू गुलाल द्यायचा. माणसेत्याच्या पाया पडत. एक पाट मांडून त्यावर पणती, नारळ ठेवून गोसावी त्याच्यासमोर बसलेलाअसायचा. माणसे त्या पाटावर तांदूळ, नारळ, पै-पैसा, चवली-पावली यथाशक्ती ठेवीत.
आपणही बैराग्याला आपली नड सांगावी. आपल्याला कुठेशेर मिळेल का? हे विचारावे असे त्याच्या मनात यायचे. पण त्याची गोसाव्याशी एवढी घसणझालेली नव्हती. रमल बघायला येणाऱ्यांना नारळ, लिंबू, उद, तेल आणून दे अशी सटरफटर कामेपुर्षा तत्परतेने करायचा. हळू हळू तो देवळात जाऊन टेकला की गोसावी हसून 'या' म्हणायचा.मग एक दिवस बैरागी एकटा असलेला गाठून पुर्षा धीर करुन पुढे सरला. आपली कर्मकहाणी सांगूनया परिस्थितीतून बाहेर पडायचा उपाय त्याने विचारला. बैराग्याने काजळात बोटे बुडवूनआरशावर काही आकृत्या काढल्या. थोडा वेळ टक लावून बघितले नि बोलू लागला. "येत्यातीन रोजात तुला कायमचा शेर मिळणार आहे. मारुतीला नारळ ठेव नि एकभुक्त राहून अकरा शनिवारधरीन असा नवस बोल. भाग्य आपल्या पायांनी चालत येऊन तुझा दरवाजा ठोठावील.” पुर्षा निर्धास्तझाला. मारुती पुढे नारळ ठेऊन अकरा शनिवार उपास धरायचा संकल्प त्याने केला.
पुर्षा बाळंभटजीकडे जायचा बंद होऊन दहा दिवस मागेपडले. गोडबोल्यांकडे डिंकाचे लाडू करुन द्यायला माई गेलेली. सहज गप्पांच्या ओघात विषयनिघाला. पुर्षा गेले आठ-नऊ दिवस कायम बंदरावर नाहीतर गढीत बसून असतो. संध्याकाळ झालीकी मुकाट घरी जातो ही बातमी आऊ गोडबोलणीन सांगितलीन्. माई एकदम तग्रवग्र होऊन फटाकेफोडायला लागली तशी आऊ तिला समजावीत म्हणाली, "माईऽऽ पुर्षाचे चुकले खरे पण बाळंभटदेखील लुच्चा आहे. पोराला सटरफटर शिकवलेसे करुन पोटावरी राबवून घेतो. इतक्या वर्षातकाय राशी घातल्यान् शिकवून हे कधी विचारुन तरी घेतलेस का पुर्षाला? आपले हित अनहितन कळण्याएवढा पुर्षा आता लहान नाही ऱ्हायला. कुठेतरी चिकटवा त्याला. अरे हो... बरेआठवले मला... शांताभाऊ गोडशांना भवानीच्या पूजेसाठी नि घरच्या देवांच्या पूजेसाठी ब्राह्मणठेवायचा आहे असे 'हे' म्हणाले दोन दिवसांपूर्वी. देवीच्या पूजेचे वर्षासन आहे खंडीभरभाताचे. शिवाय नवरात्रात केवढी कमाई... एवढे सांभाळलेन् पुर्षान तरी तुमची जिगजिग कमीहोईल. पोरही मार्गी लागेल."
लाडू वळून झाले. माई हात धुवून बाहेर पडली. ती तडक बंदरावर आली. तिला कुणी पोराने पुर्षा मारुतीच्यादेवळात असल्याची खबर दिलीन. माई तरातरा मारुतीच्या देवळाकडे निघाली. माई देवळाच्याप्रवेशदारा समोर आली अन् बळाणीवर टेकलेला पुर्षा हडबडून उठला. आता माईच्या तोंडाचापट्टा सुरु होईल... काही विचार न करता ती आपली भोसड काढणार या विचाराने त्याच्या पोटातगोळा आला. पुर्षा समोर उभा राहताच "इथे भेटलास हे नशीब. चल माझ्या मागून..."एवढे बोलून माई तोंड फिरवून चालू लागली. काही आक्रस्ताळेपणा न करता माईने एवढ्यावरचभागवले म्हणताना पुर्षा मान खाली घालून निघाला. नुकतीच वेसण टोचल्यामुळे नरम पडलेल्याबांगर पाड्यासारखा तो माईच्या मागून चालू लागला. मागे वळूनही न बघता माईने थेट शांताभाऊगोडशांचे घर गाठले. "या माई... अरे व्वा! पुरुषोत्तम का हा? बैस रे मुला."तक्क्यावर रेलून बसलेल्या शांताभाऊंनी त्याचे तोंडभर स्वागत केले. पुर्षा वरमून ओसरीवरखांबाच्या मुळाशी टेकला. माई तडक स्वयंपाकघरात जाऊन गोडशीणीसमोर उभी राहिली. गोडशीणथोरा-मोठ्याकडची, सासरी तर गजांत लक्ष्मीचे वैभव तिच्या पायाशी! पण तिला संपत्तीचीअक्कड नव्हती. बाईपणा करुन अब्रूदार जगणाऱ्या माईचा तिला भारीपुळका. माईने पाणीसुद्धा न घेता अशान् असे सविस्तर तिच्या कानावर घातले. माईचे बोलणेऐकल्यावर कसलाही आडपडदा न ठेवता मोकळ्या मनाने गोडशीण म्हणाली, "हात्तिच्या! एवढेचना? ह्यांना तरी हल्ली पेढीच्या कामापुढे देवदेवतार्जनालाही फुरसद मिळत नाही. देवीचेवर्षासन आहे खरे पण आम्हाला तरी काय कमी आहे? कुणा गरजवंताचा चरितार्थ तरी चालेल. झालेचतर घरच्या पूजेअर्चेतूनही त्यांना जरा सुटका मिळेल. पेढीवरच्या कामालासुद्धा कुणी विश्वासूब्राह्मण मनुष्य मिळतो का? हे बघताहेत. म्हटलेत तर पुरुषोत्तमचा विचार कधीचा माझ्याडोक्यात आलाहे. पण म्हटले आपण होऊन कसे विचारावे?"
"म्हंजे तसे विचारण्यात गैर काही नाही. पण तोबाळंभटजीकडे भिक्षुकी शिखतोहे. त्याला काढायचा तिथून म्हणजे भटजी आणखी खार खाणार आमच्यावर!आता तुम्ही विषय चाळवलात हे बरीक ब्येश झाले. मी घालत्ये त्यांच्या कानावर. आता जेवणवेळझालीहे. कधी नव्हे त्या तुम्ही आल्याहात तर घासभर खाल्ल्याशिवाय मी बरी जाऊ देईन तुम्हाला.आता जेवूनच जा." कसनुसं हसत माई म्हणाली, "अहो वैनीबाई पण... नाही म्हणजेपुर्षादेखील आलाहे. आम्ही जाऊ घरी. उद्याकडे खेप करीन. तवर शांताभाऊंना विचारुन ठेवा.मी निघते आता." माईचा भिडस्त स्वाभिमानी स्वभाव ओळखून गोडशीणीचे काळीज भरुन आले."अहो माई... तुमची दिखिल कमालच म्हणत्ये मी! मुलगा बाहेर थांबलाय हे कळले असतेतर अगोदर त्याला पाणी तरी विचारले असते की! आणि काय हो माईऽऽ मुलगा नि तुम्ही दोघेआहात म्हणून का जेवायला रहायचे टाळताहात तुम्ही. धन्य तुमचीसुद्धा! मागच्या खेपी बाळंपणातआईच्या मायेने केलेत माझे... त्याची जाणीव आहे हो मला."
गोडशीणीने पुर्षाला हाक मारली. त्याच्यासाठी पाटमांडून वाटीतून लाडू नि पाण्याच्या गडवा ठेवला. तिच्या आतिथ्याने माई भारावून गेली.कुणाचे असे फुकट खाणे तिच्या रक्तातच नव्हते. "काय चटणी बा वाटायची असली तर सांगा.चटकन् तेवढी वाटून टाकीन. नाय तरी जेवण होईपर्यंत रिकामे बसून अशी काय चरबी वाढणारेय्माझी. काय करासवरायचे असले तर सांगा. शांताभाऊंना आमसोलाची चटणी आवडते. आज आल्येच आहेकरीन की! मी पाय धुवून येत्ये तंवर तिळ-जिरे काढून ठेवा." माई पाय धुवायला गेलीसुद्धा.गोडशीण नको नको म्हणत असतानाही पाट मांडून ती वाढप करायला सरसावली. "आज मी आहेवाढायला तर तुम्ही अगोदरच बसा कशा." तशी गोडशीण म्हणाली, "माई आपण दोघीजणीमग बसू. हे जेवायला बसले की यांच्या कानावर घालीन म्हणत्ये विषय. हे काय, नाही म्हणायचेनाहीत. तुम्ही मात्र एक करा, ह्यांनी तुमची अपेक्षा काय म्हणून विचारले तर अमुकच म्हणूनसांगू नका. किंबहुना देण्या-घेण्याची काय अपेक्षा नाही. मुलगा जरा रांगेला लागला म्हणजेपुरे असे म्हणा."
