प्राक्तन -७
अनिशाने तिचं आवरल्यानंतर अमेय आणि तिने दोघा मायलेकांनी एकत्र जेवण केलं. थोडा वेळ येनकेन गप्पा मारून अमेय अभ्यास करायला त्याच्या खोलीत गेला. तेव्हा अनिशा जरा पडावं म्हणून बेडवर कलंडली. पण यशची विदारक कहाणी काही तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हती.
त्याची आठवण येताच तिने फोन हातात घेतला. दुपारचे तीन वाजलेले... जेवण करून औषधं घेतली असतील का त्याने?? फोन करू का.. पण तो झोपला असेल तर झोप मोड होईल ना त्याची.. काय करू असा विचार ती करत होती. अखेर तिने मेसेज करून विचारू असं ठरवलं. आणि तिने त्याला मेसेज वरून विचारणा केली. व्हॉट्सॲप वर मेसेज केल्यावर डबल टीक तर आली नाही म्हणून तो खरंच झोपला असेल असा अंदाज तिने बांधला. आणि न राहवून तिने त्याचा प्रोफाईल डीपी पाहिला. एका लहान मुलीसोबत यशचा तो फोटो होता. ती त्याची मुलगी निधी असेल हे लगेच तिला समजून गेलं. कारण दोघांची चेहरेपट्टी आणि हसमुख चेहरा सेमच दिसत होता. फक्त निधीचे नाकेडोळे जरासे वेगळे होते. दोघांच्याही चेहऱ्यावर भलीमोठी स्माईल होती. जगातला सर्वात मोठा आनंद, सुख, समाधान जणू त्यांना एकमेकांच्या रूपात मिळालेलं म्हणून ते इतके खुश दिसत होते. पण लगेचच दुसऱ्या क्षणी अनिशाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या एवढ्याशा निष्पाप जीवाने किती काही सोसलं असेल... मृत्यू काय नि कसा असतो हे कळायच्या आतच मृत्यूने तिला मिठीत घेतलेलं...
या फक्त कल्पनेनेच मला मेल्याहून मेल्यासारखं होतंय. काळजाच्या असंख्य ठिणग्या पडत असल्याचा भास जणू तिला होत होता. तर यशची काय अवस्था असेल... कसा जगत असेल तो एवढं मोठं दुःख माथ्यावर घेऊन. त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती यातना दडवून ठेवल्या होत्या त्याने... एक छोटीशी चुक एका संयमी माणसाच्या हातून घडावी आणि त्याचीच शिक्षा म्हणून नियतीने जे होतं नव्हतं ते सगळंच त्याच्यापासून हिरावून घ्यावं... का का देवा तू फक्त चांगल्या लोकांच्याच बाबतीत इतका कठोर का झालास?? तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. ती मुसमुसत तोंड दाबून रडत होती. आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला. बघते तर काय यशचाच फोन होता. तिला ते बघून अजूनच उफाळून आलं. पण त्याला आता यातून बाहेर काढायचं, ते सगळं विसरणं अशक्यच होतं. पण त्याने आता त्याच्या आयुष्यात मूव्ह ऑन होणं गरजेचं होतं.
तिने लगबगीने डोळे पुसत दुसऱ्या का तिसऱ्या रिंगला त्याचा फोन उचलला.
" हॅलो... यश कसा आहेस, बरं वाटतंय ना आता? आणि औषधं घेतलीस ना? झोप झाली का तुझी? आता जागा का आहेस तू झोपून आराम कर ना..." फोन उचलताच अनिशाने जणू तिच्या काळजी आणि किंचित हट्टाचा वर्षावच केला जणू त्याच्यावर...
" मी बरा आहे आता. औषधं घेऊनच झोपलो होतो तासाभरापूर्वी पण आता एक महत्त्वाचा कॉल आला मग झोपेतून जागा झालो. आणि मग डाटा ऑन करून मेल्स चेक करतच होतो पण तुझा मेसेज आलेला नोटिफिकेशनमध्ये दिसला आणि मी रिप्लायही दिला. आणि रिप्लाय देताच क्षणी ब्लू टिक आली. पण रिस्पॉन्स काहीच नाही. आणि आता उशिरा फोन उचलून तुझा आवाज जरासा कापरा येतोय. यावरून काळजीने मलाच तुला विचारायचंय की तू बरी आहेस ना? " यश गंभीरपणे बोलत होता. त्याने अगदी अचूक हेरलेलं तिच्या मनातलं हे बघून तिला आश्र्चर्य वाटलं.
" अरे अरे कुठून कुठवर आला तू... खरं सांगू इतकं कधी मला माझ्या जवळच्या माणसानेही ओळखलेलं नव्हतं. (यावरून तिचा रोख खरं तर तिच्या नवऱ्यासाठी होता. हे कदाचित त्यालाही कळलं असावं ) म्हणजे अरे मी मोबाईल चालू ठेवून किचनमध्ये गेलेले सो..." ती सारवासारव करत म्हणाली. त्याला ही सगळी थापेगिरी समजत होती. पण त्याने नमतं घेतलं.
" पोचल्या हं पोचल्या भावना अचूक... " तो मिश्कीलपणे म्हणाला. तसं तिलाही हसू आलं.
