प्राक्तन -८
मागील भाग.
थोड्या वेळाने अमेयने चहा कपमध्ये गाळून भरला आणि तो कप अनिशाच्या हातात दिला. चहाचा तो सुवास किचनमध्ये दरवळलेला.. तो त्या दोघांनीही दीर्घ श्वास घेत श्वासात भरून घेतला. आता अमेयला उत्सुकता लागली होती की त्याने पहिल्यांदाच बनवलेला चहा कसा झाला असेल याची.. म्हणून तो उत्सुकतेपोटी अनिशाकडे बघत होता. तिने एक सिप घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक भाव पसरले. कारण चहा सेम टू सेम मयुरेश बनवल्यावर जसा लागतो अगदी तसाच झालेला... त्याच्या हाताची चवही अमेयच्या हातात मिसळली असं तिला वाटत होतं.
आता पुढे...
" आई काय झालं? काही कमी जास्त झालंय का... प्लीज लवकर सांग..." अमेयची एक्साईटमेंट ताणलेली आता जास्तच.
" चहा खूप भारी झालाय. माईंड ब्लोविंग.. असं वाटतंय तुझ्या बाबांसारखाच डिट्टो बनलाय चहा, नाही नाही त्याहून मस्त झालाय. विश्वास बसत नाहीये ना थांब तू पण टेस्ट कर... " अनिशा आनंदात म्हणाली. आणि तिने त्याला कपमध्ये चहा ओतूनही दिला. त्याने फुंकून हळूच पहिला सिप घेतला आणि खूप मोठं काहीतरी करावं असा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.
तेवढ्यात तिथे मयुरेश आला. आज तो लवकरच आलेला कारणही अगदी तसंच होतं. त्याचं लक्ष कामात अजिबात लागत नव्हतं. अनिशा व्यवस्थित घरी पोहोचली असेल का.. काय झालं असेल आणि यासारखे अनेक प्रश्न त्याला सतावत होते. तिला फोन करायचंही धाडस त्याला होत नव्हतं. म्हणून तो आज लवकरच घरी परतलेला... तर या मायलेकरांचा किचनमधला संवाद त्याच्या कानावर पडला. सकाळी शिकवल्याप्रमाणे त्याने आता तसाच चहा अनिशाला करून दिलेला आणि ते पिऊन तिला मयुरेशची आठवण आली. या विचारानेच तो मनातून प्रफुल्लित झालेला... तिला त्याच्या हातचा आदरक घालून केलेला चहा फार आवडायचा त्या आठवणी नकळत त्याच्या हद्याची तार छेडून गेलेल्या..
मयुरेश लगबगीने किचनमध्ये गेला. त्याला इतक्या लवकर आलेलं बघून ते दोघेही अवाक् झाले. पण तो मात्र डोळे मिटून चहाचा सुगंध श्वासात साठवत होता. तेवढ्यात अमेयने अत्यानंदाने त्याला सांगितलं की त्याने स्वत: च्या हाताने चहा बनवलाय. ते ऐकून मयुरेशला कोणे आनंद झाला. अमेयने लगेच चहाचा कप त्याच्यासमोर धरला. त्याने विलंब न लावता लगेचच घेतलाही..गरम चहा घाईत तसाच घेतल्याने त्याच्या जीभेला चटका बसला. पण त्याची त्याला पर्वा नव्हती. त्याने अमेयच्या गळ्यात हात घालत त्याला सुपर्ब अशी कॉम्प्लिमेंट दिली. रात्रीचं जेवणही त्यांनी तिघांनी मिळून गप्पा मारत केलेलं. आज कितीतरी दिवसांनी अमेयला आईबाबांचा एकत्र वेळ मिळालेला... त्यामुळे तो जास्तच खुश होता. आणि ते दोघेही लेकाच्या आनंदात आपापसातले मतभेद काही वेळ विसरून गेलेले...
रात्री जेवणानंतर मयुरेश तिची खोलीत वाट पाहत होता. ती आली आणि थेट झोपायच्या तयारीत होती तितक्यात मयुरेश बोलला,
" अनु थांब मला बोलायचंय जरा तुझ्याशी..." तो शांतपणे म्हणाला. पण तिला वाटलं सकाळी ती कुठे होती याबद्दल बोलेल किंवा विचारेल. म्हणून तिने नुसता हुंकार भरला.