"माई कोणाचे कष्ट फुकटावारी घेणे ह्यांच्यास्वभावातच नाही. तसे ते हिशोबी आहेत खरे पण तुम्ही त्यांच्यावरच सोपवलेत तर त्यांनाहीजरा बरे वाटेल. अहो दुसऱ्याच्या पोटात रिगल्याशिवाय आतड्याला पीळ कसा हो पडावा? एवढेघर भरुन दार वहातेय् आमचे... अगदीच कन्नी कटवायची भाषा हे करायचे नाहीतच, पण त्यातहीमी आहे ना खंबीर? फक्त त्यांच्या तोंडून रुकार येऊ दे मग पुढे कसे करायचे माझ्याकडेलागले." माई निर्धास्त झाली अन् तिने मान डोलावली. पुर्षा आणि शांताभाऊ जेवायलाबसले. पहिला भात संपल्यावर वाढप करताना गोडशीणीने अशान् असे म्हणून सगळा विषय बेतासबात शब्दात नवऱ्याच्या कानावर घातला. शांताभाऊ मान डोलवीत म्हणाले, "ठीक आहे.कुणाला तरी गळ घालण्यापेक्षा पुरुषोत्तम करीत असेल तर चांगलेच की. देवीची, आमच्या घरचीदेवपूजाही करील आणि पेढीवर हिशोब-ठिशोब, वसुली ही कामे सुद्धा करता येतील की त्याला,मुलगा नेकीचा आहे, माईंच्या संस्कारात वाढलेला आहे... हे सोन्याहून पिवळे झाले की! देवीच्या पूजेचे वर्षासन आहे ते खंडीभर भात मिळेल.नवरात्रात थोडे-बहुत उत्पन्न होते, तेही मिळेल. आता आमच्या घरची देवपूजा आणि पेढीवरचेकाम याच्या मोबदल्याची काय अपेक्षा आहे ते सांगा हो माई! माणसाने व्यवहाराला कसे रोखठोकअसावे. मी व्यापारी मनुष्य... स्नेहसंबंध सुद्धा ताजव्यात टाकून तोलून मापून घेणारा."
"माई, माणूस जोडताना विचार करावा. पैसा जोडण्यापेक्षातोडतो अधिक म्हणून स्पष्ट बोलतो. नाहीतर तुम्ही घरच्यासारख्या की हो आम्हाला. मागच्याखेपी रक्तानात्याचे मनुष्य काय करील अशा मायेने तुम्ही केलेत हिचे, मोबदल्याची अपेक्षाहीन करता! तुमच्यासाठी काही करता आले तर माझे भाग्यच समजेन मी. कसल्याही कौटुंबिक व्यवहारातही कधी अक्षरसुद्धा बोलत नाही. हिने आपण होऊन तुमचा विषय माझ्या कानावर घातला यात कायते समजलो मी. पुरुषोत्तम या क्षणापासून राहू दे! फक्त तुमच्या अपेक्षा निःसंकोच सांगा.त्या पूर्ण करायची माझी इच्छा आहे." माईंनी गोडशीणीने पढवले होते त्याप्रमाणेउत्तर दिलेच आणखी पुस्ती जोडली. "देवीचे वर्षासन हेच बक्कळ झाले.आम्ही दोन माणसे खाऊन खाऊन खाणार किती? कितीमिळाले म्हणजे माणूस पुरे म्हणेल? पूजेचे अवघे चार घटकांचे काम. हिशोब-ठिशोब ठेवायचेकाम आधी तो दोन वर्षे शिकू दे. मग तुम्ही विचार करा नि काय ते ठरवा. अमूकच द्या असेमाझ्या तोंडून कधी यायचे नाही.”
माईचे बोलणे सुरु असता घास घेण्याचे विसरुन शांताभाऊऐकतच राहिले, “माई तुमची मात्र धन्य आहे हो. तुमचा एवढा विश्वास आहे माझ्यावर हे ऐकूनचमी धन्य झालो. खूप तालेवार बघितले मी पण तुमचा नमुना काही वेगळाच आहे. घरच्या पूजेचेवर्षाकाठी पंचवीस रुपये आणि पेढीवरच्या कामाचा महिना दहा रुपये देऊ आम्ही. मुलाला पूर्णदिवसभर गुंतवणूक आहे. उद्या लग्न कार्य होणार. त्याचा योगक्षेम भागेल एवढी कमाई त्यालाव्हायलाच हवी. याखेरीज कधीही वेळे गरजेला तुम्ही शब्द टाका. माझी उपत आहे तोपर्यंतपरत केव्हा द्याल हे शब्द माझ्या तोंडून यायचे नाहीत. माई अन्नावर बसून मी हे सांगतोय्...”त्यांचे बोलणे ऐकूनच माईचे पोट भरले. बाळंभटाकडे जाणे बंद करुन आपल्याला काहीही कल्पनान देता पुर्षा रिकामटेकडा हिंडू लागला हे ऐकल्यावर त्यांच्या पायाखालची भुईच सरकलीहोती. आपण त्याला हुडकीत बंदर पालथे घालून गढीवर जातो काय... गोडशीणीकडे शब्द टाकतोकाय नि अकल्पितपणे आपले भाग्य फळफळते काय... माई अचंबा करीत राहिल्या.
पुर्षा गोडशांच्या पेढीवर रुजू झाला. सकाळीच आंघोळकरुन तो बाहेर पडायचा. सोवळे नेसून गढीवर जाऊन देवीची आणि येता येता मारुतीची पूजाहीकरायचा. मग गोडशांच्या देवाची पूजा. त्यांची पूजा उरकून त्याने कपडे घातलेन की, गोडशीणकाकूंची हाक यायची. लाडू, गोडाचे पोहे, सांजा काही ना काही खाणे आणि ग्लासभर गरम दूधतयारच असायचे. खाणे उरकून तो पेढीवर पोहोचला की हळूहळू गिऱ्हाईकांची वर्दळ सुरु व्हायची.हे काम म्हणजे जशी राजाची गादी असेच त्याला वाटायचे. तो मन लावून काम करायचा. दुपारीजेऊन तो लगेच घराबाहेर पडायचा. पेढी उघडेपर्यंत मारुतीच्या देवळाकडे चक्कर मारायचा. बैराग्याचे शब्द अकल्पितपणे सत्य ठरले... त्याला जन्माचाशेर मिळाला होता. या जाणीवेने तो रोज न चुकता बैराग्याला हाकमारुन यायचा. त्याची बैराग्याशी घसण वाढू लागली.
बैरागी काय काय अद्भुत गोष्टी सांगायचा. खूप दूर त्याचे घर.. प्लेगात त्याचे आई-बाप वारले तेव्हा त्याचे वय अवघे चार वर्षांचे. चुलत्यानेत्याला सांभाळले खरे पण त्याची बायको महाखाष्ट! आई-बापावेगळ्या या पोराचे ती भलते छळ करायची. धड दोन वेळचेअन्नसुद्धा मिळायची भ्रांत. कशीबशी दोन-तीन वर्षे गेली. गावातल्या शास्त्रीबुवांनी आपल्या मुलाबरोबरत्याची धर्ममुंज लावली. मुंजीनंतर आठवडाभराने असेल...काहीतरी सांडलवंड झाली म्हणून चुलतीने त्याला बेदम मार दिला.काविलता रसरशीत तापवून त्याच्या उजव्या मनगटावर ढाणी ओढली. वेदनांनी कळवळत तिचा हात झिंजाडून तो भयाने धावत सुटला. कोणी शोध घ्यायला मागून येईल म्हणून तो तीन दिवस कुत्र्यासारखा धावत राहिला.अन्नपाण्याविना धावून धावून तो उरी फुटला आणि भर दुपारी उन्हाच्या कडावरचक्कर येऊन पायवाटेतच कोसळला. तो जागा झाला तेव्हा कोणी कफनीधारीसाधू त्याच्या जवळ बसलेला होता.
