Heritage of Doctor in Marathi Moral Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | धन्वन्तरीचा वसा

Featured Books
  • મમતા - ભાગ 103 - 104

    ️️️️️️️️મમતા :૨ ભાગ :૧૦૩(પ્રેમ હવે પિતાનું દુઃખ ભૂલી થોડો હળ...

  • નિતુ - પ્રકરણ 22

    નિતુ ; ૨૨ (લગ્નની તૈયારી) નિતુની માતાનું ઓપરેશન પૂર્ણ થયું અ...

  • ભાગવત રહસ્ય - 50

    ભાગવત રહસ્ય-૫૦   નારદજી કહે છે –સતત હું વિચારતો-મારા શ્રીકૃષ...

  • એક ષડયંત્ર.... - ભાગ 80

    (માનવ અત્યાર સુધી મારતો હતો હવે તે તેની સાથે જબરજસ્તી પણ કરવ...

  • ભીતરમન - 28

    હું નશાથી ચકચૂર રોજની માફક જ ઘરે આવ્યો હતો. મા જાણતી જ હતી ક...

Categories
Share

धन्वन्तरीचा वसा

धन्वंतरीचा वसा

राजा धुवाळ्याला साप चावला. त्याचा चुलता, वाडीतले झिलगे सोबत घेऊन बोंबा मारत भांब्याच्या मांगराकडे आला. दंश करणारं जनावर मारुन त्याने ते बरोबर आणलेलं. जनावर उताणं करुन भांब्या किलकिल्या डोळ्यांनी बघू लागला. “म्हाताऱ्या! अडीच पाराचा हये जनावर.” त्याचा पोरगा गंग्या पटकन म्हणाला. सख्या धुवाळी मान हलवत म्हणाला, “हां हां बराबर दीस उगवोन दोन घंटे झाले असती नसती. उडदळीत जोतां धरलेली हुती. राजो कोपरे मारी हुतो नी ह्या लचांड मेरेसून भायर इला. उजवे पायाच्या आंगठ्याक ढास मारुन जनावर परातला आनी ढास सोडून मेरेतल्या बिळात जावक लागला. राजो निसतो ब्बांव मारुक लागलो. जोतये जोता सोडून धावले.”“राजो बिळाहारी ब्वॉट दाकवित हुतो. परशान् बीळ खणलान् हात दोन हात तवा साप मिळालो. मी राजाचो पाय बगलो. सापाचो डवस बघलो सोत्ता. डोयेचो फडको सोडून पोटरेक वेढे मारले आनी गाठ आवळली ज्याम. झिलगे राजाक उचलून घरी घेवन ग्येले. आम्ही धाव मारीत इलाव तुझ्याकडे.” सख्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकणारा भांब्या मान डोलवत म्हणाला, “हां....हां त्ये ब्येस क्येलं. म्हंजी सापाचा डंवस झाला त्येला येक कलाक उलाटला असंल. मी गंग्याला घेऊन वसद काडतो आनी येतो बेगीन धुवाळवाडीत. आता माजा वय झाला. वसद लय खोल खणावा लागतो. त्ये माना आता सुधरत न्हाई. ह्ये पोरगं व्हईल तयार माज्या हाताबुडी. तुमी होवा फुडं. डंवसकऱ्याला पाणी पाजा. दुसरा काय खायला द्येव नकू. तुमी कुडवाळी खान्याला मरनार म्हणून बजावला. पोरगं वाचेल... काय भेव करु नका...”बापलेक टाकोटाक औषध आणायला निघाले. सर्पदंशावरचा कंद दुव्हाळीजवळ चिखलवटीच्या भागात हमखास मिळायचा. भांब्याच्या खापर पणजापासून त्यांच्या घरात वैदगिरी पिढीजात चालत आलेली. धनगराचं घराणं आसमंतात प्रसिद्ध. सर्पदंश, जलोदर, काळपुळी, दोषी ताप, नागीण, मुतखडा, भगंदर, कावीळ, बाळंतपणात अडलेल्या बाईला सुलभ प्रसुतीवर औषध, लहान मुलांचे गोवर, कांजिण्या, नाळगुत, डांग्या खोकला, हगवण असे आजार, त्याखेरीज जनावरांच्या आजारावर आणि विताना अडलेल्या जनावराची सुटका करणं... नाना आजारांवरची हुकमी औषध धनगर देई. सर्पदंशाचा रुग्ण तर भांब्या हमखास बरा करीत असे.सर्पदंशाचे अगदी अखेरच्या टप्प्यात गेलेले रुग्ण... हिरड्यातून रक्त यायला लागलं, श्वास कोंडायला लागला आणि आता आटोपला बाजार असे जीवनमृत्युच्या सीमेवरचे रुग्णही भांब्याने जगवलेले. दुव्हाळीजवळ गेल्यावर भांब्या नेहमीच्या जागेवर गेला. पाऊस उलगत येऊन कडधान्य पेरायचा तो हंगाम. औषधी कंदाच्या पात्यांना केसरे फुटून पार झालेली नि सुकलेल्या पात्या जमिनीवर पडलेल्या. पात्यांवरुन कंद कसा ओळखायचा ते पोराला दाखवून भांब्याने त्या ठिकाणी खणायला सांगितलं.“गंग्या, ढोपरभर ख्वॉल खण म्हंजी कांद्याची हाडी उमग्येल. जरा सावद खण. हाडीला कुदलीचा ढका लागता उपेग न्हाई.” गंग्या खणायला लागला. भांब्या न्हायला व्हाळात उतरला. आंघोळ झाल्यावर काष्टीचा फडका सोडून तो धुऊन पुन्हा काष्टी लावून तो व्हाळाबाहेर पडला. म्हातारा येईतो गंग्याने औषधी कंदाची हाडी खणून मोकळी ठेवलेली. म्हातारा खाली बसत म्हणाला, “जा तू पन आंग धुऊन घे. ह्या वसदाला पारोशा अंगान घडायचे न्हाई मंग गुण येईत न्हायी..." गंग्या अंग धुऊन आला. “आता मद भागातला येक कांदा घ्ये आनी बाकीची हडी माती लोटून बुजवून टाक नी वर खुणेसाठी तीन धोंडे मांड. पुन्ना कदी वखूत आला तर हुकमी वसद मिळते इथे. गीमात पात्या सुकून तुटून गेल्या की वसद सोदायला भारी पडते." मुंड्याच्या खिशातला अडकित्ता काढून भांब्याने कंदाची साल तासून टाकली नि त्याच्या चार फोडी करुन त्या खिशात टाकल्या."गंग्या, सालपटा उचलून लांब टाकून द्ये. कदीपन वसद देताना ते वळकू येया नाय पायजे. मग्ये ओसदाचा गुण येईत न्हाय. तेचा नाव बी कंदी फोडायचा नाय. नी ही ईद्या गुरु क्येल्याशिवाय द्येयाची न्हाई. माज्या बापानं माना लई लोंबवले तेवा ही इद्या माना भेटली." बापलेक धुवाळवाडीकडे निघाले. गावथड जवळ आली. धारेवर हारीने काजूची झाडं लागली. त्याच्या खोडावरची वितभर साल भांब्याने काढून घेतली. साल काढलेल्या भागावर धुरळा थापून टाकला. सालीच्या बारीक पिंजोळ्या करुन घेतल्या. आता ती साल कुठल्या झाडीची आहे हे ओळखू आलं नसतं.बापलेक राजा धुवाळ्याच्या घरी पोहचले तेव्हा राजावर विषाचा बराच अंमल चढलेला दिसला. भांब्याने पाटावरवंटा आणायला सांगितला. कंदाच्या फोडी चांगल्या ठेचून ठेचून त्याचा थलथलीत गलका केला. जुनेराचा वितभर तुकडा ओला करुन त्यावर कंदाचा गलका ठेवला. दंशकऱ्याच्या तोंडात बोट घालून त्याची जीभ अंगठ्याखाली धरली आणि त्याच्या घशातच रस पिळला. चमचा दीड चमचा रस पडला. मग चंचीतला लखलखीत चाकू काढून दंश झालेल्या जागी उभे आडवे छेद घेतले. थोडं रक्त वाहून गेल्यावर कंदाचा उरलेला चोथा जखमेवर चेपून फडक्याने बांधून टाकला. काजीच्या सालीचा वाटून वाटून थोडा रस काढला. तो रस दंशकऱ्याच्या कानशिलांना, छाती पोटाला चोळला. हात धुतले आणि भांब्या पान खायला बसला. घटकाभरात राजाला वांती झाली. "आता ईख उतरले... आता भेव संपले. पोराला पानी पाजा आनी मिरची द्येवा चावायला."