कामीनी ट्रॅव्हल्स पर्व ३६
हर्षवर्धनच्या मनात काय चालू आहे हे बघू या भागात
भय्यासाहेबांची तब्येत आता ठीक आहे असं आत्ताच प्रदीपने फोनवर आपल्याला सांगीतलं मग आई का एवढी घाबरली? प्राचीने आईला भय्यासाहेबांबद्दल सांगीतली असेल तरी आई का एवढी थकलेली दिसतेय?
हर्षवर्धनला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं.त्याने
प्राचीला विचारलंच,
" प्राची तू आईला भय्यासाहेबांची तब्येत ठीक असल्याचं सांगितलं नाहीस का?"
" सांगीतलं."
" मग तरी आई एवढी थकल्यासारखी का दिसतेय. एवढी घाबरली? खरं काय आहे ते मला सांग. प्लीज इतरांसारखं मला वाढवू नकोस."
हर्षवर्धनला इतकं अस्वस्थ आणि गडबडलेला बघून प्राचीने त्याला शांत करत म्हटलं,
" हर्षवर्धन घाबरू नकोस.आई ठीक आहेत."
" मला बुद्धी नाही असं तुला वाटतं का?"
हर्षवर्धनने हे बोलताच प्राची चमकली.तिला कळेना हर्षवर्धनच्या डोक्यात हे खूळ कुठून आलं?
" हर्षवर्धन तुला असं का वाटतंय?"
" तुला काय सगळ्यांनाच वाटत.तू हुशार आहेस.मी मात्र कमी डोक्याचा आहे."
हर्षवर्धन हाताच्या मुठी आवळून म्हणाला. त्याचं हे वागणं, बोलणं म्हणजे त्याच्या मनातील फ्रस्ट्रेशन आहे हे प्राचीच्या लक्षात आलं.
प्राचीने कामीनी बाईनी विश्वासच्या घरी जाऊन त्याला कसं झापलं ते सांगीतलं.
" काय! आईने विश्वासला झापलं?"
" हो.त्यावेळी त्यांना जो राग आलेला होता.त्यामुळे त्याचा थकवा त्यांना आला." प्राचीने शांतपणे उत्तर दिलं.
" आईने कशाला जायचं त्या विश्वासकडे? तिथे त्याने काही केलं असतं तर?"
" हर्षवर्धन विश्वासने त्याच्या घरी काही केलं नसतं.त्याच्या बायकोला त्यांचे हे उद्योग माहिती नाही.तो घरात सभ्य माणसासारखा वावरतो."
" तरी आईने जायला नको होतं. किती थकली आहे."
" हे बघ हर्षवर्धन तुला असं वाटतंय की आईने जायला नको होतं पण आईंच्या साठी जे झालं ते उत्तम झालं.त्यांच्या मनातील राग पूर्ण पुणे बाहेर पडल्याने त्यांची तब्येत चांगली राहील.त्यांच्या या बोलण्याने विश्वासला वचक बसला कारण आईंमुळे त्याच्या बायकोला त्यांचे उद्योग कळले. तू घाबरू नकोस.आई दोन दिवसात ठीक होतील."
हर्षवर्धनचा हात हातात घेऊन,तो हळूच थोपटत प्राची म्हणाली.
हर्षवर्धनच्या मनाचं फारसं समाधान झालेलं नाही हे प्राचीला कळलं पण ती शांत बसली. हर्षवर्धनला सावरण्यासाठी वेळ द्यायला हवा हे प्राचीच्या लक्षात आलं.
***
भय्यासाहेबांना घरी येऊन दोन दिवस झाले होते.पण अजूनही त्यांना थकवा वाटत होता. त्यांना कमीतकमी महिनाभर तरी विश्रांती घ्यायला डाॅक्टरांनी सांगितलं होतं.स्वत:चं काम करताना त्यांना श्रम होऊ नये म्हणून प्राचीनी एक केयरटेकर ठेवला होता.
आता कामीनी बाई पण ब-या होत्या.
