रस्त्यारस्त्यावर तक्रारपेटी असावी?
अलिकडील काळात लैंगिक घटनात्मक वाढ होतांना दिसत आहे. नागपूरातीलच एका पोलीस स्टेशनची घटना. सदर घटनेत एका ऑटोचालकानं एका शाळेत जाणाऱ्या मुलीला चक्कं धमकी दिली की मी तुझ्यासोबत कलकत्त्यासारखं अमानवी कृत्य करीन. सदर घटनेवरून हे दिसून येते की आज मुली सुरक्षीत नाहीत.
तशीच दुसरी घटना. बदलापूरची अशीच घटना. त्या घटनेत आईला एका लहान कमीतकमी चार वर्षाच्या मुलीनं म्हटलं की आई मला लघवीच्या जागेवर मुंग्या चावल्यासारखं वाटतंय. त्यानंतर आईनं त्या भागाची तपासणी केली. तपासणी दरम्यान आढळून आलं की त्या शाळेत असाही एक व्यक्ती होता की ज्यानं तिच्या अजाणतेपणाचा फायदा घेवून तिला छळलं. अमानुष अत्याचार केला.
अशा बऱ्याच घटना घडत असतात परीसरात. आज गुन्ह्यांना कोणीच घाबरत नाहीत असे दिसते. कारण चांगली माणसं विनाकारण आज गुन्हेगार बनवली जातात आणि चोर असे रस्त्यारस्त्यावर मोकाट फिरत असतात. त्यामुळं अशा अमानवीय घटना. या अमानवीय घटनांवर ब्रेक लावता येवू शकतो काय? होय. काही अंशी ब्रेक नक्कीच लावता येवू शकतो. त्याचं उत्तर आहे तक्रार पेट्या लावणे.
तक्रार पेटी. तक्रार पेटी ही प्रत्येक शाळेत असावी. तशीच ती प्रत्येक कार्यालयातही असावी. ती रस्त्यारस्त्यावर असावी. जशी स्वच्छता करायची झाल्यास कचराकुंड्या जशा असतात तशी. स्वच्छता करतांना कचरा हा कुंडीत टाकून ठेवला जातो व परीसर स्वच्छ राखला जातो. तशीच तक्रार पेटी जर रस्त्यारस्त्यावर, शाळेत वा कार्यालयात असेल तर नक्कीच त्यात असलेल्या सुचनांवर कारवाई होत गेल्यानं नक्कीच जनमत सुधरेल व गुन्हेगारी पाश्वभुमीचे विचार ठेवणाऱ्या वा बाळगणाऱ्या मनाची स्वच्छता होईल. मात्र तक्रार ज्या व्यक्तीसमुदायाची करायची असेल, त्याचे काही पुरावे तक्रार पेटीत अर्ज टाकण्यापुर्वी आपल्याजवळ असावे. कारण तसे पुरावे आपण देवू शकत नसाल तर त्या तक्रारीला काहीच अर्थ नसावा.
तक्रार अर्ज टाकण्यापुर्वी आपल्याजवळ पुरावे का असावेत? कोणी तक्रार करतांना पुरावे कसे काय बाळगणार? हा एक आपल्या मनात त्यासोबत शिकायत पेटीत अर्ज टाकतांना एक संभ्रमाचा प्रश्न निर्माण होवू शकतो. परंतु त्याचं उत्तर म्हणजे आजच्या काळात कोणीही कोणाला आपली वादावर बदला घेण्यासाठी तक्रार पेटीत तक्रार जाणूनबुजून टाकू शकतात. ज्यातून चांगला सुस्वभावी व्यक्तीही गुन्हेगार ठरु शकतो. यासाठी पुरावे असणे गरजेचे आहे. तसं पाहिल्यास काही किरकोळ स्वरुपाचे अर्ज हे तक्रार पेटीत टाकल्यावर त्याची शहानिशा व्हावी व तक्रार खोटी आढळून आल्यास तक्रार करणाऱ्यावरही कारवाई व्हावी. जेणेकरुन कोणीही पुराव्याशिवाय अर्ज तक्रार पेटीत टाकणार नाही.