राजाला मिरची तिखट लागली म्हणजे विष नक्की उतरलं याची खात्री झाली. माणसांनी सुटकेचा निःश्वास टाकला. धनगराने आज्या पणज्याच्या वैदगिरीच्या गप्पा सुरु केल्या. भांब्याचा पणजा तरुण असताना वाघोटणला डाक बंगल्याचं काम सुरु होतं. कुणी इंग्रज अंमलदार ते काम बघायला घोड्यावर बसून आला. कातळावर पाय फसला नि घोडा जो आडवा झाला तो वर उठायलाच तयार होईना. आजूबाजूचे जाणकार आले पण घोड्याची 'अवेदा' काय आहे याची परीक्षा होईना. मग कुणीतरी गोवळातल्या इंज्या धनगराचं (भांब्याचा पणजा) नाव सांगितलं. कोतवाल धनगराला बोलवायला रवाना झाला. अंमलदाराने बोलावल्याची वर्दी ऐकून इंज्या हादरुन गेला. गाठ ब्रिटीश अंमलदाराशी होती. बरं तर बरं नाहीतर खडी फोडायला जेलात जायची पाळी होती. कोतवाल समक्ष आल्यामुळे न जाऊनही गती नव्हती. मूळवसाच्या पाया पडून इंज्या बाहेर पडला.इंज्या जवळ जाताच घोडा फुर्रर्रऽऽफुर्रर्र करायला लागला. हातातला दांडा कातळावर खण् खण् आपटून इंज्याने घोड्याला जरा दबवलं आणि नीट परीक्षा केली. घोड्याचा उजवा खांद उतरलेला होता. चार कोंबडीची कवटं, हळद, तुरटी ही सामग्री मागवून घेतली. एका वाडग्यात अंडी फोडून त्या बलकात हळद, तुरटी टाकून चांगलं मिश्रण केलं. सात-आठ बापयांनी घोड्याला जाम धरलं. अंड्याचा बलक दुखीच्या खांद्यावर ओतून हाताने खांदा चांगला मळून नरम पडल्यावर इंज्याने घोड्याची टाप हातात धरली. त्याचा पाय ढोपरात दोन-तीन वेळा दुमडून सैल करुन लांब ताणून धरला. आपल्या खोटांनी घोड्याच्या पोटवळावर नेट देऊन घोड्याचा पाय नेटाने वर लोटला. त्याबरोबर खट्ट ऽऽ असा आवाज झाला. खांद्याचं हाड जागेवर बसलं आणि गड्यांना झिंजाडून जनावर ताड्ङ्कन उठून उभं राहिलं. खांद्याची सूज उतरण्यासाठी पाळंमुळं उगाळून लावायला दिली. गरम पाण्यात मीठ टाकून ते सांध्यावर ओतायला सांगितलं. अंमलदार खूश झाला. सायबाने त्याकाळी चांदीचे पंचवीस रुपये आणि उत्तम ठासाची बंदूक अशी 'बक्षिसी' इंज्याला दिली.भांब्याची गप्पाष्टकं होईतो राजाला चांगला उतार पडला. "तेला तिसऱ्या रोजाला बापू मिराशाकडून मंत्राचे पानी घाला. तवसर न्हायला देऊ नगा. पथ्य आंबाट, तिकाट, तेलकाट, वशाट खायाचे नाय. दोन रोज शित पन दाकवू नगा. फक्कस पेजेचा घोट नायतर आंबील द्येयाची." बापलेक उठून घराकडे निघाले. वाटेत गंग्या म्हणाला, "अरे म्हाताऱ्या, धुवाळ्याने शेरमापटे तांदूळ-नाचणे दुकून न्हाई धिले." करवादून भांब्या म्हणाला, "पोरा, ते कुलवाड्या जात लय हरामी. पन वैदगिरी ह्ये द्येवाचं काम. मानूस जगला ते आपली बिदागी. माना माझ्या बापूसाने बजावला. कोन मानूस शेरमापटे खुशीन द्येईल तर ध्येयाचे. न्हाय देले तर रंजीस व्हऊ नकू. परपंचाची कालजी द्येवावर. त्येच्यावर भरोसा ठिवून आपून आपल्याच्यान व्हईल त्ये करावे. तू बी हे शबूद ध्येनात ठेव. पटत आसले तर शीक वैदगिरी. न्हाईपेक्षा माजी इद्या माज्यासंगे मातीत ग्येली तरी माना परवा न्हाई. पैशाची अट घालून ओसद घेईल त्ये रांड कमाई... त्येचावर थुकतो म्यां..."भांब्याने बापसाचा शब्द पाळून वैदगिरी केली म्हणून त्याचा हातगुण होता. ढोरांच्या बाबतीत तर ज्या घरच्या जनावरावर उपचार केले तिथं तर तो पाणीसुद्धा पीत नसे. मोबदला कुणी विचारलाच तर 'मोन गायत्री'च्या औषधाचा विक्रा केला तर त्याचं शेण जाईल गा माझ्या तोंडात....' असं तो सांगायचा. या असल्या व्यवहारामुळे मात्र त्याचा उदरनिर्वाह खटू रुटू चालायचा. आजूबाजूला नाव मात्र मोठं झालेलं. वैद्यगिरीमुळे वेळी-अवेळी कुणीही कुठेही बोलवायला येई. शेतीची कामं रखडत, धड होता होईना. शेरडं मात्र दोन खंडी होती. स्वतःवैद्य असल्यामुळे त्याच्या शेरडांना कसला साथीच्या आजारांचा त्रास होत नसे. शेरडं चरवायला कायम ओलवस असलेला दुव्हाळीचा परिसर.सणासुदीला मटणासाठी बोकड खपत. त्याचे बरे पैसे मिळायचे. म्हणून दोन वेळा नेमाने चूल पेटत असे इतकंच. वैदगिरी ही फुकट फौजदारी. एकतर माणूस प्रसंगात असायचं. अशावेळी देणंघेणं कुणाला सुचावं? आणि भांब्याला काही दिलं नाही तरी चालतं या लौकिकाचा पुरेपूर फायदा कुळवाड माळवाड घेत. काही घरंदाज तालेवार घराणी मात्र मळणीच्या वेळी धनगरासाठी मण-अर्धा मण नाचणे-भात बाजूला काढत. सुगीच्या वेळी धनगर अशी मळणी गोळा करी. सुरुवातीला म्हाताऱ्याचं वागणं गंग्याला पटत नसे, पण बापसाबरोबर चार ठिकाणी फिरल्यावर गंग्याचे डोळे उघडले. सर्पदंश नाहीतर असाध्य आजाराने मृत्युशय्येवर पडलेल्या रुग्णाची स्थिती, त्याची अगतिकता पाहिल्यावर आपल्या औषधाने त्याला गुण येऊ दे, तो जगू दे, देणंघेणं गेलं खड्ड्यात हे गंग्यालाही पटलं. माणूस आजारातून बरा झाला की त्याने केलेली भलावण, लोकांकडून मिळणारा आदर याचं मोल त्याला उमगलं.बापाबरोबर फिरुन गंग्याने पुष्कळ औषधांची माहिती करुन घेतली. रोगाची पारख कशी करायची? लक्षणं कशी ओळखायची? कोणतं औषध कसं योजायचं? वेगवेगळ्या आजारपणाची पथ्यं कोणती? अशी वैद्यगिरीची माहिती घेऊन तो तरबेज होत चालला. भांब्या त्याला घेऊन वेळी अवेळी दुव्हाळी जवळ टेंबावर, देवराईत फिरुन यायचा. त्याचं कारणही तसंच होतं. काही औषधं चांदण्यात खणावी लागत. काही औषध शुक्र उगवल्यावर खणायची असत. काही दिवसाउजेडी, काही तिन्हीसांजेला, काही अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी; त्याशिवाय पाळंमुळं एवढीच औषधं नव्हती. काही वनस्पतींची केवळ पाने, केवळ फुलं किंवा शेंगा, काहींच्या फळांची फक्त सालं किंवा आतलं बी एवढंच औषध असायचं. काही झाडं-वेली विशिष्ट मोसमात मिळणारी होती.