हम साथ साथ है भाग २रामागील भागावरून पुढे…
रेवती हे सासूबांईचं अवघड जागेचं दुखणं आहे हे एव्हाना सुलभाच्या लक्षात आलं होतं. सुलभाचं लग्न झालं तेव्हा रेवती काॅलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. काॅलेजचा अभ्यास, परीक्षा, परीक्षेचं टेन्शन हे फक्त रेवतीच्या बाबतीतच आहे असं सासूबाईंना वाटायचं.
एकदा घाईघाईने नाश्ता अर्धवट करून प्लेट तशीच ठेऊन रेवती काॅलेजला पळालीतिच्यामागे सुलभाच्या सासूबाई
" अगं बळा नाश्ता पूर्ण करून जा. किती उन्हाची घरी येतेस त्रास होईल तुला."
सासूबाईंच्या बाळाने काही ऐकलं नाही.ती तशीच गेली.
रेवतीची खरकटी प्लेट बघून सुलभाला राग आला.ती सासूबाईंना म्हणाली
" आई रेवतीला तिच्या नाश्त्याची प्लेट घासायला टाकायला सांगा. नाश्तापण अर्धवट ठेवला आहे."
" अगं तू बघीतले नं तिला उशीर झाला ते. तिच्या काॅलेजमध्ये पाच मिनिटे सुद्धा उशीर चालत नाही.आणि तू तिला प्लेट घासायला टाकायला सांगतेस."सासूबाईंनी फणका-याने म्हटलं.
" आई रेवतीचं हे रोजचं आहे. रोज घाईघाईने नाश्ता करते अर्धवट ठेवते. जरा लवकर उठायला सांगा तिला."
" तुला सांगायला काय होतंय! केवढा अभ्यास असतो तिला."
सुलभाला आश्चर्य वाटलं.क्षणभर तिला प्रश्न पडला 'आपण शिकलो की नाही? आपण एवढ्या धावपळीत कधी नाश्ता केला नाही. कदाचीत आपण रेवती सारखा अभ्यास करत नसू. बरोबर आहे.' आणि स्वतःशीच हसली.
" विनाकारण हसायला काय झालं?"
" अं…काही नाही."
सुलभाच्या उत्तराने त्यांचं समाधान झालं नाही.त्या शंकीत नजरेने सुलभा कडे बघत होत्या.
तेव्हापासून सुलभाने रेवती हा विषय पुन्हा काढला नाही. आपलं काम बरं नि आपण बरं असं तिने ठरवलं.
***
" आई ऊद्या पासुन मला ऑफिसला लवकर जावं लागेल आणि यायला उशीर होत जाईल."
" का?"
"ऑडिट चालू होणार आहे. मला लवकर जावं लागेल आणि उशीरा यावं लागेल."
" तुझं काय काम आहे तिथे?"
"अं…" सासुबाईंच्या बोलण्यावर काय बोलावं हे सुलभाला कळेना.
"मला म्हणूनच तू नोकरी करणं पसंत नव्हतं."
"का पण?"
"आता तू ऊठशील आणि सरळ ऑफीसमध्ये निघून जाशील. म्हणजे सगळी कामं माझ्या अंगावर पडणारं."
" एरवी सगळं करूनच जाते. या ऑडीटमुळे पंधरा दिवस मी सगळं काही करू शकणार नाही."
" किती म्हणालीस पंधरा दिवस! अगं इतके दिवस लागतात का त्या ऑडीट का फाॅडीट म्हणते त्याला?"
"हो. एवढे दिवस लागतात. दरवर्षी असं ऑफीसमध्ये ऑडिट असतं."
" मागल्या वर्षी पर्यंत तर नव्हतं तुझ्यामागे ते ऑडिट"
"आई या वर्षी माझं प्रमोशन झालंय. मी विभागाची मुख्य झाली आहे त्यामुळे मला ऑफीसमध्ये हजर राहणं आवश्यक आहे."
" कशाला घेतलंस प्रमोशन?"
"मागच्या वर्षी नाही घेतलं कारण प्रमोशनवर माझी बदली होणार होती. म्हणून मी प्रमोशन घेतलं नाही. यावर्षी इथेच राहणार होते म्हणून प्रमोशन घेतलं."
" उपयोग काय त्या प्रमोशनच"
" का? पगार वाढला माझा. वरची पोझीशन मिळाली. हे महत्वाचं नाही का?"
" पगार तुझा वाढला. आम्हाला त्याचा काय उपयोग?"
" आई तुम्ही असं का बोलता? घरात मीपण खर्चाला पैसे देते."
" ते मिरमुटले पैसे काय पुरतात! बाकीचा खर्च आम्हालाच करावा लागतो. यांचं पेन्शन सुद्धा कमी आहे."
सासूबाईंचं हे बोलणं ऐकून सुलभा स्तभींत झाली. घरखर्चाला पैसे देऊन उरलेल्या पैशात आपला वैयक्तिक खर्च आणि बचत यात संपतात. हे कसं यांना कळत नाही.
बचतसुद्धा करायला हवी. सध्या आपल्या औषधांवर किती खर्च होतो आहे यांना कसं कळत नाही.
सुलभा आपल्याच विचारात होती. तेव्हाच सासूबाई म्हणाल्या
"ऊद्या पासून माझ्या डोंबल्यावर आला स्वयंपाक."
" त्याची सोय केली आहे."
" काय सोय केली?"
"उद्यापासून महिनाभर स्वयंपाक करायला बाई येणार आहेत.
"महिनाभर कशाला? तुला तर पंधरा दिवसच काम आहे नं!"
"आई बायका आजकाल महिन्याभराच्या बोलीवर काम करतात. त्यामुळे ती महिनाभर येईल."
" कशी करते स्वयंपाक?"
"चांगली करते असं माझी मैत्रीण म्हणाली. तिच्याकडे हीच बाई स्वयंपाक करते."
" मी स्वयंपाक घरात इकडची काडी तिकडे करणार नाही. त्या बाईला सगळं आटोपून स्वयंपाकघर स्वच्छ करून जायला सांग. हल्ली गुडघे फार दुखतात माझे."
एवढं बोलून सासूबाई कसातरी चेहरा करून गुडघ्यावरून हात फिरवत खुर्चीवर बसल्या.
सुलभाला त्यांचं गुडघा पुराण माहिती असल्याने हसू आलं. सासुबाईंच्या बोलण्याचा फार विचार न करता ती तयार व्हायला खोलीत गेली.___________________________