mukta vhayachay mala bhag 10 in Marathi Motivational Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मुक्त व्हायचंय मला - भाग १०

Featured Books
Categories
Share

मुक्त व्हायचंय मला - भाग १०

मुक्त व्हायचंय मला भाग १०

मागील भागावरून पुढे…

मालतीला वाटतं होतं तसंच घडलं. माधव आणि सरीता रघूवीर घरी नाही हे बघून मालतीला भेटायला आले."आई तू पुन्हा विचार कर तुझ्या निर्णयावर." माधव म्हणाला." हो आई. अगं या वयात तू एकटी कशी राहशील? आणि बाबांना आता शुगर निघाली आहे.त्यांची काळजी घ्यायला हवी नं." सरीता काळजीने म्हणाली.मालती यावर काहीही बोलत नाही. तिचं गप्प बसणं यांचा अर्थ काय असेल याचा दोघांनाही अंदाज येत नव्हता." आई तू या घरात राहून तुझ्या मनाप्रमाणे जग.तू घरातील कुठल्याही कामात स्वतःला गुंतवू नको." माधव म्हणाला. माधवचा चेहरा खूप गोंधळलेला होता. त्याचा चेहरा बघून मारुतीला मनातून हसू आलं पण चेहरा तिने जाणीव पूर्वक निर्विकार ठेवला.सरीताचा चेहरा पण खूप व्याकूळ झालेला दिसला. मालतीला मनातून गंम्मत वाटत होती ती ही की माझ्याबद्दल यांची काळजी आहे की वडिलांबद्दल.मालती अजूनही बोलली नव्हती. तिला मनातून वाटत होतं की दोघांच्या जन्माच्या वेळी रघूवीरने  जी नाटकं केली ती खूप जुनी झाली असली तरी मुलांना सांगणं आवश्यक आहे. हे  ऐकल्यावर मग मुलांना ठरवू दे काय करायचं." आई अग आम्ही तुझ्याशी बोलतोय तुझं लक्षच नाही." वैतागून माधव म्हणाला."मला तुम्ही समजवायला आला असाल तर त्याचा आता काही उपयोग होणार नाही." मालती म्हणाली."म्हणजे तू आपला निर्णय बदलणार नाहीसनाही?" माधव" आधी तुम्हाला मी जे सांगणार आहे ते ऐका मग तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला."मालती म्हणाली."आता काय बोलायचं आहे.सगळं तर सांगीतलं तू." सरीता म्हणाली."नाही सगळं सांगितलं नाही. जे तुम्हाला माहिती नाही ते मी सांगणार आहे. तुमचा तुमच्या बाबांवर खूप विश्वास आहे. मला हे माहिती आहे म्हणून मी जे सांगीन त्यावर विश्वास बसणार नाही हेही माहिती आहे तरीही मी सांगते."थोडं थांबून मालती पुन्हा बोलू लागली."तुमच्या बाबांना मूल नको होतं.कारण मूल झालं की त्यांना त्यांच्या आयुष्यात अडथळे येतील असं वाटायचं म्हणून मला जेव्हा पहिल्यांदा बाळाची चाहूल लागली तेव्हा त्यांनी गर्भपात करायला सांगीतला. मी ते ऐकलं नाही.याचा परीणाम हा झाला की त्यांनी मला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली.माझं बाळ त्या त्रासामुळे या जगातून गेलं.मला खूप मोठा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांचा त्रास ‌वाढत गेला. माझ्या माहेरच्या कोणालाही आपल्या घरी यायचं नाही म्हणून तुमच्या बाबांनी सक्त ताकीद दिली होती. माझे भाऊ, आईवडील वहिनी सगळे मला ऑफीसमध्ये लंचटाईममध्ये भेटायला यायचे. खूप वाईट वाटायचं.ऑफीस संपवून माहेरी जायची सोय नव्हती. कारण मी ठरलेल्या वेळी घरी पोचले की नाही हे बघायला ते घरी फोन करत असत.आणि मला ते बसपुरतेच पैसे देत असत.ऑफीसला उशीर झाला आणि बस चुकली तर टॅक्सी करण्याची सोय नव्हती. पैसे नसायचे माझ्याजवळ.मी ऑफीसमध्ये जायला लागले पण ऑफीस, घर आणि तुमच्या बाबांची मर्जी सांभाळता सांभाळता मी थकले. एक दिवस ऑफीसमध्ये मी चक्कर येऊन पडले. ऑफीसमधील लोकांनी मला दवाखान्यात नेलंमी दवाखान्यातून घरी आले तर माझ्या मदतीसाठी यांनी एका मावशींना आपल्या घरी आणलं. त्या मावशी माझं खूप प्रेमाने करायच्या. अचानक एक दिवस बोलता बोलता मला कळलं की मावशी यांच्या गावच्या कामासाठी गरजू असणारी स्त्री नाही तर मावशी त्यांच्या आई होत्या."