Kamini Traval - 40 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग ४०

Featured Books
Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग ४०

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ४०

हर्षवर्धन ऑफीसमध्ये जायला म्हणून तयारी करत असतो. प्राची खोलीतल्याच इझीचेयरवर मागे डोकं टेकवून डोळे मिटून बसलेली असते. हर्षवर्धनचं तिच्याकडे लक्ष गेलं.

हर्षवर्धन प्राचीला म्हणाला,

"प्राची आज आठवडा झाला तू ऑफिस मध्ये आलेली नाही ऑफिस मध्ये किती कामं खोळंबली आहेत. किती टूर्सचं नियोजन करणं थांबलेलं आहे. कधी येणार आहेस ऑफीसमध्ये? तू फक्त स्वतःच्या मनस्थितीचच कौतुक करत बसणार आहेस?"

हर्षवर्धनचं हे बोलणं ऐकलं तशी प्राची खुर्चीवरून ताडकन उठली आणि त्याला म्हणाली,

"हर्षवर्धन गेली अनेक वर्ष तुझ्या मनस्थितीला सांभाळत मी जगले. माझ आयुष्य राहीलच कुठे माझ्यासाठी? मी वेगळं म्हणून काही जगलीच नाही. सतत हर्षवर्धन ..हर्षवर्धन... हर्षवर्धन. फक्त हर्षवर्धनसाठी जगले. आता मी नाही हा ताण सहन करू शकत आणि नाही तेच ते आयुष्य फक्त तुझ्यासाठी जगू शकत. हर्षवर्धनच्या दृष्टीनं हे कठीण आहे. हर्षवर्धनला हे अवघड जाईल. सतत हर्षवर्धन.. हर्षवर्धन.. हर्षवर्धन करून कान किटले माझे. माझं डोकंही सतत ताण सहन करून थकलय. मी फक्त आठवडाभर थकव्यामुळे घरात बसले तर तू मला ऐकवतोयस."

हर्षवर्धन थोडावेळ गप्प बसला पण लगेच तोही म्हणाला

"तुला यायला नको ऑफिसमध्ये.पण ऑफीसमध्ये तुझा शब्द अंतिम असतो. तुझ्याशिवाय कुठलही काम फायनल टप्प्यावर जात नाही"

.यावर प्राची त्याला म्हणाली,

"हर्षवर्धन हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू कधी घेतलास का पुढाकार? कधी इच्छा तरी व्यक्त केलीस का? मी आज नियोजन करतो. असं कधी म्हणालास? एकदा दोनदा तुझा निर्णय चुकला असता.नियोजन चुकलं असतं पण इतकी वर्ष झाली तू अजूनही तुझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघायलाच तयार नाहीस.

हे बघ या सगळ्या व्यवसायाचा आता मला कंटाळा आलाय. मला आता डोक्याला टेन्शन नको. काहीच नको. माझ्या मनासारखी एकही गोष्ट मी करू शकले नाही. आता मला आयुष्य माझं फक्त माझ्यासाठी जगायचं आहे. मला कुठलेही ताण नको आहेत आता. ही ट्रॅव्हल्स कंपन तुला चालवायची असेल तर तू चालव बरोबर तन्मयला घे नाहीतर सरळ बंद कर. माझा काहीही संबंध नाही आता या व्यवसायाशी"

एवढे म्हणून प्राची डोळे मिटून पुन्हा खुर्चीवर जाऊन बसणार तर हर्षवर्धन तिला मारायला हात उगारतो. त्याचा हात वरच्यावर पकडून प्राची म्हणाली,

" तू काय समजतो स्वतःला? तुझ्यासाठी माझं आयुष्य वेचलं. माझ्या मनासारखं नाही जगले. तुला त्याची काही किंमत नाही हे कळलय. माझ्यावर पुन्हा हात ऊगारायची हिम्मत करायची नाही. माझी चांगली बाजू तू बघीतली आहेस. माझ्यावर हात उगारून माझा अपमान करण्याचा पुन्हा प्रयत्न केलास तर माझी दुसरीही वाईट बाजू तुला दाखवीन.

नवरा आहेस म्हणून पुरूषार्थ दाखवू नकोस.तुझ्याशी मी लग्नं केलं तेव्हा तू पूरूष काय माणूस म्हणून सुद्धा जगण्याच्या स्थितीत नव्हता. मंगळसूत्र मी तुझ्या नावाचं घालते पण त्याचा मालक हर्षवर्धन पटवर्धन तर माझ्याबरोबर खंबीरपणे कधीच उभा नव्हता.