आज सकाळी राधाची ऑफीसची जागा बघून कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये जावं असं प्राचीनी ठरवलं होतं.त्याप्रमाणे ती निघाली.
राधाच्या ऑफीस जवळ प्राची पोचताच राधाला बरं वाटलं.
" आलीस बाई खरोखर.तू येईपर्यंत मला खरं वाटत नव्हतं."
राधा म्हणाली.
"अगं आज आधी तुझ्या ऑफीसमध्येच यायचं ठरवलं. माझ्या ऑफीसमध्ये मी एकदा गेले की मला वेळच मिळत नाही. चल जागा बघू "
प्राची म्हणाली तसे तिघं आत जातात.
" छान आहे जागा.पण तुला इंटीरियर करून घ्यावं लागेल." प्राची म्हणाली.
" हो ते करणारच आहे. एका इंटीरियर माणसाशी झालंय बोलणं. तो ही जागा पण बघून गेलाय."
राधानी सविस्तर सांगितलं.
" हं हे बरं केलंस.कधीपासून करतोय सुरवात?"
" जागेचं फायनल डील झाल्यावर."
" म्हणजे तू अजून जागा घेतलीच नाहीस?"
प्राची नी आश्चर्याने विचारलं.
" नाही.तू कुठे जागा अजून फायनल केली होतीस."
" अरे देवा!"
प्राचीने आपल्या कपाळावर हात मारला.
"राधा अगं इतकी कशी तू? मला जर वेळच नसता झाला तर …?"
"तसं काही झालं नाही नं! आलीस तू जागा बघायला. आता फायनल झाली.पुढच्या आठवड्यात जागा आपल्या ताब्यात येईल."
राधानी आनंदानी सांगितलं.
"शशांक अरे हिला काही समजव..कसला वेडेपणा करते ही."
थोडीशी वैतागूनच प्राची बोलली.
"अगं प्राची मलापण तुझा ग्रीन सिग्नल हवा होता या जागेसाठी.मग मी राधाला काय समजावणार?"
"मला नं तुम्हा दोघांच्या बोलण्यावर हसावं की रडावे तेच कळत नाही."
प्राची निघणार तेवढ्यात तिला प्रदीपचा फोन येतो. शंकरककांना हार्ट अटॅक येतो म्हणून हार्ट केयर सेंटरमध्ये ॲडमीट केलय असं प्रदीप प्राचीला सांगतो आणि रडू लागतो.
"प्रदीप रडू नको.मी लगेच पोहचते आहे दवाखान्यात."
" राधा ही निघते.आमचे ड्रायव्हर शंकर काकांना हार्ट अटॅक आला आहे.त्यांना दवाखान्यात ॲडमीट केलय.मला जायला हवं."
" ठीक आहे.निघ तू.पण सावकाश जा.नंतर कळव."
" हो" म्हणत प्राची घाईने कारपाशी गेली.
" या प्राचीच्या मागे काय शुक्लकाष्ठ लागलंय कळत नाही."
राधा म्हणाली.
" खरंय.संकट बहुदा वाटच बघत असतात कधी प्राचीच्या आयुष्यात धडकआयचं याची."
" प्राचीचं लग्न झाल्यापासून तिला जराही उसंत मिळाली नाही."
" हं.प्राची आली आणि जागा बघून गेली म्हणून बरं झालं मी लगेच जागा फायनल केली म्हणून सांगतो."
" हो सांग.मी निघते.एवढ्या वेळात तो क्लायंट चौधरी घरी पोचला असेल.मला उशीर झाला तर कटकट करेल.त्याला सगळ्या मुलांची घाई असते."
" ठीक आहे.तोक्लायंट आपला अन्नदाता असतो.त्याच्यावर चिडून कसं चालेल? तू जा. मी ब्रोकरला भेटून येतो फोन करण्यापेक्षा."
शशांक म्हणाला आणि लगेच त्याच्या बाईकला किक मारून गेला.राधाही त्याच्या मागोमाग निघाली.