काय!" दोघही आश्चर्याने ओरडले."तुम्ही आत्ता जसे ओरडला तशीच मीही ओरडले. मग मावशींनी मला सगळी हकीकत सांगितली. तुमच्या आजोबांना तमावशी आवडत नव्हत्या त्यामुळे ते त्यांना वाट्टेल तसं बोलत आणि मावशींना काडीची किंमत देत नसत. वडिलांचं आईप्रती वागणं बघत बघत तुमचे बाबा मोठे झाले त्यामुळे त्यांना कोणाही बद्दल आदर राहिला नाही.खूप मिजास होती त्यांना.मला पुन्हा दिवस राहिले तेव्हा मी तुमच्या बाबांना कळू दिलं नाही.मला पूर्वी आलेला अनुभव पुन्हा घ्यायचा नव्हता. मावशी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या.कारण त्यांना होणारं नातवंडं बघायचं होतं.मी ब-याच उशीरा यांना सांगीतलं. तेव्हा त्यांनी खूप तळतळाट केला पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. मला हे बाळ वाढवायचं होतं. मावशींच्या पाठींब्यामुळे माधवा तुझ्या जन्म सुखरूप झाला. मावशी बरोबर असल्याने मी पुन्हा दिवस राहिले तरी सांगीतलं नाही. याहीवेळेस तोच तमाशा झाला पण मी ठाम राहिले. सरीता म्हणून तू हे जग बघण्यासाठी जन्म घेऊ शकली.मी तुम्हाला या जगात आणण्यासाठी हट्ट केला. पण नंतर तुमच्या मनात तुमच्या बाबांनी माझ्याविषयी वाईट साईट भरवलं. मी गप राहिले कारण तुमच्यासमोर मला आमची भांडणं नको होती.तुम्ही तुमच्या बाबांच्या सहवासात राहिल्याने तुम्हाला माझा स्वभाव, माझे विचार कधीच कळले नाही. तुम्हाला ते कळू नाही म्हणून तुमच्या बाबांनी तेवढी काळजी घेतली होती.आता मला माझ्या आवडीचं जगायचं आहे. तुमच्या योग्य वाढीसाठी मी गप्प राहिले. माझ्याविषयी तुमचं मत काय आहे हे मला कळत होतं तरी मी गप्प राहिले. तुमचं ऊत्तम भविष्य माझ्या डोळ्यासमोर होतं.मुलांनो आता कुठल्याही शब्दात मला अडकवू नका. ज्या व्यक्तीचा सहवासच मला आवडत नव्हता त्या व्यक्तीबरोबर इतकी वर्ष राहिले.आता मला या नकोश्या वाटणा-या नात्यातून मुक्त होऊ द्या." मालती एवढं बोलून थांबली.माधव आणि सरीता मालतीचं बोलणं ऐकून सुन्न झाले.आपले वडील असे आहेत. त्यांचं खरं रूप हे आहे. यावर खरंतर दोघांचा खरच विश्वास बसत नव्हता. कारण दोघांनीही त्यांचं जगणं म्हणजे एका राजासारखं असल्याचं बघीतलं होतं. आई त्यांच्यापुढे बावळट वाटायची.ती बावळट नसून ती मुद्दाम तशी वागली आणि आपल्याला हे कळलं नाही असेच भाव दोघांच्याही चेहेऱ्यावर होते."आई तू जे सांगीतलं ते आमच्यासाठी धक्कादायक आहे. बाबा असे आहेत यावर विश्वास बसत नाही." माधव म्हणाला"माधवा पुष्कळदा ख-या गोष्टींपुढे खोटी गोष्ट चकचकीत दिसते. लोकांना त्या चकचकाटाची भूल पडते. त्यात तुम्ही दोघं लहान होता.तुम्हाला ख-या खोट्याची परीक्षा कशी करता येईल!""आई तू कधीतरी सांगायचं आमच्या बाबांबद्दल खरं काय आहे ते." सरीता ने म्हटलं." मी सांगीतलं असतं तर तुम्ही त्यांच्या विरोधात वागला असता तर तुम्हाला काय त्रास दिला असता त्यांनी हे तुम्हाला कळलं नसतं पण मला माहिती होतं. त्यांचा मार ,त्यांची शीक्षा तुम्हाला सहन होणार नाही म्हणून गप्प बसले. आता तुम्ही मोठे आहात. तुम्हाला समजतंय म्हणून तुम्हाला सांगीतलं. तुमचा विश्वास नसेल बसला तर ठीक आहे. मी खरंच बोलले आहे.आता तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय निर्णय घ्यायचा ते."एवढं बोलून मालती थांबली. घरात भयानक शांतता पसरली ही शांतता माधव आणि सरीता ला जीवघेणी वाटतं होती.मालती मात्र शांत होती.मालतीचा निर्णय पक्का होता मुलांना आता ठरवायचं होतं ते म्हणजे आईला समर्थन द्यायचं की वडलांच्या बाजूने राहायचं.  


—-----------------------------------------------


क्रमशः मुक्त व्हायचंय मलालेखिका…मीनाक्षी वैद्य.