Nikita raje Chitnis - 20 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | निकिता राजे चिटणीस - भाग २०

Featured Books
Categories
Share

निकिता राजे चिटणीस - भाग २०

निकिता राजे चिटणीस

भाग  20

भाग १९   वरून  पुढे  वाचा .........

शशिकला चिटणीस.

“अरे पण आम्हाला का कळवल नाही लगेच. ?”

“आम्ही फोन करतच होतो पण संपूर्ण दिवस तुमच्या फोन ला रेंज नाही अस उत्तर येत होत. आम्ही ट्रॅवल ऑफिसला पण फोन केला. ते पण तसंच म्हणाले. दुसराही दिवस तसाच गेला. मग काका म्हणाले की तुम्ही आज संध्याकाळ पर्यन्त ओंकारेश्वराला पोचणारच आहात तर निदान तुमची यात्रा तरी पूर्ण होऊ दे. जे घडायच, ते तर घडूनच गेल आहे. म्हणून काल संध्याकाळी तुम्हाला कळवल आणि रघुवीरला पण पाठवलं.” वाटवे मॅडम म्हणाल्या.

आता संदर्भ लागला की वाघूळकरांचा आवाज असा का येत होता. आणि रघुवीर आमच्या जेवणाची एवढी काळजी का घेत होता ते.

आता काय. तसंही संस्कार निखिललाच करायचे होते. त्याचा काही प्रश्न नव्हता. म्हणून मी सगळ्यांना म्हंटलं की “आता बरीच रात्र झाली आहे तेंव्हा तुम्ही सगळे घरी जा. घरी सगळे वाट पहात असतील.”

“मॅडम आमची चिंता करू नका आम्ही सगळे तीन दिवसांपासून इथेच आहोत. तुम्ही तिघही आता जरा आराम करा.” वाघूळकर म्हणाले.

निकिताला झोपेची गोळी देऊन झोपायला सांगितलं. ती गेली. रात्रभर असच बोलणं चालू होत. सगळे तपशील कळले. डोळ्याला डोळा लागला नाही.

सकाळी वाघूळकर, वाटवे, दामले सगळे आपापल्या घरी गेलेत. काका, विमल आणि निखिल मात्र राहिले.

संध्याकाळी वाघूळकर आणि वाटवे मॅडम आल्या. ऑफिस मध्ये पाटील आणि परब या जोडगोळी ची जबरदस्त चौकशी चालू होती. बबन, वाघूळकर आणि वाटवे हे त्यांच्या रडार वर होते. “हं करू द्या त्यांना चौकशी त्यांच कामच आहे ते. तुम्ही लोक मात्र शांत रहा.” मी म्हंटलं. “पोलीसांशी वादा वादी करून काही साधत नाही. काय आहे पांच वर्षांपासून ते गुन्हेगार शोधताहेत पण प्रगती शून्य. त्या मुळे स्वत:वरचाच राग ते तुमच्यावर काढाणार हे दिसतंच आहे. तुम्ही शांत रहा. कर नाही त्याला डर कशाची.”

“एक दोन दिवसात ते इथे पण येतीलच तुम्ही सांभाळून रहा एवढंच.” – वाघूळकर.

“आहे. मला त्याचा अंदाज आहे. तुम्ही काळजी करू नका. मी उद्या पासून ऑफिस ला यायचा विचार करते आहे. तुम्हाला काय वाटत.”

“नाही मॅडम इतकी घाई कशाला. आम्ही आहोत की सगळे. पुनः काही वाटल तर तुम्ही फोन वर आहातच की. बाकी आम्ही सांभाळून घेऊ.”- वाघूळकरांनी दिलासा दिला.   

“वाटवे मॅडम मला ऑफिसची काळजी नाही. तुम्ही आहातच सगळे, माझी काळजी वेगळीच आहे. डोंगरे आणि मेहता पुन्हा पूर्वीचाच राग आलापण्याची शक्यता वाटते म्हणून.”