त्याला सामान्य माणसाच्या पातळीवर आणण्यासाठी मी एक बायको म्हणून कष्ट केले. आपला समाज तर पुरुषप्रधान संस्कृती जपणारा. माझ्या सारखी लहान वयाची बाई नव-याला बरं करण्यासाठी धडपडतांना दिसल्यावर कोणी पुरूष काय स्वच्छ हेतूंनी मला मदत करायला येत होता का?

या सगळ्या लांडग्यांपासून स्वतःला वाचवत तुझ्यासाठी धडपडले.या ट्रॅव्हल्सच्या क्षेत्रात काय कमी लांडगे होते. सगळे मला मदत करायला एका पायावर तयार होते. त्यांचा हेतू मदत करण्यापेक्षा वेगळा आहे हे मला कळत होतं पण प्रत्येक वेळी शशांक माझ्या बरोबर उभा राहिला भावाच्या नात्याने म्हणून या व्यवसायात मी खंबीर पणे उभी राहू शकले. संदीप आणि यादव हेही प्रामाणिक माणसं भेटल्यामुळे माझं काम मी नीट करू शकले.

हर्षवर्धन तुझ्यासाठी मी माझं आयुष्य जगायच़ जाणीव पूर्वक विसरले कारण मला तुझ्यात सुधारणा घडवून एका माऊलीला तिचा मुलगा परत करायचा होता. पण ज्याच्यासाठी मी हे सगळं केलं तो तर कृतघ्न निघाला. आता मला हा व्यवसाय आपला संसार या कशातच रस वाटत नाही. मला आता फक्त मलाच सतत भेटायचं आहे. स्वत:ला आवडेल तेच करायचं आहे. हा व्यवसाय तू पुढे चालव नाही तर सरळ बंद कर. आता मी नाही याच्यात पडणार."

खोलीत ही वादावादी चालू असतानाच खोलीच्या बाहेर कामीनी बाई पोहोचल्या. त्या प्राचीसाठी चहा घेऊन आल्या होत्या. दोघांचा एवढा वाद ऐकून एकदम अचंबित झाल्या.

"प्राची तू तुझ्या मनातली सगळी भडास काढलीस.पण मी कसा जगलो यांचा विचार केला कधी? सगळ्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी फक्त सहानुभूती, कीव दिसायची आणि तुझ्याबद्दल सगळ्यांच्या डोळ्यात कौतुक दिसायचं. मला कुठे आपल्या ऑफीसमध्ये अजूनही कोणी विचारतं? प्राची मॅडमचा शब्द शेवटचा. प्राची मॅडम किती धीट आहेत. किती हुशार आहेत. हेच मी सगळ्यांच्या तोंडून ऐकत आलो. मी कोणीच नव्हतो आणि नाही. मी कुठलंही काम किंवा कुठलाही निर्णय घ्यायचा प्रयत्न केला तर त्याकडे संशयाने बघीतलं जातं. का? कारण मला बुद्धीचं नाही हा सगळ्यांचा समज झालाय. तू हा समज करून दिलास."

हर्षवर्धनचा चेहरा हे सगळं बोलताना विचीत्र झाला. त्यांचं बोलणं ऐकून प्राची हबकली.ती म्हणाली,

"तू आत्ता जे बोललास ते सगळं तुला कळतय तर तू का पुढाकार घेतला नाहीस कुठल्या टूरचं नियोजन करण्यात, ऑफीसच्या इतर कामात? हा घाणेरडा विचार स्वतःच्या मनात गोंजारण्यापेक्षा एकदा मला सांगायचं होतं. मी केव्हाच सगळे अधिकार तुझ्या हातात दिले असते. मला हौस नव्हती हा व्यवसायाचा डोलारा उभा करायची. आपण या घरातून बाहेर पडल्यानंतर तुझी जबाबदारी पेलत असताना तुला झेपेल आणि तुझ्या बरोबर राहून हा व्यवसाय करणं मला सोपं पडलं. मी तर नोकरी करत होते.पैसे मिळवण्यासाठी हा व्यवसाय करायची गरज नव्हती.तुला या वयात नोकरी कोण देईल? तू सक्षमपणे नोकरी करू शकशील हे ठामपणे सांगण्यासारखी तुझी मन: स्थिती नव्हती. म्हणून हा व्यवसाय सुरू केला.तू बरा होईपर्यंत आपला व्यवसाय नीट सुरू झाला की तुझ्या हातात व्यवसायाची सगळी सूत्रं देऊन मी बाजूला व्हायचं हे मी ठरवलं होतं. या सगळ्यात माझ्याबरोबर आई होत्या खंबीरपणे म्हणून मी सगळ्या वाईट प्रसंगात सगळ्यांशी लढू शकले. व्यवसायात खंबीरपणे उभी राहू शकले.