तो साधूबरोबर दहा-बारा वर्षे वेगवेगळ्याभागात फिरत राहिला. मंत्रतंत्र, मुद्रासामुद्रिक,सर्पविद्या यामध्ये तो पारंगत झाला. मग एक दिवशीफिरस्ता साधू त्याला म्हणाला, "तू आता जा! जगायला आवश्यक एवढी शिदोरी मी तुला दिलीय. ती सत्कारणीलाव. सुखाने जगायचे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, स्त्रियांच्या मोहात चुकूनही पडू नकोस. मिळालेल्या विद्येचासत्कारणी वापर केलास तर तुझ्या दोन वेळच्या अन्नाची सोय मारुतीराया करील."बैरागी मग पाय नेतील तिकडे जात राहिला. या भटकंतीतएका हठयोग्याशी त्याची गाठ पडली. नदीच्या प्रवाहात उभे राहून काही साधना सुरु असतानात्याची समाधी लागली. त्या अवस्थेत तो किती काळ होता देव जाणे. तो जागृतीत आला तेव्हासर्वांगाचा दाह होत होता. तो कसाबसा काठावर आला. संपूर्ण शरीरावर माशांनी लचके तोडूननेल्यामुळे झालेल्या जखमांनी विव्हळत असताना बैराग्याची त्याच्याशी गाठ पडली.
बैरागी तीन महिने त्याची सेवा करीत राहिला. पुढचीचार-पाच वर्षे तो हठयोग्यासोबत कुठकुठच्या मुलूखात फिरला. पिचपिच्या डोळ्यांच्या, बायकांप्रमाणेवेणी घालणाऱ्या लोकांचा प्रदेश, पक्षी पकडून त्यांना शिकवून त्यांची विक्री करुन चरितार्थचालविणाऱ्या जाड ओठांच्या काळ्याकभिन्न लोकांचा प्रदेश, जारण-मारण, वशीकरण आणि काळीजादू करणाऱ्या लोकांचा प्रदेश. नजर पोचेतो वाळूचे पर्वतप्राय ढीग पसरलेला रखरखीत वैराणप्रदेश. त्या प्रदेशात फिरताना तर उंटांचा कारवान घेऊन जाणाऱ्या धिप्पाड लुटारुंनीत्या दोघांना पकडून साखळदंडाने जखडून टाकले. त्यांच्या तांड्यात जखडबंद केलेले कितीतरीपुरुष आणि स्त्रियाही होत्या. ती बहुधा गुलामांची विक्री करणारी टोळी असावी. सप्ताहभर ते बंदी म्हणून राहिले. मार्गात एका नगराजवळ कारवानथांबला. कैद केलेल्या जथ्यातल्या काही स्त्रियांना घेऊन टोळीतले लुटारु नगरात गेले.फक्त चार पहारेकरी पहारा देत थांबलेले. हठयोग्याने ती संधी साधून योगसामर्थ्याने साखळदंडतोडून सुटका करुन घेतली.
मदिरेच्या नशेत बहोश झालेल्या चारही रक्षकांचा शिरच्छेदकरुन हठयोग्याने सगळ्या बंदींना मुक्त केले. त्यानंतर दोघांची पुन्हा भ्रमंती सुरुझाली. हठयोग्या बरोबरच्या भटकंतीत बैराग्याने रमल विद्या शिकून घेतली. आता बैरागी तारुण्यानेमुसमुसलेला होता. बंदीवान काळात त्याचा स्त्रियांशी संपर्क आला आणि देहभोगाची अनिवारलालसा उचंबळून येऊ लागली. हठयोग्याचा मार्ग आणि आपला मार्ग भिन्न आहे हे ओळखून बैराग्यानेत्याची संगत सोडली. दिशाहीन भ्रमंतीत बैरागी अखेर या गावंढ्या गावात स्थिर झाला. "मीकाही जीवनाचा तिटकारा आल्यामुळे या मार्गाला वळलेलो नाही. सर्वसामान्याप्रमाणे घर प्रपंचाचीअतीव ओढ माझ्या मनात आहे. माझे नाव गाव सगळे पुसले आहे अन् हे भणंगासारखे बेवारशी जिणेमाझ्या नशिबी आले आहे." बैरागी उद्विग्नतेने सांगायचा.
त्याच्याकडे असलेल्या अद्भूत विद्या, लोकांना आणिखुद्द पुर्षाला त्याच्याविषयी असलेला आदर या पार्श्वभूमीवर संसार सुखासाठी आसुसलेल्याबैराग्याची त्याला कीव यायची. असला अद्भुताचा साठा आपल्याकडे असता तर आपण त्रिखंडावरराज्य केले असते असे तो म्हणायचा. पुर्षाच्या अपरिपक्व, अनुभवशून्य वाक्ताडनावर हसतबैरागी म्हणे, "आईच्या का असेना मायेचे पांघरुण तुझ्या भाग्यात आहे. आता तर तुझ्याचरितार्थाचीही सोय झालीय. पण मी मात्र एवढे सामर्थ्य असूनही भणंगच राहणार. माझ्याकडच्याविद्या, अद्भुत सिद्धी माझ्या स्वतःच्या उपयोगाच्या नाहीत. त्यांचा फायदा असलाच तरतो इतरांना आहे. माझे स्वतःचे भविष्य बघायचा प्रयत्न केला तर आरशात फक्त काजळाने माखलेलाअवकाश दिसतो; माझे प्रतिबिंब सुद्धा दिसत नाही. माझ्या दोन्ही गुरुंनी मला सिद्धी दिल्यात्या ही अट घालून... मोबदल्याची पृच्छा सुद्धा मी करावयाची नाही असे बंधन आहे. मी सांगितलेलेरमल तुझ्या प्रत्यंतराला आले. पण मी? इतक्या लोकांच्या अडचणी निवारण करुनही मला केवळएकदा पोटभर जेवता येईल इतकीच तुटपुंजी प्राप्ती आहे माझी. म्हणून रोज रात्री मी जेवतो,दिवसभर उपाशीच बसून असतो की मी...”
बैराग्याकडची गुढ विद्या मात्र मती गुंग करणारी होती.मी मी म्हणाणाऱ्या लोकांनी त्याला अजमावयाचा प्रयत्न केला पण त्यांचाही संदेह दूर झाला.त्याची ख्याती इतकी दूरवर पसरली की, लांबून माणसे यायची. अलिकडे तर माणसांची वर्दळफारच वाढली. आपली पाळी येईतो माणसांना विरड विरड तिष्ठत बसावे लागायचे. गर्दी वाढलीतसा रोख ठोक व्यवहारही सुरु झाला. एखादा सावकार गडी कडोसरीचा राणी छाप चांदीचा रुपयासरसावीत पुढे जायचा. ऐऱ्या गैऱ्यांना बाजूला सारुन तो बैराग्यापुढे मस्तक टेकवून चांदीचारुपया खण्णकन् पाटावर ठेवायचा. मग त्याचे काम आधी व्हायचे. दूरवरुन येणारी माणसे वेळमोडू नये म्हणून सर्रास या प्रकारचा अवलंब करु लागली अन् बैराग्याला चांगली प्राप्तीव्हायला लागली. आता धर्मशाळे ऐवजी तो सरदार बागव्यांच्या घरामागे बखळीत रहायला लागला.
कुठे मयत झाले, पाऊस-वादळ येणार, असली भाकितेही बैरागीअचूक सांगायचा. त्याचे प्रत्यंतर पुर्षाने कैक वेळा घेतलेले. एकदा तर मंदिरा समोरच्याउंच कदंब वृक्षावर एक समुद्र गरूड झेपावत येऊन बसला अन् त्याचे चित्कार सुरु झाले.त्याचे आवाज ऐकून बैराग्याने आरशात रमल बघितले अन् पुर्षाला म्हटले, "जा ....सांग जा तुझ्या मालकाला...... गढीच्या दक्षिणेकडे समुद्रात माल भरुन येणारे एक अगदीतारु बुडायच्या बेतात आहे. वेळेवर पोचलात तर तारवावरची माणसे तरी वाचतील. तारु वाचविणेकठीण आहे......" पुर्षा तत्क्षणी धाव मारीत गेला. बैराग्याचे सांगणे ऐकल्यावरकसलीही शंका न बाळगता शांताभाऊ बंदरात आले अन् चार मचवे मदतीसाठी रवाना केले. मचवेगढीला वळसा घालून सुसाट वेगाने दक्षिणेकडे निघाले. ते घटनास्थळी पोहचेपर्यंत जहाज निम्मेबुडत आले होते. जहाजावरुन उड्या टाकून पोहत किनाऱ्यावर यायचा प्रयत्न करणारी माणसे...ती मात्र वाचली. तिघे बेपत्ता झाले पण एकोणीस लोकांचे प्राण वाचले. बैराग्याने सांगितलेलेरमल अचूक होते. मदुराईहून सामान भरुन गोडशांच्या पेढीवर पोचवायला निघालेले ते जहाजहोते.
