In search of Gold in Marathi Classic Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | सुवर्णप्राप्ती

Featured Books
Categories
Share

सुवर्णप्राप्ती

             सुवर्णप्राप्ती

तेजपाल कपारीजवळ जाऊन उभा राहिला अन् सूर्यास्त झाला. अवघड चढणीचा मार्ग वेगाने पूर्ण केल्यामुळे अति श्रमाने त्याला धाप लागली. खरे तर बसल्या जागी अंग पसरावे इतकी मरगळ आलेली. तथापि या निर्मनुष्य परिसरात रात्र बिनघोर घालविण्यासाठी सुरक्षित जागा पहाणे क्रमप्राप्त होते. म्हणून मरगळ झटकून तो उठला. तो कपारीतून आत शिरला. आत चांगली दोन खण ऐसपैस जागा पाहून त्याला बरे वाटले. आत इतस्ततः विखुरलेली पिसे अन् विष्टा या जागी पक्षाचे वास्तव्य असल्याची सूचक होती. मात्र अवघड चढणीच्या मार्गाने एखादे हिंस्त्र श्वापद इथपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. पिसे अन् विष्ठा यांचे सूक्ष्म अवलोकन करता पक्षी सांप्रत काळी येथे वास्तव्यात नसावा हे त्याच्या ध्यानात आले. म्हणून कपारीच्या एका कडेला थोडी साफसफाई करुन त्याने बाणांचा भाता, धनुष्य, सामानाचे बोचके आणि मध-पाणी यांचे बुधले तिथे ठेवले. कटीवस्त्रावर वेष्टिलेले उत्तरीय सोडून कमरेचे खड्ग, परशु ही आयुधे उतरुन ठेवली अन् पाय लांब करीत सैल अंगाने कपारीच्या कडेला टेकून त्याने नेत्र बंद केले. अर्धा घटिका विश्रांती घेतल्यावर त्याला जरा हुशारी वाटू लागली. बोचक्यातले पिठाचे गाठोडे सोडून चार पसे पीठ कटोऱ्यात घेतले. त्यात थोडासा मध आणि पाणी ओतून त्याने चांगले मिश्रण केले. पीठाचे चार बेताचे गोळे करुन बोटाच्या फटीत अडकलेले कण तो चाटू लागला. इतक्यात पंखांच्या फडफडाचा प्रचंड ध्वनी आला. कर्कश चित्कार टाकीत पक्षिराज कपारीच्या मुखालगतच्या खडकावर विसावला. तेजपाल निःस्तब्ध होऊन कपारीच्या मुखाकडे पाहू लागला. काही क्षणातच अणकुचीदार चोच आणि निखाऱ्यासारखे लालबुंद डोळे असलेला पक्षिराज कपारीतून आत शिरला. "हे मानवा... घाबरु नकोस! माझा अजस्त्र देह पाहून तुला भीती वाटणे स्वाभाविकच आहे. पण मी मनुष्यभक्षक नाही. या दुर्गम भागात सुवर्णाचा शोध घ्यायला आलेले मानव बहुशः माझ्या कपारीचाच आश्रय घेतात." पक्षिराजाचा अजस्त्र देह पाहून पुराण कथांमधील जटायू, वैनतेय, संपाती आदी पक्षिगणांचे स्मरण त्याला झाले. तसेच त्याने चिरक्या आवाजात उच्चारलेली मनुष्यवाणी ऐकून तो विस्मयचकित झाला. दोन्ही हात जोडून विनम्र भावाने तेजपाल उद्गारला. "पक्षिराज, आम्हा मानवांच्या धर्मकथांमधील जटायू, संपाती अन् वैनतेय अशा पराक्रमी पक्षिवर्गीयांचे स्मरण आपल्या दर्शनाने मला झाले असून मी तुम्हाला आदराने वंदन करितो! दूर दक्षिण क्षेत्राकडून निघालेला मी संपूर्ण भरतखंड पालथा घालून इथवर आलो आहे. घनदाट वृक्षराजीनी भरलेल्या वनप्रदेशात अजस्त्रकाय सर्प, अक्राळ विक्राळ हिंस्त्र श्वापदे मी पाहिली. यमुनेच्या पात्रात विकराल नक्रही मी पाहिले. परंतु तुमच्या तुलनेत ते नगण्य जीवजंतू आहेत असे मला वाटू लागले आहे. याखेरीज आपण उच्चारित असलेली मनुष्यवाणी...! शरीरमर्यादा ओलांडून आमची देववाणी आपण कशी काय आत्मसात केलीत या गोष्टीचेही बहुत आश्चर्य मला वाटत आहे. त्याहीपेक्षा माझा हेतू आपण कसा काय ओळखलात याचेही कुतूहल वाटून मी पहातोय ते स्वप्न आहे की सत्य याचा संभ्रम मला झाला आहे." तेजपालच्या कथनाने प्रसन्नचित्त होत्साता पक्षिराज उद्गारला, "बा मानवा! केवळ आपण पाहिलेले जग म्हणजे परिसीमा नव्हे. हे विश्व किती अद्भूत अतर्क्य गोष्टींनी भरले आहे याची कल्पना तरी तुम्हा मानवांना कशी यावी? दिक्कालापर्यंत मुक्त संचार करणारे आम्ही वैनतेयाचे वंशज! सर्वत्र संचार करुन हे विश्व आम्ही अवलोकिले आहे. आता तू ज्या सुवर्ण प्रदेशात जाणार आहेस त्याही पलिकडे गृध्रराज संपातीचे वंशज आहेत. त्यांना पाहून तर तुझ्या जाणीवाच ठिकाणावर राहणार नाहीत. आता प्रश्न उरला मी मनुष्य वाणी कशी काय उच्चारितो हा...! तर निसर्गाने आम्हा पक्षिवर्गीयांना दिलेली जिव्हा... ती सुद्धा मानवांपेक्षाही कार्यक्षम आहे. आम्ही पक्षिवर्गीय जे स्वर उच्चारितो त्याच्याशी तुलना करता मानवांची स्वरमाला अगदीच प्राथमिक ठरते असे माझे मत आहे. अर्थात मनुष्य वाणी हे फक्त माझेच वैशिष्ट्य असून माझ्या इतर बांधवांना मनुष्य वाणी अवगत नाही! ही मला कशी प्राप्त झाली तो मोठा अद्भुत इतिहासच आहे म्हणेनास... पक्षिराज पुढे सांगू लागला, "माझी आयुर्मर्यादा एक शत संवत्सरे एवढी आहे. माझा पितामह अद्याप उडावयासही शिकला नव्हता त्यावेळी कोणी मानव देहधारी तापस या हिमगिरीवर आला. या कपारीच्या मागील बाजूला जे पर्वत शिखर आहे त्याठिकाणी एक अजस्त्र गुंफा आहे. त्या गुंफेत तो तापस शिरला आणि गुंफेचे मुख त्याने एका प्रचंड शीलेने बंद करुन घेतले. त्यापासून आजपर्यंत अव्याहतपणे त्याचे तप सुरु आहे. केवळ वायू भक्षण करुन त्याने आपले जीवीत टिकविले आहे. मी लहान असता एका वेळी तो तापस गुहेबाहेर आला. मी बालसुलभ कुतूहलाने त्याच्या संन्निध गेलो. त्यावेळी त्याने मजवर कृपादृष्टी केल्यामुळे मानवांची वाणी मला अवगत झाली. त्यानंतर उतारावरील सरोवरात स्नान करुन तो पुनश्च गुंफेत गेला. त्या उपरान्त मात्र मी त्याला पाहिलेले नाही. मात्र अद्यापही त्याचे तप सुरु आहे, तो गुंफेत आहे याचा प्रत्यय मला आला आहे." पक्षिराजाचे अद्भुत कथन ऐकून तेजपालला क्षुधेचेही भान राहिले नाही. आपल्या हेतूपूर्ती मध्ये या पक्षिराजाचे काहीना काही सहकार्य आपणांस जरुर मिळेल याची खात्री त्याला वाटू लागली. याच हेतूने त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे त्याने योजिले. कटोऱ्यातला मधुयुक्त पीठाचा गोळा समोर धरीत तो म्हणाला, "पक्षिराज! मी गृहस्थधर्मी आहे. माझ्या क्षुधा शमनाच्या वेळी आपण मजसोबत असता हे अन्न एकट्याने खाणे काही मला उचित वाटत नाही. म्हणून त्यातला अल्प भाग मी आपणांस देऊ इच्छित आहे, त्याचा आपण स्वीकार करावा." पक्षिराजाने पिठाचा गोळा चोचीत घेतला. मधुयुक्त असे पीठ फारच रुचकर लागले. तुम्हा मानवांची कल्पकता मात्र वर्णनातीत आहे. तू दिलेले अन्न फारच स्वादिष्ट आहे. कोणत्या प्राणी वा पक्षाच्या मांसापासून हे बनविलेस बरे?" पक्षिराजाने पृच्छा केली. तेजपाल उत्तरला, "पक्षिराज, हे अन्न मांसापासून केले नसून साळीच्या लाह्यांचे पीठ आणि मध यांचे ते मिश्रण