Kamini Traval - 38 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग ३८

Featured Books
Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३८

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३८

प्राची आता जरा सावरलेली दिसत होती.पण अजून तिच्या मनात गोंधळ होताच. ऑफीसमध्ये जायची तिला इच्छा होत नव्हती.

आज कामीनी बाईंनी तिला घरीच रहा म्हटलं. हर्षवर्धनला कळत नव्हतं किती दिवस प्राची घरात राहणार आहे? ऑफीसमध्ये एकट्याने जाऊन सगळं मॅनेज करणं त्याला कठीण जात होतं. म्हणून तो कामीनी बाईंना म्हणाला.

"आई प्राची किती दिवस घरी थांबणार आहे? ऑफीसमध्ये सगळं तिच्या निर्णयावर अवलंबून असतं."

हर्षवर्धनचा चेहरा बघून कामीनी बाईंना त्याचा राग आला.

" हर्षवर्धन अरे प्राची ची अवस्था काय झाली आहे बघतोस नं तू. तू घे पुढाकार.ऑफीसमध्ये जे निर्णय घ्यायचे तू घे."

" मी…? "

" मग काय झालं? तूही या ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालक आहेस. तुलाही लक्ष घालावं लागेल व्यवसायात. किती दिवस तू प्राचीवर अवलंबून राहणार? जरा धाडस कर. हिम्मत दाखव. तन्मय अजून लहान आहे. "

कामीनी बाईंच्या लक्षात येतं की हर्षवर्धनचं लक्षच नाही.त्या हर्षवर्धनचा दंड धरून त्याला गदागदा हलवून म्हणाल्या.

"हर्षवर्धन मी काय म्हणतेय त्याकडे लक्ष आहे का तुझं? हर्षवर्धन…"

" काय...आई काय म्हणतेस?"

"हर्षवर्धन जरा लक्ष दे मी काय म्हणतेय. प्राचीला काही दिवस शांतता लाभू दे.किती राबली आहे ती. तुला लक्षात येतंय का? तुमचं लग्न झाल्यापासून एकही क्षण ती पोरगी स्वस्थ बसलेली नाही. तू कसा होतास. तुझ्यासाठी संसारातील सगळी सुखं नाकारली तिनी. फक्त एकच ध्यास होता तिला हर्षवर्धनला पुर्वी सारखं करायचं.

इतकी वर्ष एक दिवसही ती शांतपणे झोपली नाही. सतत तुझा विचार. सतत तुझ्याभोवती रिंगण घातल्यासारखं ती जगली. म्हणून आज तुझ्यात एवढी प्रगती दिसतेय. पण तुला तिनी घेतलेल्या कष्टांची जाणीव आहे असं वाटतं नाही मला.

तिला उभारी येईल असं काही तरी कर. पुढचे टूर आखणं, त्यांचं योग्य नियोजन करणं हे कर. जरा हिम्मत दाखव. मी आणि प्राची तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आज प्राचीशी बोल तिला बरं वाटेल असं‌ वाग."

" हो.विचारतो."
हर्षवर्धन जरा गोंधळातच बोलतो.

"आधी जा प्राचीशी बोल."
कामीनी बाईं कणखर आवाजात बोलल्या.
.

हर्षवर्धन हळुहळू जरा घाबरतच प्राचीच्या खोलीत शिरला.

प्राची एका कुशीवर झोपली होती. तिचे डोळे बंद होते पण तिचं डोकं मात्र विचार करून दमलेलं होतं.तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं.

हर्षवर्धन तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला आणि तिला हाक मारली.

" प्राची कशी आहेस."

प्राचीने हळूच डोळे उघडून बघतलं. हर्षवर्धन समोर उभा असतो. प्राचीने एक क्षण त्याच्याकडे बघून पुन्हा डोळे मिटले.

"प्राची कसं वाटतंय तुला? "

प्राचीच्या उत्तराची तो वाट बघत होता. प्राची एक शब्द बोलत नाही. तिला हर्षवर्धनचं तिथे असणंपण नको वाटत होतं. ती त्याच्याकडे पाठ करून झोपली. थोडावेळ हर्षवर्धन तिथे थांबला नंतर पाय न वाजवता खोलीबाहेर निघून गेला. प्राची त्याला पाठमोरी बघत होती. तिच्या डोळ्यातून पाणी काही थांबत नव्हत.