शांताभाऊंनी बैराग्याच्या पायावर डोके ठेवले. रोजदोन वेळचा शिधा गोडशांच्या पेढीवरुन बैराग्याला पोच होऊ लागला. आता तो मारुतीच्या देवळात बसायचा बंद झाला. झुळझुळीतधोतर नेसून तो बखळीतच बसायचा. जानू बागवे कायम त्याच्या जवळ बसून रहायचा. बागवे फक्तनावाचेच सरदार राहिलेले... त्याच्या बापजाद्यांनी चंगी भंगीपणात संपत्तीची माती केली.जानुच्या बापसाने तर घरातली भांडी-कुंडी सुद्धा विकली. अन्नान्न दशा असली तरी सरदारकीचापीळ मात्र कायम होता. स्वतःला क्षत्रिय खानदानी म्हणवणारे बागवे! वाड्याचा अर्धा भागकोसळलेला... इनामतीची मळ्यातली सुपीक जमीन पण ती खंडाने दिलेली... कशीतरी दोन वेळेलाचूल पेटायची इतकेच. बैराग्याला नारळ-तांदूळ भरपूर मिळायला लागलेले. तो जानूच्या मार्फतअसल्या वस्तू आडगि-हाईकी विकून पैसा करायला लागला. जानूचाही हात ओला व्हायला लागला.
एक दिवस संध्याकाळचा जानू शांताभाऊंना भेटला. त्यालापाचशे रुपयांची नड होती. त्याच्या सारख्याला एवढे रुपये कसे द्यायचे? चाळीस एकराच्या मळ्याची प्रॉमिसरी नोट लिहून देऊन जानूने रुपये उचलले.दोन दिवसांनी त्याच्या वाड्याच्या पडलेल्या भागाची साफ सफाई सुरु झाली. कोसळलेल्याभिंतीच्या दगड मातीचे ढीग उपसायला सुरुवात झाली. बिऱ्हाड गोठ्यात हलवून वाड्याचा शाबूतअसलेला भागही पाडायचे काम सुरु झाले. आठवडाभरात भिंती पाडून पुऱ्या झाल्या. लोक आश्चर्यकरायला लागले. कालपर्यंत उधाऱ्या उसनवाऱ्या करणाऱ्या जानू बागव्याने हे भलतेच काय आरंभले.चौकशी करणाऱ्याला वाडा नवीन बांधणार म्हणून जानू सांगे. बागव्याला विनाशकाले विपरीतबुद्धी आठवली असे लोक म्हणायला लागले. सोन्यासारखा मळा गहाण टाकून त्याने रक्कम उभीकेलीन् ही वार्ता गुप्त राहिली नाही. आता बागव्या देशोधडीला लागणार अशा चर्चा सुरुझाल्या. अकस्मातपणे काम बंद झाले अन् जानूही कुठे गडप झाला.
काम बंद का झाले? जानू कुठे गेला? घरातले कोणीच माणूसकाही गम लागू देईना. कोणाला काहीच तर्क करता येईना. पाऊण महिना उलटत आला. बागव्याचाविषय मागे पडला. अकस्मात मलबारी लाकूड सामान भरलेला कोठ्या शिडे उतरुन बंदरात नांगरलागेला. करवतकाठी धोतर, बाराबंदी, डोईला ऐजबाज फेटा, पाच बोटात पाच अंगठ्या घालून वळणदारलाकडी मुठीची गुप्ती बसवलेली काठी हातात धरुन जानू बागवे झोकात बंदरावर उतरला. तो आलाआणि बागव्यांकडे जशी दिवाळीच सुरु झाली. वाड्याचे काम सुरु झाले. बंदरावरुन ताजी फडफडीतमासळी बागव्याच्या वाड्यावर जायला लागली. शांताभाऊंचे रुपये सव्याज फेडून बागव्यानेगहाणखताची प्रॉमिसरी नोट परत घेतली. बैरागी बखळ सोडून बाहेर पडला. आपल्यादोन पेट्यांना भक्कम कुलूपे लावून त्याने त्या धर्मशाळेत हलवल्या.
कसे कोण जाणे पण बागव्याला वाड्याचा चौथरा खणतानाअमाप गुप्तधन मिळाल्याची वार्ता षट्कर्णी झाली. त्याला बैराग्यानेच ते शोधून दिले याविषयीशंकाच नव्हती. बागव्याच्या भाग्योदयाचे इंगित कळल्यावर पुर्षाचा जीव मात्र चुरचुरला.त्यानेही मनाशी काही बेत पक्का केला. घरामागल्या मोकळ्या पडवीची भिंत बांधून घेतलीआणि बैराग्याला तिथे राहण्याची त्याने गळ घातली. तोही लगेच तयार झाला. त्याने पुर्षाच्यापडवीत सामान हलविले. एक-दोन दिवसांनी मिळकतीतले थोडे तांदूळ, एक नारळ त्याने माईलादिला. त्याचे जानवे, देवदेवतार्जन आणि पुर्षाला त्याच्या भविष्याची आलेली प्रचिती...माईने त्या दिवसापासून त्याचे पान वाढून द्यायला सुरुवात केली. आता पुर्षाच्या घरीमाणसांची वर्दळ वाढली. पुर्षा तर पेढीवरुन आला की, कायम बैराग्यासमोरच तळ ठोकून रहायचा.रात्र-रात्र त्यांच्या गोष्टी चालायच्या. गोष्टींच्या ओघातच एकदा बैराग्याने जानू बागव्याचेबिंग फोडले.
बैरागी जानूच्या घरामागे बखळीत रहायला लागला त्यानंतरची अवस... उजाडत्या अवसेला पहाटे दुसरा कोंबडा आरवला नी बखळी मागच्या फणसावरुनपिंगळ्याची भाक झाली. घुघुर्र ऽऽ घुम्म्ऽऽघुघुर्र ऽऽ पिंगळ्याची भाक कानावर पडली अन्बैरागी ताडकन उठला नी दरवाजा जवळ उभा राहून वेध घ्यायला लागला. अर्ध्या घटकेतच त्यानेदुसरी भाक दिली घुघुर्रऽऽऽ घुम्म.... घुम्म् ऽऽ घुम्म्. त्याक्षणी वैरागी दार उघडूनबाहेर पडला. शांत वातावरणात दाराचा कर्रर्र ऽऽ कुर्रर्र ऽऽ आवाज झाला तसा पिंगळा पंखफडकावित फणसावरुन उडाला. संधी प्रकाशात बैराग्याने तो अचूक टेहेळला. आता तर शंकाच मिटली.एखाद्या ठिकाणी गुप्तधन असले तर त्या ठिकाणच्या दक्षिणेकडे बसून मार्गशीर्षातल्या अमावस्येलापिंगळा भाकणूक करतो. त्याची भाकणूक, त्याचे संकेत माणसाला अगम्य असतात तरीही आपण बसलेलेठिकाण कोणाला कळू नये ही सावधगिरी पिंगळा घेतो. म्हणूनच दाराचा आवाज ऐकून तो उडाला.नाहीतर त्याच ठिकाणाहून तो तिसऱ्यांचा भाक देतो.
उजाडल्यानंतर बैराग्याने नेमक्या खाणाखुणा शोधल्या.बखळी समोरच्या वाड्याच्या कोसळलेल्या पडवीच्या भिंतीच्या मुळाशी शिवलिंगाच्या शाळुंखेसारख्याआकाराचे मुख असलेले जिवंत वारुळ दिसले. वारुळापासून पूर्व आणि ईशान्य यांच्यामध्येअकरा हात अंतरावर गुप्तधन मिळणार हे त्याने ओळखले. रमल बघितल्यावर ते धन जानूच्या पूर्वजानेठेवलेले असल्याचेही समजले. त्याची प्राप्ती जानूला होण्यात काही अडचण नव्हती. गुप्तधनाचीराखण करणारा भुजंग त्रयस्थ व्यक्तीला त्या धनाला हात लावू देत नाही. जानूच्या बाबतीतराखणदाराचा प्रश्न उद्भवणार नव्हता. पूर्ण शहानिशा झाल्यावर त्याने जानूला घोळात घ्यायचीसुरुवात केली. जानूचे भाग्य फळफळणार त्याचबरोबर आपला हेतू साध्य करण्याची आशा त्याच्यामनात मूळ धरु लागली.
अलीकडे मंत्र-तंत्र रमल हे मार्ग सोडून लग्नकार्यकरुन संसार थाटावा असे त्याला वाटायचे. हे भणंगाचे जिणे त्याला जड झालेले. पण संसारथाटायचा म्हणजे घरदार बांधायला हवे. कायम चरितार्थ चालेल एवढी पुंजी जमवायला हवी. धनप्राप्तीचेअनंत मार्ग त्याला माहिती होते पण त्याला स्वतःसाठी ते वापरता येण्याजोगे नव्हते. तसेमुळी त्याच्या गुरुंनीच बंधन घातलेले... पण स्वेच्छेने कुणी दिले तर मात्र स्विकारण्याचीमुभा होती. अर्थात थेट तशी पृच्छा सौदेबाजी सुद्धा त्याला करुन चालणार नव्हते. म्हणूनबैरागी मोठ्या अडचणीत सापडला. खूप विचार करुन तो जानूला खेळवायला लागला. गुप्तधन मिळणारम्हणताना जानू हरखला... अन्नान्न दशा असलेला जानू... "धनाचा ठिकाणा सांगा. तोशोधण्यासाठी वाटेल तेवढा खर्च आपण करु" असे तो म्हणायचा... बैराग्यापुढे लोटांगणेघालायचा पण धन मिळाले तर अमूक देईन असे त्याच्या तोंडून येईना त्यामुळे बैराग्याचीसुद्धा पंचाईत झाली.