विशिष्ट रोगावरची औषधं फार दुर्मिळ. त्यांची नेमकी ठिकाणं माहीती करुन लक्षात ठेवावी लागत. काही औषधं समुद्राच्या भरती-सुकतीचे ताण बघून पैदा करायची असत. वैद्यगिरी म्हणजे सामान्य काम नाही हे गंग्याला पुरतं उमगलं, पण आपला पिढीजात व्यवसाय सुरु ठेवून घराण्याचा लौकीक चालवायचा या ईर्षेने गंग्या म्हाताऱ्याचा शब्द न् शब्द हृदयात साठवायचा. झोपेचा कितीही अंमल असला तरी सुद्धा उत्तररात्री म्हाताऱ्याची हाक कानात पडली की गंग्या तट्कन उठून बसे अन् बापलेक भ्रमंतीसाठी बाहेर पडत. काळोख्या रात्री सगळा परिसर एकदम अनोळखी वाटायचा. दिवसा उजेडी चटकन् उमगणाऱ्या वनस्पती काळोखात किंवा चांदण्यात सुद्धा उमगून काढणं कठीण कर्म व्हायचं. काळपुळीवर औषध असलेली वेल चांदण्यात बघितली की एकदम वेगळी दिसायची. हिरवी कंच पाने चांदण्यात चांदीसारखी चमचम करायची. वेळी अवेळी औषधं हुकमी शोधायची म्हणजे सगळा परिसर तोंडपाठ व्हायला हवा. म्हणूनच वेळ मिळेल त्या त्या वेळी म्हातारा पोराला बरोबर घेऊन रानोमाळ हिंडे.कावीळ, परमा, सर्पदंशावरचं एक औषध, दोषी ताप अशा काही रोगांवरची औषधं 'मंत्रून' द्यायची अट असे. अन्यथा त्यांचा गुण येत नसे. गंग्याची बरीचशी तयारी झाली याची खात्री झाल्यावर भांब्याने त्याला मंत्र द्यायचं ठरवलं. हे मंत्र ग्रहणाच्या वेळी पाण्यात बुडून म्हटल्यावर सिद्ध होणारे असत. मंत्र जिथे घ्यायचा तो परिसरही शुद्ध असण्याची अट असे. त्या दृष्टीने दुव्हाळी जवळच्या पावणाईच्या देवळाचा परिसर चांगला होता. कोनशीचा टेप सुरु झाला की टेपाच्या उगवत आणि मावळत अशा दोन्ही अंगांनी दोन बारमाही पाण्याचे वहाळ वाहत येऊन एकत्र व्हायचे अन् तिथून पुढे एका धारेने गावदरी पार करुन दर्याला जाऊन मिळायचे. उन्हाळ्यात पाणी कमी होऊन टेपापासून दर्यापर्यंतचा भाग कोरडा पडायचा पण कोनशीच्या टेपापर्यंत जितवणी असायचं.उगवतच्या वहाळाने हाकेएवढं अंतर चालून गेलं की, उंच दरड सुरु व्हायची. त्या दरडीवर वडा-पिंपळाचे पार लागायचे नि त्यांच्यापुढे पावणाईचं मंदिर. पावणाईचा सभामंडप चांगला ऐसपैस. देवीचा गाभारा सभामंडपापेक्षा कमरभर उंचीवर. गाभाऱ्यात दोन हात औरस चौरस काळवत्री चबुतऱ्यावर मध्यभागी असलेली वरवंट्यासारखी हातभर उंच शिळा. तिच पावणाई! नवसकऱ्यांनी घातलेले सोन्याचे दागिने कायम देवीच्या अंगावर असायचे. एका बाजूला आड रानातलं देवीचं देऊळ, त्यात देवीच्या अंगावर शंभरापेक्षा अधिक सोन्याचे दागिने. कुठे पेटी नाही की कडीकुलूप नाही. रांधपाच्या भांड्यापासून तो दागिन्यांपर्यंत सगळं उघड्यावर. देवस्थान जागृत. नवसाला पावणारी म्हणून पावणाई.पावणाईच्या उजव्या अंगाला व्हाळात मोठी कोंड... उन्हाळ्यातसुद्धा तुडुंब भरुन वाहणारी... ती जागा मंत्र घ्यायला एकदम नामी! ग्रहणाची वेळ धरुन भांब्या पोराला घेऊन तिथे आला. दोघंही आंघोळ करुन देवीच्या पाया पडले. देवीचे पुजारी भटवाडचे बापू मिराशी, दोघेही त्यांच्या पाया पडले. देवीला नारळ ठेवल्यावर बापूंनी गाऱ्हाणं घातलं आणि दोघेही ओल्या अंगाने पुन्हा कोंडीवर गेले. भांब्याने गंग्याच्या कानात तीन वेळा मंत्र सांगितला. गंग्याने तो नीट लक्षात ठेवला. बारा अक्षरांचा तो मंत्र एका दमात सात वेळा असा सात खेपा पाण्यात बुडून म्हटल्यावर सिद्ध करायचा होता. दुसरा होता तो अठरा अक्षरांचा! हा मंत्र एका दमात नऊ वेळा असा नऊ आवर्तने करुन सिद्ध व्हायचा होता.ग्रहण सुटण्यापूर्वी गंग्याचे मंत्र घेऊन झाले. आता कधी प्रसंग येईल त्यावेळी फक्त आंघोळ करुन एकदा मंत्र म्हटला की पुरेसं होणार होतं. मात्र मंत्राची पाळणूक म्हणजे मोठंच दिव्य! तेही म्हाताऱ्याने समजावून दिलं. जेवताना बोलायचं नाही, जेवताना कांडपाचा, जात्याचा, धुण्याचा, विटाळशी बाईचा आवाज कानावर आला तर ताट बाजूला सारुन तसंच उठायचं. अमावस्येला हजामत करायची नाही. हे मंत्र ज्या रोगांना वापरायचे अशा रोगाने गांजलेला रुग्ण भेटायला आला तरी भरल्या ताटावरुन उठायचं. मंत्रून द्यायची औषधं ओलेत्याने काढायची आणि मंत्रवायची. औषध नेऊन रुग्णाच्या स्वाधीन करेपर्यंत किंवा रुग्णाला औषध न्यायला आलेल्या इसमाला देईपर्यंत इराकतीला जायचं नाही. सगळ्या पाळणुकी गंग्याने ध्यानात घेतल्या. त्या सहज जमणाऱ्या होत्या, पण विटाळाशी बाईचा आवाज कसा ओळखायचा ही शंका त्याने विचारली. कोणतीही पाळणुकीला बाधा येणारी गोष्ट मांत्रिकाच्या लक्षात आली नाही तरी अशी गोष्ट घडल्यावर कानात खण्ण-खण्ण असा आवाज येईल, तो आला की मांत्रिकाने ओळखायचं.बापलेक पुन्हा देवीच्या देवळात गेले. बापू मिराशी देवीला आंघोळ घालीत होता. देवीच्या पाया पडून दोघंही सभामंडपात बसले. पूजा करुन बापू बाहेर आले. म्हातारा हात जोडून त्यांना म्हणाला, "भटजीकाका, माज्या लेक आता वैद झाला. माजी सगळी इद्या द्येली तेका." बापू हसत म्हणाले, "ठीक झाले. तू आता म्हातारा झालास. तुजे डोळ्यांदेखत तुजा लेक वैदगिरीला लागला हे बरे झाले. देवीची कृपाच म्हणायास हवी." म्हातारा म्हणाला, "काकानू, माना येक भविस् इचारायचं होते."बापू देवीचे पुजारी. त्यांच्यावर देवीचं वारं होतं. देवीच्या गाभाऱ्यात बसून ते सांगतील त्याची प्रचिती यायची असा लोकांचा गाढ विश्वास! बापू गाभाऱ्याकडे निघाले. म्हातारा मागोमाग जाऊन गाभाऱ्याच्य दारात टेकला. देवीच्या चबुतऱ्याजवळ बापू थोडा वेळ डोळे मिटून बसले. देवीचा संचार झाल्यावर ते म्हणाले, "आता विचार काय ते.'' "गंग्याचं लग्न कधी होईल? सोरगत कुठल्या दिशेला शोधायची?" ही विचारण भांब्याने केली. देवीची कुड बोलली, "गोवळाच्या उत्तरेला तरळा, नाधवडे ते गगनबावड्या पर्यंतचा टापू. तिथे होरा आहे. पोरगी कामाडी, देखणी मिळेल पण तिस पाच कन्या झाल्यावरच मुलाचा योग संभवेल. दुसरा होरा गोवळाच्या ईशान्येस कासार्डा, पियाळी, फोंडा ते पार राधानगरीपर्यंत दिसतो. पाव्हणा तालेवार पण पोरगी काळी. काम आंग मोडून करायची हौस नसेल. नांदायला जरा कुरकुर करील पण तिस दोन मुलगे होतील. मूळवस राजी करुन पावणाईस चोळी लुगड्याचा नवस केलास तर आडमेळं दूर होईल. कोणची सोरगत करायची ते तुझ्या खुशीवर. आजपासून अवसेपर्यंत काय शब्द काढायचा नाही. अवसेनंतर प्रयत्न कर. महिन्याभरात काम यशावर जाईल. काम झालेवर नव्या जोड्यास देवीच्या