तिला सोडून मी मित्राच्या रूमवर परतलो, आणि दुसऱ्या दिवशीसाठी तयारी सुरू केली. सकाळी लवकरच आवरून घेतलं, कारण आजचा दिवस तितकाच खास असणार होता. तिला माझ्यावर white शर्ट खूप आवडत, त्यामुळे मी मुद्दामच व्हाइट शर्ट घालून तिला भेटायला निघालो. तिला खूश करण्यासाठी मी विचारपूर्वक त्या शर्टची निवड केली होती. जेव्हा तिला भेटायला गेलो, ती अगदी मला आवडणाऱ्या पिवळ्या रंगाच्या long कुर्ती मध्ये दिसली, आणि तीचं ते रूप पाहून माझं मन मोहून गेलं. तिच्या आवडीचा रंग आणि तिचं प्रसन्न हसणं, हे सगळं दिवसाची सुरुवातच गोड बनवत होतं.
आज आम्ही लाल महाल पाहायचं ठरवलं होतं. इतिहासात रमायला लाल महालसारखं ठिकाण नव्हतं. त्या ऐतिहासिक जागेचं सौंदर्य आणि तेथील प्रत्येक कोपऱ्यात लपलेली कहाणी आम्ही अनुभवत होतो. ती जागा पाहता पाहता, वेळेचं भानच राहिलं नाही. जेव्हा लाल महाल पाहून बाहेर पडलो, तेव्हा जवळपास दुपार झाली होती, आणि भूक तर प्रचंड लागली होती. मग आम्ही एकमताने ठरवलं की, आज मस्तपैकी मटण खाऊया, त्या मटणाचं जेवण आणि तिची सोबत. हे क्षण दिवसाला अजूनच खास बनवत होते.
जेवण करून बाहेर पडलो, आणि बाहेर वातावरण बदललेलं होतं. आकाशात काळे ढग जमा झाले होते आणि पावसाची चाहूल लागली होती. पाऊस आणि प्रेमाचं नातं तर कायमच खास असतं, आणि आज तिची सोबत या वातावरणात अजूनच सुंदर वाटत होती. आम्ही त्या वातावरणात शांतपणे एका ठिकाणी बसलो. पावसाच्या सरी हवेत दरवळत होत्या, आणि त्या साजरी शांततेत तिच्या सोबत वेळ घालवणं, हे जणू प्रत्येक क्षणाला एक नवीन अर्थ देत होतं. काही विशेष बोलायची गरजच नव्हती. फक्त तिची सोबतच पुरेशी होती.
पाऊस जरा जोरात सुरू झाला, त्यामुळे जास्त कुठे फिरता आलं नाही. पण खरं सांगायचं तर त्याची काही खंत नव्हती, कारण तिच्या सोबतच्या त्या काही शांत क्षणांत मी खूप आनंदी होतो. पावसाच्या थेंबांच्या सुरात आणि तिच्या सोबतीच्या गोडव्याने दिवसाचा शेवट जणू स्वप्नासारखा झाला. अशा सुंदर आठवणींचा दुसरा दिवसही संपला, पण त्या पावसात घालवलेला वेळ कायमच लक्षात राहील.
कालच्या पावसामुळे बरंच काही पहायचं राहून गेलं होतं, आणि आज पुण्यातला शेवटचा दिवस होता. त्यामुळे मनात एक वेगळाच उत्साह आणि हलकासा खेदही होता. आज तिला भेटायला थोडासा उशीरच झाला, जवळपास दुपारीच आम्ही एकत्र आलो आणि मग लगेचच जेवायला गेलो. मस्तपैकी जेवण झालं, आणि एकमेकांच्या सोबतचा वेळ विशेष वाटत होता. जेवणानंतर आम्ही भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन घ्यायचं ठरवलं. त्या ठिकाणचं ऐतिहासिक महत्त्व मनात घर करून गेलं. रंगारी वाड्याचं सौंदर्य आणि त्यात दडलेल्या ऐतिहासिक गोष्टींनी मन भारावून गेलं. गणपती दर्शनानंतर आम्ही तिथल्या वाड्यातील जुन्या, ऐतिहासिक गोष्टी पाहत होतो. ज्या एका काळाच्या साक्षीदार होत्या. त्या प्रत्येक गोष्टीत एक प्रकारचं वैभव आणि पुण्याचा जुना इतिहास डोळ्यांसमोर उभा राहत होता.