पाच-सहा दिवस या घोळाष्टकात गेले अन् अचानक जानूलाकशी काय उपरती झाली कोण जाणे! बैराग्याचे पाय धरुन तो म्हणाला, "मला जे काय मिळेलत्यातील निम्मी वाटणी मी तुमच्या पायावर अर्पण करीन. आता माझा अंत बघू नका. माझ्यावाडवडिलांची आण घेऊन मी वचन देतो... मी दिला शब्द खरा करीन." हे ऐकल्यावर बैराग्याचेसमाधान झाले. धनाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी त्याने चार दिवसांची मुदत घेतली. हुरळलेल्याजानूला पुरते लोंबवल्यावर त्याने गुह्य उघड केले. धन किती आहे, त्याचे नेमके ठिकाण...हा तलास लावण्यासाठी आपल्याला किती त्रास झाला सगळे रंगवून रंगवून सांगितले. सारे ऐकूनघेतल्यावर जानूने पुन्हा एकदा गळ्याची चामडी चिमटीत धरुन प्राप्तीतला निम्मा वाटा देण्याचेवचन दिले. बैरागी निर्धास्त झाला. गुप्त धनाची नेमकी जागा, ते कसे हस्तगत करायचे ह्याचाबेत दोघांनी ठरवला. जानू तयारीला लागला. चौथरा मोकळा करुन झाल्यावर बैराग्याने सांगितल्याजागी खणती घेतली. बैराग्याची वाचा खरी झाली. अमाप संपत्ती ताब्यात मिळाल्यावर मात्रजानूची नियती फिरली. परागंदा झालेला जानू अवतीर्ण झाल्यावर सगळ्या माणसांना घेऊन तोबैराग्याच्या पाया पडला. "तुमच्या आशीर्वादाने माझे भाग्य उजळले," असे म्हणून अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे वळे त्याने बैराग्याच्या पायाशी ठेवले.
"पुरुषोत्तमा... लक्ष्मीचा मोह हा असा आहे.तिच्या दर्शनाने मी-मी म्हणणाऱ्यांचीही नियत बदलायला वेळ लागत नाही." बैराग्यानेदीर्घ उसासा सोडला. सत्याचे विदारक दर्शन बैराग्याला झाले होते. अर्थात चरफडण्यापलिकडेतो काही करु शकत नव्हता. त्याचे हात बांधलेले होते ना... त्याच्या अलौकिक सिद्धी जानूच्याहिकमती मतलबापुढे थिट्या पडल्या! सगळे ऐकून पुर्षा अवाक् झाला. हा बैरागी म्हणजे धनप्राप्तीचेअमोघ भांडारच आहे की... शांताभाऊंकडे मगजमारी करीत पै-पैसा जोडीत राहण्यापेक्षा याबैराग्याला वश करुन जन्माची ददात मिटेल असे डबोले आपण मिळवायला हवे हा विचार त्याच्यामनात चमकून गेला. आता खाणे-जेवणे, काम-धंदा यात त्याचे चित्तच रमेना. त्याची हुन्नरक्षीण झाली. आपण मारे जिवाचा आटापिटा करुन सगळा तेगार सांभाळायचा पण लोण्याचा गोळामात्र शांताभाऊ मटकावणार... रक्ताचे पाणी मी करणार नी पुंजी शांताभाऊंची वाढणार...हे नि असले विचार त्याचे काळीज जाळू लागले.
कितीही उदार झाला तरी शांताभाऊ म्हणजे पक्का व्यापारी!स्नेहसंबंधसुद्धा ताजव्यात टाकून तोलून मापून जोखणारी; कवडी कवडी जोडणारी महाचिक्कटअवलाद... बरीच मुदत तंगलेली, जवळ जवळ बुडित म्हणून तुळशीपत्र सोडलेली त्यांची कितीयेणी मी खेटे घाल-घालून, अक्कल हुशारीने वसूल करुन आणली! पण शांताभाऊला काही असे म्हणवले नाही की, बाबा रे, तू होतास म्हणून हे येणेवसूल झाले. म्हणून त्यातले निम्मे... ते ही राहो पण अशा कामप्रीत्यर्थ चवली पावलीसुद्धाबक्षिसी म्हणून देणे ते कटाक्षाने टाळायचे. म्हातारी गेल्याचे दुःख नाही... काळ सोकावताकामा नये असे त्यांचे तत्त्व! हळू हळू माणसाच्या अपेक्षा वाढत जातात. मग त्याची बुद्धीफिरते. बक्षिसी हा जणू आपला हक्कच वाटतो चाकराला... अशा माणसाची नियत कधी कशी फिरेलयाचा भरवसा देता येत नाही. म्हणून चकाच्या बाहेर तांबडा पैसा कधी कुणाच्या हाताला नलावणे बरे !!
त्यांची ही रोकडी व्यापारी नीती हळूहळू पुर्षालाउलगडायला लागली अन् त्याला मनस्वी घृणा वाटू लागली. देवीचे वर्षासन त्यांनी पुर्षालादिले खरे पण त्याबरोबर नवरात्र उत्सवाचा खर्चही त्याच्या अंगावरच टाकलेला होता. वर्षासनाचेएक चतुर्थांश उत्पन्न त्या खर्चालाच लागायचे... म्हणजे खाते पोते बरोबर. अंग मेहनतसुटायची इतकेच. हे विचार मूळ धरु लागले आणि पुर्षाची पहिली हुन्नर कणाकणाने कमी व्हायलालागली. त्याच्यातला हा बदल शांताभाऊंनी हेरला नसता तरच नवल! त्याचे हे औदासिन्य प्रौढपणाच्याउंबरठ्यावर पाय ठेवताना वयपरत्वे येणारे असावे... लग्नकार्य झाले की गाडे रांगेला लागेलअसा विचार शांताभाऊंनी केला. त्यादृष्टीने स्नेहीसोबत्यांकडे त्यांची विचारणा सुरुझाली. पुर्षा मात्र अंतर्यामी पेटून उठला. आपली अलिप्तता लक्षात येऊनही शांताभाऊ दुर्लक्षकरतात त्याअर्थी त्यांच्या लेखी आपण कवडीमोल आहोत, असा ग्रह त्याने करुन घेतला.
बैराग्याच्या मागे पुर्षाने धोशाच लावला. त्याच्याकृपेने गुप्तधन मिळावे यासाठी काळीज गहाण टाकायचीही आपली तयारी आहे. प्राप्तीतला बाराआणे हिस्सा बैराग्याच्या पायाशी अर्पण करु असे तो काकुळतीला येऊन सांगायचा. पण बैरागी मात्र गम लागू देईना. जानुच्या अनुभवावरुन त्याला चांगलीअद्दल घडलेली. पुर्षाच्या बाबतीत तो दक्षता घेणार होता. तसा काही उपाय सुचेपर्यंत पुर्षानेकितीही आणाभाका घेतल्या तरी तो बधणार नव्हता. तसा एक जालीम उपाय त्याच्याकडे होतासुद्धा...!रक्ताचे वचन घेतले असते तर पुर्षा फिरुन पडायला धजावला नसता. पण तसे त्याला सुचवायचेम्हणजे मोबदल्याची अपेक्षा केल्यासारखे होणार अन् गुरुचे वचन मोडणार... म्हणजे त्याचीविद्या फळाला येणार नाही! हा तिढा कसा सोडवायचा? यावर विचार करण्यात बैराग्याने कैकरात्री वाया घालवल्या. आपले चातुर्य-हुशारी पुरती पणाला लावली. पुर्षा आपण होऊन कचाट्यातसापडेल असा जमालगोटा पर्याय खूप विचाराअंती बैराग्याला सुचला.
