अखेरचा पर्याय in Marathi Classic Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | अखेरचा पर्याय

Featured Books
Categories
Share

अखेरचा पर्याय

अखेरचा पर्याय

           क्षुधा – तृष्णा या उर्मीची पर्वाही न करता रुरूची पायपीट अहर्निश सुरू झाली. ईप्सित पूर्ण होईतो अन्य विचारही मनात येऊ द्यायचा नाही असा त्याचा पक्का निर्धार होता. पंचनद प्रांत पार करताच त्याला हिमगिरीचे दर्शन झाले. पार आभाळात विरत गेलेली उत्तुंग हिमिशखरे आणि क्षितिज भेदून त्या पलीकडे पोचणाऱ्या पर्वत मालिका, पार्श्वभूमीवर हे दृष्य अधिकच गूढ करणारे अवकाशातील सप्तरंगांचे विभ्रम. नजरेतही न सामावणारी ती अनंतता पाहिल्यावर आपली मार्गक्रमणा योग्य दिशेने असल्याची खात्री रुरूला पटली. गणनाची मानवी परिमाणे थिटी ठरावीत असा विस्तीर्ण हिमगिरी! तो उल्लंघून त्या पलीकडे दिक्कालातील मृत्युलोक गाठण्याची रुरूची दुर्दम्य इच्छा!! ती तर मानवी कल्पनेतही न साकारणारी अतीत ठरण्याजोगी!!! आता मृत्युलोक गाठायला फारसा अवधी नाही या विचाराने तो उत्तेजीत झाला.प्रमव्देवरील उत्कट प्रेमापोटी मानवी सामर्थ्याला न पेलणारे मूर्ख साहस तो करू धजावला होता. महर्षि स्थूलकेशींनी यशाची किंचिंत शाश्वतीही व्यक्त केली नव्हती. उलट असे दुःसाहस न करण्याची स्पष्ट सूचना दिली. पण क्षुधा तृष्णा या उर्मीची पर्वाही न करता रुरूची पायपीट अहर्निश सुरू झाली. ईप्सित पूर्ण होईतो अन्य विचारही मनात येऊ द्यायचा नाही असा त्याचा पक्का निर्धार होता. पंचनद प्रांत पार करताच त्याला हिमगिरीचे दर्शन झाले. पार आभाळात विरत गेलेली उत्तुंग हिमिशखरे आणि क्षितिज भेदून त्या पलीकडे पोचणाऱ्या पर्वत मालिका, पार्श्वभूमीवर हे दृष्य अधिकच गूढ करणारे अवकाशातील सप्तरंगांचे विभ्रम. नजरेतही न मावणारी ती अनंतता पाहिल्यावर आपली मार्गक्रमणा योग्य दिशेने असल्याची खात्री रुरूला पटली. गणनाची मानवी परिमाणे थिटी ठरावीत असा विस्तीर्ण हिमगिरी! तो उल्लंघून त्या पलीकडे दिक्कालातील मृत्युलोक गाठण्याची रुरूची दुर्दम्य इच्छा!! ती तर मानवी कल्पनेतही न साकारणारी अतीत ठरण्याजोगी !!महर्षि स्थूलकेशींची मानसकन्या हिला आपण वरले असून तिच्याशी विवाह करण्याचा निश्चय रूरूने आपल्या पित्याकडे व्यक्त केला. पुत्राच्या इच्छा पूर्तीसाठी महाराज प्रमती यानी स्थूलकेशींची भेट घेतली. महर्षिनी उपचार म्हणून प्रमव्दरेची संमती विचारली. अधोवदना प्रमव्दरेचे मधुर हास्य हीच संमती मानून त्यांनी विवाह निश्चिती केली. उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर प्रमव्दरा रुरू यांचा विवाह निश्चित झाला. आता तर प्रमव्दरा अहर्निश रुरूच्या चिंतनात मग्न राहू लागली. तिची अन रूरूची दृष्टभेट झाली त्या स्थळी तर तिच्या एकसारख्या फेऱ्या होऊ लागल्या. विवाहाला केवळ तीन सप्ताहांचा अवधी होता. प्रातःकाली सुस्नात होऊन प्रमव्दरा फुले वेचण्यासाठी बाहेर पडली. रुरूच्या चिंतनात मग्न असलेल्या तिला मार्गातील तो विषारी भुजंग दिसलाच नाही. तिच्या लक्षात येण्यापूर्वीच भुजंगाने तिच्या टाचेत आपले विषदंत रूतवले. आर्त किंकाळी मारून प्रमव्दरा भूमीवर कोसळली. भुजंग एवढा विषारी होता की, सख्यांनी तिला उचलून कुटीत नेऊन ठेवले त्याच क्षणी तिची प्राणज्योत मालवली.प्रमव्दरेच्या मृत्यूची दुर्वार्ता राजप्रासादी आली. विवाह सोहोळयानिमित्त राजप्रासादाचे सुशोभन सुरू होते. त्या दुर्वार्तेने प्रासादावर अवकळा आली. रूरूच्या हृदयाचे जणू स्पंदनच क्षीण झाले. तसाच प्रासादाबाहेर पडून तो अश्वारूढ झाला. महर्षिच्या कुटी समीप येताच अश्वावरून उडी मारून पाय उतार होत तो तीरासारखा कुटीत प्रवेश करता झाला. त्याची हृदयेश्वरी अविचल झालेली पाहून त्याचे भानच सुटले. “प्रमव्दरे तुझी प्राप्ती हे माझ ध्येय होते. तुझ्याविना माझे जीवन व्यर्थ आहे....." तिच्या मस्तकावर हात ठेऊन मग रूरूने ती भीषण प्रतिज्ञा उच्चारली. "प्रमव्दरे तुझ्या प्राप्तीसाठी मी प्रत्यक्ष मृत्युलोकी जाईन. मृत्यु देवतेकडून तुझ्या जीवनाचे दान प्राप्त होईपर्यंत हा रूरू कोणत्याही देह भोगाच्या अधीन होणार नाही. तुझे जीवन प्राप्त झाले नाही तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन". रूरूची ही प्रतिज्ञा ऐकताच त्याच्या स्कंधावर थोपटीत महर्षि म्हणाले, "राजकुमार.... प्रतिज्ञा मागे घ्या. प्रमव्दरेचे दुःख सहन करण्याचे मनोधैर्य माझ्याकडे आहे. परंतु सम्राट प्रमती आणि महाराणी पुत्रशोक सहन करणार नाहीत. कुमार.... मुत्यू अटळ आहे. मृताला पुनार्जीवनाची प्राप्ती तर असंभव. ते शक्य असते तर माझे तपःसामर्थ्य मी पणाला लावले असते. प्रसंगी प्रमव्दरेसाठी माझे जीवनदानही मी केले असते. मुत्यू ही विधी योजना आहे. त्यामध्ये कालत्रयी बदल होत नसतो. म्हणून अशी शक्य न होणारी प्रतिज्ञा आपण करू नये." मात्र निश्चयी रूरू आपल्या प्रतिज्ञेवर अटळ राहीला."