"तुझ्या पोट दुखीच्या निदानाबद्दल मी तुला उद्या सांगतो आज खूप गडबड आहे". डॉक्टर त्याच्या मित्राला म्हणाला. पण मित्राला चैन पडेना त्याने पुन्हा डॉक्टरला फोन लावला. डॉक्टरचा आवाज कानावर आला. " तू माझ्याकडे यापूर्वीच आला असतास तर एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती पण धीर सोडू नको मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन."
मित्र खचून गेला. तेवढ्यात डॉक्टर म्हणाला, "सॉरी लँडलाईन वर दुसऱ्या एका पेशंट शी बोलत होतो. तुला काहीही झालेलं नाही थोडा गॅस ट्रबल आहे."
********†***
अलक
कॉल सेंटर मधून अपरात्री रिक्षाने घरी जात असताना मध्येच रिक्षावाल्याचे दोन-तीन गुंड मित्र आत शिरले सगळे मिळून तिच्यावर बळजबरी करू लागले.
"मी घाबरत नाही दोन वर्षांपूर्वी अशाच बळजबरीत माझा रिक्षात मृत्यू झाला होता त्यामुळे मला सवय आहे याची" ती म्हणाली.
रिक्षावाला आणि सगळे गुंड घाबरून पळून गेले.
त्यानंतर तिने शांतपणे दुसरी रिक्षा केली आणि आपल्या घरी गेली हातात कोणतेही शस्त्र ठेवण्यापेक्षा अशी गोष्ट सांगणं जास्त सोपं वाटायचं तिला!.....
***†********†*
अलक
त्या दोघांनी बऱ्याच दिवसापासून तिला 'हेरून' ठेवलं होतं. कामावरून घरी जात असताना ती त्यांना ठराविक ठिकाणी भीक मागत बसलेली दिसायची. वय वीस- एकवीस. आज देखील ती तिच्या ठराविक जागी उभी होती. अंगावरील कपड्यांच्या अक्षरशः चिंध्या झालेल्या. ती नको नको म्हणत असताना त्या दोघांनी तिला आपल्या रूमवर नेलं आणि ....
आपल्या आईला हाक मारून सांगितलं आपल्याकडे पाहुणी आली आहे. तिला जेवायला वाढ आणि ताईचे जुने कपडे तिला दे.
**********
अलक
बालवाडीत मधल्या सुट्टीत शिक्षकांनी मुलांना खाऊ खाण्यासाठी रांगेत उभं केलं.टेबलावर प्रत्येकाला एक वाटी केक किंवा एक कॅडबरी असं ठेवलं होतं. मुलांनी एकापेक्षा जास्त घेऊ नये म्हणून शिक्षक मुलांना म्हणाले
"देवबाप्पा कॅडबरी कडे लक्ष ठेवून आहे तेव्हा सांगितलं तेवढेच घ्या "
रांगेतली एक खट्याळ छोटू ताई आपल्या मागच्या मैत्रिणीला म्हणाली "दोन दोन केक घेऊया कारण देवबाप्पाच लक्ष फक्त कॅडबरी कडे आहे"
**********
अलक
"रस्त्यावरच्या प्रवाशांना लुटून मारणारा कैदी हॉस्पिटल मधून पळाला आहे"
पावसाळी मध्यरात्री एका हॉस्पिटल समोरून माझी कार पुढे जात असताना कार मधल्या रेडिओ मधून मी वरील बातमी ऐकली. त्याचवेळी एका माणसाने मला थांबवून माझ्याकडे लिफ्ट मागितली. रेडिओ वरची बातमी ऐकून सुद्धा न घाबरता मी कार थांबवली.
माझं सावज आयतंच माझ्या गाडीत शिरत होतं.
****†********
अलक
हायवे वरचे ते हॉटेल आलिशान असूनही इतर हॉटेल पेक्षा खूपच स्वस्त दरात उपलब्ध होते त्याने रात्री चेक इन करतानाच,असं का याबद्दल रिसेप्शनिस्ट कडे चौकशी केली. इथे पूर्वी एक खून झाला होता. म्हणून ग्राहक मिळत नाही म्हणून आम्ही चार्जेस कमी ठेवले आहेत. रिसेप्शनिस्ट म्हणाला. दुसऱ्या दिवशी चेक आउट च्या वेळी सकाळच्या रिसेप्शनिस्ट कडे बिलाचं पेमेंट करताना त्याने रात्रीच्या रिसेप्शनिस्टने काय सांगितले याचा किस्सा त्याला सांगितला.
तुम्ही म्हणता आहात त्या रात्रीच्या रिसेप्शनिस्टचा याच जागी आठ वर्षांपूर्वी खून झाला होता. सकाळचा रिसेप्शनिस्ट म्हणाला.
**********
अलक
"मला जरा बाथरूमला नेऊन आण रे, शेवटचं !" नव्वदी पार केलेले बाबा आपल्या मुलाला म्हणाले. मुलगा सुद्धा आता साठीच्या वर गेला होता. वडील आपल्या 90 वर्षाच्या आयुष्यात कधीच नकारात्मक बोलले नाहीत. त्यामुळे वडिलांच्या "शेवटचं" या शब्दाने तो चरकला. त्याने वडिलांना हाताला धरून बाथरूमला नेऊन आणून पुन्हा अंथरुणावर झोपवलं आणि त्यांचे पाय चेपत बसला... किती वेळ कोणास ठाऊक आणि अचानक तसाच खाली कोसळला. नव्वदीच्या त्या वृद्धाने आपल्या पायावर पडलेल्या मुलाच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवून त्याला अखेरचा निरोप दिला. "शेवटचं" हा शब्द वडिलांच्या तोंडून स्वतःच्या नाही तर मुलाच्या आयुष्याशी संबंधित उच्चारला गेला होता.
***********
अलक
विमानाने अचानक पेट घेतला.आणि आतील प्रवाशांच्या आर्त किंकाळ्यानी आसमंत भरून गेला.आपण आता वाचत नाही म्हणून सगळे देवाचा धावा करू लागले. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आपले आई, वडील, बहिण ,भाऊ, नवरा बायको, मुलं आले. एअर होस्टेस आणि अन्य कर्मचारी आपल्याला खोटा धीर देत आहेत हे सर्वांना कळत होतं. पुन्हा एकदा प्रचंड मोठा आवाज आला, काळा धूर पसरला, आणि सगळं शांत झालं......... कट.. कट..कट ... व्हेरी नाईस...... पॅक अप करा. बाकीचं शूटिंग उद्या... दिग्दर्शक खूष होत म्हणाला..., ...
**********