कामीनी ट्रॅव्हल्स भाग २६
भय्यासाहेबांना आज दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला. भय्यासाहेबांनी स्वतःच्या कारनी घरी जाईन ॲम्ब्यूलन्स नको असं स्पष्ट सांगीतलं होतं.
डिस्चार्ज घेताना बिलींग डिपार्टमेंटमध्ये सगळे पैसे भरल्यावर भय्यासाहेबांना वाॅर्डबाॅयनी त्यांचे कपडे घालून व्हिलचेयर वर बसवलं.
भय्यासाहेबांच्या नजरेस कोणी येणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेतली. न जाणो यांच्यापैकी कोणाला बघून त्यांचा पारा चढला तर पुन्हा पंचाईत.
कारमध्ये भय्यासाहेबांना वाॅर्डबाॅयने बसवलं.आणि कारचं दार लावलं. एवढ्याश्या गोष्टींनी पण त्यांना दमल्या सारखं झालं. त्यांनी क्षणभर डोळे मिटले. आपल्या शेजारी कोणीतरी बसल्याचं त्यांना जाणवलं तसं त्यांनी डोळे उघडून बघीतलं तर बाजूला कामीनी बाई बसलेल्या दिसल्या.
"तुम्ही कशाला बसलात कारमध्ये? उतरा."
" अहो ओरडू नका. आत्ताच बरं वाटतंय तुम्हाला. मी घरी येतेय तुमच्याबरोबर."
" कशाला?"
"अहो तिकडे तुमची देखभाल कोण करणार? सध्या तुम्हाला रेस्ट घ्यायची आहे."
" शंकर कार थांबव."
शंकरनी कार थांबवली.
"उतरा खाली.काही गरज नाही तुमची. आपलं घर सोडून जाताना तुम्हाला माझी काळजी नाही वाटली आता कशाला नाटकं करताय? उतरा."
भय्यासाहेब जोरात ओरडले.घाबरून कामीनी बाई खाली उतरल्या.
मागे दवाखान्या जवळ असणा-या असणा-या लोकांना गेटजवळ कार का थांबली ते कळेना. थोड्यावेळानी कामीनी बाई कारमधून खाली उतरल्या आणि कार भरधाव गेटच्या बाहेर पडली. कामीनी बाई तिथेच उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. प्राची,राधा,अशोक वासंती, शशांक सगळेच कामीनी बाईंजवळ आले.
"आई काय झालं?का उतरलात कारमधून?"
प्राचीने विचारल्याबरोबर त्या एकदम रडायलाच लागल्या. प्राचीने त्यांना जवळ घेऊन थोपटलं.त्या थोड्या शांत झाल्यावर म्हणाल्या.
"मला गरज नाही असं म्हणाले. आपलं घर सोडून जातांना माझी काळजी वाटली नाही तर आता का नाटकं करता? ऊतरा खाली असं म्हणाले."
हे बोलतानाही कामीनी बाईंना हुंदका आला.
प्राची म्हणाली
"आई तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला तिकडे रहायला जायचय नं?"
त्यांनी मान हलवून हो म्हटलं.
" मी बघते काय करता येईल.आता आपण घरी जाऊ."
सगळे दवाखान्यातून आपापल्या घरी गेले.
प्राची आणि कामीनी बाई कार मधून घरी निघाल्या. प्राचीनी ड्रायव्हर नव्हता ठेवला कारण तिला कार चालवायला खूप आवडायची. आत्ता दोघी घरी निघाल्या. कामीनी बाई आपल्याच विचारात होत्या. प्राची पण विचारात होती. यावर काय उपाय सापडेल? अचानक तिला भय्यासाहेबांच्या बेस्ट फ्रेंडची आठवण झाली.
जयंत सरदेसाई. ते भय्यासाहेबांचे लंगोटीयार होते. भय्यासाहेबांचा ते कान पिरगळू शकतील एवढी दोघांची घट्ट मैत्री होती. एकदा तिची भेट झाली होती. दोघी आपल्याच विचारात होत्या. विचारात असूनही प्राचीनी यांत्रीकपणे कार चालवत बरोबर घरापाशी आणली. ती कामीनी बाईंना म्हणाली.
"आई तुम्ही घरी जा. मला एक काम आहे ते करून मी येते. "
यावर हो म्हणत कामीनी बाई कारच्या खाली उतरल्या. प्राचीनी थोडं समोर गेल्यावर कार एका जागी थांबवली.
प्राचीनी जयंत सरदेसाई यांना फोन लावला.
"हॅलो." पलीकडून आवाज आला.
" काका मी भय्यासाहेबांची सून प्राची बोलते आहे."
"बोल.आज कसा काय फोन केलास?"
