मला स्पेस हवी पर्व २ भाग ३३ अंतिम भाग
आज नेहाचा जाण्याचा दिवस उजाडला.आज नेहा जाणार यामुळे सुधीरच्या आईला फार वाईट वाटत होतं. चहा करताना त्यांचे अजिबातच लक्ष नव्हतं. चहा यायला इतका उशीर का लागतो आहे हे बघायला सुधीरचे बाबा स्वयंपाक घरात आले तर त्यांना दिसलं की सुधीरच्या आईची कुठेतरी तंद्री लागली आहे आणि गंजातलं चहाचं पाणी आटून चाललं आहे. त्यांनी लगेच गॅस बंद केला आणि म्हणाले,
" अगं तुझं लक्ष कुठे आहे ?चहाचं पाणी सगळं आटलं."
यावर त्या म्हणाल्या,
" आज जरा अस्वस्थ वाटतं आहे."
सुधीरचे बाबा म्हणाले,
" तुझे पाय दुखतात आहे का? जा आराम कर. मी करतो चहा."
" नाही हो पाय वगैरे काही दुखत नाही पण खूप गळल्यासारखं वाटतंय ."
"का ग ताप आहे का ?बघू ."
असं म्हणून सुधीरच्या बाबांनी सुधीरच्या आईच्या हाताला हात लावून बघितलं.
" ताप तर वाटत नाही. तुझ्या डोळ्यात पाणी का?" त्यावर त्या म्हणाल्या,
" नेहा जाणार म्हणून माझं मन व्याकूळ झालं आहे. ती आजूबाजूला असली की खूप बरं वाटतं. आता इतक्या महिन्यांनी तिची चाहूल घरात आली. आता पुन्हा ती कधी येणार कुणास ठाऊक ?"
यावर सुधीरचे बाबा म्हणाले,
" हे बघ तिची नोकरी आहे ना त्यामुळे तिला जावं लागणार. तिला जाताना रडलेल्या तोंडाने निरोप देणार आहेस का?"
" नाही पण माझं मन रडवेल होतय."
" हे बघ आता जरा तू शांत रहा आणि चहा घे."
स्वयंपाक घराच्या बाहेर नेहाने दोघांचं सगळं संभाषण ऐकलं होत. तिने झपाटल्याप्रमाणे सुधीरच्या आईला जाऊन मिठी मारली आणि रडू लागली. त्यांना कळत नाही त्यांनी म्हटलं,
" नेहा का रडते आहेस ?"
ती म्हणाली,
" आई तुमचं मन जसं व्याकूळ झालंय ना तसंच माझं मनही व्याकुळ झालय. पाच महिन्यापूर्वी जो ताण मला आला होता त्याच्या तिरी मिरीत मी बंगलोरला प्रमोशन घेऊन गेली पण मला घरी आल्यावर तुमच्या सगळ्यांची खूप आठवण यायची. पण फोन करायला हिंमत व्हायची नाही ."
"का ? फोन केला असता तर तुलाच बरं वाटलं असतं."
सुधीर ची आई म्हणाली.
"हो .पण मला लाज वाटत होती. तुम्ही सगळे खूप समजावून सांगत होते तरीही तुमचं न ऐकता मी बंगलोरला गेले. आता कुठल्या तोंडाने तुम्हाला फोन करू?"
" अगं वेडी आहेस का ? हे तुझंच घर आहे. इथे तू पुन्हा फोन केला असता तर तुला कोणी सुळावर चढवलं असतं का ?"
" हे बघ देर आहे दुरुस्त आहे असं म्हणतात .फोन राहू दे तू प्रत्यक्ष इथे आलीस नं. "
सुधीरचे बाबा म्हणाले.
"आता तुला पटलंय ना आता तू इथे येत जा.'
सुधीरची आई म्हणाली.
"ऋषीच्या शाळेला सुट्टी लागली की तुम्ही तिघेही बंगलोरला नक्की या."
" हो नक्की येऊ. ऋषीला पण तुझी आठवण येते."
"मला आता आठवतोय सुधीर म्हणाला होता तुला स्पेस हवी असेल तर टूरला जाऊन ये म्हणजे फ्रेश होशील. पण तेव्हा मी ऐकलं नाही. नंतर मला पश्चाताप झाला. जेव्हा सुधीर बंगलोरला आला तेव्हा मला मनापासून आनंद झाला आणि लक्षात आलं मी माझ्या घरापासून वेगळी राहू शकत नाही ."