महर्षि विधिलिखित अटळ असते. तव्दत माझा निर्धार सुद्धा अटळ आहे. प्रमव्दरेशिवाय जीवन ही कल्पना मी सहनच करू शकत नाही. एकतर प्रमव्दरेची प्राप्ती अथवा आत्मसमर्पण हे दोनच पर्याय माझ्या समोर आहेत. मला निर्वेध यश मिळण्यासाठी आपण आशीर्वाद द्यावेत!” असे म्हणुन रूरूने महर्षिच्या चरणाला स्पर्श केला. “महर्षि आता या क्षणीच मी मुत्युलोकाच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. मी येईपर्यंत प्रमव्दरेवर अग्निसंस्कार करू नये. मी षण्मासांचा वायदा करीत आहे. हा काल पूर्ण होण्यापूर्वी मी प्रमव्दरेचे जीवनदान प्राप्त करून परत येईन. नच आलो तर माझ्यासह प्रमव्दरेचे और्ध्वदेहीक करावे.” निग्रही रूरू मार्गस्थ होण्यासाठी कुटीबाहेर पडत असता महर्षिनी त्याला थांबविले. मृत्यु लोकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कथन करून एक भक्कम वेत्रकाष्ट त्यांनी रुरूला दिले. “मार्गामध्ये सांगाती म्हणून हा वेत्र निरंतर तुम्हा सोबत राहू द्या....आता निघा...यशस्वी व्हा!" रुरू निघून जाताच प्रमव्दरेच्या सर्वांगाला दिव्य वनस्पतींचा रस चोपडुन तिचे कलेवर सुरक्षित रहाण्यासाठी मधाने भरलेल्या मृतिकापात्रात ठेवण्यात आले.कस्तुरी मृगाच्या गंधाने पूर्व स्मृतीत गढून गेलेला रूरू भानावर आला. आता सर्वत्र अंधार असल्यामुळे मार्ग दिशा यांचे आकलन होत नव्हते. तो एका वृक्षातळी विश्रांती घेण्यासाठी बसला. पंच पंच उषःकाली तो पुनश्च मार्गस्थ झाला. अवघड चढणीचा मार्ग पूर्ण हिमाच्छादित असल्याने अतिबिकट होता. केवळ निर्धार आणि आत्मसंयमनाच्या बळावरच त्याने वेदनांवर काबू ठेवला होता. पाय रक्ताळले, तहान, भुकेमुळे गात्रे शुष्क झाली अन् चेतना क्षीण होत त्या अवघड मार्गात तो मूर्च्छित होऊन खाली पडला. रूरूला जागृती आली. तेव्हा आपले मस्तक एका वृद्धाच्या मांडीवर असल्याचे त्याच्या लक्षात आले. दिव्य देहाचा कौपिनधारी वृद्ध त्याच्या मस्तकावरून हळूवारपणे हात फिरवीत होता.अकल्पितपणे रुरूच्या मुखातून शब्द उमटले, “तात, माझ्या अवघड अवस्थेत पित्याच्या वत्सलतेने आपण मला थोपटीत अहात म्हणून नकळत माझ्याकडून अयोग्य संबोधन उच्चारले गेले. वस्तुतः तुमचा पुत्र म्हणवुन घेण्याची माझी पात्रता नाही. या मूढाला क्षमा असावी.” रूरूच्या मुखातून उमटलेल्या संबोधनाने भारावलेला तो वृद्ध म्हणाला, "कुमार तुझ्या सहजोद्गारांनी मी धन्य झालो. तुम्हा मानवांमध्ये माता-पिता ही नाती सर्वश्रेष्ठ आहेत. मला नकळत का होईना तू परमोच्च पितृस्थानी बसविले आहेस. आता मला सत्यकथन करणे भागच आहे. राजकुमार, मी एक कर्तव्य भ्रष्ट गंधर्व आहे. या अधमाला विश्वावस्तु ही उपाधी आहे. तुझी प्राणप्रिया प्रमव्दरा, तिचा जन्म माझ्या अन् मेनकेच्या संबंधातून झाला आहे. विषय सुखाच्या क्षणिक उन्मादाने धुंद होऊन आम्ही भलतीच चुक केली. विषयतृप्ती झाल्यावर शिक्षेच्या भीतीने आम्ही या गोष्टीची वाच्यता केली नाही. गर्भकाळ पूर्ण होईतो मेनका गुप्तरूपाने पृथ्वीवरच राहीली. प्रसुत झाल्यावर ती नवजात कन्या महर्षि स्थूलकेशींच्या कुटीसमीप ठेऊन मेनका निघून गेली. कुमार, कर्तव्यच्युत झालेल्या या गंर्धवाला तात ही उपाधी शोभत नाही."“कन्येच्या स्नेहबंधामुळे मी गुप्तरूपाने महर्षिच्या आश्रमात प्रमव्दरेला डोळाभर पाहात असे. ती अल्पायुषी आहे. याचे पूर्ण ज्ञान मला होते. तुम्ही परस्परांवर अनुरक्त झालात हे समजताच मुक अश्रू ढाळण्याशिवाय मी काहीही करू शकत नव्हतो. तिच्या निधनाने तू दुःखार्त होशील याची पूर्ण कल्पना मला होती. पण तिच्या प्रेमासाठी असे काही भलते... मानवी आवाक्याबाहेरचे साहस तू करशील याची मला कल्पनाच येऊ शकली नाही. तुझ्या या अवस्थेला मीच कारणीभूत आहे..... राजकुमार रूरू या पतिताला तू क्षमा कर.” आता वृध्दाचे रूप त्यजून विश्वावस्तूने आपले गंधर्व रूप प्रकट केले. रूरूला आधार देऊन बसते केल्यावर त्या गंधर्वाने जवळच्या काष्ट पात्रातले पेय द्रोणात ओतून रुरूच्या मुखाकडे नेत म्हटले, “तुझ्या प्रतिज्ञेची मला माहिती आहे. तुझे व्रताचरण भंग करण्याचे पातक मी करणार नाही हा द्रव हविष्यान्नाच्या रसामध्ये कमलपुष्पातील मध मिसळून मी खास तयार केला आहे. हे जल नाही आणि अन्नही नाही. याच्या सेवनाने तुझ्या प्रतिज्ञेचा भंग होणार नाही. उलट चैतन्याची पुनः प्राप्ती होईल."तो मधुर रस कंठात उतरताच रूरूच्या शरीरात चैतन्याची लाट उसळली. "काष्ट पात्रातील सगळा द्रव तू प्राशन कर. याच्या सेवनाने तुझी इप्सित पूर्ती होईपर्यंत तुला क्षुधा - तृष्णा यांची जाणीवही होणार नाही. अगर तुझ्या शरीरातील चैतन्याचा उर्जा संचयही क्षीण होणार नाही.” रूरूचे द्रवपान पूर्ण झाल्यावर त्याने यक्षाच्या चरणी मस्तक टेकविले. "गंधर्वराज! आपल्या दर्शनाने मी पावन झालो आहे. मी दुर्बल होऊन या अवघड स्थानी मूर्च्छित होऊन पडल्यामुळे माझी प्रतिज्ञा भंग झाली असती. पण आपण मला योग्यवेळी सहाय्य केलेल्या कृतीमुळे आपले पापक्षालन झाले आहे. आता माझे इच्छित कार्य पूर्ण होईल याची मला खात्री आहे. प्रमव्दरेची प्रीती आणि आपले आशीर्वाद या बळावर माझे सामर्थ्य आणि निश्चय कालत्रयी क्षीण होणार नाही."