"तुम्ही आहात का घरी?तुम्हाला वेळ असेल तर मला यायचं होतं. थोडं काम आहे तुमच्याशी."
" हो ये.मी घरीच आहे."प्राची फोन ठेवून कार सुरु केली.
***
प्राची जयंत सरदेसाई यांच्या घरी गेली.
"ये. बिझनेस वुमन आल्यात आमच्या घरी आज.आमची वास्तू पावन झाली."
" काका काय लाजवताय मला." प्राची म्हणाली.
" बोल काय काम आहे?"
" चार दिवसांपूर्वी भय्यासाहेबांना मासीव्ह हार्ट अटॅक आला होता."
" अगं काय सांगतेस? तरीच तो फोन उचलत नाही. मला कळेचना काय झालं. तसा आमचा भय्या सरकीट आहे थोडा.केव्हा काय त्यांच्या मनात येईल सांगता नाही येत. मला वाटलं असंच काहीतरी झालं असेल आणि या महाशयांचं डोकं फिरलं असेल म्हणून फोन उचलत नसेल."
यावर प्राची मनातच हसली आणि मनातच बोलली खरं आहे.
"काका आईंना त्यांची काळजी वाटते म्हणून त्या तिकडे राह्यला जाईन म्हणाल्या.पण भय्यासाहेबांनी त्यांना येऊ दिलं नाही. मला वाटतं तुम्ही त्यांना भेटून त्यांना समजवाव. आई इकडे राहिल्या तर त्या अस्वस्थ राहतील. त्याचा परीणाम हर्षवर्धनवर पण होऊ शकतो. हर्षवर्धन आत्ताच जरा सावरलाय.आईला सतत दु:खी बघून पुन्हा त्यांचं तंत्र बिघडलं तर पंचाईत."
" तू म्हणतेस ते बरोबर आहे.मी काय करावं असं तुला वाटतं?"
"काका ऊद्या तुम्ही भय्यासाहेबांना भेटायला जा.तुम्हाला त्यांच्या आजारपणाची बातमी शंकरनी दिली असं सांगा. मी शंकरला सांगून ठेवते. यदाकाचित त्यांनी शंकरला विचारलच तर तो हेच सांगेल."
" ठीक आहे.तू म्हणतेस तसं सांगतो."
"त्यांना पटवून द्या की आईंनी तिथे त्यांच्याजवळ असणं किती आवश्यक आहे.सध्या त्यांना आराम व्हावा म्हणून एक केयर केअर ठेऊया. आई तिथे एकट्या असतील त्यामुळे तो केयरटेकर असे पर्यंतच्या वेळेत शंकरला तिथे थांबायला सांगणार आहे."
" प्राची अगं केवढा विचार केलास. कौतुक वाटतं तुझं. इतका विचारं करणारी माणसं कमी आढळतात.मी तुला पूर्ण मदत करायला तयार आहे. हवंतर रोज सकाळी आणि संध्याकाळी एक तास त्यांच्याबरोबर गप्पा मारायला जाईन. माझ्याशिवाय त्याची अंडीपिल्ली कोणाला माहिती असणार त्यामुळे धाकात राहील थोडा."
एवढं बोलून ते हसले. प्राचीलाही हसू आलं.
" बरं काय घेणार तू? पहिल्यांदा आलीस आमच्याकडे. मी चहा काॅफी करून शकतो.आमची बायको गेली आहे भजनी मंडळात नाहीतर तिनी खायलाच केलं असतं."
"अहो खरच काही नको.मी पुन्हा येईन.तिकडे आई अस्वस्थ असतील त्यांना जाऊन सांगते. तुम्ही भय्यासाहेबांना सांगणार म्हटल्याने माझं टेन्शन दूर झालं. निघू मग." प्राची म्हणाली.
" हो निघ.मी ऊद्या जातो भय्याला भेटायला.नंतर करतो तुला फोन."
" ठीक आहे.निघते."
प्राची कारमध्ये बसून काय सुरु करणार तेवढ्यात संदीपचा फोन आला.
" मॅडम ते पाटेकर आलेत."
" हो का. ठीक आहे त्यांना बसव माझ्या केबीनमध्ये. चहा सरबत विचार. मी पोहचते पंधरा मिनीटात." प्राचीने फोन ठेऊन कार सुरु केली.
प्राची ऑफीसमध्ये पोचली केबीनमध्ये शिरताच पाटकरांकडे बघून म्हणाली,
" नमस्कार पाटकर साहेब"
"नमस्कार मॅडम" पाटकर म्हणाले.