" कळलंय ना तुला ! हे महत्त्वाचं. आता तू काही काळजी करू नको तू इथे येत जा.मधून सुधीर तिथे येईल. तिथे आणि दोन वर्षानंतर तुला इथे परत पाठवलं की मग काही काळजीच नाही."
तेव्हा नेहा म्हणाली,
" जर मला इथे पाठवलं नाही तर मी नोकरी सोडून देईन ."
"नोकरी सोडण्याचा एकदम विचार करू नको." सुधीरचे बाबा म्हणाले.
" कारण तुझ्या आवडीचं काम मिळालेला आहे पुन्हा तसंच मिळेल की नाही याची खात्री नाही."
तेव्हा नेहा म्हणाली,
" बाबा माझ्या आवडीचं काम मिळालं पण मला तुमच्या सगळ्यांपासून खूप लांब राहावं लागतय. जो ताण मला प्रियंकाच्या जाण्यानंतर आला होता. त्या नातेवाईकांच्या विचित्र वागण्यामुळे ताण आला होता तो गेला. आता मला माझ्या कुटुंबाची गरज आहे. ऋषीला माझी गरज आहे. मला तुमची गरज आहे. आई बाबा तुम्ही जसं मला समजून घेतलं तसं जिने मला नऊ महिने कुशीत वाढवलं तिने पण नाही हे समजून घेतलं."
यावर सुधीरची आई म्हणाली,
" नेहा बेटा तुला मी म्हटलं होतं ना एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. तू इतक्या झटपट काहीही न सांगता बंगलोरला गेलीस आणि ऋषीला मागे सोडून गेलीस. याचा त्यांना राग आला असेल आणि त्यांच्या दृष्टिकोनातून तू किती चुकलीस हे त्यांना वाटल्यामुळे त्या तुला बोलल्या. तुझी आई आहेत त्या. त्यांच्या या रागावर दुर्लक्ष कर."
" हो आई."
" सुधीर उठला का ग?"
" नाही अजून ."
"मग जा त्याला उठव चहा झालाय. नाश्ता पण करतेय. "
" मी नाश्ता करते. तुम्ही थांबा. सुधीरला उठवून येते."
नेहा आपल्या खोलीत गेली. बघते तर काय सुधीर कुठेतरी आढ्याकडे बघत पडलेला होता. त्याच्याकडे बघून नेहाला कळेना त्याला काय झालं? ती पलंगावर बसली आणि सुधीरचा हात हातात घेऊन म्हणाली,
"सुधीर काय झालं ?असं काय अडकडे बघत बसला आहेस? कसला त्रास होतोय का ?कशाचा विचार करतोयस?"
तेव्हा नेहाला पटकन मिठी मारत सुधीर म्हणाला,
"नेहा दोन दिवस मी खूप खुश होतो ग. आता पुन्हा तू बंगलोरला जाणार म्हणजे पुन्हा ते उदासीन दिवस माझ्या भोवती फिरणार." यावर नेहा म्हणाली,
"माझी पण तीच अवस्था आहे आता मी ठरवलं आहे मधून मधून मी यायचं आणि मधून तू ये. ऋषीची शाळा संपली की आई बाबा येतील माझ्याकडे. दोन वर्ष झाले आणि त्यानंतर पुन्हा मला पुण्याला पाठवलं तर ठीक आहे. नाही पाठवलं तर मी सरळ नोकरी सोडून देईन .आता मला ही माझी स्पेस नकोशी झाली रे .स्पेस कशाला हवी आता असं वाटतं. मी किती वेड्यासारखी वागले तेव्हा मी त्या ताणामध्ये इतकी खोलवर फसले होते की मला सारासार विवेकानी वागावे हेच कळत नव्हतं.मला फक्त एकट राहायचंय सगळ्यांच्या पासून असं वाटायला लागलं होतं आणि म्हणून मी इतक्या तडकाफडकी बंगलोरला गेले. नंतर मात्र माझ्या लक्षात आलं की घरात राहून सुद्धा स्पेस मिळते. तू म्हणाला होतास तसं मी टूरला गेले असते तरी मला स्पेस मिळाली असती पण तेव्हा मी तुझं ऐकलं नाही. आता मला ही स्पेस टोचायला लागली आहे कारण मला माझं कुटुंब खूप आवडतं. तुझे आई-बाबा किती समजूतदार आहेत.प्रत्येक वेळेला मला समजून घेतात. कधीच माझ्यावर उगीच चिडचिड करत नाही .जशी प्रियांका होती तशीच मी इतकी त्यांनी माझी काळजी घेतली. आता मलाच माझी लाज वाटते. या वयात त्यांना आराम हवा त्याच वेळेला मी माझी स्पेस शोधत बंगलोरला गेले. आता नकोय मला ही स्पेस. सुधीर मी आत्ताच सोडू का नोकरी?"