" बरं ते जाऊदे. पण तुझी झोप मोडेल म्हणून मी ऐनवेळी फोन करायचा निर्णय बदलला. तर दुसऱ्या कुणी तुझी झोप मोडली फोन करून... " ती जराशी नाराज होत म्हणाली. यावर तो मनमोकळा हसला.
" जे व्हायचं ते होतच असतं. कारण काहीही झालं तरी काळ आणि वेळ आपण बदलू शकत नाही तसंच चुकवूही शकत नाही. " तो त्याच्या नेहमीच्या समजावणीच्या सुरात म्हणाला. पण नाही म्हणलं तरी हे बोलताना त्याचा आवाज खोल झालेला हे तिलाही जाणवलं.
" खरंच किती बरं वाटतं तुला बोलल्यावर.. सगळा शीण निघून जातो. तू ना पॉझिटिव्हीटीची खाण आहेस. आता पटकन बरा हो.. म्हणजे परत भेटू तिथे त्याचवेळी. " अनिशा त्याला बोलतं करण्यासाठी म्हणाली.
" पटकन बरा हो म्हणजे काय राव.. मला असा कोणता मुक्का मार लागलाय की काही मोडलंय. मी फाईन आहे. आणि कितीही काही झालं तरी ती पहाटेची वेळ मी त्या जागेव्यतिरिक्त अन्य कुठेच घालवू शकत नाही. गेल्या पाच वर्षांत एकदाही खंड पडलेला नाही. " तो नॉर्मली म्हणाला. पण तिला आश्चर्य वाटलं आणि कुतूहलही...
अजून थोडावेळ बोलून त्यांनी फोन ठेवला. त्यानंतर यशच्या मनातही अनिशाचे विचार घोळत होते. तिची काळजी, तिचं मैत्रीण म्हणून हक्क दाखवणं, तिचा प्रांजळ स्वभाव, आणि सगळंच... काही महिन्यांपूर्वी नैराश्याला कंटाळून जीव द्यायला निघालेली, पण आता किती मोकळी आणि दिलखुलासपणे वागते. पीडेने ग्रासलेल्या त्याच्या आयुष्यात कुणाला तरी अपघाताने आत्महत्या करण्यापासून वाचवलं याचं मनोमन समाधान वाटलं त्याला... आणि योगायोगाने तिच व्यक्ती इतक्या कमी कालावधीत त्याची जीवाभावाची मैत्रिण व्हावी हे सगळं स्वप्नवतच वाटत होतं त्याला अजूनही... याच मैत्रीखातर अनिशाचा संसार, तिला तिच्या हक्काच्या नवऱ्याचं प्रेम परत मिळायला हवं. कारण कुटूंबातला एक सदस्य जरी चिंताग्रस्त असला तरी त्याच्यासोबत इतरही नकळत त्यात भरडले जातात. आणि शेवटी नाही म्हणता म्हणता वाळूप्रमाणे सगळंच हातातून निसटून जातं... पून्हा शिल्लक राहतो तो फक्त एकटेपणा, क्षुल्लक चुकीतून उद्वभवलेला घातकी परिणाम आणि त्याचाच आयुष्यभर होत राहणारा पश्चात्ताप.. हे त्याने स्वत: अनुभवलेलं. पण हे अनिशाच्या बाबतीत होऊ नये असं त्याला मनोमन वाटत होतं.
दुसरीकडे किचनमध्ये खडबडीचा आवाज आला तसं अनिशा त्या दिशेने गेली. आणि पाहते तर काय अमेय चहा बनवण्यासाठी आदरक ठेचत होता.
" अमू चहा कुणासाठी करतोय राजा तू.. " तिने तिथे येत त्याला विचारलं. कारण त्याला काही किचनमध्ये जेवण आणि इतर सगळं गरम करणं याशिवाय काहीच येत नव्हतं.
" मी माझ्यासाठी दूध गरम करत होतो. म्हटलं तुझ्यासाठी चहाही करावा. आणि तुला माहितीय आज सकाळी तू नव्हतीस तर बाबा त्यांच्यासाठी असाच चहा करत होते. ते बघून मलाही शिकण्याची इच्छा झाली आणि आश्चर्य म्हणजे बाबांनी लगेच शिकवलंही मला.. आणि आता तेच तुझ्यासाठी ट्राय करून बघावं म्हटलं, मला जमते की नाही ते.." अमेय उकळत्या पाण्यात चहापत्ती आणि दूध टाकत एक्सायटेडली अजून बरंच काही सांगत होता. ते ऐकून अनिशा भारावून गेलेली. ती फक्त प्रेमाने त्याच्याकडे बघत त्याला प्रतिसाद देत होती.
थोड्या वेळाने त्याने चहा कपमध्ये गाळून भरला आणि तो कप अनिशाच्या हातात दिला. चहाचा तो सुवास किचनमध्ये दरवळलेला.. तो त्या दोघांनीही दीर्घ श्वास घेत श्वासात भरून घेतला. आता अमेयला उत्सुकता लागली होती की त्याने पहिल्यांदाच बनवलेला चहा कसा झाला असेल याची.. म्हणून तो उत्सुकतेपोटी अनिशाकडे बघत होता. तिने एक सिप घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक भाव पसरले. कारण चहा सेम टू सेम मयुरेश बनवल्यावर जसा लागतो अगदी तसाच झालेला... त्याच्या हाताची चवही मिसळली होती अमेयच्या हातात असं तिला वाटत होतं.
क्रमशः
©️®️ अबोली डोंगरे.