आहे. प्रवासात कंदमुळे, फळे, प्राणी, पक्षी काहीही मिळाले नाही तर अडचण येऊ नये यास्तव साळीच्या लाह्यांचे पीठ अन् मध मी सोबत वागवीत आहे. अग्निसंस्कार झाल्यामुळे हे पीठ दीर्घकाळ टिकते. ते स्वादिष्ट आहे अन् पौष्टिकसुद्धा आहे बरे! खेरीज त्यात मध मिसळलेला असल्यामुळे तर ते फारच रुचकर लागते." मग कटोऱ्यातला आणखी एक पिठाचा गोळा पक्षिराजाला देऊन उरलेले गोळे तेजपाल खाऊ लागला. दुसरा गोळा चवीने खाल्ल्यावर पक्षिराज सांगू लागला, "मानवा, खरेतर तृण, धान्य, किटकादी क्षुद्र आहारावर उपजिविका करणाऱ्या कनिष्ठ पक्षी कुलातील मी नाही. परंतु भक्ष्याच्या उष्ण रुधिरापेक्षाही तू दिलेले अन्न रुचकर अन् मधूर आहे हे मात्र खरे. खेरीज त्याचे सेवन करताना काहीच सायास पडत नाहीत. मध आणि धान्य ही चविष्ट असते, हे नवीनच ज्ञान मला तुझ्यामुळे प्राप्त झाले." पिठाचे गोळे भक्षण करुन पक्षिराज प्रसन्नचित्त झाला आहे हे तेजपालाने ओळखले. याचा फायदा घेऊन आपल्या हेतूपूर्तीसाठी त्याचा काही उपयोग होईल का? हे अजमावून पहावे असा विचार करुन त्याने पृच्छा केली. "पक्षिराज, आपण सर्वत्र मुक्त संचार करता तर सुवर्ण प्रदेशाचे ज्ञान आपल्याला असणारच. तेथे सुवर्णाचा साठा नेमका कोठे आहे? त्यावर कोणाची सत्ता आहे? तो प्रदेश येथून कितीसा दूर आहे? त्या भागात कोणी मानव राहतात का? तसेच त्या प्रदेशातून प्रवास करताना कोणते धोके संभवतात? या माझ्या शंकांचे परिमार्जन करुन आपण मला उपकृत करावे. या निर्मनुष्य प्रदेशात तुमच्या रुपाने साक्षात देवदूतच मला भेटला आहे, असे माझे प्रांजळ मत आहे. मोठ्या भाग्यानेच मला आपले दर्शन झाले असे माझे मत आहे. आपण ज्ञानी असून माझा हेतू आपण ओळखला आहेच! तर माझ्या शंकांचेही निरसन करावे अशी माझी प्रार्थना आहे!" आपल्या कथनाचा इष्ट परिणाम पक्षिराजावर होत असल्याचे हेरुन तेजपाल पुढे बोलू लागला, "पक्षिराज, आम्ही मानव तर गरूडांना देवस्वरुप समजतो. आमच्या पवित्र धर्म ग्रंथामध्ये तुमच्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमांचे सर्गच्यासर्ग आहेत. तुमच्या कुळातील महाशक्तिशाली पक्षिराज विनतासुत! त्याने तर स्वर्गलोक जिंकून अमृत कुंभ प्राप्त केला असे वर्णन मी मोठ्या भक्तिभावाने धर्म मार्तण्डांच्या तोंडून श्रवण केले आहे. देवराज श्रीविष्णूंचे वाहन गरूड हेच असून तो पक्षिवर्गातील उच्च कुळातील आणि समस्त पक्षिवर्गाचा राजा आहे असाही निर्वाळा मानवांचे धर्मग्रंथ देतात. ज्या देवता प्रतिमांची प्रतिष्ठापना करून आम्ही त्यांचे नित्य पूजन करतो, त्यामध्ये पक्षिराज गरूडाची प्रतिमासुद्धा असते. तेजपालाच्या कथनाने संतुष्ट होत पक्षिराज वदला, "तू कथन केलेल्या महान परंपरेचा उल्लेख माझ्या पिता-पितामह आदी ज्येष्ठांच्या मुखी मीही ऐकला आहे. ज्या विनतासुताचा तू उल्लेख केलास त्याच्याच महान कुळातील मी स्वतः आहे, याचा मला अभिमान असून या गोष्टी तुम्हा मानवांना ज्ञात आहेत याबद्दल मला अतीव आनंद झाला आहे." पक्षिराजाला खुलवून इप्सित साध्य करण्याचा हा सुवर्ण क्षण आहे. हे ओळखून तेजपाल म्हणाला, "आपले दर्शन हे तर माझे परम भाग्यच आहे. भविष्यात महान पराक्रमी वैनतेयाने मला दर्शन दिले होते एवढेच नव्हे तर मजशी प्रत्यक्ष संभाषणही केले होते हा सुवर्णक्षण मी माझ्या हृदय संपुटात नित्य जतन करीन. आपल्या भेटीचे वृत्त ऐकून इतर मानव तर माझ्या भाग्याचा हेवाच करतील. हे पक्षिराजा, तू अत्यंत वंदनीय आहेस. तू अगदी अकल्पितपणे माझा भाग्यविधाताही बनला आहेस. तर कृपा करुन मी पृच्छा केलेली माहिती तू इत्यंभूत कथन करावीस अशी प्रार्थना मी तुझ्या चरणी करतो." मानववाणी ज्ञात असणाऱ्या त्या पक्षिराजाला मतलबी स्वार्थी हेतूसाठी मानव विनयाचे कसे ढोंग करु शकतो याचा काडीमात्रही अनुभव नव्हता म्हणूनच त्याच्या प्रार्थनेला भुलून त्याला सुवर्णप्रदेशाची माहिती द्यावयाची एवढेच नव्हे तर सुवर्णप्राप्तीच्या त्याच्या कार्यात त्याला सर्वतोपरी सहाय्य करण्याचा मनात निर्धार करीत पक्षिराज कथन करु लागला. "बा मानवा! या हिमगिरीच्या पश्चिम दिशेला कांचनगंगा नदीच्या उद्गमापाशी टेकडीमध्ये सुवर्णसंचय आहे. या स्थानापासून अवकाशमार्गे अडीच घटीकांमध्ये तिथवर पोहोचता येईल. मधला प्रदेश निबिड अरण्याने व्याप्त आहे. त्यामध्ये अतिविशाल सर्प, हिंस्त्र श्वापदे वस्ती करुन आहेत. मात्र ती निशाचर असल्यामुळे दिवसा त्यांचा उपद्रव व्हायचा नाही. त्या प्रदेशात मानवांची वस्ती आहे. ते मानव तुझ्या तुलनेत फारच अप्रगत आहेत. त्यांचे वागणे श्वापदांप्रमाणे असून त्यांना मानवांची भाषाही अवगत नाही. धातूच्या शस्त्रांचे ज्ञान सोडाच पण साध्या वस्त्रांचेही ज्ञान त्यांना अद्यापि झालेले नाही. सुवर्णसाठा त्यांच्याच कब्जात आहे. ते वृत्तीने पशुवत अन् आक्रमक, तामसी स्वभावाचे आहेत. पर्वताच्या कडे कपारी, गुहा, झाडांच्या ढोली यांच्या आश्रयाने ते वास्तव्य करतात. यापूर्वी सुवर्ण प्राप्तीच्या हेतूने त्यांच्या प्रदेशात गेलेल्या नागर मानवांची त्यांनी हत्या केली. एवढेच नव्हे तर त्यांचे मांसही त्यांनी भक्षण केले. ते सर्वभक्षीच आहेत." "भक्ष्य प्राप्तीसाठी सुवर्ण प्रदेशात माझा नित्य विहार असतो, हे खरे पण सुवर्णाचा साठा नेमका कोठे आहे याचे ज्ञान मी प्राप्त केलेले नाही. आम्हा पक्षिराजांना तर भक्ष्याखेरीज इतर कशातही स्वारस्य असत नाही पण तुम्हा मानवांना सुवर्णाचा एवढा मोह का असावा हे काही मला कळलेले नाही. सुवर्ण प्राप्तीसाठी आपले जीवन सर्वस्व गमाविण्याचे मूर्ख धाडस तुम्ही मानव प्राणी का करु धजावता हे माझ्या दृष्टीने एक गूढच आहे. तू तरी सुवर्णाच्या मोहाने असला धोका पत्करु नयेस असे मला वाटते. तू शस्त्र सज्ज आहेस हे ठीक आहे पण सुवर्णप्रदेशातील त्या मानवी श्वापदांची संख्या तर अगणित आहे. दगडांचा मारा करीत एकदा का त्यांनी भक्ष्याला कोंडीत धरले की हिंस्त्र श्वापदेसुद्धा सहसा त्यांच्या कचाट्यातून सुटत नाहीत तशी पाळी तुझ्यावर आली तर तुझे जिवित रक्षण कसे करायचे ही समस्याच माझ्यापुढे निर्माण झाली आहे." पक्षिराजाला काय उत्तर द्यावे याचा क्षणभर तेजपाललाही संभ्रम पडला. थोडा विचार करून त्याने सावध स्पष्टीकरण केले. “पक्षिराज, सुवर्णप्राप्तीमध्ये माझा तसा व्यक्तिगत स्वार्थाचा हेतू नाही. आमच्या जीवनातही सुवर्णाला फारसे मोल नाही. पण मगाशी मी उल्लेखिले