Adnyat jag in Marathi Horror Stories by nilesh mundhe books and stories PDF | रखमा आजी.. एक अज्ञात जग

Featured Books
Categories
Share

रखमा आजी.. एक अज्ञात जग

रखमा आजी.. एक अज्ञात जग...

 

मी जेव्हा अकरावी बारावी साठी KTHM नाशिक येथे होतो.. तेव्हा माझा एक रूम पार्टनर होता... ही घटना त्याने मला सांगितली होती.. गुरुनाथ पाटील त्याचे वडील.. त्यांच्या बाबतीत घडलेला हा किस्सा.. आता हा किती खरा आणि किती खोटा हा त्यांनाच माहीत.. 

 

हि 1982 सालाची गोष्ट आहे...गुरुनाथ पाटील नुकतेच पदवी पास झाले होते. . काही ठिकाणी अर्ज पाठवल्यानंतर, त्यांना समुद्राच्या आसपासच्या दुर्गम भागातील एका सोनेवाडी नाव असलेल्या गावात, आश्रम शाळेत शिक्षकाच्या नोकरीची ऑर्डर आली. नोकरीच्या संधीने ते अतिशय उत्साहित होते. लवकरच त्यांनी नोकरीवर रुजू होण्याचे ठरवले. दोन दिवसातच त्यांनी आवश्यक सामान एका लोखंडी पेटीत भरले, आणि सोनेवाडी च्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचले. तिथून पुढे कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने त्यांनी डोक्यावर पेटी ठेवून, पायपीट करत, निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत सोनेवाडी गावाचा प्रवास सुरू केला.

 

आजूबाजूला उंचच उंच झाडांनी आच्छादलेले डोंगर, त्यातून वाहणारे पाण्याचे झरे, आणि आकाशातून येणारे पक्ष्यांचे संगीत.. या सर्वांनी त्यांचे मन मोहित केले होते. निसर्गाने संप्पण अश्या भागात पुढील आयुष्य जाणार या विचाराने ते आनंदी झाले होते... काही अंतर चालल्यावर मागून एक बैलगाडी आली, आणि तीने त्यांना थोड्या वेळातच गावात पोहोचवले.

 

सोनेवाडीला पोहोचताच, त्यांनी शाळेत हजेरी लावली. हेडमास्तर वयोवृद्ध आणि शिस्तप्रिय होते. त्यांनी गुरुनाथ गुरुजींना सांगितले की, त्यांच्या राहण्याची खोली अजून एका रिटायर्ड गुरुजींच्या ताब्यात आहे, ज्यांना एक महिना अजून तिथे राहायची परवानगी दिली आहे. त्यामुळे त्या महिन्याभरासाठी गुरुनाथ गुरुजींना गावात कुठेतरी दुसरी व्यवस्था करावी लागणार होती.

 

गुरुनाथ गुरुजी त्या भागात एकदम नवखे होते ... त्यांनी गोंधळून हेड गुरुजींकडे बघितले आणि एखादी खोली शोधून द्यायची विनंती केली.. 

थोड्याच वेळात डोक्यावर पेटी आणि शाळेचा शिपाई घेऊन स्वारी गावाच्या दिशेने निघाली... शिपाई चांगला बोलघेवडा होता.. गावात पोहोचे पर्यंत त्याने शाळेविषयी बरीच माहिती पुरवली... गुरुनाथ गुरुजी मात्र त्याच्या कडे कमी आणि आजूबाजूला जास्त बघत होते.. डोंगरात वसलेले ते गाव... लाल मातीच्या अरुंद, वळणदार रस्त्यावरून चालत असताना, बाजूला असलेल्या झाडांच्या सावल्या आणि मधूनच कानावर येणारे पक्ष्यांचे मधुर आवाज मन प्रसन्न करत होते... 

 

गावात पोहोचल्यावर त्यांचा तांडा हळू हळू पुढे सरकत होता... सगळी घरे एक सारखीच दिसत होती.. कुडाच्या भिंती त्यावर मातीचा लेप आणि वर गवताची छपरे, फक्त आकारमानात थोडा फार बदल... आता यातील कोणत्या घरात राहायची वेळ येते देव जाणे.... गुरुनाथ गुरुजी मनातच विचार करत, शिपाई कुठे घेऊन जातो हे बघत त्याच्या मागे चालले होते... गावाच्या शेवटी जाऊन एका चांगल्या मोठ्या घरासमोर तो थांबला... घर अगदी तसेच फक्त आकारमान थोडे मोठे होते...