पायावर आणून घाल." म्हाताऱ्याने दुसरा होरा मनोमन नक्की केला. अवस उलटून दोन दिवस मागे पडले. धुवाळवाडीतले गाडीवाले फोंड्याचा बाजार करायचे. म्हाताऱ्याने त्यांच्या कानावर विषय घालून गंग्यासाठी सोरगत बघायला गळ घातली. दहा दिवसांनी फोंडा बाजार करुन परत येताना गाडीवाल्यांनी मागाडी आणली. राधानगरीजवळच्या विठ्या खराताची पोरगी त्यांना उमगलेली. म्हातारा, गंग्या, जावई भिक्या आणि नादातला सगेवाला असे चौघं राधानगरीला गेले. देवीने सांगितल्या प्रमाणे विठ्या खरात मोठा मालदार ! धनगर असूनही दहा एकर शेती, चार जोते, नोकर चाकर असा मोठा बारदाना असलेला. हा तालेवर धनगर गंग्याला आपली पोरगी देणार नाही असं भांब्याच्या जावयाला वाटलं. आपली शंका त्याने सासऱ्याच्या कानात सांगितली. भांब्याने च्यक् च्यक् करत म्हटलं, "तू बगच आता. माना मोटा ईश्वास हाये. इथे शबूद वाया जाईत न्हायी..."कोण, काय, ते बोलणे झाल्यावर विठ्या खरात खुशीत आला. भांब्याची ख्याती त्याच्या ऐकीवात होती. त्याचा पोरगासुद्धा लेकीला शोभणारा... बापासारखा वैदगिरी करणारा म्हटल्यावर विठ्या राजी झाला. आत जाऊन घरवालीशी बोलून बाहेर आला. "आमाला पसंत हाये तुमची सोयरीक. फोंडा बाजाराला तुमचा लई नाव घेतेत गा समदे गाडीवाले. तुम्हाला लई मान हाये लोकात. माझी बी योक आट व्हती. ल्येक देईन तर नामजद घराण्यात. आता म्हुरत काडूया, नी घेऊया बार उडवून." भांब्याने मनोमन पावणाईला दंडवत घातला. जेवणं उरकून लग्नाची तीथ ठरवूनच मंडळी घराकडे निघाली. पाव्हण्यांना फोंड्यापर्यंत सोडण्यासाठी विठ्याने बैलगाडी जुंपली.गंग्याचा संसार सुरु झाला. त्याची बायको भागी तालेवाराच्या घरात वाढलेली. गडी, पाहुणे यांनी घर भरलेलं. घराशेजारीच सगेवाले. गंग्याचा मांगर एकवशी, आडरानात. तिला मांगरात एकटं राहायला 'भ्याव' वाटायचं म्हणून भांब्या मांगरात थांबायला लागला. त्याने फिरती बंद केली. वैदगिरीपण आता त्याला जमेना. कुणी जुनी ओळखीची माणसं अवचित यायची. गंग्या आतबाहेर असला की म्हाताऱ्याला भीड घालत. म्हातारा मग तरपासून सांगायचा, "वैदगिरी माजी कदवाच बंद झाली. मंतर-पाळनूक सगळे सोडले. माजा वय झाला. माना काय सुदरेना. पोराला ईद्या दिली. आता फकस घरच्या लक्षुमीला माजी राकान हाये कोनशातल्या काटी गत. माना आता पिडू नुको."म्हाताऱ्याची फिरती बंद झाली खरी पण दिवसभर आराम करणं त्याच्या पचनी पडेना. त्याचं अन्न तुटत चाललं. तो एक वेळ जेवायचा ते सुद्धा किती? बचकाभर भात नायतर दोन कोर भाकरी. कधी कधी तर नुसतं शेरडाचं दूधच पिऊन ऱ्हायचा. लोट्यावर धारणाला टेकून डोळे मिटून पावणाईचं नाव घेत राहायचा. सुनेवर त्याचा भारी लोभ. आल्या गेल्याकडे तिचं तोंडभर कौतुक करीत राहायचा. तिच्या बापाच्या तालेवारीच्या गोष्टी ऐकवायचा. भागी म्हाताऱ्याचं जिवापाड करायची. म्हातारा दिवसेंदिवस आळायला लागला. थंडीचा मोसम सुरु झाला. एकदा कडक्याची थंडीची लाट आली त्यात भांब्या आटोपला. सगळी दुनिया म्हाताऱ्या वैद्याला मुठमाती द्यायला मांगराकडे जमली. आता पुन्हा भागी एकटी पडली, पण एकवशी राहायला आता ती सरावलेली, गंग्याच्या बिनकमाईच्या वैदगिरीबद्दल मात्र ती फडफडत राहायची. गंग्या दिवसदिवस वैदगिरी करत घराबाहेर राहायचा. त्याच शेतीवाडीकडे दुर्लक्ष व्हायचं. भागीचा बापूस कुळवाड्यासारखा शेतीत राबायचा. घरात विपुल धान्य-धुन्य, मन मानेल तसं खायचं प्यायचं... नुसती चंगळ व्हायची. दादल्याकडे सोन्यासारखं कसब, हातगुणही चांगला. जरा व्यवहाराने वागला तर काटकसर ओढघस्त संपेल असं तिला वाटायचं. या गोष्टीवरुन ती कायम गंग्याचा जीव खायची. कुणी बारा बंदरचा माणूस वेळी-अवेळी मांगरावर येऊन थडकायचा. भागी त्याच्यावर करवादायची, "आता न्हाई येयाचा वैद... तो ग्येला चवळी पेराया. दोपारच्या वक्ताला यील ना घरी, तवा मागून घ्ये काय ती दवा. त्या पतूर बस गप्प तिथंच पावळीला... फुकाटची बैदा तिच्या मायला."गंग्या दुपारी येईतो आडगावहून आलेल्या माणसाला कुठला थोप निघायला? तो अंदाजाने गंग्याला शोधत जायचा. गंग्या नांगरट थांबवून त्याला 'वसद' द्यायचा. काही वेळा रोगी तपासून, त्याचं लक्षण, चाल-चलन बघून औषध द्यायचं असे. मग गंग्या सरळ जोत सोडून घरी यायचा आणि त्या माणसाबरोबर चालू लागायचा. त्याचं जेवणखाणसुद्धा अवेळी व्हायचं. अन्न झाकून ठेवत भागी त्याची वाट बघत रहायची. "जेवण येळेला तरी येळेसरी घरी हावाव म्हणतो म्या. मन ठ्येवून आपली शेती जित्राब करा नि मंग बसा फुकाटची वैदगिरी करीत..." ती गंग्याला सुनावायची. "रात ध्या कुट कुट हिंडत बसतायसा. हिकडं बक्कळ साप, किरडवं निगत्यात. माज्या जिवाला घोर लागून हातो. मलाबी एकलीला हिंडायचं भ्याव लागतं की, तुमी बसा गावभर हिंडत आनी हिकडे साप-किरडाव डसून म्यां जातो की मरुन. वैदाची बायकु आसुदाबिगार मरुद्या.... मंग बसा की बोंबलंत..."गंग्या मागीलदारी गेला. धनसडीच्या बाजूला वेखंडाच्या कोंबऱ्या खणून चांगली ओंजळभर वेखंडाची कुडी काढली. ती उन्हात तापवून सुकवली. "भाग्येऽऽ तुला साप किरडवाचा भेव वाटतो लई. तेच्यावर ह्यो रामबाण ओसद बग येकांडाचे. ह्या कुड्यानला दोरा बांधून चेपलीला, पायाला बांधून फिर बिनघोर. येक कुडे कडोसरीला खवून ठ्येव. ह्येच्या वासाला किरडू जवळ येयाला भिते. आम्ही रानामाळात रातदिवस फिरतावं... आमच्याबी पायातानाला येकांड बांदल्याले असते." मांगराच्या पाठी देवरण्यावरची वेलही तिला दाखवून ठेवली. विषारी जनावरावरचं ते औषध होतं. काय भावना झालीच तर वेलाची आठ-दहा पाने चावून चावून त्याचा गलका दंश झालेल्या जागेला चेपून धरायचा. उपचार होईपर्यंत असं दोन-तीन वेळा केलं की विष फाकत नसे. शिवाय मांगरात धारणाला बांधलेली शेंगही त्याने दाखविली. विष फारच भिनतंय असं वाटलं तर ती शेंग अर्धी झरवून पोटात घ्यायची.