तू का नाही पुढे आलास. आता वाटतंय नं तर कर तू हा व्यवसाय. तू तुझ्या हिमतीवर घे निर्णय,कर नियोजन. एखाद्या वेळेस चुकेल तुझा निर्णय, तुझं नियोजन. पण नेहमीच असं कसं होईल? मी आणि आई आहोतच तुझ्याबरोबर.पण आता मी हे करणार नाही. तन्मयच्या आयुष्याची घडी तुलाच बसवायची आहे. त्याला बरोबर घे. त्याला आवड आहे या व्यवसायाची."

प्राची एवढं बोलून दमून खुर्चीवर बसली .तिने डोळे मिटून घेतले. हर्षवर्धनच्या लक्षात आलं आता ही बोलणार नाही. तो जोरातच बडबड करतो.प्राचीला ऐकू जावं याचं उद्देशाने.

"मला आता स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. बायकोच्या सांगण्यानी चालणारा असं म्हणतात मला. आता दाखवतोच सगळ्यांना."

हे बोलून तो खोलीच्या बाहेर पडला तर दारात त्याला कामीनी बाई दिसल्या. त्यांच्याशीही तो काही न बोलता घराबाहेर पडला. कामीनीबाईंना त्यांचं शेवटचं वाक्य जे त्याने प्राचीला उद्देशून म्हटलं असतं ते ऐकू आलेलं असतं. म्हणूनच त्यांना खूप आश्चर्य वाटतं.

***

प्राची डोळे मिटून खुर्चीवर बसली असते. तिला हर्षवर्धनच्या डोक्यात असे काही विचार इतके वर्ष चालू असतील याची कल्पनाच आली नव्हती. तिला याची पुसटशी शंका जरी आली असती तरी तिनी लगेच व्यवसायाची सगळी सूत्र त्याच्या हातात दिली असती. तिला वाटलं

"आपण एवढी वर्ष जे केलं ते सगळं पाण्यात गेलं का? मला हर्षवर्धनहून वरचढ असल्याचं कधीच दाखवायचं नव्हतं. मग यांच्या डोक्यात हे सडके विचार कसे आले? कोणी त्यांच्या डोक्यात भरवले?"

***

"प्राची जागी आहेस का? तुझ्यासाठी चहा आणला आहे."

प्राची डोळे उघडते.कामीनीबाईंना बघून डोळे पुसते.
"आई…"

"शांत रहा.नको बोलूस काही.मी सगळं ऐकलय.चहा घे आणि शांतपणे पडून रहा.आपण नंतर बोलू."

कामीनी बाईं तिच्या डोक्यावरून प्रेमानी हात फिरवतात. प्राचीचा चहा घेऊन झाल्यावर तिला म्हणाल्या,

""आता शांत झोप फार विचार करू नकोस."

"आई हर्षवर्धनला असं कसं वाटलं? त्यांच्यापेक्षा मी मला आहे हे का लोकांना दाखवीन? असं मला वाटत असतं तर त्याला सुधारण्यासाठी मी एवढी मेहनत का घेतली असती? आई मी त्याच्या मनातील न्यूनगंड काढून टाकण्यासाठी धडपडत होते. हर्षवर्धन तर वेगळा समज मनात ठेवत आला. मी काय केलं की याच्या मनातील सगळ्या गैरसमजातून मळभ दूर होईल? आई सांगा हो मला.मी खचले आता."

एवढं बोलून प्राची ढसाढसा रडायला लागली.

कामीनी बाई प्राचीचं नैराश्य बघून मनातून हादरल्या. त्यांना तिची किव आली आणि हर्षवर्धनच्या कृतघ्नपणाचा राग आला. आता आपल्याला काहीतरी उपाय शोधायला हवा. प्राचीला असं उन्मळून पडू द्यायचं नाही.ती इतकी वर्ष व्रतस्थपणे आपला सहचरीणीचा धर्म निभावत होती. आज तिला या वेळी आपणच सावरायला हवं

कामीनी बाईंनी हळूच प्राचीच्या पाठीवर थोपटले. प्राची डोळे मिटून बसलेली होती पण तिच्या डोळ्यातून अविरतपणे अश्रू वहात होते. कामीनी बाईंनी हळूच आपले डोळे पुसले आणि पावलांचा आवाज न करता खोलीबाहेर पडल्या.

प्राचीला सावरायला हवं हे लक्षात येतांनाच हर्षवर्धनचा राग आणि त्याचा निश्चय बघून मनात त्यांना हर्षवर्धनबद्दल आशेचा किरण दिसला. हा कारण प्रखर झाला तर सगळीच समस्या सुटेल हेही त्यांच्या लक्षात आलं. आता त्या किरणाचा सूर्य प्रकाश कधी होतो याची त्या वाट बघू लागल्या.
---------------------------------------------------------
क्रमशः
लेखिका…मीनाक्षी वैद्य