शाळेत पत्रपेटी असावी? प्रश्न मोठा संभ्रमाचा आहे व सर्वांना आश्चर्य वाटणारा आहे. त्याचं कारण असं की आजच्या काळात शाळेत घडत असणाऱ्या घटना. शाळेत विद्यार्थ्यांसोबत कोणता मुलगा कसा वागतो. कोणता शिक्षक कसा वागतो. कोणती शिक्षीका कशी वागते. तसाच कोणता शिक्षक आपल्या शाळेतील शिक्षीकेसोबत कसा वागतो? संस्थाचालक आपल्या शाळेतील शिक्षिकेसोबत कसा वागतो? हे पाहण्यासाठी शाळेत तक्रार पेटी असावी व ती उघडण्याचा अधिकार हा केवळ मुख्याध्यापक वा शालेय प्रशासनाला नसावा तर त्याची समिती असावी. ज्या समितीसमोर ती तक्रार पेटी उघडली जावी. ज्या समितीत जि. प. चे अधिकारी, मुख्याध्यापक, पालक, वस्तीतील गणमान्य नागरीक, पोलीस कर्मचारी असावे. त्या सर्वांसमक्ष ती तक्रार पेटी उघडली जावी. जेणेकरुन त्यात दोषी असलेल्या व्यक्ती किंवा मुलांवर तो जर गंभीर गुन्हा असेल तर कारवाई करता येईल. असं जर झालं तर शाळेत घडणाऱ्या लैंगिक छळाच्या घटना कमी करता येतील.
कार्यालयात असलेल्या तक्रार पेट्या उघडतांना त्याचीही तक्रार पेटी असावी. त्याठिकाणीही तक्रार पेटी उघडतांना समिती असावी. ज्या समितीत कार्यालय प्रशासन प्रमुख, एखादा पोलीस कर्मचारी, ते कार्यालय ज्या परीसरात आहे. त्या परिसरातील एखादा गणमान्य नागरीक, एखादा सामान्य कार्यालय कर्मचारी असे पदाधिकारी असावे.
रस्त्यारस्त्यावरही तक्रार पेटी असावी व ती तक्रार पेटी उघडण्याचा अधिकार हा केवळ पोलिसांनाच असावा. तो इतरांना नसावा. शिवाय पोलिसांनी त्या तक्रार पेटीत असलेल्या तक्रारीवर विचार करुन शहानिशा करुन घ्यावी. जर ती तक्रार योग्य वाटत असेल तर......
*पुरावे कसे गोळा करावेत?* अलिकडील काळात पुरावे गोळा करणे अतिशय सोपे आहे. त्या व्यक्तीचे एखाद्यावेळेस लपून छपून व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते वा फोटोही काढता येतो. परंतु आजच्या काळात जे काही बलात्काराची प्रकरणं घडतात. त्या प्रकरणात असे आढळून आले आहे की सदरच्या कृतीचा पुरावा घटना घडण्यापुर्वी गोळा करता येत नाहीत. अचानकच कोणी येतो व बलात्कार करुन जातो. तसं पाहिल्यास बऱ्याच घटनेत मात्र बलात्कार करणारी व्यक्ती ही उमेदवाराच्या मागावर असते हे दिसून येते. तसं आढळूनही येतं. तरीही उमेदवाराला त्याची प्रत्यक्ष तक्रार करता येत नाही. कारण तक्रार पेट्या नसतात व भीती वाटते. जर तक्रार पेट्या असतील व पुरावेही नसतील तरी उमेदवार तक्रार पेटीत तक्रार करु शकतो.
महत्वाचं सांगायचं झाल्यास तक्रार पेटी ही स्वच्छतेच्या पेटीसारखी जागोजागी असावीच. कारण समाजातील बलात्कार पीडीत मनातील कुविचारांची स्वच्छता करावयाची आहे. ती जर असेल तर शंभर प्रतिशत नाही, परंतु जास्तीत जास्त टक्केवारीनं स्वच्छता करु शकतो. त्यासाठी शासनानं प्रत्येक चौकाचौकात, शाळेत, कार्यालयात टपालपेटीसारखी तक्रारपेटीही लावणे गरजेचे आहे. अन् खर्चच करायचा असेल तर लाडकी बहिण योजनेवर खर्च न करता अशा तक्रार पेट्या लावून स्री सुरक्षा करण्यावर खर्च करावा. जेणेकरुन महिलांची सुरक्षा होईल व प्रत्येक महिला देशात, गावागावात, शहराशहरात सुरक्षीत होईल हे तेवढंच खरं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
अंकुश