They should also be able to enjoy happiness in Marathi Short Stories by Ankush Shingade books and stories PDF | त्यांनाही सुख उपभोगता यावं

Featured Books
Categories
Share

त्यांनाही सुख उपभोगता यावं

त्यांनाही सुख भोगता यावं?

         *जाती कशा निर्माण झाल्या असतील बरे? हा लोकांना नेहमीच प्रश्न. तसं पाहिल्यास नेहमीच जाती ह्या कामावरुन पडल्या असं म्हटलं जातं. तशा पुर्वी जाती नव्हत्याच तर वर्ण अस्तित्वात होते. कालांतरानं एक असा व्यक्ती निर्माण झाला नव्हे तर केल्या गेला की त्यानं कामाला जातीचं स्वरुप दिलं. ते आपला उल्लू सरळ व्हावा. आपल्याला काम करावं लागू नये व सुख मिळावं म्हणून. त्यानं आपली अक्कल वापरुन कामावरुन जाती तर निर्माण केल्याच. शिवाय इथल्याच माणसाला गुलाम बनवलं. कोणाला देवादिकावरुन तर कोणाला अंधश्रद्धेवरुन तर कोणाला विदेशी आक्रमण कऱ्यांच्या हस्ते. त्यानंतर आपला डाव साधला व ती महामारी आणली. ज्यातून भेदभाव, अंधविश्वास, विश्वासघात हे आजार पसरले. ज्याची लागवण त्या काळात जरी झाली असली तरी आजही ते रोग संपलेले नाहीत.*
           चांभार समाज. म्हणतात की चांभार हे काल देशाचे राजे होते. त्यांनी राजपद हिसकावून घेतलं नाही तर ते देण्यात आलं होतं स्वखुशीनं असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. त्यासाठी प्राचीन काळातील इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. चांभार व महार हे शुद्ध शब्द नंतर आले असावे. पुर्वी या शब्दांना माहार व चमार म्हटलं जात असावं.
          प्राचीन काळात जसा माकड झाडावरुन खाली येवून राहू लागला. तशा गरजाही वाढल्या असतील. त्या गरजा पुर्ण करीत असतांना कामाची निर्मीती झाली असेल. शिवाय कामाचीही विभागणी झाली असेल. चामड्याच्या कामाशी संबंधीत असलेल्या जाती होत्या चांभार, मांग, मेहतर, खाटीक व महार. चांभारला चमार म्हटलं जात असेल. चमारचा अर्थ, च अर्थात चर्म, मा अर्थात मांस व र अर्थात रक्त. हे लोकं चामड्याशी संबंधीत काम करीत असतील व यांचा रक्त मांस व चामड्याशी संबंध येत असेल. ही मंडळी चामडे पकविण्याचे काम करीत असतील. मांग या शब्दाचा अर्थ होता. मां अर्थात मांस व ग अर्थात गलविणे म्हणजेच चांभारानं पकविलेल्या चामड्याचा उपयोग करणे. त्यानुसार मांग लोकं चामड्याचा वापर करुन ढोल, तंबोरे, खंजिरी, डफ बनवत असतील. हे प्राण्यांना घाबरविण्यासाठी असेल. महारला माहार नाव होतं. मा अर्थात मांस, हा अर्थात हाड व र अर्थात रक्त. ती मंडळीही चामड्यांशी संबंधीत कामं करीत असतील. ज्यात मांस हाड मांस व रक्ताशी संबंध येत असेल. जशी ते हाडापासून बासरी बनवीत असतील. हेही हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठीच असेल. मेहतरचा अपभ्रंश मैहतर असेल. मै अर्थात मैला, ह अर्थात हाडे, त अर्थात तत्सम सर्व वस्तू व र अर्थात रक्ताशी संबंधीत सर्व वस्तू व या सर्वांची स्वच्छता करणे. खाटीकचा शब्दावरुन अर्थ असेल खा अर्थात खांड खांड करणे म्हणजेच तुकडे करणे. अर्थात मांसाचे तुकडे करणे. टी अर्थात त्याला टिकवणे व क अर्थात कवटीचीही विल्हेवाट लावणे. त्यानंतर पोटजातीही आल्या. त्या पोटजातीही कामावरुनच पडल्या. 