“मॅडम आम्ही सावध राहू. तुम्ही चिंता करू नका.” वाटवे मॅडम म्हणाल्या.  

दूसरा दिवस तसाच गेला. संध्याकाळी ऑफिस मधून, दिवस भरात काय काय घडलं यांचा रीपोर्ट आला. सगळ ठीक चालल होत. निकिता पण आता सावरली होती. रोजचे व्यवहार चालू झाले होते. काका, विमल आणि निखिल इथूनच ऑफिस ला जायचे. मीच त्यांना म्हंटल की तुम्ही ऑफिस जॉइन करा म्हणून. किती दिवस सुट्टी घेणार. तसे ते तेरवी होई पर्यन्त रहाणार होतेच. ठीकच आहे.

दहा बारा दिवस तसेच गेलेत. तेरवी झाली. सगळ निखिलनेच केलं. मग दोन दिवसांनी भाऊजी आणि मंडळी त्यांच्या घरी गेलीत. काही दिवसांनी रविवारी सकाळी देशपांडे आणि दामले पतीपत्नी आलेत. भेटायला आले होते.

“आम्हाला पेपर मधून कळल्यावर राहवेना, म्हणून प्रत्यक्ष भेटायला आलो. तुम्ही कणखर आहात, स्वत:ला लवकरच सावराल अस वाटतच होत. आज तुम्हाला पाहून खात्रीच झाली. आम्हाला तुमचं खूप कौतुक वाटतं.” दामले आल्या आल्याच बोलले. “काय झाल, कसं झाल हे सगळ पेपर मध्ये आलच आहे. त्याच्यावर आपण बोलूया नको, अस मला वाटत. ऑफिस मध्ये आता कोण आहे? कोण बघतंय सगळं? तुम्ही पुन्हा जाणार का जबाबदारी घ्यायला?”

दामले देशपांडे आल्यावर मलाही जरा बरच वाटल. भाऊजी पण त्याच वेळी आले होते. त्यांची आणि  भाऊजींची ओळख करून दिली. छान गप्पा चालल्या होत्या निकिताही सामील झाली होती. राधाबाईंनी कॉफी करून आणली. गप्पा गोष्टींमुळे जरा हलक हलक वाटत होत, आणि दुधात मिठाचा खडा पडला. पाटील आणि परब आले. दामले आणि देशपांडे मंडळी असतांना पोलिस आले म्हंटल्यांवर मला जरा अवघडल्या सारख झाल. देशपांड्यांच्या ते लक्षात आल. ते म्हणाले की तुमचं होई पर्यन्त आम्ही बाहेर व्हरांड्यात बसतो. ते चौघेही बाहेर व्हरांड्यात जाऊन बसले.

“नमस्कार मॅडम पुन्हा यावं लागल. विचारपूस करायची होती.”- इंस्पेक्टर पाटील.

“ठीक आहे. तुमच कांमच आहे ते. बसा. बोला. विचारा जे हवं ते.”

“ही घटना घडली तेंव्हा तुम्ही बाहेर गावी होत्या अस कळलं. कुठे गेला होतात” – पाटील.

“आम्ही नर्मदा परिक्रमा करून आलो. ट्रॅवल कंपनी बरोबरच गेलो होतो.”

“काय काय पाहील ?” – पाटील.

“यात्रा होती ती. पिकनिक ला गेलो नव्हतो. तुम्हाला कंपनी च ब्रोशर देते. त्यावरून सगळं स्पष्ट होईल. हे घ्या. जसं लिहिल आहे त्याप्रमाणेच यात्रा झाली.”

“तुमच्याच घरी विष प्रयोग होऊन, एकसारखेच दोन मृत्यू होतात याच तुम्हाला आश्चर्य नाही वाटल ? तुमच्या मते काय कारण असाव याच. कोणी केल असाव ? काही प्रकाश टाकता का ?” – पाटील साहेबांचा सुर आता थोडा बदलला होता.