प्राचीच्या मनात येतं

" देवा कधी हा माणूस शहाणा होणार? याच्यासाठी माझं पूर्ण आयुष्य दिलं पण याला त्याची जाणीव आहे की नाही? कधीतरी याने पुढाकार घ्यावा. टूरची पूर्ण जबाबदारी घ्यायला कधीतरी हिम्मत दाखवुन पुढे यावं.

जेव्हा हा या जगात नव्हता म्हणजे नशेच्या विळख्यात अडकला होता तेव्हा मी सुध्दा या ट्रॅव्हल्सच्या क्षेत्रात नवीन होते तरी मी हिम्मत केली. व्यवसाय आणि हर्षवर्धनचं आयुष्य रांगेला लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझं वय लहान होतं. मला कुठले व्यवसायातील आर्थिक गणीतं माहिती होती.

तेव्हा माझ्याबरोबर कोण होतं? फक्त आई होत्या. त्यांच्या पाठींब्यामुळे मी हे सगळं करू शकले.आता हर्षवर्धनला स्वतःलाच काही करायची इच्छा नाही का? जे चाललंय त्यात त्याला कुठेही धक्का पोचत नाही. कसला ताण येत नाही. हेच आता त्याला योग्य वाटायला लागलं का?

असं असेल तर मात्र मला विचार करावा लागेल. आयुष्यभर या ताणाखाली मी नाही राहू शकणार. काय नेमकं चाललंय हर्षवर्धनच्या मनात यांचा छडा लावलाच पाहिजे. ते कळल्यावर मग निर्णय घ्यायला हवा."

एवढ्या विचारांच्या आक्रमणामुळे प्राचीचं डोकं दुखणं अजून वाढलं.तिला इतकं गळल्यासारखं वाटतं होतं की अंथरूणावरून ऊठूच नाही असं तिला वाटत होतं.

***

हर्षवर्धन प्राचीच्या खोलीतून बाहेर पडला.त्याचा चेहरा बघून कामीनी बाईंनी त्याला विचारलं

"कायरे प्राची काय म्हणाली?"

हर्षवर्धन समोरच्या खोलीत सोफ्यावर जाऊन बसला. त्याच्या या कृतीने त्यांना काहीच कळत नव्हतं.त्यांनी पुन्हा विचारलं

"अरे मी काय विचारतेय प्राची काय म्हणाली?"

हर्षवर्धन एक नाही न दोन नाही. आता मात्र कामीनी बाई तडकल्या.त्या तरातरा त्यांच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या.

" हर्षवर्धन मी तुला काही विचारतेय. लक्ष आहे का तुझं?"

" काय म्हणालीस?"

हर्षवर्धनचा निर्विकार चेहरा बघून त्यांना आता हर्षवर्धनचीच काळजी वाटायला लागली. त्या हर्षवर्धनजवळ जाऊन बसल्या.त्यांनी विचारलं

" हर्षवर्धन मला सांग काय झालं? प्राची काय म्हणाली?"

हर्षवर्धन काहीच बोलला नाही कामिनी बाईना आता त्याची खूपच काळजी वाटायला लागले आत्तापर्यंत प्राची कशी हिंमतवान आणि धाडसी होऊन काम करत होती म्हणून कामीनी बाई शांत होत्या पण हर्षवर्धन अजूनही पूर्वीसारखा नॉर्मल झालेला नव्हता म्हणजे आता काय करायचं हे त्याला कळतच नव्हतं.

त्यांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन ला विचारल

"हर्षवर्धन अरे काय झालं? काय म्हणाली प्राची तुला? मला सांग सगळं."

तेव्हा तो कामिनी बाईंकडे बघुन म्हणाला,

"मला कळत नाही काय झालंय प्राचीला. माझ्यासाठी तिनं खूप केलं हे मला माहिती आहे. पण मी काय करू शकतो? मला अजून तेवढी हिम्मत नाही आली ग खूप मोठे निर्णय घेण्याची. प्राची किती पटपट निर्णय घेते. कुठल्याही प्रसंगात ती पटकन धाडसी पाऊल उचलते. पण मला नाही जमत ग आई ती करते तसं करायला.मी कसं करू मला त्याची चिंता वाटते. तिला असं वाटत असेल की मी अजून पूर्वीसारखा नॉर्मल नाही झालो म्हणजे माझ्या वयाचा माणूस जितकं काही करू शकतो तसा मी नाही करू शकत. पण काय करू ग आई मी तूच सांग."