त्याप्रमाणे देवतांच्या प्रतिकृती तयार करावयाला टिकावू आणि शुद्ध धातू म्हणून आम्हाला सुवर्णच लागते. पक्षिराज! माझा हेतू साध्य झाला तर माझ्या प्रदेशातील मानव मला दुवा देतील. त्याचे श्रद्धास्थान अशा देवतांच्या प्रतिमा घडविण्यासाठी जिवावरचे संकट पत्करुन मी सुवर्ण प्राप्त केले या माझ्या कृत्याची मोठी प्रशंसा होईल. नाहीतरी हा देह कधी ना कधी मृत्युमुखी पडणारच आहे तर मग काही दैदिप्यमान पराक्रम तरी करावा हा माझा यामागे हेतू आहे. केवळ या आणि एवढ्याच इच्छेने मी येथवरचा पल्ला गाठला आहे." "पक्षिराज, यशाचा क्षण अगदी जवळ आला असता भ्याडाप्रमाणे जीव रक्षणासाठी आधार घेण्यास मी सुद्धा क्षुद्र कुलातील थोडाच आहे? माझ्या पूर्वजानीही दिग्गज पराक्रम गाजविला असून त्यांच्या नावाला बट्टा लागेल असे भीरुतापूर्ण कृत्य मी कदापि करणार नाही. माझ्या या साहसकार्यात तुझ्यासारखा परमप्रतापी सहाय्यकर्ता लाभला असता माघार घेणे हा तर करंटेपणाच म्हणावा लागेल. माझ्या अमोघ शरसंधानाची जराशी चुणूक पाहिल्यावर हल्ला करण्यासाठी पुढे येण्याचे धाडस ते नरदेहधारी पशू कदापि करणार नाहीत याची खात्री हे पक्षिराजा तू बाळग. याखेरीज अगदीच जीवावर बेतले तर मला उचलून तू उंच आकाशात उड्डाण मारुन माझे रक्षण करु शकशील, यावर माझा पूर्ण भरवसा आहे. पक्षिराज किमानपक्षी माझे हे साहस एका अर्थाने तरी यशस्वी झाले आहे. सुवर्णप्राप्ती झाली नाही तरी वैनतेयाचा पराक्रमी वंशज मला भेटला! तसेच हिमगिरी पासून स्वर्गलोकांचा आरंभ होतो असा आम्हा मानवांचा आजपर्यंतचा समज सपशेल खोटा आहे, याचे ज्ञान मला झाले हे सुद्धा भाग्यच म्हणायला हवे." तेजपालच्या कथनाने पक्षिराजाला चांगलाच हुरुप आला. "मानवा, मी काय सांगतो हे लक्षपूर्वक ऐक. हिमगिरी पासून देवलोक सुरु होतो, हा तुमचा समज निखालस खोटा आहे. एवढेच नव्हे तर तुम्ही म्हणता तो स्वर्गलोक या अवनीवर कुठेही नाही हेही तू ध्यानात घे. स्वर्ग लोक मेघमालांच्याही पलीकडे उंच आकाशात आहे. स्वर्गलोक पहाण्याच्या हेतूने मी खूप वेळा उंच अवकाशात उड्डाण करुन पाहिले पण देवलोक गाठण्याचे सामर्थ्य मी एवढा बलसंपन्न असून मजकडेही नाही, हेही तू ध्यानात ठेव. मानवा आताच मला स्मरण झाले... कांचन गंगेच्या उगमापाशी पूर्व दिशेला टेकडी मध्ये एक मोठे विवर आहे. त्या विवरातून सुवण प्रदेशातील मानव देहधारी बाहेर पडताना पाहिल्याचे मला स्मरते. ते मानव अधूनमधून आपल्या देहावर सुवर्णमृत्तिकेचे लेपन करतात तसे लेपन करुन विवराबाहेर येणारे काही मानव मी दोन संवत्सरांपूर्वी पाहिले होते." "मानवा, निःसंदेहपणे, त्या विवरातच सुवर्णाचा संचय असावा. तुझ्या शोधाला आता दिशा सापडली आहे. तू अशी काहीतरी युक्ती काढ की जेणेकरुन मी तुला सुरक्षितपणे त्या स्थळापर्यंत अवकाश मार्गाने नेऊ शकेन. अन् हो! तत्पूर्वी तू मला असेही वचन दे की, तुला सुवर्णप्राप्ती झाली तर तू ज्या देवतांच्या प्रतिकृती करशील त्यामध्ये वैनतेयाचीही प्रतिमा नक्की करशील!" पक्षिराजाचे कथन ऐकून तेजपालचे हृदय आनंदाने उचंबळून आले. पण वरकरणी तसे न भासविता तो गंभीर स्वरात म्हणाला, "पक्षिराज! पवित्र देवतांची अन् मानवाच्या पवित्र धर्माची शपथ घेऊन मी तुला वचन देतो आहे; मला सुवर्णप्राप्ती झाली तर विनतासुताची प्रतिमा मी बनवीन. एवढेच नव्हे तर तिची प्रतिष्ठापना एका विशाल मंदिरात समारंभपूर्वक करुन अखिल मानव जातीसाठी एक कायमचे श्रद्धास्थान मी निर्माण करीन!!" संकल्प पूर्तीचा क्षण नजीक आला या आनंदाने तेजपाल निर्धास्त झाला. त्याची वणवण आता संपणार होती. कर्तव्यच्युत आळशी दरिद्री म्हणून त्याची निर्भर्त्सना या उपरांत कोणी करू शकणार नाही असा अमूल्य धनसंचय करून जीवनाचे साफल्य प्राप्त करून देणारा क्षण आता दूर नाही याची खात्री वाटून तो सुखावला. निर्मनुष्य प्रदेशातून भटकंती सुरू असता कित्येक दिवस निश्चिंतपणे निद्रा घेण्याचे सुखही त्याला लाभलेले नव्हते. मात्र आज पक्षिराजाच्या कृपाछत्राखाली तो निःशंक मनाने गाढ झोपला. पंच पंच उषःकाली पक्षिराजाच्या कर्ण कर्कश चित्कारानी त्याला जागृती आली. तो खडबडून उठला. पक्षिराज का ओरडत आहे त्याचा वेध घेत असता काही क्षणातच पंख फडफडवीत आलेला दुसरा गरुड पक्षिराजाच्या सन्निध घेऊन बसला. सूक्ष्म निरिक्षण केले असता नवागत गरुड मादी वर्गापैकी असावा अन् बहुशा ती पक्षिराजाची मादी असावी असा तर्क तेजपालाने केला. सावध पावले टाकीत तेजपाल कपारीच्या मुखापाशी थांबला अन् पक्षिराजाला हाक मारुन त्याने वंदन केले. "मानवा ही माझी भार्या आहे. आम्हा गरूडांमध्ये प्रणयाराधनाच्या काळातच नर-मादी एकत्र राहतात. इतर वेळी त्यांची विश्रांती स्थळे भिन्न असतात. या माझ्या भार्येला मनुष्यांची वाणी अवगत नाही तसेच तिला मनुष्यांविषयी खूपच घृणा आहे. त्याचे कारणही तसेच आहे. खूप संवत्सरांपूर्वी मुक्त विहार करीत ती मनुष्यवस्ती नजीक एका उद्यानात आली असता कुणी दुष्ट मानवाने तिजवर शरसंधान केले. आम्ही गरुड विश्रांती घेत असताही सावधचित्त असतो म्हणून बाण येताना दिसताच माझ्या भार्येने प्रसंगावधान राखून त्वरेने उड्डाण केले. तिचा मर्मभेद झाला नाही परंतु तिच्या वाम पक्षांत बाण रूतला. त्या जागी अजूनही जखमेचा व्रण आहे." पक्षिराजाचे कथन सुरू असता मादी कर्णकटू चित्कार करीत राहिली. तिचे ओरडणे थांबताच पक्षिराजाचे खंडित झालेले कथन पुन्हा सुरू झाले. "बा मानवा! तुला पाहून तिच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या असून तू काही दगाफटका तर करणार नाहीस ना? अशी शंका तिला वाटत आहे. पक्षिवर्ग प्रायः मनुष्य जातीवर विश्वास ठेवत नाही. त्यात आणखी माझ्या भार्येला माणसांचा विषारी अनुभव आला आहे. तेव्हा तू कोण? तुला पक्षिराजाविषयी कसा आदर आहे हे मी तिला कथन करतो" पक्षिराज आणि त्याची मादी यांचे कर्कश चित्कार दीर्घकाळ सुरु राहिले. खूप वेळाने मादी किंचित शांत झाली. दोन्ही हात जोडून मस्तक झुकवीत तेजपाल उद्गारता झाला. "पक्षिराज! तुम्ही उभयता देव स्वरूप असून मला वंदनीय आहात. तुझ्या भार्येवर मर्माघाती शरसंधान करणारा मानव कुळातील होता हे कळल्यामुळे मी व्यथित झालो आहे. त्या दुष्टकृत्याची भरपाई करण्यासाठी, त्या निंद्य कृत्याचा सूड घेण्यासाठी पाहिजे तर तुझ्या भार्येने आपल्या तीक्ष्ण चोचीने माझ्यावर प्रहार करून मला शिक्षा द्यावी तसे झाले तर माझ्या