खरंच स्रिया स्वतंत्र्य झाल्यात का?
*आज आपल्याला स्री स्वतंत्र्य दिसते. तसेच काही पुरुषही स्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करतांना दिसतात. त्याचं कारण आहे, स्रियांचा विकास. आज स्रिया हिरीरीनं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामे करतांना दिसतात. त्यातच काही स्रिया चंद्रावर गेल्या तर काही स्रिया देशाच्या पंतप्रधान व राष्ट्रपतीही. काही स्रिया अधिकारीही बनल्यात. परंतु ह्या मुठभरच स्रिया आहेत की ज्या एवढ्या समोर गेल्यात. आजही अशा बऱ्याच स्रिया आहेत की ज्यांना येथील पुरुषसत्ताक समाजानं धर्म, प्रथा, परंपरा, अंगात येणे, अंधश्रद्धा, रुढी यांच्या साखळीनं बांधून ठेवलेलं आहे. ही एक शोकांतिकाच नाही तर विचार करण्यालायक बाब आहे.*
नियम माणसानं बनवले. चांगलं सुव्यवस्थीत माणसाला जीवन जगता येईल यासाठी. ज्यातून माणसाला व्यवस्थीत जीवन जगता येत होतं. तशाच प्रथाही माणसानंच बनवल्या. कशासाठी? तर त्यातून माणसाची त्याला होणाऱ्या तीव्र वेदनांपासून सुटका करता येईल वा करुन घेता येईल. परंतु काही नियम माणसाचे असेही ठरले की जे स्वार्थासाठी बनविण्यात आले होते.
प्रथांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सतीप्रथेचं उदाहरण पाहू. सतीप्रथा समाजात अस्तित्वात होती. ती कुप्रथाच होती. कारण ज्या स्रिचा पती मरण पावत असे. त्या स्रिला समाज जाणूनबुजून तिची इच्छा नसतांनाही तिच्या पतीच्या शरणावर जबरदस्तीनं ती जीवंत असतांनाच जाळून टाकत असत. ज्यावेळेस तिचा पती शोकमग्न असायचा. तेव्हा तिला समाज काय करणार याची जाणीव नसायची. त्यावेळेस तिला त्याच्या शरणावर जाळणं हे अघोरी कृत्य नव्हतं काय? ती जात असतांना तिला त्यावेळेस कसं वाटत असेल? याची कल्पनाही आपण करु शकत नाही. साधा एखादा विस्तवाचा चटका जरी आपल्या शरीराला लागला तरी आपली अंगार होते. तशीच अंगार तिला होत होती.
सुरुवातीला सतीप्रथा बनवली. त्याचं कारण होतं आक्रमणं. प्राचीन काळात युद्ध होत असत व त्या युद्धात बहुतेक स्रियांचे पती मरण पावत असत. त्यानंतर ते जरी राज्यासाठी वा राज्य वाचविण्याचे प्रयत्न करीत असतांना मरण पावले असले तरी त्यांच्या मृत्यूनंतर समाज त्या स्रियांना चांगली वागणूक देत नव्हता. तो अशा विधवा स्रियांना सतावायचा. शिवाय जर त्या युद्धात संबंधीत जे राजे जिंकले. ते राजे वा त्या राज्यातील घटक गुलाम झालेल्या स्रियांच्या इज्जती लुटत. अशावेळेस महाभयंकर वेदना होत. त्या वेदना एक स्री दुसरीला सांगत असे व ती स्री आपआपल्या पतीला. मग सतीप्रथेचे नियम बनले की पती मृत्यूनंतर अशा वेदना वा त्रास सहन करण्याऐवजी ज्या कोणत्या स्रिला पतीच्या शरणावर सती जायचं असेल, तिनं सती जावं, अर्थात जाळून घ्यावं. याचाच अर्थ असा की आत्महत्या करावी. त्यानंतर तो नियम बनताच अशा स्रियांचे पती युद्धात मरण पावताच त्या स्रिया परराज्यांतून दास्यत्व पत्करण्याऐवजी पती शरणावर स्वतःला जाळून घेवून संभाव्य भविष्यात होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळवत. पुढे ही प्रथा पाडली व त्या प्रथेत वेगळेच नियम बनले. ते नियम होते, जर पत्नी पतीच्या शरणावर सती गेली तर ती भाग्यवान आहे. आता यात भाग्याचा आणि सती जाण्याचा काही एक संबंध नव्हता. परंतु तो संबंध जोडण्यात आला व ती प्रथा कितीतरी काळापासून कितीतरी काळापर्यंत तशीच्या तशीच सुरु ठेवली. त्या भाग्याच्या नियमात काहीच बदल केला नाही वा ती प्रथा बंद करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. जेव्हा ही प्रथा एका इंग्रज अधिकाऱ्यानं बंद करण्याचा प्रयत्न केल्या गेला. तेव्हा येथील बरेचसे लोकं असे होते की ते त्या इंग्रज अधिकाऱ्याला म्हणत होते की साहेब, आमची ती परंपरा आहे. आमच्या आड तुम्ही येवू नका.