सुधीर म्हणाला,
" हे बघ नोकरी तुझी आहे .तुला करायची आहे की नाही हे तू ठरव.तू नोकरी सोडलीस तरी आम्हाला काहीही अआक्षेप असणार नाही. जसं तुला कळलं की हे कुटुंब तुला हवसं वाटतं तसंच तू सुद्धा आमच्या आयुष्याचा एक भाग आहे. तुझ्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. त्यामुळे तू उद्याही नोकरीचा राजीनामा देऊन इथे आलीस तरी काहीही हरकत नाही. पुण्यात नंतर तुला मिळाला जॉब. करावासा वाटला तर कर नाहीतर करू नकोस. मला चांगली नोकरी आहे त्यामुळे आत्ता तू टेन्शन घेऊ नको.तू बेंगलोरला शांतपणे जा तुला सहा महिने झाले आहेत. तू परमनंट व्हायच्या आधी नोकरी सोडायची असेल तर राजीनामा दे आणि इथे परत ये. आम्ही सगळे तुझी वाट बघतोय."
यावर नेहाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ती म्हणाली,
" सुधीर आजकाल एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी सोड असं कोणीही नवरा म्हणत नाही रे ! उलट काय हवं ते कर, ऍडजेस्ट कर पण नोकरी कर असं म्हणणारे नवरे मी बघितले आहे."
यावर असे सुधीर हसत म्हणाला ,
अरे बापरे म्हणजे किती नवऱ्यांना बघितलस तू?
" चल सुधीर तुला सगळ्या वेळा गंमततच सुचते. अरे माझ्या मैत्रिणी त्यांचा अनुभव सांगतात म्हणून कळलं. मी बंगलोरला गेल्यावर सरांना विचारते आणि त्यांना सांगते की माझा मुलगा लहान आहे. त्याच्यामुळे मी आता इथे राहू शकते नाही आणि सुधीर मला आता नकोय नोकरी. मला बंगलोर नकोय. मला तुमच्या पासून लांब जायला नकोय. मला फक्त तुम्ही सगळे हवे"
आणि तिने सुधीरला घट्ट मिठी मारली.सुधीर म्हणाला,
" नेहा अजिबात घाबरू नकोस. तुझी नोकरी सोडून द्यायची इच्छा असेल तर मीच काय आई बाबा सुद्धा तुझं स्वागतच करतील. हे सुद्धा नोकरी का सोडते असं म्हणणार नाही. तू लवकर ये आम्ही सगळे वाट बघतोय. "
सुधीरने हळूच नेहाच्या गालाचा चुंबन घेतलं त्यावर नेहा म्हणाली,
" चला आता चहा झालाय असा मी निरोप मला द्यायला दिला होता.किती वेळ झाला आपण बोलत बसलो पण आपलं हे बोलणं आवश्यक होतं. आणि हा आता खूप शांत मनाने बंगलोरला जा आणि आम्ही पण येथे निश्चिंत राहतो. तिथे गेल्यावर साहेब काय म्हणतात ते कळव."
सुधीरने बोलणं ऐकून नेहाचा चेहरा आनंदाने फुलला. नेहा आणि सुधीर चहा घ्यायला समोरच्या खोलीत आले. नेहाचा आणि सुधीरचा हसरा चेहरा बघून सुधीरचे बाबा म्हणाले ,
"काय रे काय झालं ?"
