Kamini Traval - 29 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग २९

Featured Books
Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग २९

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २९

काही वर्षांनंतर…

कामीनी ट्रॅव्हल्स आता ट्रॅव्हल्सच्या क्षेत्रात सिनीयर झाली होती. निसर्ग नियमानुसार सगळ्यांची वयं वाढली होती. भय्यासाहेब ऐंशीच्या घरात होते तर कामीनी बाई त्यांच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असल्या तरी त्याचीही पंच्याहत्तरी झाली होती.

हर्षवर्धन पन्नाशीच्याजवळ पोचला होता आणि प्राची पन्नाशीच्या आत होती. प्राची हर्षवर्धनचा मुलगा तन्मय आता पंधरा वर्षांचा होता.लग्नांतर बरेच वर्षांनी प्राची हर्षवर्धन आई-बाबां झाले होते.

प्राचीच्या बाबांनी दोन वर्षापूर्वी कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये येणं सोडलं होतं. त्यांचही वय झालं होतं. तन्मय यंदा दहावीच्या वर्गात होता. त्याचा अभ्यास, त्याच्या ट्युशन त्याचे मित्र या सगळ्यात म्हणजे तन्मयच्या जगात त्याचे आजी आजोबा म्हणजे भय्यासाहेब आणि कामीनी बाईं जातीनं लक्ष देत होते.

प्राची आणि हर्षवर्धन कामाच्या व्यापात व्यस्त असत पण तन्मयसाठी त्यांच्याकडे भरपूर वेळ होता. जे आपण भोगलं त्याची धग आपल्या मुलाला लागू नये यासाठी हर्वर्धनचा प्रयत्न असे. तन्मयच्या सगळ्या गोष्टीत तो लक्ष देण्याचा प्रयत्न करीत असे.

तन्मय तर दोन्ही आजी आजोबांच्या खूप लाडका होता. तन्मयलाही दोन्हीकडचे आजी आजोबा प्रिय होते. प्राचीनी तन्मयला कधीच हर्षवर्धनचे बाबा पूर्वी कसे होते हे सांगीतलं नाही. तिनीच काय कामीनी बाई आणि हर्षवर्धननेपण सांगीतलं नाही. तिघांच्या दृष्टीने ते आता तन्मयला सांगण्याची अजीबात गरज नव्हती.

मधल्या काळात भय्यासाहेब खूप बदलले होते. घर, बायको, मुलगा, सून यांचं महत्व त्यांना कळलं होतं. प्रत्येकाला त्याचा मान ते द्यायला शिकले होते त्यामुळे घरात आनंद होता आणि घरातील लोकांच्या मनामध्ये आनंद झिरपत होता.

कामीनी ट्रॅव्हल्सचा पसारा आता खूप वाढला होता. पुण्यात मुख्य शाखा होती तर मुंबईत दोन नाशिकला एक तर नागपूरला एक शाखा कार्यरत होती. आता कामीनी ट्रॅव्हल्स मध्ये काम करणा-यांची संख्यापण वाढली होती. पुर्वीसारखं आचारी बरोबर घेऊन जावं लागत नसे.

हाॅटेलमध्ये प्रवाश्यांना उतरवता येत असे. कामीनी बाई आता पुर्वी सारख्या टूरवर जात नसतं. कारण आता प्रत्येक टूरबरोबर एक टूरलिडर असे ,गाईड असे. कामीनी ट्रॅव्हल्सचा आता दबदबा चांगलाच वाढला होता. ऊत्तम ट्रॅव्हल कंपनी म्हणून पर्यटन विभागाकडून तिनदा पुरस्कारपण मिळाला होता.

प्राची आणि हर्षवर्धन पुरस्काराच्या पाठीमागे धावणारे नव्हते. प्रत्येक प्रवासी पहिल्यांदा कामीनी ट्रॅव्हल्स बरोबर आला तर तो कायमचा कामीनी ट्रॅव्हल्सशी कसा जोडल्या जाईल याचा विचार प्राची करत असे.

