प्रकरण १२
त्या दिवशीच कोर्टाचं कामकाज संपल्यानंतर पाणिनी पटवर्धन सौम्या सोहोनी आणि कनक ओजस हे एका रेस्टॉरंट मध्ये कॉफी घेत बसले.
“मला वाटतंय पाणिनी,की न्यायाधीशानी त्यांचं मत आधीच बनवलय.”
“तुला मी काही गोष्टी शोधायला सांगितल होतं, त्याचा काय केलस?”
कनक च्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत पाणिनी ने मुद्द्याला हात घातला
“माहितीचे असे वेगवेगळे तुकडे मिळाले आहेत.. एक सलग अशी माहिती त्यातून निर्माण होत नाही आता हे तुकडे तुझ्या कितपत उपयोगी पडतील माहित नाही पण तू स्वतःच मगाशी म्हणालास त्याप्रमाणे तुझे हे अशील हे अत्यंत खोटारड आहे.”-कनक
“ती आहे पण आणि नाही पण. ती माझ्याशी खोटं बोलली कारण तिला तिच्या भावाची इभ्रत वाचवायची होती तिला वाटत होतं त्याच्या डोक्यावर एक तलवार फिरते आहे आणि ती कधीही त्याचं डोकं उडवून टाकेल या विचाराने माझा सल्ला धडकावून लावून तिने काही कृती केली त्या दृष्टीने तिने माझी फसवणूक केली पण त्यामागचे कारण मीमांसा बघितली तर त्याबद्दल मी तिला दोषी धरणार नाही. म्हणजे मला अजूनही असं वाटतंय की ती खरं सांगत असावी की तिने खून केलेला नाही म्हणून. अर्थात आरोपीच्या वकिलांच हे कामच असतं त्याला त्याच्या आशिलाने किती वेळा फसवलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवून आपली केस चालवायची.”
“ते काही असले पाणिनी,तरी माझं मत आहे की ती त्याला भेटायला त्याच्या फ्लॅटवर गेली होती. पैसे देऊन त्याला विकत घ्यायचा तिने प्रयत्न केला त्यात तिला यश आलं नाही आणि त्यामुळे तिने त्याला मारून टाकलं.”--कनक
“तू काय काय शोधून काढलेस ते सांग ना.” पाणिनी म्हणाला
“विवस्वान बद्दल तुझा अंदाज खरा ठरलाय पाणिनी,तो एक रहस्यमय आयुष्यच जगतोय. म्हणजे जगला आहे असं आपण आता भूतकाळात उल्लेख करून म्हणू शकतो. त्याच्या उत्पन्नाचा काय साधन होतं हे कोणालाही माहीत नाही आणि किती उत्पन्न तो मिळवायचा हे कोणी सांगू शकणार नाही. मला मिळालेल्या माहितीनुसार त्याच्याजवळ कायम पिस्तूल असायचं पॉईंट अडतीस कॅलिबर च. ते ठेवण्यासाठी कायम तो आपल्या खांद्यावर शर्टच्या आतल्या बाजूला डावीकडे चामड्याचा पट्टा वापरत असे. त्याचे कपडे कायम टेलर कडून शिवून घेतलेले असायचे म्हणजे रेडीमेड कपडे तो कधीच वापरत नसे आणि त्याचा कित्येक वर्ष एक ठरलेला टेलर होता तो त्याने कधीही बदलला नाही. तो कायम सूट वापरायचा.”—कनक.
“हो मलाही तो अनुभव आला. आम्हाला तो भेटायला आला तेव्हा पूर्ण सूटमध्ये होता.” पाणिनी म्हणाला. “मला सांग कनक ज्या वेळेला त्याचं प्रेत पोलिसांना मिळालं तेव्हा तू म्हणतोस त्या ठिकाणी डाव्या बगले मध्ये त्यांनी रिव्हॉल्व्हर ठेवलं होतं त्याचं?” पाणिनीने विचारलं.
