Hum Saath Saath hai - 6 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | हम साथ साथ है - भाग ६

Featured Books
Categories
Share

हम साथ साथ है - भाग ६

ऊणीव भाग ६

वामागील भागावरून पुढे…

रात्रीचं स्वयंपाकघरातील मागचं सगळं आवरून सुलभा आपल्या खोलीत आली. दिपक नेहमीप्रमाणे पुस्तक वाचत होता. खोलीत आल्यावर दिपकशी काहीही न बोलता  सुलभा गादीवर आडवी झाली.

दिपकला आश्चर्य वाटलं. कारण सुलभा इतक्या शांतपणे कधीच येऊन झोपत नसे. कुठल्या न् कुठल्या विषयावर दोघांची चर्चा चालत असे. त्याने पुस्तक मिटवून ठेवलं आणि सुलभा जवळ आला.

"काय ग काय झालं?"सुलभा काहीच बोलली नाही.

"सुलभा काय झालं सांगशील का त्याशिवाय मला कसं कळेल."

सुलभा ने कूस बदलली आणि दिपक कडे बघत म्हणाली,

"दीपक मला वाटते या डॉक्टरांच्या डोक्यावर पैसे घालणं आता बंद  करावं,”

“का?अगं काही दिवस घालवावेच लागतात.  डाॅक्टरच म्हणाल्या नं. इतक्या चटकन निर्णय घेणे योग्य नाही.” दिपक सुलभाला म्हणाला.

"अरे, किती दिवस त्यांच्या औषधाचा मारा सहन करायचा?"वैतागून सुलभा उत्तरली.

"आपण कशासाठी डॉक्टरांकडे गेलो ?"

दीपकनी शांतपणे सुलभाला प्रश्न केला.

"आपल्याला बाळ हवय हो नं!" दिपक

" हो." सुलभा

"मग लक्षात ठेव कुठल्याही गोष्टीसाठी वाट बघणं धीर ठेवणं  महत्त्वाचं आहे. काल आपण डॉक्टरकडे गेलो म्हणजे आज तुला गूड न्यूज मिळेल असे कसे अपेक्षित करतेस?" दिपक

" तुझं म्हणणं पटतंय मला पण पैशांचाही विचार करावा लागतो." सुलभा

"ट्रीटमेंट" हा पाहुणा एकदा घरात घुसला की चांगले दहा हजारांच्यावर चंदन लावून जाणार हे आता सुलभाच्या लक्षात यायला लागलं होतं.

या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे कशाची ना कशाची तपासणी करायला जायचं नि एक दोन नोटा डोळे झाकून ठेवून यायचे. हा क्रम गेले वर्षभर चालला होता. आताशी तिला या सगळ्याचा उबग आला होता. दिपकला मात्र ते पटलं नव्हतं.

सासूच्या तऱ्हेवाईक बोलण्याने कंटाळलेल्या सुलभाने दीपकला म्हटलं

“दीपक, या ट्रिटमेंटचा मला कंटाळा आलाच आहे त्यांचं बरोबर आई कशा पद्धतीने बोलतात मला, तुला ठाऊक आहे नं.”

"हे बघ सुलभा, सासू सुनेमधील हा तणाव घरोघरी असतो. त्यावर विशेष चर्चासत्र ठेवण्याची काही गरज नाही.”

दीपकचं हे असले तडक फडक निर्णय ऐकून सुलभाचं डोकं तडकलं. ती तणतणली की त्यावरही दीपकचं उत्तर तयार होतच.

“सुलू तू शांत डोक्याने विचार कर म्हणजे तुला माझं म्हणणं पटेल. तू जशी आई होण्यासाठी उतावीळ झालेली आहेस तशी तीही आजी होण्यासाठी उतावीळ झालेली आहे. दोघीजणी कुठेतरी तडजोड करीत जा." दिपक

दीपकच्या बोलण्यावर सुलभानेही ऐटीत त्रिकालाबाधीत सत्य सांगितलं म्हणाली,

"दीपक सासू-सुनेत कधी तडजोड होऊच शकत नाही. ही पण घरोघरी आढळणारी गोष्ट आहे."

तिच्या या बोलण्यावर दीपकला हसावं की रडावं ते कळलं नाही.

"चल झोप आता उशीर झाला आहे." दिपक.

" बघते झोप लागली तर." सुलभा

" फार विचार करू नकोस." दिपक

" असं म्हटल्याने विचार येणं थांबत नाही." सुलभा

" ठीक आहे मी झोपतो." दिपक

सुलभा विचारांच्या आवर्तनात ओढली गेली.

तिच्या मनात आलं की सुरेश खूप नशीबवान आहे. लग्नं होताच क्षणी त्याने वेगळं राहून आपल्या बायकोला आई आणि बहिणीच्या कचाट्यातून  सोडवलं. दिपक आहे श्रावण बाळ. सुलभालाही दिपकचं कौतुक आहे पण कधी कधी त्याचा अतिरेक होतो असं सुलभाला वाटायचं.

सुलभाच्या मनात आले मंजू शहाणी भांड्याला भांडे लागण्यापूर्वी वेगळी झाली. पुन्हा मान ताठ करून सासरी यायलाही मोकळी. रोज दिवसातून एकदा तरी सुलभाला मंजूच्या या शहाणपणाचं कौतूक वाटायचं.

विचार करता करता कधीतरी सुलभाला झोप लागली.

***

दोन तीन दिवसांनी सुलभाला सासूबाईंनी म्हटलं

"तू काय या स्वयंपाकीण बाईला नेहमीसाठी ठेवणार आहेस का?"

"अजून काही ठरवलं नाही." सुलभा म्हणाली

" नाही तसा विचार सुद्धा करू नकोस." सासूबाई.

" मला तर तिचा स्वयंपाक आवडतो. तिची मदत होते. ऑफीसमध्ये उशीर झाला तरी काळजी वाटत नाही कारण तुम्हाला सगळ्यांना वेळेवर जेवायला मिळातं. "

" आम्हाला नाही आवडत तिचा स्वयंपाक." सासूबाईंनी नाक फुगवून सांगीतलं.

" दिपक, बाबा आणि प्रवीण यांना आवडला आहे बाईंनी केलेला स्वयंपाक."

"त्यांना आवडला असेल मला आणि रेवतीला नाही आवडला." सासूबाईंनी म्हटले.यावर सुलभा ने चक्क दुर्लक्ष केलं आणि ती आपल्या खोलीत गेली.

"दिपक मला नं सुरेशचं खूप कौतुक वाटतं. त्याला किती काळजी आहे आपल्या बायकोची. आपल्या आई आणि बहिणीचा स्वभाव माहिती असल्याने सरळ वेगळा राहिला."

यावर दिपक काही बोलला नाही.

"माझ्या बाबांकडे नव्हते पैसे जावयाला फ्लॅट घेऊन द्यायला...."

दीपकला नेहमी वाटायचं  ते या वेळी तो बोललाच,

"सुलू वेगळं राहण्यात कसली मजा. सगळे एकत्र राहतांना तडजोडी करीत एकमेकां बरोबर जगण्यात मजा आहे." सुलभाला मात्र दीपकचे हे तत्त्वज्ञान पटलं नाही.

"नवऱ्याची आईवर येडी श्रद्धा असते.” असा शेरा मारायला मात्र ती विसरली नाही.__________________________क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागातलेखिका…मीनाक्षी वैद्य.