रूरूच्या स्कंधावर प्रेमाने थोपटीत गंधर्व म्हणाला, “राजकुमार तुझी आणि प्रमव्दरेची प्रीती युगानुयुगे चिरंतन राहील. तुझ्या ईप्सित पूर्तीमध्ये कसलीही अडचण येणार नाही. यासाठी माझे सामर्थ्य मी तुझ्या हातातील या वेत्रामध्ये बद्ध करीत आहे. हा वेत्र दक्षिण हाती घेऊन तू माझे स्मरण केलेस की तीन वेळा तुला माझे सामर्थ्य वापरता येईल. गरज पडेल तेव्हा या बळाचा तू योजकतेने वापर कर. ईप्सित पूर्ण होताच संकल्पपूर्वक हा वेत्र मस्तकाला टेकवलास की माझे सामर्थ्य मला परत मिळेल. मात्र या गोष्टींची तू वाच्यता करू नकोस. अगदी आवश्यक तेव्हाच अन् तुझे सगळे उपाय हरतील तेव्हा चातुर्याने या तीन वरदानांचा वापर कर! जा. यशस्वी हो!” अन् विश्वावस्तु अदृष्य झाला.स्तिमित झालेल्या रूरूने क्षणभर शांतपणे विचार केला. मृत्युलोकात पोचेपर्यंत वृथा कालापव्यय टाळण्यासाठी गंधर्वाकडून प्राप्त झालेले वरदान वापरण्याचे त्याने ठरविले. वेत्र दक्षिण हस्ती धारण करून मृत्युलोकापर्यंत जाण्याची इच्छा व्यक्त करून त्याने नेत्र मिटुन घेतले. क्षणभरातच "तुझी इच्छा पूर्ण झाली आहे.” असे स्वर कानी पडताच त्याने डोळे उघडण्याचे प्रयत्न केले. पापण्या उघडायला त्याला अती कष्ट झाले. आता पायाखाली, वर, आजुबाजूला सर्वत्र धूसर कृष्ण रंगाचे साम्राज्य असून चहुबाजूनी अनंतापर्यंत अंधुक होत जाणाऱ्या आकाशगंगा दिसू लागल्या.भूमी, जल, वायू, कोणतेही माध्यम नसलेल्या त्या भिन्न अवकाशस्थ भिंतींमध्ये त्याचा श्वासोच्छवास पूर्ण बंद होउन हृदयाचे स्पंदनही थांबवल्याचे जाणवले. भिन्न जाणीवांच्या पातळीवर त्याचे अस्तित्व जिवंत आहे हे लक्षात येऊन त्याची मती गुंग झाली. देहाचे अनावर ओझे सांभाळताना तर त्याला अति कष्ट होऊ लागले. मस्तकाचा भार असह्य होउन मेंदूला झिणझिण्या आल्या. त्या असह्य शरीर मनस्थितीतही आपल्या इच्छित कार्याचे स्मरण होऊन रुरू सावरला. वेत्रावर आपला देहभार तोलीत तो मृत्युलोकात प्रवेश करण्याच्या मार्गाचे शोधन करू लागला. एकाग्र दृष्टीने निरखल्यावर धूसर पटा आडून पाहिल्याप्रमाणे समोरच्या दृष्याचा बोध त्याला होऊ लागला. जेमतेम एक व्यक्ती कसा तरी प्रवेश करू शकेल एवढ्या अरूंद प्रवेशव्दाराच्या चारही अंगांनी दृष्टीपोचेतो उंच अन् लांबवर अस्पष्ट होत जाणारी लोहसदृष्य तटबंदी दिसत होती. एखाद्या अजस्र जलचराने उघडलेल्या विकराल जबड्याप्रमाणे दिसणारे ते मृत्युलोकाचे प्रवेशव्दार..... अन् प्रवेश मार्गातून दिसणारा अंतर्भाग रक्तिम कृष्ण वर्णाने खोलवर गुढ होत गेलेला!महद्क़ष्टाने एक एक पाऊल निग्रहाने उचलीत रुरू प्रवेश व्दारासमीप पोचला. आता मात्र प्रवेश मार्ग चांगला प्रशस्त आणि भव्य असल्याचे त्याच्या लक्षात आले. निरखून पहाताना अति तणावामुळे बुबुळे नेत्रपटल फाडून बाहेर येतील की काय? असे भय वाटून त्याने पापण्या मिटून घेतल्या. काळजाचे पाणी करणारे सर्प फुत्कार ऐकून त्याने नेत्र उघडीत पाऊल मागे घेतले. "मूर्ख मानवा, असा अविचार करू नकोस. हा मृत्युलोक आहे. तुझा साक्षात काळ असणारा मी एकादश मुखी नागराज तुला दंश करण्यास अधीर झालो आहे." तप्त ताम्ररस कानात ओतावा अशा वेदना करीत नागराजाचे शब्द त्याच्या कर्णात घुसले. भिती पेक्षाही ते शब्द कर्णपटलावर आदळले असता जो आघात झाला, त्यामुळे झालेल्या असह्य वेदनानी रूरूचा चेहरा वेडावाकडा झाला. त्याच वेळी आलेल्या उग्र कुबट सडलेल्या रक्तमासांच्या दर्पामुळे त्याच्या पोटात ढवळून आले.तो विस्फारत नेत्रांनी पाहू लागला. गुंजेसारख्या रक्तवर्णी नेत्रातून जणू अग्निजिव्हा प्रज्वलित होत असल्याप्रमाणे बावीस प्रखर नेत्रांनी पहात अतीनील दुधारी जिव्हांची लवलव करताना अणकुचीदार विषदन्त दाखविणाऱ्या त्या अकरा फणा असलेल्या नागराजाचे दर्शन होताच रुरू थिजून गेला. अति कष्टाने एक एक शब्द उच्चारताना छातीवर येणाऱ्या दडपणामुळे रूरूच्या घशात रक्ताचे लोट जमा होऊ लागले. "नागराज! मी मृत्यु देवतेला भेटायला आलो आहे. माझ्या प्रियतमेच्या प्राणांची भिक्षा मला मागायची आहे. माझ्या प्रियेला आपल्या भूमिस्थित बांधवाने दंश केल्यामुळे तिला अकाली मृत्यु आला आहे. नागराज! केवळ तीन सप्ताहानंतर आम्ही विवाहबद्ध होणार होतो. सुखाचा प्याला ओठाला लावण्यापूर्वीच विधीने माझे चैतन्यच जणू शोषून घेतले आहे. माझ्या जीवनाचे श्रेयच जणू हरवले आहे. आजवर कोणी मानवाने केले नसेल असे धाडस करून मी इथे आलो आहे. कृपा करून मला मृत्यु लोकात