माघात गंग्याचा सासरा विठ्या लेकीला आढाळायला आला. त्याला दम्याचा भारी त्रास. त्याच्यावरही त्याला औषध हवं होतं. गंग्याने दम्याची लक्षणं नीट विचारुन घेतली. "हेच्यावर हुकमी इलाज हाये, पण तो बेस्तरवारी कारायला लागते. तुमाला त्या पावत चार रोज थांबायला लागनार." सासरा उपचारासाठी लेकीकडे थांबला. गंग्याकडे येणारी माणसं तोंडभर स्तुती करायची गंग्याची, त्याला नावजायची. "तुमचा जावाय म्हंजे द्येव मानूस. आमच्या भागात तेका लय मानतत. तेचो दवो खावन किती मानसांचो जीव वाचलोहा... तेचा हातगुन पन नावजतत लॉक." सासरा फुलून जायचा. भागी मात्र चरफडायची. "बाबा, ह्ये समदं रिकामं मोटेपन गा. तोंडानं ग्वॉड बोलत्यात पन चिमटीभर दानं काय पदरात टाकत न्हाई. नुस्ती फुकाट फौजदारकी, शेतीचं काय धड निभंना ह्यांच्यान. कामाच्या धिबिडग्यानं लई कट्टाळले बग म्या." म्हातारा फक्त हसला. लेकीची कळ त्याला उमगली होती, पण जावाय करतो तेही गैर नाही असं त्याचंही मत पडलं.बेस्तरवारी पहाटेच गंग्याने सासऱ्याला उठवलं. दोघही न्हाऊन आले. गंग्याने सासऱ्याच्या उजव्या कानाच्या पाळीत शीर धरुन चांदीची तार टोचली आणि सुंकल्यासारखी पिळून ठेवली. गळ्यात गंड्याबरोबर बांधायला मुळ्या दिल्या. पथ्य विडी ओढायची नाही नि मटण खायचं नाही. सुंकलंसुद्धा फक्त वर्षभर कानात ठेवायचं होतं. जावयाने शीर धरुन टोचली त्याचवेळी छाती मोकळी झाल्याचं सासऱ्याला भासलं. दुसऱ्या दिवशी सासरा फोंडा बाजाराला जाणाऱ्या गाडीवाल्यांबरोबर निघून गेला. त्याच्या पुढच्या बाजारादिवशी त्याने भावकीतलं एक पोरगं लेकीकडे घरगडी म्हणून धाडलं. त्याच्यासोबत दोन जोंधळ्याची बुचडी, गुळाची ढेप, कसली कसली कडधान्ये, डाळ, लेकीला साडीचोळी, जावयाला मुंडी नि रुमाल, भुईमुगाच्या शेंगा... काय काय धाडलं. त्याचा दम्याचा त्रास आता बंद झाला.सासऱ्याने घरगडी पाठवला खरा, पण त्याला काही तरी मजूरी द्यायला हवी होती, ती उचलून देणं कसं जमावं ही शंका गंग्याने बायकोला विचारली. पोरगा विठ्याच्या भागेल्याचा होता. त्याच्याकडे वर्षभर मजूरीला असलेल्या गड्यांमधला. त्याची मजूरी धान्याच्या रुपात द्यायची पद्धत असे. ती बाबा परभारे भागवणार होता. सासऱ्याच्या उपकाराने गंग्या कानकोंडा झाला, पण आता त्याच्या उरावरचा भार कमी झालेला. घरचा कामधंदा शिस्तीत व्हायला लागला. तरीही गंग्याच्या वैद्यगिरीबद्दलची भागीची पिरपिर कमी झाली नाही. औषधपाणी न्यायला आलेल्या माणसाकडून अगोदर बोली करुन गंग्याने मोबदला घ्यावा असं तिला वाटायचं, पण गंग्या काही ते मनावर घेईना. पाऊसकाळ आला. शेतीची कामं सुरु झाली. यावर्षी कायम पड टाकलेले भांगे जोताखाली आणायचे असा बेत भागीने योजला. सकाळीच भाकरी खाऊन गंग्या नि गडी जोत घेऊन गेले. भागी दुव्हाळीपर्यंत शेरडं लावून आली. त्यांच्यामागे राहावं लागत नसे. दोन कुत्री खांडाबरोबर राखणीला फिरायची. संध्याकाळी शिकवल्यासारखी शेरडं आडवून वाड्यापर्यंत आणायची. भागी मांगराकडे माघारी आली तर दारात औषधकरी बसलेले. त्यांना टाळून भागी मागीलदारी गेली.माणसं नजर ठेवूनच होती. कुणीतरी मागे जाऊन धनगरणीला हाक मारली. संर्पदंशाचा रुग्ण होता म्हणून गंग्याला न्यायला चार कोसांवरुन ते बापये आलेले. ते गंग्याची चौकशी करायला लागले. भागी त्यांना गंग्याचा ठाव ठिकाणा सांगायला राजी होईना. माणसांनी आर्जवं केली. दंशकऱ्याच्या जिवाशी गाठ आहे म्हणून विनवलं. "तुमचा माणूस जगला काय म्येला काय... आमाला काय फरक पडतो? शेतीचा काम खोळंबल त्याचा काय? धनगराचा ज्वात तुमी धरतायसा काय? तेचा शेत पिकल तवाच च्यार गोटे मिळत्याल आमाला की तुजा मानुस जगला म्हणून माज्या दादल्याला शेरभर रुपये देणार हाईंस का बुचड्यावाले...? दादला बसला रिकामी वैदगिरी करत आनी आमाला उपाशी मरायची वेळ आली की न्हाई? म्या बापाकडनं शेरमापटा आनला म्हणून रांदतोय दोन येळेला. माजी येळ थटली तर कोन माईचा लाल शेरमापटं टाकंल माझ्या पदरात. बोला की! तुमी दुसरा वैद सोदा. माजा दादला न्हाई यियाचा. नि म्यांबी त्येचा ठिकाना न्हाई सांगनार तुम्हास्नी..." भागी अडून बसली.माणसं रंजीस झाली. एक बापया बोलला, "खरा हा तुजा दुकु, पण ही येळ कसली. सापाचा ईख उतरणारो दुसरो कोन वैद हा ह्या भागात? तू काय मागशी ता देव आमी, पण घोवाचो ठिकानो सांग ग्ये माज्ये आवशी." नी तो भागीच्या पाया पडला. भागी खूश झाली. "आता ब्येस झालं बघा. दोन पायल्या तांदुळ आनि चांदीचं रुपायं दोन देशीला हित्त आनून? हाये कबूल?" माणसांनी नाइलाजाने मान डोलावली. भागी ताठ शब्दांत म्हणाली, "नुसती मुंडी हालवशीला आनि मागनं फसवशीला. आयशीच्या कासट्याची शप्पथ खावा तरच ईस्वान ठेवीन म्यां..." माणसांनी शपथ घेतली तेव्हाच भागीचं समाधान झालं. तिने गंग्या कुठे भेटेल याच्या खाणाखुणा सांगितल्या, आपण तांदूळ नि रुपये मागितले हे दादल्याला सांगू नका. "तुमी हून द्येवा त्येला" असंही बजावलं. माणसं गंग्याला शोधत गेली. गंग्या परभारेच औषध आणायला गेला.दंशकऱ्याला औषध देऊन झालं. त्याला उतार पडला आणि गंग्या जायला निघाला. तेवढ्यात त्याला बोलवायला गेलेल्यांना आठवण झाली. आपण आयशीच्या कासट्याची शपथ खाल्लेली आहे. दंशकऱ्याच्य बापसाला त्यानी ही गोष्ट सांगितली. रुपये आता कुठून उभे करायचे ही पंचाईत होती. ते मागून पुढून द्यायचे. आत्ता तांदूळ बांधून द्यायचे असं ठरलं. दोन पायली तांदुळाची मोट त्यांनी गंग्याला आणून दिली. गंग्याला हा अनुभव नवीनच. जिवावरचा प्रसंग आलेला असताना आपण असा मोबदला घेणं त्याला रुचेना. तो आढेवेढे घेऊ लागला. माणसांनी अतीच गळ घातली तेव्हा त्याला घेणंच भाग पडलं गंग्या मोटळं घेऊन येताना दिसल्यावर भागी हरखली. तिने घरात जाऊन तांदूळ ओतले नि रुपये शोधले. 'बेन्यांनी फशिवलंच की... रुप्पय न्हाई देलं.' ती मनात म्हणाली.