“ठेवलच असणार १००%” कनक म्हणाला
पाणिनीचे डोळे स्वाभाविकपणे बारीक झाले “तुला याच आश्चर्य वाटत नाही की साक्ष देताना पोलीस अधिकाऱ्यांनी त्या खोलीत काय काय होतं त्याचे सविस्तर वर्णन केलं फोटो दाखवले प्रेत कसं पडलं होतं त्यावर कुठले कपडे होते कपाळावर बंदुकीच्या गोळीच भोक कसं पडलं होतं , एवढेच नव्हे तर उशी आणि फरशीवर रक्ताचे डाग होते हे सगळं सांगितलं
पण कोणीही त्याच्या सूटच्या आतल्या कप्प्यात रिव्हॉल्व्हर होत याबद्दल उल्लेख सुद्धा कसा केला नाही?” पाणिनीने विचारलं.
“सरतपासणीत त्याला कोणीही विचारलं नसेल. तू तरी उलट तपासणीत हा प्रश्न विचारलास का त्या पोलीस अधिकाऱ्याला?” कनक ने योग्य मुद्दा मांडला
पाणिनी हसला. “मी नाही विचारलं. मला तो विचार त्यावेळेला मनात आला नाही खरं म्हणजे मी त्यांना विचारायला हवं होतं की महत्त्वाचं असं काही त्याच्या शरीरावर किंवा त्याच्या कपड्यात सापडल का? तुम्ही ज्याचं वर्णन केलं आहेत त्या गोष्टी सोडून.”
“त्याच्या उत्पन्नाच्या स्त्रोताबद्दल काय कळलं का तुला कनक?”
“त्याचे सगळे व्यवहार रोखीने व्हायचे. त्याच्या कमरेला कायम पैसे ठेवण्यासाठी पाऊच असायचा मला समजल्यानुसार त्याचा कुठल्याही बँकेत खाते नव्हतं त्याने महागडी कॅडिलक कार सुद्धा रोख पैसे देऊन विकत घेतली होती.”
“ बाईची काय भानगड?”
“बऱ्याच बायका त्याला भेटायला येत असत”
“वेगवेगळ्या बायका की त्याच त्या बायका?” पाणिनीने विचारलं.
“वेगवेगळ्या” कनक न उत्तर दिलं
“मी प्रचिती पारसनीसच्या ऑफिसमध्ये तिच्या मालकाला भेटायला गेलो तेव्हा तिथून बाहेर पडताना माझ्यासाठी जी चिठ्ठी ठेवलेली होती त्याबद्दल काय कळलं?”
“ती इलेक्ट्रिक टायपिंग मशीन वर छापलेली चिठ्ठी होती. त्या ऑफिसमध्ये सगळेच इलेक्ट्रिक टाईपराईटर आहेत पण तू म्हणतोस ती चिठ्ठी त्या ऑफिसमध्ये असलेल्या युक्ता बेहेल नावाच्या मुलीच्या टाईपराईटर मधून छापलेली होती.युक्ता बेहेल गुरुवारी दुपारी आपल्या ऑफिस मधून बाहेर पडली आपलं डोकं दुखतं आहे हे कारण सांगून पण शुक्रवारी सकाळी पुन्हा ती आपल्या कामावर रुजू झाली ती आपल्या ऑफिसमधील कर्मचारी वर्गात सर्वांची आवडती आहे अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सर्वांची. एकेकाळी तिची आणि प्रयंक पारसनीसची खास मैत्री होती.शाल्व धारवाडकर आणि शुक्लेंदू धारवाडकर हे दोघे मालक सुद्धा तिच्याशी घनिष्ठ संबंध ठेवून होते.”
पाणिनी कॉफीचे घुटके घेता घेता कनक देत असलेली माहिती लक्षपूर्वक डोळे मिटून ऐकत होता.
“बरोबर खुनाच्या वेळेलाच ती ऑफिसातून बाहेर पडली होती.” पाणिनी म्हणाला.