कालची सतीप्रथा इंग्रजांनी कुप्रथा ठरवून बंद केली जोरजबरदस्तीनं. सतीप्रथा आज बंद झाली. परंतु आज अशाही काही प्रथा आहेत की ज्या प्रथेला धार्मिक रंग चढवला आहे. जसे, देवी अंगात येणे ही कुप्रथाच आहे. परंतु त्याबद्दल सार्वजनिक ठिकाणी कोणाला बोलता येत नाही. कारण धर्माचा पगडा. काही लोक फार शिकलेले आहेत. परंतु तेही अशा अंधश्रद्धा पाळतांना दिसतात. त्यांनाही वाटत असते की देवी खरोखरच अंगात येते. ते शिकलेले लोकंदेखील अडाणी असलेल्या लोकांच्या अंगात देवी वा देव आल्यास त्यांच्या भोवती राहात असतात. मग त्या अंगात येणाऱ्या माणसांच्या पाया लागणे सुरु होते. आता यात विचार करण्यालायक गोष्ट अशी की खरंच देव वा देवी अंगात येत असे काय? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. ही कल्पना जर अंगात येणारा देव आहे, असे मानल्यास समस्त कोटी त्या देवाचा संसार असतांना व त्याच देवांवर समस्त संसार अवलंबून असतांना त्या अंगात येणाऱ्या देवांना एवढा वेळ तरी कुठून मिळतो की तो त्याच माणसांच्या अंगात दहा पंधरा मिनीट असतो. तसेच ज्या स्थानावर या देव्या येतात. त्या स्थानावर येणाऱ्या देव्यांचे नावं सुद्धा त्यांना माहीत असतात. कधी कधी एकाच वेळेस दोन माणसांच्या अंगात एकच देवी येते. ती एकच देवी, तेही दोन माणसांच्या अंगात? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. परंतु या प्रश्नांवर कोणीच व्यक्ती आपल्या मेंदूवर जोर लावून विचार करीत नाहीत. त्यातच जर एखाद्यानं हळूच जावून त्या देवी असणाऱ्या माणसाला टाचणी वा पीन टोचली तर त्याला अंगारच व्हायला नको. परंतु तो हडबडून जागा होतो. मग देवी जर अंगात असते तर त्याला का बरं टाचणी वा पीन टोचल्यास वेदना व्हावी. होवूच नये वेदना. परंतु या गोष्टीवर कोणीच लक्ष केंद्रित करीत नाही आणि म्हातारे, अनुभवी, शिकलेले आणि इतर तत्सम घटक वेड्यागत अंगात येणाऱ्या देव्यांच्या माग फिरत असतात. वाटत असतं की त्या माणसांच्या अंगात खरोखरच देवी आली आहे. यावर कोणी काही बोलल्यास ती देवी बोलायच्या अगोदर आजुबाजूची माणसंच बोलत असतात. ती त्या अंगात येणाऱ्या देवीसाठी भांडण करीत असतात. जसं त्या अंगात येणाऱ्या देवीचं नाही तर तिथं गोळा असणाऱ्या भाविकांचंच नुकसान होतं. म्हणत असतात की त्या देवी अंगात येणाऱ्या झाडाची टिंगल करु नका. नाहीतर ती देवी तुम्हासह आम्हालाही शाप देईल.
महत्वाचं सांगायचं झाल्यास असं का होतं? याचं उत्तर आहे धर्माचा पगडा. आपल्या धर्माचे जे नियम आहेत. त्या नियमानं जे शिकवलं. तेच आपण मानतो व पाळतोही. मग आपण कितीही शिकलो. कायदेपंडित झालो, न्यायाधीश बनलो, तरी धर्माला मानतो आणि धर्मातील अशा अंधश्रद्धा व कुप्रथाही पाळतो. त्यावर आपण सखोल विचार करीत नाही.