जीवनाचे सार्थक झाले असेच मी समजेन पण माझ्या हेतूविषयी तिने शंका घेऊ नये अशी माझी विनंती तू तिजप्रत विदित करावीस. ती देईल तो न्याय मी आनंदाने मान्य करीन". त्यांचे हे कथन गरूड वर्गीयांच्या भाषेत पक्षिराजाने आपल्या भार्येला कथन केले. उभयंताचे चित्कार आणि कर्कश ध्वनी यावरून कसलाच अंदाज तेजपालला करता येईना. "बा मानवा! तुझे निवेदन मी भार्येला कथन केले आहे. अर्थात पक्षिधर्माप्रमाणे ती तुजवर किमपि विश्वास ठेवायची नाही. मात्र तुझे हृदय चंचुप्रहाराने विदीर्ण करून मृत्यूदंड द्यायची तिची इच्छा नाही. भावी योजनेतही ती कसलेही सहकार्य करणार नाही अन् त्याची जरूरीही नाही. मी माझ्या इच्छेप्रमाणे वर्तावे परंतु पुनरपि तू येथे येऊ नयेस असे मात्र तिने बजाविले आहे. बा मानवा! या वेळी मात्र तिने तुला अभय दिलेले आहे!" पक्षिराजाचे कथन पूर्ण होत असता मादी झेप घेऊन दूर उडून गेली. मोठे अरिष्ट टळले याबद्दल तेजपालाने सुटकेचा निश्वास टाकला. त्याने प्रस्थानाची तयारी सुरू केली. संभाव्य योजनेत पक्षिराजाच्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर करून घ्यायचा त्याचा बेत होता. अत्यंत आर्जवी, मधूर स्वरात त्याने आपला बेत पक्षिराजाप्रत कथन केला. कमरेभोवती उत्तरीयाचे वेढे देऊन पक्की गाठ मारून तेजपाल भूमीशायी झाला. पक्षिराजाने अवकाशात उंच झेप घेतली. थोडावेळ आकाशात गोल गोल घिरट्या घालीत तो तेजपालच्या समीप उतरु लागला. त्याच्या जवळ येताच आपल्या बळकट नखांनी तेजपालच्या कमरेला बांधलेल्या उत्तरीयावर घट्ट पकड घेत त्याने तेजपालला उचलले. तेजपालाने नेत्र मिटून घेतले. तो बलसंपन्न पक्षिराज तेजपालला घेऊन सुवर्ण प्रदेशातील कांचन गंगेच्या उगमाकडे झेपावू लागला. नियोजित स्थळी येताच पक्षिराजाने गोल गोल घिरट्या घेऊन संपूर्ण परिसराचे सूक्ष्म अवलोकन केले. कांचन गंगेच्या उगमा नजिकच्या विस्तृत क्षेत्रात मानव अथवा अन्य कोणत्याही प्राणी नाही याची पूर्ण खात्री पटल्यावर पक्षिराज विवरास सन्मुख येत तेजपालचा देह त्याने अत्यंत हळूवारपणे तृष्णाच्छादित भूमीवर ठेवला. दीर्घकाळ प्रचंड वेगाने अवकाश भ्रमण केल्यामुळे तेजापालचे मस्तक बधीर झाले. थोड्या अवधीनंतर भानावर येत तो उठून बसला. तद्नंतर कांचन गंगेच्या उगमापाशी त्याने मुखप्रक्षालन केले. ओंजळ भरुन कांचनगंगेचे स्वर्णयुक्त जल प्राशन केल्यावर तो चांगलाच तरतरीत झाला. आता आजुबाजूच्या प्रदेशाचे अवलोकन त्याने केले. टेकडीच्या पायथ्यापाशी नदीच्या उगमापासून तो नजरेच्या टप्प्यांच्या अंतरावर सुरू होणाऱ्या वनप्रदेशापर्यंतच्या भूमीवर कमरे इतक्या उंचीचे तृण माजलेले असून क्वचित एखादे दुसरे झुडूप उगवलेले दिसले. उगमाच्या दुतर्फा असेलला चिखल फिक्कट शेवाळी रंगाचा असून त्यात अधून मधून असणारे सुवर्णकण सूर्य प्रकाशात चमचम करीत होते. उगमस्थानाच्या उजवीकडे अदमासे चार वाव लांब रुंद असलेल्या विवराच्या तळाला तृणहीन भूमीवर उमटलेली फिक्कट शेवाळी रंगाची पदचिन्हे खचितच त्या प्रदेशातील आदिमांची होती. त्या पदचिन्हांमध्ये सुवर्णकणांचे प्रमाण एवढे होते की पदचिन्हांची संपूर्णकडा सोनेरी रंगाने चमकत होती आणि संपूर्ण आसमंतात कोणाचीच चाहूल लागत नव्हती. संकल्पपूर्तीच्या उन्मादात तेजपाल विवरासमोर झाला. "मानवा मी आता क्षुधार्थ झालो आहे. येथे येत असता काही अंतरावर झुडूपांच्या आश्रयाने बसलेला मृगांचा थवा मी हेरला आहे. मी भक्ष्य पकडून त्वरेने परत येतो." असे सांगून पक्षिराजाने गगनात झेप घेतली. तेजपाल विवराच्या अंतर्भागाचे अवलोकन करु लागला. सूर्योदय होऊन अर्धा प्रहर उलटलेला असल्याने सूर्य किरणे थोड्या प्रमाणात विवरातून आत शिरल्यामुळे अंतर्भागात उजेड दिसत होता. विवराच्या मुखापासून सुमारे दीड-दोनशे पावलांच्या अंतरावर विवराची लांबी पूर्ण होत असून तेथे पुरुषभर उंचीवरुन संततधार जलप्रवाह पडताना दिसला. त्याचे अवलोकन सुरु असता पायाच्या नख्यांमध्ये घट्ट पकडलेला मृग घेऊन आलेला पक्षिराज दिसला. त्याच्या समीप येताच पक्षिराजाने उंचावरुनच मृग सोडून दिला. गरगरा फिरत मृग भूमीवर आदळला अन् त्याच्या पाठोपाठ पक्षिराजही त्वरेने उतरला. "मी विवरात प्रवेश करतो. तू शांतपणे भोजन कर. काही धोका वाटलाच तर मला इशारा कर!" असे सांगून तेजपाल विवरात शिरला. अंतर्भागात दहा पावले चालल्यावर जे दृश्य दिसलेते पाहून तेजपाल स्तिमित झाला. विवर चांगले ऐसपैस आणि लांब-रुंद होते. अंतर्भागात एका टोकाला दरडीमध्ये फिक्कट हिरव्या रंगाच्या प्रस्तरांमधून, कोसळणाऱ्या जलप्रवाहातून असंख्य सुवर्ण कण ओघळत होते. भूमीवर पडून विवराच्या डाव्या बाजू पर्यंत वहात येणाऱ्या जलौघाच्या दोन्ही बाजूनी फिक्कट हिरव्या चिखलावर पुजंक्या पुंजक्यांनी सुवर्णाचे थर साठलेले होते. दीड-दोनशे पावले वहात येणारा तो जलौघ विवराच्या डाव्या बाजुला भूमीत लुप्त झाला होता. हेच जल भूमीच्या अंतर्भागातून वहात नदीच्या टेकडीबाहेरच्या उगमस्थानी उमटत असावे! म्हणूनच तेथे हिरवट रंगाचा चिखल दिसतो. अन्यथा आजुबाजूची भूमी पिवळसर रंगाची दिसत होती. इतक्या अवचितपणे अन् विनासायास सुवर्णाचा अमाप साठा हाती आला याबद्दल त्याने आराध्य देवतेचे आभार मानले. संकल्पपूर्तीच्या त्याक्षणी धर्मदत्तांनी सांगितलेले भाकित त्याला आठवले. सुवर्णप्रदेशाच्या शोधात येण्यापूर्वी त्याने नगरातल्या नृसिंहाच्या देवालयात कौल घेतला होता. देवस्थानचे प्रमुख आचार्य. धर्मदत्त... त्यांच्या कुडीत नृसिंहाचा संचार व्हायचा. त्यावेळी त्यांनी उच्चारलेले भाकित सहसा चुकायचे नाही अशी लोकवदंता होती अन् त्यामुळे नगरश्रेष्ठी पेक्षाही त्यांना आदर दिला जायचा. तेजपाल तर कुमार वयात त्यांच्या वाऱ्यालाही फिरकत नसे. नृसिंह मंदिराच्या मागील बाजूला पाठशाळेत मात्र त्याला नेमाने जायला लागायचे. वृद्ध अध्यापक गंगभट्ट म्हणजे साक्षात जमदग्निचा अवतार. अविवाहित राहून वेदविद्या प्रसाराला त्यांनी वाहून घेतलेले, अशा समर्पण भावाने कार्य करणाऱ्या विद्वांनाचे ठायी हटकून आढळणारी अहंमन्य तऱ्हेवाईक वृत्ती त्यांच्या ठायी ठासून भरलेली. मंडुकाचार्य, बकध्यान, कृष्णवराह, गर्दभ अशी देववाणीतली शेलकी विशेषणे छात्रांना बहाल करीत ते विशेष असणाऱ्या प्राण्यालाच साहेल असे ताडनही ते करीत. त्यांना फारच कष्ट झाले तर उर्वरित कार्य त्यांच्यावतीने त्यांच्या मर्जीतला कुणी छात्र पार