“मी तुला मगाशी म्हटल्याप्रमाणे माहितीतले वेगवेगळे तुकडे जे मला मिळाले त्यातला आता दुसरा तुकडा तुला सांगतो.” कनक म्हणाला
“मी माझा बराचसा वेळ आणि पैसा रत्नगर्भ अपार्टमेंट मधल्या रिसेप्शनिस्ट आणि टेलिफोन ऑपरेटर कडून माहिती घेण्यात खर्च केला. मला असं आढळलं की विवस्वानने अनेक जणांना फोन लावले होते. त्या अनेक फोन पैकी एक फोन वारंवार एकाच व्यक्तीला अनेक वेळा लावला गेला त्या व्यक्तीचं नाव आहे इरा गर्ग. ही साधारण २७ वर्षाची दिसायला स्मार्ट गोरी अशी मुलगी आहे घटस्फोटीत आहे.बृहत आयात कंपनी इथे ती दिवसा नोकरी करते. रात्री मात्र ती इतर सामाजिक कार्य करते. पण ती अशी कोणाच्या नजरेत भरणारी नाही तिच्यावर मी माझे गुप्तहेर सोडले आहेत माहिती काढण्यासाठी.”
“तुझ्या दृष्टीने ही बया तुला महत्त्वाची का वाटते कनक ?”
“तेच तुला सांगतोय बृहत आयात कंपनीआणि प्रचिती पारसनीस काम करत असलेली एकादषम कंपनी यांचे एकमेकात बरेच व्यवहार आहेत.” कनक म्हणाला.
“तुमच्या मनात काहीतरी विचार चाललाय का सर?” पाणीनी चा चेहरा पाहून सौम्यान विचारलं
“थांब जरा सौम्या,” कनक म्हणाला, “आणखीन एक विवस्वान विषयी माहिती कळली ती पटकन सांगतो, विवस्वान हा ब्लॅकमेलर होता हे तुला मी सांगितलं आहे पण तो फक्त जिथे बायकांची भानगड असेल त्याच लोकांना ब्लॅकमेल करायचा इतर कुठलीही गुप्त माहिती त्याला जरी मिळाली पण त्यात बायकांची भानगड नसेल तर तो ब्लॅकमेल करत नसे. म्हणजे चोरोंके भी उसूल होते है म्हणतात ना तसं.” कनक ने पटकन सांगून टाकलं.
“सांगा ना सर काय विचार चाललाय तुमच्या मनात?” सौम्यानं पुन्हा पाणिनीला विचारलं.
“हाच विचार चाललाय सौम्या, विवस्वानचा खून झाला त्यावेळी विवस्वान एक तर आपल्या कॉटच्या बाजूला उभा असावा किंवा कॉटच्या कडेवर बसलेला असावा त्याच्या कपाळावर गोळी घालण्यात आली पॉईंट २२ च्या रिव्हॉल्व्हर ने आणि त्या रिव्हॉल्व्हर ची नळी नऊ ते सव्वा नऊ इंच ची होती. खुनी माणूस त्याच्याकडे तोंड करूनच उभा असणार.” पाणिनी म्हणाला
“बर मग? त्याचं काय? त्यात खास काय आहे? प्रचिती पारसनीस विवस्वान ला भेटायला गेली तिने बेल वाजवली असेल तिला आत घेतला असेल तिनं त्याला खरेदी करण्यासाठी पैसे देऊ केले असतील त्या दोघात वाद झाला असेल तेव्हा तिला आठवल असेल की हे ब्लॅकमेलर लोक कधीच थांबत नाहीत तेव्हा तिच्या लक्षात आलं असेल की आपल्या भावाला वाचवायचा असेल तर या ब्लॅकमेलरला संपवला पाहिजे आणि तिने त्याला समोरून गोळी घातली असेल.”
“तू विवस्वानच्या फ्लॅटमध्ये गेला आहेस?” पाणिनी ने अचानक विचारलं.
“पोलिसांनी त्यांचं तिथलं काम आवरल्यानंतर मी तिथे गेलो.”
“विवस्वान च्या कपड्यांच्या कपाटाचं काय तो त्याच्या कपड्याबद्दल खूप जागरूक होता असं तू म्हणालास.”
“अरे त्याचे कपड्याचे कपाट म्हणजे बघण्यासारखं होतं. मी सांगितल्याप्रमाणे त्याचे सूट टेलर मेड असायचे पण त्याचे इतर कपडे मात्र ब्रांडेड असायचे म्हणजे त्याची अंतर्वस्त्र सुद्धा ब्रँडड असायची.”
“ त्याच्या टेलरशी तू बोललास?” पाणिनीने विचारलं.