तेव्हा नेहा पटकन सुधीरच्या आई जवळ जाऊन बसली आणि त्यांना मिठी मारत म्हणाली,
" आई मी आणि सुधीरने निर्णय घेतलाय. मी बंगलोरला गेल्यावर साहेबांना सांगणार आहे की माझा मुलगा लहान आहे मला हा जॉब सोडायचं आहे. मी नोकरी सोडून इथे येणार .मला स्पेस नको. मला माझे कुटुंब हवाय. आम्ही ठरवलंय आई बाबा तुम्हाला चालेल ना मी नोकरी सोडून आले तर?" यावर सुधीरचे बाबा म्हणाले ,
"नेहा बेटा प्रत्येक वेळेला पैसा कामाला येत नाही. काही ठिकाणी नात्यांचे बंध आवश्यक असतात. तुला आता स्पेस नकोय कारण तूला जे नातं पहिल्यापासून आवडत होतं ते आता तुला पुन्हा आवडायला लागलय म्हणून तुला आता ती नोकरी नकोशी आहे. तू अवश्य नोकरी सोडून इथे ये.कितीही मोठ्या पगाराचे नोकरी असली तरीही तू ती सोडलीस तरी आम्हाला काहीही वाईट वाटणार नाही तू घरी आलीस ना की घर कसं भरलेलं वाटेल. बघ ऋषीला तुझी गरज आहे. सुधीरला तुझी गरज आहे आणि आम्हाला पण तुझी गरज आहे कारण तू आमची लेक आहेस ना !"
यावर नेहाच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली
"आई आता मी लवकर सगळ्या प्रोसीजर पूर्ण करून पुण्याला परत येईन. आता मी नाहीच राहू शकणार तिकडे ."
नेहाच्या निर्णयामुळे सुधरचे आई-बाबा खूपच आनंदित झाले. सुधीरची आई म्हणाली ,
'चला आज जेवताना शिरा करते.नेहा तुला आवडतो ना ! तू इतकी छान बातमी दिलीस .इतका चांगला समजूतदार विचार करून निर्णय घेतलायस. आम्हाला खूप आनंद झाला पण आपल्या कुटुंबातला आनंद आपणच जपायचा असतो कधी पैशाची गरज असते तर कधी भावनिक आधाराची गरज असते. ती ओळखायची असते. ती तू ओळखलीस त्याच्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतंय की निश्चित करा आणि बंगलोरला जा सगळी कारवाही पूर्ण कर आणि इथे ये आम्ही तुझ्या स्वागताला तयार आहोत. तुझी वाट बघत आहोत."
यावर नेहाने अजूनच घट्ट मिठी मारली त्याच वेळेला राजकुमार ऋषी ऊठून आले. झोपेतून उठल्यामुळे त्याला कळेना त्यांनी विचारलं ,
'आई तू आजीला ताबड मिठी मारली ?"
यावर सगळे हसायला लागले .ऋषीला काही कळलं नाही. पण नेहाने ऋषीला लगेच उचलून घेतलं आणि त्याची पापी घेऊ लागली तसं ऋषी म्हणाला,
" आई मी बॅड बॉय नाहीये. माझा ब्लश झाला नाही."
"हो रे बाळा तू माझं गुड बॉय आहेस .मला माहिती आहे आणि गुडबायच राहणार आहे ."यावर हसून ऋषी म्हणाला ,
"आई तू पण माझी गुड मम्मी आहे ."
त्याच्यावर सगळे हसले. मला स्पेस हवी म्हणत नेहा बंगलोरला गेली त्यामुळे सुधीरच्या घरात जे उदास वन वातावरण फिरायचं ते मला स्पेस नको मी परत येणार आहे या नेहाच्या निर्णयामुळे घरात दिवाळी सारखा आनंद पसरला.
______________________________________
समाप्त
बाचकहो कुटुंबापासून लांब राहून मला स्पेस हवी म्हणत जाणं हे किती चुकीचं आहे हे या कथा मालिकेवरून कळलं असेल कुटुंबात राहून सुद्धा आपण प्रत्येक व्यक्ती एकमेकांना आवश्यक ती स्पेस देऊ शकतो त्यासाठी आपल्याला दूर जाण्याची गरज नसते. हेच या कथा मालिकेतून सांगायचं होतं.
कथा मालिका कशी जमली यावर वाचकांनी मत प्रदर्शित केलं तर मला आनंद होईल. ही कथामालिका आवडली असेल तर इतरांना शेयर करा ही विनंती. स्टिकर द्या ही इच्छा व्यक्त करते.