         ही झाली चामड्याशी संबंधीत कामं. आता शेतीशी संबंधीत कामावरुन कुनबी जात आली असेल. कु अर्थात कृषीत, न अर्थात नवनव्या स्वरुपात बी अर्थात बिया लावणारा. माळी मा अर्थात माळवा ळी अर्थात रोपन करणारा त्यानंतर पोटजाती आल्या. फुलमाळी अर्थात फुलाचे रोपन करणारा. शेतीशी संबंधीतच पुढे तेली जात निर्माण झाली असेल. तेली अर्थात शेतीतून निघणाऱ्या धान्यावर प्रक्रिया करुन तेल काढणारा. हे नाव व हे काम बऱ्याच वर्षानंतर अस्तित्वात आलं असावं. गरजेनुसार कामं व कामाशी संबंधीत नावे आली असतील. शिंपी देखील कृषीशी संबंधीतच असेल. विणकरही कृषीशी संबंधीत असेल. धोबी देखील कृषीशीच संबंधीत असेल. तशाच काही जाती ह्या अलंकारीक कामाशी संबंधीत निर्माण करण्यात आल्या असतील. ज्यात ज्यात सोनार, दागीने बनविणे, कुंभार, मातीच्या वस्तू तयार करणे, सुतार, लाकडाच्या वस्तू तयार करणे, लोहार, लोखंडाचा शोध लागल्यानंतरची जात. लोखंडाच्या वस्तू तयार करणे. न्हावी, केस कापणे वा त्याच्या वस्तू बनविणे. गवंडी, घरे बांधणे. त्यानंतर ह्या कामावर देखरेख ठेवणारा एक घटक निर्माण झाला असेल. त्यानंतर या घटकानं विचार करुन आपलीच मक्तेदारी कशी निर्माण करता येईल याचा प्रयत्न केला असेल व त्यानं एक नवी व्यवस्था निर्माण केली असेल. ज्याची अजिबात गरज नव्हती. ती व्यवस्था होती धार्मीक विधी आणि ही विधी करण्यासाठी त्यानं गुरव जात निर्माण केली असेल. जो गुरव धार्मीक विधी करायचा. त्यानंच भाट जात निर्माण केली. भाट हा निरोप द्यायला जायचा. त्यानंच बनिया जात निर्माण केली. बनिया कोणतीही गोष्ट त्यात तेल मीठ लावून सांगायचा की ती इतरांना पटेल. अर्थात ही मंडळी वरीलप्रमाणेच कामं करीत असावी. जेणेकरुन त्याच कामावरुन त्यांना नावे देण्यात आली. ती नावे त्यांना ओळखण्यासाठी देण्यात आली असेल. 
         कामावरुन नावं आली असावीत. ती नावं ओळख म्हणून आली असावीत. ज्यात जातीचा कुठलाही संबंध नसेल आणि भेदभावही नसेलच. परंतु तद्नंतर जाती पडल्या असाव्यात व राजवंश अस्तित्वात आले असावेत.
           महत्वाचं सांगायचं म्हणजे आज मात्र भेदभाव आहे. तो भेदभाव काल जातीजातीत वाढला होता. आजही देश स्वतंत्र झाला असला आणि संविधानही बनलं असलं तरी थोड्याफार प्रमाणात आहेच. त्याचं कारण आहे विदेशी आक्रमणकर्त्यांनी आपल्या मनात ओतलेलं विष. अन् त्या विदेशी आक्रमण कर्त्या लोकांच्या मनात आपल्याच लोकांनी बिंबविलेलं विष. आपल्याच काही लोकांनी कामं व्यवस्थीत चालावीत म्हणून जे देखरेख ठेवण्याचं काम एका विशिष्ट व्यक्तीला सोपवलं होतं. त्या व्यक्तीनं स्वतः तर आपलं काम केलंच नाही. तो देखरेखही ठेवायला वा कामाची तपासणी करायला गेलाच नाही. परंतु कामाची तपासणी करण्यासाठी त्यानं आणखी एक व्यक्ती नियुक्त केला. ज्याला भाट नाव दिलं गेलं. हा भाट लोकांच्या कामावर लक्ष ठेवायचा. शिवाय बडबडही. त्याच्या बडबडपणाला त्रासून लोकं त्याला काहीबाही बोलत असावेत. त्याला आणि देखरेख ठेवणाऱ्या व्यक्तीलाही. ज्यातून तो देखरेख ठेवणाऱ्या व्यक्तीला त्या लोकांचं बोलणं सांगत येत असेल. ज्यातून त्याच देखरेख ठेवणाऱ्या व्यक्तीनं एक नवा व्यक्ती नियुक्त केला व एक नवी व्यवस्था. तो म्हणजे गुरव व ती नवी व्यवस्था म्हणजे मंदीर. देव दानव, अंधश्रद्धा व भूत प्रेत. याच लोकांना मुर्ख बनविण्यासाठी गुरव निर्माण केला.
         तो देखरेख ठेवणारा व्यक्ती फार हुशार होता. त्याला माहीत होते की हा माकडमानव हिंस्र प्राण्याला घाबरतो. हा वीज कडाडल्यावर घाबरतो. हा अग्नीला घाबरतो. हा पाण्यालाही घाबरतो. हा अमूक अमूक गोष्टीला घाबरतो व हा तमूक तमूक गोष्टीला घाबरतो. त्यामुळंच त्याला आणखी घाबरवावं लागेल. जेणेकरुन तो आपलंच ऐकेल व आपल्याच बोलण्यानुसार वागेल. असं मनात आणून त्यानं मंदिराची कल्पना सर्वांसमोर मांडली व सांगीतलं की त्यानं आपला फायदा होईल. वीज जास्त कडाडणार नाही. पाण्यात आपण बुडणार नाही. आगीपासून वाचता येईल. ह्या सर्व गोष्टी घडतात. त्याचं कारण आहे, देव आणि भूत. भूतच या गोष्टी घडवून आणत असतात. त्याचेवर नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला मंदीर निर्माण करायला हवं. त्यात देव बसवायला हवा व त्याची पुजा अर्चना करायला हवी.