" मला माहितीय मी चुकलो, जास्तीत जास्त सुखसोयी मिळाव्यात या हव्यासाने मी जवळ असलेल्या माझ्या हक्काच्या गोष्टी मात्र दुरावल्यात. काय मिळवलं यापेक्षा अमूल्य असं तुझं नि अमेयचं प्रेम गमावलं हे मला आजच नाही तर मागच्या काही दिवसात दिसून आलं. खरं तर लगेच तू सगळं विसरून मला माफ करावं इतका क्षुल्लक अपराध नाहीये माझा.. पण मी मात्र ठरवलंय या चुकीचं प्रायश्चित्त करून घ्यायचं. आणि याची सुरुवात मी एक महत्वाचं पाऊस उचलून केलीय. बस्स इतकंच बोलायचं होतं. " एवढं बोलून तो थांबला. पण मागच्या काही दिवसातलं तिचं त्याला इग्नोर करणं, सिरियसली न घेणं हे जाणून ती आताही काही बोलेल याची अपेक्षा नव्हती त्याला... तरीही त्याने मात्र त्याचं मन मोकळं केलेलं तिच्यासमोर. आणि तो थेट बाल्कनीत जाऊन उभारला. डोळ्यात आसवांनी गर्दी केलेली. मन आतल्या आत धुमसत होतं. तो एकटक कुठेतरी पाहत तसाच खिन्नपणे उभा होता. काय गमावलं हे गमावल्यानंतरच का उमजतं हा प्रश्न त्याच्या खिन्नतेत अजून भर घालत होता. तेवढ्यात जवळून अचानक आवाज आला,
" जवळची व्यक्ती अंतराने म्हणा किंवा मनाने जितकी दूर निघून जाते तितकी ती अधिक जवळची वाटू लागते. मग सुरू होतो हिशोब आतापर्यंत झालेल्या चुकांचा... पण नेमकं यावेळी याहुन जास्त गरज असते ती त्या चुका दुरुस्त करण्याची...!"
त्याने आवाजाच्या दिशेने बघितलं तर शेजारी स्वत: अनिशा येऊन उभी होती. समोर कुठेतरी बघत.. डोळे तर तिचेही पाणावलेले. मनात काहुर उठलेलं.. त्याने ते बघितलं. कदाचित तिने मागच्या अडीच वर्षांत जो त्रास सहन केलेला त्याचा मनस्ताप होत होता त्याला..
" ही चुक आता दुरूस्त नाही होऊ शकत.. मी हा जॉब, हे पद आणि त्यातून मिळणारे सगळे बेनेफिट्स सोडणार आहे. खरं तर आता हे पाप माथ्यावर घेऊन जगण्याची अजिबात इच्छा नाहीये माझी.. पण मी नसताना अमेयवर इतक्या लहान वयात जो अन्याय होईल तो विचार आणि माझ्यातला पुरूषार्थ मला मरू देणार नाही. कदाचित हेच माझं प्राक्तन असेल. " तो अश्रू अडवत निर्विकारपणे म्हणाला. पण त्याच्या या बोलण्याने तिला मात्र रडू आलं.
तिचा आता बांध फुटलेला.. ती हमसून हमसून रडायला लागली. किती समंजसपणा दाखवत होता तो, किती विचारपूर्वक पाऊलं उचलत होता. आणि मी मात्र फक्त माझा विचार करत होते, आणि त्याच एवढ्याशा प्रसंगाने सरळ मागचा पुढचा विचार न करता स्वत: ला संपवायला निघालेले.. अमेयचा विचारही आला नाही माझ्या मनात त्या क्षणी ना कोणत्या नात्याचा, मी फक्त स्वत:च्याच आत्मपीडेत स्वत:ला गुरफटून घेत होते. खरं तर माफी मला मागायला हवीय... या विचाराने ती आतून पिळवटलेली.... मयुरेशने तिला सावरलं आणि आत आणून बेडवर झोपवलं.
" मयुरेश..... मयुरेश..." हेच ती सतत बोलत होती. तिच्या आसवांनी तो चिंब झालेला... तो शांतपणे तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला सावरण्याचा प्रयत्न करत होता. खूप दिवसांनी त्यांना एकमेकांच्या स्पर्शात प्रेम जाणवत होतं. आणि त्या प्रेमाच्या हिंदोळ्यावर ते दोघेही स्थानापन्न झालेले...
क्रमशः
©️®️ अबोली डोंगरे.