प्रवेश करू द्या." अन् रक्ताच्या गुठळ्या थुंकून रूरूने घसा मोकळा केला. त्वेषाने फुत्कार सोडीत नागराज म्हणाला, "मूर्खा! माझ्या भूमिस्थित बांधवाने तुझ्या प्रियेवर अनुग्रहच केला आहे असे समज. यातनामय मानव जन्मातून ती मुक्त झाली आहे. तू सुद्धा असाच माझ्या कुणा बांधवाकडून अनुग्रहित हो! अन् मग खुशाल इकडे ये. तो पर्यंत इथे येऊ नकोस..... जा! परत जा! जड देहधारी आत्म्यांना इथे प्रवेश नसतो. माझा क्रोधाग्नी क्षणोक्षणी भडकत आहे. माझ्या व्दिविंशती विषदंतानी तुझ्या देहाला कडकडून चावे घेण्याची माझी लालसा तीव्र होण्यापूर्वी तू इथून चालता हो. मी इथे असेतो तुला जिवंतपणे मृत्युलोकांत प्रवेश करणे शक्य नाही.” व्दारपाल नागराजाच्या या दर्पयुक्त भाषणाने रूरूचा स्फुल्लिंग जागृत झाला. आपल्या प्रेयसीचा करूण अंत करण्यास कारणीभूत ठरलेला भुजंग.... अन् इथे वाट अडवून बसणाराही त्याचाच बांधव...! रूरूच्या अंतःकरणातील सूड भावना जागृत झाली. वेदनांचा त्याला पूर्ण विसर पडला.“मृत्युलोकाच्या व्दाराचे रक्षण करणारा तू म्हणजे एक अतिसामान्य मतीहिन असे क्षूद्र सर्प रूप! हा दर्प-अहंकार सुद्धा तुला शोभत नाही. भूमीस्थित नागांपेक्षा तुला दहामुखे अधिक आहेत पण ती सर्व निरर्थक आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या सामर्थ्याचा अंशमात्रसुद्धा तुझ्याकडे नाही. दुतोंडी गांडुळाने आपल्या दोन मुखांचा अभिमान मिरविणे जसे निरर्थक आहे. तव्दतच अकरा सर्पफणांबद्दल असलेला तुझा अभिमानही अती भूद्र आहे. तुझा हा दर्प नष्ट करण्याचे सामर्थ्य या देहधारी राजपुत्राच्या बलसंपन्न बाहुंमध्ये जरूर आहे. माझ्या हातीच्या या वेत्राने तुझ्या एकादश फणांचा चेंदा-मेंदा करीन. मग गलितगात्र झालेल्या तुझ्या देहावर उन्मत्त लत्ता प्रहार करून तुझे रक्तामांस पायदळी तुडवीत मी अभिमानाने मृत्युलोकी प्रवेश करीन. मूर्ख नागा ! आता वेत्रप्रहार करणे सोडच पण मी तुझ्यावर थुंकणारसुद्धा नाही." त्वेषपूर्ण भाषणाने मुखात जमा झालेल्या रक्ताची चूळ नागराज्याच्या दिशेने थुंकून रूरू म्हणाला, “तुझी एकादश मुखे, ती धारण करणाऱ्या तुझ्या फणा सारे काही भ्रामक आहे. त्या पेक्षाही क्षुल्लक आहे तुझी मती. तुझ्या शून्य बुद्धीला तर गांडुळाची उपमा देणे म्हणजे त्याचा उपमर्द व्हावा. कारण त्याला निदान आत्म संरक्षणाची तरी बुद्धी असते. मूर्ख नागा! कथनाच्या ओघात तुझे अस्तित्व निरर्थक ठरावे असे सत्य तू अनवधानाने कथन केले आहेस. तू मृत्यूलोकात आहेस त्या अर्थी तुझे देहधारी अस्तित्व संभवत नाही. हे मला पुरते समजले आहे. ज्या व्दिविंशती विषदंतानी मला चावे घेण्याचे दर्पयुक्त भाषण तू केलेस ते तर हास्यास्पदच आहे. कारण मुळात तुझे अस्तित्व अशरिरी आहे!"रूरू बेधडकपणे प्रवेशव्दरातून आत घुसला. अंतर्भागात प्रवेश करताच संर्वांगावरील दडपण जरा कमी होऊन तो सैल झाला. प्रवेशव्दारातून धूसर वाटणारे अंतर्भागाचे दर्शनही भ्रामक असल्याचे त्याला जाणवले. अंतर्भागातील प्रकाश नेत्रांचा किंचित दाह करणारा पिवळसर तांबूस असला तरी सर्वकाही स्पष्ट दिसू लागले. कर्णरंध्रामध्ये निर्माण झालेला ठणका कमी झाला. अशरीर वेदना भोगणाऱ्यांच्या आर्त किंकाळ्या अस्पष्ट कां होईना आता ऐकू यायला लागल्या. लोळागोळा झालेली बोजड जिव्हा आता सफाईदारपणे सुकलेल्या ओठांवर फिरवता येऊ लागली. मुख्य म्हणजे सर्वांगावर जाणवणारा असह्य ताण कमी होऊन मुक्त हालचाल करता येऊ लागली. मृत्युलोकामध्ये अशरीर आत्म्यानांच प्रवेश का दिला जातो हे रुरूला पुरते उमगले. चहूदिशांना नीट निरखल्यावर नजर पोचेतो भयाण पोकळी दिसत होती. मात्र चहूदिशांनी येणारे रस्ते एका विशिष्ट स्थानी एकत्र आल्याचा आभास निर्माण होत होता. मृत्यु देवतेचे स्थान तिथेच असावे असा अंदाज करून रुरू त्या दिशेने पुढे जाउ लागला.छे!... या कराल मृत्यु दाढेतून सुटलेच पाहीजे! त्याने मागे वळून पाहिले धूसर झालेला प्रवेशमार्ग पाहाताच त्याला जरा हायसे वाटले! पण पृथ्वीवर परत जाऊन मोठ्या आशेने मार्ग प्रतीक्षा करणारे माता, पिता, महर्षि, प्रमव्दरेच्या सख्या, मित्र-आप्तजन याना काय सांगायचे? यशाचा अंतीम क्षण हाती आला असता कच खाऊन माघारी फिरणे यात कसला पुरुषार्थ आपण साधणार आहोत? अन् प्रमव्दरेवरील आपली असीम प्रीती, ती सुद्धा सुखभोगाच्या कवचा आड राहिलेली एक आत्मनिष्ट लालसाच होती का? आपले हे भ्याड कृत्य म्हणजे प्रीती भावनेची दारूण वंचनाच म्हणावी लागेल. प्रमव्दरेच्या प्राणांची प्राप्ती करण्यामागे आपल्या एवढ्या विषयांध अपेक्षा होत्या तर मग इथवर यायचे कष्ट तरी आपण या देहाला कशाला दिले? रंग-रुपांच्या विभ्रमांनी प्रमव्दरेशी साम्य साधू शकणाऱ्या युवतींची आर्यावर्तामध्ये कमतरता नाही. किंबहुना तिच्यापेक्षाही दिव्य सौंदर्य लाभलेल्या युवती आपण पूर्वी पाहिल्या