“मी काय सांगणार ? घटना आमच्या घरी घडली. आघात आम्ही सोसतो आहोत. शोध तुम्ही घ्यायचा आहे, प्रकाश तुम्ही टाकायचा आहे. गुन्हेगाराला शोधून आमच दुख: हलक करायचा प्रयत्न सोडून तुम्ही आम्हालाच विचारता की कोण असाव म्हणून. हे जरा विचित्र वाटंत नाही का ?”

“आमच काम असच असत. विचार पुस करूनच दिशा ठरवावी लागते. तपास आणि चौकशीचं सत्र अव्याहत चालूच असत. आम्ही जेंव्हा १०० प्रश्न विचारतो तेंव्हा एखाद दोन उत्तरांमधून महत्वाची माहिती मिळते. आणि तपासाला दिशा मिळते. तेंव्हा तुम्हीच सांगा तुम्हाला कोणाचा संशय येतो आहे का ? ही बातमी तुम्हाला इतक्या उशिरा का कळवण्यात आली ?” – पाटील

“नितीन ला मारण्यात कोणाचा फायदा होईल अस वाटत नाही. आणि आमच्या कंपनी मधले सर्वच फार निष्ठावान आहेत. आणि सर्वांनाच नितीन बद्दल फार आपुलकी आणि जिव्हाळा होता. दूसरा म्हणजे आम्हाला कळवण्याचा प्रयत्न केला या लोकांनी, पण रेंज नसल्याने आम्हाला उशिरा कळलं. तुमचं या बाबतीत काकांशी आणि निखिलशी विचारून झालच आहे.”

“मॅडम आम्ही कोणाला काय विचारल किंवा काय चौकशी केली हे तुम्ही सांगण्यापेक्षा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंच फक्त तुम्ही द्या. ते जास्त बरं होईल.” आता पाटील साहेब जरा जरबेच्या स्वरात म्हणाले.

“बरं.”

“नितीनच्या जाण्यात तुमचा पण फायदा असू शकतो. काय म्हणता ?” – पाटील.

“काय बोलता आहात साहेब, अहो माझा एकुलता एक मुलगा गेला आहे. आणि तुम्ही अस बोलता आहात . कमाल आहे.”

“कमाल माझी नाही, तुमच्या सुनेची आहे. काय चतुराईने हे सगळं तिने घडवून आणल आहे! आम्हाला सगळं कळल आहे पण तुमच्याच तोंडून ऐकायच आहे. तेंव्हा निकिता, तू आता पटापटा सांगायला सुरवात कर.” – पाटील.

बाहेर दामले मंडळी बसली होती. सर्व ऐकायला जात असणारच. मनात विचार आला, काय वाटेल त्यांना. निकीता कडे बघितल. ती लाल बूंद झाली होती. तोंडातून शब्द फुटत नव्हता. कुठल्याही क्षणी रडायला लागेल अस वाटत होत. काय करांव ? थोडा वेळ तसाच गेला. ती शांतता असह्य होत होत होती. थोड्या वेळाने ती शांत झाली. काही विचार केलाच असणार. माझ्या कडे पहात  होती.

पाटील साहेब आता थांबायला तयार नव्हते.  म्हणाले,

“निकिता बोल आता. खेळ संपला आहे तुझा. तुझ्याच तोंडून ऐकायचं आहे.”

“काय ऐकायचं आहे. ?” – निकिता शांत स्वरात म्हणाली.

“स्वत:ला निर्दोष शाबीत करण्यासाठी तिकडे दूर नर्मदा परिक्रमेला जावून इकडे बबन च्या हस्ते कार्यभाग उरकलास. बबनने आम्हाला सगळं सांगितल आहे. आता तुझी पाळी.” पाटील साहेबांनी सरळ आरोपच केला.  निकिता आता पूर्ण सावरली होती. चेहऱ्यावर करारी पणाची झलक होती. शांत होती, संतापाचा मागमूस पण नव्हता. ती कोसळणार नाही हे पाहून मला हायसं  वाटलं. 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.