नेहमीप्रमाणे रात्री जेवण झाल्यावर पुर्षा बैराग्याशीगोष्टी मारायला बसला. गुप्तधन मिळवून देण्यासाठी काही उपाय, तोडगा सुचविण्याची त्यानेबैराग्याला विनंती केली. तसेच धन मिळाल्यावर प्राप्तीतला बारा आणे हिस्सा बैराग्यालाद्यायची देवाच्या साक्षीने शपथ घ्यायची तयारी दर्शविली. सावरुन बसत बैरागी म्हणाला,“पुरुषोत्तमा मी तुला एक बोधकथा सांगणार आहे. त्यातला शब्दन् शब्द लक्षपूर्वक ऐक; नीटविचार कर आणि काय तो बोध घे. तुझ्या एकाही शंकेचे उत्तर मी सांगणार नाही. तसेच इतःपरगुप्तधन प्राप्तीच्या संदर्भात तुझ्याशी शब्दानेही चर्चा करणार नाही. गोष्ट नीट ऐकलीसतर खरे मर्म तुझ्या ध्यानात येईल. त्याप्रमाणे वागलास तर तुझे दैन्य संपले म्हणून समज.”अन् बैराग्याचे कथन सुरु झाले.
“एका गावात दोन मित्र रहात होते. शिक्षण बेताचे अन्परिस्थिती हलाखीची. चरितार्थासाठी दोघांनी मिळून काही व्यवसाय सुरु करावा असे त्यांनीठरविले. पण कोणता व्यवसाय करायचा हे ठरेना. मग सल्ला घेण्यासाठी ते एका गोसाव्याकडेगेले. गोसाव्याने दोघांच्याही हस्तरेषा निरखून बघितल्या. थोडा वेळ विचार केल्यावर तोम्हणाला, “तुमच्यापैकी एकाकडे भाग्य आहे अन् दुसऱ्याकडे बुद्धी आहे. कोणताही व्यवसाययशस्वी होण्यासाठी हे दोनही गुण एकसमयावच्छेदे करुन असावे लागतात. तुम्ही एकमताने राहिलेत,एकदिलाने काम केलेत तर माती विकूनसुद्धा गडगंज इस्टेट मिळवाल. मात्र तुमचे यश हे दोघांच्याहीगुणांचे संमिश्र फलित आहे याचा विसर पडू देऊ नका. दोघांपैकी कुणा एकाची बुद्धी फिरलीतर मात्र तुम्ही खड्ड्यात जाल.” असे होऊ नये यासाठी काही उपाय सुचविण्याची विनंती दोन्हीमित्रांनी गोसाव्याला केली. त्यावर गोसावी म्हणाला, "आहे... तसा जालीम उपाय आहे.अमावस्येच्या रात्री स्मशानात जायचे. चिता रचण्याच्या स्थानाजवळ दक्षिणेला त्रिकोणाकृतीकाढायची. आपल्या तर्जनीला छेद देऊन रक्ताचे तीन थेंब त्या त्रिकोणाकृतीवर पाडून वचनद्यायचे. आपण जिवंत असेपर्यंत वचन भंग करणार नाही. वचन भंग झालाच तर आपल्या शरीरातीलरक्ताच्या थेंबाथेंबावर वेताळाची सत्ता राहील."
"तुम्ही दोघांनीही असे रक्ताचे वचन द्या अन्मगच भागीदारीत कोणताही व्यवसाय सुरु करा. लक्ष्मी तुमच्या पायाशी लोळण घेईल."गोसाव्याचे बोलणे ऐकल्यावर बुद्धिवान मित्र म्हणाला, "गोसावीबाबा, तुम्ही सांगितलेततसे वचन एकट्या भाग्यवान मित्राने दिले तरी पुरेसे आहे. कारण व्यवसायाचे यश भाग्यावरचअवलंबून असते." त्यावर हसून गोसावी म्हणाला, "तू इथेच बोललासते बरे झाले. बिचाऱ्या भाग्यवंताची फसवणूक होणार नाही. खरेतर रक्ताचे वचन बुद्धिवंतानेम्हणजे तूच द्यायला हवे. कारण भाग्य बुद्धीच्या बळावरच उघडते अन् भाग्य काही कधी फिरत नाही... फिरते ती बुद्धी... म्हणजे फसवणूकहोण्याची शक्यता तुझ्याकडूनच आहे. तेव्हा तूच रक्ताचे वचन घे...तेवढे पुरेसे आहे."गोसाव्याने सांगितल्याप्रमाणे वचनबद्ध होऊन त्या मित्रांनी धंदा सुरु केला आणि अमापसंपत्ती मिळविली.
बैराग्याची गोष्ट ऐकल्यावर त्यातले मर्म पुर्षालाअचूक उमगले. जानूने मतलब साधल्यावर बैराग्याच्या हातावर वाटाण्याच्या अक्षता ठेवल्या...तसेआपल्या बाबतीतही होईल अशी शंका बैराग्याला वाटत आहे...अन् म्हणूनच द्रव्यप्राप्तीचातोडगा तो आपल्याला सांगत नाही हे पुर्षाला पुरते उमगले. त्याच्या पायावर डोके ठेऊनपुर्षा म्हणाला, "तुमच्या कृपेने मला धन मिळाले तर त्यातला पाऊण हिस्सा मी तुम्हालादेईन असे रक्ताचे वचन द्यायला मी तयार आहे. येत्या अमावस्येलाच मी तसे वचन देईन. मलाया दारिद्र्यातून बाहेर पडायचे आहे. आपला मतलब साधल्यावर जानूने तुम्हाला फसवले, तसेकृत्य माझ्याच्याने होणार नाही. माझी बुद्धी अशी नतद्रष्ट नाही. स्वार्थासाठी मी उपकारकर्त्याविरुद्ध फिरुन पडायचो नाही. मी रक्ताचे वचन दिल्यावर तरी तुमची खात्री पटेल ना?” बैरागीशांतपणे म्हणाला, "ते बघू अमावस्येच्या दिवशी...”
अमावस्या उजाडली. संध्याकाळी लोकांची वर्दळ कमी झाल्यावरपुर्षा बैराग्यासोबत स्मशानात गेला. सरणाच्या जागेपाशी दक्षिणेला त्रिकोणाकृती काढूनपुर्षाने तर्जनीचा छेद घेऊन रक्ताचे तीन थेंब त्रिकोणात गळवले. त्याचक्षणी घुबडांचाभीषण घुघुत्कार ऐकू आला. पिशाच्च शक्ती जागृत झाल्याची ती खूण बैराग्याने ओळखली. पुर्षाकाय वचन घेतो हे ऐकण्यासाठी त्याचे प्राण कानांत एकटवले. घुबडांचे आवाज ऐकल्यावर पुर्षाचरकला. मनावर ताबा ठेऊन त्याने वचन उच्चारायला सुरुवात केली. “मला गुप्तधन प्राप्तीचामार्ग जो कुणी सांगेल त्या माझ्या उपकारकर्त्याला मिळालेल्या धनातला...” मोक्याच्या क्षणी पुर्षा किंचितकाळ थांबला. ऐनवेळी त्याच्याबुद्धीने पलटी खाल्ली. कल्पनेत सुद्धा पाऊण हिस्सा सोडायचे जीवावर येऊन तो म्हणाला,“मिळालेल्या धनातला निम्मे हिस्सा मी स्वेच्छेने देईन. हे माझे रक्ताचे वचन आहे. माझ्याकडूनवचनभंग झाला तर माझ्या शरीरातल्या रक्ताच्या थेंबाथेंबावर वेताळाची सत्ताराहील.”
पुर्षाने ऐन वेळी पाऊण हिश्श्याऐवजी अर्धा हे शब्दउच्चारतात बैराग्याने आपला अधरोष्ट एवढ्या जोरात चावला की त्याचे पुढचे दोन दात ओठातघुसून रक्त फुटले. “आपण एवढी खबरदारी घेतली म्हणून ठीक अन्यथा हा पुर्षा सुद्धा जानूसारखाउलटला असता. ठीक आहे... अर्धा तर अर्धा हिस्सा.” बैरागी निश्चिंत झाला. दोघेही काहीन बोलता परतीच्या वाटेला लागले. बऱ्याच वेळाने पुर्षा म्हणाला, "घुबडांचे आवाजऐकून मी एवढा चरकलो की मला कायच सुधरेना...अनवधानाने पाऊण ऐवजी निम्मे हिस्सा असे शब्दमाझ्या तोंडून गेले." बैराग्याने पुर्षाच्या नजरेला नजर भिडवताच पुर्षा थबकूनखाली बघायला लागला. "काही हरकत नाही." बैरागी बोलला. "जे माझ्या प्राक्तनातआहे तेवढेच पुरे म्हणायचे. तू रक्ताचे वचन दिले आहेस, एवढे मात्र पक्के ध्यानात ठेवआणि तेवढे निभावून ने म्हणजे झाले... त्यात काही बदल झाला तर किती भीषण परिणाम होतीलयाची तुला कल्पनासुद्धा करता येणार नाही..."