याविषयी तिनी टूरवर जाणा-या आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला समजावून सांगीतलं होतं.आपल्याकडे कामीनी ट्रॅव्हल्स चे कर्मचारी जातीनं लक्ष देत आहेत हे प्रवाश्यांना कळलं पाहिजे.तरच ते कामीनी ट्रॅव्हल्स बरोबर नेहमीसाठी जोडल्या जातील.
***

भय्यासाहेब तन्मयला खूप वेळ देऊ लागले होते. हर्षवर्धनच्या बाबतीत त्यांच्याकडून जे दुर्लक्ष झालं होतं. ते आता तन्मयच्या बाबतीत होऊ नये असं त्यांना वाटायचं.थोडक्यात तन्मयमध्ये ते पंधरा वर्षांच्या हर्षवर्धनला शोधायचे. त्यांचं तन्मयसाठी धडपडणं बघून कामीनी बाईंचे डोळे भरुन येत. त्यांना भय्यासाहेबांची धडपड का चालली आहे ते कळायचं.

पूर्वी आपला नवरा असा बदलेल असं कामीनी बाईंना स्वप्नातही वाटलं नव्हतं.आज ते घडलंय. त्यांना पूर्वी न भेटलेला प्रेमळ नवरा आज कामीनी बाईंना त्यांच्या हक्काचं प्रेम सव्याज परत करत होता. त्या भय्यासाहेबांकडे बघूनही मनोमन रोमांचित होत असतं. तरूणपणी न मिळालेल्या प्रेमानी आता या वयात त्यांना पुरेपूर चिंब भिजवलं होतं.

प्राचीला आपल्या सासूमध्ये होतं असलेला बदल दिसत होता. त्यामुळे तिला आनंदच झाला होता. प्राचीनी तिच्या लग्नाच्या वेळी आपल्या सासूची जी घुसमट बघीतली होती तिचा उलगडा तिला लग्न होऊन या घरात आल्यावर झाला. तशी ती मनोमन हादरली होती. तेव्हाच तिनं ठरवलं होतं की भय्यासाहेबांच्यात बदल करायचा.आपल्या सासूला तिचं हक्काचं प्रेम मिळवून द्यायचं.

प्राचीनी मनापासून प्रयत्न केले.शेवटी तिच्या प्रयत्नांना यश आलं.भय्यासाहेबांनी शेवटी आपली चूक कबूल करून कामीनी बाई,हर्षवर्धन,आणि प्राचीला आपलं कुटुंब म्हणून स्विकारलं.

तन्मयशी बोलताना, वागताना भय्यासाहेब हर्षवर्धनचं पौगंडावस्थेतील वय तन्मय मध्ये शोधतात हे प्राचीच्या सुद्धा लक्षात आलं होतं. हर्षवर्धनकडे जसं दुर्लक्ष झालं तसं होऊ नये याची काळजी भय्यासाहेब घेत होते. तन्मयचं प्रत्येक वाक्य लक्ष देऊन ऐकत असत.

तन्मयनी भय्यासाहेबांना बाहेर चला म्हटलं की तेही आनंदानी तयार होत. तन्मयच्या मित्रांना भय्यासाहेब फार आवडायचे कारण ते त्या मुलांमध्ये त्यांच्या वयाचे होऊन जातं असत. त्या मुलांसारखी मस्ती करत असत.तन्मयचे मित्र भय्यासाहेबांना कधी कधी काही प्रश्न विचारत तेव्हा त्यांचं अवघड वळणावरचं वय लक्षात घेऊन खूप छान पद्धतींनी उत्तर देत असत.

***

एक दिवस काॅफीचा कप घेऊन कामीनी बाई खोलीत गेल्या. भय्यासाहेब कुठलीतरी पुस्तक वाचत होते. काॅफीचा कप त्यांच्या हातात देऊन कामीनी बाईं म्हणाल्या

"तुम्ही तन्मय बरोबर किती रममाण होऊन जाता. खूप आवडतं ते तन्मयला."

"कामीनी मी आयुष्यात स्वतःच्या अहंकारामुळे हर्षवर्धनचं कोवळ वय त्याच्याबरोबरीनं जगलो नाही. तन्मयमुळे मला हर्षवर्धनचं लहान वय कळलय. हे क्षण आता मला हातून घालवायचे नाहीत.

तुझ्याशी पण मी खूप चुकीचा वागलो. सतत फक्त स्वत:चा विचार करत राहिलो. नात्यांमधला रेशीम बंध कधी कळलाच नाही आजपर्यंत."

बोलताना भय्यासाहेबांचा आवाज कातर झाला तशी कामीनी बाई लगेच म्हणाल्या.