प्राचीने बेल वाजवली. नोकर तुकाराम आत आला. त्याला ती सांगितलं,
"संदीप साहेबांना आत पाठवं." संदीप आत येतो
" संदीप केबीन बाहेर डू नाॅट डिस्टर्बचा बोर्ड लाव."
"हो लावतो."
संदीप लगेच मागं फिरला आणि त्याने तो बोर्ड दाराला लावला.
"पाटकर साहेब मला काम असं होतं आमच्या ऑफीसमध्ये अकाऊंट सेक्शनला एक नवीन मुलगा लागला आहे.तो फार चौकस आहे.चौकस असणं हा चांगला गुण आहे पण तो फक्त अकाऊंट सेक्शन मधेच असा चौकस असता तर काही वावगं वाटलं नसतं.पण तो इतर विभागातही खोलवर चवकशी करतो.मला त्या मुलांबद्दल सगळी माहिती हवी आहे."
किंचीत थांबून प्राची म्हणाली,
"सगळी म्हणजे सगळी. तो राहतो कुठे?ऑफीसशिवाय तो कोणाला भेटतो?त्याचे मित्र कोण आहेत? कुठल्या बारमध्ये जात असेल तर तिथे त्याचा कोण जवळचा आहे. रोज त्याला कंपनी देणारा कोण आहे? त्याच्या घरातल्या सगळ्यांची माहिती हवी आहे.आमच्या क्षेत्रातील कोणी त्यांच्या ओळखीचं आहे का? तो काम आमच्याकडे करतो त्याला आम्ही पगार देतोच पण इथली आतली माहिती आमच्या प्रतीस्पर्धीला देऊन तो तिथला पगार घेत असेल किंवा हे काम करण्यासाठीच त्या कंपनीने त्याला नेमलं असावं.
पाटकर साहेब या माझ्या मनातल्या शंका आहेत. त्या ख-या आहेत का?हे तुम्ही शोधून काढायचं आहे. याकामाला किती वेळ लागेल आणि या कामासाठी तुम्ही किती फी घ्याल ते सांगा. आणखी एक मला सगळ्याचे फोटो लागतील."
"हो मॅडम मी फोटो काढणारच आहे.मला एक महिन्याचा अवधी द्य्या. मी शोधतो. तुमच्या सगळ्या प्रश्नांची ऊत्तरं मला मिळाली की फोटोसहित येऊन तुम्हाला भेटतो. या कामासाठीच माझी फी १०,०००₹ आहे. पाच हजार आधी आणि उरलेले काम संपल्यावर.""
"ठीक आहे. संदीप चेकबुक आणि."
"हो आणतो." संदीप चेकबुक घेऊन येतो.प्राची त्यातील एक चेक घेऊन त्यावर पाटकरांचं नाव ,रक्कम लिहून त्यांना देते.
"संदीप आपल्या एम्प्लाॅईची फाईल आण त्यात विद्युतचा फोटो असेल तो यांना दाखव. तुम्ही फोटो काढून घ्या. त्याचं नाव पत्ता लिहून घ्या. मधेमधे जरा फाॅलोअप घेईल संदीप. ठीक आहे नं."
" हो नो प्राॅब्लेम.निघू."
" हो या." प्राची म्हणाली.
पाटकर गेल्यावर,
"संदीप माझं सध्या खूप वेळ ऑफीसमध्ये येणं जमणार नाही. तुझ्यावर जबाबदारी आहे.त्या विद्युत वर थोडं लक्षं असू दे."
" हो मॅडम तुम्ही काळ्जी करु नका."
"दोन तीन दिवसांनी त्या पाटकरांना फोन करून विचार कामाला सुरुवात केली आहे की नाही."
"हो. मॅडम माझ्या एक लक्षात आलं आहे. की दर एखादं तासांनी हा विद्युत कुठेतरी जातो."
" कुठेतरी म्हणजे कुठे जातो?" प्राचीने आश्चर्याने विचारलं.
" माहिती नाही" संदीप म्हणतो.
"रोजच जातो हा?" प्राचीने विचारलं.
" हो.ही गोष्ट मला खटकल्यावर मी निरीक्षण केलं तर त्याला मेसेज येतो. तो वाचला की लगेच हा हातातलं काम सोडून बाहेर जातो."
"येतो किती वेळाने येतो हे नोटिस केलं का?"
प्राचीने विचारलं.
" हो. साधारण पंधरा विस मीनीटांनी आत येतो."
"ही माहिती पाटकरांना दे. त्यांना त्यातून काही क्ल्यू मिळू शकतो. त्याचं सोशल मिडिया चेक कर तो आहे का बघ. काही संशयास्पद वाटलं तर तीही माहिती पाटकरांना दे.आणि तू सतर्क रहा. त्याला कळू देऊ नकोस की तू त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेस.ठीक आहे."