“नक्कीच पाणिनी.त्याने मला सांगितलं की विवस्वान त्याचे टेलरिंग चे पैसे सुद्धा रोखीनेच द्यायचा. एक सूट तो सहा महिन्यापेक्षा अधिक काळ वापरत नसे.”
“सूट शिवताना त्याचा आग्रह असायचा की बगले खालील चामडी पट्ट्यात ठेवलेली रिव्हॉल्व्हर बाहेरच्या माणसाला दिसणार नाही अशा प्रकारेच सूट शिवायचा. त्याच्या टेलरशी मी चांगली मैत्री केली आणि त्याला थोडी दारू पाजली तेव्हा त्यांनी खुशीत येऊन सांगितलं की या विवस्वान बद्दल टेलरच असं मत होतं की हा माणूस कुठल्यातरी गुंडांच्या टोळीतला असावा आणि मोठे उत्पन्न मिळवत असावा. परंतु ज्याअर्थी सर्व व्यवहार रोखीने करतो त्याअर्थी तो टॅक्स चुकवत असावा अर्थात टेलरला या गोष्टीशी काही देणं घेणं नव्हतं त्याला त्याची शिवण्याचे पैसे मिळाल्याशी मतलब होता पण हा टेलरचा अंदाज होता जो त्याने मला सांगितल”.कनक म्हणाला.
“त्याच्या कपड्याच्या कपाटात सूट व्यतिरिक्त इतर कुठल्या प्रकारचे कपडे होते?” पाणिनीने विचारलं.
“एकच जर्किन होत.”
“तो सुद्धा टेलर कडे शिवून घेतलेला होता?” पाणिनीने विचारलं.
कनक थोडासा अडखळला. “अरे नाही. हे जर्किन म्हणजे एक अपवाद होत. ते टेलर कडून शिवलेल नव्हत हे जर्किन तो गाडीतून काही वस्तू घरात आणून ठेवताना किंवा घरातील वस्तू गाडीत नेऊन ठेवताना किंवा जवळपासची कामे करतांना म्हणजे थोड्याशा कष्टाच्या कामासाठी वापरत असे.”
“हे अनुमान कशावरून काढलास तू कनक?”
“तसं नाही रे म्हणजे तो त्याचे सगळे सूट आणि इतर कपडे एकाच टेलर कडन शिवून घेत होता पण हे एकच जर्किन त्या टेलर्स नव्हतं म्हणून मला म्हणायचं होतं की ते किरकोळ कामासाठी तो वापरत असावा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या जर्किन वर कुठल्याही उत्पादकाच लेबल नव्हतं म्हणजे सर्वसाधारणपणे जर्किनला मानेच्या जागी आणि खिशाच्या जागी उत्पादकाचा टॅग शिवलेला असतो पण या जर्किनच्या बाबतीत या दोन्ही ठिकाणचा टॅग कापून टाकण्यात आला होता.”
“अरे बापरे हे थोडं विचित्रच प्रकरण आहे. बर ते जर्किन त्याला कितपत फिट बसत होतं?” पाणिनीने विचारलं.
“अरे मला कसं कळणार ते ? तो जेव्हा मारला गेला तेव्हा ते जर्किन त्याच्या अंगावर नव्हतं त्याला पुढच्या उत्तरे तपासणीसाठी पोलीस घेऊन गेले. त्यामुळे ते जर्किन त्याच्या अंगावर घालून बघायला मला वेळ कुठे होता? आणि मला ते सुचल सुद्धा नाही.” कनक म्हणाला.
पाणिनी थोडा वेळ शांतपणे विचार करत गप्प बसून राहिला त्याच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते नंतर अचानक त्याने सौम्याला एकादषम कंपनीमध्ये शाल्व धारवाडकर याला फोन लावण्यासाठी सांगितलं. अपेक्षित व्यक्ती फोनवर आल्यावर सौम्याने पाणिनीच्या हातात फोन दिला.
“मी अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन बोलतोय. तुमच्याकडली कर्मचारी प्रचिती पारसनीस हिच्यावर चालू असलेल्या खटल्यात तुम्हाला थोडा तरी रस असेल ना?”