         त्यानं मंदीर निर्मिती केली. तिथं देव बसवला. त्यानंच आपल्याच लोकांना तिथं कामावर नियुक्त केलं. कोणाला गुरव म्हणून तर कोणाला भट म्हणून. त्यानंच आपल्याचकडून मोठ्या हुशारीनं कामं करवून घेतली. लोकांनीही त्याचेवर विश्वास ठेवला. त्यानंतर त्यानंच त्याच मंदिरातील देवांच्या बाबतीत आवडीनिवडी निर्माण केल्या. देवाला अमूक अमूक आवडतं. अमूक अमूक आवडत नाही. हे त्यानंच सांगीतलं. त्यानंतर जे चामड्याचे काम करीत होते. ती माणसं व ते चामड्याचं काम देवाला आवडत नाही. हेही इतर लोकांच्या मनात बिंबवलं व त्यांचा मंदिरात प्रवेश निषीद्ध असतो हेही इतर चामड्याचं काम न करणाऱ्या लोकांना सांगीतलं. शिवाय मंदिरात देव निर्माण केला. तरी विजा कडाडतच होत्या. पावसाची भीती वाटतच होती. उन्हाळ्यात वणवे लागतच होते. तसं माणसानं पुन्हा सांगीतलं की हे सगळं घडत आहे, त्याचं कारण म्हणजे मंदिरातील चामड्याचं काम करणाऱ्यांचा प्रवेश. त्याला दुजोरा भाट व गुरव जातीनं दिला. कारण त्यांना आयतं काम न करता अन्न मिळत होतं. ते का नाही बोलणार देखरेख ठेवणाऱ्या माणसाकडून. तशी त्यांनी पुष्टी देताच इथंच कट शिजला व चामड्याचं काम करणाऱ्या माणसांचा मंदिरात प्रवेश निषीद्ध झाला. याचाच अर्थ असा की अशा देखरेख ठेवणाऱ्या व्यक्तीला ज्या लोकांनी नियुक्त केलं होतं. त्याच लोकांना त्यानं आपली अक्कल वापरुन बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर त्यानं हळूहळू त्या लोकांना तोडून टाकलं आणि त्यांना तोडण्यासाठी असे असे नियम लावले. जे नियम त्यांनी न पाळल्यास मृत्यूदंडाच्या शिक्षा होत असत. 
          विशेष म्हणजे काल ज्यांनी आपण करीत असलेली कामं व्यवस्थीत चालावीत म्हणून ज्याला नियुक्त केलं. त्याच माणसानं त्या लोकांच्या पाठीत खंजीर खुपसलं. भेदभाव, देवादिक व अंधश्रद्धाचं शस्र वापरुन. आजही तसाच भेदभाव आहे की ज्या भेदभावानं काल शासक असलेल्या लोकांच्या जीवनातील जखमेवर मीठ चोळलं व त्यांना नेस्तनाबूत केलं. त्यांनी केलेला तो विश्वासघातच. यावर विचार करायला हवा होता. परंतु विचार झाला नाही. परंतु आज तसं विचार करण्याची गरज आहे आणि विचारानुसार चांगलं वागण्याची गरज आहे. आपण तसा चांगला विचार करुन चांगलं वागावं. जेणेकरुन आज त्यांनाही समानतेनं जगता यावं. जातीभेद मिटवता यावा. तसंच समाजात सर्वांच्या बरोबरीनं बसून सुख उपभोगता यावं यात शंका नाही. 
          जाती कशा निर्माण झाल्या असतील बरे? हा लोकांना नेहमीच प्रश्न. तसं पाहिल्यास नेहमीच जाती ह्या कामावरुन पडल्या असंच म्हटलं जातं. कारण पुर्वी जाती नव्हत्याच तर वर्ण अस्तित्वात होते. हे आपल्याला संदर्भ ग्रंथावरुन कळतंच. कालांतरानं एक असा व्यक्ती निर्माण झाला नव्हे तर केल्या गेला की त्यानं कामाला जातीचं स्वरुप दिलं, ते आपला उल्लू सरळ व्हावा. आपल्याला काम करावं लागू नये व सुख मिळावं म्हणून. त्यानंच आपली अक्कल वापरुन कामावरुन जाती तर निर्माण केल्याच. शिवाय इथल्याच माणसाला गुलाम बनवलं. कोणाला देवादिकावरुन तर कोणाला अंधश्रद्धेवरुन तर कोणाला विदेशी आक्रमणकर्त्यांच्या हस्ते. त्यानंतर त्यानं आपला डाव साधला व ती महामारी आणली. ज्यातून भेदभाव, अंधविश्वास, विश्वासघात हे आजार पसरले. ज्याची लागवण त्या काळात जरी झाली असली तरी आजही ते रोग संपलेले नाहीत.

            अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०