दोन दिवसांनी दिवस उगवायच्या वेळेला दंशकऱ्याच्या घरातला माणूस मांगरावर आला. गंग्या तोंड धुवत होता. माणूस ओळखून तो म्हणाला, "बरा हाये दंसकरी काय आजून तरास हाये?" माणूस म्हणाला, "तो बरो हा! उद्या त्येका मंत्राचा पानी घालूचा हा. तुका ह्या देवक् इलंय." मुंड्याच्या खिशातून दोन चांदीचे रुपये काढून त्याने गंग्याच्या हातात घातले. “छ्या छ्या! ह्ये काय नुको. तांदूळ देलास तेच म्वॉप झाले..." डोळ्यात पाणी आणून तो बापया म्हणाला, "तू रागा जाव नुको आनी बायलेक हटकू नुको तुका सोदूक बापये इले व्हते ना? तवा तुज्या बायलेन ही अट घातल्यान. इलेल्या बापयांक आवशीच्या कासट्याची शपथ घेवक लावल्यान तवाच तुजो ठिकानो सांगल्यान. हे रुपाये घी नी आमका वचनासून मोकळे कर." आला माणूस तोंड फिरवून चालू पडला. काय करावं गंग्याला सुधरेना. त्याचं डोकंच भ्रमिष्ट झालं. तो तिरमिरीत घरात धावत गेला.चुलीसमोर बसलेल्या भागीचा बुचडा धरुन तिला खेचत गंग्या म्हणाला, "त्या रोजी मान्सा डंवसकऱ्याक वसद घेयाला माज्या कडे इली... त्येंना तांदूळ नि रुपाये तू मागितलीस काय?" भागी म्हणाली, "हां...म्या मागिटलं रुप्पय. वैदाला काय प्वॉट नसतंय? आनी तुला नसेल तर माला गरज हाय. माजा सौंसार अडलाया रुप्पायासाटी. येवडा जीव जगला दंवसकऱ्याचा आता तो कमवील की जलमभर बक्कळ रुप्पय, तुमी कामधंदा सोडून ग्येलास, तुमच्या कामाला येतेत काय ते माणसं. माला हवंत त्ये रुप्पय, द्यावा हकडं." कोपलेल्या गंग्याने रुपये बाहेर भिरकावून दिले आणि लाथा बुक्क्यांनी भागीला तुडवून काढलं. गडी सोडवायला मध्ये पडला त्यालाही चार तडाखे बसले. सैरभैर झालेला गंग्या घराबाहेर पडला. तो तडक पावणाईच्या देवळाकडे निघाला.भागीला आता क्षणभरही राहवेना. आयती लक्ष्मी चालून येण्याचा मार्ग तिने शोधून काढला पण नवऱ्याला दळिद्रय आठवलं. ती गड्याला घेऊन रागाने बापाकडे राधानगरीला जायला निघाली. गड्याने मांगराचे दरवाजे झाकले. भागीला जावू नको म्हणून विनंत्या केल्या. निदान पाहुण्याला सांगून जाऊया असंही सुचवलं, पण भागीने त्याला चराचरा शिव्या घातल्या. नाइलाजाने गड्याला तिच्या सोबतीसाठी तरी निघावं लागलं. गंग्या गेला तो थेट पावणाईच्या देवळात जाऊन बसला. बापू मिराशी पूजा करुन बाहेर येत होते. गंग्याच्या चर्येवरुन काहीतरी बिनसलं आहे हे त्यांनी ताडलं. गंग्याला हटकल्यावर त्याने सगळा प्रकार सांगितला. बापू विचारी... धनगरणीची कळ त्यांनी ओळखली. लोक कामापुरते गोड बोलतात, भलावण करतात पण केवळ एवढ्यावर संसार चालत नाही. अतिरेक करु नये पण झाल्या कामाचा-कष्टांचा माफक मोबदला मिळावा अशी अपेक्षा धरणं यात तत्त्वतः काही गैर नाही. एखादा अडलानडला असेल त्याला द्यावं मोफत औषध. अमूकच दे असाही अट्टाहास नसावा, पण वैदगिरी हे गंग्याच्या चरितार्थाचं साधन असल्यामुळे वाजवी मोबदला घ्यायला काहीच हरकत नाही ही गोष्ट त्यांनी निक्षून सांगितली."सर्वान् लक्ष्मीर्विशिष्यते... पैशाशिवाय सगळे फुकट आहे. तू कामधाम शेतीवर तुळशीचे पान ठेवून वैदगिरी करत फिरतोस पण तुझ्या उतवास काय धूर जात नाय. तुझंही चुकलंच. ज्याची उपत आहे त्यानेही फुकटात औषध न्यावं हे देवास पण आवडायचं नाय. त्याच्याकडून तू शेरमापटं घेतलंस तर ते काय पाप नाय व्हायचं. अरे, तुझी लक्षुमी ती! तिज आधी समजून सांगायचे. पुन्हा असे केलेन तर देयचे दोन रट्टे, पण तू तरी अतिरेकच केलास. जा! घरी जा! तिची आधी समजूत काढ नि ह्याफुढे मी सांगितले तसा वाग. मग भांडायचा प्रश्नच येयचा नाय." बापूंनी उपोद्घात केला. गंग्या खूप वेळ विचार करत मख्खासारखा बसून राहिला. घटकाभराने बापूंनी पुन्हा ढोसणी दिली तेव्हा उठून मांगराकडे निघाला.गंग्या घरी पोचला. दार उघडून आत गेला. बराच वेळ वाट बघितली पण भागी किंवा गडी कुणाचाच पत्ता नाही. भागी रागावून माहेरी तर गेली नसेल ना? हा विचार त्याच्या मनात आला. मग त्याने आंघोळ करुन भात शिजत टाकला. चुलीजवळ टोपल्याखाली टोपात शेरडाचं दही दिसलं. भात शिजल्यावर अर्धा कुत्र्यांना राखून ठेवला नि अर्धा दही घालून मिठाच्या दाण्याबरोबर खाल्ला. जेवून उठल्यावर भागी गड्याला घेऊन बापसाकडे गेली की काय? याची चौकशी करावी म्हणून मांगर बंद करुन तो बाहेर पडला. फोंड्याकडे जाणारी वाट राणेवाडीतून गेलेली. त्याने राणेवाडीत चौकशी केली. भागी रडत भेकत चाललेली नि पाठून गडी! बघणारे भेटले. विषण्ण मनाने गंग्या घरी परतला. लोकांत हसं झालं. पाव्हणा भांडण करील... बापूंसारख्या विचारी माणसाने आपल्याला बोल लावला तिथे इतरांची काय कथा? त्याचं मन त्याला खायला लागलं.संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला साण्यातल्या दिव्यात कडूतेल घालून त्याने वात पेटवली. जेवणावर त्याची वांछाच नव्हती. रात्री उशिरापर्यंत तो विचार करत बसून राहिला. मध्यरात्रीच्या सुमारास 'हुं हुं हुंऽऽहुं' हुमण ओरडल्याचा आवाज आला. नीट वेध घेतल्यावर लक्षात आलं की हुमण त्याच्या मांगराच्या आढ्यावर बसूनच ओरडते आहे. रात्रीच्या नीरव शांततेत हुमणाचं भयाण ओरडणं ऐकून आयुष्यात प्रथमच त्याचं काळीज थरकलं. औषधासाठी रात्री बेरात्री रानावनात हिंडणारा टणक काळजाचा गंग्या पण आज मात्र बाहेर जाऊन हुमणाला हाकलायचं त्याला भेव वाटलं. त्यातच दिव्यातलं तेल संपून ज्योत विझली. गंग्याने उभी रात्र जागून काढली. हुमणाच्या ओरडण्याची संगती त्याला लागेना.सकाळी सगळी शेरडं वाड्याबाहेर काढून गंग्या पावणाईच्या देवळात गेला. बापूंची पूजा नित्याप्रमाणे सुरु होती. ते पूजा उरकून बाहेर सभामंडपात आल्यावर काळजारलेल्या सुरात गंग्या त्यांना सांगू लागला, "बापू, काल मी हिकडं इलो आनी माजी बायकू निगून ग्येली बापसाकडे. हाल्लीच तिच्या बापसान त्यांच्या वाट्यातला पोरगा गडी म्हणून हकडे लावून देलान्. त्येला वांगड घ्येऊन भागी ग्येली की निगून... बापू, रातच्याला मांगराच्या आड्यावर बसून हुमान वरडाय लागले हुंऽ हुंऽऽ करत. माजे कालीजच थराकले वो... आता काय व्हते कुनाला दकल... का सत्यानाश व्हतो माजा हेचाच भेव माला !" बापू हसत म्हणाले, "अरे! हुमण ओरडले आढ्यावर बसून त्यात एवढे कशास भ्यायास हवे. ते तसे बसून ओरडले हे चांगल्याचेच मानतात. ज्या घरात बाईल माणूस गुरवार ऱ्हाते त्या घराच्या आढ्यावर बसून हुमण ती सूचना करते. आता तुज मुलगा होणार बघ. त्याच्या पाचवीच्या घुगऱ्या मातर हुमणासाठी बाहेर ठेवायस विसरु नको." बापूंच्या बोलण्यावर गंग्याच्या शिरावरचा मोठा बोजा उतरला. "पण बापू, आता वो काय उपेग. भागी ग्येली की तिच्या बापसाकडे..."