पाडायचा. समोर बसलेला अध्ययनार्थी म्हणजे निर्बुद्ध मर्कट आहे अशा आवेशातच अध्यापन कार्य चालायचे. व्यासपीठासमोरच्या रांगेतील ब्रह्मकुमारांना वेदातील ऋचेची संथा दिल्यावर त्या मागच्या क्षात्रकुलोत्पन्नांना नीतीबोध सांगायला ते उठले की तेजपालच्या पोटात गोळा यायचा. ते उठून उभे राहीतो घडघडा पाठ केलेल्या कालच्या वचनाचे पूर्ण विस्मरण त्याला व्हायचे. मग त्यांच्या हातीच्या वेत्रकाष्ठाचे तडाखे खाता खाता, "या घटोत्कच बोळक्या तोंडाच्या गंगैयाला कंठसूत्र घालून अश्वाच्या पाठी बांधून धर्मस्थलाभोवती तीन प्रदक्षिणा घालीन तरच मी नावाचा तेजपाल" या अशक्य प्रतिज्ञेचे अंर्तमनात उच्चारण तो करायचा. यांचा मार खाऊन खाऊन आपली अवस्था खचितच निर्बुद्ध अजापुत्रासारखी होणार याचे अतीव दुःख होऊन त्या काचातून सुटण्यासाठी नगरा बाहेरच्या अलकंनदेच्या पात्रात आत्मसमर्पण करण्याच्या निर्णयाप्रत तो आला अन् अकस्मात या साऱ्या वास्तवाला अद्भुत कलाटणी देणारी घटना घडली. त्याच्या पित्याचा आकस्मिक मृत्यू झाला. मृत्तिका पात्रात निखारे घेऊन स्मशानाकडे अनवाणी जात असताही पितृवियोगाच्या दुःखापेक्षाही सक्तीने पाठशाळेत जायला लावणारी कुटुंबातील अधिकारी व्यक्ती नष्ट झाल्याबद्दल त्याचे मन आनंदाने मोहरून गेले. तेजपाल आता मन मानेल तसा वागायला मोकळा झाला. मातेचा धाक त्याला कधीच वाटला नाही. पति वियोगाच्या दुःखाने उन्मळून गेलेली ती आर्य स्त्री! तेजपालच्या पाठीवर जन्मलेले अंगावर पिणारे लेकरू असल्या मुळेच सती गेली नाही इतकेच! उभी हयात मरण येत नाही म्हणूनच ती जगत राहिली. उनाडक्या करीत स्वच्छंदपणे फिरणाऱ्या तेजपालची शरीर संपदा मात्र क्षत्रियाला शोभणारी धष्टपुष्ट होऊ लागली. वर्णधर्माला शोभणाऱ्या अश्वारोहण, धर्नुविद्या, खड्ग विद्या मात्र त्याने नगरातल्या मल्लशाळेत साध्य केल्या. तो असे निर्धास्त जीवन जगत असता पाठशाळेतील त्याचे समवयस्क मित्र अध्ययन पूर्ण करून आपापल्या वृत्ती संभाळीत सुखासीन जीवन जगू लागले. कनिष्ठ भ्राता भार्गव अध्ययन पूर्ण करुन नगर रक्षक म्हणून राजसेवेत रूजू झाला. त्यादिवशी मात्र तेजपाल अंतर्मुख झाला. अकिंचन रिकामटेकड्याला समाजात स्थान नाही हे त्यावेळी त्याला उमगले. मग मात्र विनासायास अर्थार्जन करण्याचे विविध मार्ग त्याला खुणावू लागले. अर्थप्राप्तीसाठी गैरमार्ग पत्करायला त्याचे संस्कारी मन तयार होईना. मग तो सिद्धींच्या मागे लागला. साधूअवलियांच्या अनुग्रहाने द्रव्य साधनेचे अद्भुत मार्ग प्राप्त करण्यासाठी तो त्यांच्या कच्छपी लागला. आता त्याचा कायम मुक्काम नगरातल्या धर्मशाळेत पडू लागला. अशाच प्रयत्नात एका जराजर्जर हठयोग्याशी त्याचा परिचय झाला. त्या आसन्नमरण बैराग्याची मनोभावे सेवा करून हिमगिरी पलीकडच्या सुवर्ण प्रदेशाची माहिती त्याला प्राप्त झाली. आता त्या प्रदेशात जाऊन सुवर्ण प्राप्ती करण्याच्या तयारीला तो लागला. अनंत स्नेही सोबत्यांचे अनंत सल्ले घेऊन त्याने योजना तयार केली. आपण 'अर्थार्जनासाठी देशाटन करणार' असा बेत घरात जाहीर केला. प्रस्थानापूर्वी नगरातील आराध्य दैवत नृसिंहाचा कौल घेण्याचा सल्ला मातेने दिला. तेजपाल नृसिंह मंदिरात जाऊन पोहोचला. धर्मदत्तांभोवती कडे केलेल्या पृच्छकांची पांगापांग झाल्यावर तो हळूच पुढे सरकला. मग धर्मदत्ताना साष्टांग नमस्कार करुन सुवर्णप्राप्ती होण्यासाठी हिमगिरी पलीकडे जायचा मनोदय त्याने व्यक्त केला. त्याचे कथन ऐकताच थयथया नाचत धर्मदत्त ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटत राहिले. खूप वेळानंतर तेजपालच्या नेत्रात रोखून पहात त्यांनी भाकित वर्तवले, "ज्याच्याप्राप्तीत सुखाचा आभास आहे त्याचा मनुष्याला हव्यास असतो. म्हणून ते परमप्राप्तव्य असे त्याला वाटते. परंतु ही जाणीव म्हणजे क्षितिजाला केलेला स्पर्श आहे. जे आपल्या हाती आहे ते आपलेच आहे याची शाश्वती देता येऊ नये एवढे आपले अस्तित्व क्षणजीवी आहे. असे असता तू सुवर्णप्राप्तीचा मोह धरून येथे यावेस अन् मी तुला घटित सांगावे या गोष्टीला तरी काय अर्थ उरतो ? सुवर्ण हे काही जीवनसर्वस्व नव्हे, सुखनिधान तर नव्हेच नव्हे! हे मला कळते!! त्याने क्षुधा, तृष्णा शमन होत नाही कि त्याला सुंगधही येत नाही. मग त्याचा हव्यास तरी कशाला असावा? अर्थात माझे हे कथन म्हणजे भग्न पात्रात जल साठविण्याचा प्रयत्न आहे पण तू श्रद्धेने येथे आलास तर माझा उपदेश तू खचितच ऐकावास. लक्ष्मी चंचल असते म्हणून तिच्या प्राप्तीचा हव्यास बाळगू नये. कष्ट केले तर मानवाच्या गरजा भागू शकतील एवढे कर्तृत्व त्याच्या ठायी निसर्गतः असते तसे ते तुझ्याठाई सुद्धा आहे. सुवर्ण राशींची प्राप्ती ही तुझी गरज नाही हे ध्यानी घेऊन तू त्याच्या प्राप्तीचा हव्यासच धरू नयेस. विहित कर्तव्यापासून पराडःमुख होऊन सुवर्ण प्राप्तीची; ती विनासायास व्हावी अशी इच्छा तरी तुझ्या मनी का उत्पन्न व्हावी? आयते धन हे निद्रिस्त भुजंगा सारखे असते, सांभाळणेही कठिण आणि त्याग करणेही कठिण." हे असंबद्ध भाकित ऐकून तेजपाल क्रोधित झाला. "आचार्य! मला तुमचा सल्ला नकोय. मी योजिलेल्या मार्गात मला यश मिळेल अथवा नाही... यश कसे मिळवावे यावर तोडगा सांगा." त्याचे भाषण ऐकल्यावर नेत्र मिटून घेत धर्मदत्त उद्‌गारले, “पृच्छकाची ईप्सित पूर्ती करण्यासाठी उघडलेले हे धर्मछत्र नव्हे! भाकित मी वर्तविले आहे. इतःपर ज्या मार्गाने ईप्सित पूर्ती होईल असे तुला वाटते त्या मार्गाने जायला तू स्वयंसिद्ध आहेस. त्यासाठी धर्मस्थळी येण्याची तसदी तरी तू का घ्यावीस? तू जसे इच्छितोस तसे होईल असेही समज हवे तर! पण या क्षणी मी तुझे मुखावलोकनही करु इच्छित नाही. जा! दूर हो मज समोरुन...!" या उद्दाम ब्रह्मचाऱ्याला धर्मस्थळीचे प्रमुख आचार्यपद कुणा मूर्खाने दिले असेल बरे? याचा विचार करीत तेजपाल धर्मस्थळाबाहेर पडला. तेजपाल भानावर आला. समोर दिसणाऱ्या अपार सुवर्ण राशीचा स्वामी या क्षणी मी आहे! ही भावनाच अतीव सुख देणारी वाटली. कोसळणाऱ्या जलप्रवाहाबरोबर क्षणोक्षणी भूमीच्या उदरा बाहेर पडणारे सुवर्णकण प्रवाहाच्याकडेला साचत इथल्या संचयात क्षणोक्षणी भरच घालीत राहणार. जणू कुबेराचेच हे भांडार आपल्याला ज्ञात झाले आहे. नगरातील सोडाच पण संपूर्ण आर्यावर्तातील कोणताच धनिक...