होत्या. प्रमव्दरा भेटे पर्यंत कोणत्याही चारूगात्रींचे विभ्रम आपणाला मोह जालात अडकवू शकले नाहीत कारण प्रमव्दरेच्या सौंदर्यामध्ये कामुक उत्तानतेपेक्षाही आपल्या हृदयाला भिडली ती सोज्वळ सात्विकता! वारांगनांच्या भ्रुकुटी भंगाने चळायला आपण विषयांध नरपुंगव आहोत का? छे.... इथून परत जाण्याचा विचार हेच आपले पतन आहे. मृत्यु दंड भोगीत सुटकेच्या क्षणासाठी, जीवनासाठी आतुर असणारी खुद्द प्रमव्दरा या पसाऱ्यातच कुठे तरी तिचा आत्मा असेल आपली प्रत्येक हालचाल तो निरखित असेल या जाणीवेने रूरू शरमिंदा झाला. प्रमव्दरेची आणि स्वतःचीही वंचना करून उफाळणाऱ्या जीवनाच्या उर्मीची त्याला शिसारीही आली. स्वतःच्याच रक्तमांसांची सडकी-कुजकट दुर्गंधी असह्य होउन एक आर्त किंकाळी त्याच्या मुखातून उमटली. मीनाक्षी मंदीरात वार्षिकोत्सवाच्या वेळी घुमणारा नगारे शहाजण्यांच्या दणाणणारा ध्वनी राजप्रासादावर धडकावा तव्दत त्याची किंकाळी चहूदिशा भेदीत गेली. अंतः भागातला पिवळसर तांबूस रंग किंचित सौम्य झाला. स्वसामर्थ्याची जाणीव त्या क्षणी रूरूला झाली."मृत्युदेवते.....! सामोरी ये. तुझ्या निर्घृण कृत्याचा जाब विचारायला हा देहधारी रुरू पूर्ण सामर्थ्यानिशी तुझ्या साम्राज्यात आला आहे. आता छल कपटाचा आधार न घेता माझ्यासमोर प्रकट हो!" अशी बेभान आव्हानवाणी उच्चारताच समोरच्या भ्रम पटलाचा भेद झाला. उंच आसनावर बसलेली नीलवर्णाची बलदंड मृत्युदेवता तिच्या वैभवासह समोर दिसू लागली. अर्धवर्तुळावर पायऱ्या पायऱ्यांनी वर चढत गेलेल्या रत्नखचित सुवर्ण सिंहासनांवर मृत्युदेवता उत्थितावस्थेत विराजमान झाली होती. तिने पीतवर्णी बीभत्स नेत्र कटाक्ष रूरूकडे टाकण्यासाठी शांतपणे आपला चेहरा खाली वळवला. तिच्या कर्णभूषणातील श्वेतरंगी मण्यांमधून चमकलेल्या आभेने रूरूचे नेत्र दिपले. डोळ्यांवर वामहस्त आडोशासारखा धरुन तो मृत्यु देवतेचे अवलोकन करू लागला.देवतेने बोटभर लांब केस असलेल्या उग्र भृकुटीमध्यात कुंकुमस्थानावर गलिच्छ मांसखंड चिकटवला होता. तुळतुळीत मस्तकामध्ये खोचल्याप्रमाणे लोंबणाऱ्या केसांच्या गलिच्छ पेळू स्कंधापर्यंत रुळत होत्या. त्या सावरण्यासाठी मानवी नेत्रांच्या बंधाचे अजागळ फेरे मस्तकाभोवती दिले होते. मस्तकाच्या मध्यातून दोन विरूप शिंगे वळणा-वळणांनी वर येत अणकुचीदार झाली होती. गळ्यात धारण केलेली मानवी लिंगांची माला नाभीस्थानांपर्यंत पोहोचली होती. मानवी हात स्कंधापासून तोडून ते गुंफुन केलेले कटिवस्त्र देवतेने धारण केले होते. त्यावर मानवी कर्णमालेचे अस्ताव्यस्त वेढे दिले होते. या सर्वांवर कडी करीत तिच्या अस्तित्वाची दुःसह दुर्गंधी असह्य होउन रुरूने नाक दाबून धरले. हे असले रूप धारण करून मृत्युलोकी राहाण्यापेक्षा भूलोकी रहाणे स्वर्गसुखाच्याही पलीकडचे आहे असा विचार रूरूच्या मनात आला.चबुतऱ्यावर देवतेच्या सिंहासनाशेजारी डाव्या उजव्या अंगाला बसलेल्या दोन कुरूप बेढब कृष्णवर्णाच्या स्त्रिया अधोमुख होऊन अनुक्रमे काळे व पांढरे वस्त्र विणण्यात गर्क झाल्या होत्या. चबुतऱ्याच्या कडेला मृत्युदेवतेला साजेसे हिडीस रूपवर्णांचे आठ रक्षक हाती त्रिशूळ, पाश ही आयुधे धारण करून पूर्ण नग्नावस्थेत उभे होते. मृत्यु देवतेने बोलण्यासाठी तोंड उघडताच तिचे वराहदंत ओठांच्या कडांनी बाहेर आले. दिवाभीताच्या घुघुत्कारा प्रमाणे कर्णकटुस्वरात मृत्यु देवता म्हणाली, “मूर्खमानवा, आजवर एकाही मानवाने न केले असे दंडनीय दुःसाहस तू केले आहेस. या कृत्यामागचा तुझा हेतू तर कालत्रयी सिद्ध होणार नाही. मात्र वेदना द्यायला एक सदेह आत्मा माझ्या रक्षकांच्या मनरंजनासाठी उपलब्ध करून देण्याचे महत्कार्य तू केले आहेस. जरा चहूबाजूना नीट निरखुन पहा....."रूरूने डाव्या बाजुला नजर वळविली. कुजुन सडणाऱ्या मानवी देहावशेषांवर पुंजक्या पुंजक्यांनी वळवळणारे सपुच्छ किडे दिसत होते. त्या कर्दमामध्ये लडबडलेला, त्यामधून बाहेर पडण्याची धडपड करणारा एक मध्यम वयीन नरदेह.... आतडे ढवळीत उमळुन आलेली वांती टाकीत रुरूने नेत्र मिटुन घेतले. हे सगळे भ्रामक आहे असे स्वतःच्या मनाला बजावीत नेत्र उघडण्याचे धाडस न करताच रुरू बोलायला लागला. "मृत्युदेवते... तुझे गलिच्छ विभ्रम आता बंद कर. त्यांनी भ्रांत होऊन निघुन जाण्याएवढा मी दुर्बल नाही. पृथ्वीवरील एका सामर्थ्यवान राजघराण्याचा मी वारसदार असून मिनाक्षीचा परम भक्त आहे." अन् मग अकल्पित स्फुरण होऊन त्याने देवी करुणाष्टक म्हणायला सुरुवात केली. त्याच्या चित्तवृत्ती शांत झाल्या आणि त्याने धैर्याने नेत्र उघडले. गीर्वाण भारतीचे ते शुद्ध सात्वीक स्वर असह्य होऊन मृत्युदेवतेसह सर्व रक्षकांनी दोन्ही हात ठेऊन कर्णेद्रिये झाकून घेतली होती. करूणाष्टकाचे पठण पूर्ण होताच मृदु मधुर स्वरात रूरूने कथन सुरू केले.