खो खो हसत बापू म्हणाले, "एवडी काळजी करायचे कारण नाय. दोन शाणेसुर्ते बापये घेऊन जा सासऱ्याकडे. आपली चुकी झाली म्हणून सांग. मग बघ भागी तुझे आदी येयस बाहेर पडत्ये की नाय. बायकांचा राग तितकाच. तू बिनघोर जा नी भागीस घेऊन ये. तू येईस्तर हिकडची येवस्ता बघायस तुझ्या बहिणीस ठेव आणून म्हंजे झाले." गंग्या बापूच्या पाया पडला. बापूंनी सांगितल्याप्रमाणे सगळी योजना त्याने आखली. बहिणीकडे निरोप धाडला. संध्याकाळी बहीण नि तिचा नवरा दोघंही आले. मेव्हण्याला सोबत घेऊन गंग्या दुसऱ्या दिवशी राधानगरीला जायला निघाला.भागी बापसाकडे गेली ती रडत भेकतच. नवऱ्याच्या माराचे वळ दाखवून ती म्हणाली, "आता म्या हितंच ऱ्हातो. म्यां दादल्याकडे नांदाय जानार न्हाय." बाबा काहीच बोलला नाही. जेवणं झाल्यावर त्याने गड्याकडे सविस्तर विचारुन घेतलं. झाली गोष्ट त्याने खड्यान खडा सांगितली. त्यांचं बोलणं सुरु असतानाच आत बायकांची धावपळ सुरु झाली. विठ्याने घरात डोकावून चौकशी केली. भागीला वांत्या सुरु झालेल्या. तिची आई म्हणाली, "तुमी काळजी करु नगासा. मी बगतो काय ते बयाजवार." विठ्याने गड्याकडे शिस्तीत सगळी चौकशी केली. घडलेल्या प्रकारात चूक भागीचीच आहे हे त्याला पटलं. जावयाने रागाच्या भरात इतकं मारायला नको होतं हे खरंच, पण भागीने त्याला असं करायला भाग पाडलं. नाहीतर देवासारखा गुणी जावई या थराला गेला नसता असंच त्याचं मत बनलं.त्याने गड्याला चांगलं खडसावलं, "म्या म्हनतो भागीचं डोस्कं फिरलं, पन तू एवडा शाना हयेस ना? जावायाच्या माघारी म्हायेरी पळ काडाया त्वां कशी फूस दिलीस गा? जरा सबुरी धराय काय तुजा बा मरत व्हता रे भाड्या? तुला पावण्याकडे कोनी ठिवला सांग... म्यां की भागीनं? ह्ये लय वंगाळ क्येल गा तुमी. उद्या पावणा माला बोल लावंल त्येला काय उत्तर करु म्यां? आता जा घरला! चार रोजान लावून घेतो तुला पावण्याकडे..." गडी घरी गेला. विठ्याची पोरगी नवऱ्याकडून पळून माहेरला आली ही बातमी गावभर झालेली. विठ्याचे सगेवाले त्याला आढळायला आले. त्यांनी चौकशी केली. विठ्या धोरणाने म्हणाला, "आता बोलायचा काय कप्पाळ... रांड येडं प्वॉर पिसं जावाय घावलं त्ये बी तसं... तशीच गत की वो... घोव बायलीचं भांडान झालं. घरात कोन वडील मानूस न्हाय. वैदगिरी करत कट्टाळून आल्याल पोरगं... ही बया लागली त्येचं डोस्क खायाला... मंग काय नी काय..... दिलं चार रट्ट ठिवून आनी ही बया कांगावा करत आली की घरला..."विठ्याच्या गप्पा सुरु असताना त्याची बायको दारात डोकावली. "आवंऽऽ आयकतासा न्हवं... भागीला वकाऱ्या व्हत्यात... ती पोटुशी हाय. काय भेव वाटायचं कारन न्हाय..." देवाला हात जोडत विठ्या म्हणाला, "द्येवच पावला म्हना की... आता कसला भांडान नी काय. जावायाचा बा ग्येला त्याला वरीस व्हईल की दोन हप्त्यांनी... म्हातारं सुनेच्या पोटी जलम घेतंय जनु... लय नामजद मानुस. फोंड्याच्या बाजारापतूर मानूस वळकतंय की त्येला... मोठ्ठा वईद व्हता माजा ईवाय... साप डसून मरत्यालं मानूस वाचविलं की दवा घेवून. जावाय बी माजं लय गुणी. पान न्हाई, सुपारी न्हाई, इडीकाडी, दारु-गांज्या काई न्हाई. वशाट बी खाईत न्हाई... मोठ्ठा मांत्रिक हाये त्यो. तेचा बी हातगुण नावाजातेत समद्या दुनियेत. इक्ती वर्सं म्यां मरत हुतो दम्यान पन नुसतं कान टोचून माजा दमा घालिवला की..." जावयाच्या मोठेपणाच्या गप्पा सांगून विठ्याने चौकशीला आलेल्या माणसांना चांगलं चितपट केलं.रानाचा पडित भाग खणून पिकाखाली आणायचं जोरदार काम सुरु होतं. विठ्याचे पोरगे-पुतणे रानातच तळ ठोकून राहिलेले. त्यांची जेवणं-खाणं घरुन पोचवत. दोन-तीन रोजात ते काम आटपणार होतं. तो धिबिडगा उलगल्यावर लेकीला पोचवायला जायचे बेत भागीचा बाबा आणि माय मनातल्या मनात योजत होती. एकदम माणसांचा कालवा ऐकायला आला. भागीचा चुलतभाऊ इराण्णा चांगला दांडगादुंडगा गडी... त्याला दोन गड्यांनी उचलून आणून ओसरीवर ठेवलं. त्याच्या डाव्या पायाची दवणशीर धरुन साप डसला. पोटरीला घट्ट आवळून फडका बांधलेला! तरीही विष भिनून इराण्णाच्या तोंडातून फेस गळायला लागलेला. भागीला थोडीशी माहिती झालेली. धारदार सुरी घेऊन तिने दंश झालेल्या भागाजवळ छेद घेतले. रक्त वाहायला लागलं. त्या भागात सापाचं विष उतरायची दवा देणारा कुणी वैद्य नव्हता.इराण्णाची बायको पोरं, आईबाप सगळ्यांनी रडून आकांत मांडला. इराण्णा आता वाचत नाही म्हणून त्याची बायको कपाळ फोडून घ्यायला लागली. इराण्णाच्या डोळ्यांवर झापड यायला लागलेली. कुणीतरी त्याला वांती होण्यासाठी मिठाचं पाणी पाजलं. त्याला वांती झाली, पण विष कुठलं उतरायला... आता आपला दादला असता तर इराण्णा वाचला असता असा विचार भागीच्या मनात आला न आला त्याचवेळी गंग्या नि त्याचा मेव्हणा येताना दिसले. भागी धावतच पुढे गेली, "धनीऽऽ द्येवासारकं आलासा बगा. माजा भाव आता मराय लागलाय. त्येला मोठा साप डसला. कायतरी विलाज करा... पोटाला चार ल्येकरं हायती त्येच्या. शिकस्त करा पन त्येला उतारा पडू द्या..."