साक्षात सम्राट चारुगुप्त सुद्धा आपली बरोबरी करु शकणार नाहीत. नृत्यालयातल्या रमणीय सुंदरींची उत्तरीये आता आपल्या एका भृकुटीभंगा बरोबर ढळतील, भूलोकीचे कोणतेही सुख आता आपल्याला दुष्प्राप्य नाही. या विचारांच्या आवर्तात गुंगून दिड्ःमूढ झालेला तेजपाल अनिमिष नेत्रांनी निसर्गाने मुक्त केलेले स्वर्ण भांडार पहातच राहिला. थोड्या वेळाने स्वप्न रंजनातून बाहेर आल्यावर तो पुढे सरसावला. जलप्रवाहाच्या कडेला कणाकणानी साचलेला सुवर्णाचा गठ्ठा थरथरत्या हातांनी पकडून किंचित जोर लावून तो हलविताच तळातल्या ओल्या मृत्तिकेपासून विलग होऊन अलगद तेजपालच्या हाती आला. अपेक्षेपेक्षाही जडशीळ असलेला तो गठ्ठा छातीशी कवटाळून तेजपाल मागे वळला. बोचक्यातली कटी वस्त्रे बाहेर काढून खड्गाने त्यांचा छेदघेऊन विशिष्ट आकाराचे आठ तुकडे तेजपालाने केले. प्रवाहाच्या कडेला साचलेले सुवर्णांचे गड्डे जमवून कटिवस्त्राच्या फडक्यात त्याचे नेटके गाठोडे बांधले. सुवर्णाचे जडशीळ गाठोडे पाठीवर घेऊन वेडीवाकडी पावले टाकीत तो कपारीच्या मुखापाशी आला. अर्धोन्मिलित नेत्रांनी डुलक्या घेणाऱ्या पक्षिराजाला हाक मारुन तो म्हणाला, "पक्षिराज हे गाठोडे तुझ्या निवासस्थानी कपारीत ठेऊन त्वरेने परत ये. तोवर मी दुसरे गाठोडे बांधतो." पक्षिराज सुवर्णाचे गाठोडे घेऊन निवास स्थानाकडे झेपावला अन् तेजपाल दुसरे गाठोडे बांधायच्या तयारीला लागला. तेजपालाच्या अपेक्षेपूर्वीच पक्षिराज परत आला. तोपर्यंत चार गाठोडी बांधून झाली. अतिश्रमामुळे तेजपाल धापा टाकीत होता. "अरे मानवा तू तर फारच थकलेला दिसतोस." पक्षिराज म्हणाला. त्यावर तेजपाल म्हणाला, "पक्षिराज, माझ्या थकव्याची काळजी नको करूस. तू मात्र थकू नकोस. अजून अशी सात गाठोडी सूर्यास्तापूर्वी तुला वहावयाची आहेत." पक्षिराज म्हणाला, "माझ्या शक्तीची अन् वेगाची तुला कल्पना नाही. या कामासाठी सूर्यास्तापर्यंतचा अवधी तरी कशाला? अपरान्ह काळापर्यंत उर्वरित सातही खेपा पूर्ण करुन आपण तुझ्यासह आपला मुक्काम गाठू. तू गाठोड्यांची संख्या अजून वाढवित असलास तरी माझी काही हरकत नाही." गाठोडे घेऊन पक्षिराज मुक्कामाकडे झेपावत असता आणखी गाठोडी बांधण्यासाठी एखादे सुद्धा कटीवस्त्र आपणापाशी नाही याचे अतीव दुःख तेजपालला झाले. सुवर्णाचे गाठोडे सूर्यकिरणात चमचमत असलेले तेजपालला दिसले. सहावे गाठोडे घेऊन पक्षिराजाने अवकाशात उड्डाण केले. तेजपालाचे कार्य तर पूर्ण झालेले होते. दूर जातजात ठिपक्याएवढ्या दिसणाऱ्या पक्षिराजाकडे तो पाहत राहिला. केवळ वस्त्रांअभावी आपणाला आठ गाठोड्यांवरच समाधान मानावे लागते, याचे दुःख त्याच्या जिव्हारी लागले होते. येथून आणखी सुवर्ण नेण्यासाठी काय युक्ती करावी या विवंचनेत तेजपाल पडला असता नजरेच्या टप्प्याएवढ्या अंतरावरील झाडीतून बाहेर पडून अनाकलनीय स्वरात आरडाओरडा करीत विवराच्या दिशेने येणारा आदिमांचा जथा त्याला दिसला. सुवर्णाचे गाठोडे घेऊन झेपावणारा पक्षिराज त्यांना दिसला होता. विवरातील सुवर्णाचा अपहार करण्यासाठी कुणी आले असावे याचा बोध त्यांना झाला म्हणूनच ते विवराच्या दिशेने दगड धोंड्यांचा मारा करीत पुढे पुढे सरकू लागले. विवराच्या मुखाआडून तेजपाल त्यांचा वेध घेऊ लागला. त्याने धनुष्य सज्ज केले. जथ्यातील आघाडीवरचे आदिम बाणाच्या टप्प्यात येताच एकाच्या वक्षाचा वेध घेत त्याने आकर्ण प्रत्यंचा ताणली. सरसरत गेलेल्या बाणाने आपले कार्य निर्वेध बजावले अन् उरात रूतलेल्या बाणासह आरोळी मारीत तो आदिम रक्ताच्या थारोळ्यात पडला त्यांनतर आणखी दोघांचीही तीच अवस्था झाली. आता मात्र जथा जागच्या जागी खिळून राहीला. काय होते आहे याचा अर्थबोध होईतो चौथा आदिम धराशायी झाला. त्याबरोबर प्रसंगाचे गांभीर्य कळलेले उर्वरित आदिम पळतच माघारी वळले. तेजपालाने सुटकेचा सुस्कारा सोडला. माघारी वळलेले आदिम भयाने वाट मिळेल तिकडे पळत सुटले. त्याचवेळी सहावे गाठोडे ठेऊन पक्षिराज सुवर्णप्रदेशात येत होता. भूमीवर पडलेले शरविद्ध आदिम पाहून तो किंचित भांबावला. खाली न उतरता तो गोलगोल घिरट्या घालत राहीला. विवराच्या मुखातून तेजपालाने घिरट्या घालणाऱ्या पक्षिराजाला पाहिले. उत्तरीय फडकवीत तो विवराबाहेर आला तेव्हाच पक्षिराज खाली उतरला. "अखेर त्यांना आपल्या पत्ता लागला म्हणायचा पण तू युक्तीने त्यांचा हल्ला परतवून लावलं आहेस. अक्राळ विक्राळ ओरडत दूर जाणारे पशुमानव मला दिसले. तद्नंतर शरविद्ध होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांचे चार साथीदारही मी पाहिले. तरीही सावधगिरी म्हणून मी खाली उतरलो नाही. मानवा आता सुर्वणाचा मोह सोडून आपण माघारी जावे हे बरे. ती उरलेली गाठोडी इथेच राहू द्या. तू माझ्या सोबत चल कसा!" पक्षिराजाने सल्ला दिला. "पक्षिराज, यश एवढे हाताशी आलेले असता कच खाणारा मी भिरु वृत्तीचा नाही! माझ्या भात्यात अजून अठरा बाण आहेत. पण त्याहीपेक्षा प्रभावी इलाज मला आता सुचलेला असून त्या आदिमांचा कायमचाच काटा मला काढावयाचा आहे" तेजपाल बोलला. पक्षिराज चिंतेच्या सुरात बोलला, "मानवा! त्यांचे संख्याबळ! ते तुला अजिबात ज्ञात नाही. ते जितक्या त्वरेने घाबरून पळून गेलेत, तितक्याच त्वरेने ते पुन्हा हल्ला करू शकतात. संभाव्य परिणामांचे विचार करण्याइतके तारतम्य त्यांजपाशी नाही. दुसरे म्हणजे आपला कार्यभागही बराचसा उरकला आहे. आता त्या पशु मानवांशी वैर धरण्यात काय स्वारस्य? शेवटी काहीही झाले तरी ते या भागातले मूळ रहिवासी आहेत. आपल्या लालसेसाठी त्यांचा घात करणे मला उचित वाटत नाही. त्यांच्या भूमीत येऊन आपण त्यांचे संकेत मोडीत आहोत हे माझ्या मनाला पटत नाही." त्यावर तेजपाल म्हणाला, "अती श्रमामुळे तुझी मती भ्रष्ट झाली आहे. पण ठीक आहे. पूर्वी ठरल्याप्रमाणे ही दोन गाठोडी तरी आपल्याला नेलीच पाहिजेत. अन्यथा आदिमांना घाबरून आपण पलायन केले म्हणून तुझी भार्या अवहेलना करील." यावर पक्षिराज सातवे गाठोडे घेऊन निघाला. भूमीवर पडलेल्या आदिमांचे तेजपालाने सूक्ष्म अवलोकन केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते आदिम पूर्ण दिगंबरावस्थेत होते. हातापायांची नखे रानटी श्वापदांप्रमाणे वाढलेली, अंगावरील लव पशुंप्रमाणे अंगूळभर लांब अन् डोईच्या केसांचे तर शिप्तर झालेले आहे. पडलेल्यांपैकी एक स्त्री आहे हेही त्याच्या ध्यानी आले. हे ओंगळ पशुतुल्य आदिम मानव कुळातले आहेत या कल्पनेनेच त्याला शिसारी आली. हा अमुल्य सुवर्ण खजिना त्यांच्या