Imitation of the West, killing culture in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | पाश्चांत्यांचं अनुकरण, संस्कृतीला मारक

Featured Books
Categories
Share

पाश्चांत्यांचं अनुकरण, संस्कृतीला मारक

पाश्चांत्यांचं अनुकरण ; संस्काराला मारक की तारक?

*आज पाश्चात्य संस्कृती आपल्या देशात शिरु पाहात आहे. महिला सक्षमीकरण व समानतेच्या हत्यारानं विवाहासारखा एक चांगला संस्कार तुटू पाहात आहे. पाश्चात्त्य संस्कृतीच्या नादाला लागून लोकांनी कमी कपडे घालायला सुरुवातच केली नाही तर विवाहासारखा चांगला संस्कारही मोडायला सुरुवात केली आहे. त्यातच महिलाच्या महिलाही आज नशेच्या अति आहारी गेल्याची चित्रे दिसत आहेत. आजची तरुणाई रात्रभर डॉन्सबारमध्ये नशा करीत झिंगत असलेली दिसते. ज्यात तरुणच नाहीत तर तरुणीही दिसतात. ज्या शिक्षणाच्या नावावर मायबापापासून कितीतरी दूर राहावयास गेलेल्या असतात. मोबाईलचा शोध लागल्यानं मायबाप येतीलच तर फोन करुन येणार, याचा अंदाज बाळगून. ज्यातून विवाहबद्ध होण्यापुर्वीच लिव्ह इन रिलेशनशीप तरुण तरुणीच्या नसानसात भरत असलेली दिसते. ज्याचा परिणाम विवाहबद्ध झाल्यानंतर तो करार स्वरुपाचा वाटतो व तो विवाह विवाहाच्या शपथा घेतल्यानंतरही पटकन तोडावासा वाटतो. ज्यातून कौटूंबीक न्यायालयात असंख्य कौटूंबीक खटले जोर पकडू पाहात आहेत. लोकं लिव्ह इन रिलेशनशिपचा रस्ता धरु लागलेले आहेत. परंतु लोकं हा विचार करीत नाही की आपण भारतीय आहोत. भारतात राहणारे, संस्कारी असलेले. आपल्या भारतात संस्काराचा खजिना असल्यानं आपल्याकडील वातावरण या संस्काराला टिकविण्यास साजेसे नाही. येथील वातावरण विदेशांसारखं आपल्या शरीरातील असुरक्षीत हार्मोन्स वाढू देत नाही. त्यामुळंच आपण चांगलं राहावं. संस्कारी राहावं व संस्काराची जपवणूक करुन आपण स्वतःला, आपल्या परिवाराला व आपल्या देशालाही बदनाम करु नये म्हणजे मिळवलं.*
पती आणि पत्नी. गाडीचे दोन चाकच यापैकी एक चाक जरी नसेल तरी गाडी चालत नाही. मात्र आजच्या काळात हीच चाकं डगमगायला लागलीत. कारण पती पत्नी नात्याचा अर्थच कुणाला समजलेला दिसत नाही.
अलिकडील काळात न्यायालयात वेगवेगळ्या स्वरुपाचे खटले अति प्रमाणात उभे राहात आहेत. त्या खटल्यात काही कौटुंबिकही आहेत. ज्याचे प्रमाण कितीतरी जास्त प्रमाणात अतिशयच आहे. याचे कारण काय? याचे कारण आहे पती पत्नींचं परस्परात न पटणं. शहाणी माणसं म्हणतात की दहा माणसं परवडली. परंतु एक बाई परवडत नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण एक उदाहरण देवून देतो.
दोन सख्खे भाऊ. त्या घरात एका भावाचा विवाह होईपर्यंत दोन्ही सख्ख्या भावाचं अतिशय चांगलं पटतं. परंतु जेव्हा त्या घरात एका भावाचा विवाह होतो व एक महिला घरात प्रवेश करते. तेव्हा पटणं कठीण जातं. याचं कारण काय? याचं कारण आहे ती महिला. ती महिला सारखी कुरघोडी करीत असते. सर्वच महिला द्रोपदीसारख्या जुळवून घेणाऱ्या नसतात. जसं द्रोपदीनं तिच्या पाचही पतींना अंतर दिलं नाही. जुळवून घेतलं. याचा अर्थ असा नाही की सर्वच महिला अशा वागतात आणि ज्या वागतही असतील, त्यांच्यात महिला सक्षमीकरणाचं वारं शिरलं असथ समजण्याची गरज आहे.
आज महिला स्वतंत्र्य आहे. तिला पुरुषांसारखेच अधिकार मिळाले आहेत. त्यातच समानता असल्यानं समानतेच्या चक्करमध्ये बसून महिला पुरुषांवरच अधिराज्य गाजवत असते आणि असंच तिचं वावरणं असतांना कधी कधी कुटूंबात हलकेसे वावटळ उठतात. ज्यात कधी स्री तर कधी पुरुषांना त्या वावटळाशी जुळवून घ्यावं लागतं. तेव्हाच संसार टिकतो. परंतु अशा जुळवून घेण्याची गोळाबेरीज केली तर त्याचं प्रमाण अलिकडील काळात पुरुषात जास्त असतं. मग एखाद्या वेळेस पुरुषांनाही वाटतं की आपणच का सतत जुळवून घ्यायचं. तिनं का जुळवून घेवू नये. त्यानंतर तो संधी पाहात असतो. तद्नंतर पुन्हा एखाद्या वेळेस वावटळ उठतं. ज्यात पुरुष स्रीकडून जुळवून घेण्याची आशा करतो. परंतु ती महिला जुळवून घेत नाही. मग वितुष्ट निर्माण होत असतं. ज्याची परियंती पुन्हा एखाद्या तीव्र स्वरुपाच्या भांडणात वा एखादा संभाव्य विपरीत प्रसंग ओढवण्यात होतो. ज्यातून महिला आणि पुरुष यापैकी एकाचं जास्त नुकसान होत असतं.