विशेष म्हणजे काल अस्तित्वात आलेल्या प्रथा आज कितीही वाईट असल्या वा वाईट वाटत असल्या तरी आपण त्या पाळतोच. कालची मंगळ असल्यानं लवकर विवाह न झालेली गांधारी. ती जरी सौंदर्यवती असली तरी या समाजानं तिला मंगळ आहे म्हणून लवकर विवाहच करु दिला नाही व तिला एका आंधळ्याशी विवाह करावा लागला. मग मी या सौंदर्याचं काय करु, मला आंधळा पती मिळाला, म्हणून त्या अबलेनं जीवनभर डोळ्याला पट्टी बांधून आंधळं राहून संसार केला. विचार करा की ते संपुर्ण आयुष्य डोळ्याला पट्टी बांधून जगतांना तिला किती त्रास झाला असेल. तरीही ती गोष्ट लक्षात न घेता आजही आपण तिला मंगळ आहे. लग्नानंतर तिचा पती मरेल. ही भ्रामक कल्पना विचारात घेवून एखाद्या सौंदर्यवान मुलीचा विवाह होवू देत नाही. अन् ती मुलगी जेव्हा पळून जाते, तेव्हा दिसतं की तिला मंगळच नव्हता. कारण तिचा पती जीवंत असतो बराच काळपर्यंत. शिवाय जिला मंगळ आहे म्हणून जिचा विवाह होत नाही. ती मुलगी एखाद्यावेळेस पळून गेल्यास तेही आपल्याला खपत नाही. मग मुलींनी काय करावं. पळून जावूनही विवाह करु नये आणि मंगळ आहे म्हणूनही विवाह करु नये. अन् मंगळ जाईपर्यंत तारुण्य जावून ढळतं वय आलं की तिला चांगला संसारी पुरुष मिळू नये. तो पुरुष गांधारीच्या पतीसारखा आंधळा मिळावा. तो पती दारुड्या मिळावा. तो पती एखादा अपंग मिळावा व ती सुंदर असूनही व तिची अपेक्षा असूनही व तिला चांगला पती मिळत असतांनाही तिचा अपेक्षाभंग व्हावा. हे केवळ समाजाच्या कुविचारानं घडावं ही विचार करायला लावणारी बाब आहे. कालचं ठीक आहे की काल सर्वसामान्य लोकं शिकलेले नव्हते. परंतु आज तर लोकं शिकलेले आहेत ना. आजच्या लोकांना तर सारंच कळतं. चांगलं वाईट. कुप्रथा आणि चांगल्या प्रथा. तरीही आज समाज शिकूनही कालच्याच अडाणी लोकांसारखा वागतो. हे काही बरोबर नाही. काल अडाणी लोकांनी सतीप्रथा, मंगळप्रथाच नाही नरमेध, गंगाप्रवाह, कन्यावध, चरकपुजा, तृषानल यासारख्या इतरही काही बऱ्याच अघोरी प्रथा सुरु ठेवल्या होत्या. इंग्रज आले. त्यांनी त्या प्रथांचा सखोल विचार केला. म्हणूनच त्या प्रथा बंद झाल्या. नाहीतर आजही धर्माचाच वास्ता देवून लोकांनी त्या प्रथा सुरु ठेवल्या असत्या व आजही कित्येक स्रीच नाही तर कित्येक पुरुषांचेही धर्माच्या नावावर कितीतरी बळी गेले असते यात शंका नाही. कालच्या आम्रपालीचंही तसंच झालं. कालची सुंदर असलेली आम्रपाली एक स्री असल्यानं गणराज्य असूनही येथील तथाकथीत समाजानं तिला छळलं नव्हे तर तिला वेश्या बनवलं. तसं पाहिल्यास जेव्हा सुरुवातीला महाजनपदे अस्तित्वात आली. तेव्हा मंत्रीमंडळाच्या मनोरंजनासाठी एक नगरवधू पद निर्माण झालं. त्याचं कारण होतं की बिचारं मंत्रीमंडळ हे राज्यासाठी काम करतं. ते अतिशय मेहनत करतं. प्रसंगी युद्धही करतं व आपला जीव धोक्यात घालून विजय मिळवतं. असा विजय मिळविल्यावर त्याच लोकांचं मनोरंजन म्हणून नाचगाण्याचा कार्यक्रम असावा. ते नाचगाणं कोण करेल? यासाठी नगरवधू पद निर्माण करण्यात आलं. परंतु ही नगरवधू एका कुवाऱ्याच मुलीला बनवावं. तिनं आयुष्यात कधीच विवाह करु नये. ती सुंदरच असावी. ती अमूक असावी. धमूक असावी. असे काही नियम नव्हते. शिवाय हे पद जाणूनबुजून जबरदस्तीनं आपल्या स्वार्थासाठी देण्याची पद्धत नव्हती. ते पद देतांना त्या स्रिला त्या पदाची सर्वतोपरी माहिती करुन दिली जायची व ते पद त्यानंतर जेही कोणती महिला स्विकारत असे. तिला त्या पदाचे नियम माहीत असूनही ती अगदी स्वखुशीनं स्विकारत असे. परंतु कालांतरानं त्या नगरवधू पदात बदल करण्यात आला. तो बदल स्वार्थागत करण्यात आला व त्यात स्वार्थ शिरल्यानं स्वार्थागत नियम बनविण्यात आले. मग नगरवधू पद द्यायचं आहे ना. ती सुंदर असावी. ती कुवारी असावी. ती अल्पवयीन असावी. शिवाय तिनं आयुष्यभर विवाह करु नये. असे नियम लावले गेले व ज्याची बळी आम्रपालीच नाही तर अशा बऱ्याच कुवाऱ्या स्रिया बनल्या की ज्यांना येथील तथाकथीत सत्तेचं बळी बनावं लागलं व इच्छा नसतांनाही वेश्या बनून आयुष्यभर वेश्यापणाच्या वेदना सहन कराव्या लागल्या. कारण होतं त्या स्रिला विधात्यानं दिलेलं सौंदर्य. तेच सौंदर्य येथील तथाकथीत लोकांच्या डोळ्यात खुपत होतं व वासनाधिनता मनात शिरवून त्या सुंदर स्रिचे कसे लचके तोडता येतील. याचा विचार येथील तथाकथीत समाज करीत होता.