कब्जात असणे त्याला योग्य वाटेना. आपल्या अन् खजिन्याच्या मार्गातून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा नामी बेत त्याने आखला. कमरबंदाच्या थैलीतले चकमकीचे दगड अन् कापूस घेऊन तो भूमीशायी आदिंमापर्यंत गेला. थोडेसे गवत उपटून त्यात कापूस ठेवून त्याने चकमक घासली. असंख्य अग्निकणानी कापूस धुमू लागला. त्यावर हळूवार फुंकर घालून त्याने अग्नि प्रज्वलित केला. आता आदिमांचे या प्रदेशातून समूळ उच्चाटन त्याचे हे अमोघ अग्न्यास्त्र करणार होते. सहस्त्र जिव्हानी ग्रास घेत अग्नि हळू हळू रौद्ररूप धारण करू लागला. विवराच्या दिशेने येणारा अग्नी झुडूपांच्या डहाळ्यांनी झोडपून नष्ट करीत स्वतःच्या सुरक्षिततेची व्यवस्था करून झाडीच्या दिशेने स्वाहाकार करीत निघालेल्या अग्नीचे रौद्र तांडव तेजपाल पहात असता पक्षिराज माघारी आला. "मानवा! तू हा भलताच उपाय योजिलास की रे? अनिर्बंध सुटलेला हा अग्नी साऱ्या प्रदेशाचे भस्म करील." पक्षिराजाची ही शंका ऐकून तेजपाल छद्मी हसत म्हणाला, "पक्षिराज, न जाणो ते आदिम पुनश्च चाल करुन आले अन् त्यांच्या संख्या बलापुढे माघार घेण्याची नामुष्कीची वेळ आली तर! हा वणवा असा फार काळ भडकणार नाही. भूमीवरचे शुष्क तृण जाळीत अग्नी गर्द वनराई पर्यंत गेला की आपोआप शमेल. तूर्त आदिम वीरांचा धोका पूर्ण टळला असून तू हे आठवे गाठोडे ठेऊन मला न्यायला ये!" पक्षिराज आठवे गाठोडे ठेऊन तेजपालला न्यायला येईतो वणव्याने रौद्र रुप धारण केले होते. गर्द वनराईतील झाडांची पाने आगीने होरपळल्यामुळे शुष्क होऊन उभी झाडे पेटू लागली. अग्नीचे भयाकारी तांडव पाहून घाबरलेला पक्षिराज वेळ न दवडता तेजपालला घेऊन कपारीच्या दिशेने निघाला. संपूर्ण आकाश धुरामुळे भरुन गेल्यामुळे या पूर्वीच्या मार्गाने न जाता जरा दूरच्या मार्गाने पक्षिराजाने आपला निवास गाठला. पक्षिराजाच्या कपारीजवळून सुवर्ण प्रदेशाच्या दिशेने पाहिल्यावर अर्धचंद्रकार अग्नी रेषा स्पष्ट दिसत होती. आकाशात धुराचे लोट उसळताना दिसत होते अन् प्राणभयाने दूर उडून चाललेले पक्षिवर्गही कुठे कुठे दृष्टोत्पत्तीस येत होते. "मानवा, गर्द वनराई पर्यंत गेल्यावर अग्नी शमेल असे तू म्हणाला होतास पण प्रत्यक्षात उलटच झालेले दिसतेय! संपूर्ण सुवर्ण प्रदेश आता वणव्याने बेचिराख होईल.” पक्षिराज सचिंत स्वरात म्हणाला. तेजपाल म्हणाला, "पक्षिराज! आपला कार्यभाग आता निर्वेधपणे उरकला आहे. त्या रानटी आदिमांना चांगलीच अद्दल घडविण्याची माझी इच्छा होती, ती पूर्णांशाने फलद्रुप झालेली पाहून मला अत्यानंद होत आहे. त्यांच्या संख्याबळाची तुला भीती वाटत होती ना? यापुढे सुवर्णप्रदेशात येणाऱ्या कोणालाही अटकाव करायला एकही आदिम शिल्लक राहणार नाही. हा वणवा योजनेच्या योजने त्यांचा पाठलाग करीत जाईल. पवित्र सुवर्ण भांडार आता आदिमांच्या कब्जातून मुक्त झाले आहे. पुन्हा कधी गरज पडलीच तर तुझे सहाय्य मला मिळावयाचे नाही. तशी अटच तुझ्या भार्येने घातली आहे. पण पक्षिराज मी केवळ माझ्या बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर माझा मार्ग निर्वेध केला आहे. पक्षिराजा या जीवनकलहात शेवटी शक्तीचेच साम्राज्य उरते. अशक्त दुर्बलांना जगण्याचा अधिकारच नसतो. आज अनपेक्षितपणे आर्यावर्तातील सामर्थ्यवतांच्या हाती या अमाप सुवर्ण साठ्याचे स्वामित्व आले आहे. मित्रा! तुझे सहाय्य माझ्या चिरस्मरणात राहील." किंचितकाळ थांबून विषय बदलीत तेजपाल बोलला, "मित्रा गरुडा, अतिश्रमामुळे मी क्लांत झालो आहे. आलेला शीण घालविण्यासाठी मला स्नान केले पाहिजे. येथे जवळपास कुठे एखादा जलाशय असेल तर कृपया सांग." पक्षिराजाने सांगितल्याप्रमाणे कपारीच्या विरुद्ध दिशेने उतरणीच्या मार्गावरी दिसणाऱ्या औदुंबर वृक्षासमीपच्या जलाशयाकडे तेजपाल निघाला. निवळशंख नीलवर्णी जल पाहताच त्याचे रोम रोम स्नानासाठी आतूर झाले. कटीचे खड्ग अन् परशू उतरवून तेजपालाने जलाशयात उडी मारली. मनसोक्त जलविहार करुन त्याने उत्तरीय कमरेभोवती गुंडाळीत कटीवस्त्र दूर केले. ते स्वच्छ धुऊन सुकण्यासाठी उन्हात पसरुन तो विशाल औदुंबराच्या मुळात पहुडला. झालेल्या श्रमांनी त्याला तात्काळ निद्रा आली. तो तृषार्त होऊन जागा झाला, तेव्हा सूर्य अस्ताला जात होता. जलाशयात मुख प्रक्षालन करुन ओंजळीभर भरुन पोटाला तडस लागेतो जल प्राशन करुन तो उठला. सुकलेले कटीवस्त्र चापून चोपून नेसल्यावर खड्ग परशू कमरेला खोचून तो कपारीच्या दिशेने निघाला. कपारीपासून तो हाकेच्या अंतरावर पोहोचला असता कपारी समोर पाच गरुड कर्कश चित्कार करताना त्याला दिसले. त्यापैकी दोन माद्या होत्या पण आपला सहाय्यकर्ता गरुड काही त्याला ओळखता येईना. तो थिजून जागच्या जागी खिळला. "मानवा! गोंधळून जाऊ नकोस... ये...! माझी भार्या आणि माझे बांधव माझा समाचार घ्यावयास आले आहेत. तथापि मी येथे असता तू त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही." संथ पावले टाकीत तेजपाल पुढे गेला अन् पक्षिराजापासून थोड्या अंतरावर एक चांगलासा खडक पाहून त्यावर तो आसनस्थ झाला. "मानवा! माझ्या भार्येचा सल्ला न ऐकता मी तुला सहाय्य केले. सातवे गाठोडे न्यायला मी कांचनगंगेच्या उगमापाशी आलो असता तू मारलेले पशुमानव मला दिसले. त्यावेळी उरलेल्या दोन गाठोड्यांचा मोह न करता मी तुला परत येण्याविषयी सुचविले. पण सुवर्णाच्या लोभाने अन् त्याही पेक्षा मनात योजिलेले कपटी कारस्थान पूर्ण करण्यासाठी तू मज सोबत आला नाहीस. तुझा पुढील बेत किती निंद्य आहे, याची कल्पना मला त्यावेळी आली असती तर तुझा बेत मी कदापि तडीस जाऊ दिला नसता. पण मानवा शेवटी तू माझी घोर वंचनाच केलीस." "सुवर्ण प्रदेशातील पशुमानवांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी तू किती नीच पातळी गाठलीस ते माझ्या आता लक्षात आले आहे! माझ्या ज्ञाती बांधवांनी त्याचे गांभीर्य माझ्या निदर्शनास आणून देऊन तुझ्या निंद्य कृत्यात अजाणतेपणाने का होईना सहाय्य केल्याबद्दल ते मला दूषणे देत आहेत. कपटी मानवा! वरपांगी विनयाचे ढोंग दाखवून शेवटी तू मानवाच्या मूळ 'विध्वंसक' वृत्तीचेच प्रदर्शन केलेस. तुझ्या करणीचे किती घातक परिणाम होतील याची पुरेपूर कल्पना असूनही आम्हा पक्षिगणांचा आधार केवळ क्षुल्लक स्वार्थापोटी तू भस्मसात केला आहेस. तू पेटविलेला अग्नी किती दूरपर्यंत सारा समृद्ध वनप्रदेश