गंग्या पायावर पाणी ओतून इराण्णासमोर येऊन बसला. दंशाची जागा निरखली. इराण्णाच्या पापण्या उघडून बघितल्या. तोंड उघडून जीभ बघितली. "भाग्ये, मला गूळ कराया व्हयी. ताजी कळशी भरुन पानी द्ये बेगीन." गंग्याने मुंड्याच्या खिशातून पाळामुळांचा जुडगा काढून नेमक्या औषधी मुळ्या बाजूला काढल्या. त्या हातात घेऊन बाहेर आला. डोईवर कळशी ओतली. हळू आवाजात मंत्र म्हटला आणि हातातली पाळं ठेचून पाणी घालून त्यांचा चटणीसारखा गोळा बनवला. इराण्णाच्या पायाचा दंश झालेला भाग पाण्याने स्वच्छ धुऊन त्यावर तो गोळा ठेवला आणि कापडी पट्टी त्यावर बांधली. इराण्णाची नाडी धरुन तो वाट बघत राहिला. अर्ध्या कलाकात नाडीची चाल वाढली. सासऱ्याकडे बघून तो म्हणाला, "मामा, आता भेव कमी झाला. आता चार-पाच घंटे ईख चडायचे न्हाई. आजून येक ओसद सोदून आनायला पडते. रानाची चांगली म्हायती असनारा गडी देवा माज्या सोबत. तुमच्या भागात ते ओसद सोदून आनतो मी. मी शिकस्त कोशीस करतो! येस देणारी पावनाई. दवंसकरी वाचला तर आमच्ये पावनाईला साडी चोळी न्हेसवा. हाये कबुल ?"सासरा घायकुतीला येऊन म्हणाला, "त्येची काय काळजी करु नगासा. साडी चोळी तर न्हेसवतंय. माझा इराण्णा वाचू दे. देवीला आकरा पुतळ्याची माळ घालतो नि तुमाला बी फेटा बांधतो की पर पोराला माज्या जगवा." जाणकार बापये घेऊन गंग्या औषध शोधायला गेला. मध्यान्ह टळून गेल्यावर औषध उमगलं. गंग्याने सोबत्यांना बाजूला नेलं. त्यांना तिथे थांबवून तो मूळ जागेवर आला. वेल खणून पाळ मिळवलं. खणलेली जागा ठीकठाक करुन तो सोबत्यांपाशी आला. जवळ जवळ धावतच सगळ्यांनी घर गाठलं. गंग्याने अर्ध पाळ उगाळून ते पाण्यात मिसळून इराण्णाला पाजलं. थोड्या वेळातच त्याला भडाभड वांती झाली. त्याला पाणी पाजलं आणि मिरची खायला दिली. इराण्णा जरा सावध झालेला. मिरची त्याला तिखट लागली नाही. त्याने आणखी मिरची चावून खाल्ली. गंग्याने उरलेलं पाळ सगळं झरवून टाकलं. ते पाण्यात मिसळून पाजलं. इराण्णाला परत वांती झाली. या खेपेला मिरचीचं जरांस टोक चावल्या चावल्या इराण्णाला तिखटं झोंबलं."ईख उतारले...पावणाई पावली." म्हणत गंग्याने सुटकेचा सुस्कारा टाकला. आता त्याने गुळपाणी मागितलं. बचकभर गूळ खाऊन दोन तांबे पाणी घटाघटा प्यालं. संगळ्यांच्या जिवात जीव आला. इराण्णाची बायको गंग्याचे पाय धरुन म्हणाली, "तुमी देवासारकं आला बगा आनी माजं कुक्कू वाचिवलं. माजं धर्मभाव झालासा की तुमी. तुमचं उपकार जल्मभर लक्ष्यात ठेवतो बगा म्या." गंग्या संकोचला. विठ्याच्या दारात सगळा गाव जमलेला. जो तो त्याच्या जावयाची तारीफ करायला लागला. पोरीला हाक मारुन विठ्या म्हणाला, "भाग्येऽऽ जावाय माजं यवडी चाल मारुन आले हित्त. त्यास्नी आल्या आल्या पानी विचारायचं बी सुधरलं न्हाई मला. डबऱ्यात ग्येलं म्हन की माजं वय बी आनी शानपन बी. जा पावण्यास्नी भाकरी करुन वाड जा प‌ट्किनी..." इराण्णाची बायको पुढे येत म्हणाली, "तुमाला डुवाळं लागल्यात. तुम्ही कशाला घ्येताय तरास? म्या धर्मभाव म्हनलं न्हवं की त्यास्नी. म्या करती की भाकऱ्या..."गंग्या आणि त्याचा मेव्हणा भाकरी खाऊन पलंगावर येऊन बसले. अंगणात बाया बापड्यांची नुसती गर्दी झालेली. विठ्ठल तात्याचा वैद्य जावई बघायला मुद्दाम माणसं आलेली. एखादा म्हातारा विठ्याला बाजूला घेऊन विचारी, "तुजं जावाय कंचं म्हनायचं?" अभिमानाने जावयाजवळ त्याला नेऊन विठ्या दाखवी, "ह्ये जावायबापू... तकडं कोकनात असत्यात. सा पिड्या वैदकी चाल्लीया त्यांच्या घरान्यात. पाक फोंड्यापातूर समदं लोक वळकत्यात की त्यास्नं. अक्षी द्येवमानूस बगा. किती मानसं मरनातून वाचिल्यात बगा ह्येनी. पन आबिमान म्हंशीला तर न्हाई. वसदाचा मोबदला म्हनून योक तांबडा पैका नाही घ्येनार. सगळ्यास्नं फुकाट वसद द्येतेत की. मांत्रिक बी हायती की, हिंत माला आडळाया म्हणून आल्यात. हितं काय आवशद की फिवशद... मंतर मारुन वाचिवला की आमच्या इराण्णाला आमच्या डोळ्यादेकत..."गावचे पाटील, कुलकर्णी एवढे तालेवार ! वेळे काळेलाही कधी धनगराच्या घराकडे न फिरणारे, पण दिवेलागणीच्या सुमारास ते सुद्धा धनगराचा मांत्रिक जावई बघायला विठ्याच्या घरी येऊन गेले. दुसऱ्या दिवशी सास्वेने पुरणा वरणाचा स्वयंपाक करुन जावयाला वाढला. इराण्णाच्या बापाने पाच तोळ्याचं सोन्याचं कडं गंग्याच्या हातात घातलं आणि तो नको नको म्हणत असतानाही त्याच्या पायावर डोकं ठेवलं. जेवण झाल्यावर गंग्या सासऱ्याशी बोलत बसला. सासरा भागीबद्दल काही विचारीत अशी भीती त्याला वाटत होती, पण त्या विषयाचा काय तो सोक्षमोक्ष लावायला गंग्या अधीर झालेला. सासरा अलाण फलाण गप्पा सांगत राहिला. मग गंग्याच धीर करुन म्हणाला, "भागी काय म्हनत हुती?"सासरा हसत म्हणाला, "भागीन् कशाला सांगव लागते, झाली गोस्ट काय लपून हाती? हथं आल्यापासून सारक्या वकाऱ्या व्हत्यात तिला. ती पोटुशी हाये. तुमचा बा जल्म घ्येतो वाटतं..." काय बोलावं गंग्याला सुधरेना. "इराण्णा आता सुदारला की त्येला तीन रोजानी कडु पान्याचे न्हावान घालायचे. मग पंदरा रोज तरी पथ्य सांभाळा. सांच्याला आमी निगतांव." "योक दिवसात कंट्टाळलायसा म्हना की! आता आलायसा तर दोन रोज हावा. परवाच्याला घालिवतो की फोंड्यापातूर. बाजाराला गाडी पाटवायची हाये नव्हं फोंड्याला. तुमी बी जावा म्हनं बसून..." सासरा म्हणाला. आता राहणं भागच होतं. गंग्याला भागीशी बोलायची संधीच मिळेना. त्याने मेव्हण्याला विचारलं तर तो म्हणाला, "तेनी गुळनी धरली जनु... आपुन कस्याला ईषय काडा... त्येंच्या मनात काय राग दिसत न्हाई."तिसऱ्या दिवशी गंग्यानेच इराण्णाला कडू पाण्याचे न्हावण घातले. सासऱ्याने गंग्याला, मेव्हण्याला धोतर बंडी देऊन दोघांनाही फेटा बांधला. सास्वेने दहा वस्तू मोटल्या बांधून दिल्या. गाड्या जुंपून झाल्या. गंग्या, म्हेवणा, गडी बाहेर पडले. गंग्याची पावलं जड झालेली. मोटा गाडीत चढल्या. मेव्हणा, गडी दोघंही गाडीत चढले. 'येतो आमी' म्हणत हात जोडून गंग्या वळला मात्र... माणसं जोरजोरात हसायला लागली. सासरा बोलला, "जावयबापू, अवो खुळे की काय तुमी? मुद्याची गोस्ट इसारलाय की तुमी. भागीला का हथंच सोडून जाताय... तिला बलवा की..." गंग्या भागीला बोलवायला माघारी निघाला आणि भागीला घेऊन सासू येताना दिसली. गंग्या तोंडभर हसला. भागी गाडीत चढली आणि गाड्या सुटल्या. गंग्या विचार करत होता की, माणसं अशी अवचित का बरं हसली असावी?