त्याच रात्री धन मिळवायचा उपाय बैराग्याने पुर्षालाकथन केला. मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी, उजाडल्या प्रहरी पिंगळा भाक देतो. तो भाकदेईल त्याच्या दक्षिणेकडे शोध घ्यायचा. मुंग्याचे जिवंत वारुळ असलेल्या ठिकाणी खणायचे.खणती सुरु झाल्यावर त्या धनाचा राखणदार सर्प येईल. त्याला मंत्राने बंधन घालायचे अन्मग धन ताब्यात घ्यायचे. या कामात बैरागी काही मदत करायला समर्थ नव्हता. सर्प बंधनाचामंत्र पुर्षानेच शिकायला हवा होता अन् धन मिळेपर्यंत पाळणूक करुन तो टिकवायला हवा होता.तसेच पिंगळ्याची भाक नेमकी कुठे होईल त्याचेही ज्ञान रमल बघून होणार नव्हते. त्यासाठीअमावास्येपूर्वी तीन-चार दिवस पिंगळ्याची बसल शोधून काढायला हवी होती. तो ढोलीतून बाहेरपडून कोणत्या दिशेला उडत गेला, कुठे बसून त्याने भाक दिली हे नेमके माहिती करुन घ्यायचेम्हणजे सोपे नव्हते.
"गुप्त धन मिळवायचे मार्ग असे दुस्तर आहेत.अर्थात मी या क्षेत्रातला पूर्ण ज्ञानी असल्यामुळे तुला कष्ट करुन का होईना... यशाचीखात्री आहे. मार्गशीर्ष अमावास्येला अद्याप दहा महिने अवधी आहे. तोपर्यंत काही प्रभावीउपाय मी शोधून काढीन." बैरागी पुर्षाला धीर देत म्हणाला. पुर्षा निर्धास्त झाला.दोन महिन्यानंतर आलेल्या ग्रहणाच्या दिवशी बैराग्याने पुर्षाला सर्पबंधन मंत्र शिकविला.पुर्षाने मंत्र सिद्ध केला. मंत्राची पाळणूक तो कसोशीने करु लागला. जेवणाच्या वेळीकाही निर्बंध पाळणे फार गरजेचे होते. म्हणून मंत्र घेतल्याची गोष्ट त्याच्या आईच्याकानावर घालावी लागली. माई डाफरत म्हणाली, "आपल्याला काय करायचे आहेत मंत्र नीफंत्र... आपले काम बरे आपण बरे... असल्या नष्टचर्याच्या मागे शहाण्या माणसाने लागूनये. झाले हे ठीक पण यापुढे आणखी कसल्या अघोचरी गोष्टींच्या मागे लागू नकोस."
मार्गशीर्ष अमावस्या आठ दिवसांवर आली. बैराग्यानेपिंगळ्याची बसल शोधून काढली होती. गढीजवळ सोनारांच्या घरामागे हाकेच्या अंतरावर गच्चराई होती. त्या राईत एका जुनाट आंब्याच्या झाडावर फांदीत खूप ढोली होत्या. त्यातल्याएका ढोलीत पिंगळा शिरताना बैराग्याने बघितला. पुर्षाला त्याने ती ढोल दाखविली. अमावस्येच्याआदल्या रात्री झाडावर चढून पिंगळ्याला ढोलीत बसलेला असताना पकडायचे. त्याला वाटाण्याएवढीअफूची गोळी घालायची अन् अफू चढल्यावर पुन्हा ढोलीत टाकून यायचे. उजाडताना पिंगळ्यालाजाग येईल. अफूचा अंमल चढल्यामुळे माणसाचा पायरव त्याला कळणार नाही. त्यामुळे त्याच्यापाठलगावर जाणे सोईचे ठरेल. आपल्या मागावर माणसे आहेत हे कळले तर कदाचित पिंगळ्यानेभाकच घातली नसती म्हणून बैराग्याने हा खबरदारीचा उपाय पुर्षाला सांगितला.
अवसेच्या आदल्या रात्री पुर्षा नी बैरागी पिंगळ्याच्याढोलीपासून जवळच दबा धरुन बसले. सूर्यास्ताच्या वेळी फडफड आवाज करीत पिंगळा ढोली जवळउतरला. थोडा वेळ गेल्यावर पुर्षा पुढे झाला. कसब पणाला लावून तो आंब्यावर चढला आणिपिंगळ्याची ढोल गाठून चौपदरी फडका गुंडाळून ढोलीत हात घातला. पिंगळ्याला ढोलीबाहेरकाढून अफूची गोळी त्याच्या चोचीत घालून चोच मिटून धरली. थोड्याच वेळात अफूचा अंमल चढूनपिंगळ्याची फडफड बंद झाल्यावर त्याला ढोलीत टाकून पुर्षा खाली उतरला. दोघेही घरी आले.रात्री कोणालाच झोप लागली नाही. पहिला कोंबडा आरवला त्यासरशी पुर्षा नी बैरागी दोघेहीसोनाराच्या घराच्या दिशेने निघाले. राईत शिरुन आंब्यापासून जवळच्याच झाडाखाली दोघेहीदबा धरुन बसले. दुसरा कोंबडा झाला अन् थोड्याच वेळात फडफडाट करीत पिंगळा ढोलीबाहेरआला. पंख झटकीत मान वेळावून चहू दिशांनी वेध घेतल्यावर पिंगळ्याने झेप घेतली. अफूच्याअंमलामुळे त्याला सफाईदार झेपावणे जमत नव्हते. कासराभर अंतर गेल्यावर विसाव्यासाठीटेकत टेकत गढीतल्या हत्ती टाक्याजवळ चाफ्याच्या झाडावर बसून त्याने पहिली भाक दिली.त्याच्या मागावर गेलेला पुर्षा जागच्या जागी थबकला. त्याला हाताला धरुन खाली बसण्याचीखूण बैराग्याने केली. बैरागी चाफ्यावर बसून भाक देणाऱ्या पिंगळ्याकडे एकटक बघत राहिला.
थोड्या वेळाने पंख फडफडावित पिंगळा उडाला. चाफ्याच्याझाडा भोवती रिंगण मारुन पुन्हा मूळ जागी बसल्यावर त्याने दुसरी भाक दिली. पुर्षाचाखांदा दाबीत बैरागी म्हणाला, "काम फत्ते झाले. चाफ्याच्या दक्षिणेला पंचवीस वावअंतरावर जिवंत मुंग्यांचे वारुळ असेल त्या ठिकाणी गुप्त धन असणार." बैराग्याचेबोलणे संपत असता तिसरी भाक देऊन पिंगळा उडाला आणि गोल गोल रिंगण घालीत चाफ्यापासूनकाही अंतरावर जमिनीवर उतरला. बैरागी नी पुर्षा त्या दिशेने निघाले. चाफ्याच्या डाव्याअंगाला पंख फडकवीत जमिनीवर लोळणाऱ्या पिंगळ्याच्या दिशेने ते जात असताना क्षीण आवाजातभाक देऊन पिंगळा चोच वासून निचेष्ट झाला. पुर्षाने धावतच पुढे जात पंख धरुन पाखरु वरउचलले... जमिनीवर मुंग्यांचे जिवंत वारुळ त्याला दिसले. पुर्षाच्या मागून आलेला बैरागीघोगऱ्या आवाजात म्हणाला, "पुरुषोत्तमा.... तुझ्या सारखाभाग्यवान तूच. बहात्तर शांताभाऊ कनवटीला लावता येतील एवढा अमाप द्रव्याचा साठा या क्षणीतुझ्या पायाशी आहे. या मसलतील बापड्या पाखराला मात्र जीव गमवावा लागला. अफूच्या नशेतसंकेत भंग केल्याचे प्रायश्चित्त त्याला भोगावे लागले."
दोघे घरी पोहोचले तेव्हा माई त्यांची वाटच बघित होती.पुर्षा मान खाली घालून आत गेला. अमावस्येला पेढी बंद असायची. पुर्षाला कडकडून भूक लागलेली."माईऽ मी अंग धुवून देवीची पूजा करुन येतो तोवर चांगला चुपचुपीत शिरा कर गोडाचा." देवीची पूजा करुन आल्यावर सोवळ्याचा पिळा मांडवीवर टाकून धोतरपालटीपर्यंत गरम शिऱ्याची ताटली माईने त्याच्या पुढ्यात ठेवली. शिरा खाउन झाल्यावर खळखळून चूळ भरुन हात टिपीत खुंटीवरचा सदरा-टोपीघेत पुर्षा म्हणाला, "माई मी जरा बंदरावर फिरुन येतो." सदरा घालून तो जायलावळणार एवढ्यात लगालगा बाहेर येत माई म्हणाली, "थांब! जरा टेक इथेच. मला काही विचारायचेआहे. तुझे त्या बैराग्याच्या नादी लागून कसले उपद्व्याप चालले आहेत ते स्पष्ट सांग.तुमचे बोलणे काय चालते ते मी आईकलेले आहे... माझ्याशी लपवालपवी, छक्केपंजे करशील तरयाद राख, माझ्या रक्ताची शप्पथ आहे तुला..."