***
प्राचीने गाडीतूनच तन्मयला फोन लावला आणि ही बातमी सांगीतली. लगेच आजी आजोबांना सांगू नकोस असंही बजावलं. आज तन्मयला घरीच थांबायला सांगते.
प्राची दवाखान्यात पोचली. प्रदीप खूपच अस्वस्थ असतो. त्याची आईपण तिथेच असते. त्यापण खूप घाबरलेल्या दिसत होत्या आणि ते स्वाभाविक होतं.
"प्रदीप डाॅक्टर काय म्हणाले?"
"बहात्तर तास तर ते बघणार आहेत. काल रात्री जेवण वगैरे झाल्यावर नेहमीसारखं त्यांनी शतपावली केली आणि झोपायला गेले. मध्यरात्री त्यांच्या विचीत्र आवाजानी आईला जाग आली. तिनी बाबांना असं बघीतल्यावर मला उठवलं.आम्ही ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलावली. बाबांना इथे घेऊन आलो."
प्रदीपचा चेहरा पार उतरला होता. नेहमी हस-या चेह-यानी वावरणारा प्रदीपच्या मनावर आज मणामणाचं ओझं होतं.
" तू काळजी करू नकोस.तुम्ही पहाटे पासून इथे आहात नं? प्रदीप तू काकूंना घरी घेऊन जा. फ्रेश होऊन या. तोपर्यंत मी इथे थांबते"
" नको ताई घरी लक्ष लागणार नाही. मी इथेच थांबतो."
" हो ग पोरी घरी जावसंवाटत नाही."
उदाहरणे प्रदीपचाच आई म्हणाली.
" मला कळतंय काकू.पण तुम्हाला मधूमेय आहे.तुम्ही वेळेवर खायला हवं. तुमचीपण तब्येत बिघडली तर प्रदीपला दोन दोन पेशंटचं बघावं लागेल. घरी जाऊन फ्रेश व्हा. खाऊन मग पुन्हा या. मी आहे नं. डाॅक्टरांचा राऊंड झाला तरी मी बोलेन त्यांच्याशी."
प्राचीनी दोघांनाही समजवायचा प्रयत्न केला.
शेवटी दोघं तयार झाले घरी जायला.
"प्रदीप माझी कार घेऊन जा."
प्राची कारची किल्ली प्रदीपला देत म्हणाली.
"नको ताई आम्ही जाऊ रिक्षांची."
" किल्ली घे आणि कारनी जा.आत्ता मला कुठेही जायचं नाही."
प्राची जबरदस्तीनी प्रदीपला कार घेऊन जायला लावते.
प्रदीप गेल्यावर तिथल्या खुर्चीवर बसत प्राची डोळे मिटले. तिला एकामागून एक येणा-या संकटांचा काही ताळमेळच लागतं नाही.
त्या विश्वासच्या पायांनी सध्या संकटचसंकटं येतात आहे.
शंकरकाका जरी ड्रायव्हर म्हणून भय्यासाहेबांकडे काम करत होते तरी ते आता पटवर्धन कुटूंबाचे एक सदस्यच झाले होते.
त्यांच्या दवाखान्याच़ बील आपणच द्यायचं हे प्राची मनाशी पक्कं ठरवते.
किती वेळ ती या विचारात होती कुणास ठाऊक.तिचा फोन वाजल्यामुळे ती भानावर आली. फोन प्रदीपचाच होता.
"ताई घरी येईपर्यंत आईची शुगर खूपच कमी झाली होती. बघीतली तर पन्नास पर्यंत होती. म्हणून लगेच साखर दिली. पण अजूनही साखर वाढत नाही. तुम्ही दवाखान्यात थोडावेळ थांबू शकाल का?"
प्रदीपच्या आवाजात काळजी भरलेली प्राचीला कळली.
" अरे विचारतोस काय? थांबणार आहे.काकूंना हा त्रास होऊ शकतो हे लक्षात आल्यामुळेच मी त्यांना घरी पाठवलं. तू अजीबात काळजी करू नकोस. मी आहे इथे. काकूंना बरं वाटलं की मग ते तू."