त्याने "रखमा आजी ओ रखमा आजी, आहे का घरात," म्हणून आरोळी दिली... थोड्याच वेळात हिरवे लुगडे आणि खणाची चोळी घातलेली एक आजी च्या वयाची स्त्री बाहेर आली.. वय जरी जास्त दिसत असेल तरी हालचाली मात्र वेगवान होत्या.. आवाज एकदम मायाळू... शिपायाने सर्व काही तिला सांगितले.. आणि एक महिना गुरुनाथ गुरुजींना तिच्या कडे ठेऊन घ्यायची विनंती केली.. तीला बिचारीला मूलबाळ नव्हते... ती सोबत होईल आणि वर दोन पैसे पण भेटतील म्हणून लगेच तयार झाली.. थोडके जेवणाचे पैसे ठरवून त्याच क्षणाला गुरुनाथ गुरुजी रखमा आजी चे भाडेकरू झाले... दिवस चांगले चालले होते.. गुरुजींची शाळा रोज सुरू होती.. घरी असल्यावर रखमा आजीला मदत करणे आणि बाहेर खाटेवर पडून वाचन करणे असा त्यांचा नित्यक्रम ठरलेला होता.. रखमा आजी ला मुल बाळ नव्हते.. ती आता गुरुनाथ गुरुजीलाच मुला सारखा जीव लावू लागली होती.. तसे तिच्या कडे कोणाचे आणि तिचे कोणाकडे येणे जाणे दुर्मिळच होते... कायम घराशेजारील फुला फळाची बाग, दोन शेळ्या आणि घर एव्हढेच तिचे जग होते... आता गुरुनाथ गुरुजी त्या जगात समाविष्ट झाले होते.. 

शाळेला सलग चार दिवस सुट्टी होती.. गुरुजी सकाळी सकाळी अंघोळ उरकून बाहेर येऊन वाचन करत बसले होते.. नेमके त्याच दिवशी दुपारी रखमा आजी कडे पाहुणे आले.. गुरुजी घरीच असल्या मुळे त्यांच्या दोन तीन चहात शेळीचे दूध केव्हाच संपले होते... शेजारच्या काकू कडे चांगली मोठी गाय होती.. गाय दुधाला पण बक्कळ होती.. घाई घाईने रखमा आजी पातेले घेऊन शेजारी गेली.. थोड्या वेळातच ती रिकामे पातेले घेऊन शेजारच्या काकू च्या नावाने बोटे मोडत आली.. तिने म्हणे आजी ला बघून दुधाचे पातेले झाकले होते आणि दूध संपले म्हणून रिकामेच माघारी पाठवले होते... गुरुनाथ गुरुजींनी आजीला शांत केले... झाले गेले सोडून आजी पहुण्यांशी गप्पा मारण्यात बुडून गेली... तो दिवस सरला... आजीचा राग निवळला होता ... त्यामुळे गुरुजींनी विषय काढला नाही ... ती रात्र सरली.. दुसऱ्या दिवशी aपरत एकदा नित्यनियमाने गुरुजी सकाळी सकाळी आवरून बाहेर येऊन बसले.. वाचता वाचता बाजूच्या घराकडे लक्ष गेले... तिथले काका आणि काकू गायीचे दूध काढायचा प्रयत्न करत होते .. पण गाय त्यांना लाथा मारत होती .. शेवटी वैतागून त्यांनी नाद सोडला आणि घरात निघून गेले.. परत संध्याकाळी तोच प्रकार... गुरुजी ना त्यातले काही कळत नव्हते.. म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले... दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच.. तिसऱ्या दिवशी पण तेच सुरू... संध्याकाळी तर एक वैद आले.. बराच वेळ गायीच्या सडांना अनेक औषधे चोळत होते .. पण गाय काही दूध काढू देत नव्हती... सड फुगून फुटायची वेळ आली होती... गाय होणाऱ्या त्रासाने हांबरत होती.. पण दूध काही काढू देत नव्हती... गायीची मालकीण त्या काकू रडत होत्या... गुरुजी सर्व टक लाऊन बघत होते .. थोड्या वेळात वैद बुवा वैतागले आणि काही तरी बोलत त्या काका काकू ना घरात घेऊन गेले... काही वेळा नंतर ते माघारी जाताना दिसले... अंधार पडत आला होता.. गुरुजी घरात यायला उठले... 