पतीपत्नीच्या नात्यातही तसंच आहे. एक अनोळखी स्री व एक अनोळखी पुरुष, दोघंही जेव्हा विवाहबद्ध होतात. तेव्हा नाना तऱ्हेच्या शपथा टाकतात. त्यावेळेस दोघेही म्हणतात की मी तुला कधीच अंतर देणार नाही. परंतु जसा काळ ओसरत जातो. तसे पती व पत्नी असलेले ते जोडपे आपापसात भांडत असतात. कधीच जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. त्यातच मीच का जुळवून घ्यावं? असाही प्रश्न निर्माण होतो. खरं म्हणजे एक महिला वा एक पुरुष जेव्हा पती पत्नी म्हणून विवाहबद्ध होतो. परंतु तसं विवाहबद्ध होण्याआधी त्यांनी वारंवार विचार करायला हवा की मी कोणत्याही परिस्थितीत परिस्थितीशी जुळवून घेईल व कधीच आमच्या नात्यात फारकत येवू देणार नाही. महिला असेल तर तिनं विचार करावा की मी माझ्या पतीच्या इच्छेविरुद्ध वागणार नाही व पुरुषांनी विचार करावा की मी माझ्या पत्नीच्या इच्छेविरुद्ध कधीच वागणार नाही. त्यानंतर समजा एखाद्या वेळेस भांडणाचं वावटळ उठलं आणि पतीचा आवाज तीव्र झाला तर पत्नीनं गप्प राहावं व कधी पत्नीचा आवाज तीव्र झालाच तय पतीनं गप्प राहावं. तेव्हाच नातं टिकतं. अन् तेवढंही करता येत नसेल तर आपल्या लेकरांकडं पाहावं. त्यांचा विचार करावा. त्यांच्या भविष्याचा विचार करावा. जेणेकरुन नातं टिकवता येईल. शिवाय विवाहबद्ध होण्यापुर्वी बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असल्या तरी चालतील परंतु विवाहानंतर त्या नसाव्यात. जेणेकरुन नातं टिकवता येईल. परंतु आज महिला सक्षमीकरणच्या व महिला समानतेच्या हत्याराने संपुर्ण पती पत्नीच्या नात्यांची वाटच लावून टाकलेली असून आज पती पत्नीचे नाते म्हणजे एक करार ठरत चाललेला आहे. केव्हाही करार करुन विवाहबद्ध व्हा आणि केव्हाही तो विवाहाचा करार मोडून विलग व्हा. परंतु ही गोष्ट निदान भारतासारख्या देशाला तरी शोभणारी गोष्ट नाही. कारण भारत हा संस्कारी देश आहे. येथील लोकांच्या नसानसात संस्कार कुटकूट भरलेला आहे. येथील लोकं विवाहाला करार मानत नाहीत. त्याला एक संस्कार मानत असून सोळा संस्कारामध्ये त्याला विशेष स्थान आहे. शिवाय तशी परिस्थितीही भारतात आहे. कारण भारत सुजलाम सुफलाम आहे. मात्र विदेशात भारतीय स्वरुपाची परिस्थिती नाही. म्हणूनच विदेशात विवाहाला संस्कार समजला जात नाही. एक करार समजल्या जातो. त्याचं कारण तेथील वातावरण. तेथील वातावरण हे विवाह टिकविणारं वातावरण नाही. कराराचंच वातावरण आहे. ज्यातून शरीरातील हार्मोन्सची संख्या वाढते. म्हणूनच करार करावा लागतो. परंतु भारतात तसं वातावरण नाही की माणसांना करारबद्ध होवून विवाह करावा लागेल. शिवाय इथं बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडला थारा नाही. तरीही आजच्या काळातील काही मंडळी पाश्चांत्यांचं अनुकरण करतात आणि विवाहाला संस्कार न मानता त्याला करारबद्ध समजतात. ज्यातून अलिकडील काळात भारतातही लिव्ह इन रिलेशनशीपचे वारे वाहू लागले आहेत. अशी मंडळी विवाहाला एक करार मानू लागले आहेत. ज्यातून विवाहासारख्या संस्काराचे उच्छेदन होवू लागले आहे. यातूनच देशाचीही बदनामी होवू लागली आहे.
महत्वपुर्ण बाब ही की भारत देशात राहणाऱ्या तमाम विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांनी विचार करावा की आपण भारत देशात राहात असून आपल्या भारत देशात हा संस्काराचा खजिना आहे. तो आधीपासूनच असून त्या संस्काराच्या खजिन्याला आपण पाश्चात्यांच्या नादी लागून व लिव्ह इन रिलेशनशीपचे वावटळ आपल्या मनात भरुन पाण्यात बुडवू नये की ज्यातून आपलंच नाही तर आपल्या कुटूंबाचं, आपल्या मुलाबाळाचं व आपल्या देशाचं नुकसान होईल. संस्काराचा खजिना नेस्तनाबूत होईल. एकंदरीत सांगायचं झाल्यास आपल्याही देशातील वातावरण असे संस्कार तुटल्यानं गढूळ होईल. मग आपले देशांतर्गत संस्कार तुटल्यानं भारत व पाश्चात्य यात फरक उरणार नाही. ज्यातून माणूसकी संपेल. पुत्र आईला आई व भाऊ बहिणीला बहिण म्हणणार नाही. हा सर्व परिणाम पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण केल्यानं होईल. हे तेवढंच खरं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०