बेचिराख करीत जाईल कोण जाणे!" दुःखावेग अनावर झालेल्या पक्षिराजाच्या नेत्रातून टप् टप् अश्रुबिंदू ओघळले. "मानवा! क्षुधा शांतीसाठी निर्बलांचा वध करुन आम्ही अस्तित्व टिकविले आहे. तरीही क्षुधा क्षमना एवढेच वध कृत्य करण्याचा संकेत वैनतेय वंशज कदापि भंग करीत नाही. सुवर्ण प्रदेशावर एकछत्री वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तू पेटविलेल्या वणव्यामध्ये किती निष्पाप पशुपक्षी, समृद्ध वनसंपदा नष्ट होणार आहे, याचा तर तारतम्याने विचार दूरच... उलट आपल्या कृतीचे निर्लज्ज समर्थन करुन तू तर पशुंनाही न शोभणाऱ्या वृत्तींचे प्रदर्शन केले आहेस. मानवा! तू स्वतःला फारच बुद्धिमान म्हणवितोस! मात्र तुझे बुद्धिचातुर्य, तुझी कृतघ्न वृत्ती लपविण्यास पूर्णपणे तोकडे पडले असून तुझी कुटील नीती मी पुरती ओळखली बरे! भेटीच्या आरंभी मोठ्या मानभावीपणाने मला देवता स्वरुप मानणारा तू माझा आदराने उल्लेख करीत होतास. परंतु किंचित परिचयानंतर मला अरे तुरे करण्यापर्यंत तुझी मजल गेली. तरीही मला तुझ्यापेक्षा थोड्या वरच्या प्रतीचे स्थान तू देत होतास. परंतु सुवर्णप्राप्तीचा तुझा हेतू सिद्ध होताच तुझ्या वृत्तीत बदल होऊन मला वरकरणी मित्र म्हणून संबोधित तू स्वतःच्या पातळीवर आणलेस. भविष्यात तू पुनश्चः सुवर्णप्राप्ती साठी या प्रदेशात येशील, त्यावेळी मी तुला सहाय्य केले नाही तर मला शत्रूस्थानी लेखून माझ्यावर मर्माघाती शरसंधान करायलाही तुझे मन कचरणार नाही, याची पूर्ण खात्री मानवा, मला पटली आहे. तुम्हा मानवांची उफराटी वृत्ती आम्ही पक्षिवर्गीय पुरेपूर ओळखून आहोत." "देवस्वरुप मानलेला पक्षिराज आपल्या हेतूच्या आड येऊ लागताच त्याला मतिभ्रष्ट  ठरविण्याचे तुझे धारिष्ट्य पाहिल्यावर तुझ्याशी सख्य केल्याचा पश्चात्ताप मला होऊ लागला. तरीही मी तुला माफ केले असते. पण मानवा, सुवर्ण प्रदेशावर स्वामित्व, निर्वेध स्वामित्व प्राप्त करण्याच्या आपल्या हेतूपूर्तीसाठी साधनशुचिता पायदळी तुडवून पशु मानवांचे अस्तित्वच नष्ट करण्याचा कुटील डाव तू रचिलास. हे करीत असता तुझ्याशी काडीमात्र शत्रुत्व नसलेल्या पक्षी, पशु, किटक, वृक्षवल्ली यांचाही बळी तू देऊ धजलास हे पाहता माझी भ्रष्ट मती ताळ्यावर आली. मानवा! तुझ्या या नृशंस कृत्याबद्दल वध दंडही अपुरा पडावा!! मित्रा, आता अखेरच्या क्षणी तरी तुला आपल्या दुष्कृत्याचा पश्चाताप व्हावा, धीरोदत्त राहून बुद्धिमान मानवाला शोभेलसे तुझे वर्तन संयमित रहावे, अशी माझी मनःपूर्वक इच्छा आहे. मित्रा, तुझ्या हातून घडलेल्या दुष्कृत्याचे परिमार्जन होण्यासाठी माझे बांधव तुला वधदंड देणार आहेत. तरी सद्सद्विवेक बुद्धीने तू न्याय पालनाच्या कार्यात सहकार्य करावेस असा माझा तुला सल्ला आहे!" प्रसंगाचे गांभीर्य पुरेपूर ओळखलेल्या तेजपालचा हात नकळत कमरेच्या खड्ग मुठीवर स्थिरावला. पक्षिवर्गीयांपैकी एक मादी त्वेषाने त्याच्याकडे झेपावली. सावधचित्ताने खड्ग सरसावीत हल्ला करावयास झेप घेणाऱ्या मादीवर त्याने क्रोधाने खड्ग प्रहार केला. हल्ला करणारी मादी त्याची चाल ओळखून असल्यामुळे चटकन बाजूला वळली. तरीही खड्गाचा निसटता वार तिच्या वाम पक्षावर होऊन रक्त स्त्रवू लागले. त्याचे हे कृत्य पाहून हळहळत पक्षिराज उद्गारला, "मानवा! शेवटी तूही आपल्या मूळ वृत्तीलाच जागलास! रक्षणकर्त्या पक्षिराजाच्या भार्येवर तू खड्ग प्रहार केलास की रे!" क्रोधित झालेला तेजपाल म्हणाला, "क्षुद्र गरुडांनो मजसारख्या सामर्थ्यसंपन्न मित्राशी तुम्ही निष्कारण वैर पत्करिले आहे. सांप्रतच्या घटनेशी तुमचा दूरान्वयानेही संबंध नाही. सुवर्ण प्रदेश विधात्याने तुम्हाला वंशपरंपरेने दिलेला मक्ता नव्हे. तो प्रदेश बेचिराख झाला तर स्वसामर्थ्यांने तुम्ही त्या प्रदेशाच्या पलिकडे जाऊन आपले साम्राज्य स्थापू शकता. सामर्थ्यांच्या पोकळ कल्पनांच्या आहारी जाऊन माझ्याकडून मृत्यू पत्करण्यापेक्षा येथून दूर जाऊन आपला जीव वाचविण्याचा बहुमोल सल्ला, क्षुद्र गरुडा तू आपल्या बांधवांना दे आणि तू स्वतःसुद्धा तोच मार्ग स्वीकार!" आता चारही गरुडांनी त्याला चहू अंगांनी वेढले. त्याना खड्ग भयाने दूर ठेवताना तेजपाल पुरता मेटाकुटीला आला. त्याचे चापल्य क्षणाक्षणाला क्षीण होत चालले. एका मोक्याच्या क्षणी पाठीमागून झेपावलेल्या गरुडाने त्याच्या दोन स्कंधाच्या मध्ये चोचीने प्रहार करताच किंकाळी फोडून पाठीमागे मोहरा वळवित असता त्याच्या हातीचे खड्ग गळून पडले. तत्क्षणी दुसऱ्या गरुडाने त्याच्या खांद्यात नखे रुतवीत त्याच्या टाळूत चोच खुपसली. प्राणघातक किंकाळी फोडीत रक्ताने न्हालेला तेजपाल जमिनीवर पालथा पडला. आता पक्षिराजाची मादी पुढे सरसावली. आपल्या बळकट पंजानी त्याच्या बाहूवर मजबूत पकड घेत तीने त्याचा देह उताणा केला. मग त्याच्या उदरात तीक्ष्ण नखे खुपशीत तीने त्याच्या हृदयापर्यंत खोलवर चंचूप्रहार करताच क्षीण आरोळी मारुन तेजपालचा आत्मा देहपंजरा बाहेर पडला. चेतनाहीन लोळा गोळा झालेल्या त्याच्या शरीरावर क्रोधाविष्ट मादीने पुनःपुन चोचीने प्रहार करुन त्याचा देह छिन्न विछिन्न झाल्यावर ती दूर झाली. पक्षिराजाभोवती घिरट्या मारीत चारही गरुड म्हणाले, "मित्रा, आता तुझी पाळी! स्वतःला मनुष्यवाणी अवगत असल्याची भारी घमेंड होती ना तुला? ती मनुष्यवाणी तुला न येती तर आजचा हा अनर्थ टळला असता अन् स्वबांधवाला त्याच्या दुर्वर्तनाबद्दल वधदंड देण्याची नामुष्कीची वेळही आम्हावर आली नसती. आता आपले उत्तरदायित्व स्वीकारुन तू वध दंड भोगण्यास सिद्ध हो!" खिन्न मनाने पक्षिराज उत्तरला, "मित्रांनो! माझे कृत्य मान्य करुन तुम्ही सांगितलेला दंड भोगावयास मी खुशीने तयार आहे. मात्र ज्या उच्चपक्षीकुळात मी जन्मलो त्या कुळीच्या उच्च धर्मानुसार तुम्हाकडून हीन-दीन होत मृत्यू पत्करण्यास मी कचरत आहे. जे अग्निकुंड भडकण्यास मी कारणीभूत ठरतो त्यात स्वेच्छेने आत्मसमर्पण करण्याची मुभा तुम्ही मला द्यावी!" पक्षिराजाचे हे कथन ऐकून चारही गरुडांनी माना डोलावल्या. त्याची भार्या म्हणाली, "नाही तरी तुझे कृत्य एवढे निंद्य अन् गरुड कुल कलंकित करणारे आहे की, तुजसारख्या कुलघ्नाच्या रुधिरात आमच्या चोची अपवित्रच झाल्या असत्या!” पत्नीचा मर्मघातक वाक्बाण जिव्हारी लागलेल्या पक्षिराजाने आपले पंख पसरले अन् वनराजीचे दहन करणाऱ्या वडवानलाच्या दिशेने तो झेपावला.