पुर्षा वरमला. त्याचा बेत पार पडला होता. कधीतरीतिला कळणारच होते असा विचार करुन अति पाल्हाळ न लावता त्याने मुद्याची गोष्ट, गुप्ततपशील तेवढा वगळून सांगून टाकली. त्यावर सुस्कारा सोडून माई म्हणाली, "तू आताजाणता बापया झालास...... काय करावे, करु नये तुला सांगणेसुद्धा चुकीचे. सांगितलेच तरीतू कितपत जुमानशील, ते श्रीहरी जाणे..... ऱ्हाववत नाही म्हणूनबोलायचे एवढेच. मी अशी आडव्या सुडक्याची बाई माणूस. तू पोटात असतानाच बापूस मेला तुझा!बाळंत झाल्यावर महिन्याच्या आतच चार भांडी नी दोन मण भात ठेऊन मला वेगळी टाकलेनी...घरात पिडा नको माझी म्हणून परोस हे दोन खण मला दिलेनी. चार घरचे कामधंदे करुन तुलाएवढा मोठा केला... माझे तरुण वय. पैसाच मिळवायचा असता तर छिनालपणा करुन मिळवला असताकी बक्कळ. गाव आहे तिथे सोद्यांचा काय तुटवडा...?"
"पण मला अब्रू मोलाची वाटली. पोटाला चिमटा घेऊनउपास काढले मी पण कुण्णा कुण्णाचे आभार नाही घेतले. स्वाभिमान शून्य जिणे .. जळो जिणेलाजिरवाणे हे ब्रीद जपले मी कुणाचे फुकट खायचे म्हणजे त्याच्या नर्कात लोळण्यासारखेहिडीस वाटते मला. तू तर असला निच्चड! धड शाळा पुरी केली नाहीस की त्या बाळंभटाकडूनवेद विद्याही नाही घेता आली तुला... पण माझी काळजी देवाला... गोडश्यांकडे जल्माचा शेरतुला मिळवून दिलान् त्या ईश्वराने... गोडशीण तर भाऊ मानत्ये तुला... तुझे काम, तुझीहुन्नर बघून वर्षभरात दहाचा पंधरा रुपये पगार केलेनी शांताभाऊंनी... देवीचा उत्सव खरेतरवर्षासनातून करायचा अशी बोली होती पण कसलीही वाच्यता न करता उत्सवाला पुरेल इतका शिधा-जिन्नसगोडशीण देत्ये. तुला म्हायती नसेल, पण शाळेतल्या मास्तराला फंड कापून महिन्याला अकरारुपये सहा आणे पगार मिळतो. तुझी सगळी मिळकत साठवून ठेवली ती काल मोजली मी... साडेपाचशेततीन रुपये कमी भरले."
"गावात एवढे तालेवार आहेत. चार जणांकडे जा नीप्रचिती बघ हवी तर... चार-पाच घरे सोडली तर एक तरी हरीचा लाल पन्नास रुपये तरी रोखमोजून दाखवतो का बघ जरा! पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. किती मिळाले म्हणजे माणूस समाधानीहोईल? याला उत्तर नाही. कष्ट करुन मिळते तेच खाऊन सरेना तुला. असे असताना कोणाच्याहपापाचे गुप्तधन मिळवून श्रीमंत व्हायचे नष्टचर्य तुला सुचावे हा म्हणजे कहरच आहे कहर!फुकटच्या पैशाला यश नसते आणि संपत्तीच्या जोरावर सुख मिळत नसते. फुकटची संपत्ती मिळाल्यावरतो जानु बागवा दिवसभर दारवेच्या नशेत तर्रर्र होऊन नायकिणी नाचवतो, हे... हेच सुख असेवाटत असेल तुला, तर खुशाल जा वाटेल त्या मार्गाला. जलमण्या आधीच माझा पोर उलथला म्हणेनमी...ही काय तुझ्या बापजाद्याची इस्टेट नव्हे की तुझे भाग्य तुझ्या खाटल्यावर सोन्याच्यामोहरा हगले असेही नव्हे. अवचिन्ह मार्गाने जाऊन मिळविलेली नष्ट संपत्ती... ती काहीलक्ष्मी नव्हे... पिशागत आहे... ती खा नी निस्तर मग हयात भर..."
"तुझ्या पापात मी वाटेकरी व्हायची नाही. हलकटमार्गाने मिळवलेली संपत्ती तू घरात आणशील त्या दिवसापासून मी पुन्हा बाईपण करुन कष्टाच्याकमाईवर मिळेल ते खाईन. इतःपर तुझा मार्ग तुला मोकळा आहे. कपाळ पुसकी असले तरी मी सुद्धापतिव्रता आहे. कोणाचे वाईट चिंतिले नाही की पापाचरण केले नाही. तू माझ्या उदरात माझ्यारक्तावर पोसलास... पिशागती मार्गाला जायचे हा तुझा पिंड नाही की पापाचे अन्न आजवर तुझ्यापोटात गेलेले नाही. त्या परमेश्वराला लाज असली तर तोच वाचवील तुला! मोहाला बळी पडूनबुद्धी फिरलीय तुझी... तुझे विचार बदलले आहेत...तू ताळ्यावर यावास हीच इच्छा करीन मी.तरुण वयामुळे तुझे चित्त थाऱ्यावर नाही, कामधंद्यात तुझे लक्ष नाही असे शांताभाऊंनाहीवाटले. म्हणून तुझ्या लग्नाच्या खटपटीत आहेत ते... पण तुझे नशीब बदलणे त्यांच्या हाती थोडेच आहे? जा... झाले माझे बोलून...!" डोळ्यातूनटिपूसही न काढता माई आत गेली
चार दिवस उलटले. काळवे पडायच्या वेळी बैरागी नी पुर्षावारुळाजवळ खणून बघायला गेले. सगळीकडे सामसूम झालेले. आसमंतात चिटपाखरु सुद्धा नव्हते.धोतर वर खोचून कुदळ उचलित पुर्षा सज्ज झाला. दोन घावातच त्याने वारुळ खणून काढले...अकस्मात काय झाले कोण जाणे! बाळंभटाच्या ओसरीवर बसून घोकलेली त्रिसुपर्णातील ऋचा 'तस्यातते हरयः सप्ततीरे स्वधां दुहानाऽ अमृतस्य धाराम्' पुर्षाच्या कानात घुमायला लागली.शांत सोज्वळ शांताभाऊ, गोडशीण... आणि तुझी बुद्धी फिरलीय म्हणून तोंड फिरवून जाणारीमाई त्याला समोर दिसायला लागली. चोच वासून मेलेल्या पिंगळ्याची सडकी दुर्गंधी वाऱ्याच्याझोताबरोबर आली अन् पुर्षाच्या पोटात ढवळून आले. कुदळ टाकून पुर्षा म्हणाला, "मलानको ही संपत्ती... माझा हिस्सा खुशीने सोडून वचनातून मोकळा होतो आहे मी ...!"
पुर्षा असे काही करील हे बैराग्याला अपेक्षितच नव्हते.हां कदाचित सोन्याच्या मोहोरानी शिगोशीग भरलेले हंडे बघितले की कबूल केलेली अर्धी वाटणीसुद्धाद्यायचे तो नाकारील असे बैराग्याला वाटले होते...पण हे अघटितच झाले. त्याचा मार्ग आतानिर्वेध झाला. अधीर झालेला बैरागी पुढे सरसावला. कुदळ उचलून त्याने भसाभसा टेव घ्यायलासुरुवात केली. दोन हात औरस खणती झाल्यावर तिथली माती बाजूलाओढून त्याने जरा दम खाल्ला.मग पुन्हा कुदळ उचलून दोन घाव मारले तोच घळई पडल्याप्रमाणे भाग आत आरला जात मोकळे बीळदिसू लागले. फुस्स्ऽऽ फुस्स् असे फुत्कार ऐकू येताच बैरागी मागे सरकला. बिळातून काळाकुळकुळीत भुजंग बाहेर येऊन फणा पसरीत डोलू लागला. "तू येणार हे माहित होते मला..."बैरागी हसत म्हणाला आणि त्याला बंधन घालण्यासाठी मंत्र आठवू लागला... "ही क्लीं..."पण त्यापुढे एक अक्षरही बैराग्याला आठवेना... डोक्याला ताण देऊन त्याने शिकस्त केलीपण सर्पबंध मंत्र आठवेल तर हराम! आता मात्र सगळा परिसर गोल गोल फिरु लागल्याचा भासबैराग्याला झाला. फणा उभारलेल्या भुजंगाने "हिस्सऽऽ हिस्स" असे काळजाचा थरकापउडविणारे फुत्कार टाकले. त्यासरशी कुदळ उगारुन चार पावले मागे येत बैराग्याने तोंडफिरवले अन् हताश होऊन तो परतीच्या मार्गाला लागला.