विशेष सांगायचं झाल्यास येथील तथाकथीत समाजानं येथील स्रियांनाच नाही तर काही सामान्य लोकांना छळलं. धर्माच्या नावानं, काही कुप्रथा निर्माण करुन. त्या प्रथात स्वार्थ शिरवून. त्या समाजानं कुप्रथा निर्माण करुन काहींना वेश्या बनवून छळलं तर काहींना सती बनवून ठार केलं तर काहींना मंगळ आहे असं सांगून कुप्रथांच्या नावानं बंदिस्त केलं. त्यातच कधी एखाद्या ठिकाणी भुस्खलन झालं वा भुकंप आला वा पूर आला तर काहींच्या अंगात येणाऱ्या देव्यांनी सांगितलं की अमूक अमूक प्रथा बंद झाल्या. म्हणूनच हे प्रकार सुरु आहेत. आजही तेच सुरु आहे. मात्र आज नगरवधू, सतीप्रथा, बालविवाह, विधवा पुनर्विवाह ह्या प्रथा बंद झाल्या आहेत. तरीही काही कुप्रथा बंद झाल्या नाहीत. आजही देव्या अंगात येतात. कौल देतात. म्हणतात की आपण असं करीत नाही. म्हणूनच भुकंप आला. महापूर आला आणि भुस्खलन झालं. अन् त्यावर विज्ञान शिकलेले लोकं आज वैज्ञानिक काळात विश्वास ठेवतात. आज कित्येक रजस्व स्रियांचा मंदिरप्रवेश होत नाही. त्या स्वयंपाक करायलाही चालत नाहीत. विटाळ होतो आणि जेव्हा त्याच स्रीवर त्याच अवस्थेत बलात्कार केले जातात. तेव्हा ती स्री चालते. असा आमचा समाज. काल केवळ धर्माच्या नावावर अबला स्रियांना छळत होता आणि छळत असतो आजही.
महत्वपुर्ण बाब ही की काल काही प्रथा बंद झाल्या. आज उरल्यासुरल्या प्रथा बंद करण्याची गरज आहे. कारण आज संविधान आहे व स्वातंत्र्यही आहे. आज समाजदेखील उच्चशिक्षित आहे व तो विज्ञान मानतो. अशा काळात आजतरी असल्या कुप्रथा बंद व्हाव्या. मंगळ आहे, म्हणून विवाह न करणं. होवू न देणं. रजस्व आहे, म्हणून स्वयंपाक सोडा, घरात वावरु न देणं. मुलगी पळून जाते म्हणून बालवयातच जाणूनबुजून, जबरदस्तीनं बालविवाह करणं, मुलगी समाजात सुरक्षीत नाही, म्हणून नरमेध, कन्यावध करणं. या भ्रूणहत्याच आहेत व स्रियांना छळणंच आहे. ह्या गोष्टी जेव्हा बंद होतील. तेव्हाच स्री खऱ्या अर्थानं स्वतंत्र्य होईल. ती लक्ष्मी, सरस्वती अन् दुर्गा ठरेल यात शंका नाही. इथल्या पुरुषसत्ताक समाजानं मातृसत्ताक स्रीजातीला माणसासारखं वागवावं म्हणजे झालं. तो ज्यावेळेस सर्वच स्रियांना माणसासारखं वागवेल. तेव्हाच स्री संपुर्णपणे स्वतंत्र्य झाली असं म्हणता येईल. मुठभर स्रियांच्या वागण्यावरुन स्री स्वतंत्र्य झाली असं म्हणता येणार नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०