“मृत्युदेवते ! विधि योजनेनुसार माझा कधि मृत्यु व्हायचा असेल तेव्हा तो खुशाल होऊ दे. पण तोवर मला मृत्युचे भय दाखवण्याच्या फंदात तू पडू नकोस. देहघारी मानव सारे संकेत भंग करुन तुझ्या साम्राज्यात आला आहे. तू कधीही उपभोगली नाहीस, उपभोगू शकणार नाहीस अशी प्रीतीची, समर्पणाची भावना मला तुझ्या पर्यंत घेऊन आली. देवते आजवर मानवांचे प्राण हरण करण्याचे निंद्य कृत्य तू केले आहेस. विधि योजनेनुसार का होईना? पण प्राण हरणाचे कठोर कर्तव्य बजावीत असताना कधितरी तुझ्या मनात उव्दिग्नता आली असेलच. तुझ्या आजवरच्या अन् या पुढे घडणाऱ्या या निंद्य कर्माचे परिमार्जन करायची दुर्मिळ संधी तुला मिळणार आहे. कर्तव्य कठोर असलीस तरी तू सुद्धा एक देवताच आहेस. देवत्वाचे व्यवच्छेवक लक्षण असणारी करूणा तुझ्या अंतरी खचितच असणार.... हे देवते मला अनाथ एकाकी सोडून आलेली माझी प्रियतमा... तिचे जीवन तू मला परत दे अथवा मला मृत्युदंड देऊन माझ्या प्रियतमेचा अशरीर सहवास लाभण्याचे भाग्यव्दार तरी माझ्यासाठी उघड!"विचारमग्न झालेली मृत्युदेवता सौम्य स्वरात म्हणाली, "मानवा.... माझ्या मातेची स्तुती गाऊन तू माझे बाल्य जागृत केले आहेस. तुझी व्यथा .... तुझा विरहदाह आता मला समजत आहे. मानवी प्राण हरण करण्याच्या माझ्या कठोर कर्तव्याची उाव्दग्नता आता मला आली आहे पण माझ्याही काही मर्यादा आहेत. विधि संकेतानुसार जिवंत माणसाची चेतना हरण करून तिला मृत असल्याचे सामर्थ्य माझ्यापाशी जरुर आहे. परंतु जीवनदान द्यायला मात्र मी पूर्णपणे असमर्थ आहे. तसेच विधि योजनेपूर्वी मानवाचे प्राण हरण करण्याचे सामर्थ्यही माझ्याकडे नाही. तेव्हा तुझी कोणतीही इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. मानवा तुझ्या श्रद्धायुक्त आर्त स्वरांनी अनावर झालेली माझी मातेविषयी ओढ, तिच्याच विविध रुपांपैकी एका रुपाच्या प्राप्तीसाठी आर्त झालेली तुझी विवशता मी समजू शकतो. पण केवळ असमर्थता व्यक्त करण्यापलीकडे मला काहीच सुचेनासे झाले आहे. मानवा तू क्षुद्र-नगण्य आहेस. तरीही मी एक विनंती तुला करू इच्छितो. मघाशी उच्चारलेले ते मंगल स्तवन तू पुन्हा एकदा मला ऐकव. आलेली एक बहुमूल्य संधी तू दवडली आहेस. मूर्खा, मी बालस्वरूप असताना मला तुझी कर्णकुंडले, तुझ्या अनामिकेतील सुवर्णमुद्रा, तुझ्या गळ्यातील रत्नहार, कटीची रौप्य मेखला निदान तुझ्या हातीचा वेत्र दंड... यांपैकी काहीही एक देऊ केले असतेस तरी प्रमव्दरेचे जीवनदान तुला मिळाले असते. पण हे संकेत समजण्याएवढी प्रगल्भता तुझ्याकडे नाही. हेतुपूर्तीची अपूर्व संधी तू गमावली आहेस. जा चालता हो !"मान खाली घालून हताश मुद्रेने उभ्या असणाऱ्या रुरूविषयी अपार करूणा वाटुन मग मृत्युदेवता म्हणाली, "अरे मुला ! विधिलिखित किती अटळ असते याचा प्रत्यय तुला खचितच आला असेल. तुझी निस्सीम प्रीती, समर्पण वृत्ती आणि स्वतंत्र विचार धारणा मला भावली. त्या पेक्षाही मिनाक्षी मातेबद्दलची तुझी अपार श्रद्धा प्रत्ययाला येताच तुझे कल्याण करण्यासाठीच मी बालरूप धारण केले. कोणत्याही मानवाला यापूर्वी मिळाले नव्हते अन् भविष्यात मिळण्याची शक्यता जवळजवळ नाही असे अकल्पित दान मी तुला देऊ केले होते. पण तुझ्या कपाळकरंट्या वृत्तीमुळेच तुला दारूण अपयश पदरी घेऊन माघारी जावे लागणार आहे. माझी कर्तव्य भावना आता जागृत होत असुन मी तुला शिक्षा देण्यापूर्वी तू मृत्युलोकाबाहेर पडावेस अशी माझी सक्त आज्ञा आहे.” देवतेच्या या शब्दांनी अक्षरशः उन्मळून गेलेल्या रुरूने तिच्या चरणांवर लोटांगण घातले. कठोर आत्मवंचना अन् निराशा यामुळे त्याच्या नेत्रांतून ओघळणाऱ्या अश्रृंनी त्याने देवतेचे पदक्षालन केले."मानवा! एकदा हाती आलेली संधी वाया घालवल्यामुळे मला तुझी घृणा आली आहे. तथापि मी अद्याप उग्ररुप धारण केलेले नाही. तू पश्चात्तापाने शुद्ध झाला आहेस. म्हणूनच केवळ तुला पुन्हा एकवार संधी द्यायचा माझा मनोदय आहे. अर्थात यावेळी ही संधी विना अट नसेल. तू आपली बुद्धी पूर्ण शाबूत ठेऊन ही संधी घेतलीस तर ठीकच अन्यथा तुझे जीवन म्हणजे यातना पर्व असेल. तुला प्रमव्दरेचे प्राण पाहीजे आहेत ना? मग त्याचे मोल तू काय देशिल?" देवतेने अशी पृच्छा केल्यावर रुरू म्हणाला, "देवते मी प्रमव्दरेच्या प्राणांचे मोल म्हणून माझा कोणताही शरीरावयव, एवढेच काय माझे पंचप्राणही तुला मोबदल्यादाखल देऊ शकेन. अर्थात हा माझा पर्याय तुला मान्य नसेल तर वेगळे काही मोल देण्याचा दुसरा पर्यायही मी शोधून काढीन....