या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का भाग ३
मागील भागात आपण बघीतलं की मृदुला सासुबाईंना मिठी मारून ढसाढसा रडली. तिला शांत होण्याची सासूबाईंनी वाट बघितली. मृदुला सासूबाईंना सांगेल का झालं? बघू या भागात.
बराच वेळाने मृदुलाचं रडणं थांबलं. तिने सासूबाईंना मारलेली मिठी सोडली. डोळ्यातून गालावर ओघळलेले अश्रू तिने हळूच पुसले.
" झालीस का बाळा शांत?"
" हं"
दबक्या आवाजात हुंदका आवरत मृदुला उत्तरली.
" काय झालं?"
सासूबाईंनी विचारलं.
"आई कृपा आज सकाळी गेली."
" काय?"
सासूबाईंंचाही यावर विश्वास बसला नाही.
" सकाळीच हरीशचा मेसेज आला. आई कृपा जाणार हे सहा महिने आधी कळलं होतं हो पण ती इतकी सकारात्मक ऊर्जेने वावरत होती की तिने कधी कोणाच्या डोळ्यात अश्रू येऊ दिले नाही. ती नेहमी म्हणायची मी माझ्या वेदना कवितेच्या साखरपाकात विरघळून टाकते मग त्या गोड वेदना कशा टोचतील? त्यांचं असणं पण मखमली होऊन जातं. अशी साहित्यिक बोलायची. मला आश्चर्य वाटायचं इतक्या वेदना होत असून ही इतकी शांत कशी राहू शकते?."
मृदुलाचा उमाळा थांबेना.
" मृदुला कृपा खूप सहनशील होती. तूच सांगायचीस नं की ती खूप सकारात्मक विचाराने जगण्याकडे बघते. मग ती तिला होणा-या वेदनेबद्दल असंच सकारात्मक बोलणार. आपणही कृपाकडून हे शिकायला हवं. कॅंन्सरच्या वेदना म्हणजे रात्रं दिन आम्हा युद्धाचा प्रसंग असा असतो तरीही किती शांतपणे तिने सगळ्या वेदना स्विकारल्या."
मृदुला रडतच बोलली.
"आई मला खूप पोकळी जाणवतेय हो आता. मीच तिच्याकडून खूप शिकले. सकारात्मक ऊर्जा कशी आपल्या पेशंटना द्यायची हे शिकले."
मृदुला पुन्हा रडायला लागली.
" शांत हो बाळा. कृपा गेली हे ऐकून मलाही वाईट वाटलं पण जे होणार असतं ते कधी टळत नाही. आवर स्वतःला. ती कसं शांतपणे मृत्यूला सामोरी गेली. त्याला सहजतेने स्वीकारलं तसंच आपणही तिला तितक्याच सहजपणे निरोप द्यायला हवा. कृपा सवाष्ण म्हणून गेली हे किती भाग्य आहे."
" हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण कृपाच्या घरी जायचं त्राण नाही हो माझ्यात. तिची मुलं किती लहान आहेत."
" हो खरय पण नियतीपुढे आपण काय करू शकतो? देव तिच्या मुलांना बळ देईल. तुझ्या मनाची घालमेल होतेय कळतंय मला पण तरी मृदुला तुला मन घट्ट करून जावं लागेल नं !”
" हो. जेव्हा कृपाची तब्येत जास्त बिघडली तेव्हा एक दिवस तिचा फोन आला."
" खूप त्रास व्हायला लागला होता काग तिला?"
" हं. त्रास तर होतच होता पण त्या त्रासात ही तिने कविता केली . मला ऐकवली. माझ्याने ती कविता ऐकवेना "
येणारा उमाळा दाबून टाकत मृदुला स्थीर राहण्याचा प्रयत्न करत होती. सासूबाई तिचा हात हातात घेऊन थोपटत म्हणाल्या,
" दु:खाचा कढ मनात दाबून ठेऊ नकोस बाळा. रड मनमोकळेपणाने रड. मनावरचं ओझं दूर कर."
" आई तिने जी कविता मला ऐकवली तिचं शिर्षकच होतं 'एका श्वासाचं अंतर' मी गोंधळून गेले ते ऐकून."
" काय?" सासूबाईंनी आश्चर्याने विचारलं.
"तिने मला ऐकवलेली कविता व्हाॅट्स ॲप केली."
"बघू"
सासूबाईंना मृदुलाने आपल्या मोबाईलवर तिने पाठवलेली कविता दाखवली. ती कविता अशी होती. ' आहे आणि नाही यात असतं एका श्वासाचच अंतर आजचंच नाही हे चालू आहे निरंतर.
वर्तमानात जगता जगता कधी भूतकाळ होतो ! आहे म्हणता म्हणता भूतकाळ कसा होतो? मिळे ना यास उत्तर कारण..... आहे आणि नाही यात असतं एका श्वासाचच अंतर ।
हसत खेळत असतं शरीर तोवर असतो जीवंतपणा, मृत्युची चादर ओढली तरी आठवणीत असतो टवटवीतपणा। मिळे ना यांस उत्तर कारण... आहे आणि नाही यात असत एका श्वासाचच अंतर'
" बापरे! ही कृपा किती धीट होती."
" हो नं. ही कविता तिने केली आणि दोनच दिवसात गेली."
मृदुलाच्या मनातील बोच कमी होत नव्हती.
" मृदुला तुला सगळा धीर गोळा करून तिच्याकडे जावंच लागेल. हरीशला बरं वाटेल. रडू आवर बेटा आता आणि जाऊन ये कृपाच्या घरी."सासूबाईं म्हणाल्या.
मानेनेच होकार देऊन मृदुला खुर्चीवरून ऊठली. कृपा कडे जायचं म्हणजे तिला एक मोठं आव्हान वाटू लागलं.
" देवा मला बळ दे. मी कृपाचं निष्प्राण कलेवर बघू शकणार नाही. माझ्या डोळ्यात तेवढी ताकद नाही. देवा तू बळ दे. कृपाची बाळं किती छोटी आहेत. कोणाला आता ती बाळं आई म्हणुन हाक मारतील? हरीश कडे तर बघवणार नाही. किती प्रेम करतो तो कृपावर. त्याची तर अर्धांगिनी तू ओढून नेलीस. कसं करेल तो?"
एक मोठा हुंदका मृदुलाच्या तोंडून बाहेर पडणार होता पण मृदूलाने आपल्या पदराचा बोळा तोंडात खुपसला आणि तो हुंदका बाहेर पडू दिला नाही. आपलं रडणं कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून पण तिला माहित नव्हतं तिच्या सासूबाई तिच्या मागेच उभ्या होत्या. त्यांना तिची तगमग कळत होती. हळूच आपल्या पदराने आपले डोळे पुसत त्या खोलीबाहेर गेल्या.
_______________________________मृदुला जाऊ शकेल कृपाच्या घरी.बघू पुढील भागात.