चाळीतले दिवस भाग5
आमची वस्ती जरी चाळ म्हणून ओळखली जात असली तरी प्रत्यक्षात महानगरपालिका हद्दीत अंदाजे पंचवीस तीस एकराहून अधिक सरकारी जागेवर अस्ताव्यस्त पसरलेली गरीब वा निम्नमध्यमवर्गातील लोकांची गलीच्छ वस्ती होती. आजूबाजूच्या छोट्या मोठ्या कारखान्यातले रोजंदारी कर्मचारी,रिक्षाड्रायव्हर्स, खाजगी कंपन्यात काम करणारा कुशल कामगार याबरोबरच सरकारी ड वर्ग कर्मचारी क्वचित पांढरपेशा व माजी सैनिक इथे मोठ्या संख्येने रहात होते.हाताला काम नसणाऱ्या तरुणांचा भरणाही इथे होता.दिवसभर मटका जुगार खेळणारे,बीडी शिगारेट दारूच्या व्यसनात अडकलेल्या लोकांची संख्याही खूप होती.
काही सिनेमा स्टाईल सडकछाप प्रेमवीरही इथे होते. खुलेआम आपापल्या मैत्रिणीना घेऊन गुण उधळणारे तरुणही आजूबाजूला होते.इथे प्रेमापेक्षा तारुण्यसुलभ आकर्षणातून लपून छपून एकत्र येणाऱ्या तरुणाईला पाहून इथे रहाणाऱ्या माझ्यासारखा विद्यार्थी घडण्यापेक्षा बिघडण्याची शक्यता अधिक होती,मात्र माझ्यावर झालेल्या वाचन संस्कार आणि दैवाने दिलेल्या सारासार विवेकबुध्दीच्या देणगीमुळे मी कोणत्याही भलत्या मार्गाला लागलो नाही. माझ्यासारखेच काही तरूणही तिथे राहात होते. वस्तीतल्या एकंदरीत वातावरणात आम्ही कॉलेजात शिकणारे तसे वेगळे पडायच. याच काळात आमच्यात हनुमान नावाचा एक तरुण दररोज हजेरी लाऊ लागला.
कडक इस्त्रीचे कपडे,चकाचक पॉलिशचे बूट, डोळ्यावर सतत घातलेला महागडा गॉगल अशा वेशातला हनुमान प्रथमदर्शनीच समोरच्या माणसावर छाप पाडायचा.जसे जसे दिवस जाऊ लागले तसे मंडळाच्या मुलांवर हनुमानच्या दिलदार स्वभावाची जादू वाढायला लागली.तो साईबाबा मंदिराजवळ आला की त्याच्या भोवती मुलांचा गराडा पडू लागला.हा हनुमान येताना बऱ्याचदा त्याची सजवलेली रिक्षा घेऊन यायचा त्यामुळे प्रथमदर्शनी तो रिक्षा चालवत असावा असा माझा समज झाला होता,पण नंतर समजले की तो पुणे स्टेशन भागात एका नामांकित हॉस्पिटलमधे नोकरी करतो! त्याच्या राहणीमानावरून तरी तो चांगल्या पगारावर आणि मोठ्या हुद्द्यावर काम करत असावा असे वाटत होते प्रत्यक्षात तसेही नव्हते. तो त्या हॉस्पिटलमधे वार्डबॉय म्हणून काम करत होता.जशी जशी हनुमानची माहिती मिळू लागली तसे तसे त्याच्याबद्दल त्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दलचे
गूढ वाटू लागले. हनुमानने मंदिरालाही भरीव वर्गणी दिली होती त्यामुळे तो मंडळाचा महत्वाचा सदस्य झाला होता.मी वेळ मिळेल तेव्हाच मंडळाकडे जायचो त्यामुळे माझी आणि हनुमानची ओळख जरा उशीराच झाली. हनुमानच्या आजूबाजूला मुलांचे कोंडाळे का वाढत चालले आहे, तो म्हणतो तसेच मुले का वागतात याचे कोडे लवकरच उलगडले…
हनुमानकडे प्रचंड पैसा होता आणि व्यसनी मुलांसाठी खाण्या पिण्यावर तो वाट्टेल तेव्हढा पैसा खर्च करत होता,त्यामुळे ‘असतील शीते तर जमतील भुते’ या न्यायाने त्याच्या पुढेमागे सतत मुले गोंडा घोळत असायची.एक दोनदा त्याच्याबरोबर तिथल्या उडप्याच्या हॉटेलात जायला मिळाले तेव्हा त्याच्या लोकप्रियतेचे कारण लक्षात आले.मागचा पुढचा विचार न करता ज्याला जे हवे ते तो खाऊ देत होता आणि सर्वांचे बील हसतमुखाने भरत होता.ज्या मुलांना नियमित दारूचे व्यसन होत त्यांच्या दारूची सोय हनुमान करायचा, कुणाला नॉनव्हेज खायचे असेल तर कॅम्पातल्या डायमंड क्वीन हॉटेलात मनसोक्त खायला घेऊन जात असे.एक दोनदा मी मित्रांबरोबर तिकडे जेवायला गेलो तेव्हा पुढची गोष्ट ऐकून अक्षरश: हादरलो होतो.डायमंड क्वीनचे जेवण झाल्यावर ज्यांना तशा गोष्टी आवडतात त्यांना रेड लाईट एरियात नेऊन ‘ती’ सोयही तो करायचा.हाईट म्हणजे पुढे त्यातून कुणाला आजार झाला तर डॉक्टरही ठरवून दिला होता! अर्थातच सगळी बील हनुमान भरायचा.गणेशोत्सव, बुध्द जयंती असो वा नाताळ, उत्सवकाळात रात्री गाजलेले हिंदी मराठी सिनेमे वस्तीतल्या रस्त्यावर पडदा बांधून दाखवण्याचा सपाटा त्याने लावला होता.मी शम्मी कपूर, राजेश खन्ना यांचे बहुतेक सर्व सिनेमे या रोडवर बसून बघितले आहेत.आमच्या मंडळाची लोकप्रियता त्यामुळे अजूनच वाढली होती.
मंडळाच्या वतीने बांधले जाणारे चार भिंती आणि मंगलोरी कौले घातलेले साईबाबा मंदिरही या दरम्यान बांधून झाले. मंदिरात मूर्तीसाठी एक चबुतरा बांधून साईबाबांची एक मोठी तसबीर लावली गेली.ढोल लेझीम लाऊन मिरवणूक काढून रामनवमीच्या मुहूर्तावर मंदिराचे लोकार्पण झाले.आता मूळच्या कचराकुंडीचे रूपांतर एका भक्तीकेंद्रात झाले होते. मंदिरात रोज आरतीला साईभक्तांची गर्दी वाढू लागली.
(क्रमश:)
- प्रल्हाद दुधाळ.