“हा त्या अर्थाने आहे धारवाडकर सावधपणे म्हणाला. म्हणजे तुम्हाला नक्की काय हवंय त्यावर ते अवलंबून आहे”
“तुमच्या कंपनीत जी रोख रकमेत तूट आली होती त्याचं तुम्ही ऑडिट करून घेणार होतात ते ऑडिट पूर्ण झालय का?”
“हो. झालं.”
“नेमकं काय आढळून आल त्यात? मला सांगू शकाल तुम्ही?”
“साधारणपणे दहा लाखाची तूट आहे.”
“कोणावर तरी अन्याय होऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर एक करू शकाल माझ्यासाठी?” पाणिनीने विचारलं.
“काय?”
“तुमच्या ऑफिस मधील कर्मचारी युक्ता बेहेल मी उद्या सकाळी कोर्टात हजर राहू शकेल अशी व्यवस्था कराल प्लीज?”
“तुम्ही तिच्या येण्या-जण्याचा खर्च करणार असाल म्हणजेच तो खर्च कंपनीवर पडणार नसेल तर मी तिला रजा मंजूर करतो.”
“तसं नाही म्हणायचं मला. ती इकडे यायला तयार होणार नाही अशी शक्यता आहे.”
“तसं असेल तर मी तिला बळजबरी करू शकणार नाही.”
“पण ती तुमच्या कंपनीत नोकरीलाच आहे ना बरीच वर्ष?”
“सेक्रेटरी पदावर काम करणाऱ्या बऱ्याच मुली आमच्याकडे बरीच वर्ष नोकरीला आहेत. तुम्हाला माहिती आहे की आमचा व्यवसाय हा फार वेगळ्या प्रकारचा व्यवसाय आहे त्यामुळे आमच्या या व्यवसायात सेक्रेटरी म्हणून अत्यंत हुशार कर्मचारी आम्हाला लागतात. त्या दृष्टीने आम्ही त्यांना तयार केलेलं असतं, म्हणजे प्रशिक्षण दिलेला असतं.”
“मी तुम्हाला ही वैयक्तिक विनंती याच्यासाठी करतोय की ती इथे हजर असणं फार म्हणजे फारच महत्त्वाच आहे मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही आणि तुमचा पुतण्या शुक्लेंदू धारवाडकर, असे दोघेही तिला घेऊन उद्या कोर्टात खटल्यासाठी हजर राहा.”
“आम्ही तिघे?” पलीकडून तो आश्चर्याने जोरात ओरडला.
“हो तिघेही. माझे खात्री आहे की तुम्ही तिला एकटीलाच इकडे यायला सांगितलं तर ती येणार नाही. कदाचित तुमच्याही हातून निसटून जाईल आणि तुमच्या शुक्लेंदू पैकी तुम्ही दोघेही न येता कोणीतरी एकच तिच्याबरोबर आलं तर तिला आणखीनच संशय येईल पण तुम्ही दोघेही तिच्याबरोबर असाल तर तिला संशय येणार नाही आणि प्रचिती पारसनीसलाही त्याची मदत होईल.”
“हे बघा पटवर्धन प्रचिती पारसनीस जर दोषी असेल तर ती कुठल्याही मदतीच्या लायकीची नाही.”
“पण समजा खरोखरच ती दोष नसेल तर? प्रामाणिकपणे सांगा खरंच तुम्हाला असं वाटतं की तिने खून वगैरे केला असेल म्हणून? तुम्ही तिला चांगलंच ओळखता माझ्यापेक्षाही जास्त काळ.” पाणिनी म्हणाला
“ते खरं असलं तरी एक लक्षात घ्या जेव्हा एखाद्या व्यक्तीवर संकट येत तेव्हा ती व्यक्ती कशी वागेल हे तुम्ही नाही सांगू शकत. तिने कायमच तिच्या भावाची बाजू घेऊन त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला खरोखर वाटतंय की तिचं उद्या कोर्टात हजर असणे महत्त्वाच आहे?”
“तेवढं महत्त्वाचं नसतं तर मी तुम्हाला वैयक्तिक पातळीवर एवढी विनंती केली नसती. आर्जव केलं नसतं.”
