Tya Fulanchya Gandhakoshi Sang tu aahes ka? - 1 in Marathi Classic Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? - भाग 1

Featured Books
Categories
Share

त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? - भाग 1

या फुलांच्या गंधकोषी…सांग तू आहेस का? भाग १" कृपा गेली…एक निरागस शब्द संपला. आयुष्याच्या अर्ध्या वाटेवरच हा शब्द मला सोडून गेला. माझ्या श्वासापेक्षाही हा शब्द मला प्रिय होता.आता मी काय करू डाॅक्टर? काळ सगळ्यावर औषधं असतं असं म्हणून माझं सांत्वन करून नका.माझा शब्द मला परत देता आला तर द्या."हरीशसकाळी सकाळी हरीशचा मेसेज वाचून डाॅक्टर मृदुला सुन्न झाली.सकाळच्या या प्रसन्न वेळेला उदासीची गडद छाया दाटून आली असं मृदुलाला वाटलं.***कृपा ही मृदुलाची पेशंट होती. मृदुला ही डाॅक्टर आहे  आणि ती  कॅंन्सर पेशंटचं काऊन्सलिंग करत असे.  कृपा जेव्हा पहिल्यांदा मृदुलाच्या दवाखान्यात आली तो दिवस मृदुलाला आठवला.कृपा आपले सगळे रिपोर्ट घेऊन मृदुलाच्या ओपीडी मध्ये आली होती. कॅंन्सर पेशंटना काऊन्सलिंग करणे आवश्यक असतं. या काऊन्सलिंगमुळे पेशंटमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढल्याने ते या आजारांमध्ये खचून न जाता आहे ते आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतात.या कॅंन्सर पेशंटना सकारात्मक ऊर्जा देण्याचं खूप मोठं काम मृदुलाला करावं लागत असे.काही पेशंट या सकारात्मक काऊन्सलिंग मुळेच या आजारातून बाहेर पडले होते.मृदुलाने कृपाचे सगळे रिपोर्ट बघीतले आणि तिने कृपाशी बोलणं सुरु केलं." नमस्कार  कशा आहात तुम्ही?"" मी मजेत आहे. माझा चेहराच सांगत असेल." कृपाने हसत म्हटलं." हो तुम्ही फ्रेश दिसताय."" माझे रिपोर्ट तेवढे चांगले नाहीत पण मला एवढं फ्रेश ठेवणारी जादूची कांडी आहे नं माझ्याकडे."" जादुची कांडी?"मृदुलाला एवढ्या मोठ्या वयात कोणी जादुची कांडी हा शब्द वापरलेला आठवत नाही." हो.जादुची कांडी. ऐकायची आहे?"" जादुची कांडी ऐकणार कशी? ती तर बघण्याची गोष्ट आहे नं?"मृदूलाने  गोंधळून विचारलं. कृपाने कविता म्हणायला सुरुवात केली.'पळभर आहे  जिंदगी रूसवा नको कुठलाआनंदाचे पंख पसरूनी स्वीकारावे तिजला.'"वा! मस्त. कोणाची आहे ही कविता?" मृदुलाने विचारलं."माझी."कृपा म्हणाली. हे बोलताना कृपा हसली"तुम्ही कविता करता?""हो या कवितेमुळे कॅंन्सर सारख्या रणांगणावर लढताना मला बळ मिळतं."कृपाचे हे शब्द ऐकून मृदुला स्तब्ध झाली. तिला काय बोलावे कळेना. आत्तापर्यंत तिच्याकडे जेवढे कॅंन्सर पेशंट येऊन गेले त्यांच्यात कोणीही तिला कृपासारखा हसरा पेशंट भेटला नाही. कृपा म्हणजे वेगळंच रसायन होतं. कृपा  इतकी सकारात्मक ऊर्जेने भरलेली आहे. हिला मी कुठून आणखी सकारात्मक ऊर्जा देऊ हा प्रश्न मृदुलाला पडला."मॅडम काय झालं? तुम्हाला आवडली नाही का कविता?""अं …"कृपाच्या बोलण्याने मृदुला भानावर आली."खूप आवडली. तुम्ही अजून काय करता?आणखी काही कविता केल्या का?""हो तुमची इच्छा असेल तर ऐकवीन."मृदुलाला पण असा पेशंट आजपर्यंत बघायला मिळाला नव्हता. कॅंन्सर पेशंटना त्रास इतका होत असतो की चार शब्द बोलण्याचे त्राण नसते. त्राण नसण्या पेक्षाही उत्साह नसतो. कृपा ही खूपच वेगळी होती म्हणून मृदुलाला तिचं कौतुक वाटलं.'वळणावरती आयुष्याच्या तो मज भेटला,ओंजळीत शब्दांचीच फुले दिली मजला.शब्द गंध तो भिनला ग माझ्या तनामनातआता  असोशी नाही कुठली मम मनाला.’'कृपा कविता म्हणून थांबली. मृदुला एकटक कृपाकडे बघत होती."मॅडम कविता संपली."कृपाच्या बोलण्याने मृदुला भानावर आली."कृपा इतकं मोठं आजारपण आलं असताना तुला कविता कशा सुचतात?"“ मॅडम कॅंन्सर सारखा रोग हा मला घेऊनच जाणार हे मला माहीत आहे. मग त्याला घाबरायचे कशाला? तो जेव्हा मला घेऊन जाईल तोपर्यंत तर मी माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगू शकते नं?”"कृपा तुझ्यात इतकी सकारात्मकता आहे मी आणखी तुला कोणते सकारात्मक विचार, ऊर्जा देऊ शकणार आहे? तू नसती आलीस माझ्या कडे तरी चाललं असतं""हो चाललं असतं पण आपली भेट घडायची होती. मागच्या  जन्मी आपला सहवास पूर्ण व्हायचा असेल म्हणून आपली भेट झाली. ""असं असतं का?"मृदुलाने आश्चर्याने विचारलं."हो मॅडम. माझा यावर विश्वास आहे आणि मला आनंद झाला तुम्हाला भेटून.'"मलापण आनंद झाला. तुमच्या सारखी सकारात्मकतेची प्रचंड ऊर्जा घेऊन जगणाऱ्या व्यक्तीशी माझी ओळख झाली.""हं " कृपा हसली."मी येऊ का?" कृपाने विचारलं"हो. या" "आता कधी येऊ?""आता पेशंट म्हणून नका येऊ. एक मैत्रीण म्हणून या."नक्की." हसत कृपा म्हणाली.कृपा हसत आपली फाईल घेऊन मृदुलाच्या केबीनबाहेर पडली.कृपाला पाठमोर बघताना मृदुलाच्या मनात आलं की किती सहजतेने ही आयुष्य जगतेय. आपण सतत कुठल्यातरी ताणाखाली वावरतो. ही कॅंन्सर सारख्या रोगांनी पिडीत असतानाही तिच्या वागण्यात कुठेही याचा मागमूस दिसत नाही. मी काय हिला सकारात्मक ऊर्जा देणारं मलाच वेळ आली तर हिच्याकडून सकारात्मक ऊर्जा घ्यावी लागेल.मृदुलाने पुढल्या पेशंटसाठी बेल वाजवली.