" हो ताई.तुमचा किती आधार वाटतो आम्हाला."
प्रदीप गहिवरून हे बोलला.
" प्रदीप आता इतक्या वर्षांनी पटवर्धन आणि पाटेकर कुटुंब एकच झाल्यासारखं झालंय. तू फार ताण घेऊ नकोस. शंकरकाका बरे होणार आहेत."
प्रदीपशी बोलणं झाल्यावर प्राची कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये फोन करून आज ती येऊ शकणार नाही हे सांगते.
प्राची स्वस्थ बसलेली दिसत होती पण मनानी मात्र स्वस्थ नव्हती. ऑफीसमध्ये संदीप आणि यादव खूप प्रामाणिकपणे काम करत आणि इतक्या वर्षांपासून ते दोघंही कामीनी ट्रॅव्हल्स बरोबर काम करत असल्याने प्राचीला खूप बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालावं लागत नसे.
हे सगळं असलं तरी तिची एक बाजू लंगडीच होती. ती म्हणजे हर्षवर्धन. हर्षवर्धनचा कोणत्याही प्रसंगात पाठिंबा नसायचा. तोच स्वतःच्या आयुष्यात अजूनही गोंधळलेलाच असतो मग तो काय प्राचीला पाठिंबा देणार?
संदीप आणि यादव जरी प्रामाणिक असले तरी तिला सतत सावध आणि खंबीर रहावं लागत असे. म्हणून तन्मयनी लवकर ऑफीसमध्ये काम करायला लागावं आणि ब-याच गोष्टी आत्मसात कराव्यात असं प्राचीला वाटत होतं.
असं झालं तर प्राचीच्या डोक्याला खूप शांतता मिळणार होती.
" मॅडम मी काही औषध आणि इंजक्शन आणायची आहेत."
नर्सच्या आवाजांनी प्राचीची तंद्रीत भंगली आणि तिनी डोळे उघडले.
नर्सनी तिचं वाक्य पुन्हा म्हटल्यावर प्राची पटकन उठली आणि तिने नर्सच्या हातातलं प्रिस्क्रीप्शन घेतलं.
" डाॅक्टरांचा राऊंड कधी आहे.?"
प्राचीनी नर्सला विचारलं.
"अर्ध्या तासांनी डाॅक्टर येतील. त्याआधी ही औषधं आणि इंजक्शन आणून द्या."
नर्स म्हणाली.
" हो."
प्राचीनी उत्तर दिलं आणि ती औषधं घ्यायला तळमजल्यावर दवाखान्याच्या औषधांच्या दुकानात गेली.
***
प्राचीनी आणलेली औषधं त्या नर्सला दिली आणि मघाच्याच खुर्चीवर ती बसली. आजपर्यंत प्राची रिकामी कधीच बसली नव्हती. मुद्दाम स्वतःला ती कामात बुडवून घ्यायची.
लग्नं झाल्यापासून ती अशी शांत बसूच शकली नव्हती. एकीकडे भय्यासाहेब आणि दुसरीकडे हर्षवर्धन या दोन विचीत्र लोकांना सांभाळत जगण्यात तिची खूप शक्ती खर्च झाली होती.
कधी कधी तिला वाटायचं की माझ्या नशीबात एवढा झगडा का देवाने लिहीला? मी कंटाळून, चिडून हा संघर्ष केला नाही. प्रत्येक वेळी निधडेपणानी सगळे वार झेलले तरी जीवनसाथी हर्षवर्धनची बाजू अजुनही लंगडीच आहे. भय्यासाहेब सुधारले पण माझा संघर्ष कुठे थांबलाय? तो चालूच आहे.
सतत इतरांना मदत करण्यासाठी धडपडते पण हर्षवर्धनची गाडी रूळावर आणावी असं देवाला का कधीच वाटलं नाही.शेवटपर्यंत मी हाच संघर्ष करत जगायचं का?