"असूदे आता नको त्या जुन्या आठवणी. तुम्ही आता खूष आहात नं. हेच आम्हाला हवं आहे. मलासुद्धा तुमच्या प्रेमात उरलेलं आयुष्य घालवायचं आहे. नका फार विचार करू. एकदा हार्ट अटॅक येऊन गेला आहे तुम्हाला. सांभाळा स्वतःला."

कामीनी बाई म्हणाल्या.

दिवस काय कापरा सारखे उडून जात होते. तन्मय आणि भय्यासाहेब यांचं मेतकूट दिवसेंदिवस आणखी घट्ट होत चाललं होतं. भय्यासाहेब हर्षवर्धनशी आता मोकळेपणाने बोलत असत पण हर्षवर्धनलाच त्यांच्याबरोबर खूप बोलणं जमतं नसे. भय्यासाहेब हे जाणून होते त्यामुळे ते फार आग्रह करत नसत. अजूनही भय्यासाहेबांना नाही पण हर्षवर्धनला थोडा अवघडलेपणा येत असे. तो अवघडलेपणा जायला वेळच लागणार आहे हे भय्यासाहेब जाणून होते.

***

प्राची आणि हर्षवर्धनचा बराचसा वेळ ऑफीसमध्ये किंवा टूरमध्ये जाई. पुर्वीसारखं त्यांना प्रत्येक टूरबरोबर जावं लागतं नसे. अनुभवी गाईड होते,मॅनेजर होते. एकावेळी चार लहान मोठ्या टूर ते घेऊन जाऊ शकत. ऑफीसमध्ये बसून प्राची आणि हर्षवर्धन प्रत्येक टूरलिडरच्या संपर्कात असत.

कधीतरी एखाद्या टूरवर दोघांपैकी कुणीतरी जात.तन्मयकडे भय्यासाहेब आणि कामीनी बाईंचं लक्ष असायचं त्यामुळे प्राची आणि हर्षवर्धन निर्धास्त असायचे.तन्मयही शहाणा होता त्याला आपल्या आईवडलांचं काम नेमकं काय आहे हे माहिती होतं. त्यालासुद्धा ट्रॅव्हल्सच्या क्षेत्रात यायची इच्छा होती.

तन्मय एकदा प्राचीला म्हणाला सुद्धा

"आई मलापण ट्रॅव्हल्सच्या क्षेत्रात यायचं आहे."

यावर हलकसं हसून प्राची म्हणाली,

"तन्मय आधी दहावीची परीक्षा छान मार्कांनी पास हो.मग तुला घेता येईल या कोर्सला ॲडमीशन."

प्राचीनी हसतच त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

तन्मय मनात समजला आणि हट्ट न करता अभ्यासाला लागला. प्राचीला त्याचा प्रश्नं आवडला होता कारण हा व्यवसाय सांभाळायला तन्मय हवाच होता. तन्मयच्या मनात या व्यवसायात येण्याची इच्छा निर्माण झाली आहे तर त्याचा उपयोग आपण करून घ्यायला हवा हेही तिच्या लक्षात आलं.

***

त्यादिवशी भय्यासाहेबांनी हर्षवर्धनला काय विचारलं हे प्राचीला कळलं नाही पण तो जरा अस्वस्थच होता. खोलीत फे-या मारत होता. थोडा अंदाज घेत प्राची म्हणाली

" हर्षवर्धन काय झालं? भय्यासाहेब काही बोलले का?"

" नाही.त्यांनी विचारलं मला." हर्षवर्धन बोलता बोलताच गप्प झाला.

" हर्षवर्धन गप्प का झालास? काय विचारलं तुला भय्यासाहेबांनी?"

" त्यांना त्यांचं मृत्यूपत्र करायचंय."

हे बोलताना हर्षवर्धनचा आवाज थरथरला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

त्याचा हात हातात घेऊन प्राची हळूवार पुणे म्हणाली

"हर्षवर्धन एवढा अस्वस्थ नको होऊस. या वयात त्यांना त्यांच्याकडे असलेल्या इस्टेटीची सविस्तर माहिती देणं आवश्यक वाटत असेल."

"मृत्यूपत्र म्हटलं की धस्स होतं ग मनात. आत्ता कुठे ते माझ्याशी एक प्रेमळ बाबा म्हणून वागू लागले आहेत. किती वर्ष मी बाबांना शोधत होतो ते आत्ता मला मिळाले आहेत तर इतक्या लवकर त्यांचं छत्र माझ्या डोक्यावरून जावं असं नाही वाटत गं.""