पलीकडच्या बाजूने कोणतीच प्रतिक्रिया थोडा वेळ आली नाही. थोडा वेळ वाट बघून पाणिनी पुढे म्हणाला,
“तुम्ही तिघेही आलात तर कोर्टात अन्यथा निर्माण होणारे तुमच्या कंपनीबाबतचे प्रश्न आपल्याला बाहेरच्या बाहेर निस्तरता येतील.”
“कोणत्या प्रकारचे प्रश्न पटवर्धन?”
“तुमच्या कंपनीबाबतचे प्रश्न म्हणजे तुम्ही नेमकं काय स्वरूपाचा व्यवसाय करता? एवढी मोठी रोख रक्कम तुम्ही का ठेवता? त्यामुळे तुम्ही काही इन्कम टॅक्स वाचवता का? असे अनेक प्रश्न. असे प्रश्न की ज्याची उत्तर तुमच्या स्पर्धकांना कायमच हवी आहेत.”
“ठीक आहे ठीक आहे” पलीकडून शाल्व धारवाडकर घाई घाईत म्हणाला. “तुम्ही जर मला खात्री देत असाल की आम्ही आल्यामुळे आमच्या कंपनीच्या व्यवसायाबाबत कोर्टात काहीही बोललं जाणार नाही आणि त्याचबरोबर तुमच्या अशीलासाठी आमचं येणं महत्त्वाचं आहे
तर मी आणि शुक्लेंदू दोघेही जण तिला घेऊन उद्या सकाळी कोर्टाच्या वेळेत हजर राहू. तुम्हाला कुठे आणि कधी भेटायचं?”
“तुम्ही आज रात्रीच विमान पकडा आणि उद्या सकाळी इथे रीवाला या तुम्ही विमानतळावर उतरल्यावर एखादा हॉटेल बुक करून थोडं आवरून घ्या नंतर कनक ओजसच्या नंबरला फोन करा तो तुम्हाला हॉटेलवर गाडी पाठवेल गाडीतून तुम्ही सरळ कोर्टात या कोर्टात तुम्हाला येण्याची आणि बसण्याची सगळी व्यवस्था करेल” पाणिनी म्हणाला
“ठीक आहे येतो मी. मला कनक ओजस यांचा नंबर पाठवा.”
पाणिनीने त्याला कनकचा नंबर दिला. “तुमच्यावर अवलंबून राहू शकतो ना मी?” पाणिनीने विचारलं.
“माझा शब्द दिलाय मी तुम्हाला.” शुक्लेंदू म्हणाला.
“सज्जन माणसांनी दिलेला शब्द म्हणजे वचनच आहे” पाणिनी म्हणाला आणि त्यांनी फोन ठेवला.
“काय चाललय काय तुझ्या डोक्यात पाणिनी?” कनक न विचारलं
“मला आता बोगद्यापलीकडचा उजेड दिसायला लागलाय. दहा लाखाची तूट!”
“मुळातला आकडा २० लाख होता” कनक म्हणाला
“बरोबर आहे तू म्हणतोस ते पण ज्या वेळेला शुक्लेंदू ऑफिस मध्ये आला तेव्हा म्हणाला की तो एका बिझनेस डील साठी बाहेर गेला होता आणि जाताना त्याने दहा लाखाची रक्कम बरोबर घेतली होती पण ते डील झालं नाही त्यामुळे ती दहा लाखाची त्याने नेलेली रक्कम परत कॅशियरकडे देणारच होता तो.” पाणिनी म्हणाला
“मला काहीच लक्षात येत नाहीये” कनक म्हणाला
“नको येऊ दे आता काही लक्षात उद्या जर तिघेही कोर्टात हजर झाले, तर आपण खूप नशीबवान ठरू.” पाणिनी म्हणाला
“तू त्यांना आश्वासन दिलेस ना की त्यांच्या धंद्याची कुठलीही लफडी बाहेर येणार नाहीत म्हणून?”
“मला नाही वाटत तसं काही बाहेर काढावे लागेल.” पाणिनी म्हणाला.
“आता आपलं बरंच आणि महत्त्वाचं काम झालंय त्यामुळे आता उद्याची फारशी चिंता न करता आपण मस्त खाण्याचा आनंद घेऊ.”-कनक
(प्रकरण 12 समाप्त)