त्यानंतर आम्ही नाना फडणीसांचा वाडा पाहायला गेलो. तो वाडा म्हणजे खरोखर अप्रतिम होतं! तिथलं स्थापत्य, जुन्या काळातील वस्तू , आणि वातावरणचं वेगळं जादूचं असं होतं. त्या वाड्याचं सौंदर्य, त्याचं ऐतिहासिक महत्त्व, सगळंच खूप अप्रतिम होतं, आणि त्या जागेने मन पूर्णपणे मंत्रमुग्ध केलं.
सूर्य पुनः मावळतीस चालला होता, आणि तो क्षण मला कालच्या शनिवार वाड्याच्या समोर तिच्यासोबत घालवलेल्या वेळेची आठवण करून देत होता. त्या ऐतिहासिक जागेतील शांततेत तिच्यासोबतची गप्पा, हसणं, आणि एकमेकांना जाणून घेणं, हे सगळं मनात जीवंत झालं. मग, तिथे पुन्हा जाण्याचा मोह आवरला नाही. मी तिथे जाण्याचं ठरवलं, कारण त्या जागेचं आकर्षण आणि तिच्या सोबतच्या आठवणींनी मनाला एक वेगळं समाधान दिलं होतं. पुण्यात आल्यानंतर तिला ओळखण्यासाठी आणि तिच्या समवेत वेळ घालवण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक क्षणाची जाणीव होत होती. तिथे जाण्याचा विचार करताना मला जाणवत होतं की, माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात तिच्यासोबतच्या त्या गोड आठवणींनी कायमचा ठसा ठेवला आहे.
आता मात्र निरोप घेण्याची वेळ आमच्यावर आली होती. आमच्या भेटीची सुरुवात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने झाली होती, आणि आता शेवटही तिथेच होणार होता. दगडूशेठ च्या दर्शनात ती किती खूश होती, आणि आजच्या निरोपाच्या क्षणात तिच्या डोळ्यांत त्या आनंदासोबतच एक वेगळं शून्यताही होती. हे नातं अजून छान फुलायला तिला थोडा वेळ हवा होता, पण मनाने आम्ही अगदी एकमेकांमध्ये गुंतलो होतो. ती मला स्वारगेटवर सोडायला आली होती, आणि वातावरण जणू एकदम भावनिक झालं होतं. ती गप्प होती, आणि मीही. आमच्यात फारसं बोलणं झालं नाही, पण मनांत खूप काही घडत होतं. त्या निरोपाच्या क्षणी जाणवलं की, त्या ३ दिवसांच्या फिरस्तीने मी एक नवीन नातं निर्माण केलं आहे. एक असं नातं, ज्यात प्रेम आहे, ओळख आहे, आणि खूप काही गोड आठवणी आहेत.
ती माझ्या जवळ आली, आणि या क्षणात वेळ थांबल्यासारखा वाटत होता. एकमेकांच्या हातात हात देत, तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसणं आणि त्या निरोपाच्या भावनांनी मन हलकं झालं. "पुन्हा भेटू," असं ती म्हणाली, आणि मला जाणवलं की, जरी हे एक अंतराचं भान होतं, तरी या नात्यातली गोडी अजूनही जिवंत आहे. निरोप घेताना, मनात एक अद्भुत शांतता होती, आणि पुन्हा भेटण्याची आशा मनाला प्रोत्साहित करत होती.