या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का भाग ५(अंतिम भाग)
मागील भागात आपण बघीतलं की मृदुला कृपाच्या घरी गेली होती. आता बघू या भागात काय होईल ते.
मृदुला कृपाच्या घरून निघाली तीच मुळी गलीतगात्र होऊन. मृदुला कशी तरी गाडीपाशी आली. कितीतरी वेळ तिला गाडीची किल्ली सापडेना. पर्समधील सगळ्या खणांमध्ये शोधून तिला किल्ली सापडेना. ती किल्ली शोधताना थकली आणि उभ्या उभ्या तिला रडू कोसळलं.
पाच दहा मिनिटांनी तिचा उमाळा थांबला. तिने पुन्हा पर्समध्ये किल्ली शोधली. किल्ली सापडताच तिला हायसं वाटलं. किल्लीने कारचं दार उघडून ती ड्रायव्हिंग सीटवर बसली. कार सुरू करण्यासाठी किल्ली लावताना तिचा हात थरथरत होता. मृदुलाला आश्चर्य वाटलं ते याचं की आजपर्यंत इतक्या कॅंन्सर पेशंटचे मृत्यू तिने बघितले होते पण त्यावेळी तिला असा त्रास कधीच झाला नाही.
मृदुला कृपाच्या मृत्यू पचवूच शकत नव्हती. हताशपणे तिने कार सुरू केली. जाताजाता कृपाच्या घराकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी एकदा बघीतलं आणि कार सुरू करून निघाली.
****
घर येताच मृदुलाने कार गेट बाहेरच ठेवली आणि जडशीळ पावलाने कारमधून उतरली. वाॅचमनला कारची किल्ली देत सांगीतलं,
" सुनो जय गाडी साफ करेगा तो उसे कार अंदर रख देने के लिये बोलना."
जय मृदुलाचा ड्रायव्हर आहे.
" जी मॅडम. मॅडम आपकी तबीयत ठीक नहीं है?"
वाॅचमनने काळजीने विचारलं.
" ठीक है." अस्पष्ट पुटपुटत मृदुला घरात शिरली.
घरात हाॅलमधील सोफ्यावर मृदुलाने स्वतःला झोकून दिलं आणि ढसढसा रडायला लागली.
सासूबाईंंना तिच्या रडण्याचा आवाज आला तशा त्या बाहेर आल्या. मृदुलाची अवस्था बघून त्याही कळवळल्या. त्या हळूच तिच्या बाजूला जाऊन बसल्या आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागल्या.
"आई मी कशी जगू हो कृपाशिवाय? एक खरी मैत्रीण माझ्यापासून काळाने ओढून नेली. अशी मैत्रीण पुन्हा भेटेल का?"
मृदुलाने केविलवाण्या स्वरात विचारलं.
सासूबाईंंना काय ऊत्तर द्यावं कळेना.
" आई सांगा नं?"
मृदुलाने पुन्हा विचारलं.
"बाळा या आयुष्याच्या महासागरात वहात येणाऱ्या दोन ओंडक्यांची भेट होत असते पण प्रत्येकाची भेट ठरलेल्या वेळेलाच होते आणि ठरलेल्या वेळेपर्यंतच ते एकमेकांचे सोबती असतात. आपल्या हातात काही नसतं गं. या दु:खातून स्वतःला वेळीच सावर. कृपाने जो संजीवनी मंत्र तुला दिला आहे तो तू जाणीवपूर्वक कॅंन्सर पेशंटसाठी वापर. त्यांचं जगणं सुसह्य कर हीच तू कृपाला दिलेली खरी श्रद्धांजली असेल."
बराच वेळाने मृदुलाचे हुंदके थांबले.
****
आज जवळजवळ आठ दिवसांनी मृदुला क्लिनिक मध्ये जायला निघाली. आज तिचा फ्रेश चेहरा बघून सासुबाईंना बरं वाटलं. आठ दिवस तिचा मलूल चेहरा आणि कंटाळलेलं वागणं बघुन मृदुलाच्या नव-यालाही म्हणजे राजेशलाही आश्चर्य वाटलं. त्यालाही कृपाबद्दल माहिती होतं. कारण मृदुला येताजाता कृपाबद्दल राजेशला सांगत असे. मृदुलाच्या सांगण्यावरून त्यालाही कृपा एक ग्रेट पर्सनॅलिटी वाटायची.
कृपा मृदुलाच्या किती मनाच्या जवळची आहे हे त्यालाही माहीत होतं पण तिच्या जाण्याने मृदुला एवढी कोसळेल यांची त्याला कल्पना आली नव्हती.
आज मृदुलाला ब्रेकफास्ट साठी डायनिंग टेबलवर आलेलं बघून राजेशला बरं वाटलं.
" गुड मॉर्निंग. ये. आज मावशींनी पोहे मस्त केले आहे. चल गरम गरम खायला ये."
राजेश कृपाकडे बघून म्हणाला.
" हो आलेच."
हसत मृदुला खुर्चीवर बसली. मावशींनी लगेच तिच्या समोर प्लेट ठेवली आणि त्यात गरम पोहे वाढले.
" अरे व्वा! मावशी आज राजेशच्या आवडीचे तुरीचे दाणे घालून केलेत पोहे."
" हो मॅडम काल मला कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडे कोवळ्या तुरीच्या शेंगा दिसल्या म्हणून घेऊन आले."
" बरं केलंत."
मृदुलाला हस-या चेह-याने पोहे खाताना बघून राजेशला बरं वाटलं. तेवढ्यात सासूबाईं पण तिथे आल्या. त्यांनी मृदुलाला हसताना बघीतलं तसं त्यांनाही बरं वाटलं.
" मावशी आईंसाठी पोहे आणा."
मृदुला म्हणाली. तिच्या आवाजात आज बरच चैतन्य आलेलं राजेश आणि आईंच्या लक्षात आलं. दोघही एकमेकांकडे बघून समाधानाने हसले.
" हो आणते."
" मृदुला आज तुला हसताना बघून बरं वाटलं ग."
" आई तुम्ही काळजी करू नका. आता बरं वाटतंय मला. कृपाच्या जाण्याचा मोठा धक्का बसला होता. आठ दिवस लागले या मला धक्क्यातून सावरायला. आता पुर्वी पेक्षा जास्त मेहनत करणार कॅंन्सर पेशंटसाठी. त्यांचं जगणं सुसह्य करण्यासाठी मला आनंदी राह्यला हवं."
" गुड. मृदुला तू खूप कार्यक्षम डाॅक्टर आहेस.असं हरून चालणार नाही. खूप शुभेच्छा तुला."
राजेशने हस-या चेहे-याने मृदुलाचा हात हळूच दाबला.
" थॅंक्यू "
मृदुला आनंदाने राजेशला म्हणाली.
आज खूप दिवसांनी मृदुला हसतमुख चेहऱ्याने घराबाहेर पडली.
'तुझ्या माझ्यातील मैत्र होतं वेगळं…
तुझ्या असण्याने फुलणारं ;
माझ्या असण्याने सजणारं.
जगावेगळं हे नातं आहे रेशीम बंध ;
जे तुला आणि मला कळणारं,
फक्त तुला आणि मला कळणार.'
कारमध्ये बसल्या बसल्या मृदुलाच्या मनात या ओळी घरंगळत आल्या तशी मृदुला स्वतःशीच हसली.
__________________________________
समाप्त