मला जो त्रास भोगावा लागला त्याने एक शिकले दुसरा कोणी त्रासात असेल तर त्याला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. हे नुसतंच मला वाटलं नाही तर तेच मी करत आले अद्याप ही करतेय. पण त्याने माझ्या संसाराच्या गाडीचं एक चाक अजूनही चिखलातून वर आलेलं नाही. ते अजून तसंच रूतून बसलय.
प्राचीच्या मिटल्या डोळ्यातून घळघळ अश्रू वहात होते. आपण दवाखान्यात आहोत याचं तिला भान राहिलं नाही.
मघाच्याच नर्सनी तिला हाक मारली
" मॅडम डाॅक्टर राऊंड वर आलेत.तुमच्या पेशंटबद्दल ते तुमच्याशी बोलतील."
तिच्या आवाजानी प्राचीनी डोळे उघडले.तिच्याकडे बघत नर्स म्हणाली
" मॅडम खुप टेन्शन घेऊ नका.रडू नका.तुमचा पेशंट बरा होईल."
किंचीत हसत, डोळे पुसत प्राची म्हणाली
"नाही घेत टेन्शन. पण थोडं दडपण आलंय"
त्या नर्सला ती खरं थोडीच सांगणार होती. प्राची उठून वाॅशरूमकडे गेली.
चेहरा गारपाण्याचे हबके मारून ठीक केला आणि दीर्घ श्वास घेऊन स्वतःच्या मनावर कंट्रोल आणला.नंतर वाॅशरूमच्या बाहेर आली.
***
थोड्यावेळाने डाॅक्टरांनी प्राचीला केबीन मध्ये बोलवलं.
पेशंट बद्दल माहिती सांगून म्हणाले…
_________________________________
क्रमशः
काय म्हणाले डाॅक्टर प्राचीला? बघू पुढील भागात.
लेखिका – मीनाक्षी वैद्य
कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३७
अजून अठ्ठेचाळीस तास आपण त्यांच्यावर लक्ष ठेऊया.
सध्या त्यांना झोप लागेल असंच बघतोय.फार विचार त्यांच्या डोक्यात नको यायला. यांचा मुलगा कुठे आहे?""
प्राचीने त्यांना काकूंच्या तब्येतीबद्दल सांगीतलं.
"" होका मग त्यांना आता दवाखान्यात आणू नका.त्यांनाच त्रास होईल.ठीक आहे लवकरच बरे होतील.""
प्राची केबीन बाहेर पडली आणि तिने प्रदीपला फोन करून सांगितलं.
***
प्राचीचं डोकं आणि मन शांत रहाणार नव्हतं.पुन्हा विचार सुरू होतील म्हणून ती दवाखान्याच्या कॅन्टीन मध्ये काॅफी घ्यायला गेली.स्ट्राॅंग काॅफीमुळे डोक्यात चाललेल्या जुन्या प्रसंगांची आवर्तनं थांबतील असा कुठेतरी तिला विश्वास होता.
या विचारांनी तिचं डोकं फुटायची वेळ आली होती.याला जबाबदार राधाचं बोलणं होतं.प्रदीपचा फोन आल्यावर तो कशासाठी आला हे राधाला कळलं तेव्हा ती पटकन म्हणून गेली.
"" प्राची संकटांना काय तूच दिसतेस का? तू त्या संकटांची खूप छान खातीरदारी करते असा बहुदा त्यांचा समज झालाय.घरचं झालं थोडं आणि ही बाहेरची संकट तुझ्यावर येऊन आदळतात आहे. काय म्हणावं तुझ्या नशीबाला!""
"" काहीतरी काय बोलतेस?"" असं थट्टेवारी घेत प्राची निघाली होती.पण मघापासून हाच विचार डोक्याला छळत होता.
प्राचीनी स्ट्राॅंग काॅफीची ऑर्डर दिली.
-----------------------------------------------------------
क्रमशः
लेखिका --मीनाक्षी वैद्य