तशी मुभा हे देवते तू मला दे." सस्मित मुद्रेने मृत्यु देवता म्हणाली, “मूर्खा पुन्हा एकवार हाती आलेली संधी तू दवडतोस की काय अशी शंका मला वाटत होती पण पूर्वानुभवाने शहाणा होऊन सावध कथन केल्यामुळे दुष्प्राप्य अशी ही संधी तू दवडली नाहीस इतकेच. पण तू देऊ केलेली भरपाई अयोग्य आहे. तुझे शरीरावयव घेऊन तुला पंगु करून मी तुला इच्छित गोष्ट दिली तर माझ्या वृत्तीला मालिन्य येईल." “मूढपामरा ! तुझ्या प्राणांच्या मोबदल्यात प्रमव्दरेला जीवनदान म्हणजे तर शापच देणे होईल. तुम्ही मानवांनी स्वतःच्या वृत्ती नुसार सत्व-रज-तम हे गुण देवतानाही चिकटवलेले असल्यामुळे तुझी माझ्याकडे पाहाण्याची दृष्टी दूषित आहे. मूर्खा !..... सृजना एवढाच मृत्युही श्रेष्ठ आहे. तुझ्या भाषेत सांगायचे तर त्रिगुणांनी युक्त सामान्य देवतांपेक्षा माझी श्रेणी उच्च आहे. स्वयंभु आदितत्वापासुन माझी निर्मीती झाली आहे म्हणून तुझ्या अज्ञानाचा फायदा घेऊन दायित्व झटकून टाकण्याचा प्रमाद माझ्या हातून घडावयाचा नाही. तुला माझी ओळख पटली नाही हेच खरे. आता वेळ वाया न घालवता तुला दुसरा एखादा पर्याय सुचवायचा असेल तर तू जरुर सुचव. तत्पूर्वी ही दुसरी संधी घ्यायची की नाही.... याचा विचार तू करावास."देवतेचे कथन पूर्ण झाले तरी रुरूला बोलायचे धाडस होईना. आपल्याला एकदा पुन्हा संधी देण्यामागे देवतेची काही कुटील इच्छा असावी असा त्याचा ग्रह होऊ लागला. निराश होऊन रुरू म्हणाला, "देवते एकीकडे माझ्यावर अनुकंपा करावयाचे नाटक करीत असता तू पद्धतशीरपणे माझी वंचना चालविली आहेस असे मला वाटत आहे. तुम्ही देव मानवांपेक्षा हीन, क्षुद्र अहात. ना धड त्याला स्वयंप्रज्ञेने वागण्याचे स्वातंत्र्य बहाल करीत, ना त्याच्या विचारांचे नियंत्रण करित! तू जर त्रिगुणी देवतांपेक्षा श्रेष्ठ आहेस, तर मग मला काय पाहीजे अन् मी त्या बदली काय देऊ शकेन याचेही ज्ञान तुला आहेच. मग तू विचारावे मी सांगावे हे नाटक कशाला? आपण अनादी स्वयंभू आहोत असे तू मला भासवीत असलीस तरी तुझे नियंत्रण करणारे तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ असे वेगळेच काही तत्व अस्तित्वात नसेल कशावरुन? तसे असेल तर देवते ते तत्व कोणते? त्याच्याकडे कसे पोचायचे? बस्स एवढे मार्गदर्शन तू कर. तेवढे पुरेसे आहे. अर्थात हे माझे कथन म्हणजे तू मला देऊ केलेल्या संधीचा भाग नाही. देवते मला दुसरी संधी देण्याचे वचन तू दिलेले आहेस. त्यातून तुला मुक्त होऊ देण्याएवढा मी मूर्ख नाही. पण मानवाच्या मर्यादा तुला ज्ञात असतानाही निर्णय माझ्यावर सोपवून तू माझी कुचंबणा केली आहेस. देवते..! तुझ्या बदलणाऱ्या रुपांविषयी मी पूर्ण अज्ञानी आहे. तू बालस्वरुपात असताना आपले ईप्सित साध्य करुन घ्यावयाचे चातुर्य मला साधले नाही. त्याबद्दल हे देवते तू मला दूषणही दिलेस. पण हा व्यवहार मानवी पातळीवरचाच झाला असता एकतर तू मला फसवायचे अगर मी तुला फसवायचे. देवते असेच जर असेल तर मग चातुर्यात तू मला नक्कीच हरवशील. येन केन प्रकारेण तुला माझी वंचनाच करायची असेल तर हे देवते तू खुशाल कर. पण काहीही झाले तरी प्रमव्दरेचे प्राण परत घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही."अस्फुट हास्य करीत मृत्यु देवता म्हणाली, "मूर्खा! तू कितीही शब्दच्छल केलास तरी माझ्या सामर्थ्याचे, माझ्या मर्यादांचे उल्लंघन मी कदापि करणार नाही. तुम्हा मानवांना स्वयंप्रज्ञा असल्यामुळे तुमचे संचित तुमच्या हाती आहे. परंतु भ्रामक कल्पनांचा पाठलाग करताना तुम्ही आपल्या प्रज्ञेचा वापरच करीत नाही. केवळ स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी तू प्रमव्दरेचे संचित बदलू पहात आहेस. त्यासाठी तू काय द्यावेस हे मी कसे सांगू? माझे स्वच्छ मत असे आहे की तिच्या प्राप्तीची इच्छाच तू करू नयेस. विधियोजनेनुसार जे योग्य तेच झाले आहे, असे असूनही तुझी आर्तता पाहुन तुझी इच्छा पूर्ण करण्याची संधी मी एकवार तुला दिली आहे. मला तुझी वंचनाच करावयाची असती तर तू इथवर पोहोचू शकला नसताच. मूर्खा उच्च श्रेणीतील देवता कधीही असत्य, अर्धसत्य वा भ्रामक कथन करीत नसतास. त्यांचा शाप अथवा वर कधीही अस्थाई नसतो. मग तुझ्यासारखे अज्ञ त्याला वंचना म्हणोत. तसेच माझ्यापेक्षा काही वेगळे उच्च श्रेष्ठ तत्व अस्तित्वात नाही. ती केवळ तुझ्या मूढ मनाची भ्रांती आहे. मी तुला निर्वाणीचे बजावीत आहे. एकतर विधि संकेता विरुद्ध जाण्याचा हट्ट तरी तू करू नकोस अथवा तुझ्या ईप्सित पूर्तीसाठी योग्य मोबदला तरी तू दे. योग्यायोग्य विचार करायला तू पूर्णपणे स्वतंत्र आहेस." देवतेचे कथन ऐकुन रुरू पूर्णपणे निराश झाला. देवतेने देऊ केलेली दुसरी संधी मूर्खपणापाई हातची घालवून आयुष्य मातीमोल करुन घेण्यापेक्षा सर्वसंगपरित्याग करुन विरक्त जीवन जगावे अशी त्याची धारणा होऊ लागली. त्याच वेळी यशप्राप्तीची संधी हाती आली असता तिच्याकडे पाठ करुन माघार घेणे सर्वथा अयोग्य आहे. हा विचारही त्याच्या मनात आला.