असं म्हणून हर्षवर्धन कामीनी बाईंच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला. कामीनी बाईं आता पेचात अडकल्या. एकीकडे प्राचीची ही उद्विग्न अवस्था तर दुसरीकडे हर्षवर्धनची अशी नाजूक मनोवस्था. कामीनी बाई त्याला म्हणाल्या,

"हर्षवर्धन तू थोडी हिंमत कर आणि एक पाऊल पुढे टाक. समजा चुकलं तरी चालेल पण तू धाडस करणं महत्वाचं आहे. मी आणि प्राची दोघी तुझ्या पाठीशी आहोत. तुझ्या बाबांची तब्येत सध्या नाजूक असल्याने त्यांना सोडून मी कुठेही जाण्याची कल्पना करू शकत नाही. मग आता काय करायचं? तूच विचार कर आणि पुढे हो."

कामीनी बाईं हळुवारपणे हर्षवर्धन च्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या. आणि पुढे म्हणाल्या

"हर्षवर्धन प्राची खूप थकली आहे. तिनी किती कष्ट घेतले आहेत हे तुलाही माहीत आहे. आता बाबांमुळे मी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम बघू शकत नाही. तन्मय काहीतरी करत असला तरी तो लहान आहे. संदीप आणि यादव अनुभवी कामगार आहेत आपल्याकडे. यादव,संदीप आणि आम्ही दोघी तुझ्या पाठीशी आहोत. पण तू थोडीशी हिम्मत कर. तू टूरचं नियोजन कर. तू एक पाऊल पुढे टाक मग आपोआपच सगळं नीट होईल.
प्राचीच्या मनावरचं ओझं नाहीसं होईल. तू पुढे जातोयस, काहीतरी करण्याची इच्छा दाखवतोयस हे बघून तिलाही खूप आनंद होईल. ती आपोआप या सगळ्या अस्वस्थ मन: स्थितीतून बाहेर पडेल." हळुवारपणे त्याच्या डोक्यावर कामीनी बाई कुरवाळत म्हणाल्या.

कामीनी बाईंनाही काही समजत नव्हतं. त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. त्यांनी त्या वाहू दिल्या.आणि हर्षवर्धनला शांतपणे धोपटायला सुरुवात केली.

हर्षवर्धनला आता या मनस्थितीतून बाहेर काढण्याची खरच आवश्यकता आहे असं कामिनी बाईंना वाटू लागलं होतं. प्राची आणि हर्षवर्धन दोघांचीही मन:स्थिती नाजूक होती. आता या दोघांना सांभाळून कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये पण काम सांभाळावं लागणार हे त्यांच्या लक्षात आलं. त्याचं फार विचार करून नियोजन करावं लागणार होत.

सध्यातरी कामीनी बाईंच्या नजरेसमोर अंधारच होता. कुठली दिशा त्यांना सध्यातरी दिसत नव्हती. त्यांना मार्ग शोधावा लागणार होता. ते कसं करायचं यावरच त्यांच्या डोक्यात विचार चालू होते. हर्षवर्धन गोंधळलेलाच बसला होता. प्राचीसुद्धा मरगळलेल्या अवस्थेत होती.

देवाची आळवणी करत कामीनी बाईंनी हळूच हर्षवर्धनचं डोकं आपल्या मांडीवरून खाली ठेवलं आणि त्या आपल्या कामात गुंतल्या.

***

वासंतीने अशोकला कामीनी बाईं फोनवर काय म्हणाल्या ते सांगितलं.प्राचीच्याबद्दल सांगीतलं.

"अहो प्राचीला भेटून यायला हवं.कशानं पोरं एवढी हळवी झालीय कळत नाही.आपण जाऊया. तिच्याशी बोलूया.बघू काय टोचतय तिच्या मनाला.एवढी धीट मुलगी एकदम काय झालं तिला ते बघायलाच हवं."

"हो तू म्हणतेस ते बरोबर आहे. तसंही आपल्याला भय्यासाहेबांची तब्येत बघायला जायचं होतं. जाऊनच येऊ. एवढी शहाणी मुलगी अशी का झाली हे बघावच लागेल. मी म्हणतो ऊद्याच जाऊन येऊ या.,"
अशोकच्या या म्हणण्यावर वासंती होकारार्थी मान हलवते.
--------------------------------------
क्रमशः
लेखिका --- मीनाक्षी वैद्य