" हो मॅडम.येतो." संदीप केबीन बाहेर गेला..
प्राची स्वतःशीच विचार करत होती की विद्युत नेमका कोणाचा माणूस असेल? कोणी प्लांट केलं असेल त्याला इथे? ट्रॅव्हल्सच्या क्षेत्रात इतकी स्पर्धा आहे की आत्ता या क्षेत्रात आलेल्या कामीनी ट्रॅव्हल्सला एवढं यश मिळतंय हे पचत नसेल. या स्पर्धेच्या जगात बरेच जणं छुपे शत्रू असतात. ऊघडपणे वार करणारे दिसतात. छुपेरूस्तम दिसत नाहीत. विद्युत तर एक मोहरा असेल. मास्टर माईंड वेगळाच असेल.कळेल.
हर्षवर्धनच्या फोनमुळे तिची तंद्री भंगली.
"हॅलो.बोल "
" प्राची आई जेवली नाही. सकाळी तू घरी सोडून गेल्यापासून ती नुसतीच रडतेय. तू ये नं घरी.मला काही कळत नाही मी काय करु?"
" ठीक आहे काळजी नको करु मी लगेच निघते."
फोन ठेऊन प्राचीने बेल वाजवली.नोकर आत येतो.तसं ती म्हणाली,
"संदीपला पाठव आत."संदीप आत आल्यावर प्राची संदीपला म्हणाली.
"संदीप मला अचानक घरी जावं लागतंय. तुझ्यावर आणि यादव वर ऑफीस ची जबाबदारी आहे. मी निघते. यादवला सांग.मी आजपासून माझी केबीन लाॅक करून जाणार आहे. ठीक आहे."
" हो मॅडम." संदीप म्हणाला.
प्राची घाईनीच निघते.कार चालवतांना डोक्यात कामीनी बाईंबद्दलच विचार चालू असतात. तिच्या लक्षात येतं त्यांना त्या घरी पाठवायलाच हवं नाहीतर त्यांचीच तब्येत खराब होईल. रस्त्यावर ट्रॅफीक इतका होता. की कर मुंगीच्या पावलांनी चालली होती. प्राचीचं मन कधीच घरी जाऊन पोचलं होतं.कसाबसा रस्ता मोकळा झाल्यावर प्राचीने भन्नाट वेगाने कार चालवली
घरी पोचताच. कार पार्किंगमध्ये ठेऊन प्राची घाईनी घरात शिरली. कामीनी बाईंच्याकडे तिचं लक्ष जातं आणि तिला धक्काच बसला. त्या कुठेतरी हरवल्यासारखं बघत होत्या आणि डोळ्यांतून सतत पाणी येत होतं. प्राची हळूच त्यांच्या शेजारी जाऊन बसली तरी त्यांना कळलं नाही.
"आई असं का करतात?"
तिच्या बघताच त्यांना जोरात हुंदका फुटतो.त्यांना प्राची जवळ घेते.
"किती जोरात ओरडले ग ते माझ्यावर. माझी काळजी करणं म्हणजे त्यांना नाटक वाटलं.मी इतकी वाईट आहे."
त्यांना ती हळुहळू थोपटत होती. त्यांना तिनी मनसोक्त रडू दिलं. त्यांचा उमाळा शांत झाल्यावर प्राची त्यांना म्हणाली.
"आई अश्या तुम्ही न जेवता खाता राहिल्या तर त्यानी तुमची तब्येत बिघडेल.भय्यासाहेबांमध्ये सुधारणा होणार आहे का? तुम्हाला तिकडे राह्यला जाता येणार आहे."
" कसं? ते नाही म्हणाले मला."
"भय्यासाहेबांचे मित्र सरदेसाई काकांना मी आत्ता भेटले. ते ऊद्या आपल्या घरी जाणार आहेत आणि भय्यासाहेबांना पटवून देणार आहे की तुम्ही तिथे असणं किती आवश्यक आहे. दोन तीन दिवस थांबा. सरदेसाई काका रोजच जाणार आहेत आपल्या घरी. ते बरोबर त्यांना समजावतील. तुम्ही जेवा. अजून जेवला नाहीत. चला आपण दोघी जेवू."
असं म्हणून त्यांना उठवते. कामीनी बाई डोळे पुसत स्वयंपाक घरात जातात. प्राची फ्रेश व्हायला आपल्या खोलीत जाते. हर्षवर्धनला आईच्या रडण्याचं कारण कळत नाही.
हर्षवर्धनच्या मनात भय्यासाहेबांबद्दल प्रेम निर्माण होईल का?
----------------------------------------------------------
क्रमशः
लेखिका – मीनाक्षी वैद्य