आपली भ्रांती दूर करण्यासाठी पूर्ण विचार करून त्याने आराध्य देवता मीनाक्षीला साकडे घातले. आपले मानसिक संतुलन ढळू नये यासाठी त्याने आंत्यंतिक श्रद्धेने पुन्हा एकदा देवी करुणाष्टक मनात म्हटले. रुरुचे स्तवन सुरु असता मृत्युदेवतेच्या मुद्रेवर जागृत होणारे सात्विक भाव पाहिल्यावर त्याचे मनोधैर्य वाढले. स्तवन पूर्ण होताच तो निग्रहाने म्हणाला, “मृत्यूदेवते! प्रमव्दरेच्या प्राणदानाच्या मोबदल्यात श्रद्धायुक्त अंतःकरणाने मी तुझे पदवंदन करीत आहे. हे देवते माझी भ्रांती आता दूर झाली आहे. माझे आराध्य दैवत आणि तू दोघेही एकच आहात याचे ज्ञान आता मला झाले आहे." रुरुने देवतेला साष्टांग नमस्कार घालून तिच्या चरणावर मस्तक ठेवले. “रुरू! तू श्रद्धापूर्वक केलेले वंदन मला पावले आहे. त्याच्या बदल्यात प्रमव्दरेचे प्राण तुला खचितच परत मिळतील...पण यामध्येही एक अडचण आहे." देवतेचे उद्गार ऐकताच रुरुचे ओठ शुष्क झाले. "देवते! शेवटी तुम्ही देवता निष्ठुर असता हेच खरे. आपले स्वयंभूत्व अबाधित राखण्यासाठी तुम्ही कधी कसा पवित्रा बदलाल हे सांगता येत नाही. देवते माझा हेतू प्रांजळ असेल, प्रमव्दरेविषयी माझी भावना शुद्ध असेल तर विधिलिखीतही टळेल अशी माझी श्रद्धा आहे. देवते! कोणती अडचण आहे तर ते सांग.!"मृत्युदेवता म्हणाली, "मूढा... स्वयंभु देवता तुम्हा मानवांच्या निष्ठा, श्रद्धा जरुर पारखतात. याचा अर्थ त्या निष्ठुर असतात असे नाही. माझी अडचण ऐक! जीवन समाप्ती एवढेच माझे कार्य आहे. तरीही तुझे धाडस आणि अढळ श्रद्धा पाहून विधिसंकेतात न बसणारे तुझे ईप्सित पूर्ण करण्याची संधी मी तुला दिली आहे. मात्र हे करीत असता तुझी वंचना आणि माझ्या मर्यादांचा भंग होऊ नये याची दक्षता मी घेत आहे. परंतु तुझ्या मूढ मतीला एवढे तारतम्य सुचत नाही. म्हणूनच ज्या देवतेकडून वरदान मागायचे तिची निर्भर्त्सना करण्याचा तुझा प्रमाद मी पोटात घालीत आहे इतकेच. मूढा! प्रमद्वरेचे केवळ प्राण मिळून तुझे ईप्सित कसे साध्य होईल? त्यायोगे ती क्षणकाल सचेतन होईल इतकेच. तिला आयुष्य लाभायला हवे तरच माझ्या अनुग्रहाला काही अर्थ उरेल. अन्यथा क्षणिक प्राणदान ही तुझी घोर वंचनाच ठरणार नाही का? प्रमव्दरेला आयुष्य लाभावे अशी काही भरपाई तू देऊ शकशील का? तसे असेल तर जरुर सांग." देवतेचे हे कथन ऐकल्यावर रुरुने किंचीत काळ विचार केला. मग मृत्युदेवतेला नमस्कार करुन तो म्हणाला, "हे मृत्युदेवते! तुझी करुणा मी खरोखरच ओळखू शकलो नाही. तुझ्या स्वरुपाचे पूर्ण ज्ञान आता मला झाले आहे. मी यापूर्वी केलेले कथन हा माझा घोर प्रमाद आहे. हे मान्य करुन त्या पापक्षालनार्थ हा माझा प्रणाम तू स्वीकार.!"मृत्युदेवतेला साष्टांग नमस्कार करुन तिच्या चरणी लीन होऊन रुरुने देवी करुणाष्टकाचे पुरश्चरण केले. मग विनम्रपणे अधोमुख होऊन तो म्हणाला, “मृत्युदेवते! तू मला वरदान देऊ इच्छित आहेस हे खरे पण ते घेताना माझ्या मनात अद्याप रेंगळणाऱ्या शंकेचे निरसन तू करावेस अशी माझी विनंती आहे. माझे स्वतःचे किती आयुष्य उरले आहे ते तू मला सांग.” शंका निरसनाच्या नावाखाली रुरु आपल्याला अडचणीत टाकणारी पृच्छा तर करणार नाही ना? या विषयी जागरुक असलेली मृत्युदेवता म्हणाली, "रुरु! तुझ्या मृत्युचा नेमका दिवस काही मी सांगू शकणार नाही. परंतु आयुर्मानाची संवत्सरे पाहिजे तर सांगेन." मान डोलावित रुरु म्हणाला, "सांग देवते! माझे आयुष्य किती उरले ते तर मला कळूदे!” रुरुची पृच्छा अगदी सामान्य आहे हे समजल्यामुळे गाफील झालेल्या मृत्यूदेवतेने त्याच्या आयुर्मानाची संवंत्सरे किती तो अंक उच्चारला. तो ऐकताच आपण आजपर्यंत जगलेला कालावधी वजा करावयास देवता विसरली आहे. हे रुरुने ओळखले पण वरकरणी तसे न भासविता त्याने खिन्न मुद्रा केली. "देवते! प्रमव्दरेविना इतका दीर्घकाळ मला जीवन लाभावे यावर माझा विश्वासच बसत नाही." मृत्युदेवता कठोर स्वरात उद्गारली, "रुरु येथे तुझ्या इच्छा अनिच्छेचा प्रश्नच येत नाही. तुझा विश्वास बसो न बसो! मी सांगितले ते त्रिकालाबाधित सत्य आहे. एवढे मात्र लक्षात ठेव.” त्यावर रुरु म्हणाला, "हे देवते, तू म्हणतेस त्या अर्थी ते सत्यच आहे म्हणजे इतर मानवापेंक्षा मला खूपच आयुष्य लाभले म्हणायचे. मला एवढे दीर्घायुष्य बहाल करण्यात विधिची काय असेल? ही गोष्ट मला अगम्य आहे" रुरुच्या या बोलण्यावर मात्र मृत्युदेवता भांबावली.अनवधानाने आपल्याकडून झालेली चूक देवतेच्या लक्षात आली. तिच्या मुद्रेवर बदलत जाणारे भाव रुरूने अचूक टिपले. त्याच क्षणी तो निर्धाराने बोलू लागला. "देवते! माझी वंचना होणार नाही अन् तुझे वरदानही वाया जाणार नाही. असा पर्याय आता मला सुचला आहे. प्रमव्दरेला आयुष्य प्राप्त होण्यासाठी पर्यायी आयुष्यच मिळायला हवे. तर हे देवते माझे जे आयुष्य अद्याप शिल्लक आहे, असे काही क्षणापूर्वी तू मान्य केलेस, त्यातले निम्मे आयुष्य, प्रमव्दरेला मिळू दे! देवते तू असे मला वरदान दे!” वरदहस्त उंचावित मृत्युदेवता म्हणाली, “तथास्तु!”

                              **********