"हर्षवर्धन मृत्यूपत्र केलं म्हणजे तुझ्या डोक्यावरचं छत्र जाईल असं नाही. ते त्याची योग्य ती व्यवस्था करून ठेवणार असतील. मृत्युपत्राकडे डोळसपणे बघ. हा विचार प्रत्येकाला त्याच्या उतारवयात करायला हवा.जे करत नाहीत त्यांच्या माघारी त्यांच्या कुटूंबामध्ये खूप वाद होतात. कुटूंबात असलेले चांगले संबंध बिघडतात. तुला सूद्धा माहिती आहे नं. कितीतरी अश्या भांडणाचे किस्से आपण ऐकतो, बघतो हे भय्यासाहेबांना होऊ नये असं वाटत असेल म्हणून ते मृत्यूपत्र करणार असतील. तू फार विचार करू नकोस."

"प्राची मला अजून खूप बोलायचं आहे ग त्यांच्याशी. तन्मयच्या वयाचा होऊन त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यांच्याकडून माझे लाड पुरवून घ्यायचे आहेत. आपल्या व्यवसायातले पुढचे प्लॅन त्यांना सांगायचे आहेत."

हर्षवर्धन कोलमडल्या सारखाच झाला.

त्याच्या पाठीवर थोपटत प्राची म्हणाली

"मृत्यूपत्र आणि आपल्या व्यवसायातील प्लॅन सांगणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हर्षवर्धन.दोन्ही गोष्टी एकात करू नको. तू भय्यासासेबांच्या बरोबर तुला जसं हवंय तसं वाग. त्यांच्याकडून एवढे वर्ष अपूर्ण राहिलेले तुझे लाड पुरवून घे.कदाचित तुझ्या आणि तन्मयच्या बरोबर राहून त्यांचा त्रास कमी होईल.त्रास कमी झाला,ते आनंदी राहिले तर ते काही वर्ष आपल्या बरोबर राहतील. कळलं मी काय म्हणतेय ते?"

हर्षवर्धनने हो म्हणून मान डोलावली.पण प्राचीला माहित होतं की हर्षवर्धन आता बराच वेळ याच विचारात राहील.

सगळेजण जेवणाच्या टेबलपाशी जमले पण हर्षवर्धन मात्र आला नव्हता.भय्यासाहेबांनी विचारलं तसं प्राची म्हणाली

"तुम्ही मघाशी मृत्यूपत्र करणार असं बोललात नं त्यामुळे तो थोडा अस्वस्थ झालाय.मी समजावलं त्याला पण माहिती नाही तो जेवायला येईल की नाही."

"मी घेऊन येतो त्याला."

असं म्हणून भय्यासाहेब त्यांच्या खोलीत गेले.कामीनी बाईंना अस्वस्थ झालेलं बघून प्राची त्यांना म्हणाली,

"आई घाबरू नका.काही गोष्टी सहन करण्याची हर्षवर्धनची ताकद अजून वाढलेली नाही म्हणून तो एवढा अस्वस्थ झालाय आणि इतकी वर्ष भय्यासाहेबां बरोबर त्याला आपल्या भावना व्यक्त करण्याची संधीच मिळाली नव्हती.आता ती मिळाली आहे आणि भय्यासाहेब लगेच मृत्यूपत्र तयार करण्याच्या गोष्टी करतात आहे. त्यामुळे तो जरा अस्वस्थ झालाय."

" हो मलाही कळतेय हर्षवर्धनची अवस्था. हे कसं समजावतात बघू."

दोघी शांतपणे हर्षवर्धन आणि भय्यासाहेब यांची वाट पहात जेवणाच्या टेबलावर बसल्या.

हर्षवर्धन अस्वस्थपणे येरझा-या घालत होता. त्याच्या खांद्यावर भय्यासाहेबांनी हात ठेवताच तो लगेच मागे वळला. भय्या साहेबांना बघून एकदम रडायला लागला.तसे भय्यासाहेबांनी चटकन त्याला मिठीत घेतलं.

"बाबा मला खूप बोलायचय तुमच्याशी. तुम्ही का घाई करताय मृत्यू पत्र करायची."

हर्षवर्धनने रडतच भय्यासाहेबांना विचारलं,

त्यांच्या पाठीवर प्रेमाने थोपटत भय्यासाहेब म्हणाले

" हर्षू अरे असा बावचळू नकोस."

हर्षवर्धनला त्यांच्या लहानपणी भय्यासाहेब हर्षू हाक मारत ते हर्षवर्धनला आठवलं.

