Chalitale Divas - 4 in Marathi Biography by Pralhad K Dudhal books and stories PDF | चाळीतले दिवस - भाग 4

Featured Books
Categories
Share

चाळीतले दिवस - भाग 4

भाग 4.

    साईबाबाचे मंदिर बांधायची आमच्या मंडळाची कल्पना वस्तीतल्या लोकांना चांगलीच आवडली होती.लोक स्वतःहून यासाठी वर्गणी देऊ लागले.जिथे आम्ही मंदिराचे नियोजन केले होते ती रस्त्याच्या बाजूचा साधारणपणे पंधरा फूट बाय वीस फुटाची जागा होती.जमा झालेल्या वर्गणीतून मंदिराचे बांधकाम सुरु झाले.दरम्यानच्या काळात चंद्रसेन निकम ज्यांना आम्ही बापू म्हणायचो,त्यांच्या पुढाकाराने साईबाबा दिवाळी फंडही सुरु झाला.प्रत्येक सभासदांने काही वर्गणी जमा करायची आणि गरजू व्यक्तीला कर्ज द्यायचे अशी ही व्यवस्था होती.मी शिकत असल्याने या फंडाचा सभासद मात्र होऊ शकलो नव्हतो.

  मी स्वतः स्वयंपाक करून खायचो.बऱ्याच वेळा स्वयंपाक करायचा खूप कंटाळा यायचा अशावेळी इस्माईल भाई पठाण यांच्या बेकरीतून मी छोटा ब्रेड आणि अंडे विकत आणायचो आणि ब्रेड आम्लेट करून खायचो.इस्माईलभाईचा भाऊ आसिफ मंडळात आमच्याबरोबर असायचा त्यामुळे इस्माईलभाई मला ओळखत होता.एकदा इस्माईलभाईने मला मी काय करतो याबद्दल चौकशी केली.या वस्तीत राहून मी बीएस्सी करतो आहे याचे त्यांना खूपच कौतुक वाटले.कधी कधी मी ब्रेड अंडी उधारीवरही घेऊन जात असे.माझ्याकडे बऱ्याचदा पैशाची चणचण असते हे भाईनी काही दिवसांतच ओळखले.एक दिवस मी असाच ब्रेड घ्यायला त्यांच्याकडे गेलो असताना त्यांनी विचारले..

“ दुधाल, कॉलेज के  वास्ते तुम्हे पैसा किधरसे मिलता हैं, आपका भाई तो कुवेतमें हैं ना?”

“ कभी कभी भाभीसे लाता हूं, कभी गावमें जाके माँ से लाता हूं. ..”

“ याने हर महिना पैसा नहीं मिलता हैं तुम्हे, बराबर?”

मी होकारार्थी मान हलवून जमिनीकडे बघू लागलो.

“ सुनो दुधाल...तुम्हारा नाम मैं ने इस डायरी में लिखा हैं...अब जितना चाहे उतना ब्रेड और अंडा इस डायरी के तुम्हारे खाते में लिखनेका और लेके जाने का,कितना भी उधारी होने दो...जब कभी तुम्हारी नोकरी लगेगी तब  ये पैसा वापस कर देना!”

माझ्यासाठी इस्माईलभाई देव होऊन मदतीला आला होता कारण मला खरंच नियमितपणे खर्चायला पैसे मिळणे अवघड झाले होते! त्यानंतर कित्येक दिवस मी उधारीवर ब्रेड अंडी घेऊन जात होतो..मी नोकरीला लागेपर्यंत दोन हजाराच्या वर माझा उधारीचा आकडा गेला होता,पण भाईने एका शब्दाने मला पैशाबद्दल कधीही विचारले नव्हते.1982 साली मी नोकरीला लागल्यावर थोडी थोडी करून इस्माईलभाई ची उधारी चुकती केली.

  मेन रोडवरचा राजू गुप्ता आमचा किराना दुकानदार होता.पुण्यात आल्यावर भावाबरोबर बऱ्याचदा मी गुप्ताकडे माल आणायला जायचो त्यावेळी राजूचे वडील गल्ल्यावर असायचे.मी एकटा राहू लागल्यावर तिथूनच मला लागणारा किराणा घ्यायचो.माझी आणि राजुची छान ओळख झाली होती,त्यालाही मी झोपडपट्टीत राहून कॉलेजला जातो याचे कौतुक वाटायचे.त्यालाही माझ्या आर्थिक ओढाताणीबद्दल अंदाज आला होता.शिकत असताना माझ्या खाण्याची आबाळ होऊ नये असा विचार करून राजू माझ्याबद्दल त्याच्या वडिलांशी बोलला आणि नोकरी लागल्यावर पैसे देण्याच्या बोलीवर राजू मला हवा तेव्हढा किराणा उधारीवर देऊ लागला! नोकरीला लागल्यावर इस्माईलभाईप्रमाणेच राजुची उधारीही मी चुकती केली.

 मी रॉबर्ट या व्यक्तीकडून सायकल भाड्याने घेतली होती.महिन्याचे भाडे वीस रुपयेही मला वेळेत देणे शक्य व्हायचे नाही.एकदा तर मी  गरवारे कॉलेजबाहेर स्टॅन्डवर लावलेली माझी सायकल चोरीला गेली.आता रॉबर्ट सायकलचे पैसे मागणार म्हणून मी फारच घाबरलो.रडवेला चेहरा घेऊन मी दुकानात गेलो  आणि रॉबर्टला घडलेली गोष्ट सांगितली.रॉबर्ट मुळीच रागावला नाहीच पण त्याने मला धीर दिला म्हणाला..

“शोध जर मिळाली तर बघ, आता उद्यापासून ही दुसरी सायकल घेऊन जात जा कॉलेजला.”

त्याने दुसरी सायकल मला दिली.ती हरवलेली सायकल कधीच परत मिळाली नाही. मी नोकरीला लागल्यावर हरवलेल्या सायकलचे एकशेवीस रुपये रॉबर्टला दिले! रॉबर्ट,इस्माईलभाई व राजू गुप्ता यांसारखी देवमाणसे माझ्या आयुष्यात अगदी अडचणीच्या वेळी मदतीला धावली आणि माझा जगण्याचा मार्ग सुकर झाला.

दैवी चमत्कार म्हणजे अजून दुसरे काय असते?

   मी मनापासून अभ्यास करत होतो,नियमितपणे कॉलेजला जात होतोच,पण फावल्या वेळेत मंडळाच्या मुलांच्यातही रमत होतो.प्रचंड माणुसकी असलेल्या या मुलांच्यात काही अवगुणही ठासून भरलेले होते,पण त्यांच्या संगतीत राहून आपण बिघडू शकतो हा विचार माझ्या मनात कधीच आला नाही!

( क्रमश:)

प्रल्हाद दुधाळ.