"गुरुजी ओ गुरुजी वाईच इकड येता का?" त्या शेजारच्या काकांनी गुरुजींना हाक मारली.. गुरुजी त्यांच्या कडे गेले...

"गुरुजी आजी ना एक विनवणी करशाल का?," काका म्हणाले..

"काय विनवणी करायची आहे आणि का?" गुरुजींना काहीच कळेना..

"अहो त्या दिवशी ह्या येडीनी घरात दूध असून आजी ना परत पाठवले... त्याच्यामुळेच आता तीन दिस झाले, गाय पार मरायचा वकुत आलाय पण दूध काय देईना..." काका तळमळीने बोलत होते..

"अहो मी एक गुरुजी आहे आणि आजी काय करतील याच्यात, त्या पण काही डॉक्टर नाही.. आजीला किंवा एखाद्या वैदाला दाखवण्यापेक्षा तालुक्यावरून डॉक्टर बोलवा..." गुरुजी घराकडे निघत निघत बोलले...

तेवढ्यात तो पटकन उठला आणि गुरुजींचे पाय धरून रडायला च लागला.. 

"गुरुजी अस नगा करू, तुम्ही फक्त एकदा आजीला सांगा चूक झाली म्हणा आमची पुन्यांदा न्हाई होनार...अस सांगा.. आणि माफ करायला लावा." बोलताना तो पाय काय सोडत नव्हता.....

"ये मंगे आन ते दूधाच भगुल, गुरुजी ह्ये घेऊन जावा आणि फकस्त एव्हढी इनंती करा आमच्या कडन आजीला.." दुधाने भरलेले पातेले गुरुजींच्या समोर करत तो बोलला..

गुरुजींना तर काहीच अर्थबोध होईना.. ते कसे तरी त्यांना टाळत घाई घाईने घरी पळून आले.. आणि एक कोपऱ्यात बसले...

रखमा आजी ने त्यांना भूक लागली का विचारले... ते नाही म्हणाले... त्यांना एक तर अजून हि काही अर्थ बोध होत नव्हता..

"कुठ गेलता रे इतका वेळ..तुला सांगितलय ना अंधार पडल्यावर जास्त बाहेर नाही भटकायच.." आजी मायाळू आवाजात दटावत बोलली..

गुरुजींनी घडा घडा घडलेले सर्व सांगितले ..

बोलणे ऐकून आजी चिडेल आणि भांडायला जाईल अशी शंका होती गुरुजींना.. 

पण बोलणे ऐकून रखमा आजी,"आले की नाही लाईनीत, मला पाहून पातेले लपवती का?". असे म्हणत हसायला लागली.. एक वेगळीच चमक तिच्या डोळ्यांमध्ये होती..

"आजी काय झाले आहे नक्की, ते असे का म्हणत होते आणि आता तुम्ही असे का बोलताय मला काही सांगाल का?" गुरुजी मेटाकुटीला येऊन बोलत होते .. 

आजी पटकन उठत बोलली , तुला पहायचय ना कशी खोड जिरवली त्या दूध वालीची... चल मग.. घरातून एक पकड हातात घेऊन आजी तरा तरा पुढे निघाली.. गुरुजी घाई घाईने पळत निघाले... आजी थेट शेजरच्यांच्या गोठ्यात घुसली... आणि त्या गायीच्या खुट्याजवळ पकडीने जोर लावून एक खिळा बाहेर काढला..

गुरुजी गायी जवळ च उभे होते... खिळा निघताच गुरुजींच्या पायावर कसले तरी थेंब पडायला लागले.. गुरुजींनी खाली वाकून बघितले... गायीच्या सडातुन दुधाच्या धारा लागल्या होत्या ...आजी त्यांच्या कडे बघून हसत होती... गुरुजी अचंबित होऊन कधी आजीकडे तर कधी दुधाच्या धारांकडे बघत थरथरत होते....

ती रात्र कशीबशी काढून, दुसऱ्या दिवशी गुरुजींनी आठ दिवसांची रजा टाकली... परत येतो सांगून सामान घ्यायला पण परत गेले नाही... सध्या ते एका बस कंडक्टर च्या नोकरी तून निवृत्त होऊन आयुष्याचा आनंद उपभोगत आहेत...

 

लेखक: रूद्रदमन 

 

कथा आवडल्यास अभिप्राय नक्की द्या..

( टीप : या पेज वरून सादर होणाऱ्या सर्व कथा काल्पनिक असून, निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिलेल्या आहेत.. या कथांद्वारे आमचा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविण्याचा हेतू नाही..)