" बाबा किती वर्षांनी हर्षू म्हणालात."

"होरे. मीपण बरीच वर्ष सगळं विसरलो होतो. मी मृत्यू पत्र केलं म्हणजे लगेच जाणार नाहीरे बाळा. मलापण तुझ्याशी खूप बोलायचं आहे. तुला माहिती आहे मी तन्मयमध्ये पंधरा वर्षांचा हर्षवर्धन शोधतो. बाळा खूप अन्याय झाला तुझ्यावर माझ्याकडून."
एवढंच भय्यासाहेब कसंबसं बोलू शकले. त्यांनी हर्षवर्धनला अजून घट्ट मिठी मारली.

खोलीच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या प्राची आणि कामीनी बाईंचं मन गदगदलं. प्राचीचे डोळे ओलावले तर कामीनी बाईंच्या डोळ्यातून धारा बरसू लागल्या. कामीनीबाईंसाठी ही बापलेकाची भेट मौल्यवान होती.

दोघी हळूच खोलीपासून लांब झाल्या आणि जेवणाच्या टेबलाजवळ येऊन बसल्या. थोड्यावेळाने भय्यासाहेब हर्षवर्धनला घेऊन आले. हर्षवर्धनचा चेहरा अजून ऊतरलेलाच होता.

सगळेजण मुकाट्याने जेवत होते. तन्मयचीच फक्त बडबड चालू होती.सगळ्यांना शांत बघून त्याला काहीतरी वेगळं वाटत होतं पण काय ते त्याला कळत नव्हतं म्हणून सगळ्यांना हसविण्यासाठी त्याची धडपड चालु होती.

जेवायला ते सगळे एकत्र बसले होते पण प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळ्या विचारांची आवर्तनं चालू होती. पानात वाढलेल्या पदार्थांची आज कुणी तारीफ केली नाही किंवा नावं ही ठेवली नाही. कारण कोणाचंच जेवणाकडे लक्ष नव्हतं. प्रत्येकजण दुस-यानी जेवावं,उपाशी राहू नये म्हणून स्वतः जेवत होता.

तन्मयला हे सगळं रोजच्यापेक्षा वेगळं आहे हे जाणवत होतं. सगळ्यांना हसवण्याची धडपड करून तोही दमला. शेवटी तोही न बोलता जेवायला लागला.

प्राचीला हर्षवर्धनचा हा मूड खूप दिवस राहतो का याची जरा चिंता वाटली. हर्षवर्धन पूर्वीपेक्षा खूप सुधारला होता पण मन अजून हळवं होतं. त्यात मृत्यूपत्र हा शब्दच त्याला रडवून गेला.

हर्षवर्धनला पुन्हा पहिल्या सारख्या आनंदी मूड मध्ये आणण्यासाठी काय करावं याचा ती विचार करू लागली.

सगळ्यांनी आज फक्त ऊदरंभरणं केलं होतं. मनापासून कोणी जेवलं नव्हतं. रोज जेवणाच्या टेबलावर हास्याची कारंजी उसळत असत. तन्मयच सगळ्यांचं टार्गेट असायचा.आज असं काहीच घडलं नव्हतं.

या प्रसंगावरून हर्षवर्धन किती हळव्या मनाचा झाला आहे याची भय्यासाहेबांना कल्पना आली.हर्षवर्धनची ही अवस्था त्यांच्यामुळेच झाली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. काहीही न सुचून ते उदासपणे खोलीत पलंगावर आडवे होऊन डोळे मिटून पडून राहिले. असा किती वेळ गेला माहित नाही. कामीनीबाई खोलीत आल्याचही त्यांना जाणवलं नाही.

भय्यासाहेबांच्या मिटल्या डोळ्यातून पाणी गळत होतं. ते बघून कामीनी बाईंना गलबलून आलं.त्या हळूच ऊलट्या पावली खोलीच्या बाहेर पडल्या आणि समोरच्या खोलीत सोफ्यावर विमनस्कपणे येऊन बसल्या. हर्षवर्धनचं मन अजूनही कोवळं राह्यलं आहे याची त्यांनाही कल्पना आली.

क्रमशः

कामीनी ट्रॅव्हल्सचा हा प्रवास पुढच्या भागांमधून कसा पुढे सरकतोय ते बघूया
-----------------------------------------------------
लेखिका मीनाक्षी वैद्य